Thursday, June 4, 2015

एक सेक्युलरच मुस्लिमांचे दोष दाखवतो




मिसबाह काद्री व झीशान खान यांच्या निमीत्ताने एबीपी माझावर जी चर्चा रंगली, त्यात माजी कॉग्रेसनेते व माजी आप कार्यकर्ते अजित सावंत सहभागी झाले होते. आपल्या सेक्युलर भूमिकेसाठी ते ओळखले जाते. नेहमी हिरीरीने सेक्युलर भूमिका मांडणार्‍या सावंतांनी त्याच दिवशी ‘लोकसत्ता’मध्ये एक लेख लिहीला असल्याचे स्मरण संयोजक प्रसन्ना जोशी यांनी करून दिले. पण त्या दिवशीच्या चर्चेत सावंत यांनी प्रस्थापित सेक्युलर प्रतिमेला धक्का देणारी स्पष्ट भूमिका मांडली. मुस्लिम समाजाविषयी जनमानसात वा एकूणच हिंदू समाजात संशयाची भावना कशामुळे वाढीस लागली आहे, त्या दुखण्यावर सावंत यांनी नेमके बोट ठेवले होते. रमझान वा शब्बे बारात अशा निमीत्ताने मुस्लिमबहुल भागात जो धिंगाणा चालतो, त्याचा उल्लेख त्यांनी केला. तशाच काही गोष्टी मांडल्या. जेव्हा अशा रितीने मुस्लिम गुंडगिरी होते व परिसरातील लोकांना त्याचा त्रास होतो, तेव्हा कोणी मुस्लिम नेता त्याला पायबंद घालायला पुढे येत नाही. मग पर्यायाने इतरांच्या मनात मुस्लिमांविषयी पुर्वग्रह तयार होतो. झीशान व मिसबाह त्याच पुर्वग्रहाचे बळी आहेत. अशी भूमिका सावंत यांनी समर्थपणे मांडली. सेक्युलर म्हणून ओळखल्या जाणार्‍या कोणाहीकडून अशी अपेक्षा कधीही केली जात नाही. पण आता त्यातलेही अनेकजण सावंत यांच्याप्रमाणे स्पष्टवक्तेपणा पत्करू लागलेत, हा सेक्युलरांसाठीच धोक्याचा इशारा आहे. आपला सेक्युलर मुखवटा फ़ार काळ टिकवणे कसे अवघड होत चालले आहे, त्याचीच साक्ष सावंत यांच्या नव्या भूमिकेतून समोर आलेली आहे. आपली बहुसंख्या असलेल्या भागात मुस्लिम कसे दादागिरी करतात आणि जमाव होऊन अंगावर येतात, तेच सावंत यांनी मांडले. तेच वास्तव आहे. त्यातून मग मुस्लिम विरोधातले पुर्वग्रह वाढलेले आहेत. पण त्यातले सत्य बघण्यापेक्षा प्रसन्नाने त्याला कलाटणी देण्याचा केलेला प्रयास निंदनीय होता.

रमझान व शब्बे बारातच्या गोंधळाबद्दल बोलायचे असेल, तर शिवाजीपार्कला ६ डिसेंबरला होणारा प्रकार व गणेशोत्सवातला गदारोळ यावरही बोलावे लागेल; अशी त्या चर्चेला कलाटणी देणे म्हणजे वडाची साल पिंपळाला लावणे होय. कारण गणेशोत्सवात किंवा महानिर्वाणदिनी होणारी गर्दी कोणाच्या अंगावर जात नाही, की हल्लागुल्ला करीत नाही. त्या गर्दीमुळे स्थानिक रहिवाश्यांचे जीवन विस्कळीत व प्रभावित होते, यात शंका नाही. पण आपली गर्दी व बहुसंख्या आहे, म्हणून अकारण कुरापती काढण्याचा प्रकार दोन्ही प्रसंगी होत नाही. अजित सावंत यांनी दिलेले उदाहरण बोलके व स्पष्ट होते. रमझान व शब्बे बारातच्या निमीत्ताने मुस्लिम तरूण बेफ़ाट वेगाने मोटरसायकली पळवून पादचारी व नागरिकांना हैराण करण्याचा खेळ करतात, हा मुस्लिमबहुल परिसरातील अनुभव आहे. त्याला गुंडगिरी वा झुंडशाही असेच नाव आहे. उत्सवाची गर्दी झुंडशाही वा गुंडगिरी नसते. म्हणूनच त्याला त्रास म्हणता येईल. पण गुंडगिरी वा अन्याय अत्याचार म्हणता येत नाही. आणि त्याच कारणास्तव परिसरात मुस्लिम सण उत्सव नकोत, असे कोणाला वाटले तर त्याला दोष देता येत नाही. कारण मुस्लिम बुजूर्ग वा नेते अशा बेतालपणाला, माथेफ़िरूंना पायबंद घालत नाहीत, असा मुद्दा सावंत यांनी मांडला होता. त्यांच्यासारख्या जबाबदार कार्यकर्त्याला सेक्युलरपणावर शंका घेतली जाईल, हा धोका पत्करून इतके बोलायची पाळी कशामुळे आलेली आहे? त्याचे गांभिर्य प्रसन्ना सारख्या पत्रकाराने ओळखले पाहिजे. कुठेतरी अतिरेक व माथेफ़िरूपणाला पाठींबा देणे थांबले पाहिजे, असे सावंतनाही वाटू लागले आहे. कुठलेही खापर नेवून भाजपा वा संघाच्या माथ्यावर फ़ोडून भागणार नाही, याची प्रामाणिक जाणिव त्यातून स्पष्ट होते. सावंत यांच्यासारखे संघाचे वा मोदी भाजपाचे कट्टर विरोधक अशी भाषा का बोलू लागलेत?

अजित सावंत यांच्यासोबत त्या कार्यक्रमात भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये सहभागी झालेले होते. पण त्यांनी नव्हे इतकी मुस्लिमाच्या दोषपुर्ण वर्तनाची नेमकी मांडणी सावंत यांनी त्या दिवशी केली. ती करताना त्यांच्या चेहर्‍यावर कुठलाही आनंद नव्हता, इतका विषाद होता. आपण आजवर मुस्लिमांची पाठराखण केली, त्यातून गैरलागू वागणार्‍यांना प्रोत्साहन तर दिले गेलेले नाही ना, याचे वैषम्य त्यातून लपत नव्हते. पण आपल्या प्रामाणिक सेक्युलर भूमिकेची साक्ष सावंत यांनी दिली हे मानावे़च लागेल. त्याला महत्व एवढ्यासाठी आहे, की चुक असेल ती दाखवणे व सुधारण्यासाठी प्रयत्न करणे अगत्याचे असते. सावंत यांनी मुस्लिमांच्या चुकांवर बोट ठेवले, तेव्हा त्याची दुसरी बाजू समजून घ्यावी लागेल. जेव्हा असा एकतर्फ़ी सेक्युलर पवित्रा घेतला जातो, तेव्हा मुस्लिमातल्या माथेफ़िरूपणाला उत्तेजन दिले जात असते आणि त्यातून काही मुले शेफ़ारतात. त्यांच्याकडून गुंडगिरी व झुंडशाही माजवली जाते. अकारण व चुकीचे समर्थन दिल्यावर बेताल वागणे हाच आपला अधिकार आहे अशी चुकीची समजूत तयार होत असते. ज्यांच्याकडून असा माथेफ़िरूपणा होतो, त्याचे तेही बळी असतात. कुणीतरी फ़ालतूगिरीला पाठिशी घातल्याने त्यांच्याकडून असे होत असते. उतावळ्या एकतर्फ़ी सेक्युलर थोतांडाने अशा मुठभर मुस्लिमांना चिथावण्य़ा दिल्या जातात. त्यांच्या शेफ़ारण्याने एकूण मुस्लिमांविषयी जनमानसात विपरीत मतप्रवाह तयार होतो. मुस्लिमातले बुजूर्ग त्याला रोखत नाहीत आणि सेक्युलर दिवटे त्याची पाठराखण करतात. याचा एकत्रित परिणाम मुस्लिमांविषयी वाईट पुर्वग्रह तयार होणे असाच आहे. त्याचे परिणाम मग मुस्लिमांना दूर ठेवण्यात होत जातो. नेमकी हीच बाजू सावंत यांनी नेमक्या शब्दात मांडली होती. पण मुद्दा असा, की त्यांच्यासारख्या निर्भेळ सेक्युलरावर अशी पाळी कशामुळे आली आहे?

वास्तविक त्या दिवशीच्या चर्चेत मुस्लिम गुंडांचा धिंगाणा वा दंगल असा विषय नव्हता, दोन सुशिक्षित तरूण मुस्लिमांचा विषय चर्चेला होता. त्यात सावंत यांनी असे मुद्दे कशाला आणावेत? तर एकूण मुस्लिमांविषयी जनमानस कसे होत चालले आहे, त्याची ती चुणूक होती. शिकलेला असो किंवा अशिक्षीत असो, मुस्लिम आ्पल्या परिसरात नकोत अशी धारणा वाढीस लागल्याची वेदना सावंत यांनी बोलून दाखवली. मुठभर बेताल मुस्लिमांचा माथेफ़िरूपणा व सेक्युलरांकडून त्यांचीच होणारी पाठराखण मुस्लिमांविषयी आकस व पुर्वग्रह निर्माण करत असल्याची ती वेदना आहे. सावंत यांच्यासारखा हाडाचा सेक्युलर इतके स्पष्ट बोलण्यापर्यंत आला असेल, तर राजकारणापासून अलिप्त रहाणार्‍या सामान्य हिंदूच्या मनात किती खदखद असेल, त्याची नुसती कल्पना केलेली बरी. मुस्लिम असे़च वागणार आणि त्यांची बाजू सेक्युलर घेतच त्यांना डोक्यावर चढवून ठेवणार, अशी एक सार्वत्रिक मानसिकता वाढीस लागली आहे. त्याला जितका माथेफ़िरू मुस्लिम कारणीभूत आहे, तितकाच सेक्युलर भेदभावही कारण झाला आहे. मात्र त्याचे बळी सामान्य मुस्लिम ठरत आहेत. कारण जेव्हा मुस्लिमांविषयी अशी समजूत तयार होते आणि ती खोडून काढली जात नाही, तेव्हा त्याला खतपाणीच घातले जात असते. जगभर त्याचे परिणाम दिसत आहेत. अन्य देशात संघ वा हिंदूत्ववादी नाहीत. पण तिथेही मुस्लिमांबद्दल हीच भावना वाढीस लागली आहे. त्यातून बाहेर पडायचे असेल, तर मुस्लिमांना आत्मपरिक्षणाची गरज आहे. त्यात त्यांना सेक्युलर मदत करू शकतात. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे इथले सेक्युलर त्यातल्या बेतालपणाला पाठीशी घालत असतात आणि पर्यायाने मुस्लिमांची विकृत प्रतिमा जनमानसावर ठसवली जात असते. मग सावंतसारखा निष्ठावान सेक्युलरही विचलित होऊन जातो. इतरेजनांची काय कथा?

1 comment:

  1. खूप छान ..... कधी कधी परिस्थिती अशी उद्भवते की आपल्याच लोकांचे भांडे उघडे पाडावे लागतात. नेमके सावंतांबद्दल पण हेच झाले आहे....

    ReplyDelete