Sunday, November 25, 2018

एक्सपायरी डेट

Image result for sushma swaraj

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आतापासूनच आपण पुढली निवडणूक लढवणार नसल्याचे जाहिर केल्याने बरीच कुजबुज सुरू झालेली आहे. तेही स्वाभाविक आहे. कारण मागल्या लोकसभा निवडणूकीत भाजपाची सुत्रे व नेतॄत्व पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदींनी हाती घेतल्यापासून आपल्या पक्षातील जुन्या वयोवृद्ध नेत्त्यांना हळुहळू क्रमाने बाजूला केलेले होते. त्यापैकी सर्वात बुजुर्ग असलेले लालकृष्ण अडवाणी यांनी पहिला आक्षेप घेतला होता. कारण त्यांना येऊ घातलेल्या परिस्थितीचा अंदाज मोदी उमेदवार होण्याच्या शक्यतेपासूनच आलेला होता. पण त्यांना कोणी फ़ारशी दाद दिली नाही आणि अखेरचा उपाय म्हणून त्यांनी लोकसभा मतदारसंघ मिळवताना गुजरात की मध्यप्रदेश, असा घोळ घातला होता. तेव्हा त्यांना हवा तो मतदारसंघ निवडण्याची मोकळीक देण्यात आली. अखेरीस त्यांनी गुजरातचाच गांधीनगर मतदारसंघ स्विकारला. पण दरम्यान त्यांच्या मनातली चलबिचल उघड होऊन गेलेली होती, ती काय असावी? तर उमेदवारी देऊन आपल्याला मोदींच थेट पराभूत करतील की काय? या शंकेने अडवाणी बावरले होते. तसे झाले नाही. पण एकूणच भाजपातील ज्येष्ठ नेत्यांची कुवत व हिंमत स्पष्ट होऊन गेली. त्याच पठडीतल्या सुषमा स्वराजही आहेत. त्या पंधराव्या लोकसभेतील विरोधी नेत्या होत्या. त्यामुळेच मोदी त्यांना कनिष्ठ नेता वाटणे स्वाभाविक होते आणि मोदींच्या उमेदवारीने आपला पंतप्रधान पदाचा हक्क नाकारला जाण्याची बोच त्यांच्याही मनात असल्यास नवल नाही. पण त्यांनी परिस्थितीशी जुळवून घेतले. बाकी ज्येष्ठ नेत्यांना मोदींनी मार्गदर्शक मंडळ स्थापन करून राजकीय वृद्धाश्रमात टाकले. अशा मागल्या पिढीच्या नेत्यांविषयी मध्यंतरी कॉग्रेसचे दिग्विजयसिंग यांनी कधी नव्हे ते शहाण्यासारखे विधान केलेले होते. पण त्याची कोणी दखल घेतली नव्हती.

दिग्विजयसिंग चमत्कारीक वा खुळचट बोलण्यासाठी इतके ख्यातकिर्त झालेले आहेत, की चुकून शहाण्यासारखे बोलले, तर कोणी त्यांची दखल घेत नसल्याचा परिणाम असावा. पण सहासात वर्षापुर्वी राहुल गांधी कॉग्रेस पक्षातले महत्वाचे निर्णय घेऊ लागल्यापासून त्यांचे निष्ठावंत असल्यासारखे दिग्विजयसिंग यांनी राहुलनेच अध्यक्ष पदाची सुत्रे हाती घेण्यासाठी वारंवार घोषणा केल्या होत्या. पण त्या कधी फ़लद्रुप झाल्या नाहीत. त्या बदलासाठी सिंग यांनी मांडलेले तर्कशास्त्र योग्य असे होते. राजीव गांधी यांनी नवी तरूण पिढी म्हणून आपल्यासारख्या अनेकांना कॉग्रेसच्या नेतृत्वात पुढे आणले. अशा माझ्यासारख्या नेत्यांचे आता वय झाले असून, त्यांनी आपणहून बाजूला व्हायला हवे किंवा त्यांना पक्षाने बाजूला करायला हवे; असे मतप्रदर्शन एका पक्ष अधिवेशनात सिंग यांनी केले होते. त्यासाठी त्यांनी वयोवृद्द्ध वा वाढल्या वयाचे नेते असा शब्द वापरला नव्हता, तर एक्सपायरी डेट झालेले नेते असा केला होता. हा आजार फ़क्त कॉग्रेस पक्षालाच जडलेला नाही, तर अनेक लहानमोठ्या पक्षाला त्या वयाच्या व्याधीने व्यापलेले होते व आहे. मोदींनी पक्षाची सुत्रे हाती आल्यावर सर्वप्रथम त्याच आजाराचा निपटारा केला होता. आधी अशा नेत्यांना निर्णय प्रक्रीयेतून बाजूला केले आणि नंतर सत्ता प्राप्त झाल्यावर सरकारी अधिकार पदापासूनही दुर ठेवले होते. त्यासाठी पंच्याहत्तरी ओलांडलेले नेते अशी लक्ष्मणरेषा आखलेली होती. सुषमा स्वराज ती ओलांडत असतील तर त्यांनी आपले भवितव्य ओळखलेले आहे आणि आपला मुरलीमनोहर वा लालकृष्ण होण्यापुर्वी माघार जाहिर केली आहे. शिवाय त्यांची प्रकृतीही त्यांना साथ देईनाशी झाली आहे. म्हणूनच त्यातून फ़ार मोठा अर्थ शोधण्याची गरज उरलेली नाही. कारण यशवंत सिन्हा, अरुण शौरी इत्यादिंच्या थयथयाटाने काही साध्य झालेले नसेल, तर सुषमाजी या वयात काय बंड करू शकणार आहेत?

खरेतर अनेक पक्षातील नेत्यांनी आता बाजूला होण्याची वेळ आली आहे. आली नव्हेतर येऊन गेलेली आहे. सुषमाजी १९७७ च्या काळातल्या सर्वात तरूण आमदार म्हणून जनता लाटेत निवडून आल्या होत्या. म्हणजे निवडणूकांच्या राजकारणात त्यांची कारकिर्द ४१ वर्षांची होऊन गेली आहे. त्याच कशाला लालूप्रसाद यादव, पासवान, शरद यादव आणि मुलायमसिंग त्याच पिढीतले नेते आहेत. शरद पवार तर त्यांच्याही आधी दहा वर्षे कोवळा आमदार म्हणून निवडणूकीने राजकारणात आले. शक्य तितकी अनेक सत्तापदे या लोकांनी उपभोगून झालेली आहेत. मिळवण्यासारखे पंतप्रधानपद सोडल्यास त्यांना कुठली महत्वाकांक्षा आता असता कामा नये. पण यापैकी बहुतेकांना नव्या राजकारणात आपल्याला स्थान नाही, याची टोचणी सहन होताना दिसत नाही. मध्यंतरी आपल्या अर्धशतकाच्या राजकीय कारकिर्दीचे समारंभ शरद पवारांनी खुप साजरे करून घेतले. त्यांचेच समकालीन म्हणावे असे विधानसभा गाजवलेले शेकापचे आमदार केशवराव धोंडगे यांनी त्यापैकी एका समारंभात भाषण करताना पवारांची मस्त टोपी उडवली होती. हा बिनचिपळ्यांचा नारद असल्याची उपमा त्यांनी दिलेली होती. ती जितकी मजेशीर होती, तितकीच पवारांच्या अनेक समकालीन नेत्यांनाही लागू होणारी आहे. कारण त्यापैकी बहुतेकांना राजकीय जीवनात व जनमानसात स्थान उरलेले नाही. पण राजकीय घडामोडीत लुडबुडायची हौस काही फ़िटलेली नाही. आताही तब्येत हाताबाहेर गेली असताना पवारांची धडपड शोभणारी नाही. तिक्डे दिल्लीत कुठल्याही विरोधी एकजुटीत हात गुंफ़ून उंच करायला हजेरी लावणारे शरद यादव दयनीय वाटतात. कारण ते नेता जरूर आहेत, पण त्यांच्या हाताशी कुठलाही पक्ष वा संघटना उरलेली नाही. मात्र आपण आजही लढवय्ये असल्याच्या थाटातले त्यांचे बोलणे शेलारमामाला शोभणारे आहे.

शेलारमामावरून आठवले. त्याने तानाजी धारातिर्थी पडला असताना आपण पुढे येऊन तलवार उपसली नव्हत. तर गडावरून माघारी पळून जाण्याचे दोर कापून टाकले होते आणि मावळ्यांना लढा किंवा मरा, असा अंतिम संदेश दिला होता. त्या सैनिकांना चेतवण्य़ाची कामगिरी बजावणे व स्वत:च सेनापती म्हणून पुढाकार घेण्यात खुप मोठा फ़रक असतो. आता लढण्याचा जोश ज्यांच्यात आहे त्यांनाच पुढे येऊ देण्यात वाढलेल्या वयाची शोभा असते. त्यासाठी नवख्यांना चार युक्तीच्या गोष्टी सांगणे व चुका होत असतील तर सुधारायला मदत करणे; अशा वयातली खरी कामगिरी असते. दुर्दैवाने त्याला भारतातले कुठल्याच पक्षाचे नेते राजी नसतात. त्यांना पदावरून उतरण्यापेक्षा कोणीतरी हुसकून लावण्याची प्रतिक्षा असते. दहा वर्षे पंतप्रधानपद उपभोगलेले मनमोहन सिंग वा अनेक महत्वाची अधिकारपदे भोगण्यातच आयुष्य खर्ची पडलेले चिदंबरम, अहमद पटेल, अंथनी वा खुद्द एक्सपायरी डेट उलटून गेलेले दिग्विजय सिंग काय करीत असतात? आताही मध्यप्रदेशच्या निवडणूकीत ज्योतिरादित्य शिंदे यांना अपशकून करण्यापेक्षा सिंग यांनी कोणते कर्तृत्व गाजवले आहे? त्यांच्याच दहा वर्षाच्या कारभाराने मतदार इतका विचलीत झाला होता, की कॉग्रेस म्हणजे पुन्हा दिग्विजय, अशा भयापोटीच मतदाराने सलग १५ वर्षे भाजपा व शिवराजसिंग चौहान यांना सत्ता बहाल केलेली होती. इतके असूनही सिंग यांची खुमखुमी संपलेली नाही. यशवंत सिन्हा, शौरी इत्यादी त्याच वाटेने चाललेले आहेत. त्यांना कोणी एक्सपायरी डेटचा अर्थ समजावण्याची गरज आहे. अर्थात तो त्यांनाही ठाऊक आहे. परंतु मान्य होत नाही. अवघे पाऊणशे वयमान अशी जी उक्ती आहे तशी त्यांची प्रत्येक बाबतीत लुडबुड चाललेली असते. त्यांच्याप्रमाणे हास्यास्पद होऊन बाजूला व्हायची दुर्दैवी वेळ यायला नको, म्हणूनच बहुधा सुषमाजींनी समाधानी मनाने निवृत्तीचा निर्णय घेतला असावा.

आज आपल्या देशातल्या कुठल्याही खेड्यातल्या सामान्य माणसालाही एक्सपायरी डेट म्हणजे काय ते नेमके कळते. खाद्यपदार्थ असो किंवा एखादे महत्वाचे महाग उपकरण असो, त्याची उपयुक्तता कितीकाळ असू शकेल, याचा उत्पादकांनी दिलेला इशारा छापलेला असतो. म्हणूनच असे पदार्थ वा वस्तु खरेदी करताना सामान्य लोक आधी एक्सपायरी डेट बघून घेतात. त्या वस्तु दिसायला नासलेल्या वा सडलेल्या नसतात. त्यामुळेच टाकावू किंवा अपायकारक नाहीत असेही वाटत असते. पण वस्तुस्थिती तशी नसते. त्यांचा काहीही उपयोग राहिलेला नसतो. मुदतीनंतर त्यांचा उपयोग संपलेला असतो आणि क्वचित त्यांच्यामुळे अपायही होण्याची भिती असते. म्हणूनच एक्सपायरी डेटचे महत्व आहे. ज्या कारणास्तव किंवा उपयोगासाठी त्या वस्तु असतात, तोच राहिलेला नसतो. राजकारणात अशा अनेक नेत्यांची आज गर्दी आहे. त्यांना बाजूला करण्याचीही खुप गरज आहे. म्हणून दिग्विजयसिंग यांचा मुद्दा खुप योग्य व चांगला होता. पण त्यांनाच कळलेला उमजलेला दिसत नाही. इतरांचे काय बोलावे? अमेरिकेचे अध्यक्षपद म्हणजे जगाची सुत्रे हलवण्याचे राजकारण. पण अशा पदावरून आठ वर्षे जगावर राज्य केलेले जॉर्ज बुश, बिल क्लिंटन वा बराक ओबामा यांच्यासारखे तुलनेने खुप कमी वयाचे नेते अधिकार सोडल्यावर प्रचलीत राजकारणातून संन्यास घेतल्यासारखे अलिप्त झालेले आहेत. मनमोहन किंवा अडवाणी यांच्यासमोर तर हे अध्यक्ष मुलेच आहेत. पण आज त्यांनी दाखवलेला संयम भारतात कोणाला दाखवता आला आहे काय? हे दृष्य मनाला उद्विग्न करणारे आहे. कारण ज्यांचा दबदबा माझ्या पिढीने वा समकालीन पन्नाशीतल्या पिढीने बघितला आहे, त्यांची आजची केविलवाणी धडपड मन विषण्ण करून टाकते. अमिताभ वय झाल्यावर योग्य शोभणार्‍या भूमिकेत गेला म्हणून टिकलाय. हे गर्जणार्‍या यशवंत सिन्हा वगैरेंना कोणी सांगावे?

9 comments:

  1. मोदींपेक्षा 2 वर्षांनी लहान आहेत सुषमाजी

    ReplyDelete
  2. अमेरिकेतील अध्यक्षही स्वतःहून बाजूला होत नाही कायद्याने त्याना मर्यादा घातली आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. सुषमाजी माेदींचे हेकटपणाला कंटाळले आहेत

      Delete
  3. भाऊ एकंदर सुषमा स्वराज यांच्याकडे बघून मला असं नाही वाटत की अडवाणी यांच्या सारखं पंतप्रधानपद मिळणार नाही म्हणून त्या बाजूला होत असतील. अर्थात मोदी मागून येऊन पंतप्रधान झाल्यामुळे त्यांची संधी गेली याची सल कदाचित असेल त्यांना. पण माझ्यामते प्रकृतीमुळे त्या बाजूला होत असाव्यात. गेले काही महिने त्यांच्या चेहऱ्यावर कायम सूज दिसते, आणि त्यांना चालताना जरी त्रास होत नसला तरी जिना चढताना कोणाचीतरी मदत लागते. त्यामुळे त्या कदाचित बाजूला होत असाव्यात.

    ReplyDelete
  4. एक्सपायरी डेट मधे शुष्माजी बसत नाहीत

    ReplyDelete
  5. सुषमा स्वराज मोदींपेक्षा केव्हाही उजव्याच आहेत .

    ReplyDelete
    Replies
    1. व्हिसा माता ट्विटरवर आपल्या खात्याचा कारभार पाहत आहेत.उ.प्र.मधील नौटंकी पोरगी आठवते का? कागदपत्रे,पुरावे सादर न करता तिला पासपोर्ट वर नाव आणि धर्म बदलून हवा होता आणि तसे करायला नकार देणा-या अधिका-याला सुषमा स्वराज यांनी कोणतीही खातरजमा न करता दंडात्मक कारवाई ला तोंड देण्यास भाग पाडले.अशी मंत्री मोदींपेक्षा उजवी? की उधोजी राजांनी नाव सुचवलं म्हणून सुषमाजी योग्य? आणि मोदींनी उमेदवारी मिळवताना काय बाकीच्यांना दादागिरी केली होती का? सुषमाजी एवढ्या योग्य होत्या तर जनतेने त्यांना डोक्यावर घेतले असते ना.

      Delete