Saturday, August 8, 2020

आत्मनिर्भर भारताचा चेहरा

 Baba Shingote Archives - TV9 Marathi


गुरूवारी एका वृत्तसमुहाचे संस्थापक संपादक मुरलीधर शिंगोटे यांचे निधन झाले. वयाच्या ८२ व्या वर्षी देह ठेवतानाही हा माणुस अस्वस्थ असणार, याविषयी माझ्या मनात तीळमात्र शंका नाही. कारण अस्वस्थता हाच त्यांच्या जगण्याचा आधार होता. पुण्याच्या जुन्नर भागातील एका गावातून रोजगारासाठी मुंबईत पोहोचलेला एक तरूण कुठलेही मोठे स्वप्न उराशी बाळगून या मायानगरीत आला नव्हता. जगण्याची धडपड आणि दुर्दम्य इच्छाशक्ती इतकेच त्याचे पाठबळ होते. तेवढ्या बळावर त्याने एक मोठा वृत्तसमुह पन्नास वर्षात उभा केला. त्यांची आजची ओळख अनेक वृत्तपत्रांचे संपादक संस्थापक अशी असली, तरी मुळातला हा हाडाचा विक्रेता होता. वृत्तपत्रासारखा माल बाजारात खपावा आणि वाचकाने वृत्तपत्र विकत घेऊन वाचलेच पाहिजे; असा हट्ट असलेला हा माणूस होता. त्याच विक्रेता म्हणून असलेल्या जिद्दीतून तो वृत्तपत्र चालवण्याकडे योगायोगाने ओढला गेला होता. अन्यथा त्याचा पत्रकारितेशी तसा पेशा म्हणून काडीमात्र संबंध नव्हता. पण विकायला मोठे वृत्तपत्र हातात नाही, तर आपणच वृत्तपत्र काढावे असा ध्यास त्याने केला. तेव्हा त्यासाठी आवश्यक असलेले भांडवल त्याच्यापाशी नव्हते, तसेच त्यासाठी अत्यावश्यक असलेली प्रतिभा वा लेखनाची कुवतही त्यांच्यापाशी नव्हती. पण अशा जिद्दी माणसाने गेल्या पाव शतकात एक मोठा वृत्तपत्र समुह उभा करून दाखवला. आज त्याची महत्ता अगत्याने सांगणे भाग आहे. कारण कोरोना व डिजिटल युगात त्याच छापील वृत्तजगताला मंदीने संकटात ओढलेले आहे. त्यावेळी मुरलीधर शिंगोटे हा दीपस्तंभ म्हणून पत्रकारांना बघता आले पाहिजे. तर प्राप्त परिस्थितीवर मात करता येईल.

माझा आणि मुरलीधर शिंगोटे यांचा संबंध त्यांनी स्वत:चे वृत्तपत्र सुरू केल्यानंतर आला आणि तोही योगायोग होता. मुळात वृत्तपत्र वितरणातली त्यांची कारकिर्द खुप मोठी होती. बुवा दांगट यांच्याच गावचे असल्याने तरूणपणी शिंगोटे यांनी बुवांपाशीच उमेदवारी केली. पण फ़ावल्या वेळात त्यांनी भायखळा स्थानकानजिक आर. बी. मोरे या आणखी एका दिग्गज वितरकाकडेही काम केले. १९५०-६० च्या जमान्यात मुंबईतले हे दोन वितरणाचे सम्राटच होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्मिक या साप्ताहिकाचा आरंभ बुवा दांगट यांनीच दिलेल्या पाच हजार रुपयातून झाला होता, यात बुवांची महत्ता समजू शकते. अशा वितरकाकडे उमेदवारी करताना शिंगोटे यांनी त्यातले अनेक बारकावे शिकून घेतले होते आणि फ़ावल्या वेळात मोरे यांच्याकडे जाऊन अधिकची माहिती मिळवत, त्या व्यवसायाच्या खाचाखोचा अनुभवी लोकांकडून शिकलेल्या होत्या. त्यातून त्यांनी मिळवलेला अनुभव किंवा घेतलेले प्रशिक्षण, आज वृत्तपत्र व्यवस्थापनाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेक पदवीधरांनाही माहितीचा नसेल. कुठे कुठले वृत्तपत्र किती खपू शकते आणि कुठल्या हेडलाईनला किती प्रतिसाद मिळू शकतो, याचे आडाखे बांधून त्यांनी आपला जम बसवला आणि अनेक नव्या वृत्तपत्रांनाही मुंबईच्या परिसरात प्रस्थापित केलेले होते. २००० नंतरच्या काळात तर नवे वृत्तपत्र काढायचे, मग वितरक मुरलीशेठच असावा, असा दंडक तयार झाला होता. पण स्वत:ची वृत्तपत्रे काढल्यावर या माणसाने साठी उलटलेली असतानाही अनेकदा अवघा महाराष्ट्र पालथा घातला होता. जिल्हे तालुके व त्यात कुठेही कुठले वृत्तपत्र किती चालते किंवा का चालते; त्याची इत्थंभूत माहिती त्याच्या मेंदूत नोंदलेली असायची. 

‘नवाकाळ’ दैनिकाला शून्यातून उभे करताना जितकी निळूभाऊ खाडीलकरांची समर्थ लेखणी कामाची ठरली, तितकेच मुरलीशर शिंगोटे यांच्या वितरणाच्या कौशल्याची किमया त्यात सामावलेली होती. जेव्हा नवाकाळचा खप सांगण्यासारखा नव्हता, तेव्हा त्याच्या वितरणाची जबाबदारी शिंगोटे यांनी घेतली. त्यासाठी आवश्यक डिपॉझिट भरायलाही त्यांच्यापाशी पैसे नव्हते आणि ते मागण्याइतकी क्षमता निळूभाऊंकडे नव्हती. त्यातून त्यांनी एकत्रितपणे ‘सर्वाधिक खपाचे मराठी दैनिक नवाकाळ’ होण्यापर्यंत मजल मारली होती. वितरणासाठी हाताशी कुठली गाडी नव्हती की सहकारी नव्हते. तेव्हा एका एका स्टॉलवर सायकल दामटत नवाकाळच्या प्रतीचे वाटप करून शिंगोटे या क्षेत्रात उतरले होते. त्याच नवाकाळला नव्वदीच्या दशकात कित्येक लाखांचा खप मिळेपर्यंत ही जोडी चालली. पुढे त्यांच्यात मतभेद झाले आणि अकस्मात नवाकाळची एजन्सी निळूभाऊंनी काढून घेतली. तेव्हा शिंगोटे यांच्याकडे वितरणाच्या कामात गुंतलेल्या दोनशेच्या आसपास कामगारांचा ताफ़ा जमा झाला होता आणि एका रात्रीत त्यांना उद्यापासून काम नाही म्हणायची हिंमत या माणसाला झाली नाही. मग त्या सगळ्या कामगारांना पुरेल इतके काम देण्यासाठी आपलेच वृत्तपत्र चालू करण्याची खुळी कल्पना घेऊन शिंगोटे झपाटले. त्याचे स्वरूप आज एका मोठ्या वृत्तसमुहात झालेले आहे. त्याच कालखंडात त्यांची माझी भेट झाली. ज्या दिवशी त्यांच्याकडून नवाकाळची एजन्सी गेली, त्याच दिवशी त्यांनी ‘मुंबई चौफ़ेर’ नावाचे सांजदैनिक सुरू केलेले होते. तिथून त्यांची संपादक म्हणून कारकिर्द सुरू झाली. चार ओळींची बातमी लिहीण्याची क्षमता नसलेल्या माणसाचे हे नुसते धाडस नव्हते, तर खुळेपणाच म्हटला पाहिजे. 

तशी जुळवाजुळव त्यांनी केली आणि नव्या दैनिकाची जाहिरातही केलेली होती. फ़ार थोड्या लोकांना आज ठाऊक असेल, की त्या दैनिकाचा संपादक म्हणून त्यांनी साहित्यिक ह मो मराठे यांच्या नावाशी घोषणा केलेली होती. पण बोलणी पुर्ण होण्यापुर्वीच जाहिरात केल्याने मराठे चिडले व त्यांनी सहभागी व्हायला नकार दिला. मग संपादकाचे काय करणार? शिंगोटे यांनी बेधडक आपलेच नाव संपादक म्हणून लावले. पण १ मे १९९४ रोजी नव्या दैनिकाचा पहिला अंक प्रसिद्ध केलाच. आपलाच एक विक्रेता संपादक असल्याने मुंबईभरच्या विक्रेत्यांचा पाठींबा त्यांना मिळाला, तरी त्या पेपरला आकार व चेहरा नव्हता. अशावेळी अशोक शिंदे या दुसर्‍या वितरकाने माझ्याशी शिंगोटे यांची भेट करून दिली आणि तिथून मलाही नवी ओळख मिळाली. तोपर्यंत मी अनेक वर्तमानपत्रात कामे नोकर्‍या केल्या होत्या. लिखाणही केलेले होते. आरंभी त्यांच्या चौफ़ेरमध्ये फ़क्त हेडलाईनची बातमी देण्याचे मान्य झाले आणि त्याला मिळालेल्या प्रतिसादामुळे हा माणूस कमालीचा हरकला. त्यामुळे काही महिन्यातच सकाळचे दैनिक काढायचे धाडस त्यांनी केले. ‘आपला वार्ताहर’ नावाचे ते दैनिक नवाकाळचा प्रतिस्पर्धी अशाच स्वरूपात आम्ही बाजारात आणले आणि अल्पावधीत त्याला चांगला प्रतिसाद मिळत गेला. १९९५ ची विधानसभा निवडणूक त्याला लाभदायक ठरली. पण तिथून मग शिंगोटे यांची घोडदौड वृत्तपत्र क्षेत्रात सुरू झाली. त्यातूनच त्यांना पुणे येथे आपले वेगळे दैनिक करण्याची सुरसुरी आली आणि ‘पुण्यनगरी’ ह्या दैनिकाचा जन्म झाला. ते त्यांच्या मालकीचे तिसरे दैनिक होते. मग बंद पडू घातलेले कानडी दैनिक त्यांनी चालवायला घेतले. यशोभूमी नावाचे हिंदी आणि तामिळी भाषेतले दैनिकही चालवले. त्या यशावर स्वार होणे मात्र या कलंदतराला शक्य झाले नाही. तो सामान्य वितरक म्हणण्यापेक्षाही विक्रेताच राहिला. लोकांनी शेठ वा बाबा अशा अनेक उपाध्या दिल्या, तरी आपल्या सामान्य जगण्यातून हा माणूस कधी बाहेर पडू शकला नाही.

माणसाची जिद्द किती दुर्दम्य असते आणि संकटे माणच्या जिद्दीसमोर कसे गुडघे टेकतात, त्याची डझनावारी उदाहरणे या माणसाने मला अल्पावधीतच दिलेली आहेत. ‘वार्ताहर’च्या काळात एका संध्याकाळी छपाईची प्लेट उर्दू टाईम्सच्या प्रेसपर्यंत घेऊन जायला गाडी गर्दीतून निघणे शक्य नव्हते, म्हणून ड्रायव्हर रडत बसला होता. तर शिंगोटे यांनी वॉचमनला सांगून भाड्या़ची सायकल मागवली आणि त्याच्या कॅरीयरला प्लेटची गुंडाळी बांधून प्रेस गाठला होता.त्या दिवशी गौरी्गणपती विसर्जनाची मुंबईत सर्वत्र गर्दी होती आणि वितरणाच्या कामावरचे अनेक कामगार गैरहजर होते. साठीच्या दारातला हा माणूस त्या प्रेसमध्ये ठाण मांडून छापलेल्या प्रति मोजून त्यांचे गठ्ठे बांधायला बसला होता. त्या रात्री गर्दी ओसरल्यावर मॅनेजर तळेकर यांच्यासमवेत मी प्रेसवर पोहोचलो, तर मुरलीशेठचे काम संपत आलेले होते. ८० हजार कॉपी एकहाती मोजून संपल्यावर त्यांनी श्वास घेतला. पण एका जागी बैठक मारल्याने कंबरेखालचा भाग पुरता बधीर होऊन गेलेला होता. मुंग्या इतक्या आलेल्या होत्या, की त्यांना दोघांनी धरून उठवायचे म्हटले तरी दहाबारा मिनीटे खर्ची पडली. सहा तास सलग काम करूनही ह्या माणसाची उर्जा संपलेली नव्हती. समोर मॅनेजर दिसताच त्यानी कुठल्या भागात पेपरची कॉपी कशी वितरीत होणार आहे, त्यासाठी प्रश्नांचा भडीमार त्यांनी केला. ह्यात आजही बदल झालेला नव्हता. महाराष्ट्राच्या कुठल्याही जिल्ह्यात पुण्यनगरी दैनिकाचे कार्यालय आहे आणि तिथेही जाऊन धडकणारा पंच्याहत्तरीचा हा माणूस पेपरचा गठ्ठा उशाला घेऊन चक्क घोरत झोपी जायचा. देहाची इतकी छळणूक आपल्या जिद्दीसाठी करणारा दुसरा माणूस मी बघितला नाही कधी. आज त्यांच्या निधनानंतर मला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आत्मनिर्भर भारताचा चेहरा याच माणसात दिसला. शून्यातून विश्व निर्माण करताना अडचणी वा संकटांना भीक न घालणारा भारतीय. मुरलीधर शिंगोटे.

आज कोरोनामुळे छपाईच्या माध्यमांची कमालीची तारांबळ उडालेली आहे. एका बाजूला डिजिटल माध्यमे आणि दुसरीकडे कोरोनामुळे वाचकांपर्यंत वृत्तपत्र पोहोचवण्यात आलेला दिर्घकालीन अडथळा; यामुळे वृत्तपत्रसृष्टी मोठ्या संकटात सापडलेली आहे. हजारोच्या संख्येने पत्रकार व कर्मचारी मालक वर्गाने घरी बसवले आहेत. अर्थात त्यांनाही व्यवहार परवडणे तितकेच अशक्य झाले आहे. अशावेळी पाव शतकापुर्वीचे शिंगोटे आठवतात. त्यांची सर्वात मोठ्या वितरणाची एजन्सी हातातून गेली असताना आपल्या दोनशेहून अधिक कामगार सहकार्‍यांना घरी पाठवण्यास त्यांनी ठामपणे नकार दिला होता. त्यांना कामावरून काढायचे नाही वा बेकार करायचे नाही, इतकीच खरी इच्छा होती. तिचा पाठलाग करताना त्या जिद्दी माणसाने आणखी काही हजार लोकांसाठी रोजगाराची संधी निर्माण केली. खिशात पैसे नव्हते किंवा पाठीशी कोणी भांडवलदार किंवा प्रतिभावंत संपादकही नव्हता. होती फ़क्त अपेक्षा व तिचा पाठलाग करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती. संकटाला घाबरून जाण्यापेक्षा त्याच्यावर मात करण्याची अपार जिद्द असलेला हा माणूस म्हणून मोदींच्या आत्मनिर्भर संकल्पनेपुर्वीचा आत्मनिर्भर भारतीय होता. त्याने कधी असले शब्द ऐकले नाहीत वा त्याला उच्चारताही आले नसते. पण त्या निर्जीव शब्दांचे जितेजागते स्वरूप म्हणजे मुरलीधर अनंता शिंगोटे. कुटुंब वा मुले नातवंडांसाठी त्याने कमावलेली संपत्ती मागे राहिली असेल. पण आजच्या निराशामय कोरोना काळात प्रत्येक नागरिकासाठी शिंगोटे यांनी दाखवलेली जिद्द इच्छाशक्ती आणि समस्या झुगारण्यातून उभारलेली कृती; ही सर्वात मोठी संपत्ती आहे. आपण घेणार असलो तर आपली आहे. अन्यथा भूमीगत धन म्हणून ते तसेच दुर्लक्षित राहून जाईल, म्हणून तिकडे लक्ष वेधले.


9 comments:

  1. Being the reader of Punya Nagari since start
    I can really relate to both of you
    You both are great inspiration
    RIP 🖤

    ReplyDelete
  2. हि तुमची मुरलीधर शिंगोटे यांना दिलेली श्रध्दांजली एक माईलस्टोन आहे, अप्रतिम.

    ReplyDelete
  3. 1. सातारा जिल्ह्यात एका आडगावी माझी बदली झाली होती तेथे फक्त
    पुण्यनगरी हा सर्वात कमी जाहिराती असलेला अधिक बातम्या देणारा स्थानिक पेपर
    .त्यातील उलटतपासणी या सदरातून भाऊ तुमची मला पहिली ओळख झाली .तेव्हापासून मी तुमचा आणि पुण्यनगरीचा चाहता झालो. सध्या मी अहमदनगर येथे पुण्यनगरी घेतो. कोरोना च्या काळात जाहिराती मिळत नव्हत्या त्याच काळात पुण्यनगरी मध्ये विविध हार्दिक मान्यवर कार्यकर्त्यांचा फोटो सहित "सोशल डिस्टन्स पाळा कोरूना टाळा" अशा असंख्य जाहिराती त्यांनी मिळवून उत्पन्नाचा नावीन्यपूर्ण मार्ग त्यांनी शोधला. संकटातही संधी शोधणाऱ्या या त्यांच्या कल्पकतेचेमला कौतुक वाटले.salute to such a real practical man

    ReplyDelete
  4. Namaskar Bhau. Its w.r.t. your video on Tumbalelya Mumbaichya Ayktanche abhinandan.

    You congratulated him for saying that in entire world there will be water logging in low lying area.

    It's not true. Netherlands is entire country below sea level. They have developed words best watermanagement system. Are you not aware of this ?
    Instead of praising them I wish learned person like you show them the mirror and question why BMV have not developed such a strong water management system.

    ReplyDelete
  5. देव सगळ्यांनाच असे आत्मनिर्भरता प्रदान करो.

    ReplyDelete
  6. धन्य आहे ह्या माणसाची आजच्या तरुणांनी हा लेख नक्की वाचला पाहिजे

    ReplyDelete
  7. माझ्या महाविद्यालय शित्रण काळात फक्त "कबुतर जा जा " हे चारोळ्यांचे सदर वाचायला अगदी सोळा सतरा वर्षांची मुले मुंबई चौफेर विकत घ्यायची ....

    यशोभुमी ची गोष्टच वेगळी आमचा उत्तल प्रधेश मधला सुरक्षा रक्षक गावच्या बातम्या वाचायला दरररोज एक दीड कि.मी पायपीट करून यशोभुमी आणायचा ... (बच्चे को साप ने काटा , ट्रॅक्टर पलट गया , अशा बातम्यांनी भरलेला असायचा यशोभुमी ) तरी ही मुख्य आकर्षण हे त्या मधील शेरो शायरी चे सदर हेच असायचे ...

    ग्राहकांची नाडी शिंगोटेंनी योग्य रीत्या पकडली होती हे खरे

    ReplyDelete
  8. श्रध्दांजली.

    लेख आवडला

    ReplyDelete
  9. भाऊ, बाबांची खरंच नव्याने ओळख झाली त्यांच्याबद्दल आदर तर होताच पण हे सगळं वाचल्यावर तो पटींनी वाढला

    ReplyDelete