Thursday, August 20, 2020

साहेबांच्या ‘कवडी’ची किंमत

 

Satyamev Jayate: The politics behind Parth Pawar's cryptic tweet

नुकताच एक मोठा राजकीय भूकंप महाराष्ट्रात झाला. म्हणजेच त्याचे झटके सौम्य असले तरी तो शरद पवारांनी केलेला असल्याने त्यालाही भूकंप मानण्याची मराठी पत्रकारितेची एक परंपरा आहे. त्यामुळे त्याला भूकंप संबोधणे भाग आहे. झाले असे, की एका बैठकीतून पवार बाहेर पडत असताना काही पत्रकारांनी त्यांना गाठले आणि त्यांचे नातू पार्थ पवार यांच्या वर्तनाविषयी प्रश्न विचारला. त्यावर अधिक तपशीलात न बोलता साहेबांनी तो प्रश्नच झटकून टाकला. म्हणजे उत्तर टाळले असे नाही, तर गोलमाल उत्तर दिले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांच्या प्रचार सभेतील एका विधानाची गंभीर दखल घेऊन खास मुलाखतीतही त्याचा प्रतिवाद करण्याचे अगत्य दाखवणार्‍या पवारांनी, पार्थचा विषय असा झटकून टाकणे चमत्कारीक होते. पण साहेबांनी झटकले तरी महत्वाचे असते आणि त्यांनी सविस्तर उत्तर दिले तरी मास्टरस्ट्रोक असल्याने त्याची दखल माध्यमे घेत असतात. सहाजिकच पार्थविषयी पवार काय बोलले, त्याला राजकीय महत्व प्राप्त होणारच. त्यांनी त्या एका दगडात किती पक्षी मारले, त्याची मोजणी तात्काळ सुरू झाली. कुठे मेलेला पक्षी सापडलाच नाही तर पिसे गोळा करून पराचा कावळा करण्याला पर्याय नसतो ना? असो मुद्दा असा की पार्थ पवार या नातवासाठी माढ्यातून लोकसभेची उमेदवारी सोडणार्‍या साहेबांनी अचानक त्याला कवडीची किंमत देत नसल्याचे विधान का करावे? यात कवडीचे मोल कोणाचे आहे? पार्थ कवडीमोल आहे की साहेबांच्या कवडीचे मोल मोठे आहे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधायला हवीत. पण साहेब बोलले मग पक्षी किती मेले त्याचा शोध घेताना असे प्रश्न डोक्यात येणार कुठून? तुम्ही आम्ही ज्याला कवडी म्हणतो तितकीच पवारांची कवडी मूल्यहीन असते का?


१९८० च्या सुमारास आम्ही काही मित्रमंडळी आपल्या कुटुंबासह दिल्ली आगरा फ़िरायला गेलेले होतो. त्यापैकी फ़त्तेपुर सिक्रीला गेलो असताना एक गाईड आमच्याकडे धावत आला. खरेतर अशा भागात गेल्यावर अनेक गाईड तुमच्यावर झडपच घालत असतात. तिथेही तेच घडलेले होते. पण माझा ज्येष्ठ दिवंगत मित्र वसंत सोपारकर याने त्यांना झटकून टाकलेले होते. आम्हाला गाईडच नको असल्याचे सांगून कटकट संपवली होती. मग दुरवर ताटकळत असलेला हा मध्यमवयाचा गाईड पुढे सरसावला आणि तोच गाईड करील असा आग्रह धरून बसला. त्याला पैसे विचारले तर म्हणाला २५ रुपये. तेव्हा ही रक्कम मोठी होती. तसे बोलल्यावर उत्तरला पैसे देण्याचा आग्रह नाही, पण गाईड मलाच करायचे आहे. पसंत नाही पडल्यास एकही पैसा देऊ नका. मला त्याचे खुप नवल वाटले आणि त्याला होकार भरला. त्याने तो परिसर छान समजावून सांगितला, शेरोशायरीपासून इतिहासाचे अनेक दाखले देत त्याने सर्वकाही दाखवले. अखेरीस मी त्याला म्हटले, मिया आपले २५ रुपये कमाये है. तेव्हा कुठे त्याची कळी खुलली आणि हट्टाचे रहस्य त्याने उलगडून सांगितले. तो हिस्टरी सोसायटीचा गाईड होता आणि रोज तिथे येत असला तरी त्याच्या मनपसंत लोकांनाच गाईड करायचा. अन्यथा सरकार नियुक्त असल्याने सन्माननीय परदेशी पाहुण्यांनाच गाईड करण्याचे काम त्याचे होते. ते ऐकून धक्का बसला. शिवाय त्याने अन्य गाईड कसे पर्यटकांना दंतकथा वा वाटेल ते रंगवून सांगतात, त्याचेही किस्से खुप ऐकवले. त्यापैकी एक किस्सा पवारांचे ताजे विधान ऐकल्यावर आठवला.


आपण सर्वांनी इतिहासाची ओळख होताना एक गोष्ट नक्की ऐकलेली आहे. औरंगजेब हा बादशहा असला तरी टोप्या विणून त्यावर गुजराण करायचा. तो धर्मभिरू होता हे आपण ऐकलेले आहे. टोपी काय किंमतीची असते? ती विणायला किती वेळ लागतो? बादशाहीच्या कामातून सवड काढून औरंगजेब किती टोप्या विणत असेल आणि त्याची कमाई किती असेल, याचा विचारही आपल्या मनाला शिवत नाही. त्यामुळे आपण नुसते तितकेच वाक्य ऐकून भारावून जातो. त्याचा खुलासा करताना हा गाईड म्हणाला, इथेच गल्लत होत असते. खुद्द बादशहाने विणलेली टोपी किरकोळ किंमतीत कोण विकत घेईल सांगा? तुम्ही आम्ही टोपी विणली वा चित्र रंगवले तर त्याची बाजारातली किंमत किती असेल? दहाबारा रुपयांनाही कोणी विकत घेणार नाही. पण कोणा राष्ट्रपतीने वा अशा सेलेब्रिटीने एखादे चित्र काढले; तर लाखोच्या किंमतीतच विकले जाणार ना? तिथे चित्राला किंमत नसते तर चित्र काढणार्‍याची किंमत खरेदीदाराने भरायची असते. इथे हिंदूस्तानचा बादशहाने विणलेली टोपी किती मोहरांना विकली जात असेल, त्याची नुसती कल्पना करा. आम्ही त्याच्यावर म्हणूनच खुश होतो. अशी माणसे सहजगत्या किती नवा दृष्टीकोन देऊन जातात ना? बादशहाने फ़राटे मारलेले असले तरी त्याचे गुणगान करून कौतुकाचा वर्षाव होण्याला पर्याय नसतो. तर आठवडाभरात विणलेल्या एका टोपीची किंमत त्याला किती मिळत असेल? इथे निकष लक्षात घ्यावा लागत असतो. तुमची आमची कवडी आणि पवार साहेबांची कवडी म्हणुन सारखी नसते.


काही वर्षापुर्वी अण्णा द्रमुकच्या कुणा नेत्याने जयललिता यांच्यावरचे पुस्तक प्रकाशित केले होते आणि प्रकाशन समारंभाच्या व्यासपीठावरच त्याच्या पाच हजार प्रति संपून गेल्याची घोषणा झाली होती. मंचावरच्या प्रत्येकानेच प्रत्येकी शंभर दोनशे प्रति विकत घेतलेल्या होत्या. त्यापैकी कितीजणांनी ते पुस्तक उघडून वाचले असेल तोही एक संशोधनाचा विषय होऊ शकतो. यातली गंमत त्या गाईडने कथन केलेल्या एका गोष्टीमुळे समजू शकते. नऊ वर्षापुर्वी ममता बानर्जी बंगालमध्ये प्रचंड बहूमताने निवडून आल्यावर त्यांच्याबाबतीत असाच कौतुकाचा वर्षाव सुरू झालेला होता. पक्षाच्या प्रचारासाठी निधी उभारताना त्यांनी काढलेल्या चित्रांच्या विक्रीतून खुप पैसा उभारला गेला, असे सांगण्यात आलेले होते. देशात नावाजलेल्या अनेक चित्रकारांमध्ये ममतांचा उल्लेख कधी आलेला नाही. मग निवडणूक निधी उभारण्याइतक्या महागड्या चित्रांच्या कलाकृती ममतांनी कधी निर्माण केल्या? तसा प्रश्नही कुणा पत्रकाराला पडलेला नव्हता. पण त्यांच्या कारकिर्दीला पाच वर्षे पुर्ण होत असताना बंगाल, आसाम ओडीशा अशा पुर्वेकडील राज्यात अनेक चिटफ़ंड घोटाळे उघडकीस येऊ लागले. तेव्हा ममतांच्या कलाकृतींच्या कौशल्याचे रहस्य उलगडत गेले. लाखो गरीब मध्यमवर्गियांच्या कष्टाच्या कमाईतले पैसे अधिक मोठ्या परतफ़ेडीचे आमिष दाखवून लंपास करणार्‍या चिटफ़ंडवाल्यांनीच ममतांची बहुतांश चित्रे विकत घेतलेली होती. हा योगायोग म्हणायचा.  एकेक चित्र कोट्यवधींना विकले गेले होते आणि तृणमूल कॉग्रेसचा निवडणूक फ़ंड उभा राहिला होता.


युपीए सरकारच्या अखेरच्या काळात एअर इंडिया डबघाईला गेल्याचा खुप गवगवा झाला आणि त्याची उलाढाल व जमाखर्च तपासला गेला असताना अशाच एका औरंगजेबाचा शोध लागलेला होता. त्याचे नाव श्रीमती अन्थोनी असे होते. त्या संरक्षणमंत्री ए. के. अन्थोनी यांच्या पत्नी होत्या. एअर इंडियाचे हिशोब तपासले गेले नसते तर कदाचित जगाला संरक्षणमंत्र्यांची पत्नी इतकी हुन्नरी चित्रकार असल्याचा शोध कधीच लागला नसता. असो, याचा अर्थ सर्व अशा गोष्टी बोगस वा भ्रष्ट असतात, असेही मानायचे कारण नाही. शब्दात अडकू नये इतकेच सांगायचे आहे. जेव्हा सचिन तेंडूलकर आपली एखादी बॅट लिलावात विकायला काढतो, तेव्हा तिला नुसती बॅट म्हणून कोणी किंमत देत नाही. सचिनकडे अशा अनेक बॅटी आहेत आणि त्यांचा इतिहास असतो. अमूक सामन्यात विजयी फ़टका मारलेली किंवा कुठल्या मैदानात विक्रम साजरा केलेली बॅट असू शकते. तेव्हा बॅटला इतकी किंमत असे निश्चीत ठरलेले नसते. बॅट कोणाची कुठली तिचा इतिहास काय, यानुसार किंमत ठरत असते. सहाजिकच आपल्या नातवाच्या काही वक्तव्याला वा त्याच्या भूमिकेला आपण कवडीची किंमत देत नाही; असे खुद्द पवार साहेब म्हणतात, तेव्हा त्यांच्या लेखी कवडी म्हणजे किती मोलाची असते, तेही लक्षात घ्यावे लागते. पवारांनी पार्थचे नाव घेऊन कवडीची भाषा वापरलेली नाही. मग ते रोहितविषयी बोलले आहेत का? बिलकुल नाही. प्रश्न पार्थच्या भूमिकेविषयी असेल तर उत्तरही पार्थच्याच संदर्भात आलेले असणार आणि म्हणून पार्थच्या लेखी कवडीचे मोल किती तेही बघावे लागेल ना? नुसते दगडात पक्षी किती मेले त्यांची पिसे काढून मोजण्यात काय हाती लागणार?


चर्चा रंगल्यात की पार्थ अपरीपक्व आहे, असेही साहेब म्हणाले. त्यांनी रागावून म्हटले की संयमाने उद्गार काढले, याचा खुप उहापोह झाला. किंबहूना पार्थ लोकसभेला उभा होता आणि आजोबांनीच त्याला पक्षाची उमेदवारी दिल्याचाही अगत्याने उल्लेख झाला. पण आजोबा व नातवांचे मूल्यांकन करताना त्यांच्यातला एक्सचेंज रेट काय आहे, त्याची दखलही कोणी घेऊ नये का? लोकसभेला राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार म्हणून पार्थ पवारांनी जो अर्ज भरला होता, तेव्हा त्यांनी आपल्या उत्पन्नाचेही विवरण दिलेले आहे. त्यात आजोबा व नातवाचा एक्सचेंज रेट आला आहे. आपण विसरून गेलोय का? त्या प्रतिज्ञापत्रात पार्थ पवार यांनी एक महत्वाचा तपशील दिलेला आहे. त्यामध्ये त्यांनी आजोबांना तब्बल ७० लाख रुपये कर्जावू दिल्याचे म्हटलेले होते. मग पार्थाची किंमत कवडीचीही नाही, असे मानुन चालेल का? की पवारांच्या हिशोबात सत्तर लाख रुपयेही कवडीमोल असतात? पवारांची कवडीही सत्तर लाखापेक्षा अधिक किंमतीची असते, असे त्यांना सांगायचे आहे काय? आपल्यासारख्या सामान्य लोकांना जे काही कवडीमोल वाटते, त्याची किंमत एकदोन रुपयेही नाही म्हणून आपण जे शब्द वापरतो, ते साहेबांच्या व्यवहाराला लागू होत नाहीत. पवारांचा शब्दकोष आपल्यापेक्षा पुर्णपणे वेगळा आहे. औरंगजेबाने विणलेल्या टोप्या, ममता वा श्रीमती अन्थोनी यांनी रंगवलेली चित्रे किंवा सचिनची बॅट आणि पवारांच्या व्यवहारातील कवडी; यांचा एक स्वतंत्र दर्जा असतो. त्यांच्या मोजपट्टीने आपली चित्रे, टोप्या, बॅट वा कवडी मोजली जात नसते. हे विवरण लक्षात घेतल्यास समजू शकेल, की साहेबांनी एका दगडात अनेक पक्षी मारलेले नसून पार्थ अजून कवडीही कमावण्याच्या योग्यतेचा झालेला नाही, किंवा त्याला राजकारणातले ‘चलन-वलन’ समजू लागलेले नाही असे म्हणायचे असू शकते.


3 comments:

  1. भाऊ नेहमीप्रमाणे जबरदस्त. आपल्या लेखातून , ध्वनिचित्रफितीमधून व्यक्त झालेल्या मांडणीमुळे एक नवा दृष्टिकोन मिळतो. तुमचा या क्षेत्रातील दीर्घ अनुभवच यातून डोकावतो. शुभेच्छा

    ReplyDelete
  2. Shri Sarada Pawar mhanale "Hope Sushant case doesn't go Dabholkar way. Yacha khara arth vegla aahe ka? Mumbai policane forensic saksh nash kelyamule Dabholkar chya casi sarakhi hi case rakhadel

    ReplyDelete