१९८६ सालात मी ‘मार्मिक’ या साप्ताहिकाचा कार्यकारी संपादक म्हणून काम करत होतो. शिवसेना त्याच काळात आपला व्याप अवघ्या महाराष्ट्रात विस्तारत होती आणि प्रथमच सेनेला मुंबई महापालिकेची सत्ता एकहाती मिळालेली होती. त्याच दरम्यान माझ्या धाकट्या भावाचे लग्न निघाले होते. मला अशा कौटुंबिक सोहळ्याचे अजिबात आकर्षण नाही. म्हणून मी सहसा भावंडांच्या लग्नातही पुर्ण वेळ कधी हजर राहिलो नाही. सहाजिकच घरच्या लग्नासाठी कुठल्याही मित्र परिचिताला आमंत्रण देण्याचा माझा स्वभाव नाही. पण अगदीच जवळचे असतात, ते नाराज होतात. म्हणून औपचारिक आमंत्रण द्यायचो. तेव्हा प्रमोद नवलकर मार्मिकच्या कामात लक्ष घालायचे आणि आठवड्यातले तीन दिवस कार्यालयात यायचे. सहाजिकच त्यांना आमंत्रण देण्याला पर्याय नव्हता. लग्नाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी नवलकर कार्यालयात आले असताना त्यांना मी पत्रिका दिली आणि तेही चिडलेच. आज पत्रिका देता? असा काहीचा नाराज स्वर त्यांनी लावला. मग काही क्षणातच त्याना स्मरल्यासारखे म्हणाले, ‘साहेबांना दिली का पत्रिका?’ मी नकारार्थी मान हलवली, तर ते कमालीचे विचलीत झाले. आपल्या व्यापातून बाळासाहेब कुठे लग्नाला वेळ काढू शकणार होते? म्हणजे असे माझे तर्कशास्त्र होते. पण आमंत्रण दिले नाही तर साहेब रागावतील, असा इशाराच नवलकरांनी दिला आणि लग्नाच्या आदल्या रात्री आठच्या सुमारास मी मातोश्रीवर पोहोचलो. साहेबांना पत्रिका दिली आणि त्यांनीही इतक्या ‘उशिरा’ असा सूर लावलाच. मग थातूरमातूर उत्तर दिले. त्यावर त्यांनी चक्क लग्नाला येत असल्याचे सांगून टाकले. आता माझी पंचाईत होती. कारण साहेब येणार म्हणजे संपुर्ण वेळ लग्नात हजर रहण्याखेरीज मला पर्याय नव्हता. पण विषय तेवढ्यावर संपला नाही, तितक्याच सहजपणे साहेबांनी मला विचारले, ‘शिरीला पत्रिका दिली का?’
शिरी म्हणजे श्रीकांत ठाकरे. बाळासाहेबांचे कनिष्ठ बंधू व तेच मार्मिकचे आरंभीपासूनचे प्रकाशक होते. संपादकाला पत्रिका दिली तर प्रकाशकालाही देणे आवश्यक होते. मी ठोकून दिले की दिलीय पत्रिका म्हणून! पण प्रत्यक्षात मी श्रीकांतजींना पत्रिका दिलेली नव्हती. पण आता थाप मारलीच आहे, तर धावपळ करणे भाग होते आणि मला तितक्या उशिरा बांदरा येथून पुन्हा शिवाजी पार्कला येणे भाग झाले. श्रीकांतजी काहीसे मितभाषी व कोरड्या स्वभावाचे. इतक्या रात्री त्यांचे दार वाजवले आणि ते चिडलेलेच सामोरे आले. त्यांना पत्रिका देण्यास आलो म्हटल्यावर ते भडकलेच. उद्या लग्न आणि आज रात्री पत्रिका? पुन्हा थाप मारणे आले. दिवाळी अंकाच्या कामात गढलो होतो. सवड आता मिळाली म्हणून त्यांची समजूत काढली. मनातल्या मनात म्हटले, त्यांनी आपल्या थोरल्या भावाशी यावर बोलू नये म्हणजे झाले. दुसरा पुर्ण दिवस मग मला लग्न सोहळ्यात व हॉलवर थांबावे लागलेले होते. साहेब येणार हे घरात सांगितलेले असल्याने भावाचे मित्र व बहुतांश नातलग उशिरापर्यंत थांबलेले होते आणि साहेब साडेआठ वाजता मीनाताई, कुमूदताई व श्रीकांतजींना घेऊन आले. तेव्हा त्यांच्याभोवती सुरक्षा रक्षकांचा मोठा गराडा नसायचा. एकदोन पोलिस असत. त्यांना थेट मंचावर नेवून नवरानवरीला भेटवले आणि त्यांचे आशीर्वादही झाले. मग खाली आल्यावर त्यांनी काही पेय वगैरे घेतले नाही. पण मला एका वृद्धेकडे बोट दाखवून ओळख विचारली. ही महिला त्यांना परिचीत वाटत होती. शिवसेनेच्या आरंभीच्या महिला आघाडीत ती कार्यरत असल्याचे त्यांनी अगत्याने सांगितले, मी त्यांना तिच्यापाशी घेऊन गेलो, ती माझी आई होती. अर्थात वयाने ती साहेबांपेक्षाही मोठी होती. काही बोलायचे म्हणून ती सीटवरून उठून उभी राहिली, तर साहेब व मीनाताई तिच्या पाया पडले. हा सगळा भाग माझ्या आईला चक्रावून टाकणारा होता. मलाही चकीत करणारा होता.
मिश्किल हास्य करीत माझ्या पाठीवर थाप मारून साहेब म्हणाले, ज्येष्ठांचा सन्मान ठेवायचा असतो. इकडे माझ्या आईचे डोळे अश्रूंनी डबडबले होते. जमलेली मंडळीही थक्क झालेली होती. पण ह्या सर्वाचे कारण असलेल्या बाळासाहेबांचे तिकडे अजिबात लक्ष नव्हते. त्यांनी खांद्यावर हात टाकला आणि मला मंचाच्या एका बाजूला नेले. काहीतरी ते कुजबुजल्यासारखे माझ्याशी बोलत असल्याचे इतरांना दिसत होते. पण ऐकू येत नव्हते की समजत नव्हते. शिवसेनाप्रमुख भाऊच्या खांद्यावर हात टाकून काय कानगोष्ट करीत असतील, याची प्रत्येकाला उत्कंठा असणे स्वाभाविकच असणार. महाराष्ट्रात उदयास येऊ घातलेल्या नव्या पक्षाचे सर्वोच्च नेते असलेले बाळासाहेब मला काय सांगत असतील, ही इतरांची उत्सुकता मलाही कळत होती. अर्थात काहीतरी राजकीय विषय असेल वा काही राजकीय लिखाणाविषयीच आम्ही बोलत असणार, हे सर्वांचेच गृहीत होते. कारण साहेबांचा अविर्भाव आदेश देण्याचा होता किंवा जाब विचारल्यासारखा होता. पण मी हसत हसत त्यांच्याशी बोलत होतो. म्हणून बहुतेक उपस्थित बुचकळ्यात पडलेले होते. दहाबारा मिनीटातच साहेब निघून गेले आणि तात्काळ पाहुण्यांनी साहेब काय सांगत होते, म्हणून माझ्यावर सरबत्ती केली. मात्र आमच्यात झालेला संवाद तिथे कोणालाही जाहिरपणे सांगण्यासारखा नव्हता. अनेकदा अशा मोठया व्यक्तींच्या आयुष्यातील घटना त्यांच्या व्यक्तीमत्वाला धरूनच टिकवाव्या लागत असतात. बाळासाहेब त्याला अपवाद होते. तरीही त्यांच्याशी तेव्हा झालेला माझा संवाद जाहिररित्या कथन करणे मला योग्य वाटले नाही. कारण तो संवाद अतिशय हास्यास्पद वा निरासग होता. बघणार्यांच्या कल्पनेपलिकडला होता. ज्या लग्नाला साहेब आलेले होते, त्याची जी इंग्रजी पत्रिका मी त्यांना दिलेली होती. त्यापेक्षा वेगळी एक पत्रिकाही छापलेली होती आणि तीही त्यांना हवी होती. इतकेच आमच्यात बोलणे झालेले होते.
आपल्याकडे लोक लग्नाच्या वा कुठल्याही समारंभाच्या आकर्षक वा खर्चिक आमंत्रण पत्रिका छापतात आणि तरीही त्या कोणी उघडूनही बघत नाहीत. तुम्ही आमंत्रण द्यायला गेलात, मग हातात पत्रिका घेतानाच समोरचा विचारतो, अरे वा, कुठला मुलगा वा मुलगी आहे? विवाहस्थळ कुठे आहे? तारीख कोणती आहे? म्हणजे इतका खर्च करून बनवलेली पत्रिका वाचलीही जात नाही. मला त्याचा खुप राग यायचा. म्हणून माझ्या भावंडांच्या लग्नात मी नेहमीच चमत्कारीक पद्धतीने आमंत्रण पत्रिका छापलेल्या होत्या. त्या पत्रिका हाती घेणार्याला वाचाव्याच लागत असत. थोरल्या बहिणीच्या लग्नाची पत्रिका मी साध्या ब्राऊन पेपरवर हॅन्डबिलासारखी छापली होती. ती बघूनच लोक शिव्या घालत वाचायचे आणि हसायचे. पण वाचायचे. तशीच या भावाची पत्रिका मी मुद्दाम अंतर्देशीय पत्रावर मालवणी भाषेत छापली होती आणि थेट पोस्टाने पाठवून दिलेली होती. त्यातला मालवणी मसुदा वाचून लोक चकीत झाले होते आणि माझ्या या चक्रमपणाची चर्चाही नातलगांमध्ये झालेली होती. मात्र इतर मान्यवरांसाठी इंग्रजीतल्या पत्रिका भावाने मुददाम छापल्या होत्या. तर त्यातलीच पत्रिका मी साहेबांना दिलेली होती. पण अवघ्या चोविस तासात मी अशी काही चमत्कारील मालवणी पत्रिका छापल्याचे साहेबांना कळले होते. एखाद्या लहान मुलासारखी त्यांना त्याविषयी उत्सुकता होती. त्या हॉलमध्ये मला बाजूला घेऊन ती पत्रिका त्यांना आमंत्रण रुपाने दिली नाही, म्हणून त्यांनी खडसावले होते. सहाजिकच दुरून बघणार्यांना ते आवेशात बोलताना दिसले व मी हसताना दिसलो होतो. दुसर्या दिवशी सकाळी ती मालवणी पत्रिका मातोश्रीवर आणून त्यांना दिली पाहिजे, असा इशारा देऊनच त्यांनी सोहळ्याचा निरोप घेतला होता. यातली निरासग अपेक्षा कोणला समजणार होती? एका मोठ्या नेत्याच्या मनातली ही उत्कंठा कोणाला उमजणार होती?
हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नावाच्या आक्रमक नेत्याचा खरा चेहरा होता. त्यावर कुठला मुखवटा नव्हता की आवरणही नव्हते. एक उत्कंठेने भारलेले निरागस मूल असावे, तसा हा माणूस कोणीही निर्मळ मनाने बघितला तर त्याच्या प्रेमात पडावे, इतका सरळ होता. मार्मिकचा कार्यकारी संपादक म्हणून त्यांच्या सान्निध्यात आल्यानंतर त्यांना सलग चार वर्षे जवळून बघता आले. वयाने, अनुभवाने व प्रतिष्ठेने वीस वर्षे मोठे असलेले बाळासाहेब कुणाशीही सहज मित्रत्वाने बोलू शकत होते व वागतही होते. राजकीय बडेजाव त्यात नव्हता आणि असला तर मला कधीही जाणवला नाही. त्यांच्यासमोर नतमस्तक असावे लागते किंवा त्यांच्यासमोर कोणाचीही बोलती बंद होते, असे मीही ऐकून होतो. पण मार्मिकमध्ये दाखल झाल्यापासून कधीही तसे जाणवले नाही. रस्त्यावर टपरीवर कुणा मित्राशी गप्पा माराव्यात, इतक्या मनमोकळेपणाने त्यांच्याशी बोलता आले. आपण मोठा नेता वा व्यंगचित्रकार आहोत, म्हणून समोरच्याने आपल्याशी कसे वागावे बोलावे, अशी त्यांची कुठलीही अट नसे. अर्थात तो माणूस जितका मनमोकळा होता, तितक्या स्वच्छ मनाने तुम्ही त्याच्याशी वागणे बोलणे अगत्याचे असायचे. जेव्हा महाराष्ट्राचे राजकारण साहेबांना वगळून मोजता येत नव्हते, तेव्हाही हा माणूस तसाच होता आणि नंतरही तितकाच अलिप्त होता. राजकारणाच्या गुंतवळ्यात फ़सलेले एक निरागस मुल, असेच मला त्यांचे कायम विश्लेषण करावेसे वाटले. राजकारणातले फ़ायदेतोटे किंवा रागलोभ याच्या पलिकडे गेलेला एक सामान्य माणूस, हे बाळासाहेबांचे खरे रूप होते. म्हणूनच त्यांच्याविषयी आपापल्या मनातील समजूतींना चिकटून बसलेल्यांना त्यांना कधी ओळखता आले नाही की समजून घेता आले नाही. बहुतांश लोकांच्या मनात त्यांच्याविषयी जी प्रतिमा होती, त्यापेक्षा खरा माणूस खुपच भिन्न होता.
मातोश्रीवर गेले मग मुजरा करावा लागतो, कुणा बुवा महाराजाप्रमाणे बाळासाहेबांच्या पाया पडावे लागते; अशा अनेक दंतकथा आहेत. पण मला तसा कुठलाही अनुभव आला नाही. मी या काळात कधी त्यांच्या पाया पडल्याचे आठवत नाही. त्यांच्या खोलीत त्यांच्याशी बोलत असताना एक कोणी व्यक्ती आली आणि ती साहेबांच्या साष्टांग पाया पडली. माझेही पाय समोर होते आणि मी माझे पाय मागे घेतले. त्यावर मिश्कील हसून ते म्हणाले, तो माझ्या पाया पडतोय. मीही उत्तरलो, म्हणून माझे पाय मागे घेतले, तेही त्यावर मनसोक्त हसले. आणखी एकदा मी मातोश्रीवर गेलो असताना त्यांच्या थेट पाया पडलो होतो. त्यांना ते खटकले आणि म्हणाले, आज काय बिघडले आहे? तू चक्क माझ्या पाया पडतो आहेस? मी उत्तरलो, माझे वडील हयात नाहीत, तुम्ही वडीलांच्या वयाचे आहात आणि आज माझा वाढदिवस आहे. तात्काळ ते आपल्या आसनावरून उठले आणि उभे राहून म्हणाले, मग पुन्हा पाया पड. आता मला तुला आशीर्वाद द्यायचा आहे. मी त्यापुर्वी त्यांच्या कधीही पाया पडलेलो नव्हतो, हे त्यांच्या पक्के लक्षात होते. पण त्याविषयी कुठला आक्षेप नव्हता की अपेक्षाही नव्हती. पुढला अर्धा तास मग त्यांनी पाया पडण्यावरूनचे किस्से मला ऐकवले. ते म्हणाले, एक माणूस पाया पडला मग मला संताप येतो, पण बोलूनही दाखवता येत नाही. मला गंमत वाटली. कोणी पाया पडला म्हणून संतापायचे काय कारण? मलाही नवल वाटले, म्हणून विचारले कोणाचा राग येतो, पाया पडल्यावर? ते म्हणाले अमिताभ बच्चनचा! हे आणखीच गुढ झाले. इतका मोठा कलावंत पाया पडला, हा गौरव आहे, त्यावर रागावण्यासारखे आहेच काय? अशावेळी खुलासा करताना साहेब हसायचे त्याला तोड नाही. माझ्या प्रश्नार्थक मुद्रेकडे बघत साहेबांनी धमाल खुलासा केला. ‘अरे आपण उभे असताना अमिताभ पाया पडला, तरी ओणवा असूनही तोच उंच वाटतो ना?’ (अपुर्ण)
वा भाऊ ! किती छान आठवणी तुम्ही साहेबांच्या सांगितल्या ! अश्या ठिकाणी नतमस्तक होते .
ReplyDeleteभाऊ सलाम तुम्हाला ....निःशब्द..!
ReplyDeleteमस्त लेख .बाळासाहेब ठाकरे यांची माणुसकी व विनोद त्याचप्रमाणे लोक त्यांच्यावर एवढे प्रेम का करत होती हे कळाले .
ReplyDeleteखुपच छान लिहिलय भाऊ...आणखी काही बाळासाहेबांच्या आठवणी असतील नक्की प्रसिध्द करा
ReplyDeleteमस्त लेख, बाळासाहेबांचे असे किस्से ऐकायला आवडतात. उत्तुंग उंचीच्या ह्या माणसाचा स्वभावच निराळा आणि त्यांनी जो राजकीय पक्ष उभा करण्यात तहहयात घालवली त्या पक्षाचे हे वेगळेपण त्यांचे वंशज चुकीच्या लोकांच्या नादी लागून करत आहे, ह्याचं दुःख आहे.
ReplyDeleteखुप छान भाउ.
ReplyDeleteखरंच खूप छान वाटलं तुमच्याकडून बाळासाहेंबांबद्दल ऐकायला मिळालं हे. अजून असे किस्से असले तर जरूर शेअर करा. खूप खूप आभारी आहे.
ReplyDeleteहा लेख पूर्वी वाचलेल आठवतय. चार पाच वर्षापूर्वी.
ReplyDeleteअत्यंत ह्रद्य आठवणी
ReplyDeleteअशा प्रकारचे आठवणीतले बाळासाहेब असे एक स्वतंत्र पुस्तकच खरे तर लिहायला हवे आहे । बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे कितीतरी पैलू जे लोकांना एरवी माहिती नाहीत ते त्यातून समजू शकतील
ReplyDeleteवा .आनंद दिलात, अनेक किस्से लिहा भाऊ. धन्यवाद
ReplyDeleteChaan sir
ReplyDeleteएक विनंती
ReplyDeleteभाऊ त्या लग्न पत्रिका आम्हाला सुद्धा पहायला मिळतील का ???
धन्यवाद भाऊ बाळासाहेबांच्या आठवणी सर्वांसोबत मांडल्याबद्दल!👌
ReplyDelete