Showing posts with label पानसरे. Show all posts
Showing posts with label पानसरे. Show all posts

Tuesday, September 1, 2015

ते माणसे मारतात, हे विचार मारतात!

खालील चित्रात इंद्राणीच्या पार्टीत रमलेला विवेकवादी प्रणय रॉय आणि विनोद दुआ दिसतोय ना?



एकाने गाय मारली तर दुसर्‍याने वासरू मारायचे काय? त्यातून न्याय होत नाही. कारण तसे कृत्य अविवेकी असते असे जाणते पुर्वापार सांगत आले. थोडक्यात वासरू मारणे अविवेकी किंवा विवेकाला सोडचिठ्ठी असाच अर्थ होतो ना? पण स्वत:ला विवेकी वा विवेकवादी म्हणवून घेणारे नेमक्या त्याच मार्गाने जाताना दिसतील. नरेंद्र दाभोळकर यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर विवेकवादी म्हणून मिरवणार्‍यांची भाषा काय होती? माणुस मारता येतो, त्याचा विचर मारेकरी मारू शकत नाही. खरेच आहे. मारेकरी फ़क्त देहाला मारतो. कारण ते माणसाचे भौतिक रुप असते. माणसाचा विचार अमुर्त असतो. त्याला मारता वा संपवता येत नाही. पण जो काही विचार असतो, त्याचे विकृतीकरण केले; मग तो आपोआप मारला वा संपवला जात असतो. आणि दुर्दैव असे असते, की देहरूपी माणसाला मारणारा विचार मारू शकत नसला तरी त्याच माणसाचे विचारांचे अमुर्त रुप त्याचाच उदो उदो करणारे मारून संपवत असतात. कारण हेच लोक त्या विवेकी विचारांचे विकृतीकरण करून त्यांना तिलांजली देण्याचे समारंभ साजरे करत असतात. कॉम्रेड गोविंद पानसरे यांची दाभोळकरांच्या पाठोपाठ दिड वर्षांनी हत्या झाली. मारेकर्‍याला त्यांचे विचार कुठे मारता आले? ते विचार आजही उपलब्ध आहेत. व्याख्याने व लिखाणाच्या स्वरूपात उपलब्ध असलेले पानसरे यांचे विचार व त्यातला विवेक त्यांच्याच अनुयायांमध्ये कितीसा दिसतो? पानसरे यांनी विचारांना व विवेकाला असलेला धोका दाखवला, नेमके शत्रू दाखवले. पण त्यांच्याच गळ्यात गळे घालून पानसरे अनुयायी वागत असतील, तर मग त्यांच्याच विचारांचा मारेकरी कोण असतो? हातात पिस्तुल घेतलेला की पानसरेंच्या विचारांना तिलांजली देत विवेकाला मुठमाती देणारा? पानसरे आपल्या ‘परिवर्तनाच्या दिशा’ या पुस्तकात काय लिहीतात?

   ‘शोषक चलाख असतात, आहेत. ते ज्या अनेक चलाख्या करतात, त्यातील एक चलाखी अशी असते, की, ते स्वत:च शोषितांच्या हिताचा विचार मांडतात. शोषितांना बनवायचा तो प्रकार असतो. शोषक दुसरी एक चलाखी करतात. जे शोषितांचा विचार मांडतात त्यांनाच शोषक मान्यता देतात. त्यांनाच आपले विचारवंत म्हणून घोषित करतात. याचा परिणाम शोषितांचा संघर्ष कमकुवत करण्यात होतो. काही वेळा शोषितांमधून आलेल्या नेत्या कार्यकर्त्यांना शोषक जवळ करतात, सत्तेत थोडाबहूत वाटा देतात. हा सुद्धा शोषितांना फ़सवण्याचा डाव असतो. म्हणूनच आपल्या धडावर आपलेच डोके असावे आणि आपल्या डोक्याखाली आपलेच धड असावे.’

हा कॉम्रेड पानसरे यांनी सांगितलेला मूलभूत विचार आहे. त्याचा लवलेश तरी त्यांच्या हत्येनंतर उमटलेल्या प्रतिक्रीयेत वा तमाशात दिसला आहे काय? हिरीरीने ‘आम्ही सारे पानसरे’ असे फ़लक मिरवणार्‍यांचे डोके तरी त्यांच्या आपल्याच धडावर आहे काय? असते तर त्यांनी पानसरे हयात असताना वा त्यांच्या नंतरही असे कोण भामटे आपल्यात व चळवळीत घुसून परिवर्तनाचा विचका करीत आहेत, त्याचा शोध अगत्याने घेतला असता. शोधक नजरेने जगाकडे बघितले असते आणि परिवर्तन वा शोषितांच्या चळवळीला कमकुवत करण्याचा कुठला डाव खेळला जातोय व त्यातले खेळाडू कोण आहेत, त्याचा अभ्यास केला असता. त्यांना उघडे पाडण्याचा प्रयास केला असता. पण आजतरी असे दिसते, की शोषकांनी ज्यांना विचारवंत म्हणून नेमून दिलेले आहे, त्यांनी छू म्हणायची खोटी, की पुरोगामी म्हणून नाचणारे विचारांचा व विवेकाचा मुडदा पाडायला सज्ज असतात, धावत सुटतात. विवेक व विचारांना सोडचिठ्ठी देवून अंधभक्ताप्रमाणे दाखवलेल्या लक्ष्यावर तुटून पडतात. त्याचा परिणाम असा, की ज्यांचा गौरव करायचा त्यांचीच शिकवण पायदळी तुडवली जाते.

आजची बहुतांश माध्यमे व त्यांनी घोषित केलेले महान विचारवंत समाजातले तथाकथित पुरोगामी आहेत आणि ते कोणाच्या भांडवल पुंजीवर विचारवंत घोषित करण्यात आले आहेत? बहुतांश मोठी माध्यमे आज समाजाचे शोषण करणार्‍या विविध भांडवलशहा व काळा पैसावाल्यांची बटीक आहेत. सामान्यांचे शोषण वा दिशाभूल करून जमवलेल्या भांडवलावर त्यांनी माध्यमांचा ताबा मिळवला आहे. त्यांच्या त्या पापाचे उदात्तीकरण करायला त्यांनी जे विचारवंत संपादक जाडजुड पगार देवून दावणीला बांधलेले आहेत, त्यातला प्रत्येकजण पुरोगामी व सेक्युलर तत्वज्ञानाची अखंड पोपटपंची करताना दिसेल. असे नामवंत विचारवंत विवेकाच्या विचारांचा बाजार मांडल्याचे देखावे उभे करतात आणि बाकीचे हुरळलेले पुरोगामी आपल्या धडावरचे डोके खाली उतरवून शोषकाच्या विचारवंतांकडे आपली बुद्धी गहाण टाकत असतात. कालपरवा एका वाहिनीच्या मालकाने लंडन येथील बाबासाहेबांनी वास्तव्य केलेल्या घराची खरेदी करण्याची घोषणा केली. सरकार ते काम करणार नसेल तर ही वाहिनी व त्याचा मालक ते पुरोगामी काम करणार असल्याचा गवगवा झाला. त्याच्याच वृत्तपत्राने मोठी मथळ्याची बातमी देवून आपली पाठ थोपटून घेतली. मग त्याच माध्यम समुहात कार्यरत असलेल्या शेकड्यांनी पत्रकार कर्मचार्‍यांचा पगार व मोबदला थकवल्याची बातमी आली आणि पळापळ झाली. ज्यांना कित्येक महिने राबवून घेतले पण साधे वेतन कबुल केल्याप्रमाणे दिले नाही, त्याने असे नाटक करायला बाबासाहेबांचे नाव बिनदिक्कत वापरले. किती पुरोगामी लोक त्याला जाब विचारायला पुढे सरसावले? कर्मचार्‍यांसह सामान्य जनतेची पिळवणूक करणार्‍यांचा पैसा स्मारकासाठी वापरण्याला विवेकवाद म्हणतात काय? त्या वाहिनी वा वृत्तपत्राच्या संपादकांनी त्याच मालकाचे उदात्तीकरण करण्यात धन्यता मानली. डोके कुठे आहे? कुणाच्या धडावर आहे?

शीना हत्याकांडात चव्हाट्यावर येऊ घातलेल्या काळ्याकुट्ट गुन्ह्याच्या अंतरंगात मागल्या दोन दशकात बोकाळलेल्या माध्यम पसार्‍याची पापे दडलेली आहेत. विवेकाला तिलांजली देत काळापैसा वाममार्गाने गुंतवून मोकाट झालेल्या वाहिन्या व माध्यम समुहांनी पोसलेले विचारवंत, संपादक व पत्रकार आपल्याला नित्यनेमाने नितीमत्तेचे ‘बोल्ड एन्ड ब्युटीफ़ुल’ डोस पाजत असतात. वैचारिक क्रांतीसाठी विवेकाचा गळा घोटण्याची ही परिवर्तनवादी चळवळ आता अशा टप्प्यावर आलेली आहे की तिथे पुण्यकर्म साधण्यासाठी पापकर्माच्या कुबड्यांवर उभे रहावे लागते. अशा पापात बुडालेल्यांकडून आपण काय ऐकतो? ‘खुनी विचार मारू शकत नाही.’

हेच लोक पानसरेंचा विचार मारेकरी संपवू शकत नाही अशी ग्वाही देत असतात. कारण मारेकरी विचार मारू शकत नाही हे त्यांना पक्के ठाऊक असते. किंबहुना तेच विचार मारण्याचे कंत्राट घेऊन यांनी बौद्धिक मारेकरी होण्याचा व्यवसाय हाती घेतलेला असतो. त्यांच्या शोषक मालकालाही ठाऊक असते, की सुपारीबाज नेमबाज गोळी झाडणारा विचार संपवू शकत नाही, की मारू शकत नाही. ते काम करण्यासाठी सराईत भाषेत (पानसरे, दाभोळकर वा कलबुगी यांचे) विचार नामशेष करणार्‍या खास बुद्धीजिवी दांभिकांना हाताशी धरणे भाग आहे. त्यासाठीच मागल्या दोन दशकात अब्जावधी रुपयांचा काळापैसा माध्यमात ओतला गेला आहे. सामान्य माणसाच्या अतीव शोषणातून लुबाडण्यात आलेल्या त्याच पैशावर आज अनेक पुरोगामी संस्था, संघटनांचा संसार उभा आहे. अनेक पुरोगामी विचारवंत आपले पांडित्य माध्यमातून फ़ैलावत पानसरेंचा मूळ विचार मारण्याचे काम अतिशय शिस्तबद्ध रितीने पार पाडत असतात. पुरोगामी वा विवेकी विचारांची हत्या करण्यासाठी ज्यांच्या धडावर अजून त्यांचेच डोके आहे, त्यांचे शिरकाण करण्याचे व्रत घेतल्यासारखे हे विचारवंत काम करतात. त्यात ते इतके यशस्वी झालेत, की कोणा आंबेडकरवाद्याला उपरोक्त वाहिनी वा वृत्तपत्राच्या संपादकांना लंडनच्या बाबासाहेबांच्या घराविषयी केलेल्या घोषणेचा जाबही विचारायचे धाडस झालेले नाही. कारण त्यातली दिशाभूल कळण्यासाठी आपले डोके आपल्याच धडावर असायला हवे आणि त्यालाच तर या वैचारिक मारेकर्‍यांनी सुरूंग लावला आहे. कारण आपल्याच धडावर आपलेच डोके असेल तर आपण विवेकी विचार करू शकतो आणि विवेकाने निर्णय घेऊन काम करू शकतो. तरच परिवर्तनाची चळवळ पुढे जाऊ शकेल आणि पर्यायाने परिवर्तन घडून येईल. पण तसे झाले तर समाजातील शोषणकर्त्यांनी जायचे कुठे? त्यांनी पोसलेल्या विचारवंतांना चंगळ कशी परवडणार?

कॉम्रेड गोविंद पानसरे समजून घेताना

                           File Photo of Former Vice-Chancellor of Hampi University, M M Kalburgi who was shot dead at his Kalyan Nagar residence by unidentified gunmen, in Dharwad on Sunday. Credit: PTI

‘आपल्या धडावर आपलेच डोके असावे आणि आपल्या डोक्याखाली आपलेच धड असावे.’ - कॉ. गोविंद पानसरे

आपण जेव्हा कुठल्याही इंटरनेट साईटवर जातो तेव्हा तिथे असलेली माहिती आपण बघत असतो. आपलाच संगणक ती माहिती दाखवत असला तरी ती माहिती आपल्या संगणकात साठवलेली वा आपलीच नसते. दिसतो तो निव्वळ आभास असतो. सदरहू माहिती दूर कुठल्या तरी वेगळ्या सर्व्हर संगणकावर असते आणि इंटरनेट जोडणीमुळे आपल्या संगणकावर आभास म्हणून दिसत असते. जोडणी तुटली वा निकामी झाली, मग तो आभास क्षणात बेपत्ता होतो. अशा जोडण्यांनी जगाच्या पाठीवर कुठल्याही देशात जोडलेला मोठ्या अद्ययावत संगणकात साठवलेली माहिती, चित्रे वा चित्रणे आपण घरबसल्या बघू शकत असतो. टॅब वा स्मार्ट फ़ोनवरही आपल्याला हे सर्व दिसू शकते. त्यालाच नेटवर्क म्हणतात. जिथे आपल्या हातातला फ़ोन वा समोरचा संगणक त्या अन्य कुठल्या संगणकाचा दुय्यम सहाय्यक असल्यासारखा राबत असतो. काय दिसावे किंवा काय असावे याबाबत आपल्या हातातल्या यंत्राला कुठले स्थान नसते की अधिकार नसतो. पण जे काही समोर दिसते तो आपला ब्लॉग वा फ़ेसबुकची ‘आपली भिंत’ म्हणून आपण किती मालकी हक्काच्या थाटात बोलत असतो? आपली भिंत म्हणायला समोर असतेच काय? नुसता आभास! इतर कुणाच्या मालकीच्या यंत्रणेने उभा केलेला व त्याच्याच इच्छेनुसार वेळोवेळी त्यात होणार्‍या बदलासह तो निव्वळ आभास असतो. तरी आपण मात्र याला ब्लॉक केले वा त्याची रिक्वेस्ट नाकारली, असे किती आढ्यतेने बोलतो ना? त्यातला अभिनिवेश कसा असतो? आपण आपले राजे वा ती भिंत, ती साईट आपले साम्राज्य असल्याचा आभास आपण जगत असतो. त्या खोटेपणाच्या आपण किती आहारी गेलोय, त्याचा अंदाज यावा म्हणून हे सांगितले. ज्यात आपल्याला कुठलाही खराखुरा निर्णय सुद्धा घ्यायची मोकळीक नसते. त्या समोरच्या संगणक वा स्मार्ट फ़ोनपेक्षा आपण तरी किती स्वतंत्र असतो बुद्धीने?

नेटवर्क ही अशी बाब आहे जिथे तुम्हाला आपले स्वातंत्र्य गहाण ठेवावेच लागते अन्यथा तिथे तुम्हाला प्रवेशच मिळू शकणार नाही. यातली आपली गुलामी वा अगतिक अवस्था समजून घेतली, तर कॉम्रेड गोविंद पानसरे काय शिकवतात, ते लक्षात येऊ शकेल. ‘आपल्याच धडावर आपलेच डोके’ असे पानसरे म्हणतात. पण आपली साईट वा आपलीच भिंत असे म्हणताना आपला संगणक तरी तितका स्वतंत्र असतो काय? तो नुसता आज्ञांचा वाहक व ताबेदार असतो. त्याला नेटवर्कमध्ये कुठले स्वातंत्र्य नसते की त्याचा मालक असलेल्या आपल्याला त्यातले कुठले निर्णय घेता येत नाहीत. समविचारी म्हणून एकदा कुठल्याही गटात, पक्षात वा संघटना गोटात दाखल झाले, मग वेगळी अवस्था नसते. तिथे जे नेटवर्क हाताळणारे ‘मेंदू’ सर्व्हर म्हणून काम करत असतात, त्यांच्या आज्ञेनुसारच तुमचा मेंदू चालू शकत असतो. तुमच्या मेंदूला स्वतंत्र विचार करायची मुभा उरत नाही. तर विवेकाची गोष्ट दूर राहिली. कुठलीही घटना घडली वा माहिती समोर आली, तर विविध गटात वा गोटात विभागलेले लोक म्हणूनच सारखेच व्यक्त होतात. त्यांच्यात एकप्रकारचे साम्य साधर्म्य आढळून येते. लक्ष्मणानंद यांची निर्घृण हत्या हा विषय इथे मी मांडला म्हटल्यावर विनाविलंब त्यात हिंदूत्वाविषयी आत्मियता असलेल्यांना जवळीक वाटली आणि ती सेक्युलरांना चपराक वाटली. तर त्याच्या नेमके उलट सेक्युलर पुरोगाम्यांना त्यातला कट्टर हिंदूत्ववाद दिसला. पण जी पोस्ट आहे, त्यात माध्यमांनी व बुद्धीमंतांनी लोकांसमोर विषय मांडताना केलेला भेदभाव बघायची इच्छा कोणालाच झाली नाही. कारण बहुतेकांचे मेंदू कुठल्या तरी नेटवर्कशी जोडून घेतले गेले आहेत. मग तटस्थपणे कलबुर्गी, पानसरे वा लक्ष्मणानंद यांच्या हत्येकडे माणूस म्हणून बघताच येत नाही. तर आपापल्या नेटवर्क व सॉफ़्टवेअरने जो अर्थ लावून दिला आहे, त्यानुसारच बघावे लागते.

याचा साधासरळ अर्थ आपण मेंदू न वापरताच जे काही परस्पर कोणी आपल्यावर लादतो, त्याला आपण आपला विचार वा विवेकी भूमिका मानलेले आहे. त्यामधली सत्यासत्यता तपासण्याची आपली उपजत इच्छाच मरून गेलेली आहे. कलबुर्गींच्या हत्येसाठी क्षणार्धात हिंदूत्ववाद्यांना दोषी धरणे, ही तशा नेटवर्कची सक्ती असते. त्या सॉफ़्टवेअरने तुमच्या पुढे अन्य पर्याय ठेवलेला नसतो. असे झाले मग दुसरी बाजूही तितकीच आवेशात प्रतिवाद करायला उतरते. ही दुसरी बाजू पुरावा मागू लागते. यापैकी कुणाला एक माणुस हकनाक मारला गेलाय, याची तसूभर फ़िकीर वा वेदना दिसुन येत नाही. मारला गेलाय तो एक माणूस होता आणि त्यालाही वेदना संवेदना होत्या, याविषयी आपण किती बधीर झालोत, त्याची कृतीशील साक्ष द्यायलाच आपण हिरीरीने पुढे येतो. त्यातले बुद्धीवाद युक्तीवाद किती भावनाशून्य झालेत, त्याचेही भान कुणाला उरलेले नाही. उधमपूरला ओलिसांनी पकडून दिला, तो नविद नावाचा जिहादी जितक्या निरभ्रपणे हिंदूंना मारायला मजा येते असे म्हणाला, तितकेच आपणही संवेदनाहीन झालेलो नाही काय? काही क्षण वा तासापुर्वी तुमच्या आमच्यासारखा जीवंत असलेला हाडामासाचा माणूस हकनाक मारला गेला याची कुणालाच पर्वा दिसत नाही. आपापले मुद्दे, आक्षेप व आरोप पुढे न्यायला आणखी एक साधन मिळाल्याचा विकृत आनंद आपण किती सहजगत्या उपभोगतो? तेव्हा ‘आपल्या धडावर आपलेच डोके’ म्हणजे स्वतंत्रपणे विचार करू शकणारा विवेकी मेंदु शिल्लक उरलेला असतो काय? पानसरे यांचे विचार म्हणून कंठशोष करणार्‍यांना तरी पानसरे यांचे विचार कोणते, याचे कितीसे भान असते? विरोधात बोलणार्‍यांची अवस्था तरी किती भिन्न आहे? जितक्या सहजपणे इसिसचे कृष्णवस्त्रधारी कुणाचा गळा कापून टाकतात, तितक्या सहजतेने आपण अन्य कुणाच्या भावनांचा मुडदा पाडत नाही काय?

तंत्रज्ञानाच्या आहारी जाताना आपणच आपल्यातली माणुसकी किती बधीर करून बसलोय, त्याचा हा पुरावा नाही काय? मानव प्राण्याला जी उपजत बुद्धी मिळाली आहे, त्यातूनच विचार व बुद्धीवाद उदयास आलेला आहे. माणूस म्हणून ज्या भावनांचा गुंता असतो, त्यातून उलगडणार्‍या नाते व व्यवहार संबंधातून विविध वैचारिक भूमिका विकसित झाल्या आहेत. पण त्याच्या आहारी जाताना आपण त्याचा पाया असलेल्या माणुसपणालाच पारखे होत चाललो आहोत. ज्या बुद्धीचा माज व मस्ती आपल्याला चढलेली आहे, तिचाच वापर करायचेही भान आपल्याला उरले नाही आणि पर्यायाने विवेकाचा त्यात बळी पडला आहे. एकमेकांना पाशवीवृत्तीने शत्रू लेखण्याचा आवेश इतका शिरजोर झाला आहे, की आपण पशूलाही लाजवील इतके पशूवत होत गेलो आहोत. मात्र तोंडाने विवेक व विचाराची पोपटपंची करत असतो. नेटवर्कच्या जमान्यात माणुसपण हरवून बसलो आहोत. कुणाच्या धडावर कुणाचे डोके आहे त्याचाही थांगपत्ता लागत नाही, अशी अवस्था आहे. विचार मारता येत नाही असे बोलतो, पण त्या विचारांसाठी मुक्त-स्वतंत्र बुद्धी असायला हवी त्याचीही आठवण आपल्याला उरलेली नाही. नुसती छोट्या पडद्यावर दिसणारी फ़ेसबुकची भिंत वा कुठली वेबसाईटच आभासी उरलेली नाही. आपले जीवनच आभासी होऊन गेले आहे. त्यातल्या भावना, वेदना, विचार व विवेकही भासमात्र होऊन गेला आहे. दिसायला ‘आपल्या धडावर आपलेच डोके’ नक्की आहे, पण त्यातला मेंदू आपल्याच विचारांनी व विवेकाने चालतो किंवा नाही, याची शंका यावी अशी एकूण सोशल नेटवर्किंगने आपली अवस्था करून टाकली आहे. जे बोलतो, सांगतो ते आपल्याला तरी किती उमगले आहे, याची शंका घेण्यासारखी परिस्थिती आहे. अशा अवस्थेत अन्य कोणी विचार मारायची गरज कुठे उरते? इतरांचे सोडा, आपणच आपल्या विचारशक्तीचे मारेकरी झालोत.