Tuesday, August 18, 2020

बंगलुरूने दिलेला धडा

 Bengaluru violence: To recover costs, govt to ask HC for claims ...


शीर्षक वाचले तर कोणाला वाटेल की त्यातून आपले राजकीय नेते काही धडा घेतील. पण भारतातले किंबहूना जगातले नेते, सहसा अशा घटनांपासून काहीही शिकत नाहीत. म्हणून तर तशाच घटना सातत्याने घडत असतात आणि त्यात अनेक दिग्गज राजकारणी नेत्यांचा बळी गेलेला आहे. जे बंगलुरू येथे घडले ते प्रथमच घडले; असेही नाही. सहा महिन्यांपुर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतात आलेले होते आणि त्यांच्या राजधानी दिल्लीतल्या कार्यक्रमाचा मुहूर्त साधून अशीच दंगल पेटवून देण्यात आलेली होती. त्यातले धागेदोरे आता उघडकीस येत आहेत आणि त्यामागची संपुर्ण योजनाही समोर आणली जात आहे. म्हणून बंगलूरूची घटना टाळता आलेली नाही. कारण अशा दंगली घडवणार्‍यांना स्थानिक लोक वा विषयाशी कुठलेही कर्तव्य नसते. त्या अर्थाने अठरा वर्षापुर्वी गुजरातमध्ये भडकलेल्या दंगलीलाही स्थानिक असे कुठलेही कारण नव्हते. फ़क्त निमीत्त मिळालेले होते आणि असे निमीत्त पुरवणारेच त्या हिंसाचाराचे खरेखुरे मुख्य सुत्रधार असतात. पण प्रत्यक्ष हिंसा वा दंगल घडत असताना ते तिथून मैलोगणती दुर असतात आणि त्यांना त्यातले आरोपी म्हणून समोर आणणे शक्य असते असे बिलकुल नाही. दिल्ली, बंगलुरू वा अगदी महाराष्ट्रात कोरेगाव भीमा येथे उसळलेली दंगल आठवा. तपासानंतर त्यांचे सापडलेले धागेदोरे खुप दूरवर पसरलेले होते. अलिकडल्या काळात अशा घटना योजनाबद्ध रितीने मुद्दाम घडवल्या जातात आणि त्यासाठी स्थानिक निमीत्त शोधले जाते, असेच आढळून येईल. दिल्ली वा तत्पुर्वी जमिया मिलीया विद्यापीठात उसळलेल्या हिंसाचाराला तर स्थानिक काही निमीत्त नव्हते. तेव्हा तात्विक निमीत्त उपलब्ध करून देणारी टोळी आपल्याला उजळमाथ्याने फ़िरताना दिसू शकेल. समाजातले प्रतिष्ठीत वा उच्चपदस्थ म्हणून हे लोक मिरवताना दिसतील. पण सहसा त्यांचा हिडीस चेहरा समोर येत नाही.


बंगलुरूकडे वळण्यापुर्वी आपण कोरेगाव भीमा वा एल्गार परिषदेचा तपशील तपासू शकतो. तिथेही जाणिवपुर्वक एका दलित सोहळ्याची पार्श्वभूमी वापरली गेली. ज्या दिवशी प्रतिवर्षी मोठ्या संख्येने दलित समाज विजयस्तंभाला अभिवादन करायला तिथे जात असतो, त्याच्या आदल्या दिवशी चिथावणीखोर भाषा वापरणारी परिषद योजण्यात आली होती. तिथे रस्त्यावर उतरून न्याय मिळवण्याची भाषा उत्स्फ़ुर्त बिलकुल नव्हती. त्यात सहभागी झालेली मंडळी दिल्लीच्या केंद्रीय विद्यापीठाचे विद्यार्थी व प्राध्यापक म्हणून अशा विचारांचा फ़ैलाव करीत असतात. त्यांनीच संसद भवनाचा हल्लेखोर अफ़जल गुरूच्या फ़ाशीला न्यायालयीन हत्या ठरवण्यापर्यंत मजल मारलेली आहे आणि त्याच्यासह काश्मिरातील घातपात्यांचे उदात्तीकरण करण्याचा आटापिटा नित्यनेमाने केलेला दिसू शकेल. त्यापैकीच काहीजण नक्षलवादी कारवायांचे समर्थन करताना आढळतील वा त्यांच्या बचावासाठी अगत्याने पुढे येताना आपण बघितलेले आहेत. गुजरात दंगलीचे स्तोम माजवून यांनीच हायकोर्ट, सुप्रिम कोर्टापर्यंत दंगलखोर मंडळींना आश्रय देण्यात पुढाकार घेतलेला होता. भारतविरोधी कुठल्याही कारवाया किंवा हालचालींचे समर्थन करताना ते आपली शक्ती बुद्धी पणाला लावताना आपण बघितले आहेत आणि तेच यातले खरे सुत्रधार असतात. पण जेव्हा तपासकाम सुरू होते आणि गुन्ह्याचे धागेदोरे शोधले जातात, तेव्हा त्यांचा थेट संबंध सापडणार नाही. इतक्या साळसूदपणे ह्या गोष्टी योजलेल्या असतात. पुर्व दिल्लीच्या दंगलीतही आता तपासाअंती किती आधीपासून हिंसाचाराची तयारी झाली व सामग्रीची सज्जता राखण्यात आली, त्याचे पुरावे सापडलेले आहेत. पण शाहिनबाग प्रकरणात पुढे दिसणारा कोणीही त्यात सापडणार नाही. व्यवहारात त्यांनीच अशा प्रत्येक घटनाक्रमाला प्रेरणा व चालना दिल्याचे आपल्याला जाणवू शकते. फ़क्त ते कोर्टात सिद्ध करणे अशक्य असते. म्हणून त्यातला धडा शोधण्याची गरज आहे आणि त्यानुसारच कायदे बनवण्याची गरज आहे.


अशा घटनांना रोखण्यासाठी विद्यमान कायदे अपुरे आहेत आणि त्यांच्या चाकोरीतून न्यायालये गुन्हेगारीला रोखण्याची बिलकुल शक्यता नाही. कारण असे कायदे आपल्या कुठे गळफ़ास लावू शकतात, त्याचा पोलिसांपेक्षाही अशा सुत्रधारांनी बारकाईने अभ्यास केलेला आहे. म्हणूनच त्यातून आपण सहज निसटायचे आणि स्थानिक साथीदार बळी म्हणून पुढे करायचे; अशी त्यातली योजना असते. कुठल्या तरी उदात्त तत्व किंवा हेतूने भारावलेले असे खुप उत्साही बळी आत्मसमर्पणाला उतावळेच झालेले असतात. शिवाय पकडले गेल्यावर समर्थनाला नामचीन मंडळी पुढे येणार हेही त्यांना ठाऊक असते. पुर्व दिल्ली वा आता बंगलुरूच्या हिंसेचे आरोपी असोत, त्यांना यातले गुन्हेगार ठरवले जाते. पण तेही यातले बळीच असतात. त्यांना उदात्ततेच्या नावाखाली बळी दिले जात असते. पण खरे सुत्रधार मोकळे रहातात आणि पुढल्या घटनेसाठी नवा बळी शोधून नवी हिंसा घडवितच रहातात. कोरेगाव भीमाच्या निमीत्ताने अशाच खर्‍या सुत्रधारांपर्यंत प्रथमच तपासकाम जाऊन पोहोचले आणि त्यांचेही नावाजलेले ज्येष्ठ साध्या अटकेच्या निमीत्ताने चव्हाट्यावर आले होते. त्या दंगलीत मरण पावलेले दलित वा अन्य ग्रामस्थ यांच्या न्यायाची बाजू मांडायला यापैकी कोणी पुढे येत नाही. पण सुत्रधार पकडले जातात म्हटल्यावर किती तारांबळ उडली होती? दिल्लीच्या दंगलीतही तपासाचा रोख पीएफ़आय संघटनेच्या दिशेने जाऊ लागल्यावर भल्याभल्यांची पळापळ होऊन गेली होती. कारण उघड आहे. कितीही लोकांची धरपकड झाली म्हणून या सुत्रधारांना काळजी नसते. पुढले बळीचे बकरे शोधून कामाला लावणारे सुत्रधार सुरक्षित राहिले पाहिजेत, हा हट्ट असतो. बंगलुरूच्या बाबतीत सुरूवातीलाच या पीएफ़आय संघटनेकडे पोलिसांनी रोख वळवला आणि दंगलीच्या पाठीराख्यांची गोची झाली आहे. तात्काळ त्यात कॉग्रेसच्या नेत्यांनी भाजपावर तोफ़ा डागणे सुरू केलेले आहे. पण भाजपाचा त्यात संबंधच कुठे येतो? मुळात चिथावणीखोर पोस्ट कॉग्रेस नेत्याच्या कोणा नातलगाची आहे, तर भाजपाचा संबंध काय?


ज्या संघटनेकडे आता हिंसाचाराचा संशयित म्हणून बोट दाखवले जात आहे, तिच्याशी कॉग्रेसने सातत्याने मैत्रीच राखलेली आहे. ही संघटना मुळातच केरळातली आहे आणि दोन दशकापुर्वी बंदी घालण्यात आलेल्या सीमी नामे संघटनेच्या एका फ़ुटीर गटाने हा नवा उद्योग सुरू केला होता. त्याचे मुख्यालय केरळात असून आपल्या राजकीय सोयीनुसार कॉग्रेस व डाव्या आघाडीने वेळोवेळी त्या संघटनेला आश्रय देणे वा पाठीशी घालण्याचे पाप केले आहे. त्याचाच विस्तार कॉग्रेसचे मुख्यमंत्री असताना कर्नाटकात झाला आणि विधानसभेच्या निवडणूकीत कॉग्रेसने त्या संघटनेचा पाठींबा मिळवण्यासाठी आटापिटा केलेला होता. त्याच संघटनेच्या सदस्य व म्होरक्यांनी बंगलुरूत हिंसाचार माजवला आहे आणि त्याला निमीत्त पुरवण्याचे काम कॉग्रेस आमदाराच्या नातेवाईकाने केलेले आहे. मग त्यात भाजपाचा संबंध काय? भाजपा सत्तेत आहे, म्हणून तर तात्काळ हिंसेला रोखण्यासाठी गोळीबारापर्यंत मजल गेली. कॉग्रेसच्या हाती सत्ता असती तर त्या दंगलीचा संपुर्ण कर्नाटकात प्रादुर्भाव होण्यापर्यंत मुभा देण्यात आली नसती, असे कोणी सांगू शकणार आहे काय? सांगायचा मुद्दा इतकाच, की ज्या गतीने एका सोशल मीडियात आलेल्या पोस्टवर हिंसक प्रतिक्रीया उमटली, ती उत्स्फ़ुर्त बिलकुल नव्हती. त्यामागे पुर्ण तयारी व सज्जता दिसलेली आहे. म्हणजेच सर्व सज्जता झाल्यावर फ़क्त निमीत्ताची प्रतिक्षा होती आणि ते निमीत्त एका सोशल माध्यमातील पोस्टने मिळालेले आअहे. मग ती पोस्ट जाणिवपुर्वक टाकलेली होती काय? संबंधित व्यक्तीने पोस्ट टाकली असेल वा कोणी हॅक करून त्याच्या खात्यावर पोस्ट टाकलेली असेल. पण त्यातून निमीत्त मिळाले म्हणजे बाकी सज्जता होती. ते निमीत्त नसते तर आणखी कुठले निमीत्त शोधून हिंसा झालीच असती. कारण हिंसेची तयारी पुर्ण झाली होती. निमीत्ताची प्रतिक्षा चालली होती. म्हणून शोध घ्यायचा तर हिंसक घटनेचा घेण्यापेक्षा त्यामागची तयारी व सज्जता कधीपासून झाली वा कोण ती करीत होते, त्याचा तपास झाला पाहिजे. तोच त्यातला धडा आहे. अर्थात शिकायचा असेल तर. कठपुतळी पकडून काही साध्य होत नाही, सुत्रधार बंदिस्त झाल्याशिवाय असले हिंसाचार थांबणारे नाहीत.


3 comments:

  1. भाऊ आजच तुमचा सोनू सूद आणि CBI हा विडिओ बघितला. आणि या ब्लॉग चा विषयसुद्धा pseudo सेक्युलर आहे. आपण व्हिडिओवर कॉमेंट बंद केल्यामुळं इथे प्रतिक्रिया देत आहे. सध्या शिवसेना पण 6यांच्या गोटात सामील झाली आहे. आपल्याला सेनेकडून ज्या अपेक्षा आहेत ती सेना कधीच संपली आहे. मी लहान असताना आमच्या गावात सेनेची शाखा स्थापन झाली होती. त्या वेळी स्वातंत्र्यलढ्याच्या वेळी जसे लहान मुले चिठ्ठया पोहोचवत असत, ते काम मी सुद्धा केले आहे. त्यामुळं मलाही लहानपणापासून सहानुभूती आहे. आज मी साठी पार केली आहे. अपेक्षाभंगाचं दुःख सहन करत आहे. आपण पूर्वी मार्मिक चे संपादक होतात त्या मुळे आपणालाही हे दुःख सतावत असणार. मी पण दुःखी च आहे

    ReplyDelete
  2. भाऊ, आता हे देशात सतत होणार आहे. श्रीराममंदिर तोडून परत मशीद बांधू असे सरळसरळ बोलले जातेय त्यात बंगळूरुची दंगल पूर्वरचित होती यात नवल नाही. श्रीराममंदिराची पायाभरणी ठरल्यापासूनच हे सुरु झाले आहे. पुरोगामी शिरोमणी श्रीमान शरदुद्दीन लगेचच कोरोना जाईल का म्हणाले.
    त्या पाठोपाठ अनेक पुरोगाम्यांना, अंधश्रद्धा निर्मूलन वाल्यांना वांत्या झाल्या, पण देशातील बहुसंख्य हिंदू खूष आहेत आणि ते आपल्याला विचारत नाहीत हे दिसल्यावर मात्र आतून हलले असावेत. या दंगलीच्या मागे असेच आतून हललेले लोक तर नसतील?

    ReplyDelete
  3. भाऊ ह्यावर प्रकाश टाकावा,
    मुंबई ही महाराष्ट्रातच आहे ना.तर मग मुंबई पोलिसांना महाराष्ट्र पोलीस का म्हणत नाही?
    बिहार पोलिसाना पाटना पोलीस म्हणत नाहीयेत. त्याना तर बिहार पौलिसच म्हंतात की.
    मी मागे मुंबईला आलो होतो पवई या भागात माझी परिक्षा होती त्यावेळी मला रोमिंग लागलेल.


    सुशांतच्या निमीत्ताने महाराष्ट्रद्रोही असा अरोप होत असल्याचे जाणवले म्हणून पोस्ट करतोय.

    ReplyDelete