विसाव्या आणि एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जी अनेक माणसे भारतीय राजकारणावर प्रभूत्व गाजवित होती, त्यापैकी एक असलेले अमरसिंह यांचे शनिवारी सिंगापूर येथे एकाकी अवस्थेत निधन झाले. मुत्रपिंडाच्या विकाराने ते तसे अलग पडलेले होते. त्यामुळेच त्यांना मायभूमीपासून दुर परदेशात उपचार घ्यायला जणू मुक्कामच ठोकावा लागलेला होता. पण एकूण राष्ट्रीय राजकारणात कुठलेही महत्वाचे किंवा मोक्याचे पद न भूषवलेला हा माणूस; त्याच राजकारणातील एक मोक्याचा मोहरा किंवा मुरब्बी नेता होता. आज अनेकांना बारा वर्षापुर्वीच्या मनमोहन सरकार समोर उभे असलेले बहूमत सिद्ध करण्याचे आव्हान आठवणारही नाही. ज्या डाव्या आघाडीच्या पाठींब्यावर युपीए बनवून कॉग्रेसने पुन्हा देशाची सत्ता मिळवलेली होती, त्याच मार्क्सवादी नेतृत्वाने अणूकराराला कडाडून विरोध करताना युपीए सरकारचा पाठींबा काढून घेण्यापर्यंत मतभेद विकोपास गेले. शीतयुद्ध अस्ताला जाऊन तीन दशकांचा कालावधी उलटून गेला असला तरी आपला अमेरिका विरोध व्रतस्थ वृत्तीने जोपासणार्या पोथीनिष्ठ मार्क्सवादी प्रकाश करात यांनी ४५ डाव्या खासदारांचा पाठींबा काढून घेतल्याने मनमोहन सरकार कोंडीत सापडले होते. आधीच विरोधात असलेल्या भाजपाच्या जोडीला मार्क्सवादी खासदारांची साथ मिळाल्याने युपीएचे बहूमत बारगळले होते. पण त्याचा तोल संभाळण्याचे काम एका माणसाने पार पाडले आणि त्याचे नाव होते अमरसिंह.
डाव्यांनी सिंग सरकार संपवण्याची पुर्ण मोर्चेबांधणी केली होती आणि भाजपानेही त्यात पुर्णपणे सहभाग घेतला होता. मध्यंतरी असलेल्या मायावतींनाही आपल्या गोटात ओढून डाव्यांनी त्यांना पुढल्या पंतप्रधानपदाचे गाजरही दाखवलेले होते. अशावेळी किमान २५ लोकसभा सदस्यांची तुट भरून काढण्याची मोठी समस्या मनमोहन सरकारपुढे होती आणि त्याचा निचरा अमरसिंह यांनी एकहाती केला होता. त्यासाठी त्यांना नंतर काही महिने तुरूंगातही जावे लागलेले होते. त्यांनी आपल्या रहात्या बंगल्यात भाजपाच्याही खासदारांना फ़ोडण्याचा उद्योग केल्याचा आरोप झाला आणि छुप्या चित्रणाने अमरसिंह गोत्यात आले होते. तेव्हा मनमोहन सरकार बचावले आणि त्याचे खरे श्रेय अमरसिंह यांनी केलेल्या चलाखीला वा समिकरणालाच होते. मात्र जो सौदा झाला होता, त्याचे पुढल्या काळात पालन झाले नाही आणि अमरसिंह यांच्या राजकीय जीवनाला तिथून उतरती कळा लागली. भारतीय राजकारण व उद्योग व्यापार क्षेत्रातला मोठा दुवा असाच त्यांचा लौकीक होता. अमिताभ बच्चन सारख्या दिग्गजालाही त्यांनी मुलायमच्या समाजवादी दावणीला आणुन बांधण्याची किमया करून दाखवली होती. आज त्यांच्या एकाकी मृत्यूनंतर म्हणून तर सर्वच पक्षातले जुने नेते श्रद्धांजली देत आहेत.
विसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकात अमिताभच्या नावाने सुरू झालेल्या कंपनीचे दिवाळे वाजल्यानंतर मोठी रक्कम आयकरात भरण्याचा ससेमिरा महानायकाच्या मागे लागला होता. त्या संकटातून त्याला बाहेर काढून तितक्या प्रचंड रोख रकमेचा भरणा करण्याची किमया अमरसिंह यांनी केली असे म्हटले जायचे. पण नंतरच्या काळात बच्चन कुटुंबाच्या प्रत्येक लहानमोठ्या घडामोडीत त्यांचा सहभाग कॅमेराने टिपून ठेवलेला आहे. म्हणून तर २००२ च्या विधानसभा निवडणूकीत खुद्द अमिताभने मुलायमच्या उत्तर प्रदेशातील कारभाराचा ‘उत्तम प्रदेश’ असा प्रचार केला होता. फ़ार कशाला मुलायमपुत्र अखिलेशच्या प्रेमविवाहासाठी पित्याला पटवण्य़ाचे कामही याच अमरसिंहांनी केलेले होते. मात्र मुख्यमंत्रीपदी अखिलेश विराजमान झाल्यापासून मुलायम गोटातून अमरसिंह खुप दुरावत गेले आणि जणू भारतीय राजकारणातून दुर फ़ेकले गेले. ज्यांनी गुजरात दंगलीवरून मोदींची यथेच्छ अखंड निंदाच केली होती, ते अमरसिंह २०१४ च्या सुमारास मोदींचे गुणगान करण्यापर्यंत आले होते आणि व्याधीने त्रस्तही झालेले होते. पण त्या विपन्नावस्थेत त्यांना मुलायमनीच आश्रय दिला आणि ते नव्याने राज्यसभेत पोहोचले होते. मात्र त्यांना पुन्हा तितके महत्वाचे स्थान समाजवादी पक्षात मिळू शकले नाही किंवा भारतीय राजकारणात कुठली नवी किमया करून दाखवता आली नाही. भारतीय राजकारणात राजरोस सौदेबाजी करून प्रतिष्ठेने मिरवणारा नेता, अशी त्यांची ख्याती होती आणि अनेक सापळे उधळून त्यांनी त्यात यशही संपादन केलेले होते.
पण उमेदीच्या आयुष्यात ज्या मस्तीत हा नेता वागला व जगला; त्याच स्तरावर पुन्हा येणे त्यांना शक्य झाले नाही. मोदी युगात बदललेले राजकारणाचे स्वरूप आणि एकपक्षीय बहूमताच्या कालखंडात, त्यांच्या कौशल्याला फ़ारसा वाव राहिला नव्हता. त्यातच व्याधीग्रस्त शरीर आवश्यक त्या पळापळीला साथ देत नव्हते. भारतातली आरोग्य सेवा पुरेशी आधुनिक नसल्याने त्यांना वारंवार परदेशी जाऊन उपचार घ्यावे लागत होते आणि दिर्घकाळ तिथेच वास्तव्य करावे लागत होते. त्यातच एकप्रकारे त्यांचे गॉडफ़ादर म्हणावे असे मुलायमसिंगच राजकारणातून बाहेर फ़ेकले गेलेले होते. किंबहूना ती नव्वदीच्या दशकातली सगळी पिढीच मोदीयुगात मागे पडलेली आहे. अमरसिंह त्याच कालखंडातले. त्यामुळेच आजच्या वेगवान नव्या राजकारणात ते कुठल्या कुठे विस्मृतीत गेलेले होते. आज ज्याला ऑपरेशन कमल म्हणतात, त्यातले महागुरू अशीच त्यांची ओळख होती आणि राजस्थानची उलथापालथ चालू असताना कुणाला अमरसिंह आठवलेही नाहीत, हा काळाचा महिमाच म्हणायचा. असो, त्यांच्या निधनाने आणखी एक जुन्या पठडीतला मुरब्बी राजकीय नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे.
far chhan Vivechan Bhau..
ReplyDeleteKhup sakhol & vistrut vivechan!!
ReplyDelete