Thursday, November 29, 2018

बी टीम आणि ए टीम

Image result for rahul gandhi

मला राहूलचे सर्व फ़ोटो व्हिडीओ आवडतात. जगात कोणापाशी इतका टोकाचा आत्मविश्वास मला आजवर आढळलेला नाही

तीन राज्यांच्या विधानसभांसाठी मतदान संपलेले आहे आणि येत्या शुक्रवारी राजस्थान व तेलंगणा या दोन विधानसभांसाठी अखेरच्या फ़ेरीतले मतदान व्हायचे आहे. त्यासाठी शेवटची प्रचार रणधुमाळी चालू असून विविध पक्षांनी एकमेकांवर बेधडक आरोप करण्याला पर्याय नाही. त्यात तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी भारत ही मोदींच्या पित्याची जागिरी नसल्याचे म्हटले आहे, तर मोदींनी राव हे कॉग्रेसप्रमाणेच घराणेशाही राबवित असल्याची टिका केली आहे. यात कॉग्रेस हा तेलंगणातला मुख्य विरोधी पक्ष असल्याने त्या पक्षाचे मुरब्बी अध्यक्ष राहुल गांधी काय म्हणतात, याला खास महत्व आहे. राहुल नेहमी राफ़ायल वा अनिल अंबानी यांच्यावर बोलत असतात. पण तेलंगणात त्यांनी आगामी राजकारणाचे बिगुल वाजवलेले आहे. आपल्या सोबत आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हजर असतानाही राहुलनी चंद्रशेखर राव यांच्याशी निकालानंतर युती करण्याची घोषणाच करून टाकली आहे. पण नायडूंना त्याचा किती अंदाज आलाय, हे ठाऊक नाही. पण ही राहुल गांधी यांची शैली झालेली आहे. ते एक बोलतात आणि भलतेच करतात, हा आजवरचा अनुभव आहे. अशा राहुलनी नायडूंच्या हजेरीत राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीला भाजपाची बी टीम घोषित केलेले आहे. हा मोठा राजकीय संकेत आहे. कारण राहुल प्रचारात ज्या पक्षावर भाजपाचा हस्तक वा बी टीम म्हणून हल्ला करतात, त्यांच्याशी निकालानंतर थेट युती करतात, असा इतिहास आहे. त्यामुळे त्यांनी राव यांना भाजपाची बी टीम म्हटलेले आहे. मग ११ तारीख नंतर तेलंगणात टीआरएस व कॉग्रेस यांचे संयुक्त सरकार सत्तेत आले तर नवल मानण्याचे कारण नाही. असेच कर्नाटकात झालेले आपण विसरून गेलो काय? कर्नाटक विधानसभेच्या प्रचारात अखेरच्या दिवसात राहुल यांनी कुमारस्वामी व जनता दल सेक्युलर पक्षाला भाजपाची बी टीम म्हणून घोषित करून टाकलेले नव्हते का?

आताही तेलंगणात राहुलनी राव यांच्या टीआरएस पक्षाला हरवण्यासाठी चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षाशी हातमिळवणी केलेली आहे. त्यातली पहिली गंमत अशी, की तेलंगणाच्या निर्मितीला तेलगू देसम पक्षाचा कडवा विरोध होता. त्यामुळेच त्या राज्यात नायडू यांना फ़ारसे समर्थक नाहीत. मागल्या विधानसभा व लोकसभा निवडणूकीत त्याची प्रचितीही आलेली आहे. त्यामुळेच नायडूंना स्वबळावर तिथे लढणे शक्य नव्हते. त्यांनी कॉग्रेससोबत आघाडी करण्यात गैर काहीच नाही. पण तिथे हे दोन पक्ष एकमेकांना कोणती मदत करू शकणार आहेत, त्याचे उत्तर सोपे नाही. नायडू आंध्राचे मुख्यमंत्री व तेलंगणाचे शत्रू मानले जातात. त्याचा फ़टका कॉग्रेसला कितपत बसेल वा लाभ होईल, ते आज सांगता येत नाही. पण मजेची गोष्ट अशी, की आंध्राची विभागणी करून वेगळे तेलंगणा राज्य केल्याचे श्रेय कॉग्रेस मागते आहे आणि त्याचे तात्कालीन कडवे विरोधक आता त्याच कॉग्रेससोबत हातात हात घालून उभे आहेत. लोकांनी तेलंगणा देणार्‍या कॉग्रेसवर विश्वास ठेवावा, की तेलंगणाला कडवा विरोध करणार्‍या चंद्राबाबूंना नव्या राज्याचे तारणहार मानावे? एकूणच घोळ आहे ना? तर असे लोक एकत्र येऊन तेलंगणा समितीला भाजपाची बी टीम घोषित करीत आहेत. पण मग भाजपाची ए टीम कोण आहे? त्याचा खुलासा राहुलनी कधीच केलेला नाही. त्यांना भाजपाची प्रत्येक राज्यातली बी टीम नेमकी ठाऊक असते. पण एक टीम मात्र सांगता येत नाही. मग तेच व त्यांची कॉग्रेस भाजपाची ए टीम आहे काय? कारण भाजपाला मागल्या चार वर्षात जितके व जिथे मोठे यश मिळाले, त्यात महत्वाची मदत खुद्द राहुल गांधी व कॉग्रेस पक्षानेच केलेली आहे. मात्र जिथे ए टीम फ़सली तिथे भाजपाच्या बी टीमशी कॉग्रेसनेच हातमिळवणी करून सत्तेवर कब्जा मिळवला आहे. आताही बहुधा निकालानंतर राहुल बहूमत हुकलेल्या चंद्रशेखर रावना पाठींबा देण्याच्या मनस्थितीत आलेले असावेत.

त्यालाही हरकत नाही. लोकशाहीत आणि निवडणूकीच्या राजकारणात संख्येला महत्व असते. सगळेच पक्ष आधी एकमेकांच्या विरोधात लढतात, दोषारोप करतात आणि नंतर गळ्यात गळे घालून सत्तेची हिस्सेदारीही करतात. तेच कॉग्रेस वा राहुल गांधी यांनी केल्यास त्यात काही गैर मानायचे कारण नाही. पण ज्या भाजपाच्या विरोधात राहुल अखंड आग ओकत असतात, त्याच पक्षाची बी टीम लगेच त्यांच्यासाठी पुरोगामी कशी होते, त्याचाही एकदा खुलासा त्यांनी करावा अशी अपेक्षाही गैर मानता येत नाही. पण खुलासा गांधी खानदानाने देण्याची कुठलीही गरज नाही. सुदैवाने तशी अजून भारतीय राज्यघटनेत तरतुद झालेली नाही. बहुधा पुढल्या काळात पुन्हा युपीएचे पुरोगामी राज्य आले, तर तशीही तरतुद केली जाईल. मग असे प्रश्न विचारण्याची वा खुलासा मागण्य़ाची हिंमत कोणाला होणार नाही. पण सध्या तशी तरतुद नसल्याने हे प्रश्न उपस्थित होणारच. अर्थात त्याचा खुलासा मिळण्याची अपेक्षा बाळगता येत नाही. म्हणूनच आपल्या बुद्धीनुसार त्याची उत्तरे शोधणे भाग आहे. जर टिआरएस व कर्नाटकातील कुमारस्वामींचा सेक्युलर जनता दल भाजपाची बी टीम असेल; तर त्याच्याशी राहुल निकालानंतर हातमिळवणी कशाला करतात? आणि ह्या अशा बी टीमवर पुरोगामी लोक भाजपाचा विरोधक असल्याचा विश्वास कशाला ठेवतात? त्याचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला भाजपाची ए टीम कोण याचा शोध घ्यावा लागेल आणि तो घ्यायला गेल्यास राहुल गांधी व त्यांचे निकटवर्तियच भाजपाची खरी ए टीम असल्याचे धागेदोरे सापडू शकतात. २०१३ पासून कॉग्रेसच्या नेतृत्वाची सुत्रे हाती घेतल्यापासून नरेंद्र मोदींच्या कॉग्रेसमुक्त भारताच्या घोषणेला वास्तवात आणण्यासाठी राहुल गांधींनी जेवढे परिश्रम घेतले तितके खुद्द मोदी शहांनी घेतले नाहीत. राहुल व अय्यर निरूपम बब्बर इत्यादिकांनी तशीच मेहनत घेतलॊ नाही का? मग त्यांना भाजपाची ए टीम नाही तर काय म्हणायचे?

मागल्या दोनतीन महिन्यापासून पाच राज्याच्या विधानसभा निवडणूकांची अखंड रणधुमाळी चालू आहे आणि राज्याच्या मतदानात स्थानिक प्रश्नांना मोठे महत्व असते. तिथले मतदार आपल्या अडचणींवर मात करणारा सत्ताधारी शोधत असतात आणि सत्तेत असलेल्यांच्या चुकांसाठी त्याला शिक्षा करायला मत बनवित असतात. परंतु राहुल गांधी कॉग्रेसचे स्टार प्रचारक म्हणून सगळ्या राज्यात राफ़ायल विषयावर पोटतिडकीने बोलताना आपण बघितलेले आहेत. ज्या विषयाशी त्या राज्यातूल मतदार जनतेला काडीमात्र कौतुक नाही की फ़िकीर नाही, अशा विषयावर तोफ़ा डागून राहुलनी भाजपाच्या स्थानिक मुख्यमंत्र्यांना किती दिलासा दिला आहे? शेतकरी संकटात अणि महागाई वा विकासाचे थांबलेले काम; यासाठी लोक उत्सुकतेने कॉग्रेसची भूमिका ऐकायला व्याकुळ झालेले होते. तर त्यांना अनिल अंबानींना तीस हजार कोटी मिळाल्याचे वॄत्त सांगून राहुल गांधी निराश करत राहिले. हे ए टीमचे काम नाही काय? राहुल जातील व बोलतील तोच चर्चेचा विषय व्हायचा आणि त्यात कुठेही स्थानिक प्रश्न वा समस्यांचा मागमूस नव्हता. हे कॉग्रेसला लाभदायक नव्हते आणि भाजपाला त्रासदायक नव्हते. मग राहुल कोणाला हातभार लावत होते? कोणाची ए टीम म्हणून दौरे करीत होते? अशा ए टीम आणि बी टीमने निकालानंतर एकत्र यायचे ठरवले, तर त्यात वावगे काय? ज्योतिरादित्य शिंदे वा सचिन पायलट यांनी मागल्या दोनतीन वर्षात आपापल्या राज्यात मेहनत घेऊन भाजपा विरोधी हवा निर्माण केली, ती राहुलनी आपल्या दौर्‍यातून काढून घेतली. तर मोदींसाठी प्रचाराला चांगले वातावरण निर्माण होते आणि भाजपाची ए टीम असेल तर तेच त्या टीमचे काम असते ना? उद्या अशा रितीने त्या तीन राज्यात भाजपाने आपले सरकार व सत्ता टिकवली, तर त्याचे श्रेय मोदींपेक्षाही भाजपाच्या ए टीमला म्हणजे राहुल गांधींनाच द्यावे लागणार ना?


9 comments:

  1. भाऊ राममंदिर मुद्द्यावर जरा प्रकाश टाका ना

    ReplyDelete
  2. भाउ राहुलच्या भाषणांमुळे शिवराज व रमणसिंह यांना फार मोठा द्लासा मिळालाय हे तुमच वाक्य एकदम खरय कारण गुजरातमध्ये मोदींना२४ सभा घ्यायायला लाागल्या होत्या यादोन राज्यात फार कमी सभा घेतल्यात mp ची मतदाान जवळ आल असताना मोदी राजस्थानमध्ये सभा घेत होते राजस्थानमध्ये कठिन दिसतय पण जास्त सभा घेुउन गुजरात सारख होइल कारण इथेपन राहुलची तीच गत

    ReplyDelete
  3. राहुलचा आणि एक गुण मदत करतोय म्हनजे जोतीरादित्य सचििन पायलटला राहुलला मुख्यमंत्री करायचय पण स्वता त्या दोघांना द दिल्लीमधे राहुलच्या माग माग करायचय कमलनाथांची राहणी पण दिल्लीचीच आहे त्या मुळते पन लोक राखुनच प्रचार करतात.

    ReplyDelete
  4. श्री भाऊ, मराठा आरक्षण ह्या विषयावर लिहा, २. राफेल वर पण सविस्तर लिहा, आजच्या लोकसत्तेत एकदम U turn लेख आहे

    ReplyDelete
  5. राहुल यांच्या आत्मविश्वासामागे मला ते तर कोठल्यातरी ' अमली ' पदार्थाच्या अमलाखाली आहेत की काय असे वाटते....!! ते हास्य , तो आत्मविश्वास आणि ते बेफाट बोलणे .....!!

    ReplyDelete
    Replies
    1. मला पण तसच वाटत

      Delete
    2. अगदी बरोबर , सहमत

      Delete
    3. I think
      Rahul was captured in drug and foreign currency act in USA
      That time Mr.vajpayi was the p.m.
      Don't know why he used his favour for rahul!

      Don't know Sonia should have requested Vajpayee to solve the problem
      Now we can see the bragmacharis mistakes

      Delete