Sunday, June 7, 2015

मिस्टर ओवायसी, नो उल्लू बनाविंग



सामान्य माणसाचीच नव्हेतर सर्वसाधारण बुद्धीमान असलेल्या लोकांची दिशाभूल कशी करावी, याचे प्रात्यक्षिक हवे असेल, तर मुस्लिम धर्मवादी नेत्याचे युक्तीवाद काळजीपुर्वक अभ्यासणे भाग आहे. ही मंडळी अतिशय चतुराईने आपली धर्मांधता, धर्मनिष्ठा आणि कायदे-राज्यघटना यांची सरमिसळ करत असतात. कालपरवा मिसबाह काद्री या मुलीला मुंबईत घर नाकारण्याचा प्रकार गाजला होता. तेव्हा अशीच गफ़लत करण्यात आली. आता तोच युक्तीवाद उलटा फ़िरवून छत्रपती शिवाजी महाराज वा शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाला विरोध केला जात आहे. त्याचीच पुनरावृत्ती ‘योगा दिवस’ शाळांमध्ये साजरा करण्यातून केली जात आहे. मात्र कुणी तथाकथित बुद्धीमंत त्यातली धर्मांधता बघू शकत नाही, किंवा त्यावर अवाक्षर बोलणार नाही. याचा एकच अर्थ निघतो, की असे बोलघेवडे बुद्धीमंत निर्बुद्ध तरी असावेत, किंवा जाणिवपुर्वक दिसणारे बघायला राजी नसावेत. औरंगाबाद येथून विधानसभेत निवडून आलेले ओवायसींच्या मजलीस पक्षाचे आमदार व पुर्वाश्रमीचे एक सेक्युलर पत्रकार इम्तियाझ जलील, यांनी औरंगाबाद येथे सरकारी भूमीवर भाजपाचे दिवंगत नेते गोपिनाथराव मुंडे यांच्या स्मारकाला विरोध केला आहे. सरकारच्या जमिनीवर लोकोपयोगी प्रकल्प उभे रहावेत, असा त्यांचा आग्रह आहे. मुंडे यांना आपण आदरार्थी मानतो. पण स्मारक मात्र नको म्हणताना, लोकोपयोगी सुविधेचा विषय कसा अलगद जोडून दिला आहे. त्यांचा हा दावा लोकोपयोगी दिसणारा आहे, यात शंकाच नाही. पण त्यामागे लोकहिताचा आग्रह आहे, की धर्माचा आग्रह आहे? इस्लामच्या ज्या संकल्पना आहेत, त्यात कुणाही दिवंगत व्यक्तीचे स्मारक बसत नाही, हा धर्मवाद यामागे नाही काय? कालपरवाच इसिसने सिरीयातीन हजारो वर्षे जुन्या मुर्ती फ़ोडून टाकल्या, तीच मानसिकता जलिल यांच्या विरोधातही दिसत नाही काय?

एकेश्वरवादी इस्लाममध्ये कुठल्याही प्रतिक व मुर्तीला विरोध असतो. म्हणून दिसतील तिथल्या मुर्ती फ़ोडून टाकणे वा कुठल्या मुर्ती उभारायला प्रतिबंध असणे, ही धार्मिक भूमिका आहे. पण तशी धार्मिक भूमिका म्हणून स्मारकाला विरोध केला, तर धर्मांध ठरवले जाईल. म्हणून मग इस्पितळ बांधा, सार्वजनिक सुविधा उभ्या करा अशी पुस्ती जोडायची. मग आमचे सेक्युलरच नव्हेतर मुक्त विचाराचे उदारमतवादीही हातोहात उल्लू बनायला सज्जच असतात. जलिल यांच्या अशा भूमिकेचे थोडेसे विच्छेदन करून बघता येईल. पेट्रोलचा प्रचंड पैसा सौदी अरेबिया व अन्य तेलसंपन्न देशांच्या हाती आल्यावर त्यांनी गरीब मुस्लिम देशात काही पैसा मुस्लिम संस्थांना पुरवला आहे. त्यातून किती इस्पितळे, दवाखाने व शाळा उभ्या राहिल्या? आलेला प्रत्येक डॉलर भव्यदिव्य मशिदी उभारण्यावर खर्च झाला ना? तेव्हा याच जलिलनी मौन कशाला धारण केलेले होते? मशिदीपेक्षा सार्वजनिक सुविधा व मुस्लिम मुलांना अत्याधुनिक शिक्षण देऊन जीवनाच्या स्पर्धेत यशस्वी होण्याची साधने उभी करावी, असे आवाहन त्यांनी वा त्यांच्या पक्षाने कधी केलेले आहे काय? नसेल, तर अकस्मात त्यांना सार्वजनिक सुविधांचे स्वप्न कशाला पडलेले आहे? अशा स्मारकासाठी सरकारी तिजोरीतुन पैसा येत नाही आणि मुंडे वा अन्य कुणाच्या चहाते समर्थकांनी निधी जमा केलेला असतो. त्याचा वापर कसा व कुठे करावा, यात जलिल यांनी आपले नाक खुपसण्याचे काही कारण आहे काय? सौदी अरेबियाने पाठवलेल्या पैशातून इथल्या ट्रस्ट वा संस्थांनी मशिदी मदरसे उभारण्यापेक्षा इस्पितळे बांधून गरीब मुस्लिमांच्याच उपचाराची व्यवस्था करावी, असे कधी मजलिसने सांगितले नाही. कुणा हिंदूत्ववाद्याने तशी मागणी त्यांच्याकडे केलेली नाही. कुठल्या सेक्युलर शहाण्यालाही तशी सदबुद्धी झाली नाही. मग आताच इस्पितळाची उबळ कशाला?

एका बाजूला जलिल असली मुक्ताफ़ळे उधळणार आणि दुसरीकडे त्यांचे सर्वेसर्वा नेता असाउद्दीन ओवायसी शाळांमध्ये योग शिकवण्याला विरोध करणार. योगामध्ये सूर्यनमस्कार असतो आणि त्याला इस्लामची मान्यता नाही. म्हणून शाळेत योगाची सक्ती नसावी, हा ओवायसीचा आग्रह आहे. हा विरोध धर्मासाठी आहे ना? मुद्दा इतकाच, की शाळेत मुलांना कशासाठी प्रवेश दिला जातो? नोकरी कशासाठी दिली जाते? एखाद्या इमारतीमध्ये कुणाला वास्तव्य करण्याची जागा कशासाठी मिळते? तेव्हा धर्मसाठी प्रवेश नाकारता कामा नये. आणि धर्माकडे बघताही कामा नये. म्हणजे शाळा, नोकरी वा जागा मिळवताना जलिल वा ओवायसी यांच्या मुस्लिमांना धर्म  नसतो. एकदा ते साध्य झाले, मग त्यांचा धर्म सुरू होतो. म्हणजे ज्यांनी सुविधा उभारल्या, त्यांच्या धर्माला डावलून प्रवेश मिळायला हवा आणि तो मिळाला, मग ज्याने प्रवेश मिळवला त्याच्या धर्माचे कुठे उल्लंघन होता कामा नये. कशी उफ़राटी बाब आहे ना? शाळेत प्रवेश मिळताना तिथे होणार्‍या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी व्हायचे बंधन विधार्थ्याने व त्याच्या पालकाने मानलेले असते. मात्र त्याचा अवलंब करण्याची पाळी येईपर्यंत धर्म नसतो. जेव्हा नियम कायदे व बंधने पाळायचा प्रसंग येतो, तेव्हा मग इस्लाम हे निमीत्त करून सर्वकाही धाब्यावर बसवायची सज्जता असते. ही चतूराई नजरेआड केली, मग आपल्या भावना व श्रद्धा जपणारे सामान्य हिंदु धर्मांध होऊन जातात आणि त्यांना झोडायला तथाकथित धर्मनिरपेक्ष हातात राज्यघटनेची छडी घेऊन बसलेले असतात. पण जेव्हा तीच छडी मुस्लिमांच्या चलाखीला रोखायला उचलायची वेळ येते, तेव्हा सेक्युलर हातपाय लटपटू लागतात. हे आता सामान्य लोकांनाही कळू लागले आहे आणि त्यामुळेच मागल्या लोकसभा निवडणूकीत उलथापालथ होऊन गेली. जलिल व ओवायसी त्याला अधिक वेग देत आहेत.

इथे पुन्हा मौलाना वहिउद्दीन यांनी सांगितलेली आडमुठी भूमिका समजून घ्यावी लागेल. मुस्लिमांविषयी जगभर संशयाची व नाराजीची मानसिकता कशामुळे येत चालली आहे, त्याचे नेमके विश्लेषण त्यांनी केलेले आहे. जिथे आपण जातो आणि वास्तव्य करतो, तिथल्या निसर्ग, परंपरा व जीवनाशी एकरूप व्हायला मुस्लिम बिलकुल तयार नसतात. तिथे प्रवेश मिळण्यापर्यंत सर्व अटी मान्य केल्या जातात आणि त्यासाठी धर्म आडवा आणला जाऊ नये, असा मुस्लिमांचाच आग्रह असतो. त्याचा अर्थ असा, की इतर धर्मियांनी उभारलेल्या संस्था वा सुविधांचा लाभ मिळवताना आपला धर्म वेगळा असल्याने अडवले जाऊ नये. पण त्यांच्याच सुविधांचा वापर करताना आपला धर्म इतरांना आडवा येत असेल, तर त्यांनी निमूट सहन केले पाहिजे; असा अट्टाहास असतो. युरोपमध्ये बुरख्याचा आग्रह धरणे वा चर्चप्रणित शाळांमध्ये इस्लामी शैलीच्या वस्त्रप्रावरणांचा आग्रह कशाचे लक्षण आहे? पाऊस पडत असेल तर भिजण्यापासून बचाव म्हणून इतर कुणाच्या छत्रीत जायचे आणि तिथे घेतल्यावर आपणाला भिजवले जाते म्हणत, दुसर्‍याच्या छत्रीवरच हक्क सांगायचा, असा सगळा प्रकार आहे. ओवायसींचा शाळेत योगाचा अभ्यास घेण्य़ाला विरोध कशाला? मुस्लिमांवर सक्ती नको असे म्हणायलाही हरकत नाही. पण योगाला विरोध कशाचे द्योतक आहे? जलिल यांचा स्मारकाला असलेला विरोध त्यांच्या धार्मिक मुर्तीपूजा विरोधी (शिर्क) भावना व श्रद्धेतून आलेला आहे. मुर्तीपूजा हे इस्लाममध्ये सर्वात भीषण पाप मानले जाते. स्मारकाला घातले जाणारे हार खुपतात, त्याचीच मग जाहिर वाच्यता जलिल यांनी केलेली नाही काय? नोकरीत वा सोसायटीत मुस्लिम नको म्हटले, मग धर्मानुसार भेदभाव होतो. मग स्मारक नको किंवा योगाच नकोत, ह्या आग्रहातून जलिल व ओवायसी धार्मिक भेदभावाचाच आग्रह धरत नाहीत काय?

Saturday, June 6, 2015

बिहारमध्ये सर्वांचीच अतित्वाची लढाई



येत्या काही महिन्यात बिहारच्या विधानसभेची मुदत संपायची आहे. परिणामी त्यापुर्वी तिथल्या नव्या विधानसभेची निवड होणे आवश्यक आहे. निवडणूक आयोगाने तशी तयारी सुरू केली आहे. त्याचबरोबर राजकीय पक्षांनीही आपापली जुळवाजुळव सुरू केली आहे. कारण बिहारमधून कॉग्रेसचे एकछत्री राज्य संपुष्टात आल्यापासून तिथे कुठल्याच राजकीय पक्षाला एकहाती बहुमत व सत्ता संपादन करता आलेली नाही. कुठल्या तरी दोन वा अधिक पक्षांना निवडणूकपुर्व वा निकालानंतर सत्तेसाठी एकत्र यावेच लागले होते. मागल्या दोन निवडणूकात तिथे भाजपा व नितीशकुमारच्या संयुक्त जनता दलाची आघाडी होती व त्यांनी २००५ पासून सतत बहुमताचा पल्ला गाठला. १९८० पासून पुढल्या एका दशकात तिथे कॉग्रेसचे एकछत्री राज्य होते. पण त्याला कॉग्रेसची सत्ता म्हणण्यापेक्षा मिश्राबंधूंची सत्ता संबोधणे रास्त ठरावे. केंद्रात एल. एन. मिश्रा यांचा इंदिरानिष्ठ म्हणून दबदबा होता आणि आणिबाणीच्या काळात त्यांचे घातपाती घटनेत निधन झाल्यावर त्यांचे बंधू जगन्नाथ मिश्रा यांना बिहारची सत्ता मिळाली. त्यांना पक्षात वा राज्यात कुठले आव्हान नव्हते. पण १९८९ नंतर जी मंडलची लाट उसळली, त्याने बिहारची राजकीय समिकरणे कायमची बदलून टाकली. त्यातच मिश्रा यांना दिर्घकाळ चाललेली भागलपूरची दंगल आवरता आली नाही आणि मुस्लिम मतदार कॉग्रेसने कायमचा गमवला व मुस्लिम ही लालूंची दोन दशकांची मतपेढी होऊन गेली. तेव्हा सत्ता गमावल्यापासून कॉग्रेसची बिहारमध्ये जी घसरगुंडी सुरू झाली, त्यातून त्या पक्षाला कधी सावरताच आले नाही.  सहासात वर्षापुर्वी कॉग्रेसचे भावी अध्यक्ष म्हणून राहुल गांधींनी सुत्रे हाती घेतल्यापासून पक्षाला अस्तंगत होण्याची बाधा झाली. आता येऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकीत पुन्हा डोके वर काढण्याची कसरत कॉग्रेस करू बघत आहे.

खरे तर लागोपाठचा पराभव आणि पर्यायी स्थानिक नेतृत्व नसल्याने, कॉग्रेस बिहारमधून जवळपास नामशेष होत गेली. भाजपाला शह देण्याच्या राजकीय डावपेचात जे दिल्लीत झाले, ती बिहारची पुनरावृत्ती होती. लालकृष्ण अडवाणी यांची रथयात्रा रोखून लालू मोठे झाले, तरी तेव्हा भाजपाच्या पठींब्याने त्यांना सत्ता मिळालेली होती. तो पाठींबा भाजपाने तेव्हा काढून घेतल्यावर कॉग्रेसने समर्थन देऊन लालूंना सत्तेवर कायम राखले. पण आपले बिहारमधले राजकीय स्थान कॉग्रेसने कायमचे गमावले. मग प्रत्येक निवडणूकीत कॉग्रेसची शक्ती व संख्या घटतच गेली. अखेर २००४ सालात त्याच लालू व पासवान यांच्या दुय्यम सहकार्‍याची भूमिका पार पाडत कॉग्रेसने काही यश मिळवले होते. पण मागल्या विधानसभा निवडणूकीत राहुल गांधींनी तिथे तळ ठोकून पक्ष संघटना इतकी ‘सामर्थ्यशाली’ बनवली, की स्वबळावर राज्यातून सर्व जागा लढवण्याचा धाडसी प्रयोग केला. त्यात सर्वाधिक अनामत रकमा गमावण्याचा विक्रम कॉग्रेसच्या खाती नोंदला गेला. २४३ पैकी केवळ चार आमदार निवडून येऊ शकले. गेल्या वर्षी लोकसभेत जगजीवन राम यांच्या पुण्याईवर विजयी होणार्‍या मीराकुमारही पराभूत होऊन पक्षाचे नामोनिशाण शिल्लक उरलेले नाही. सहाजिकच विधानसभा स्वबळावर लढायचा विचारही मागे पडला आहे. पण अन्य कुणा समविचारी पक्षाच्या मदतीने लढणेही अशक्य झालेले आहे. कारण नव्या परिस्थितीत नितीश व लालूंची दोस्ती झाली असून, त्यांनी कॉग्रेसला नगण्य जागा देऊ केल्या आहेत. त्यावर समाधान मानले तर आहेत त्यापेक्षा एकदोन आमदार वाढतील. पण कॉग्रेस राष्ट्रीय पक्ष म्हणून बिहारमध्ये मिरवू शकणार नाही. म्हणूनच मग स्वबळावर नाही तरी नितीश वा लालू यापैकी एकाशी संगनमत करून लढायचे डावपेच कॉग्रेस लढवत आहे. पण ते बोलण्याइतके सोपे काम नाही. कारण लालू व नितीश यांची आधीच आघाडी झालेली आहे.

लोकसभेत दोघांना दणका बसल्यावर घाईगर्दीने नितीश यांनी लालूंशी दोस्ती केली आणि नंतरच्या पोटनिवडणूकात भाजपाला शह देऊन दाखवला होता. तिथून मग य जुन्या दुष्मनांची जवळीक सुरू झाली. नितीशना पुन्हा मुख्यमंत्री होतानाही लालूंनी मदत केली. अधिक जुन्या जनता परिवारातले विखुरलेले विविध गट एकत्र आणायची प्रक्रियाही सुरू झाली. मात्र अजून त्याला फ़ळ आलेले नाही. तत्वत: जुन्या जनता दलाचे सर्व गट एकत्र यायला तयार असले, तरी खरोखरच एकत्र येण्याची त्यांची ‘तयारी’ दिसत नाही. निदान बिहार विधानसभा निकाल लागेपर्यंत तरी त्यात यश मिळणार नाही. सहाजिकच आजच्या स्थितीत नितीश व लालू यांना आपापल्या पक्षाच्या बळावर जागावाटप करून मोदी लाट थोपवण्याचे आव्हान पेलायला हवे आहे. मात्र हे जागावाटप सुखनैव होण्याची चिन्हे नाहीत. लालू समसमान वाटपाला राजी नाहीत. लोकसभेच्या मतदानात जिथे लालूंच्या राजदला अधिक मते असतील, त्या जागा आपल्या असा लालूंचा दावा आहे. तो मानला तर नितीशना फ़ार जागा शिल्लक उरत नाहीत. म्हणूनच नितीशना अधिक वाटा हवा आहे. शिवाय नितीशनाच मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून पेश करण्याचा त्यांच्या पक्षाचा आग्रह आहे. पण लालूंना निकालापुर्वी नेत्याचे नाव घोषित करायची घाई नको आहे. थोडक्यात मोदी वा भाजपाला रोखण्यात एकमत असले, तरी आपल्यातला दुसरा पुढे जाऊ नये याची अधिक फ़िकीर या दोघा जुन्या लोहियावादी मित्रांना सतावते आहे. सहाजिकच त्यांच्यात बिनसले असेल, तर अधिक वितुष्ट यावे आणि नितीशनी लालूंपेक्षा कॉग्रेसशी जागावाटप करून दोघात वाटणी व्हावी, अशी कॉग्रेसची रणनिती आहे. त्यामुळे नितीशना मोठा वाटा मिळू शकेल. पण कॉग्रेसलाही ४३ पेक्षा अधिक जागी उमेदवार उभे करता येतील. ते सगळे जिंकणार नसले, तरी त्यातून पक्षाला नवी उभारी येण्य़ाची प्रक्रिया सुरू होईल अशी अपेक्षा आहे.

लालूंच्या अराजकाला रोखण्यासाठी सेक्युलर मुखवटा बाजूला ठेवून नितीशनी भाजपाशी युती केली होती. पण मोदीद्वेष विकोपाला जाऊन त्यांनी आपलेच बिहारमधील वर्चस्व नामशेष करून घेतले. मागल्या लोकसभेत २० खासदार असलेला नितीशचा पक्ष एनडीएमध्ये दुसर्‍या क्रमांकाचा मोठा पक्ष होता. एनडीएत असते तर आजही लोकसभेत तसेच चित्र राहिले असते आणि भाजपाला बिहारमध्ये मोठा पक्ष होण्याची शक्यताच नाकारली गेली असती. नितीशची लोकप्रियता निदान बिहारमध्ये झाकली मूठ राहिली असती. पण हवेची दिशा ओळखून ती संधी पासवान यांनी साधली व नितीश मुख्यमंत्री असूनही राजकीय अडचणीत सापडले. मागल्या दहा वर्षात कमावलेली राजकीय शक्ती त्यांनी मागल्या दिड वर्षात उतावळेपणा करून गमावली आणि आता कॉग्रेस त्याच अगतिकतेचा लाभ उठवून आपला जिर्णोद्धार करायची संधी शोधत आहे. भाजपा जिंकायला नको असला, तरी आपल्या जीवावर शिरजोर झालेल्या लालू व अन्य सेक्युलर पक्षांना रोखण्याचाही विचार कॉग्रेस करते आहे. मात्र त्यासाठी नितीश व लालू यांच्यात कायमचे बिनसले पाहिजे. निदान त्यांच्यातले जागावाटप फ़िसकटले पाहिजे. त्याचा लाभ भाजपाला मिळणार हे कॉग्रेसलाही कळते. तरीही आपल्या पक्षाचे पुनरुज्जीवन हा कॉग्रेससाठी प्राधान्याचा विषय आहे. म्हणूनच तोंडाने सेक्युलर मतांची विभागणी नको असली भाषा कॉग्रेसनेते बोलत असले, तरी त्यांचे प्रयास लालू-नितीश यांच्यात बेबनाव अधिक विस्तारीत होण्याच्या दिशेने चालू आहेत. शिवाय लालू व राहुल यांच्यातील शत्रूत्व लपलेले नाही. लालूंना वाचवण्यासाठीच युपीएने काढलेल्या अध्यादेशाला जाहिरपणे फ़ाडून राहुलनी प्रत्यक्षात लालूंना निवडणूकीच्या राजकारणातून बाद केले, ही वस्तुस्थितीही बोलकी आहे. राजकीय सक्तीमुळे हे सेक्युलर एकत्र यायची भाषा बोलत असले, तरी मोदी विरोधात कितपत त्यांची मैत्री अखेरपर्यंत टिकेल याची शंकाच आहे.

Thursday, June 4, 2015

वटवट सावित्रीचे पुरोगामी व्रतवैकल्य



मागले दोनतीन दिवस वटसावित्री या सणाच्या निमीत्ताने सोशल मीडियावर बरीच उलटसुलट मते व्यक्त झाली. अर्थात ज्यांना पुरोगामी वा पुढारलेले म्हणून मिरवायचे असते, त्यांना इतकी उत्तम संधी अन्य कुठली मिळणार? म्हणूनच अशी हिंदू सणाची टिंगल उडवण्यात तत्सम लोकांचा पुढाकार होता. काळाबरोबर जग बदलत असते आणि जुन्याच्या जागी नवी पाखंडे व थोतांडे उदयास येत असतात. मग नव्या पाखंडांना आपले बस्तान बसवण्यासाठी जुन्यांची पाळेमुळे खणून काढावीच लागतात. त्याचा अर्थ नव्या समजूती वा चालीरिती मोठ्या उपयुक्त असतात असे अजिबात नाही. उलट तेही जुन्याच निरूपयोगी निरर्थक व्रतवैकल्याचे आधुनिक स्वरूप असते. अगदी सतीसावित्री म्हणावी, इतक्या निष्ठेने त्याचे पालन करणार्‍या पुरोगामी पतिव्रताही आपल्यात उजळमाथ्याने वावरत असतात. आपल्याला डोळसपणे त्यांच्याकडे बघता यायला हवे. वटसावित्रीचे व्रत म्हणजे तरी काय असते? तर सावित्रीने आपल्या पतीला यमराजाच्या तावडीतून सहीसलामत बाहेर काढल्याची कथा. मग तिच्यासारखेच आपणही पतिशी एकनिष्ठ असल्याची जगाची व स्वत:ची समजूत घालण्यासाठी केलेले औपचारिक कृत्य म्हणजे वटसावित्रीचे व्रत. त्यात मग वडाच्या झाडाला पुजणे, त्याला प्रदक्षिणा घालून आणखी काही उद्योग करणे. यातून सात जन्म तोच पती मिळण्याची अपेक्षा बाळगणे. पुढल्या जन्मात काय होणार किंवा पुढला जन्म आहे किंवा नाही, याची कोण हमी देऊ शकतो? विज्ञानाने ते सिद्ध होत नाही. मग त्याची टवाळी होणारच. आणि टवाळी केल्याने आपण पुढारलेले वा विज्ञानवादी असल्याचे सिद्ध होते. मग मनात कितीही शंका असोत किंवा श्रद्धा असोत. सगळेच मोठ्या तावातावाने असे वागत व दाखवत असतात. विज्ञानाने सर्वच गोष्टी कुठे सिद्ध होत असतात? कित्येक पुरोगामी श्रद्धा व समजूती वटसावित्री इतक्याच भ्रामक असतात ना?

वटसावित्रीचे व्रत करणारे मुर्ख कशामुळे असतात? तर मागला जन्म वा पुढला जन्म असतो, असे अजून तरी विज्ञानाने सिद्ध केलेले नाही. सिद्ध होणे म्हणजे तरी काय असते? ज्या काही कल्पना असतात वा आग्रहाने मांडल्या जात असतात, त्या प्रयोगाने व अनुभवाने दाखवून देता येतात. ज्याचे परिणाम वास्तवात दाखवून देता येतात, तेव्हा ती गोष्ट सिद्ध झाली असे मानले जाते. म्हणूनच त्याला विज्ञान मानले जाते. पण अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांचा आधुनिक म्हणून आग्रह धरला जातो, पण त्या कधीच सिद्ध होऊ शकलेल्या नाहीत. जगातल्या कामगारांना एकत्र करण्याच्या घोषणा व प्रयोगाला शंभरापेक्षा अधिक वर्षे उलटून गेली. कामगारांचे राज्य अशी कल्पनाही राबवून अपेशी ठरल्याचे आपण बघितले आहे. मग सात जन्म तोच पति मागणारी कल्पना जिकती भाकड, तितकीच समाजवाद वा कामगारांचे राज्य ही कल्पना भाकड नाही काय? आपण सांगतो तेच सत्य असल्याचा जनमानसावर प्रभाव पाडणार्‍या गोष्टी सत्य म्हणून स्विकारल्या जातात आणि त्यांचा प्रभाव फ़िका पडू लागला, मग त्या भाकड होतात. वटसावित्रीचे व्रतवैकल्य आणि समाजवादी व्रतस्थ लोकांचे वागणे, यात मग कितीसा फ़रक शिल्लक उरतो? पण वटसावित्रीचे व्रत जितक्या आग्रहाने व निष्ठेने आजही अनेक महिला पाळतात किंवा त्यांचे समर्थन जितके लोक करतात, तितकेच फ़सलेल्या समाजवादी विचारांचे समर्थन पदोपदी आपल्या अनुभवास येत नाही काय? मग दोन गोष्टीमध्ये कशाला आधुनिक व पुढारलेले म्हणायचे आणि कशाला कालबाह्य ठरवायचे? मागल्या दोनतीन दशकाचा अनुभव काय सांगतो? फ़ुले अंबेडकरांचा महाराष्ट्र असे सतत कानीकपाळी ओरडले जात असते आणि त्याच राज्यात आजही जातीपातीच्या नावाने अन्याय अत्याचार चालू असतात. त्याच्याशी लागेबांधे असणारेच व्रतस्थ पुन्हा तीच फ़ुले आंबेडकरांची जपमाळ ओढत नसतात काय?

मग वडाच्या झाडाला ठरल्या दिवशी प्रदक्षिणा घालणार्‍या महिला आणि ठरल्या दिवशी फ़ुले आंबेडकरांच्या स्मारकाला भेटी देऊन श्रद्धांजली अर्पण करणार्‍यांमध्ये कितीसा फ़रक असतो? ज्यांचे सगेसोयरे वा निकटवर्तिय असे दलित पीडितांवर अन्याय अत्याचार करतात, त्यांच्याच तोंडी फ़ुले आंबेडकरांचा नामजप चालू असतो, त्याला काय म्हणायचे? गेल्या दोनचार वर्षात महाराष्ट्रामध्ये जितके दलित अत्याचार घडले, तो अनुभव काय सांगतो? ज्याप्रकारे जातीअंताची लढाई चालू होती, ती काय साध्य करू शकली? संघर्षाचे प्रकार व पद्धतीत निदान बदल करायची भूमिका तरी पुढे येऊ शकली आहे काय? अशा घटना घडतात, तेव्हा शरमेने मान खाली गेली असे सांगितले जाते आणि पुढे काहीच होत नाही. मग अशा पिडीतांना घरी जाऊन भेटणे, न्यायाची आश्वासने देणे, खपवून घेतले जाणार नाही अशा वल्गना करणे, हा एक व्रतस्थ उपचार झालेला नाही काय? याच जन्मात न्याय देण्याच्या वल्गना खोट्या ठरतात आणि आणखी अन्याय अत्याचार होत रहातात, तेव्हा संघर्षाचा मार्ग व उपाय कुठेतरी फ़सलेले असतात. त्याचा फ़ेरविचार करायची इच्छा होत नाही आणि त्याच फ़सव्या भ्रामक गोष्टींचा नामजप चालू रहातो, तेव्हा विकृत मानसिकताच दिसून येते. वडाला प्रदक्षिणा निरर्थक असेल, तर विविध स्वरूपाची कालबाह्य आंदोलने व संघर्ष कशाचे लक्षण आहेत? दहाबारा वर्षे गुजरातच्या दंगलीचे निमीत्त करून जो अतिरेक झाला, त्याचे विपरीत परिणाम मतदानातून पुरोगामी राजकारणाला भोगावे लागले आहेत. पण म्हणून त्यातली निरर्थकता शोधण्याचा तरी प्रयास झाला आहे काय? तितक्याचा आस्थेने व निष्ठेने पुरोगामी आपल्या व्रताचे पालन करताना दिसत आहेत. कित्येक वर्षाच्या वटसावित्री व्रताने कुठल्या पतिव्रतेला आपल्या कॅन्सरग्रस्त वा असाध्य आजारी पतीला जीवदान देणे शक्य झालेले नाही. त्यापेक्षा पुरोगामी मुर्खपणा भिन्न आहे काय?

शेकडो उदाहरणे देता येतील. जिथे महिलांना वडाचे झाड पूजायला जवळ मिळत नाही, तिथे विकतची वडाची फ़ांदी आणून व्रताची सांगता केली जात असते. वास्तविक ते झाड इतकेच पवित्र दैवत असेल, तर त्याची तोड होता कामा नये. पण व्रतस्थांच्या श्रद्धा जेव्हा अतिरेकाच्या आहारी जातात, तेव्हा दैवताचीही खैर नसते. जितके हे श्रद्धाळूंच्या बाबतीतले सत्य आहे, तितकेच ते पुरोगामी असण्यातले सत्य आहे. तिथे पुजाअर्चा औपचारिकरित्या पार पाडली जाते आणि इथेही तितकीच औपचारिकता दिसून येईल. आपण पुरोगामी आहोत म्हणजे जे काही हिंदू असेल त्याच्या विरोधात उभे राहिले मग फ़ेअर एन्ड लव्हलीच्या गोरेपणा इतके झटपट पुरोगामीत्व मिळत असते. म्हणून मग वटसावित्री वा तत्सम कशाची तरी टवाळी हा सोपा मार्ग झाला आहे. पण जितके हास्यास्पद असा व्रतांना मानले व ठरवले जाते, तितक्यच निष्ठेने आपापली पुरोगामी व्रते संभाळली जात असतात. ‘आम्ही सारे दाभोळकर’ वा ‘आम्ही सारे पानसरे’ अशा घोषणा देणारे तारखा व तिथी पाळतात आणि एक उपचार पुर्ण करतात. पुढे काय होते? खरेच हे सगळे दाभोळकर असते, तर पानसरेंची हत्या होऊच शकली नसती. म्हणजेच दाभोळकरांच्या हत्येनंतर उपचार म्हणून संघर्ष झाला आणि पानसरेंचा बळी जाऊ शकला. एका हत्येपासून धडा घेऊन काहीही उपाय शोधले गेले नाहीत, तर पानसरे मारले जाणारच. कारण त्यांना न्याय देणे वा त्यांच्या मारेकर्‍यांना शोधण्याची इच्छाच कुणाला नव्हती. त्या निमीत्ताने करायचे औपचारिक राजकारण मात्र साजरे झाले, जशा वडाला प्रदक्षिणा घालून सण साजरा व्हावा. त्यातून काही निष्पन्न होणार नाही, याची खात्री असते. पण देखावा करावा लागतो. जुनी व्रतवैकल्ये आणि नवी व्रतवैकल्ये यातला फ़ोलपणा व त्यातली अंधश्रद्धा जशीच्या तशी एकजिनसी व समामधर्मीच आहे. वटसावित्री करणार्‍या निमूट असतात आणि पुरोगामी व्रतस्थ बोलघेवड्या वटवटसावित्री असतात.

एक सेक्युलरच मुस्लिमांचे दोष दाखवतो




मिसबाह काद्री व झीशान खान यांच्या निमीत्ताने एबीपी माझावर जी चर्चा रंगली, त्यात माजी कॉग्रेसनेते व माजी आप कार्यकर्ते अजित सावंत सहभागी झाले होते. आपल्या सेक्युलर भूमिकेसाठी ते ओळखले जाते. नेहमी हिरीरीने सेक्युलर भूमिका मांडणार्‍या सावंतांनी त्याच दिवशी ‘लोकसत्ता’मध्ये एक लेख लिहीला असल्याचे स्मरण संयोजक प्रसन्ना जोशी यांनी करून दिले. पण त्या दिवशीच्या चर्चेत सावंत यांनी प्रस्थापित सेक्युलर प्रतिमेला धक्का देणारी स्पष्ट भूमिका मांडली. मुस्लिम समाजाविषयी जनमानसात वा एकूणच हिंदू समाजात संशयाची भावना कशामुळे वाढीस लागली आहे, त्या दुखण्यावर सावंत यांनी नेमके बोट ठेवले होते. रमझान वा शब्बे बारात अशा निमीत्ताने मुस्लिमबहुल भागात जो धिंगाणा चालतो, त्याचा उल्लेख त्यांनी केला. तशाच काही गोष्टी मांडल्या. जेव्हा अशा रितीने मुस्लिम गुंडगिरी होते व परिसरातील लोकांना त्याचा त्रास होतो, तेव्हा कोणी मुस्लिम नेता त्याला पायबंद घालायला पुढे येत नाही. मग पर्यायाने इतरांच्या मनात मुस्लिमांविषयी पुर्वग्रह तयार होतो. झीशान व मिसबाह त्याच पुर्वग्रहाचे बळी आहेत. अशी भूमिका सावंत यांनी समर्थपणे मांडली. सेक्युलर म्हणून ओळखल्या जाणार्‍या कोणाहीकडून अशी अपेक्षा कधीही केली जात नाही. पण आता त्यातलेही अनेकजण सावंत यांच्याप्रमाणे स्पष्टवक्तेपणा पत्करू लागलेत, हा सेक्युलरांसाठीच धोक्याचा इशारा आहे. आपला सेक्युलर मुखवटा फ़ार काळ टिकवणे कसे अवघड होत चालले आहे, त्याचीच साक्ष सावंत यांच्या नव्या भूमिकेतून समोर आलेली आहे. आपली बहुसंख्या असलेल्या भागात मुस्लिम कसे दादागिरी करतात आणि जमाव होऊन अंगावर येतात, तेच सावंत यांनी मांडले. तेच वास्तव आहे. त्यातून मग मुस्लिम विरोधातले पुर्वग्रह वाढलेले आहेत. पण त्यातले सत्य बघण्यापेक्षा प्रसन्नाने त्याला कलाटणी देण्याचा केलेला प्रयास निंदनीय होता.

रमझान व शब्बे बारातच्या गोंधळाबद्दल बोलायचे असेल, तर शिवाजीपार्कला ६ डिसेंबरला होणारा प्रकार व गणेशोत्सवातला गदारोळ यावरही बोलावे लागेल; अशी त्या चर्चेला कलाटणी देणे म्हणजे वडाची साल पिंपळाला लावणे होय. कारण गणेशोत्सवात किंवा महानिर्वाणदिनी होणारी गर्दी कोणाच्या अंगावर जात नाही, की हल्लागुल्ला करीत नाही. त्या गर्दीमुळे स्थानिक रहिवाश्यांचे जीवन विस्कळीत व प्रभावित होते, यात शंका नाही. पण आपली गर्दी व बहुसंख्या आहे, म्हणून अकारण कुरापती काढण्याचा प्रकार दोन्ही प्रसंगी होत नाही. अजित सावंत यांनी दिलेले उदाहरण बोलके व स्पष्ट होते. रमझान व शब्बे बारातच्या निमीत्ताने मुस्लिम तरूण बेफ़ाट वेगाने मोटरसायकली पळवून पादचारी व नागरिकांना हैराण करण्याचा खेळ करतात, हा मुस्लिमबहुल परिसरातील अनुभव आहे. त्याला गुंडगिरी वा झुंडशाही असेच नाव आहे. उत्सवाची गर्दी झुंडशाही वा गुंडगिरी नसते. म्हणूनच त्याला त्रास म्हणता येईल. पण गुंडगिरी वा अन्याय अत्याचार म्हणता येत नाही. आणि त्याच कारणास्तव परिसरात मुस्लिम सण उत्सव नकोत, असे कोणाला वाटले तर त्याला दोष देता येत नाही. कारण मुस्लिम बुजूर्ग वा नेते अशा बेतालपणाला, माथेफ़िरूंना पायबंद घालत नाहीत, असा मुद्दा सावंत यांनी मांडला होता. त्यांच्यासारख्या जबाबदार कार्यकर्त्याला सेक्युलरपणावर शंका घेतली जाईल, हा धोका पत्करून इतके बोलायची पाळी कशामुळे आलेली आहे? त्याचे गांभिर्य प्रसन्ना सारख्या पत्रकाराने ओळखले पाहिजे. कुठेतरी अतिरेक व माथेफ़िरूपणाला पाठींबा देणे थांबले पाहिजे, असे सावंतनाही वाटू लागले आहे. कुठलेही खापर नेवून भाजपा वा संघाच्या माथ्यावर फ़ोडून भागणार नाही, याची प्रामाणिक जाणिव त्यातून स्पष्ट होते. सावंत यांच्यासारखे संघाचे वा मोदी भाजपाचे कट्टर विरोधक अशी भाषा का बोलू लागलेत?

अजित सावंत यांच्यासोबत त्या कार्यक्रमात भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये सहभागी झालेले होते. पण त्यांनी नव्हे इतकी मुस्लिमाच्या दोषपुर्ण वर्तनाची नेमकी मांडणी सावंत यांनी त्या दिवशी केली. ती करताना त्यांच्या चेहर्‍यावर कुठलाही आनंद नव्हता, इतका विषाद होता. आपण आजवर मुस्लिमांची पाठराखण केली, त्यातून गैरलागू वागणार्‍यांना प्रोत्साहन तर दिले गेलेले नाही ना, याचे वैषम्य त्यातून लपत नव्हते. पण आपल्या प्रामाणिक सेक्युलर भूमिकेची साक्ष सावंत यांनी दिली हे मानावे़च लागेल. त्याला महत्व एवढ्यासाठी आहे, की चुक असेल ती दाखवणे व सुधारण्यासाठी प्रयत्न करणे अगत्याचे असते. सावंत यांनी मुस्लिमांच्या चुकांवर बोट ठेवले, तेव्हा त्याची दुसरी बाजू समजून घ्यावी लागेल. जेव्हा असा एकतर्फ़ी सेक्युलर पवित्रा घेतला जातो, तेव्हा मुस्लिमातल्या माथेफ़िरूपणाला उत्तेजन दिले जात असते आणि त्यातून काही मुले शेफ़ारतात. त्यांच्याकडून गुंडगिरी व झुंडशाही माजवली जाते. अकारण व चुकीचे समर्थन दिल्यावर बेताल वागणे हाच आपला अधिकार आहे अशी चुकीची समजूत तयार होत असते. ज्यांच्याकडून असा माथेफ़िरूपणा होतो, त्याचे तेही बळी असतात. कुणीतरी फ़ालतूगिरीला पाठिशी घातल्याने त्यांच्याकडून असे होत असते. उतावळ्या एकतर्फ़ी सेक्युलर थोतांडाने अशा मुठभर मुस्लिमांना चिथावण्य़ा दिल्या जातात. त्यांच्या शेफ़ारण्याने एकूण मुस्लिमांविषयी जनमानसात विपरीत मतप्रवाह तयार होतो. मुस्लिमातले बुजूर्ग त्याला रोखत नाहीत आणि सेक्युलर दिवटे त्याची पाठराखण करतात. याचा एकत्रित परिणाम मुस्लिमांविषयी वाईट पुर्वग्रह तयार होणे असाच आहे. त्याचे परिणाम मग मुस्लिमांना दूर ठेवण्यात होत जातो. नेमकी हीच बाजू सावंत यांनी नेमक्या शब्दात मांडली होती. पण मुद्दा असा, की त्यांच्यासारख्या निर्भेळ सेक्युलरावर अशी पाळी कशामुळे आली आहे?

वास्तविक त्या दिवशीच्या चर्चेत मुस्लिम गुंडांचा धिंगाणा वा दंगल असा विषय नव्हता, दोन सुशिक्षित तरूण मुस्लिमांचा विषय चर्चेला होता. त्यात सावंत यांनी असे मुद्दे कशाला आणावेत? तर एकूण मुस्लिमांविषयी जनमानस कसे होत चालले आहे, त्याची ती चुणूक होती. शिकलेला असो किंवा अशिक्षीत असो, मुस्लिम आ्पल्या परिसरात नकोत अशी धारणा वाढीस लागल्याची वेदना सावंत यांनी बोलून दाखवली. मुठभर बेताल मुस्लिमांचा माथेफ़िरूपणा व सेक्युलरांकडून त्यांचीच होणारी पाठराखण मुस्लिमांविषयी आकस व पुर्वग्रह निर्माण करत असल्याची ती वेदना आहे. सावंत यांच्यासारखा हाडाचा सेक्युलर इतके स्पष्ट बोलण्यापर्यंत आला असेल, तर राजकारणापासून अलिप्त रहाणार्‍या सामान्य हिंदूच्या मनात किती खदखद असेल, त्याची नुसती कल्पना केलेली बरी. मुस्लिम असे़च वागणार आणि त्यांची बाजू सेक्युलर घेतच त्यांना डोक्यावर चढवून ठेवणार, अशी एक सार्वत्रिक मानसिकता वाढीस लागली आहे. त्याला जितका माथेफ़िरू मुस्लिम कारणीभूत आहे, तितकाच सेक्युलर भेदभावही कारण झाला आहे. मात्र त्याचे बळी सामान्य मुस्लिम ठरत आहेत. कारण जेव्हा मुस्लिमांविषयी अशी समजूत तयार होते आणि ती खोडून काढली जात नाही, तेव्हा त्याला खतपाणीच घातले जात असते. जगभर त्याचे परिणाम दिसत आहेत. अन्य देशात संघ वा हिंदूत्ववादी नाहीत. पण तिथेही मुस्लिमांबद्दल हीच भावना वाढीस लागली आहे. त्यातून बाहेर पडायचे असेल, तर मुस्लिमांना आत्मपरिक्षणाची गरज आहे. त्यात त्यांना सेक्युलर मदत करू शकतात. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे इथले सेक्युलर त्यातल्या बेतालपणाला पाठीशी घालत असतात आणि पर्यायाने मुस्लिमांची विकृत प्रतिमा जनमानसावर ठसवली जात असते. मग सावंतसारखा निष्ठावान सेक्युलरही विचलित होऊन जातो. इतरेजनांची काय कथा?

Wednesday, June 3, 2015

तोता मिरच खा गया


चार दशकांपुर्वी मनोजकुमारचा ‘उपकार’ नावाचा चित्रपट खुप गाजला होता. त्यात शेतकरी असलेल्या मनोजचा सुशिक्षित धाकटा भाऊ प्रेम चोप्राने रंगवला होता. सावकाराची भूमिका करणारा  खलनायक  मदन पुरी पोपटाला मिरची भरवतानाचा मजेशीर प्रसंग रंगवला आहे. एकीकडे प्रेम चोप्राचे कान फ़ुंकत हे मिरची भरवणे चालू असते. मग एका क्षणी तो प्रेम चोप्रा तिथून तणतणत निघून जातो आणि पोपट मिरची खातो. तर खलनायक म्हणतो, ‘तोता मिरच खा गया’. त्यावर त्याचा नोकर विचारतो, मतलब क्या मालिक? त्यावर खलनायक म्हणतो, ‘मतलब, भारत के घर महाभारत’. त्यात मनोजकुमारचे नाव भारत असे दाखवले आहे आणि दोन भावातले भांडण म्हणजे महाभारत. मिसबाह व झीशान यांच्या निमीत्ताने वाहिन्यावर जे काहुर माजवले गेले आणि हिंदू समाजाला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्याचा जो सेक्युलर तमाशा रंगवला गेला; तेव्हा त्या खलनायकाचे शब्द आठवले. अशा चर्चा व ब्रेकिंग न्युजमधून दुसरे काय साधले गेले? तोता मिरच खा गया ना? आधीचे दोन लेख ज्यांनी वाचले आहेत, त्यांच्या लक्षात एव्हाना आलेच असेल, की झीशान खान याने फ़क्त मुस्लिमांवर अन्याय होते असे नाही, तर हिंदूनाही या देशात भेदभावाची वागणूक मिळते, याची ग्वाही दिलेली आहे. म्हणजेच त्याच्या मनात हिंदूविषयी कुठले किल्मीष नाही किंवा त्याच्या मित्रांच्या मनात मुस्लिमांविषयी कुठली अढी नाही हे सिद्ध होते. मिसबाहचे प्रकरणच निव्वळ कांगावा होता आणि तिचा संधीसाधू सेक्युलर अजेंडाने बळी घेतलेला आहे. मग सवाल इतकाच उरतो, की अशा गोष्टींचे सेक्युलर शहाणे इतका गाजावाजा कशाला करतात? त्यांना दोन भिन्न समाजात सौहार्द निर्माण करायचे असते, की त्यांच्यात द्वेष भावना रुजवून हिंसाचार माजावा असा सेक्युलर अजेंडा आहे? निदान पुरावे तरी तसेच समोर येतात.

मिसबाहने ज्या इमारतीमध्ये मुस्लिम म्हणून जागा नाकारल्याचा दावा केला, तिथे आधीपासून दोन मुस्लिम कुटुंबे गुण्यागोविंदाने नांदत असल्याचे मिड-डे वृत्तपत्रानेच पुराव्यानिशी सिद्ध केले आहे. मग त्या इमारतीसह एकुणच बिल्डर व इमारतीच्या रहिवाश्यांबद्दल असे खोटेनाटे काही पसरवण्याचा माध्यमांचा कुठला पवित्र हेतू असू शकतो? काही जागी असा भेदभाव नक्कीच होतो आणि तो धर्मापेक्षा शाकाहारी व मांसाहारी लोकांमधला वाद आहे. त्यात कुठेही धर्माचा लवलेश नाही. जैन प्राबल्य असलेल्या अनेक भागात मांसाहारी हॉटेलांची संख्या घटत चालली आहे. त्यावरून अगदी हिंदू असलेल्या मांसाहारींनीही तक्रारी केलेल्या आहेत. त्याला धर्माचा रंग यातून चढवण्याचा उपदव्याप माध्यमांनी केलेला नाही काय? योगायोगाने त्यात हिरीरीने भाग घेणारे बहुतेक लोक सेक्युलर म्हणून मिरवणारे आहेत. मिसबाहने आपली तक्रार सोशल मीडियातून मांडली होती, तिला कायद्याच्या कचाट्यात पकडण्याचे डावपेच सेक्युलर म्हणवणार्‍यांनी केले. मग आपल्या माध्यमातील दोस्तांच्या सहकार्याने त्याचा देशव्यापी गाजावाजा घडवून आणला. पण त्याची शक्यता लक्षात घेऊन संबंधित व्यक्तीने आधीच पोलिसात मिसबाहच्या विरोधात वर्दी देऊन ठेवलेली असल्याने सेक्युलर थोतांड पुरते उघडे पडले. मात्र त्यातले खरे दोषी माध्यमकर्ते चव्हाट्य़ावर आले. गंमत याची वाटते, की आपला बाप मरून पडला तरी जितका आक्रोश केला नसता इतका त्यांचा टाहो, थक्क करून सोडणारा आहे. उदाहरणार्थ एबीपी माझा वाहिनीवरील चर्चेचा तर उत्साह ओसंडून वहात होता. पण यांचाच बाप अडीच वर्षापुर्वी तिथे आझाद मैदानात मरून पडला होता, तेव्हा त्यांच्या तोंडातून हुंदकाही निघालेला नव्हता. बाकी कोणाला नाही तरी एबीपीवाल्यांना आपल्या जखमा आठवायला नको काय? ऑगस्ट २०१२ मध्ये काय घडले होते आझाद मैदान परिसरात?

म्यानमार देशात मुस्लिमांवर अन्याय अत्याचार होतात म्हणून रझा अकादमीने एक मोर्चा काढला होता. त्यासाठी जमा झालेल्या मुस्लिम तरूणांनी आसपासच्या बसेस वहाने पेटवून दिलेली होती. महापालिकेने उभारलेल्या अमर जवान ज्योती स्मारकाची मोडतोड केली होती. चित्रण करणार्‍या पत्रकारांना यथेच्छ झोडपले होते. त्यातच मग एबीपी नेटवर्कची एक ओबीव्ही गाडीही जाळून भस्मसात केलेली होती. तेव्हा त्या मुस्लिम दंगलखोरी व हिंसाचाराबद्दल ‘माझा’वर कितीशी चर्चा झाली होती? किती अश्रू ढाळ्लेले होते? तिथे जे काही झाले, त्यात महिला पोलिसही सुटल्या नव्हत्या. त्यांचे विनयभंग झाले असे ‘सभ्य भाषेत’ सांगितले गेले. त्याचा अर्थ काय होतो? तो सगळा धार्मिक उन्माद नव्हता? धार्मिक भेदभाव म्हणूनच जमावाने अशी वागणूक इतरांना दिलेली नव्हती? ज्यात मुस्लिम गुंतलेला असतो अशा हिंसेला व दहशतवादाला धर्म नसतो म्हणायचे आणि चुकून त्यात हिंदू सापडला, की धर्माचे लेबल लावायचे; ह्याला भेदभाव नाही तर काय म्हणतात? तो भेदभाव सेक्युलर माध्यमे व पत्रकार करतात. बुद्धीमंतच करतात. कोणी हिंसाचारी असा भेदभाव करत नाही. म्हणून तर दोन दगड कार्यालयावर फ़ेकले की आकाशपाताळ एक करणारे ओबीव्ही जाळली तरी चिडीचुप्प होते. की जाळपोळ चांगली असते आणि किरकोळ दगड फ़ेकणे भयावह असते असले सेक्युलर तर्कशास्त्र आहे? एबीपी माझावर चर्चा झाली त्याचे म्हणून वैषम्य वाटते. वडाची साल पिंपळाला लावण्याचाच तो प्रकार नव्हता काय? मिसबाहसाठी झुंजार झालेल्या प्रसन्ना जोशीने आपल्याच नेटवर्कची ओबीव्ही जाळली गेली, तेव्हा तितकेच शौर्य कशाला दाखवले नव्हते? मग वाटते त्यांच्यासाठी मुस्लिमांनी केलेला हिंसाचार हा शांततेचा प्रयोग असतो आणि कुणा हिंदूने शंका काढली तरी प्राणघातक हल्ला असतो. दुसरा काही अर्थ निघतच नाही ना?

मागल्या चौदा वर्षात अशाच खोट्यानाट्या प्रचार व थापेबाजीने मोदींना देशातील हिंदूसाठी तारणहार बनवण्याचा घाट घातला गेला. अशाच बिनबुडाच्या अपप्रचाराने मोदी इतके लोकप्रिय झाले, की भाजपासह संघाला त्यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार करण्याखेरीज गत्यंतर राहिले नाही. देशातील हिंदू समाज क्रमाक्रमाने सेक्युलर विचारांनी इतका भाबावलेला आहे, की त्याला अशा विचारांच्या धोक्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी मोदींना शरण जाण्याखेरीज कुठला पर्यायच राहिला नाही. लोकसभा निवडणूकीत त्याचेच प्रत्यंतर आलेले आहे. अशा ‘सेटलवाडी’ प्रचाराने मुस्लिमांना अधिक धर्मवादी बनवले आणि हिंदूंना मोदींच्या आश्रयाला जाणे भाग पाडले. त्यातून जे भाजपा सरकार सत्तेत आले आहे, तेवढ्याने सेक्युलर समाधानी दिसत नाहीत. त्यांना घटनात्मक बंधनातील मोदी वा भाजपा सरकार नको आहे. त्यांना पुर्णपणे हिंदू धर्मावर अधिष्ठीत सरकार व हिंदूराष्ट्र स्थापन करायचे आहे. ते काम भाजपा वा संघाच्या विद्यमान नेतृत्वाकडून शक्य नाही. खुलेआम हिंदूराष्ट्र स्थापनेची भाषा बोलायलाही संघ तयार नाही. मग हे कसे शक्य आहे? तर बहुतांश हिंदूमध्ये मुस्लिम व अल्पसंख्यांकाच्या विरोधात कडवे धर्मांध जनमत निर्माण करणे. मुस्लिम असे आक्रमक झाले तर भयभीत होऊन हिंदूंना आपला तारणहार शोधावा लागणारच. एकदा तितके बहुमत पाठीशी असेल, तर मोदी वा हिंदूत्ववादी घटनात्मक बदल करून भारताला हिंदूराष्ट्र घोषित करू शकतात. कारण तितके हिंदू जनमत टोकाला गेलेले असेल. आणि अशा प्रकारातून सेक्युलर तेच साधून देणार आहेत. म्हणून मिसबाह वा झीशानच्या नगण्य विषयाला इतके भडक करून पेश केले जाते. त्यातून मुस्लिमांप्रमाणे हिंदूमध्ये अधिक धृवीकरण साधले गेले पाहिजे. हाच तर सेक्युलर अजेंडा झालेला आहे. बिचारे मुस्लिम त्यात बळीचा बकरा म्हणून वापरले जात आहेत. कारण त्यांना आपल्या धर्माचे समर्थन माध्यमे करतात, यातच आनंद आहे. ‘उपकार’ चित्रपटातल्या प्रेम चोप्राप्रमाणे माध्यमांनी भरवलेली मिरची मुस्लिम खात आहेत ना? (अपुर्ण)

Tuesday, June 2, 2015

हिंदूराष्ट्राचा सेक्युलर अजेंडा



ज्यांनी मागल्या पाव शतकात कधीही एका शब्दाने दोन लाख काश्मिरी हिंदू पंडितांसाठी टाहो फ़ोडला नाही, त्यांना धर्माच्या नावाने अन्याय म्हणजे काही कळत असेल काय? असते तर त्यांनी आजवर किमान शंभर वेळा दिल्ली वा अन्य महानगरात निर्वासित होऊन दोन पिढ्या पडलेल्या काश्मिरी पंडितांच्या अन्यायाला वाचा फ़ोडली असती. पण वाहिन्या वा मुख्य प्रवाहातील तथाकथित माध्यमांनी एकदाही तसा प्रयत्न केलेला नाही. म्हणजेच त्यांना धर्माच्या नावाने भेदभाव होतो, याविषयी कसलेही कर्तव्य नाही, हे स्पष्ट होते. मग त्यांनी झीशान खान वा मिसबाह काद्री यांच्यावर धर्मामुळेच अन्याय झाल्याचा टाहो कशाला फ़ोडावा? तर असे सेक्युलर बुद्धीमंत पत्रकार मुस्लिमधार्जिणे असल्याचा सरसकट आरोप हिंदूत्ववादी करतात. त्यातही तथ्य नाही. कारण ज्यांनी झीशान वा मिसबाहसाठी आक्रोश केला, त्यांना मुस्लिमांवर होणार्‍या अन्यायाचेही दु:ख नाही. मग त्यांनी अशा गोष्टी घटनांचे भांडवल कशाला करावे? तर त्याचे उत्तर त्यांच्या राजकीय अजेंड्यामध्ये दडलेले आहे. त्यांना भाजपा, संघ वा हिंदूत्ववादी यांना झोडण्यासाठी वा आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्यासाठी काही निमीत्त हवे असते. मिसबाह वा झीशानच्या बाबतीत ते निमीत्त सापडते. मुस्लिमांवर धार्मिक भेदभाव झाल्याचा टाहो फ़ोडला, की आपोआप त्यात हिंदूत्ववादी गुन्हेगार असे गृहीत असते. मग अशा विषयाचा उहापोह करताना सहजगत्या भाजपाची सत्ता वा संघाच्या कामावर बोट ठेवले जाते आणि त्यांच्या प्रवक्त्यांना जाब विचारला जातो. तसा भेदभाव हिंदूंच्या बाबतीत झाला, तर त्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांना नेत्यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करणे शक्य नसते ना? मग हिंदूंच्या बाबतीत धार्मिक भेदभाव झाला, तर गवगवा कशाला करायचा? उलट यासाठी मुस्लिम ख्रिश्चनांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करावे लागेल ना?

थोडक्यात अशा घटना खर्‍या असोत वा खोट्या असोत, त्यात मुस्लिम ख्रिश्चन गुंतलेला असेल, मग टाहो फ़ोडला जातो. चर्चवर दोन खडे कोणी मारले, तरी भयंकर काही घडल्याचा आक्रोश सुरू होतो आणि हिंदू मठात बॉम्ब फ़ुटला, तरी किरकोळ घटना म्हणून दुर्लक्ष केले जाते. त्यात अर्थातच मुस्लिम अतिरेकी माथेफ़िरूंना वाचवण्याचा वा मुस्लिमांची बाजू घेण्याचाही हेतू नसतो. त्यात कुठला मुस्लिम धार्जिणेपणाही नसतो. हिंदूद्वेष हा सेक्युलर अजेंडा आहे. त्यात उपयोगी म्हणून ख्रिश्चन वा मुस्लिमांना मोहरे-प्यादे म्हणून वापरले जात असते. मिसबाह, झीशान वा ज्युलिओ रिबेरो त्या़चे बळी असतात. कारण अशा गोष्टींचा गदारोळ केला, मग त्या त्या व्यक्तीच्या नावावर बिल फ़ाडले जाते. पण कंडू सेक्युलरांचा शमवून घेतला जात असतो. त्याचे जिवंत उदाहरण खुदद झीशान खानच आहे. बुधवारी ‘टाऊम्स नाऊ’ वाहिनीवरच्या कार्यक्रमात त्याचा सहभाग होता आणि त्यानेच सर्वच धर्मियांना भेदभावाची वागणूक मिळत असल्याचे ठामपणे प्रतिपादन केले होते. पण संयोजन करणार्‍या नाविका कुमारने तिकडे जाणिवपुर्वक लक्ष दिले नाही. केरळमधल्या एका कंपनीने फ़क्त ख्रिश्चन व मुस्लिमांनीच अर्ज करावेत, हिंदूंना नोकरी मिळणार नाही, अशी जाहिरात दिल्याचे झीशानने त्याच चर्चेत भाग घेताना सांगितले. पण नाविकाने तिथे कणाडोळा केला, त्यातून लक्षात येते, की सर्व धर्मियांना भेदभावाची वागणूक मिळते असे सिद्ध होते. पण त्यामुळे संघ भाजपा सरकारला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करता येत नाही ना? मग अशा चर्चा वा गदारोळाचा सरळ साधा अर्थ काय? माध्यमांचा हिंदूविरोधी वा हिंदूत्ववाद्यांना ठोकायचा अजेंडाच यामागे नाही काय? पण त्यातून बहुसंख्य हिंदू दुखावला जातो आणि तो अधिकच मुस्लिम विरोधात विचार करू लागतो. मुस्लिम द्वेषाला खतपाणी त्यातून घातले जाते.

कुठल्याही धर्मातले मुठभर लोक अशारितीने वागत असतात आणि त्यासाठी त्या धर्माच्या सर्व अनुयायांना जबाबदार धरण्याचे काही कारण नसते. पण एकाला त्या कारणास्तव आरोपी बनवले आणि दुसर्‍याच्या बाबतीत झाकपाक केली. मग पहिला दुसर्‍याचा द्वेष करू लागतो. मिसबाह व झीशानच्या निमीत्ताने तेच झाले आहे, माध्यमांनी जो बिनबुडाचा गदारोळ केला, त्यातून अधिक हिंदू लोकांमध्ये मुस्लिमांविषयी शंकेची भावना निर्माण केली गेली. संघावर किंवा हिंदूत्ववाद्यांवर तसा आरोप नेहमी होतो. पण मागल्या तीनचार दशकात सेक्युलर अजेंडामुळे हिंदूमध्ये जितकी धर्मभावना रुजवली गेली, तितकी संघाला नव्वद वर्षात साध्य झाली नव्हती. गेल्या चौदा वर्षात गुजरात दंगलीचे निमीत्त करून मोदींना मुस्लिम विरोधी व हिंदूत्ववादी ठरवण्याच्या अट्टाहासातून जितकी मते हिंदूत्ववादी होत गेली, तितकी संघाच्या प्रचारकांनाही करता आली नसती. पण चुका मान्य करून त्यापासून शहाणा होईल तो सेक्युलर बुद्धीमंत असू शकत नाही. झालेल्या चुका मान्य करायच्या नाहीत आणि त्याचीच पुनरावृत्ती करत रहाणे, हा सेक्युलर स्थायीभाव असतो. मागल्या पाव शतकात भाजपा व त्याचा हिंदूत्ववाद संपवण्याचे जे मुर्ख प्रयास झाले, त्यातून जुने सेक्युलर पक्ष नेस्तनाबुत होऊन गेले आणि तरीही त्याचीच कास धरणार्‍या कॉग्रेसचाही अखेर धुव्वा उडाला. त्याला मोदींची लोकप्रियता, भुरळ घालणारी भाषणे वा भव्यदिव्य आश्वासने कारणीभूत झालेली नाहीत; इतका सेक्युलर पुरस्कृत हिंदुत्ववाद यशस्वी झालेला आहे. आता मोदींनी ऐतिहासिक यश मिळवल्यानंतर तरी कुठे काय चुकले त्याची मिमांसा होऊन चुका सुधारल्या जातील अशी किमान अपेक्षा होती. पण मागल्या दोनचार महिन्यात पुन्हा तेच सेक्युलर भुत बाटलीतून बाहेर काढण्यात आले आहे आणि त्यातून हिंदूराष्ट्र स्थापन होण्यापर्यंत बहुसंख्य समाजाला घेऊन जाण्याचा चंग बांधलेला दिसतो.

एखाद्या कंपनीने झीशानला मुस्लिम म्हणून नोकरी नाकारली असेल, पण त्याचवेळी त्याच्या अन्य दोन हिंदू मित्रांनी मिळालेली नोकरी मुस्लिम मित्रासाठी नाकारली, हे सुद्धा सत्य आहे. भारतातील बहुतांश हिंदू धर्मवादी नसल्याचा तो सर्वात सज्जड पुरावा आहे. तेव्हा यातली हिंदु-मुस्लिम जवळीक दाखवून दोन समाजात असलेली विभक्ती संपवण्याला प्राधान्य द्यायला हवे होते. कारण तेच वास्तव आहे. हजारो वर्षे धर्माचा अडसर न मानता दोन्ही समाज एकत्र गुण्यागोविंदाने नांदले आहेत. त्याचाच ताजा पुरावा तीन मित्रांनी दाखवला होता. पण त्याला झाकून अपवाद असलेल्या एका कंपनीचा इतका गाजावाजा करण्यात आला, की असा भेदभाव न मानणार्‍या अनेक हिंदू लोकांना अशा गदारोळाने पुनर्विचार करायला भाग पाडले आहे. त्याची प्रचिती त्यानिमीत्ताने झालेल्या चर्चेतही बघायला मिळाली. तो स्वतंत्र लेखाचा विषय आहे. कुठल्याही संवादाची सुरूवात मतभेद असलेल्या विषयापासून होत नाही. संवाद साधायचा असतो, तेव्हा वादाचे विषय बाजूला ठेवून सामंजस्य साधले जाईल असे विषय पुढे आणायचे असतात. त्यातून जसा संवाद सरकत जातो, तसे वादाचे व मतभेदाचे विषयही सोडवायला मदत होऊ शकते. पण असे दिसेल की शक्य तो विवाद माजेल व मतभेद विकोपास जातील, अशाच दिशेने माध्यमाच्या चर्चा व बातम्या पुढे आणल्या जात असतात. त्यासाठी मग मिसबाहचा कांगावा इतका रंगवला जातो, की तो खोटा पडल्यावर अवघ्या मुस्लिम समाजाकडे संशयाने बघितले जाते. पण यातला खरा गुन्हेगार माध्यमे व त्यातले पत्रकार आहेत. खरे तर मिसबाहच्या कांगाव्याला इतके राष्ट्रीय समस्या म्हणून पेश करणार्‍या माध्यमांनी त्यासाठी माफ़ी मागायला हवी. कारण त्यांनी नुसत्या एका इमारतीच्या रहिवाश्यांना बदनाम केलेले नाही, तर अवघ्या हिंदु समाजाला अपमानित केलेले आहे. (अपुर्ण)

Monday, June 1, 2015

मिसबाह काद्रीचा मिसकॉल



(लेखांक पहिला)

कोणीतरी विनोदाने म्हटलेले आहे की मोबाईल फ़ोनचा शोध कुठल्याही देशाने लावलेला असो, मिसकॉलचा शोध मात्र भारताने लावलेला आहे. बहुधा सोशल मीडियातला हा विनोद असावा. अनेक चतूर लोक त्याचा तंत्र म्हणून वापर करतात. कारण मिसकॉल असेल तर त्याचे पैसे भरावे लागत नाहीत. म्हणून काही शहाणे मुद्दाम आपल्याला हवा असलेला क्रमांक फ़िरवतात आणि एकदोन रिंग वाजल्या मग तोडून टाकतात. ज्याच्या मोबाईलवर असा मिसकॉल दिसतो, त्याला समोरची व्यक्ती ठाऊक नसेल तर तो उतावळेपणाने उलटा फ़ोन लावतो आणि होणार्‍या संभाषणाचे पैसे त्याच्या खात्यात लागू होतात. म्हणजे काम ज्याचे असते त्याला फ़ुकटात तुमच्या खर्चाने संभाषण करता येते. अनेकदा तर नको असलेल्या जागी तुम्ही फ़ोन करून गोत्यात येऊ शकता. समोरची व्यक्ती तुमच्यावर फ़ोनवरून धमक्या दिल्याचाही आरोप करू शकते. मिसबाह काद्री नावाच्या मुलीने नेमका तसाच प्रकार भारतीय माध्यमांच्या बाबतीत केला म्हणायला हरकत नाही. आपल्याला मुस्लिम असल्यानेच मुंबईत जागा नाकारली गेल्याची हुल या चलाख मुलीने दिली आणि बघता बघता माध्यमातले शहाणे मिसबाहला डोक्यावर घेऊन नाचू लागले. जगाच्या पाठीवर भारतातल्या टिव्ही पत्रकारांइतके नंबरी मुर्ख कुठे नसावेत. अन्यथा इतका भयंकर विकृत मुर्खपणा मुख्य प्रवाहातील माध्यमांकडून कशाला झाला असता? सगळीकडून काहूर माजवण्यात आले आणि जणू मुंबईत मुस्लिमांवर केवळ धर्माच्या नावाने कसा बहिष्कार घातला जातो व भाजपाची सत्ता आल्यापासून तमाम हिंदू कसे धर्मांध होत चालले आहेत, त्याचे प्रदर्शन मांडण्याची शर्यत सुरू झाली. पण यापैकी कोणीही मिसबाहने जो मिसकॉल दिला, त्यातले तथ्य शोधण्याचा जराही प्रयत्न केला नाही. चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात, त्याचा हा आधुनिक अविष्कार होता.

दोनचार दिवस आधी झीशान खान नावाच्या एका मुस्लिम तरूणाला धर्माच्या नावाखाली नोकरी नाकारण्यात आली. त्यावरून काहूर माजले होते. त्यात नक्कीच तथ्य होते. पण जितका गदारोळ चालू होता, तितका तो प्रकार गंभीर होता काय? असे अनेक ठिकाणी होत असते आणि केवळ मुस्लिमांच्याच बाबतीत होते असे नाही, अगदी हिंदूंनाही तशी वागणूक याच भारतात मिळत असते. पिढ्यानु पिढ्या या देशात जन्मलेल्या काश्मिरी पंडितांना सामुहिकरित्या तो सापत्नभाव अनुभवावा लागत आहे. मिसबाहला तरी कोणी तिच्या मालकी हक्काच्या घरातून पळवून लावलेले नाही. अन्य कोणाच्या घरात तिला भाड्याने वास्तव्य करता आले नाही, अशी तिची तक्रार आहे. पण मागल्या पाव शतकात काश्मिरच्या खोर्‍यातून लाखो हिंदू पंडीतांना धर्माच्या नाहीतर कुठल्या कारणास्तव रहात्या पिढीजात घरातून जीव मुठीत धरून पळावे लागले आहे? या संदर्भात कुठल्या माध्यमांनी कधी सेक्युलर विचारांची हत्या म्हणून गदारोळ केला आहे काय? की हिंदूंवरील अन्याय अत्याचार अशा सेक्युलर विचारात अन्याय नसतात? की मुस्लिम बहुसंख्य असतील अशा भारतीय प्रदेशातही हिंदूंवर धर्माच्या कारणास्तव अन्याय करण्याची मुभा राज्यघटनेने दिलेली आहे? धर्मासाठी मुस्लिमांवर अन्याय होता कामा नये आणि हिंदूवर मात्र व्हायला हरकत नाही, असे घटनेच्या कुठल्या कलमात नमूद केलेले आहे? असेल तर माध्यमातल्या दिवट्या विचारवंतांनी त्याचे स्पष्टीकरण करावे. नसेल, तर त्यांनी काश्मिरी हिंदू पंडितांवर धार्मिक अन्याय म्हणून कधी गळा काढला होता, त्याचाही तपशील द्यावा. पण तो दिला जाणार नाही. कारण अशा उथळ बिनबुडाच्या सेक्युलर विचारवंतांच्या लेखी बहुसंख्य असल्याने भारतात हिंदूंना कुठलाही धार्मिक वा अन्य अधिकारच नसतो. मग त्यांच्यावर अन्याय झाल्याचे त्यांच्या चर्मचक्षूंना दिसेल तरी कसे?

सेक्युलर असणे म्हणजे मुस्लिम धर्मांध असणे वा किमान हिंदू विरोधी असणे; अशी आता एक समजूत व व्याख्या तयार झालेली आहे. सहाजिकच मिसबाहवर अन्याय झालेला नसला आणि तिने निव्वळ कांगावा केला, तरी तो अन्याय असतो आणि तिचा कांगावा हाच त्या अन्यायाचा पुरावा असतो. सहाजिकच काश्मिरी पंडीतांवर धर्माच्या कारणास्तव अन्याय होऊनही डोळ्यावर कातडे ओढून घेणार्‍यांना मिसबाहच्या कांगाव्याने खडबडून जाग येते आणि गदारोळ सुरू केला जातो. मग सेक्युलर भंपकपणाच्या अंगवळणी पडलेल्या सवयीनुसार कुठलेही सत्य तपासल्याशिवाय बोंबाबोंब सुरू केली जाते. जसा काश्मिरी पंडितावरचा अन्याय बघायचा नसतो तसाच मग मिसबाहच्या कांगाव्यातला खरेखोटेपणाही शोधायचा नसतो. अंधश्रद्धा किती भक्कम असतात हे अंधश्रद्धा निर्मूलनात रममाण झालेल्या या सेक्युलर शहाण्याच्या वागण्यातून आपल्या लक्षात येऊ शकते. अन्यथा मिसबाहने बोंब ठोकल्यावर देशातल्या शेकडो टिव्ही पत्रकारापैकी एकाने तरी वास्तव शोधण्याचे कष्ट घेतले असते ना? पण कोणीही सत्याकडे फ़िरकले नाही. बिचार्‍या मिसबाहलाही काही क्षण शंका आली असेल, आपण मुस्लिम आहोत, की टिव्हीवरचे एन्कर मुस्लिम आहेत? इतक्या पोटतिडकीने तमाम वाहिन्यांवर मातम सुरू झाला होता. पण जागा कुठली, तिथे कोण रहातो, खरे घडले काय, याकडे कोणी ढुंकून कोणी बघितले नाही. जन्मदाता बाप मेला तरी जितका टाहो फ़ोडणार नाहीत, असा आक्रोश वाहिन्या करू लागल्या होत्या. पण यातली दुसरी बाजू होती, त्या इमारतीतले रहिवासी, त्याचा बिल्डर आणि जागा नाकारणारा सदनिका मालक. त्यांचीही काही बाजू असते की नाही? ती समोर आणायचे कष्ट कोणी घ्यायचे? की त्याची काही गरज नाही. मिसबाह आरोप करते आहे आणि तिचा धर्म मुस्लिम असल्याने तिचा शब्द प्रमाण मानून कोणालाही फ़ाशी देण्याला सेक्युलॅरीझम म्हणतात? सगळ्या प्रकरणाचा आधार दुसरा काय होता? मिसबाह मुस्लिम असल्याने तिला भारतात विशेष अधिकार आहेत, यापेक्षा काही वेगळा अनुभव आहे काय?

सुदैव म्हणायचे, की आपल्या देशात आजही छपाई माध्यमे अस्तित्वात आहेत आणि त्यातल्या मोजक्या पत्रकारांना अजून दुसरी बाजू तपासून बघण्याची नैतिक गरज वाटते. म्हणून मग मिड-डे नावाच्या सांध्यदैनिकाच्या प्रतिनिधीने मिसबाहला जागा नाकारलेल्या इमारतीला भेट दिली. तिने आरोप केलेल्या व्यक्तीची बाजू समजून घेतली. इतर गोष्टी तपासून सत्याचा शोध घेण्याचा प्रयास केला. मग काय, कालपर्यंत अन्यायाचे प्रतिक बनलेल्या गरीब बिचार्‍या मिसबाहला पळता भूई थोडी झाली. तिची अगदी तीस्ता सेटलवाड होऊन गेली. आपण कुठल्याही राजकीय हेतूने हा विषय जगापुढे आणला नव्हता, अशी पळवाट मिसबाहने काढली. पण मिसबाहला तरी दोषी कशाला मानायचे? ती सेक्युलर बदमाशीचा बळी आहे. ज्यांना मोदी वा भाजपा यांना हिंदूत्वाच्या नावाखाली झोडपून घ्यायचे असते, अशा सेक्युलरांना खराखोटा कुठलाही पुरावा त्यासाठी हवा असतो. मग त्यातून अशी कुभांडे रचली जातात आणि त्याचा बळी जसा घरमालक हिंदू असतो, तशीच मिसबाह सुद्धा बळीच असते. तिला आमिषे दाखवून अशा कुभांडासाठी वापरले जात असते. खरे गुन्हेगार स्वत:ला सेक्युलर म्हणून हिंदूंना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करायला सवकलेले काही बदमाश आहेत. तेच असल्या कुभांडातून दोन्ही बाजूंना झुंजवण्याचे पाताळयंत्री डावपेच खेळत असतात आणि त्यात उपरोक्त इमारतीचे रहिवासी व मिसबाह, सारखेच बळी असतात. कारण अशा सेक्युलर राजकारणाचा खेळ होतो आणि निरपराध दोन्ही बाजूचे धर्माचे लोक त्यात हकनाक बळी जात असतात. जाहिरा शेख अशाच कुभांडाचा बळी होता आणि मिसबाहही तशीच यात बळी घेतली गेली आहे. खरे गुन्हेगार माध्यमातले सेक्युलर आहेत, ज्यांना आगीत तेल ओतायचे असते आणि आग नसेल, तर मिळेल त्या ठिणगीतून आगडोंब निर्माण करायचा असतो. म्हणूनच या निमीत्ताने धार्मिक तेढ निर्माण करणार्‍यांचा नव्याने सविस्तर समाचार घेणे अगत्याचे झाले आहे. (अपुर्ण)