Monday, August 24, 2020

दबा धरून बसलेला वाघ?

 Fact Check: MNS Chief Raj Thackeray's Rallies Gain Traction ...

गेल्या सहा महिन्यात महाराष्ट्राच्या राजकारणात खुप उलथापालथी चालू असताना एक नेता अजिबात अज्ञातवास भोगताना दिसतो आहे. म्हणजे तो कुठे दिसतच नाही, म्हणून त्याला अज्ञातवास म्हणावे लागते. त्याचे नाव आहे, राज ठाकरे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना या राज्यव्यापी पक्षाचे ते संस्थापक अध्यक्ष असून राजकीय घडामोडी घडत असताना त्यांनी गप्प बसावे, हा त्यांचा स्वभाव नाही. अशा प्रत्येक बाबतीत आपले खास मतप्रदर्शन करण्यासाठी ते ख्यातनाम आहेत. पण कोरोनापासून सुशांत सिंग राजपूतच्या शंकास्पद मृत्यूपर्यंत एकाहून एक खळबळजनक घटनाक्रमाची रांग लागलेली असताना, राज ठाकरे गप्प आहेत. ही बाब म्हणूनच खटकणारी आहे. अर्थात राज हे मुळचे शिवसेना नेता असून बाळसाहेबांचे पुतणेही आहेत. त्यांची जडणघडण शिवसेनेतली असून वेगळा पक्ष काढला तरी त्यांचा आवेश व अभिनिवेश नेहमीच मुळच्या शिवसेनेसारखा राहिलेला आहे. त्यामुळेच आरंभी सतत अपयश आल्यानंतरही बाळासाहेबांनी आपली वक्तव्ये वा झुंजार शिवसैनिकांच्या बळावर जनमानसात आपली छाप पाडलेली होती. त्यांची चाळीस वर्षानंतरची प्रतिकृती असल्यासारखेच राज ठाकरे मागल्या १५ वर्षात वागलेले आहेत. म्हणूनच त्यांचे आजचे मौन चकीत करणारे आहे. किंबहूना राज ठाकरेच एकटे गप्प नाहीत त्यांच्या सोबतच शिवसेनेत काम केलेले कधीकाळचे अनेक दिग्गज नेते व विविध ज्येष्ठ शिवसैनिकही हल्लीच्या घटनांपासून चार हात दुर असलेले दिसतात. थेट ठाकरे कुटुंबावर आरोप होत आहेत आणि राजकीय खडाजंगी माजलेली आहे. पण त्यातही कुठे ज्येष्ठ शिवसेना नेते वा शिवसैनिकांचा सहभाग दिसत नाही. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचे मौन म्हणूनच जास्त ठळकपणे नजरेत भरणारे आहे.


ज्यांनी मागली पन्नास वर्षे वा किमान मागल्या दोनतीन दशकातली शिवसेना बघितलेली व अनुभवलेली आहे, त्यांना अशा घटनाक्रमात शिवसेनेकडून उमटणारी प्रतिक्रीया वा दिला जाणारा प्रतिसाद चांगलाच परिचित आहे. तो इतका नगण्य नक्कीच नव्हता व नसतो. कोरोनाच्या बाबतीत शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना झालेला भोंगळ कारभार, किंवा लोक इतके संकटात असताना रस्त्यावर कुठेही शिवसैनिकांची धावाधाव नसणे. शिवसेना व ठाकरे परिवारावर थेट तोफ़ा डागल्या जात असताना किती काहुर माजले असते? कधीकाळी अशी कडवी बोचरी टिका झाल्यावर शिवसैनिकांचे हल्ले झाल्याच्या बातम्या वाचायला ऐकायला मिळायच्या. पण त्याचा मागमूस गेल्या काही महिन्यात कुठे दिसलेला नाही. उलट आजकाल शिवसैनिक बाजूला पडलेले असून, काही प्रमाणात कॉग्रेस व आक्रमकपणे राष्ट्रवादीचे नेते शिवसेनेचा बचाव मांडताना दिसतात. ही बाब चमत्कारीक नाही काय? फ़डणविस यांच्या सरकारमध्ये सामील असतानाही शिवसेना व शिवसैनिक जितका आक्रमक दिसलेला होता, त्याचाही कुठे मागमूस आज नाही. जणू सरकारमध्ये जाताना किंवा मुख्यमंत्रीपद मिळवताना शिवसेनेने आपले अस्तित्व विसर्जित करून घेतले असावे, असेच वाटते. कारण शिवसेना म्हणजे आमदार, नगरसेवक वा सत्तापदी बसलेले कोणी नसायचे. शिवसेना म्हणजे उसळत्या रक्ताचे उत्साही तरूण, हीच तिची ओळख होती. काही वर्षापुर्वी खुद्द शरद पवारांनीही आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्याचा दाखला दिला होता. सत्ता कोणाचीही असली तरी शिवसैनिक पोलिस ठाण्यात गेला तर अधिकारी वचकून असतात, त्याची दखल तात्काळ घेतली जाते, म्हणून संघटना तशी असायला हवी, असे थोरले पवार म्हणाले होते. तिचा मागमूस आज कोणाला दिसतो काय?


आता शिवसेना वा तिची संघटना म्हणजे फ़क्त एक मुखपत्र होऊन गेलेले आहे. ‘सामना’ दैनिकात कुठला लेख वा अग्रलेख आला, त्याला शिवसेनेचा आवाज म्हटले जाते. बातम्या सामनापुरत्या मर्यादित होऊन गेल्या आहेत. पण अन्य काही शिवसेना काम करते किंवा उपदव्याप करते; असेही कुठे कानी येत नाही. याचा अर्थ अमदार, खासदार व नगरसेक्वकांचा पक्ष सोडून शिवसेनेचा अस्त झाला आहे काय? ती विसर्जित झाली आहे काय? लाखो हजारोच्या संख्येने तो युयुत्सू मराठी तरूण कुठे गायब झाला आहे? हातात कुठले शिवबंधन बांधलेले नसतानाही शिवसेना या चार शब्दांसाठी आपली शक्ती पणाला लावून पुढे सरसावणारा वा कुठलाही धोका पत्करणारा शिवसैनिक; मागल्या आठ महिन्यात कुठे दिसला आहे का? नसेल तर तो संपला असे होत नाही. कारण तो तरूण, त्याचा उत्साह वा उत्सुकता गायब होऊ शकत नाही. ती काही काळ सुप्तावस्थेत जाऊ शकते. पुन्हा एकदा तिच्या प्रेरणा जाग्या केल्यास, त्यांना चालना मिळू शकते. अर्ध्या शतकापुर्वी तेव्हाचा मराठी तरूण असाच संयुक्त महाराष्ट्र समितीच्या मागे धावत होता. पण महाराष्ट्राची स्थापना झाली आणि समितीतल्या विविध पक्ष व नेत्यांनी त्या तरूणाच्या आकांक्षांना हरताळ फ़ासून त्याचा भ्रमनिरास करून टाकला. समिती मोडली, तेव्हाही मराठी अस्मितेने पेटलेला तरूण असाच सुप्तावस्थेत गेलेला होता. राज्य मिळाले, मग समितीची गरज उरली नाही. म्हणून त्या तरूणाला नेत्यांनी वार्‍यावर सोडून दिले आणि त्याला नेतृत्व नसल्याने तोही सुप्तावस्थेत गेलेला होता. त्याला प्रेरणा व नवी चालना देण्याचा पवित्रा ‘मार्मिक’ साप्ताहिकातून बाळासाहेब ठाकरे यांनी घेतला आणि त्या तरूणाने त्याच व्यंगचित्रकार संपादकाला आपला नेता करून टाकले होते. त्या चमत्काराला शिवसेना म्हणून नंतरच्या काळात जगाने ओळखले गेले. आजची शिवसेना तशी उरली आहे काय?


अर्थात शिवसेना स्थापन होऊन गुरगुरू लागली तरी तिला राजकारणात आपला ठसा उमटवायला दोन दशकांचा कालावधी लागला होता. जेव्हा आणिबाणी व जनता लाट आली, त्यात शिवसेनाही मरगळली होती. तेव्हाची मरगळ असताना बाळासाहेबांनीही अज्ञातवास किंवा शांत रहाण्याला प्राधान्य दिलेले होते आणि आपलीच क्षीण झालेली शक्ती पणाला लावलेली नव्हती. तो बदलत्या राजकारणाचा भर ओसरल्यावर राजकारणात नव्याने पोकळी निर्माण होण्याची प्रतिक्षा केलेली होती. जनता लाट संपली आणि इंदिरा हत्येनंतर तोही राजकारणाचा भर ओसरला; तेव्हा तशी पोकळी निर्माण होताच त्यांनी नव्या दमाने राजकारणात उडी घेतली. तेव्हा आजच्या सेनेचे अनेक नेते फ़ार तर शाखाप्रमुख वा विभागप्रमुख म्हणूनच आपापल्या विभागात ओळखले जात होते. नारायण राणे, दिवाकर रावते, रामदास कदम अशी खुप नावे सांगता येतील. पण १९८५-८६ च्या राजकीय पोकळीत शिरले आणि बाळासाहेबांनी बघता बघता महाराष्ट्राला गवसणी घातली होती. मात्र मधली चारपाच वर्ष अत्यंत प्रतिकुल हवा असताना त्यांनी आपल्या मुंबई ठाण्यातल्या संघटनेला जपण्याचा व जगवण्याचा पवित्रा घेतला होता. त्यातूनच नव्या दमाने शिवसेना पुन्हा उभी राहिली. हा इतिहास एवढ्यासाठी सांगायचा, की मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचे ताजे मौन किंवा अज्ञातवास त्याच कालखंडाची आठवण करून देतो आहे. मुंबईत महापालिका जिंकल्यावर नेमके शरद पवारांनी महाराष्ट्रात तशी पोकळीच निर्माण करून दिलेली होती. पुलोद मोडून पवारांनी १९८६ सालात पुन्हा कॉग्रेस पक्षात जाण्याचा पवित्रा घेतला. त्यांनी जे कॉग्रेस विरोधातील नव्या तरूणाला नेतॄत्व दिलेले होते, त्यालाच वार्‍यावर सोडून दिलेले होते. तो तरूण पवारांसमवेत कॉग्रेसमध्ये गेला नाही, तर नव्या नेतृत्वाच्या शोधात होता आणि बाळासाहेबांनी ‘आता धोडदौड महाराष्ट्रात’ अशी घोषणा केली.


राजकीय क्षेत्रात जेव्हा नेतृत्वाची पोकळी निर्माण होते, तेव्हा सक्षम नेतृत्वाला उभारी घेण्याला पोषक वातावरण आपोआप निर्माण होत असते. मोदी युगात मनसे मागे पडली होती आणि मध्यंतरी पवारांच्या आहारी गेल्यामुळे राज ठाकरे अलगठलग पडून गेले. त्यानंतर त्यांनी स्वत:ला बरेच सावरलेले आहे. निदान चुकीच्या वेळी आगंतुक पवित्रा घेऊ नये, इतका संयम त्यांनी विधानसभा निवडणुकीनंतर दाखवला आहे. एक एक पाऊल जपून टाकताना ते दिसलेले आहेत. म्हणूनच त्यांचे आजचे मौन विचार करायला लावणारे आहे. तीन पक्षांचे सरकार बनवताना वा दोन्ही कॉग्रेस सोबत सत्तेसाठी जाताना शिवसेनेने ठराविक मतदाराच्या सदिच्छांना लाथ मारलेली आहेच. परंतु मुख्यमंत्रीपद मिळवताना केलेल्या तडजोडींनी अनेक स्वपक्षीयांनाही नाराज केलेले आहे. राष्ट्रवादी वा कॉग्रेसच्या कार्यकर्ते नेत्यांमध्ये जशी सत्ता झिरपलेली आहे, तशी ती शिवसेनेच्या तळागाळापर्यंत झिरपू शकली नसल्यामुळे नाराजी आहेच. पण कोरोनाचे आव्हान पेलताना संघटनेचा पुरता अभाव समोर आला आहे. पण त्यांच्या तुलनेत मनसेची शक्ती कमी असली तरी आपापल्या विभागात मनसेचे तरूण खुप धावपळ करताना लोकांना आढळत आहेत. दुसरीकडे शिवसेनेचे अनेक जुनेजाणतेही आपापल्या घरात निष्क्रीय बसलेले आहेत. अशा प्रसंगात लोकांची मने जिंकणारा पराक्रम करण्याची क्षमता व इच्छा असलेल्या त्या शिवसैनिकाला नेतृत्व वा चालना देण्यात उद्धव ठाकरे अपयशी ठरले आहेत, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. असा तरूण किंवा जुना उत्साही शिवसैनिक नेतृत्वासाठी आशाळभूत असतो आणि तो पुन्हा नेत्याचा शोध घेत असणार, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. तो भाजपा किंवा अन्य पक्षात जाऊ शकत नाही, तर शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेशी जुळणार्‍या दिशेने वळू शकतो.


सामना वा शिवसेनेचे विविध प्रवक्ते कितीही बोलले, तरी आज ती जुनी शिवसेना सुप्तावस्थेत गेलेली आहे, याची खात्री बाळगावी. त्या सुप्तावस्थेतून तिला बाहेर काढण्याची क्षमता उद्धव ठाकरे यांच्यापाशी नाही. किंबहूना त्यांना शिवसेना म्हणजे आमदार वा निवडून आलेली मंडळी वाटतात. बाकीचा खराखुरा चमत्कार घडवणारा शिवसैनिक त्यांनी वार्‍यावर सोडलेला आहे. राज ठाकरे त्यांनाच हाताशी धरून नव्याने आपली घडी बसवायला मुहूर्त शोधत आहेत काय? तसा मुहूर्त वा वेळ येण्याच्या प्रतिक्षेत हा वाघ दबा धरून बसलेला आहे काय? यावेळी कुठल्याही बाजूने टोकाचे बोलण्यापेक्षा मराठी अस्मितेला चुचकारत, त्याच उसळत्या रक्ताच्या तरूणाला आपल्या पंखाखाली घेण्याचे विचार मनसेच्या डोक्यात असावेत काय? जेव्हा उघडपणे या सुप्तावस्थेचा भडका उडायची वेळ येईल, तेव्हा झेप घेऊन पुढे येण्याची प्रतिक्षा चालू आहे काय? लोकपाल आंदोलन, विविध घोटाळ्यांचा प्रचंड गाजावाजा चालू असतानाही नरेंद्र मोदी त्यापासून कटाक्षाने अलिप्त राहिले होते. प्रस्थापित युपीए सरकार पुर्ण बदनाम झाल्यावर लोकक्षोभाचे राजकीय नेतृत्व देण्याची योग्य वेळ आल्यावरच मोदींनी राजकीय आखाड्यात उडी घेतली होती. तोपर्यंत माध्यमांचा सगळा अवकाश अण्णा हजारे वा रामदेव इत्यादिंनी व्यापला असतानाही मोदींनी त्यात पुढाकार घेतला नव्हता. लोकभावनेवर स्वार होण्यासाठी योग्य वेळ निवडावी लागते आणि स्पर्धक नसताना त्यात सहज यश मिळवता येत असते. आपल्या भविष्यातील वाटचालीसाठी शिवसैनिकांचा भ्रमनिरास होण्याची प्रतिक्षा राज ठाकरे करीत असतील, तर अयोग्य म्हणता येणार नाही. कारण शिवसैनिकांना वा त्यासारखे तरूण असतात, त्यांना खंबीर धाडसी ठाकरे पुढे हवा असतो आणि राज ठाकरे यांनी त्याची चुणूक खुप आधीच दाखवून झाली आहे. मग हा वाघ दबा धरून बसला आहे काय? अशी शंका घ्यायला जागा आहे.


10 comments:

  1. भाऊ,आपली समीक्षा निश्चितच विचारप्रवर्तक आहे!पण राज ठाकरे यांचेकडे बाळासाहेबा़सारखे गरजणारे वक्तव्य अभावानेच भेटते!थट्टा,टवाळी बाळासाहेब लोणचे,पापडासारखे वापरायचे.स्वामी विवेकानंदांच्या-'उत्तिष्ठ,जाग्रत'ची आठवण यावी तशी "उपर्यांच्या" मु़ंबई वरील व्यावसायिक आक्रमणामुळे,बेरोजगारीनं गांजलेल्या मराठी अस्मितेला आपल्या डरकाळीनं जागं करून बाळासाहेब त्वेषानं आणि उत्साहानं अक्षरशः: पेटवून टाकायचे!'ठाकरे'या नावाचा वारसा,व्यंगचित्रकला आणि व्यक्तिमत्व-आवाजातील साधर्म्य यापलिकडे राज ठाकरे यांचेकडून कशाची अपेक्षा आपण करू शकतो?खळ्ळ् फटॅक म्हणजे बाळासाहेब नव्हेत!शेलक्या शब्दात भंबेरी बाळासाहेब उडवायचे!तीही कला थोडीफार आहे राज यांचेजवळ!पण तो अंगार कुठं आहे??ती. विलक्षण तडफ,शिवसैनिकाचं रक्त केवळ दर्शनानं उसळल्या मारायला लागायचं,तो करिश्मा कुठं आहे??केवळ एका इशार्यावर राजकारणाची दिशा पलटवण्याची ती जादू कुठं आहे??देशद्रोह्यांना कुठलंही पाऊल उचलण्यापूर्वी दहा वेळा विचार करायला लावणारी ती धमक कुठं आहे???

    ReplyDelete
  2. Torsekar sir I want to contact you..can you please tell me your Email ID

    ReplyDelete
  3. लेख आवडला.. मांडणी आणी मुद्दे पटण्यासारखे आहेत. मा राजसाहेब 2024 साली महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेत महत्वाची भूमिका बजावतील.

    ReplyDelete
  4. Jar Maharashtra madhil Corona sathi rajya Sarkar/ uddhav thakare jababadar asatil purn deshachya Corona sathi Modinchi kahich jababdari Nahi Ka?

    ReplyDelete
  5. भाऊ, ही शक्यता नक्कीच असू शकते.

    ReplyDelete
  6. भावनेच्या भरात लिहिलेला लेख. सध्याच्या राजकारणातील घडामोडींचा नीट अभ्यास न करताच लिहिलेला लेख.

    ReplyDelete
  7. राज ठाकरेंकडून काही अपेक्षा करणे हे वायफळ आहे, हे वेळोवेळी सिद्ध झालेले आहे.
    भाऊंच्या इतर राजकीय मतांशी मी पूर्णपणे सहमत आहे, पण राज ठाकरेंबद्दलची त्यांची भूमिका अनाठायी वाटते.

    ReplyDelete
  8. येती दहा वर्षे तरी कमितकमी भाजप हा एकच पक्ष नव घेण्यासारखा प्रभावी असेल .बाकी सगळे पक्षनेते लॉकडाऊन आणि काही तर लॉकअप मध्ये असल्यासारखे
    असतील हे सांगायला ज्योतिषी /भक्त असण्याची गरज नाही.राजकारणात योग्य पवित्रा घेणे हे फोटोसाठी पोज घेण्याइतके सोपे नसते .

    ReplyDelete
  9. आदित्य ठाकरे हाच खरा वाघ आहे.आणि हा वाघ देशाचा पंतप्रधान व लवकरच अमेरिकेच्या अध्यक्ष पदापर्यंत मजल मारणार याबाबत माझ्या मनात दुमत नाही

    ReplyDelete