Sunday, November 4, 2018

कसायाला गाय धार्जिणी

urban naxals के लिए इमेज परिणाम

भीमा कोरेगावची घटना घडल्यावर एकच काहुर माजवण्यात आले होते, की तिथे हिंदूत्ववादी संघटनांनी दलित व आंबेडकरवादी अनुयायांना मारण्यासाठीच दंगल घडवून आणली. तात्काळ त्या भागात प्रभावी असलेल्या मिलींद एकबोटे आणि संभाजी भिडे अशा दोन हिंदुत्वनिष्ठ व्यक्तींच्या अटकेची मागणी सुरू झाली. तेव्हा कोणालाही त्यात अधिक तपास किंवा पुराव्याची गरज भासलेली नव्हती. एका पोलिस ठाण्यात प्राथमिक तक्रार नोंदवली गेली आणि गदारोळ सुरू झाला. पण त्यातला पुण्याच्या एल्गार परिषदेचा संदर्भ मात्र कल्लोळ करणार्‍यांना अजिबात नको होता. हे नेहमीच होत आलेले आहे. आपल्याला हेतूला पुढे रेटण्यासाठी खोट्या बातम्या सोडायच्या आणि मग त्यावरून इतके काहूर माजवायचे, की पोलिस व तपास यातही गोंधळ उडाला पाहिजे. सत्याची गळपेची झालीच पाहिजे. म्हणून भिडे एकबोटे यांच्या अटकेची मागणी घेऊन काहुर माजवण्यात आले. आता त्याला नऊ महिने उलटून गेले असताना सरकारने भिडे यांच्या विरोधातल्या तक्रारी निकालात काढल्या आहेत. त्यात चौकशीही न करता तक्रारी रद्द झाल्याच्या बातम्या झळकल्या आहेत. पण जेव्हा असे काही होते, तेव्हाही मार्ग असतात. त्याविरुद्ध न्यायालयातही जाउन याचिका करता येत असते आणि नव्याने तपासाची मागणी होऊ शकते. पण तसे इथे झाले नाही. कारण आडातच नसेल तर पोहर्‍यात कुठून येणार? आरोप वा तक्रारीला सबळ करणारा कुठला पुरावा नसेल, तर तपासात तरी हाती काय लागणार? पण याच गडबडीत एक आणखी घटना घडलेली होती. एल्गार परिषदेच्या संदर्भात पुण्यातल्या दोन तरूणांनी एक गुन्हा पोलिसांकडे नोंदलेला होता. पण त्यातल्या संशयितांना अटक करण्याची मागणी लावून धरण्यासाठी त्यांच्या पाठीशी विचारवंत वा मध्यमातले कोणी दिग्गज उभे नव्हते. म्हणून ती तक्रार दुर्लक्षित राहिली. तिचा गाजावाजा फ़ारसा झालाच नाही.

भीमा कोरेगावच्या पूर्वसंध्येला पुण्याच्या शनवारवाड्यापाशी एक भव्य परिषद भरवण्यात आलेली होती. एल्गार परिषद म्हणून योजलेल्या या सोहळ्यात देशाच्या विविध भागातून व कानाकोपर्‍यातून अनेक पुरोगामी व डाव्यांसह नक्षलींचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यात चिथावणीखोर बोलू शकणार्‍या उठवळ लोकांनाही अगत्याने आमंत्रित करण्यात आलेले होते. त्यामुळे त्यातील उथळ तितक्याच भडकावू भाषणांचा पाऊस पाडला गेला आणि दुसर्‍या दिवशी त्यातले निवडक लोक भीमा कोरेगावच्या कार्यक्रमाला गेले. त्या निवडक लोकांचा यापुर्वी अशा सोहळ्यात समावेश नसायचा. पण तिथे लोटणार्‍या आंबेडकरी समाजात घुसून दंगल करायची आणि मग दलित सवर्ण असा संघर्ष माजवून नक्षली अजेंडा आंबेडकरी समाजात रुजवायचा व्यापक प्लान होता. तो कमालीचा यशस्वीही झाला होता. कारण लगेच त्यावरून महाराष्ट्रात अनेक दलित वस्त्यांमध्ये संतापाची लाट आली आणि त्यावर आपली पोळी भाजून घ्यायला टपलेल्या नेत्यांनी महाराष्ट्र बंदची हाकही देऊन टाकली. मात्र त्यांचा मोठा अपेक्षाभंग झाला. कारण त्यांना किंवा नक्षली सुत्रधारांना अपेक्षित असलेली पोलिस दडपशाही झाली नाही. लाठीमार गोळीबार झाला नाही, की सरकारच्या हिंसेचे भांडवल करण्याची संधी नाकारली गेली. दोनच दिवसात सर्वत्र जनजीवन सुरळीत सुरू झाले. हळुहळू भीमा कोरेगाव आणि भिडे एकबोटे विषय मागे पडले. त्यात तथ्य नव्हतेच. पण दरम्यान जी तक्रार एल्गार परिषदेच्या निमीत्ताने दाखल झालेली होती, तिचे धागेदोरे शोधले जात होते आणि ते देशाच्या कानाकोपर्‍यात पोहोचलेले असताचे पुरावेही हाती येत होते., तुषार दामगुडे व अक्षय बिक्कड अशा दोन तरूणांनी परिषदेच्या तपशीलाला घातलेला हात, खुप दुरवर जाऊन पोहोचला होता. त्यावर शांतपणे पोलिसांनी काम केले आणि सात महिन्यात नक्षलींसह पुरोगाम्यांचे धाबे दणाणले.

या एका घटनेने व तपासाने दिर्घकाळ मुखवट्याच्या आड लपलेला वास्तविक माओवादाचा हिडीस चेहरा समोर आणला गेला. ऑगस्ट महिन्यात पुणे पोलिसांनी दिल्ली व अन्यत्र एकाच वेळी छापे मारून अनेक नामवंत नक्षली सुत्रधारांना ताब्यात घेण्याची कारवाई सुरू केली. मग कुणालाही बेछूट गोळ्या घालणार्‍यांना मानवाधिकार व लोकशाहीतील मतभिन्नतेचे महत्व आठवले. त्या अटकेची कारवाई होण्यापुर्वीच एकाहून एक नामवंत लोक व वकील थेट सुप्रिम कोर्टात धावले आणि या सुत्रधारांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात अडथळे उभे करण्यात आले. कारण मुळ योजनेत आपण पकडले जाण्याची शक्यताही गृहीत धरलेली नव्हती. एल्गार परिषद आयोजकांपासून सर्व चेहरे व्यवहारातले मुखवटे होते. त्यांना जग फ़सते यावर इतका अगाध विश्वास होता, की कोणी तक्रार करील आणि तपासाचे धागेदोरे जुळत माओवादी नक्षलींच्या खर्‍या सुत्रधारांपर्यंत पोहोचतील असे कोणाला स्वप्नातही वाटलेले नव्हते. म्हणूनच ऑगस्ट महिन्यात पोलिसांच्या धाडी पडल्या, तेव्हा एकामागून एक नामवंतांची झोप उडालेली आहे. मात्र यात त्यांचा एक अपेक्षाभंग होऊन गेलेला आहे. जंगल भागात आणि आदिवासी विभागातून नक्षलवाद अस्ताला चालला आहे. त्यात पांढरपेशे खुप आहेत आणि त्यासाठी गुंतवणूक करणारा देशविदेशातला पैसे पुरवणारा वर्गही उपलब्ध आहे. समस्या झाली आहे, ती जीवावर उदार होत शहीद होणार्‍या बळीच्या बकर्‍यांची. मोदी सरकार आल्यापासून नक्षली समस्या दोन पातळीवर हाताळली जाते आहे, त्याचा हा परिणाम आहे. एकीकडे पोलिस कारवाई व हिंसाचाराचा बंदोबस्त कडेकोट चालू आहे. तर दुसरीकडे त्यात फ़सलेल्या अडकून पडलेल्यांना मुक्त करून त्यांचे पुनर्वसन करण्याची योजनाही चांगली चालली आहे. परिणामी जुने मुरलेले नक्षली कमी झालेत आणि नवी भरती एकदम बंद पडली आहे.

नक्षली वा तत्सम क्रांतीकारी सशस्त्र लढाईच्या संघटना या मुख्यत: वैफ़ल्यग्रस्तांचा जमाव असतो. त्याला कुठल्याही समाजाशी कर्तव्य नसते. न्याय-अन्याय अशाही गोष्टींशी त्यांना सोयरसुतक नसते. त्यांच्या डोक्यातल्या कल्पना व समजूतीनुसार हे लोक जगाचे आकलन करत असतात. त्याचा वास्तवाशी दुरान्वयेही संबंध नसतो. जगात घडणार्‍या घटनांना ते आपल्या कथाकल्पनेत घुसडून अर्थ लावत असतात. कालपरवा केरळात पावसाने उच्छाद मांडला आणि अर्ध्याहून अधिक केरळ पाण्यात बुडालेले होते. त्यावेळी काही लोकांनी साबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशाचा आग्रह धरल्याच्या पापाची फ़ळे असली मुक्ताफ़ळे उधळली होती. असले संबंध जोडण्याची जी कुबुद्धी अल्पमती असते, त्यापेक्षा डाव्या मार्क्सवादी माओवादी अकलेची झेप कधी जात नाही. सहाजिकच असे लोक प्रत्यक्ष घटनाक्रमातून आपले सिद्धांत पुढे रेटायला उतावळे असतात. त्यात वैफ़ल्यग्रस्त सहज बळी पडतात. ज्यांना कोणाला सोपी उत्तरे हवी असतात, त्यांना कधीच विवेकबुद्धी वापरता येत नाही की मिमांसा परवडत नसते. मग ते अंधश्रद्ध असोत किंवा अंधश्रद्धा निर्मूलनवाले असोत. कुठल्याही विचारधारेची गुलामगिरी पत्करली, मग ते आहारी जात असतात आणि त्यात आपली चिकित्सक बुद्धी गहाण टाकण्याची पहिली अट असते. त्यामुळेच अशा लोकांना नेहमी वैफ़ल्यग्रस्तांचा शोध असतो. सध्या बाकीच्या पातळीवर नक्षलवाद्यांना अपयश आलेले असले तरी त्यांना नाकर्ते राजकीय वैफ़ल्यग्रस्त मोठ्या संख्येने सापडलेले आहेत. व्यवहारी राजकीय जीवनात अपेशी ठरलेल्या आजवरच्या ऐतखाऊंची संख्या हल्ली कमालीची वाढलेली आहे. निवडणूका व राजकारणात फ़सलेल्या अशा लोकांना जग पुरोगामी म्हणून ओळखते. त्यांना थेट मोदी-भाजपाशी दोन हात करणे अशक्य असल्याने, त्यांना नक्षली माओवाद्यात तरंगणारी काडी आपल्याला वाचवू शकेल अशी आशा जागलेली आहे.

भाजपा किंवा मोदींचे सरकार कालपरवा चार वर्षापुर्वी सत्तेत आलेले आहे. त्यापुर्वी म्हणजे आरंभापासून नक्षलवादाचा बंदोबस्त कॉग्रेस किंवा अन्य पुरोगामी पक्षांनाच करावा लागलेला आहे. आधीच्या दहा वर्षात युपीए म्हणून कॉग्रेसच राज्य करीत होती आणि तेव्हाचे गृहमंत्री व पंतप्रधान काय म्हणत होते? त्यांनीच नक्षलवाद हा भारताच्या अंतर्गत सुरक्षेला सर्वात मोठा धोका असल्याची विधाने केलेली होती ना? पण आज त्यांचेच नेते वकील नक्षलींच्या अटकेला विरोध करीत पुढे सरसावले आहेत. कारण त्यांना भाजपा व मोदींच्या विजयी घोडदौडीला रोखण्याचा अन्य मार्ग सापडलेला नाही. स्वबळावर मोदींना रोखता येत नाही, या वैफ़ल्य भावनेने त्यांना पछाडलेले आहे. मग कुठल्याही मार्गाने व कोणाच्याही मदतीने मोदींना रोखण्याची इच्छाशक्ती अनावर झाली तर नवल नाही. कम्युनिस्ट नेता लेनिन त्यालाच युझपुल इडीयट असे संबोधतो. त्याचा अर्थ असा, की असे दिडशहाणे स्वत:साठी मुर्ख असतात आणि त्यांच्या मुर्खपणाचा लाभ त्यांच्याच शत्रूंना उठवता येत असतो. जे इथले पुरोगामी आज करत आहेत, ती इराणच्या अलिकडल्या इतिहासाची पुनरावृत्ती आहे. १९७० दशकाच्या अखेरीस इराणमध्ये तिथल्या हुकूमशहाच्या विरोधातली मोठी लढाई कम्युनिस्ट विद्यार्थी व कामगार संघटनांनी आरंभलेली होती. पण त्याला लोकांचा पुरेसा पाठींबा मिळत नव्हता. तर दुसरीकडे तिथून परागंदा झालेला धर्मांध नेता आयातुल्ला खोमेनी पॅरीसमध्ये दडी मारून बसलेला होता. पण धार्मिक कारणाने त्याला तिथल्या शियापंथील लोकसंख्येचा मोठा पाठींबा होता. सहाजिकच त्याचा लाभ उठवण्यासाठी कम्युनिस्टांनी आपल्या आंदोलनाचा चेहरा म्हणून खोमेनीचा चेहरा जागोजागी झळकवला होता. त्यातून मोठा उठाव झाला, भडका उडाला आणि एके दिवशी इराणच्या शहाला गाशा गुंडाळून अमेरिकेचा आश्रय घ्यायला फ़रारी व्हावे लागले. पुढे काय झाले?

इराणचा शहा गेला पळून आणि मागे उरलेल्या त्याच्या पोलिस व लष्करी अधिकार्‍यांचे आधी शिरकाण झाले. त्याला पाठीशी घालणार्‍या अमेरिकन सरकारच्या विरुद्ध संताप झाला तर जमावाने वकीलातीला वेढले होते. त्यातही कम्युनिस्टांचाच पुढकार होता. पण जमाव बेफ़ाम झाला आणि पॅरीसहून खोमेनी तेहरानला पोहोचला. त्याने रितसर सत्तासुत्रे हाती घेतली व आपल्या कळसुत्री नेत्याला सत्तेवर बसवले. तिथे मग खोमेनीचा शब्द हा़च कायदा झाला. त्यातला अडसर कम्युनिस्ट नेते व संघटना होत्या. खोमेनीने सर्वप्रथम अशा तमाम कम्युनिस्ट संघटना व नेत्यांना उचलून आत टाकले. मग एक एक करून त्यांचा खात्मा करून टाकला. मुद्दा इतकाच आहे, की तिथले कम्युनिस्ट स्वत:साठी किंवा झटपट कांती करण्यासाठी खुळे झालेले होते. सोपा मार्ग म्हणून खोमेनीला हाताशी धरून त्यांनी क्रांती केली खरी. पण तिचे पहिले बळीही त्यांनाच व्हावे लागले होते. ते खोमेनीसाठी उपयुक्त ठरले होते आणि स्वत:साठीच मुर्ख ठरलेले होते. आज भारतातल्या पुरोगाम्यांची अवस्था किंचीतही वेगळी नाही. ते स्वत:साठी खुळे आणि त्यांच्याच शत्रूसाठी उपयुक्त बनून गेले आहेत. नक्षलींचाच मुद्दा घ्या. मोठ्या आवेशात या सात नक्षली सुत्रधारांचे वकीलपत्र घ्यायला कॉग्रेसचे दिग्गज पुढे सरसावले. पण त्या़च नक्षली माओवाद्यांनी काही वर्षापुर्वी छत्तीसगड राज्यातील कॉग्रेसच्या एका यात्रेवर हल्ला करून, त्यात सगळेच्या सगळे कॉग्रेसनेते ठार मारून टाकलेले होते ना? नाव घेण्यासारखा कोणी कॉग्रेसनेता आज त्या राज्यात शिल्लक उरलेला नाही. ज्या रमणसिंग नामक भाजपा नेत्याला संपवायला कॉग्रेस उतावळी झालेली आहे, त्याने तर कुठल्या कॉग्रेस नेत्याला मारलेले संपवलेले नाही ना? मग कॉग्रेसचा खरा शत्रू नक्षली आहेत की निवडणूकीतून सत्तांतर घडवणारी भाजपा आहे? नक्षलींसाठी कॉग्रेस व भाजपा हे सारखेच वर्गशत्रू आहेत ना?

जी कहाणी नक्षलींची तीच जिहादींचीही आहे. कॉग्रेस वा पुरोगामी म्हणवणार्‍या पक्ष संघटनांना भाजपा आपला शत्रू वाटतो. पण त्याच्याशी निवडणूकीत दोन हात करणे शक्य नसल्याने हे लोक वैफ़ल्यग्रस्त होऊन गेलेले आहेत. मग त्यांना भाजपाला पराभूत करण्य़ासाठी जिहादीही जवळचे वाटू लागले आहेत. मणिशंकर अय्यर यासारखे कॉग्रेसनेते पाकिस्तानात जाऊन मोदींना पराभूत करण्यासाठी मदतीची भीक मागतात. एकूण कॉग्रेस पक्ष व राहुल गांधी नेहरू विद्यापीठात जाऊन अफ़जल गुरू या फ़ाशी गेलेल्या जिहादीच्या स्मृतीदिनाच्या सोहळ्यातही सहभागी होऊ शकतात. त्याला व्यवहारी खुळेपणा म्हणतात. कारण भाजपाच्या राज्यात निदान निवडणूका होण्याची हमी आहे. भाषण स्वातंत्र्य अबाधित आहे. पण नक्षली प्रभावक्षेत्रात गेल्यास जीवाला मुकावे लागत असते. कालपरवाच तेलगू देसमच्या आजीमाजी आमदाराची हत्या झालेली आहे. जिहादी प्रदेशातही वेगळी कथा नाही. पण आज हे पुरोगामी त्यांनाच हातभार लावत आहेत. वरकरणी या पुरोगामी राजकारणाकडे बघितले म्हणजे आपल्याला ते लोक बोटचेपे वा तुष्टीकरण करणारे वाटतील. पण वास्तविकता वेगळीच आहे. प्रचलीत संसदीय लोकशाहीत व निवडणूकीच्या राजकारणात नरेंद्र मोदी वा भाजपाला पराभूत करण्याची अपेक्षा त्यांनी गमावलेली आहे. सतत पराभव किंवा नाकर्तेपणाने त्यांना ग्रासलेले आहे. त्यामुळे वैफ़ल्यग्रस्त झालेली ही मंडळी आहेत. तसे ते नक्षली संघर्षात निरूपयोगी लोक आहेत. त्यांचा लढायला वा प्रतिकाराला काही उपयोग नाही. पण त्यांच्यापाशी साधने आहेत आणि ती नक्षली चळवळीला मिळाली तरी तिला त्यांच्या विनाशातून पुढली काही पावले टाकायची संधी मिळते आहे. उद्या त्यात यापैकी कोणू बाधा आणली, तर पहिला बळी अशाच कॉग्रेसनेत्यांचाच घेतला जाईल. राजीव गांधी यांचा तामिळी वाघांनी कशासाठी बळी घेतला होता?

कुठल्याही हिंसक अराजकीय सशस्त्र संघर्ष चळवळीत सुत्रधार हे बाकीच्यांना बळीचे बकरे म्हणून वापरत असतात. मग तो अल कायदाचा ओसामा बिन लादेन असो वा तामिळी वाघांचा प्रभाकरन असो. तिथे कायदा जुमानला जात नाही आणि माणुसकीला स्थान नसते. मालक गुलाम अशीच फ़ौज असते. यात राजीव गांधी सारख्याचा बळी जात असेल, तर सामान्य पुरोगामी नेत्यांचे काय? ते सोयीचे मोहरे असतात. त्यांचा आज असा भ्रम आहे, की आपण नक्षली वा माओवाद्यांना वापरून घेत आहोत. पण व्यवहारात गरज संपते तेव्हा अशा मोहर्‍यांचा बळी घेतला दिला जात असतो. शिकारी स्वत:च कधी शिकार होऊन गेले, त्याचा त्यांनाही पत्ता लागत नसतो. म्हणून तर बाकीचे पुरोगामी नक्षलींच्या समर्थनाला धावून पुढे आले, तितका उत्साह ममता बानर्जींनी बंगालमध्ये दाखवला नाही. त्यांनी यशस्वीपणे डाव्यांना संपवायला नक्षली गटांचा उपयोग करून घेतला होता. पण सत्ता हाती आल्यावर त्याची किंमत त्यांच्याही लक्षात आली होती. ममतांनी अतिशय साळसुदपणे आपल्या राज्यातल्या नक्षलींचा काटा काढण्याची मोहिम हाती घेतली. किशनजी हा नक्षली नेता आरंभी ममतांच्या व्यासपीठावरही दिसत असे. एक दिवस त्याची चकमकीत हत्या होऊन गेली. त्यानंतर ममता सातत्याने माओवाद्यांच्या विरोधातच राहिल्या. आताही त्यांनी बाकीच्या पुरोगाम्यांच्या कोरसमध्ये आपला सुर मिसळलेला नाही. काहीजण साध्या अनुभवातून शिकतात, धडा घेतात. काहीजण कितीही चटके बसून शहाणे होत नाहीत. ते आगीशी खेळण्यात चतुराई समजून खाक होत असतात. त्यांना कोणी वाचवू शकत नाही. त्यांना त्यातून कोणी सुखरूप बाहेरही काढू शकत नसतो. गेल्या चारपा़च वर्षात भारतातले उदारमतवादी व पुरोगामी त्याच थराला जाऊन पोहोचले आहेत. त्यांचा कपाळमोक्ष त्यांनीच योजून ठेवला आहे. त्याला मोदी काही करू शकत नाहीत, की नक्षली काही करू शकणार नाहीत.

इतका मोठा तमाशा करूनही सुप्रिम कोर्टाला नक्षली संशयितांना साधा जामिन मंजूर करता आला नाही, यातच मंडळी किती गाळात रुतलेली आहेत, त्याचा खुलासा होऊ शकतो. दुसरीकडे यापैकी कोणी संभाजी भिडे वा मिलींद एकबोटे यांना अटक झालीच पाहिजे वा तपास करून घेण्य़ासाठी कोर्टाचे दार ठोठावू शकला नाही. यातूनच काय वास्तव आणि कुठला आभास या़चे स्पष्टीकरण होऊन जाते. डाव नक्षली माओवाद्यांचा आणि त्यात उतावळेपणाने पुरोगामी फ़सलेले आहेत. मोदी विरोधाच्या अतिरेकात त्यांनी नक्षलींची तळी उचलून धरली, त्याला आत्महत्या म्हणता येईल. कारण त्यामुळे मोदी सरकारवर कुठले बालंट येऊ शकलेले नाही आणि इतका प्रचार करूनही भाजपाची मते कमी होण्याची बिलकुल शक्यता नाही. उलट अशा मुर्खपणामुळे आधीच पुरोगाम्यांनी लोकांच्या मनात स्वत:विषयी शंका निर्माण केल्या आहेत. त्याची किंमत या सर्व पुरोगामी पक्षांना उद्या मतदानात मोजावीच लागेल. छत्तीसगडमध्ये कॉग्रेसला वा आंध्रप्रदेशात दोन आमदार मारले गेल्यावर चंद्राबाबू नायडूंना! म्हणूनच अशा मुर्खपणाला मी नक्षलींच्या बाबतीतला पुरोगाम्यांचा बोटचेपेपणा अजिबात समजत नाही. तो त्यांचा मुर्खपणा असतो. पंचातंत्रातली गोष्ट आहे. एक म्हातारा बगळा तलावातल्या जलचरांना जवळच्या कुठल्या मोठ्या तळ्यात नेवून सोडण्याच्या आमिषाने एक एक करून घेऊन जातो आणि खावून फ़स्त करतो. नक्षली जिहादी माओवादी खुळ्या पुरोगाम्यांना तसेच संपवणार आहेत. संपवत आहेत. पुर्वजांनी उगाच म्हणून ठेवलेले नाही, कसायाला गाय धार्जिणी! ही सगळी त्याची अवलाद आहे. गळ्यात हार घालून खाटीकखान्याकडे धावत सुटलेली फ़ौज! दुरच्या जंगलातल्या वाघाला खाटीक मारणार अशा भ्रमाने खाटकाचे हात बळकट करायला निघालेली. त्यांना तेही वाचवू इच्छित नसतील तर जगातली अन्य कुठली शक्ती ते काम करू शकेल?

13 comments:

  1. भाउ तुम्ही म्हनता तस दिडशहाणेपण या नक्षलींच्या पाठीराख्यांनी केलच आहे सुधा भारद्वाजला पहिल्यांदा फक्त दोन दिवस कस्टडी दिली हेोती खालच्या कोरटाने नंतर ती सुटली पण असती ती पोलीसांना वेळ पन नव्हता लगेच केस उभ करायला हे अतिशहाने सुप्रीम केोरटात गेले2 महिने नजरकैद वआता कोठडी वकील वैफल्यग्रसित काॅंाॅंगर्चा होता म्हनुन ठिकय नाहीतर कोटियावधी फी होते मनु सिंघवीची २ महिन्याची,आणि बदनामी झाली ती वेगळीच आमच्यासारख्याला तर हे लोक माहित नवते आता जग नक्षली म्हनुन ओळखतय त्यांना

    ReplyDelete
  2. आपके आकलन की दाद देता हूँ.

    ReplyDelete

  3. कसायाला गाय धार्जिणी हे उदाहरण भारतीय मतदाराला देखील अगदी चपखल पडते. सगळे दुर्गुण देशविघातक गोष्टी समोर उघड दिसत असून पण ते काँग्रेस लाच मत देतील हि आता खात्री पटायला लागली आहे. त्यांनाच काँग्रेस हवी असेल तर त्याला मोदी किंवा शाह काय साक्षात ब्रह्मदेव देखील काही करू शकत नाही.... सध्याच्या वातावरणावरून असे दिसते कि पुन्हा काँग्रेस १७६० पक्षांचं कडबोळं येईल. मोदींनी सरकारी तिजोरीत भरलेल्या पैश्यावर ताव मारतील,थोडे शिंतोडे लोकांवर उडवत लोकांना पण खुश करतील. लोकांना तेच चांगले वाटेल आणि अजून ५ वर्ष सत्ता काँग्रेस ला मिळेल पण या १० वर्षात भारताचे तुकडे सुद्धा पडलेले असतील किंवा अजून काही भयानक झालेले असेल. मी मोदी समर्थक असूनही मला हि शक्यता जास्तीत जास्त खरी होईल असे वाटत आहे... परमेश्वर असं न होवो.

    ReplyDelete
  4. भाऊ, दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा... 🙏

    ReplyDelete
  5. भाऊ,
    तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

    ReplyDelete
  6. bhau raj thakre hyanche nawin rajkiy watchali war tumche vichar vachayala awadtil..
    thanks

    ReplyDelete
  7. Wish you and your family including all blog reader's very happy,heal hea n intellectually prosperous Diwali

    ReplyDelete
  8. भाऊसाहेब पुढील लेखाची वाट बघतोय

    ReplyDelete
  9. कसायाला गाय धार्जिणी या म्हणीचा अर्थ अध्याप नीट समजला नव्हता. पंचतंत्रातील गोष्ट पुरोगामी आघाडीने वाचली असेल पण ते त्यातील भक्ष्य बनले आहेत याचे भान त्यांना नाही हे भाऊंच्या तिखट लेखनातून वाचायला मिळते आहे...

    ReplyDelete
  10. छान लिहिले आहे.प्रत्येक समाजव्यवस्थेत काही 'नाही रे'असतात. त्यांची नावे वेगवेगळी असतात उदा कष्टकरी, आदीवासी, बेरोजगार, वंचित जाती इ. त्यांना सतत शांत ठेवावे लागते. कारण, माओवादी, संपवावी,जिहादी, प्रकाश आंबेडकर वादी त्यांना हिंसेला चेतवत असतात.लेख छान आहे.मोदी जागरूक आहेत, यात समाधान. शेअरिंग

    ReplyDelete