Friday, March 6, 2015

जुन्या नाटकाचा नव्या संचातला प्रयोग



बुधवारी दिल्लीत आम आदमी पक्षातली रणधुमाळी शिगेला पोहोचली असताना पक्षाचे राष्ट्रीय संयोजक, म्हणजे अन्य पक्षांच्या भाषेतले श्रेष्ठी अरविंद केजरीवाल मात्र आपल्या घरी होते. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची सभा होती आणि त्यात अत्यंत महत्वाचे निर्णय घेतले जाणार होते. पण त्यापासून श्रेष्ठीच दूर होते. देशभरच्या वाहिन्या त्याचे थेट प्रक्षेपण करीत होत्या आणि काय अघटित घडणार यावर काहुर माजवण्यात आलेले होते. वास्तविक अघटित काहीच घडणार नव्हते. कारण अशी नाटके यापुर्वी अनेकदा अनेक राजकीय पक्षाच्या श्रेष्ठींनी यशस्वीरित्या पार पाडलेली होती. हा त्याच नाटकाचा नव्या संचातला प्रयोग होता. त्याची सुरूवात जशी खळबळजनक होती, तसाच त्याचा शेवटही ठरलेला होता. एकूण प्रक्रियेपासून खुद्द केजरीवाल पुर्णपणे दूर होते. पण त्यांचे खास विश्वासू संजय सिंग त्यांच्या वतीने दोन दिवस किल्ला लढवत होते आणि प्रशांत भूषण व योगेंद्र यादव यांच्यावर तो्फ़ाच डागत होते. त्यांचा सूर बघितला तर त्या दोन्ही मोठ्या नेत्यांनी पक्षाची शिस्त मोडलेली होती. त्यामुळे आता त्यांना पक्षात स्थान असू शकत नाही, हाच संजय सिंग यांचा सूर होता. अगदी कमीअधिक प्रमाणात दिलीप पाडे नामक दुसर्‍या नेत्याचाही सूर त्यापेक्षा वेगळा नव्हता. त्यानेच लेखी पत्र पाठवून या दोन्ही नेत्यांवर कारवाईची मागणी केलेली होती. थोडक्यात जे काही चालले होते, त्यापासून केजरीवाल संपुर्ण दूर होते. पण त्यात आपला कुठलाही हात नसल्याचे सिद्ध करण्यासाठी ट्वीट करून केजरीवाल यांनी आपण दु:खी असल्याची जाहिरातही करून टाकलेली होती. पर्यायाने कोणी त्यांच्यावर कारस्थानाचा आरोप करू शकत नव्हते. पण त्या दोन्ही नेत्यांना पक्षातून संपवण्याची योजनाच मुळात केजरीवाल यांची होती आणि त्याचे सूतोवाच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच केजरीवाल यांनी केलेले होते.

शपथविधी नंतर केलेल्या जाहिर भाषणात केजरीवाल यांनी खुलेआम योगेंद्र यादव यांना कानपिचक्या दिलेल्या होत्या. माध्यमातून आपला पक्ष विविध राज्यांच्या निवडणूका लढवील अशा घोषणा ऐकू येतात. ती अहंकाराची बाधा आहे आणि त्याच अहंकारामुळे लोकसभेत दाणदाण उडाली असे केजरीवाल यांनी सांगण्याची कोणती गरज होती? कारण दिल्लीच्या निकालानंतर योगेंद्र यादव याच एका नेत्याने तशी भाषा केलेली होती. किंबहूना लोकसभेनंतर विविध राज्याच्या विधानसभा लढवाव्या अशीच यादव यांची मागणीही होती. लोकसभेचा आग्रहही त्यांनीच धरला होता. केजरीवाल त्यामागे फ़रफ़टले आणि दिल्लीचीही सत्ता गमावून बसले होते. त्यामुळेच लोकसभेच्य पराभवानंतर त्यांनी फ़क्त पुन्हा दिल्लीची सत्ता मिळवण्याचा चंग बांधला आणि त्यासाठी अन्य राज्याच्या विधानसभा न लढवण्याचा निर्णयही घोषित करून टाकला होता. तिथेच न थांबता कुठल्या राज्य शाखेला लढायचे असेल, तर त्यांना दिल्लीकडून कुठली मदत मिळणार नाही, असेही बजावले होते. चारच महिन्यात दोन राज्यांच्या निवडणूका होत्या आणि त्यात यादव यांच्या हरयाणाचा समावेश होता. पण त्यांची मागणी नाकारून केजरीवाल यांनी आपली सर्व शक्ती दिल्लीत केंद्रीत केली आणि त्याचे फ़ळही मिळवले. मात्र त्यात हरयाणाच्या राजकारणात आपले स्थान निर्माण करायची संधी यादव यांना नाकारली गेली. तिथपासून त्या दोघांमध्ये बेबनाव सुरू झाला होता. मात्र धुर्त केजरीवाल यांनी दिल्लीचे निकाल हाती येईपर्यंत त्याचा गाजावाजा होऊ दिला नाही. अगदी यादव खेळत असलेला घातपाताचा डाव माहित असूनही केजरीवाल यांनी त्याची जाहिर वाच्यता होऊ दिली नाही. ते शिकार्‍याप्रमाणे योग्य संधीची वाट बघत बसले. म्हणूनच आता यादव यांच्यावर आरोपही आहे, तो दिल्ली मतदानाच्या पुर्वीचा. आणि निकालानंतर तात्काळ केजरीवाल यांनी जाहिर कानपिचक्या दिल्या.

दिल्लीत पक्षाला इतके मोठे यश मिळू नये, अशीच यादव यांची अपेक्षा होती आणि ते तसे बोलून दाखवीत. असा आरोप आता होतो आहे. म्हणजेच आपल्याला हरयाणाच्या राजकारणात संधी नाकारणार्‍या केजरीवालचे यश यादवांना खुपत होते, हे उघड होते. म्हणजेच या दोन प्रमुख नेत्यांमध्ये बेबनाव आणि वितुष्ट आले होते. सर्वेक्षणात पक्षाला ५७ जागा मिळतील सांगणारे यादव, खाजगीत पत्रकारांना मात्र तितक्या जागा मिळू नयेत म्हणायचे. याचा अर्थच छुपेपणाने त्यांनी आतून घातपात केलेला असावा. किंबहूना त्यांच्यावरही केजरीवाल यांनी आपल्या हस्तकांची पाळत ठेवून पुरावे गोळा केले, म्हणजे़च यादवांचा बेत त्यांनी हाणून पाडायचा प्रतिडाव केला असणारच. थोडक्यात हे भांडण अलिकडचे नाही, ते लोक्सभा पराभवानंतरचे आहे आणि अधिकच विस्तारत गेलेले असावे. अशा खेळीत केजरीवाल यादवांपेक्षा अतिशय वाकबगार असल्याने त्यांनी जाळे पसरून त्यात यादवांना चांगलेच गुरफ़टून टाकले होते. त्याची चुणूक शपथविधीच्या भाषणातूनच दिसली होती. ‘काही नेत्यांना अहंकार’ झाल्याचा केजरीवालांनी केलेला इशारा थेट यादवांकडे होता. पण कोणी माध्यमांनी वा पत्रकारांनी तो ओळखलाच नाही. सरकार स्थापन झाल्यावर केजरीवाल यांना शह देण्याची खेळी यादव खेळू लागले आणि केजरीवाल त्यासाठी आधीपासून सज्ज होते. म्हणूनच संयोजक बदलण्याची भाषा होताच त्यांनी पदाचा लगेच राजिनामा दिला आणि आपले विश्वासू सहकारी यादव-भूषण यांच्या अंगावर सोडून दिले. मात्र त्या दोघांची हाकालपट्टी इतरांकडून करून घेताना, केजरीवाल आपण बैठकीपासून संपुर्ण नामानिराळे राहिलेले आहेत. सोनिया गांधींनी १९९९ सालात हेच नाटक रंगवले नव्हते का? शरद पवार, तारीक अन्वर आणि पुर्णो संगमा यांनी तक्रार करताच सोनिया पक्षाध्यक्षपद सोडुन बाजूला झाल्या आणि पक्षातून हाकालपट्टी कोणाची झाली होती?

नव्या राजकीय नितीमूल्याची प्रस्थापना करायला राजकीय क्षितीजावर उगवलेल्या आम आदमी पक्षाची कहाणी वा कर्यकारिणी तरी वेगळ्या दिशेने वाटचाल करताना दिसते आहे काय? तिथे कॉग्रेसमध्ये कुठलाही पेचप्रसंग आला किंवा पक्षाचा दारूण पराभव झाला, मग कार्यकारिणीने एकमताचे नेतृत्वावर विश्वास व्यक्त करायचा, हेच एकमेव काम होत नाही काय? अन्य कुठल्या नेत्याने श्रेष्ठी म्हणजे प्रमुख नेत्यावर वा त्याच्या कामावर शंका घेतली, मग त्याच्यावर शिकारी कुत्र्याप्रमाणे तुटून पडण्यालाच कॉग्रेसमध्ये निष्ठावंत म्हणून ओळखले जात नाही काय? कालपरवा महिनाभर आधी जयंती नटराजन नामक पक्षाच्या प्रवक्त्याने काय तक्रार केली होती? खुप पुर्वीच राहुल गांधींना पाठवलेल्या पत्राची आठवण देऊन त्यांनी आपली बदनामी कशाला चालू आहे, असा सवाल केला होता. त्यांना काय अनुभव आला? तेव्हा तमाम कॉग्रेस नेते प्रवक्ते नटराजन यांच्यावर तुटून पडले नव्हते का? त्यांनाच सोनियानिष्ठ म्हणून ओळखले जाते ना? गेल्या दोन दिवसात केजरीवाल यांचे निकटवर्तिय म्हणून ओळखल्या जाणार्‍यांनी प्रशांत भूषण व योगेंद्र यादव यांच्याविषयी कोणते गौरवोद्गार काढलेले होते? फ़रक किंचित आहे. पवार वा नटराजन यांच्या हाकालपट्टीसाठी कार्यकारिणीची सभा घेतली जात नाही. आम आदमी पक्षात तेवढा तमाशा केला जातो. बाकी अस्सल कॉग्रेसी व श्रेष्ठींचा कारभार चालू नाही काय? बाकीच्या पक्षात सर्व काही बंद दरवाज्याआड चालते आणि आपला कारभार पारदर्शक व खुला असल्याचा दावा अडीच वर्षे करणार्‍या या नव्या पक्षाच्या बैठका व त्यातले निर्णय त्याच्याच स्वयंसेवकला कसे कळतात? नेत्यांनी निर्णय घेतले, मग कार्यकारिणीने त्यावर शिक्कामोर्तब करण्यानेच तिथेही निर्णय होतात ना? फ़ार कोवळ्य़ा वयात आम आदमी पक्ष ‘वयात आला’ ना? नाटक जुनेच पण प्रयोग मात्र नव्या संचात खुपच छान रंगला आहे ना?

Thursday, March 5, 2015

तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती



हे शिर्षक नाही. हा एक असा आरोप आहे, जो आपल्याला अनेकदा ऐकायला मिळतो. प्रामुख्याने तुम्ही सार्वजनिक जीवनात वावरत असाल, तर कधीतरी हे वाक्य कानी येतेच. अगदी सहजगत्या आपले परिचित मित्रही असे बोलून जातात. आपणही चपापतो. मला अलिकडे असे अधूनमधून ऐकायला मिळत असते. पत्रकार म्हणून जे काही लिहीतो, त्यावरून मग वाचक वा मित्रही मला हे ऐकवतात. थोडक्यात मी त्यांचा अपेक्षाभंग केला, असे त्यांना सुचवायचे असते. असा कोणता मी अपेक्षाभंग केलेला असतो? मीच कशाला, तुमच्या कोणाच्या वाट्याला असे वाक्य आलेच तर समोरच्याचा तुम्ही कोणता अपेक्षाभंग केलेला असतो? प्रत्येकाचे उत्तर वेगळे असू शकते. पण मुळात त्यातून बोलणारा काय सुचवत असतो? तर तुम्ही अपेक्षाभंग केलेला आहे, म्हणूनच तुम्ही एकप्रकारचे गुन्हेगार आहात. चटकन हे वाक्य ऐकायला निरूपद्रवी वाटेल. पण तसे नाही. ते तुमच्या मनात अपराधगंड निर्माण करीत असते. आपण काहीतरी चुक केली, गुन्हा केला असे आपल्याला त्यामुळे वाटते. आपण असे काय केले, की समोरच्याचा अपेक्षाभंग व्हावा, असे आपण मनातल्या मनात विचार करू लागतो. पण त्याची दुसरी बाजू अशी, की त्याने तुमच्याकडून बाळगलेल्या अपेक्षा पुर्ण करता आल्या नाहीत, याचा एक न्युनगंड आपल्या मनात उदभवतो. इतक्या सहजगत्या हे होऊन जात असते, की त्याने अपेक्षा बाळगल्याच कशाला, असा प्रश्नही आपल्या मनाला शिवत नाही. जाणिवपुर्वक आपण एखादी चुकीची गोष्ट केलेली असेल, तर मनात अपराधी भावना उदभवणे गैर नाही. पण ज्याच्या कोणाच्या तोंडी असे वाक्य असते, त्याच्या अपेक्षांचा बोजा आपल्यावर कशाला? त्याने तशा अपेक्षा परस्पर केल्या असतील, तर त्याला आपण कसे जबाबदार असू शकतो? त्याला अशा अपेक्षा बाळगण्याचा अधिकार कोणी दिला? आपण तर दिलेला नसतो. म्हणजेच त्याने परस्पर कुठल्या अपेक्षा आपल्याकडून बाळगलेल्या असतील, तर ती त्याची चुक वा त्याचा गुन्हा असतो. पण आरोप मात्र आपल्यावर करत असतो.

उदाहरण म्हणून आपण आजचे पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्याकडे बघूया. हा माणुस मागले दिड वर्ष पंतप्रधान पदाच्या शर्यतीत होता. तेव्हा तो कसा व कोणत्या कारणसाठी देशाचे नेतृत्व करायला लायक नाही, यावर प्रदिर्घ उहापोह चालू होता. असा दावा करणारेच आज अनेक बाबतीत त्याच मोदींकडून अशी अपेक्षा नव्हती, असे दावे सर्रास करीत असतात. हा उफ़राटा प्रकार नाही काय? जो माणूस पंतप्रधान होऊ शकणार नव्हता आणि त्यासाठी लायकही नव्हता, त्याने मुळात तिथपर्यंत मजल मारली; हाच त्याच्यावर टिकेची झोड उठवणार्‍यांचा अपेक्षाभंग नव्हता काय? तिथेच अशा भाष्यकार टिकाकारांच्या अपेक्षा मोदींनी पुर्ण केल्या नसतील, तर मग त्यांच्याकडून इतर अपेक्षा या लोकांनी कशाला बाळगल्या? म्हणजेच चुकीच्या अपेक्षा मोदींकडून बाळगणे ही चुक असेल, तर अशा टिकाकारांचा तो गुन्हा असतो. पण पुन्हा तेच मोदींच्या डोक्यावर आपल्या चुकीच्या अपेक्षांचे खापर फ़ोडताना म्हणतात, ‘मोदींकडून अशी अपेक्षा नव्हती’. इथे यातली लबाडी लक्षात घ्यायला हवी. मुळात मोदीसारखा माणूस देशाचे वाटोळे करणार हीच अपेक्षा होती, तर आज त्याच्याकडून काही गैर होत असेल, तर तो टिकाकारांची अपेक्षा पुर्ण करत असतो ना? मग त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती, असे बोलणे निव्वळ भामटेगिरी नाही काय? पण हे असेच चालू असते. त्याचे बळी केवळ मोदीच नसतात. कमीअधिक प्रमाणात आपण सगळेच अशा वाक्याचे बळी असतो. कधी ना कधी आपल्याही वाट्याला असे वाक्य येतच असते. त्यामागे एक धुर्त चाल असते. अकारण तुमच्या मनात अपराधगंड निर्माण करून तुम्हाला दबावाखाली ढकलण्याची ती खेळी असते.

जर तुमच्या काही अपेक्षा माझ्याकडून असतील, तर त्या बोलून दाखवल्या पाहिजेत आणि त्या मी स्विकारल्या, तर अपेक्षाभंगाचा मी गुन्हेगार असू शकतो. मनातल्या मनात तुम्ही काही गृहीत धराल आणि त्याची पुर्तता माझ्याकडून होत नसेल, तर त्याला मी कशाला जबाबदार असेन? अर्थात काही अपेक्षा गृहीतच धरलेल्या असतात आणि त्या चुकीच्या म्हणता येणार नाही. डॉक्टर, वकील वा शिक्षक, पोलिस असे काही पेशे आहेत, जिथे तुम्ही योग्य तेच कराल अशी अपेक्षा गृहीत असते. ते गृहीत म्हणजे तुमच्यावरचा विश्वास असतो. परस्परांशी सभ्यपणे वागणे, ही अपेक्षा गैरलागू नाही. पण त्याच्यापलिकडे बहुतेक अपेक्षा गैरलागू असतात. कारण नागरिक म्हणून जगताना जितक्या अपेक्षा असाव्यात, त्यापेक्षा दुसर्‍याकडून अधिक अपेक्षा परस्पर बाळगण्याचा इतरांना अधिकारच नसतो. तेव्हा अपेक्षाभंगाचे दुसर्‍याच्या माथी खापर फ़ोडणे, हीच मुळात लबाडी असते. मी काय कोणाच्या बाजूने लिहावे किंवा बोलावे ते अन्य कोणी गृहीत धरले, तर त्याच्या अपेक्षा मी कशाला पुर्ण करायच्या? मला जे सुचते वा वाटते तेच मी लिहीत असतो. ज्यांना आवडेल वा वाचनीय-उपयुक्त वाटेल, ते स्विकारतील. नावडेल ते दुर्लक्ष करतील. कोणाला आवडण्यासाठी मी लिहू लागलो, तर मला माझे मत मांडण्याची मुभाच उरत नाही. सहाजिकच मी अमूकतमूक लिहावे अशी अपेक्षा कोणी बाळगली असेल, तर तो माझ्या विचारस्वातंत्र्यावर गदा आणत असतो. तो त्याचा गुन्हा वा चुक आहे. त्याचा बोजा माझ्यावर असायचे काही कारण नाही. त्यांची पुर्तता करायलाही मी बांधील असू शकत नाही.

पण सहसा आपल्याला असे ऐकावे लागते. त्यामागचा हेतू लक्षात घ्यायला हवा. सर्वमान्य अशी जी गृहीते असतात, त्याच्यापलिकडे कोणी अपेक्षाभंग झाल्याचा दावा करत असेल, तर तो मुर्ख तरी असला पाहिजे. किंवा जाणिवपुर्वक भामटेगिरी करतो असे मानायला हरकत नाही. भामटेगिरी अशासाठी म्हणायचे, की त्यातून त्याला तुमच्या मनात अकारण अपराधगंड जोपासायचा असतो. जो गुन्हाच नाही, तो तुमच्याकडून घडला असल्याचे तुमच्या मनावर बिंबवण्याचा कुटील हेतू अशा विधानामागे असतो. एकदा असा अपराधगंड मनात जोपासला गेला, मग तुम्ही त्याच दबावाखाली कुठल्याही गैरलागू अनाठायी गोष्टींना मान तुकवू लागता. अशा अपराधगंडाच्या अदृष्य शृंखलांनी तुमचे स्वातंत्र्य जखडता येत असते. कुठल्याही धार्मिक वा पाखंडी सत्तेची तीच खरी ताकद असते. सामान्य माणसाच्या निरागस मनामध्ये अपराधी भावना जोपासली, मग त्याच्या गळी कुठलेही पापकृत्य उतरवायला किंवा तशी कृती करायला सोपे जात असते. त्यातून त्याच्या स्वयंभू विचारशक्तीला खच्ची करून वस्तुप्रमाणे त्या व्यक्तीला खेळवणे शक्य असते. विवेकाचा तिथे पहिला बळी पडत असतो. त्याची सुरूवात अशी अगदी अलगद होत असते. तुमच्यासारख्याने असे बोलावे, लिहावे? हा आरोप म्हणूनच दगाबाज असतो. म्हणूनच कोणी असे वाक्य तुमच्या तोंडावर फ़ेकले, तर बिचकण्याचे अजिबात कारण नाही. उलट त्यालाच ऐकवावे, तुझ्याकडूनही अशा शब्दांची अपेक्षा नव्हती. त्याने आपल्यावर सोडलेल्या अपराधगंडाच्या बाणाने घायाळ होण्यापेक्षा, तोच त्याच्या अंगावर परतून लावा. बघा, कसे मस्त मुक्त वाटेल.

Wednesday, March 4, 2015

केजरीवाल यांची नवी शिकार



आम आदमी पक्षात जे रणकंदन सध्या माजलेले आहे, त्यावर इतका गदारोळ व्हायचे काही कारण नाही. उलट त्यांचेही नेते राजकारणात मुरले म्हणून स्वागतच करायला हवे. आजवर प्रत्येक राजकीय पक्ष त्याच पद्धतीने पुढे आला आणि त्याच मार्गाने गेलेला आहे. ‘आप’ त्याच चाकोरीत शिरला असेल तर उगाच शंका काढण्याचे काहीच कारण नाही. देशातील भ्रष्टाचाराचे निर्मूलन करण्यासाठी आजवर शेकडो लहानमोठ्या चळवळी व आंदोलने झालेली आहेत. त्यात गुजरातच्या नवनिर्माणपासून आसामच्या गणपरिषदेपर्यंत अनेकांचा समावेश होतो. त्यातून एक नवी पिढी राजकारणात प्रवेश करत असते. जे आहे ते नासलेले-सडलेले म्हणूनच अपायकारक असल्याचे सांगत भेदरलेल्या जनतेला विश्वासात घेत, अशा चळवळी आंदोलने उभी रहातात. राजकारण व राजकीय नेते-पक्ष यांना शिव्याशाप देत आपली उजळ प्रतिमा असे लोक जनमानसात उभी करून घेतात. मग शेवटी उपाय म्हणून जुन्यांना हाकलून राजकारणाची शुद्धी करायला स्वत:च राजकारणात उतरतात. त्यांची भाषा नवी अजिबात नसते. तर ती ऐकणारे नवे असतात. फ़सणारे नवे असतात. फ़सवणारेही नवे असतात. जगात असे शतकानुशतके चालत आलेले आहे. सवाल त्यांच्या हाती सत्तेची सुत्रे येण्यापर्यंतचा असतो. ती सत्ता व अधिकार हाती आले, मग तेही त्याच जुन्याजाणत्या व तथाकथित भ्रष्ट राजकारण्यांच्याच पावलावर पाऊल टाकून पुढे चालू लागतात. मग त्यांच्या भुलभुलैयाला फ़सलेल्यांची मात्र हालत होत असते. अशा प्रक्रियेतून जशी नवी नेत्यांची एक पिढी राजकारणात पदार्पण करते, तशीच वैफ़ल्यग्रस्त होणारी जनतेचीही एक नवी पिढी उदयास येत असते. स्वातंत्र्य चळवळीपासून आजपर्यंत भारताने व त्यातल्या विविध राज्यांनी अशा अनेक उलथापालथी बघितल्या व अनुभवल्या आहेत. पण प्रत्येक नव्या पिढीला आता क्रांती व आमुलाग्र बदल होणार, अशी आशा काही सुटलेली नाही.

शेकडो पिढ्या व कित्येक दशकात प्रत्येकाने तरूणपणी प्रेम केले आहे आणि लग्नही केलेले असते. पण त्याने केलेला हनिमून त्याच्या कल्पनाविश्वात जगातला पहिलाच नसतो का? तशीच ही राजकीय व सार्वजनिक जीवनातील हनिमूनची कहाणी आहे. प्रेमात पडल्यावर सर्वकाही सोपे असते. दिवसातले काही तास चोरून भेटावे आणि नंतर आपापल्या घरी जावे, असे दिवस खुप स्वप्नाळू असतात. पण जेव्हा त्यातून लग्नापर्यंत मजल जाते आणि स्वप्न संपून संसाराचा व्यवहार सुरू होतो, तेव्हा कल्पनाविलास संपलेला असतो. त्यापेक्षा आज ‘आप’ची अवस्था वेगळी नाही. तसे यातही काही नवे नाही. मागल्या खेपेस मोठे यश मिळवल्यानंतर मंत्रीपदासाठी मोठी झोंबाझोंबी सुरू झाली होती. विनोदकुमार बिन्नी नामक आमदाराच्या नाराजीवर पांघरूण घालण्यासाठी हेच योगेंद्र यादव बिन्नीच्या घरी जाउन मध्यरात्रीपर्यंत त्याची समजूत काढत बसले होते. तिथून बाहेर पडल्यावर त्यांनी किती सराईतपणे माध्यमांसमोर थाप ठोकली होती? कोणाला आठवते का? बिन्नीची पत्नी स्वादिष्ट खीर बनवते आणि तीच खीर खायला त्याच्या घरी आलेलो होतो, असे त्यांनी सांगितले होते. मध्यरात्री वा अपरात्री कोणी सभ्य माणूस मित्राच्या घरी खीर खायला जातो काय? अशी माणसे कितीही साळसूदपणे प्रामाणिकपणाचा आव आणत असली, तरी अस्सल राजकीय असतात. मुद्दा इतकाच की केजरीवाल वा यादव दोघेही अट्टल राजकीय नेते आहेत. त्यामुळे त्यांचा सच्चाईचा मुखवटा बाजूला करून बघितले, तर आपण नवे काहीच अनुभवत नाही, याची खात्री पटू शकते. जोपर्यंत सहकार्‍यांच्या मदतीची गरज असते, तोवर त्यांना संभाळून घ्यावेच लागते. ती गरज संपली मग असे अडचण होऊ शकणारे मित्र निर्दयपणे बाजूला करावे लागतात. केजरीवाल यांनी त्याबाबतीतले आपले कसब खुप आधीपासून दाखवले आहे. आपण बघू शकलो नसू, तर तो त्यांचा गुन्हा म्हणता येणार नाही.

जेव्हा त्यांना मोठ्या प्रमाणात सार्वजनिक जीवनात प्रवेश करायचा होता, तेव्हा त्यांनी कधी रामदेव बाबांची कास धरली, तर कधी अण्णांना हाताशी शरून आपली एक प्रतिमा जनमानसात ठसवून घेतली. पुढे स्वयंभू झाल्याची खात्री पटल्यावर अण्णा वा रामदेव यांची गरज उरलेली नव्हती. मग योगेंद्र यादव, प्रशांत भूषण, शाझीया इल्मी, इत्यादींचा उपयोग होता. त्यात सगळा प्रकाशझोत आपल्याकडे रहावा याची त्यांनी काळजी घेतली आणि त्याचा लाभ दाखवून या इतरांनाही मस्तपैकी वापरून घेतले. आता त्यातल्या कोणाची गरज राहिलेली नाही. म्हणूनच सर्व समान या भूमिकेत गर्क असलेल्यांना त्यांची जागा दाखवून देणे आवश्यक होते. त्यासाठी केजरीवाल यांनी नेमका मुहूर्त शोधला होता. पण माध्यमांना तो ओळखताही आलेला मव्हता. दुसर्‍यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर केजरीवाल यांनी त्याच त्या व्यासपीठावरून यादव इत्यादींना जाहिर इशारा दिला होता. दिल्ली सोडुन अन्य राज्यात निवडणूका लढवायच्या गमजा करू नका. तो तुमचा अहंकार आहे. त्यापासून दूर रहा. हा इशारा खाजगी बैठकीतही केजरीवाल आपल्या या वरीष्ठ सहकार्‍यांना देऊ शकले असते. पण त्यांनी जाहिरपणे त्यांचे कान उपटून कोण खरा निर्णयाधिकारी व सर्वाधिकारी आहे, त्याची ग्वाही दिलेली होती. तिथेच आपली उपयुक्तता संपली हे भूषण व यादव यांच्या लक्षात यायला हवे होते. त्यांनी आपला गाशा गुंडाळला असता, तर आज त्यांना असे हिडीसफ़िडीस करून हाकलण्याची वेळ केजरीवाल यांच्यावर तरी कशाला आली असती? यापुर्वी अग्नीवेश, कोणी एक मौलवी यांच्यावरही अशीच वेळ आलेली होती. पण जुने हातपाय आपटत असताना नवे मुर्ख अशा लबाड नेत्याला धार्जिणे असतात. सहाजिकच मुर्खांची जगात कमतरता नसते, यावरच अशा डावपेच व राजकारणाच्या इमारती उभ्या रहात असतात.

रामदेव अण्णांना टांग मारल्यावर योगेंद्र यादवसारखे सहकारी हाताशी आले. त्याचा लाभ उठवून निवडणूकीत यश मिळवल्यानंतर आशुतोष, आशिष खेतान यासारखे सहकारी मिळालेले आहेत. उद्या त्यांचीही गत यापेक्षा वेगळी नसेल. कारण पक्ष वा संस्था संघटना एका कुटील धुर्त व निर्दयी नेत्याच्या लोकप्रियतेच्या बळावर चालत असतात. त्यात हमाली करण्यासाठी मुठभर हुशार बुद्धीमान लोकांची गरज असते. हे शहाणे मोठ्या अभिमानाने ते ओझे उचलून भारवाही होतात. त्यांना वाटत असते की आपल्याला हवे तिकडे आपण गाडी घेऊन जात आहोत. पण ते नुसते जोखड ओढत असतात आणि खरा लगाम त्यांच्यावर स्वार झालेल्याच्या हाती असतो. गरज व उपयोग संपला, की स्वार घोडा वा गाडी बदलून घेतो. केजरीवाल यांनी मागल्या पाच वर्षात आपल्या पोसलेल्या काही हजार स्वयंसेवक व निष्ठावान सहकार्‍यांच्या मदतीने अशा अनेक शहाण्य़ांना आपली प्रतिमा उंचावण्यासाठी बेमालून वापरून घेतले. गरज संपल्यावर अलगद बाजूला केले. जुन्यांना बाजूला करण्यासाठी नव्या मुर्खांचा वापर केला आणि आताही नवेच ह्या शिकारीतले शिकारी असल्याचे दिसून येईल. हीच तर राजकारणाची गुंतागुंत असते. त्यात उद्याच्या बळींकडून आजच्यांची शिकार होत असते. बुद्धीमंतांची अशी शोकांतिका असते, की ते असल्या जाळ्यात सहजासहजी फ़सत असतात. अगदी विचारपुर्वक मुर्खपणा करीत असतात. प्रत्येक पक्षात संघटनेत व संस्थेत केजरीवाल असतात. जोपर्यंत भुषण व यादव यांच्यासारखे उपयुक्त मुर्ख समाजात मोठ्या संख्येने उपलब्ध आहेत, तोपर्यंत केजरीवालही उदयास येतच असतात. मग पक्ष नवा जुना असो किंवा कॉग्रेस-भाजपा असो. कारण तो अतिशय निर्दयी व्यवहार असतो. तिथे मैत्री, भावना वा नात्याला महत्व नसते. सत्ता हे अंतिम उद्दीष्ट असते. ज्यांना ते उमगत नाही ते फ़सतात व शिकार होतात. नव्या राजकारणाला शिकार करायचे तत्वज्ञान शिकवण्य़ाचा आव आणणारे भूषण यादव, यात स्वत:च शिकार झालेत आणि अजून त्यांना कुठे चुकलो तेच उमगलेले नाही.

Tuesday, March 3, 2015

ओंकारेश्वराचा कावळा



गेल्या गुरूवारी माझ्या भिंतीवर कधी नव्हे ती कावळ्यांची भलतीच कावकाव चालू होती. त्या कलकलाटाने कंटाळा आला होता. म्हणून भिंतीवरून त्यांना उडवावे, असा विचार डोक्यात आला. पण मग ते काय म्हणतात, तेही ऐकायचे ठरवले. त्यातली एक कावळी दुसरीला म्हणते कशी? आमची प्रतिभा आहे ना, ती कुठेही शी करते आणि सारवून चाटतेही. किती गोड दिसते ना? म्हणून आम्ही कुणाच्या थुंकीला तोंडही लावत नाही. तर दुसरी कावळी म्हणाली, साठी बुद्धी नाठी ग. आता पहिली कावळी चकीत होऊन बघू लागली. तर दुसरी कावळी म्हणाली, आमच्यात दर दहा महिन्यांनी डोके बदलतात. त्यामुळे माझ्या धडावर सध्या ‘सातवं डोकं’ आहे. कारण आमच्यात डोकं वापरण्य़ाला मोकळीक नाही ग. इतक्यात तिथे आणखी एक डोमकावळा येऊन आणखीनच कर्कश आवाजात ओरडू लागला. म्हणतो कसा, भाऊ भाऊ बाप आठव, नाहीतर श्राद्ध घाल. मला त्याची गंमतच वाटली. म्हणालो बाबा माझं सोड तुला तुझा बाप आठवतो कारे? तर म्हणाला आमच्यात कुणालाच कुणाचा बाप माहितच नसतो, तर आठवायचा कुठला बाप? माझी प्रश्नार्थक नजर बघून त्याने अधिक खुलासा केला. आमच्या घरट्यात कोकीळही अंडी घालतात ना? मग त्यातून कोणी कुठल्या बापाची खात्री द्यायची? त्याला म्हटले, ओरडण्यातला मंजूळ आणि कर्कश आवाज तरी बदलत असेल ना? तर तो कावळा म्हणाला, संसर्गाने व संगतीने सगळेच कर्कश ओरडू लागतात. कोकीळ असून काय उपयोग? पण खुप भूक लागलीय बाप आठवा आणि श्राद्ध घाला.

च्यायला, माझा बाप मरून झाली आता पस्तीस वर्षे. कधी त्याचे श्राद्ध घातले नाही की पुण्यतिथी नाही. कारण मी असल्या अंधश्रद्धेवर जगणार्‍या कावळ्यांना पोसायचा मक्ता घेतलेला नाही. म्हणून त्याला म्हटले चालता हो. मला बाप ठाऊक आहे, आठवतो सुद्धा. पण श्राद्ध घालणार नाही की पुण्यतिथीही करणार नाही. तर म्हणाला खुप भुक लागलीय. पाच दिवसाची उपासमार झालीय. तेव्हा कुठे डोक्यात प्रकाश पडला. त्याला म्हटले तूच का तो ओंकारेश्वराचा कावळा. होय म्हणला. पण अंनिसवाला म्हणून तिथल्या जातीयवादी कावळ्यांनी कुठल्या पिंडाला शिवू दिले नाही आणि उपासमारीची वेळ आलीय. तेव्हा मेहरबानी करून श्राद्ध घाला. त्यावर त्याला म्हटले, माझा बाप बाजूला ठेव, तुझा बाप कोण त्याची कथा सांगतो. मग इंटरनेटवर जाऊन ‘दिव्य मराठी’ दैनिकात तब्बल दीड वर्षापुर्वी छापलेला लेख काढून त्यातला उताराच या कावळ्याच्या तोंडावर फ़ेकला. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येनंतर दत्तप्रसाद दाभोळकर (बंधू) यांनी लिहीलेला तो लेख खुपच उदबोधक आहे. पण अशा कावळ्यांनी कधी वाचलेले नसते की समजून घेतलेले नसते. बाप म्हणजे जन्मदाता संसार थाटतो आणि त्यात पत्नीसह समजूतदारीने संसार करतो, म्हणून बाप होऊ शकतो. हे अशा भरकटणार्‍या प्राण्यांना कसे कळावे. त्यात अंधश्रद्धा वा विज्ञाननिष्ठा कशा एकत्र नांदू शकतात आणि संसारही करू शकतात, त्याचे अभूतपुर्व वर्णनच आलेले आहे. नरेंद्र दाभोळकर यांच्या जन्मदात्यांची ती कहाणी आहे. तो उतारा असा,

"1920 च्या सुमारास माझे वडील कोकणातील खेड्यातून आपले कर्तृत्व दाखवायला सातारला आले असणार. प्रचंड कष्ट उपसून ते त्या वेळी एल.एल.बी. झालेले. सातारा शहरात त्यांनी नामांकित फौजदारी वकील म्हणून आपला जम बसवला. त्या वेळच्या किंवा खरं तर आजच्याही रिवाजाप्रमाणे ते दत्तभक्त होते. दररोज माळावरच्या दत्ताचे दर्शन, घरी स्वत:च केलेली पूजा, वर्षातून दोनदा घरी आणि एकदा गाणगापूरला जाऊन करावयाचे पारायण. पण यात बसणार नाही, अशी आमच्या घरात एक ग्यानबाची मेख होती. माझी आई कोल्हापूरची. ती फक्त मराठी चौथीपर्यंत शिकलेली. पण चौथीच्या परीक्षेत ती कोल्हापूर राज्यात पहिली आलेली. तिच्यावरचे संस्कार राजर्षी शाहू महाराजांचे. तिचे घराणे प्रचंड बुद्धिमान. तो वारसा पण तिच्या आईकडून आलेल्या.

मात्र माझ्या आईचा रामशास्त्री बाणा जरा जादाच असणार. त्या काळात तिने मंगळसूत्र घातले नाही. कुंकू लावले नाही. आमच्या घरात कधी सत्यनारायण, हळदीकुंकू असले कार्यक्रम झाले नाहीत. आपल्याला नीटपणे न येणारे इंग्रजी ही बाई कामाला आलेल्या बायांना शिकवत बसे. या बाईने अंगावर कधी सोने घातले नाही. त्यामुळे माझ्या बहिणींच्या अंगावरही कधी सोने नव्हते. घरात सोने अजिबात नव्हते आणि मुलींच्या अंगावर सोने असते, हे मला आणि नरेंद्रला भावांची (आणि नंतर आमचीही!) लग्ने झाल्यावर काही काळापुरते समजले. हे सारे पण समजण्यासारखे आहे. वयाच्या 94व्या वर्षी या बाईने शरीर दान केलेले होते. आम्हा सर्वांना तंबी भरलेली ‘मृत्यू नंतर एका तासात माझे शरीर विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जाणार. उगाच रडारड करत, धडपड करत अजिबात जमायचे नाही. शरीर गेले की शरीर संपले. त्या मेलेल्या शरीराला बघायचंय काय? सगळ्यांना सोयीची वेळ ठरवा. एकत्र जमा आणि हसतखेळत माझ्या आठवणी काढत बसा.’ खरं तर हे पण समजणारे आहे. मात्र एक गोष्ट समजावून घेणे खूप कठीण आहे, पण खूप गरजेची पण आहे. एवढे टोकाचे वैचारिक मतभेद असताना माझ्या आईवडिलांचे छोटे वादविवादसुद्धा आम्ही कधी पाहिले नाहीत. त्यांचे अगदी गुळखोबरे होते. वडिलांच्या पारायणाचे आई सर्व हसतमुखाने करायची आणि दररोज संध्याकाळी आम्हा भावंडाची जेवणे झाल्यावर दोघे अगदी निवांतपणे चुलीसमोर बसून हसतखेळत गुलूगुलू गोष्टी करायचे! विज्ञान आणि धर्म नीटपणे समजलेली माणसे समोरच्या माणसाचे अजिबात न पटणारे विचार शांतपणे ऐकून त्यांचा आदर करीत, ते समजावून घेण्याचा प्रयत्न करतात."
http://divyamarathi.bhaskar.com/article/MAG-article-te-teen-divas-of-experience-for-dattaprasad-dabholkar-4368603-NOR.html

शेवटच्या वाक्यात समाजातील सौहार्द आणि सहिष्णूता कशी उदबोधक असू शकते, त्याचे नेमके मार्गदर्शन त्यात आलेले आहे. पण संपुर्ण जीवनच कावकाव करीत फ़िरण्यात धन्यता मानणार्‍यांना त्यातला बोध कसा समजायचा? समजा अंनिसच्या बोलघेवड्या बेताल लोकांप्रमाणे तेव्हाही त्या माऊलीने आपल्या पतीच्या श्रद्धेशी वैर धरले असते, तर त्यांचा संसार होऊ शकला असता काय? तो संसारच नीट होऊ शकला नसता आणि मोडला असता, तर अंधश्रद्धा निर्मूलन समिती म्हणून आंदोलन उभे राहिले, त्याच्या जन्मदात्याचाही जन्म होऊ शकला नसता. पण हे सगळे सांगून काही उपयोग नसतो. ज्यांना आपल्या आंदोलनाच्या जनकाची जन्मकथाही ठाऊक नसते, त्यांनी इतरांनाही त्यांचे बाप आठवा म्हणून सांगण्यापलिकडे कुठली अपेक्षा बाळगता येते? जेव्हा विचार व बुद्धी संपते. तेव्हा आयमाय काढण्यापेक्षा दुसरा युक्तीवाद शिल्लक उरत नाही. मग म्हातारा, थेरडा वा बाप काढण्याला पर्याय कुठे शिल्लक रहातो?

असली भाषा वा असे अर्वाच्च लिखाण करण्याची मला गरज नाही. पण ज्यांना त्याच्यातच पुरूषार्थ व बुद्धीवाद वाटत असतो, त्यांना त्यांच्याच भाषेत समजावणे भाग असते. संवाद कुठल्या तरी एकाच भाषेत होऊ शकत असतो. ज्यांनी माझ्याबाबतीत अशी भाषा व शब्द वापरले, त्यांना समजण्यासाठी त्याच भाषेत उत्तर देणे भाग आहे. कॉम्रेड पानसरे यांच्याच भाषेत, ज्यांचे डोकेच त्यांच्या धडावर नसते, त्यांची बुद्धी तरी त्यांची कशी असणार? ते असेच बरळत जाणार. त्यांनी खुशाल बरळावे कलकलाट करावा. त्याचा त्रास मला होत असेल, तर हाकलून लावणे भाग आहे. निर्बुद्धता हाच त्यांचा गुणधर्म असतो. तो माझा पिंड नाही आणि ते कावळे असले तरी मोक्ष देण्यासाठी माझ्या ‘पिंडाला’ त्यांनी शिवण्याची अजिबात गरज नाही.

Monday, March 2, 2015

पुरोगामीच आता प्रतिगामी होऊन गेलेत



"आगर्‍याजवळील फ़िरोझाबाद येथे आकस्मिकपणे जातीय दंग्याचा डोंब उसळून, त्यामध्ये आठ माणसांचे बळी पडले आणि सुमारे साठ माणसे जखमी झाली, हा वृत्तांत वाचल्यापासून आम्ही अत्यंत बेचैन झालो आहोत. एका माणसाने दुसर्‍या निरपराध माणसावर गावठी बॉम्ब फ़ेकून त्याच्या चिंधड्या उडवणे, अगर सुरा खुपसून त्याचा कोथळा बाहेर काढणे सदगतीचा नि मोक्षप्राप्तीचा मार्ग होय, असे कुठल्या धर्माच्या खर्‍या तत्वज्ञानात सांगितले आहे कोण जाणे! पण धर्माच्या नावाने अशा प्रकारचे अत्याचार आपल्या देशात आजतागायत होत आहेत. या धर्मांधतेच्या राक्षसानेच अखेर आपल्या राष्ट्राची फ़ाळणी करून त्याची चिरफ़ाड केली, या फ़ाळणीपायी लक्षावधी निरपराध माणसांची भेसूर कत्तल झाली. असंख्य स्त्रियांच्या अब्रुची होळी झाली, कोट्यावधी माणसांच्या सर्वस्वाचा सत्यानाश झाला आणि अगणित माणसे देशोधडीला लागली. पण एवढी भयानक आहुती घेऊनही या राक्षसाचे अजून समाधान झाले नाही आणि तो देशात मिळेल त्या संधीची वाट पहात दबा धरून बसला आहे, असाच प्रत्येक जातीय दंग्याचा अर्थ आहे. म्हणून जातीय दंगा म्हटले- मग तो कुठल्याही कानाकोपर्‍यात असो- तो लहान असो की मोठा असो- आमच्या काळजात चर्र होते. हा राक्षस जोवर जिवंत आहे, तोवर हे राष्ट्र सुरक्षित नाही, त्याचे स्वातंत्र्य सुरक्षित नाही, लोकशाही सुरक्षित नाही, साधी माणुसकीदेखील सुरक्षित नाही. म्हणून या राक्षसाला थारा न देणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्याचा नि:पात करून त्याला गाडून टाकणे ही राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे. पण स्वराज्य मिळून बारा वर्षे होत गेली तरी हे होत नाही. ‘इश्वर अल्ला तेरे नाम, सबको सन्मती दे भगवान’, अशी भजने तारस्वरात आळवूनही हे होत नाही. आमची राज्यघटना निधर्मी आहे, असा अहोरात्र पुकारा करूनही हे होत नाही. हिंदु-मुस्लिम ऐक्यावर प्रवचने झोडूनही हे घडत नाही. कारण जातीय दंगे हे केवळ साध्यासुध्या माणसांच्या धार्मिक भावनांमुळे घडत नाहीत. या दंग्यांमागे संघटना असते, पद्धतशीर चिथावणी असते, पैसाही असतो. अशा दंग्यांमागे वरकरणी धर्मकारण असले तरी त्याच्या मू्ळाशी राजकारण असते. ब्रिटीश राजवटीने या देशातील स्वातंत्र्याच्या आंदोलनात दुफ़ळी माजवण्यासाठी या धर्मद्वेष्ट्या राजकारणाचा भरपूर उपयोग केला.

दंगे ज्या दंगलखोरांमुळे होतात, त्यांना शासन करून जनतेच्या नागरिक हक्कांचे रक्षण हे राज्यकर्त्यांचे कर्तव्य आहे. त्याऐवजी दंगा टाळण्याच्या सबबीखाली वाद्यबंदीचा हुकूम काढणे हा चोर सोडून संन्याशाला सुळी देण्याचाच प्रकार आहे. जातीयवाद्यांपुढे सपशेल शरणागती स्वीकारण्याच्या या धोरणामुळे त्यांचे निर्मूलन होण्याऐवजी ते जास्तच माजल्याखेरीज रहाणार नाहीत. किंबहूना, सध्या नव्याने जो ऊत आला आहे, तो या देशातील जातीयवादी व धर्मांध गटांनी नव्याने उचल खाण्याचे जे प्रयत्न चालविले आहेत, त्याचाच एक भाग आहे.

केरळातील कम्युनिस्ट सरकार उलथवून पाडण्यासाठी तेथील कॉग्रेसवाल्यांनी कॉग्रेसश्रेष्ठींच्या आशीर्वादाने राष्ट्रद्रोही मुस्लिम लीगवाल्यांशी तत्वशून्य जी युती केली, तिच्यामुळे देशभर मुस्लिम जातीयवाद्यांना नवे उत्तेजन मिळाले आहे. देशात ठिकठिकाणी लीगच्या शाखांचे पुनरूज्जीवन करण्यात येत आहे. एवढेच नव्हे, तर आक्टोबरमध्ये लीगची अखील भारतीय परिषद भरवून या संघटनेचे कार्य पुन्हा देशभर सुरू करण्याचीही घोषणाही करण्यात आली आहे. ज्या मुस्लिम लीगच्या कारस्थानामुळे अखेर भारताची फ़ाळणी झाली, ती भारताच्या राष्ट्रीय जीवनात पुन्हा जातीयवादाचे विष फ़ैलावण्यासाठी नव्याने अवतार घेत आहे. जातीय नि धार्मिक तेढ हेच लीगचे एकमेव भांडवल आहे. त्यामुळे तिच्या पुनरूज्जीवनाची नांदी जातीय दंग्यांनी व्हावी यात नवल ते काय? या प्रतिगामी, लोकशाहीविरोधी नि देशद्रोही प्रवृतीला देशात पुन्हा थारा मिळता कामा नये; म्हणून सर्व शक्ती पणाला लावून झटणे हे राष्ट्रातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. लोकशाही नि समाजवाद यांच्याबद्दल निष्ठा बाळगणार्‍या मुस्लिम नागरिकांना देखील या जातीयवादी विचाराला प्रतिबंध करण्यासाठी पुढे सरसावले पाहिजे." २४

उपरोक्त तीन परिच्छेद मुद्दाम अशा एका जुन्या लेखातून घेतले आहेत, की नव्या कम्युनिस्ट व पुरोगाम्यांना आपलाच इतिहास कळावा. कारण हा लेख आजचा नाही तर तब्बल पंचावन्न वर्षे जुना आहे. तो कुणा हिंदू महासभा, रा. स्व. संघाच्या नेत्याने लिहीलेला नाही की सनातनच्या ताज्या अंकातला नाही. तो एका कम्युनिस्ट सहप्रवाशी अशी हेटाळणी झालेल्या दिग्गज संपादकाने लिहिलेला आहे. आज जे लोक शिवाजी खरा कोण होता, त्याचा शोध घेतल्याचे तावातावाने सांगायला पुढे सरसावलेले आहेत, त्यांना भारतातला ‘कम्युनिस्ट खरा कोण होता’, त्याचे तरी भान व ज्ञान आहे काय? असते तर साडेतीन चारशे वर्षे जुन्या इतिहासाचे हवाले देत बसण्यापेक्षा त्यांनी आपल्याच भारतातील पुरोगामी इतिहासाचा थोडा तपास केला असता. कॉम्रेड पानसरे यांची हत्या झाल्यावर जातीयवादाची घासून गुळगुळीत झालेली टेप वाजवण्यापेक्षा आपल्याच अंतरंगात थोडे डोकावून बघितले असते. १९६० सालात जेव्हा संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि त्यासाठीच लढलेल्या सर्वपक्षीय समितीमध्ये फ़ुट पडली, त्याच काळात त्यापैकी एक नेते व दैनिक ‘मराठा’चे संपादक आचार्य अत्रे यांनी लिहीलेला हा अग्रलेख आहे. त्यात त्यांनी जातीयवादाला कॉग्रेस कशी चुचकारते आहे आणि ती कुठल्या राजकारणासाठी चुचकारते आहे, त्याचे दाखले दिले आहेत. कम्युनिस्टांचीच एकमेव केरळी सत्ता खच्ची करण्यासाठी कॉग्रेस पक्षाने मुस्लिम लीग या जातीयवादी पक्षाला हाताशी धरून कसले विष फ़ैलावण्याचे पाप देशात केले, त्याचा तो पुरावा आहे. त्यात कुठे हिंदूत्ववादी वा संघाचा उल्लेखही आढळत नाही. त्याही काळातले कम्युनिस्ट साहित्य व विवेचन संघाच्या नावाने खडे फ़ोडताना दिसत नाही. कारण तेव्हा तमाम पुरोगामी आजच्या भाजपाच्या भाषेत मुस्लिम जातीयवाद व मुस्लिम लीगवर खापर फ़ोडत होते. मात्र आज तेच कम्युनिस्ट व समाजवादी त्याच मुस्लिम जातीयवादाला जोजवत अंगाईगीते गाताना दिसत असतात. मतांच्या राजकारणासाठी तेव्हा कॉग्रेसने जे पाप केले असे आरोप पुरोगामी करायचे, ते आरोप आता भाजपाने केल्यावर लगेच प्रतिगामी होतो? उपरोक्त लेखात प्रतिगामी कोण व कोणत्या कारणाने त्याची वर्णन आलेले आहे.

‘या प्रतिगामी, लोकशाहीविरोधी नि देशद्रोही प्रवृतीला देशात पुन्हा थारा मिळता कामा नये’ असे १३ सप्टेंबर १९६० रोजीच्या अग्रलेखात अत्रे लिहीतात. ती प्रवृत्ती कोणाची आहे? कुणात सामावलेली आहे? आजचे कम्युनिस्ट कोणाला हाताशी धरून उलट्याबोंबा मारत असतात? ५५ वर्षे जुन्या सिद्धांताचा आधार घेतला तर आज पुरोगामी म्हणून मिरवणारेच प्रतिगामी होऊन गेलेले नाहीत काय? कारण देशाची फ़ाळणी ज्यामुळे झाली, त्याच प्रतिगाम्यांची कास आजचे पुरोगामी धरून आज चालले आहेत. त्यांना लीग चालते, त्यांना ओवायसी चालतो. किंबहूना तेच सेक्युलर पुरोगामी वाटतात. त्यांच्यामुळे देश जोडला जाईल अशा थाटात यांचे पुरोगामी राजकारण चालते. मुस्लिम लीग बदललेली नाही की त्यांच्या राजकारणातील प्रतिगामी प्रवृत्ती बदललेली नाही. बदललेले आहेत ते कम्युनिस्ट आणि समाजवादी पुरोगामी. आपलाच अगदी अलिकडचा इतिहास त्यांना आठवत नाही आणि इतिहासाचे नव्याने संशोधन व लेखन करण्याच्या गमजा चालू आहेत. आणि तोंडावर पुरावे दाखले टाकले, मग इतिहासात कशाला जायचे, असे उफ़राटे सवाल केले जातात. ज्यांना आपण कोण होतो, काय होतो आणि कसे होतो, तेही आठवत नाही, त्यांनी इतरांचे वा समाज देशाचे विश्लेषण करावे, हा हास्यास्पद प्रकार नाही काय? कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या संबंधात नुसता शोकप्रस्तावच नको तर निषेधाचा प्रस्ताव विधीमंडळात आणायला हवा. त्याला जर भाजपाचा विरोध असेल, तर तो त्यांचा मुर्खपणाच नव्हेतर दिवाळखोरी आहे. पण त्यासाठी आक्रोश करणार्‍यांनी थोडाफ़ार अशा शोकप्रस्तावाचा आपला इतिहासही तपासून बघितला आहे काय?

(उपरोक्त उतारे ‘कर्‍हेचे पाणी’ खंड ६ मधून)

Sunday, March 1, 2015

पादर्‍याला आवट्याचे निमीत्त



माझ्या पत्रकारितेची सुरूवात दैनिक ‘मराठा’त झाली. तिथे आचार्य अत्र्यांच्या सहवासाने भाषेवर प्रभूत्व असलेल्या लोकांची मांदियाळी होती. त्यात दत्तू आंबेरकर ह्या जाहिरात खात्यात काम करणार्‍या छायाचित्रकाराचाही समावेश होता. अधूनमधून नव्या पत्रकार बुद्धीमंतामुळे दत्तोबाची आठवण येत असते. कारण त्यांनी अशा अर्धवटरावांचे नेमके विश्लेषण वा व्याख्या सांगितली होती. सोशल मीडियावर ‘सकाळ’चे रोविंग एडीटर संजय आवटे यांनी लिहीलेल्या एका चिरकुट मजकुरामुफे दत्तू आंबेरकर आठवले. ते अशा अर्धवटरावांना  नव्याने शेंबुड खायला शिकणारा कावळा म्हणायचे. अतिशय किळसवाणा असा तो प्रकार आहे. आरंभी मला त्याचा अर्थ माहिती नव्हता. दत्तोबांशी चर्चा केल्यावर त्यांनी प्रत्यक्षच असा कावळा दाखवला. अत्यंत बुळबुळीत असा हा पदार्थ तुम्ही फ़ेकला, की कावळा त्यावर झेपावतो. पण तो सहजगत्या त्याच्या चोचीत येत नसतो. मग तो चोचीत ओढून घेण्यासाठी कावळा जी कसरत करतो, ती खरेच कितीतरी केविलवाणी असते. ‘चोरटया भाऊच्या मनात चांदणे!!!’ या शिर्षकाचा जो मजकूर आवटे यांनी सोशल मीडियात टाकला, त्यावर नजर टाकली तर दत्तू आंबेरकरच्या शब्दांची प्रचिती येते. माझ्या वय व बुद्धीविषयी आवटे लिहीतात


‘भाऊ तोरसेकर यांचे वय झाले आहे आणि काहीवेळा वृद्धापकाळात विचारप्रक्रिया विसंगत दिशेने जाण्याचे भय असते. त्यामुळे भाऊना माफ करायला हरकत नाही. पण त्यांच्या बेताल लेखनाने काही गैरसमज होऊ शकतात. ते होऊ नयेत यासाठी:’

असे म्हणत आवटे यांनी विचारप्रक्रिया वयानुसार विसंगत दिशेने जाण्याचे भय व्यक्त केले आहे. याचा अर्थ तसा त्यांचा अनुभव असावा आणि ज्या हिरीरीने आवटे पानसरे दाभोळकरांच्या समर्थनार्थ उभे ठाकले आहेत, त्यावरून ते कोणाच्या संगतीत असतात, त्याचा अंदाज करण्याची गरज नाही. पण मग असा प्रश्न येतो, की वयाचाच निकष लावायचा तर ते पानसरे दाभोळकर माझ्यापेक्षा वयाने अधिकच पुढे गेलेले होते. म्हणजे आवटेच्या निकषानुसार त्यांची विचारप्रक्रिया विसंगतीच्या दिशेने गेलेली आहे, असेच त्यांना वाटत असावे. त्याचे कारण उघड आहे. आवटे ज्या दिवट्यांच्या संगतीत रहातात वावरतात, त्यावर सुसंगती-विसंगती अवलंबून असते. म्हणूनच त्यांना पानसरे दाभोळकर यांचे विचार भरकटत विसंगतीच्या दिशेने गेल्यासारखे वाटले असेल तर नवल नाही. मात्र मला तसे वाटत नाही. त्या दोघांच्या काही भूमिका व विचार असू शकतील आणि त्या इतरांना पटणार्‍या नसल्या म्हणून आवटेला विसंगतही वाटल्या असतील. म्हणून मी त्यांना बेताल वागणे म्हणणार नाही. तो आवटे यांचा निष्कर्ष आहे. अर्थातच तो गैरसमजावर आधारलेला असू शकतो. पण ज्याच्यापाशी मुळात बालीश समजही नाही, त्याच्या गैरसमजाला किती किंमत द्यायची? म्हणूनच आवटे यांना पानसरे व दाभोळकर विसंगत विचार करायचे असे वाटत असले तरी मला अजिबात तसे वाटत नाही. आपापले चिंतन मनन यानुसार त्यांनी विचार मांडले आणि कृतीही केल्या. आवटेंना त्या बेतालही वाटतात, मला नव्हे. त्यांच्याकडून चुक झालीच असेल, तर आवटेसारख्या निर्बुद्ध नासमज बेताल लिहीणार्‍या बोलणार्‍यांची संगत त्या दोघांना टाळता आली नाही, इतकेच. अर्थात अशा बेअक्कल आवट्याची दखल घेण्याचे काहीच कारण नाही, असे अनेकांना वाटेल. पण जेव्हा अशी बेताल माणसे शेफ़ारल्यासारखी अक्कल पाजळू लागतात, तेव्हा त्यांचे गाढवासारखे लांबलेले कान उपटून तोकडे करावे लागतात. आणि पादण्याला ‘आवाज महाराष्ट्राचा’ म्हणत नाहीत हे सांगणे भाग पडते.

हरकत नाही, माझी बुद्धी इतकी भरकटली असेल तर साम टिव्हीवर त्यांनी मला आमंत्रित करून ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अशी माझी ओळख करून देण्याचे कारण काय? त्यातून आवट्यांची बुद्धी किती भरकटली वा भ्रष्ट झाली आहे, त्याचा पुरावा आपोआपच मिळत नाही काय? यातून या बेताल माणसाचे जगाविषयी व बुद्धीविषयी किती गैरसमज आहेत याची साक्ष मिळू शकते. दुसरी बाब आवट्याच्या भरकटलेल्या बुद्धीची व कामाची. याला ‘सकाळ’ समूहाने कोणत्या पदावर नेमले आहे? रोविंग एडीटर म्हणजे काय? ज्याला कुठली जागा वा काम नेमून दिलेले नाही व त्याने कुठेही भरकटावे असा संपादक. सहाजिकच अशा भरकटलेल्या माणसाला अवघे जगच भरकटलेले वाटले तर नवल नाही. अर्थात हा माझा नुसता आरोप नाही. त्याचा साक्षात ऑडीओ व्हीज्युवल पुरावाच आवट्यांच्या दफ़्तरी नोंदलेला आहे. त्यांनी त्याचीही लिंक सोशल मीडियात टाकली, तर कोण किती भरकटलेला निर्बुद्ध आहे, त्याचा निर्णय बघणार्‍यालाच घेता येईल.

डिसेंबर महिन्याच्या अखेरीस नागपूरला महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन होत असते. ते संपल्यावर साम टिव्हीने ‘आवाज महाराष्ट्राचा’ नावाच्या शोमध्ये चर्चा ठेवलेली होती. चर्चेचा विषय होता विधानसभेच्या हिवाळी नागपूर अधिवेशनाचे फ़लित. त्यात सकाळचे नागपूरचे निवासी संपादक होते, तसेच भाजपाचे प्रवक्ते अवधूत वाघ आणि कॉग्रेसचे डॉ. राजू वाघमारे सहभागी झाले होते. त्यात माझाही ज्येष्ठ विश्लेषक म्हणून समावेश आवट्यांनी केला होता. चर्चेचा पहिला भाग उरकला आणि ब्रेकनंतर वाघ आणि वाघमारे याच दोघांमध्ये तुंबळ लढाई जुंपली. पण चर्चा विषय सोडून कुठल्याकुठे भरकटली होती. कारण हे दोघे मुंबईच्या रेल्वे लोकल गाड्या व फ़लाटांच्या विकास सुविधांविषयी तब्बल पंधरा मिनीटे बोलत होते. माझ्या ‘भरकटलेल्या बुद्धी’नुसार रेल्वे हे केंद्र सरकारचे मंत्रालय असून महाराष्ट्र सरकार व विधानसभेच्या कक्षेत तो विषय येत नाही. म्हणूनच नागपूर विधानसभेच्या फ़लितामध्ये त्यावर चर्चा व्हायला नको. पण कागद नांगरीत बसलेल्या आवट्याला त्याचे भान कुठे होते? त्यांनी दोन्ही प्रवक्त्यांना मोकाट भरकटू दिले. शेवटी बेताल झालेल्या त्या चर्चेला रेल्वेच्या रुळावरून विषयाच्या रुळावर आणण्यासाठी मला ओरडून आवट्याला शुद्धीवर आणावे लागले. विषय कुठला आणि चर्चा कुठे चाललीय, असे ओरडून सांगितल्यवर पादण्यात रमलेल्या आवट्यांना भान आले. त्यांना शुद्धीवर आणण्यासाठी मी केलेली कॉमेन्टही अजून माझ्या स्मरणात आहे आणि दोन्ही पक्षाचे उपरोक्त प्रवक्तेही त्याची साक्ष देतील. मी आवट्यांना शुद्धीवर आणण्यासाठी म्हणालो होतो, कृपया या वाघ आणि वाघमारेंना एकाच चर्चेच्या पिंजर्‍यात कोंडू नका, अन्यथा चर्चा बाजूला रहाते आणि शिकार सुरू होते. तेव्हा कुठे आवट्यांना जाग आली. पण तोवर चर्चेचा वेळही संपत आलेला होता.

असा हा बेताल निर्बुद्ध आवटे त्याने माझी बुद्धी भरकटण्य़ाचा धोका सांगावा यातच माझी बुद्धी शाबुत असल्याचा पुरावा मिळतो. ज्याची स्वत:ची बुद्धी लाईव्ह चर्चेमध्ये भरकटलेली असते. त्याने मला बुद्धी भरकटल्याचे प्रमाणपत्र दिल्याबद्दल त्याचे आभार मानायला नको काय? त्यांनी पादलेला दुसरा मुद्दा ‘दाभोलकर अथवा पानसरे यांचे खून शेतीच्या बांधावरच्या भांडणातून नक्कीच झाले नाहीत. त्याला असणारा संदर्भ विचार आणि विवेकाचा आहे. त्यामुळे हे खून अविवेकी शक्तीनी केले आहेत, असे म्हटले जाणे स्वाभाविक आहे.’ याचा अर्थ अन्य खुन हे विवेकी शक्ती करतात असा होत नाही काय? इतर खुन विवेकी बुद्धी वा शक्तींकडून होतो असे आवट्यांना म्हणायचे आहे. इथे या माणसाची बुद्धी किती भरकटली आहे, त्याचा पुरावा वेगळा देण्याची गरज आहे काय?

त्यांचा तिसरा मुद्दा, ‘दाभोलकर अथवा पानसरे यांच्या हत्येला केरळ, चीन, रशिया, क्युबा असे संबंध जोडत काय सिद्ध होणार आहे, हे काही मला समजलेले नाही. त्यावरही चर्चा करता येईल, पण मुद्दा भरकटण्याचा डाव त्यातून यशस्वी होत जाईल!’ ज्याला एक तासाच्या चर्चेत विषय मुद्देसूद ठेवता येत नाही आणि पंधरा मिनीटे चर्चा भरकटल्याची शुद्ध नसते, त्यांनी उगाच असला पांडित्याचा आव आणायची गरज आहे काय? केंद्र आणि राज्य यांची खाती व मंत्रालये यातली तफ़ावत कळत नाही, त्यांनी मुद्दे भरकटण्याची भाषा करावी, हा विनोद नाही काय? मग आवट्यांचा मुद्दा काय आहे? त्यांच्याच शब्दात सांगायचे तर ‘मुद्दा आहे आयडिया ऑफ़ इंडियाचा.’ म्हणजे ते आयडीयाच्या काल्पनिक जगात वावरत असतात आणि वास्तवातील जगाशी त्यांचा काडीमात्र संबंध नसतो. याला भ्रमिष्टावस्था म्हणतात. कारण पानसरे दाभोळकरांची हत्या वास्तवात झालेली आहे. ती नुसती आयडीया नाही. त्या हत्यांचा आयडियाशी संबंध नसून गुन्हेतपासाशी संबंध आहे. पण कल्पनेच्या विश्वात कल्पनाविलास करण्यात रमलेल्यांना वास्तवाचे भान कसे असावे?

तर मुद्दा किती व्यापक आहे असे सांगताना आवटे म्हणतात, ‘तेव्हा हा मुद्दा तथाकथित पुरोगामी अथवा डावे पक्ष यांच्याशी संबंधित नाही. (उलट शेकापसारखा तथाकथित डावा पक्ष रायगडातही बंदमध्ये उतरताना दिसला नाही!) मुद्दा त्याहून जास्त व्यापक आहे. म्हणून तो प्रत्येक भारतीय माणसाच्या चिंतेचा होणे स्वाभाविक आहे. जो जो भारतीय, तो तो सचिंत, तो तो संतप्त असे चित्र आहे. असायला हवे. आम्ही भारताचे लोक आज अस्वस्थ असताना हा कोणी भाऊ असे पचकत असेल तर त्यांना सांगायला हवी या देशाची गोष्ट!’

हा दिवटे कुठल्या देशात रहातो ठाऊक नाही. कारण एकाच वाक्यात तो अगदी डावा असूनही रायगडातला शेका पक्ष बंदपासून दूर राहिल्या़चे सांगतो आणि त्याच वाक्यात पुन्हा ‘जो जो भारतीय, तो तो सचिंत, तो तो संतप्त असे चित्र आहे’ अशी ग्वाही सुद्धा देतो. म्हणजे जो जो संतप्त तेवढाच भारतीय बाकीचे भारतीय नसतात का? तसे असेल तर अगदी दिल्लीतले व अन्य प्रांतातील डावे पक्ष, कम्युनिस्टही भारतीय असू शकत नाहीत. कारण त्यातला कोणी नेता अस्वस्थ होऊन कोल्हापूरला फ़िरकला सुद्धा नाही. बंदमध्ये किती व कोण सहभागी झाले, त्याच्या बातम्या सकाळनेच दिल्यात. त्या तरी आवटे वाचतो काय? की रोविंग एडीटर म्हणजे घरमाशी जशी ताटावरून मैल्यावर बसत भरकटत जाते, तसे यांचे काम चालते?

‘हिंसाचाराचे समर्थन करणारी साम्यवादी आवृत्ती आणि त्याचे तपशील याचा इथे संबंध येतोच कुठे? लोकशाहीत त्याला जागा असू शकत नाही.ते सारे अवैध आहे. दाभोलकर अथवा पानसरे यांच्या हत्येला केरळ, चीन, रशिया, क्युबा असे संबंध जोडत काय सिद्ध होणार आहे, हे काही मला समजलेले नाही.’ असा प्रश्न मला विचारणार्‍या आवट्याला महाराष्ट्राचाही इतिहास माहिती नाही की इथल्या राजकारणाची ‘आयडिया’ नाही. मग समजणार तरी कसे? या अन्यत्रच्या साम्यवादी हिंसक कृत्यांचा संबंध काय असाच प्रश्न पंचावन्न वर्षापुर्वी कॉम्रेड डांगे, दाजीबा देसाई, आचार्य अत्रे इत्यादी दिग्गजांनी तेव्हाचे समाजवादी दिग्गज एसेम जोशी, नानासाहेब गोरे, बॅ. नाथ पै यांनाही विचारला होता. तसा कुठलाही संबंध नसताना तेव्हाचे संयुक्त महाराष्ट्र समितीचे राजकारण नासले होते. जे उत्तर जोशी-गोरे यांचे होते, तेच माझे उत्तर आहे. ते जरा आवटे नावाच्या घरमाशीने इतिहासावर बसून वाचले तर संबंध लक्षात येऊ शकेल. पण घाणीवरच घोंगावत बसल्यावर लक्षात काय यायचे? आज आवटे वगैरे दिवटे ज्या आवेशात सनातन वा हिंदूत्ववाद्यांवर भडीमार करत असतात, त्याच भाषेत तेव्हाचे समाजवादी दिग्गज कम्युनिस्टांना खुनी प्रवृत्ती म्हणून  खिजवत होते?

असो तर त्यांच्यामुळे मला दत्तू आंबेरकरची आठवण झाली. कारण आवट्यांनीच लिहून ठेवले आहे ‘कोणी भाऊ असे पचकत असेल तर’. तर हा अत्यानंदाने शेंबुड सापडला म्हणून त्याच्यावर झेपावणार ना? नसलेली अक्कल माणुस वापरू लागला, मग असेच होते. ज्याला देश, लोक, मुद्दे, भरकटणे, पचकणे अशा शब्दांचा मुळातला अर्थच ठाऊक नाही, त्याने जीभ उचलून टाळ्याला लावली, तर वेगळे काय व्हायचे? काय लिहीतो वा बोलतो, त्याचेही भान त्याला असायचे कारण नाही. त्यांनी आपल्या त्या ‘आवाज महाराष्ट्राचा’ शोची लिंन्क मुद्दाम इथे टाकावी, म्हणजे त्यांच्या भरकटलेल्या अकलेचे छान प्रदर्शन मांडले जाईल. चोरट्याच्या मनात चांदणे असे आपले पुर्वज म्हणून गेलेत. पण त्यांनीच पादर्‍याला पावट्याचे निमीत्त असेही म्हटले आहे. असले दिवटे त्या काळात पैदा झाले असते, तर पुर्वजांनी पादर्‍याला आवट्या़चे निमीत्त अशीच म्हण रूढ केली असती ना?

पानसरे नावाचे विचार आणि हत्यार

Swami Laxmananda Saraswati

जेव्हा आपल्याकडे कुठल्याही प्रश्नाची उत्तरे नसतात, तेव्हा चलाख व लबाड माणसे मूळ प्रश्नच बदलण्याची केविलवाणी धडपड करू लागतात. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येनंतर त्या कृत्याचा तात्काळ निषेध सर्वांनीच केला होता. कुठल्याही हिंसक हत्येचा व हिंसाचाराचा निषेध व्हायलाच हवा. पण मग त्याचवरून चर्चा होताना दोन तट पडायचे कारण काय? जेव्हा निषेधकर्त्यातला एक गट दुसर्‍या निषेधकर्त्यालाच खुनी वा हल्लेखोर ठरवू लागतो, तेव्हा हत्येचा विषय बाजूला पडून आरोपबाजीला सुरूवात होत असते. कुठल्याही गुन्हा वा हत्येचा तपास हे सामान्य माणसाचे काम नसते. ते पोलिसांचे कर्तव्य असते. अशावेळी कोणाकडे त्यासंबंधी पुरावा वा साक्षीदार असेल तर त्याला पोलिसांकडे घेऊन जाणे किंवा तपासात मदत करणे; हे त्याचे कर्तव्य असते. त्याऐवजी कोणी भलत्याच कोणावर बिनबुडाचे आरोप करू लागला आणि त्यासाठी जुने संदर्भ देऊ लागला, तर काय करायचे? त्यातला खरेखोटेपणा तपासायचा नाही काय? दाभोळकर असोत की पानसरे असोत, त्यांच्या हत्येनंतर विनाविलंब हल्ल्याचा आरोप हिंदूत्ववाद्यांवर सुरू झाला. अशा आरोपानंतर पोलिसांनीही त्या दिशेने तपास केला, आरोप झालेल्यांना ताब्यात घेऊन चौकश्या केल्या. पण कुठलाही पुरावा सापडू शकलेला नाही. आरोप करणार्‍यांनीही त्यासाठी कोणी पुरावा आणुन देण्याचे कष्ट घेतलेले नाहीत. सहाजिकच त्यापैकी कोणाला पानसरे वा दाभोळकरांच्या हत्येचे महत्व वाटत नसल्याचे स्पष्ट होते. त्यापेक्षा झालेल्या हत्येचा राजकीय लाभ उठवण्याचा अश्लाघ्य हेतू मात्र अशा आरोपबाजीतून स्पष्ट समोर येतो. एका निष्पाप व्यक्तीच्या हत्येचा गुन्हा जितका निषेधार्ह असतो, तितकाच त्याच्या हत्येपासून राजकीय लाभ उठवण्याचा हेतूही निषाधार्ह असतो. म्हणूनच त्या निषेधाच्या मुखवट्याआड लपलेल्या विकृत प्रवृत्तीचा बुरखा फ़ाडणे अगत्याचे होऊन जाते.

पानसरे यांच्या हत्याकांडानंतर तेच घडत गेले. म्हणून अशा प्रकरणांचा व त्यात गुंतलेल्या लबाड प्रवृत्तीचा पर्दाफ़ाश करणे अगत्याचे झाले. किंबहूना तेच तर पत्रकारितेचे कर्तव्य असते. आजवर बहुतांश वेळी पुरोगामी मुखवटे लावूनच वावरणार्‍या बहुतेक पत्रकार, विचारवंतांनी त्यात नेहमीच कसूर केली आहे. म्हणूनच कॉम्रेड पानसरे हयात असताना त्यांच्या विचारावर कधी वाहिनीवर चर्चा झाल्या नाहीत की कुठल्या वृत्तपत्राने त्यावर सांगोपांग चर्चा घडवण्याचा प्रयासही केला नाही. पण त्यांची निर्घॄण हत्या झाल्यावर मात्र या तमाम पुरोगामी माध्यमांना पानसरेंच्या वैचारिक लढाईचा पुळका आला. कारण त्यांच्यासाठी एक निर्घॄण हत्येला महत्व नव्हते, त्यापेक्षा हिंदूत्ववादी संघटनांना झोडण्यासाठी अशी हत्या हे धारदार हत्यार म्हणून हाती लागले होते. सहाजिकच त्या प्रयत्नाला खिळ घालणारा कोणी लेखक पत्रकार असेल, तर त्याचे लेख अशा हत्याराची धार बोथट करत असतात. म्हणून पानसरे हत्येच्या निमीत्ताने इथे जो पुरोगामी वा कम्युनिस्ट हिंसाचाराच्या जुन्या इतिहासाचा पाढा वाचण्याचा प्रयत्न झाला, त्यामुळे अनेक सेक्युलर पुरोगामी पत्रकार कार्यकर्ते विचलीत झाले तर नवल नाही. कारण त्यांनी सातत्याने सत्य लपवून ठेवत ज्या खोट्या आभासांना सत्य ठरवण्य़ाची कसरत चालविली होती, तिलाच अशा लिखाणाने तडा जात असते. हे कसे नित्यनेमाने चालू असते, त्याची शेकडो उदाहरणे आहेत. त्यातला एक आक्षेप असा की वैचारिक भूमिका वेगळी आणि एका ऐंशी वर्षाच्या म्हातार्‍याची निर्घृण हत्या वेगळी. खरेच आहे. पण मग अशी हत्या झालेले पानसरे पहिलेच आहेत काय? अशी करूणा इतर म्हातार्‍यांच्या हत्येनंतर पुरोगाम्यांनी कधी व किती दाखवली? ओरिसा राज्यात फ़ादर स्टेन्स नामक धर्मोदेशकाची निर्घृण हत्या दारासिंग नावाच्या हिंदूत्ववादी गुंडाने केली. याचा दिर्घकाळ गवगवा माध्यमातून झाला होता. पण ती ओरीसातली एकमेव हत्या होती?

त्याच ओरीसात त्यानंतर लक्षमणानंद सरस्वती नावाच्या म्हातार्‍याची हत्या झालेली होती. कधी कोणी त्याचा उहापोह माध्यमातून केला होता काय? आज पानसरेंसाठी गळा काढणार्‍यांना फ़ादर स्टेन्सचा खुनी दारासिंग लगेच आठवेल. पण लक्ष्मणानंद नावाच्या म्हातार्‍याचा खुनी आठवणार नाही. कसा आठवेल? त्याच्या बातम्याच द्यायच्या नाही. सव्यसाचि पंडा नावाच्या नक्षलवादी नेत्यावरही त्या हत्येचे अरोप होते. कधी यापैकी कोणा पुरोगाम्याने पंडाचे नाव सांगून गळा काढला? कशाला काढला नाही? त्यावर माध्यमातून उहापोह कशाला झाला नाही? खुनाची प्रवृत्ती हिंदूत्ववादी असते, तशीच मार्क्सवादी व पुरोगामी सुद्धा असते. पण त्यात हिंदूत्ववादी मारला गेला, मग सगळे पुरोगामी मौनीबाबा होऊन जातात. कशाला मौनी होतात? लक्ष्मणानंद म्हातारा नव्हता? रहात्या आश्रमात त्याच्या शरीराची खांडोळी करून त्याला ठार मारण्यात आले, तेव्हा ज्यांच्या तोंडी निषेधाचे चार शब्द उमटले नाहीत, त्यांनी हिंसेच्या विरोधात आरोळ्या ठोकण्यात अर्थ असतो काय? आज त्यांनी म्हातार्‍याच्या हत्येनंतर इतिहास कशाला उगाळता म्हणणे, बदमाशी नसते काय? सगळीकडून बघितल्यास हे लोक पक्के बदमाश असल्याचे पुरावे मिळू शकतात. मग आपली बदमाशी लपवण्यासाठी त्यांना अपवादात्मक उदाहरणे हवी असतात. त्यामुळेच मग पानसरे यांच्यासारख्या प्रामाणिक अहिंसक माणसाच्या हत्येचे भांडवल करायला हे बदमाश लोक हिरीरीने पुढे येतात. त्यांना पानसरेंच्या विचार विवेकाशी अजिबात कर्तव्य नसते. म्हणूनच त्यांनी आपापल्या हाती असलेल्या विविध साधनांचा उपयोग कधीच पानसरे यांच्या विचारांना प्रोत्साहन करण्यासाठी होऊ दिलेला नाही. मारले जाईपर्यंत अशा पुरोगाम्यांनी कितीदा वा कुठे कुठे पानसरे यांच्या पुस्तके व विचारांचा उल्लेख केला होता?

हल्लेखोर व मारेकरी नुसत्या देहाची हत्या करतात, त्यापेक्षा भयंकर हे लोक असतात, जे विचारांची हत्या करतात. पानसरेंच्या बाबतीत असे दिसेल, की आज त्यांच्या विचारांसाठी गळा काढणार्‍यांनी सहसा पानसरेंच्या विचारांना आपले तयार व्यासपीठ कधी उपलब्ध करून दिलेले नव्हते. पानसरे यांचे विचार इतके प्रगल्भ असताना त्यांना किती वाहिन्यांनी देशातल्या विविध घडामोडींसाठी वेळोवेळी आपल्या कार्यक्रमात सहभागी करून घेतले? तसे केले असते, तर पानसरे यांचे प्रगल्भ विचार शेकडो नाही तर लाखो लोकांपर्यंत सहजासहजी पोहोचू शकले असते. कुठल्या छछोर अभिनेत्री वा अभिनेत्याच्या मुलाखतीवर कित्येक तास वा वृत्तपत्राचे रकाने खर्च करणार्‍यांनी पानसरे यांना किती स्पेस दिला होता? फ़ेसबुक वा तत्सम सोशल माध्यमात किती लोकांनी आजवर पानसरे यांच्या विविध मतांवर भूमिकांवर मतप्रदर्शन केले होते? हिंसेसाठी त्यांना लक्ष्मणानंद या वृद्धाच्या हत्येचा राग येत नाही, तर पानसरेंच्य हत्याकांडाची चिड कशाला येईल? त्यांच्यासाठी पानसरेंची हत्या ही एक राजकीय संधी असते. आणि हीच अतिशय संतापजनक हिणकस प्रवॄत्ती आहे. कारण पानसरे यांच्या विचारापेक्षा त्यांना पानसरेंच्या हत्येचे अप्रुप असते. यापैकी कितीजणांनी पानसरेंचे विचार वाचले व त्याचे मनन केले आहे, याचीच शंका आहे. तसे केले असते तर पानसरे इतिहास नव्याने उलगडून सांगत होते हे लक्षात येईल आणि म्हणूनच इतिहासाचे महत्व या बोंबल्यांना उमगले असते. मग त्यांना राजकीय इतिहासातील हिंसाचाराचे स्मरण का महत्वाचे आहे, त्याचाही साक्षात्कार झाला असता. पण त्याची यांना गरजच काय? ज्यांना जिवंत पानसरे यांच्यापेक्षा त्यांच्या हत्येचे भांडवल करायचे असते. त्यांना त्यांच्या विचारांशी कुठले कर्तव्य असणार? त्यांना पानसरे नावाचे हत्यार हवे असते, विचार नकोच असतात.