Saturday, June 6, 2015

बिहारमध्ये सर्वांचीच अतित्वाची लढाई



येत्या काही महिन्यात बिहारच्या विधानसभेची मुदत संपायची आहे. परिणामी त्यापुर्वी तिथल्या नव्या विधानसभेची निवड होणे आवश्यक आहे. निवडणूक आयोगाने तशी तयारी सुरू केली आहे. त्याचबरोबर राजकीय पक्षांनीही आपापली जुळवाजुळव सुरू केली आहे. कारण बिहारमधून कॉग्रेसचे एकछत्री राज्य संपुष्टात आल्यापासून तिथे कुठल्याच राजकीय पक्षाला एकहाती बहुमत व सत्ता संपादन करता आलेली नाही. कुठल्या तरी दोन वा अधिक पक्षांना निवडणूकपुर्व वा निकालानंतर सत्तेसाठी एकत्र यावेच लागले होते. मागल्या दोन निवडणूकात तिथे भाजपा व नितीशकुमारच्या संयुक्त जनता दलाची आघाडी होती व त्यांनी २००५ पासून सतत बहुमताचा पल्ला गाठला. १९८० पासून पुढल्या एका दशकात तिथे कॉग्रेसचे एकछत्री राज्य होते. पण त्याला कॉग्रेसची सत्ता म्हणण्यापेक्षा मिश्राबंधूंची सत्ता संबोधणे रास्त ठरावे. केंद्रात एल. एन. मिश्रा यांचा इंदिरानिष्ठ म्हणून दबदबा होता आणि आणिबाणीच्या काळात त्यांचे घातपाती घटनेत निधन झाल्यावर त्यांचे बंधू जगन्नाथ मिश्रा यांना बिहारची सत्ता मिळाली. त्यांना पक्षात वा राज्यात कुठले आव्हान नव्हते. पण १९८९ नंतर जी मंडलची लाट उसळली, त्याने बिहारची राजकीय समिकरणे कायमची बदलून टाकली. त्यातच मिश्रा यांना दिर्घकाळ चाललेली भागलपूरची दंगल आवरता आली नाही आणि मुस्लिम मतदार कॉग्रेसने कायमचा गमवला व मुस्लिम ही लालूंची दोन दशकांची मतपेढी होऊन गेली. तेव्हा सत्ता गमावल्यापासून कॉग्रेसची बिहारमध्ये जी घसरगुंडी सुरू झाली, त्यातून त्या पक्षाला कधी सावरताच आले नाही.  सहासात वर्षापुर्वी कॉग्रेसचे भावी अध्यक्ष म्हणून राहुल गांधींनी सुत्रे हाती घेतल्यापासून पक्षाला अस्तंगत होण्याची बाधा झाली. आता येऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकीत पुन्हा डोके वर काढण्याची कसरत कॉग्रेस करू बघत आहे.

खरे तर लागोपाठचा पराभव आणि पर्यायी स्थानिक नेतृत्व नसल्याने, कॉग्रेस बिहारमधून जवळपास नामशेष होत गेली. भाजपाला शह देण्याच्या राजकीय डावपेचात जे दिल्लीत झाले, ती बिहारची पुनरावृत्ती होती. लालकृष्ण अडवाणी यांची रथयात्रा रोखून लालू मोठे झाले, तरी तेव्हा भाजपाच्या पठींब्याने त्यांना सत्ता मिळालेली होती. तो पाठींबा भाजपाने तेव्हा काढून घेतल्यावर कॉग्रेसने समर्थन देऊन लालूंना सत्तेवर कायम राखले. पण आपले बिहारमधले राजकीय स्थान कॉग्रेसने कायमचे गमावले. मग प्रत्येक निवडणूकीत कॉग्रेसची शक्ती व संख्या घटतच गेली. अखेर २००४ सालात त्याच लालू व पासवान यांच्या दुय्यम सहकार्‍याची भूमिका पार पाडत कॉग्रेसने काही यश मिळवले होते. पण मागल्या विधानसभा निवडणूकीत राहुल गांधींनी तिथे तळ ठोकून पक्ष संघटना इतकी ‘सामर्थ्यशाली’ बनवली, की स्वबळावर राज्यातून सर्व जागा लढवण्याचा धाडसी प्रयोग केला. त्यात सर्वाधिक अनामत रकमा गमावण्याचा विक्रम कॉग्रेसच्या खाती नोंदला गेला. २४३ पैकी केवळ चार आमदार निवडून येऊ शकले. गेल्या वर्षी लोकसभेत जगजीवन राम यांच्या पुण्याईवर विजयी होणार्‍या मीराकुमारही पराभूत होऊन पक्षाचे नामोनिशाण शिल्लक उरलेले नाही. सहाजिकच विधानसभा स्वबळावर लढायचा विचारही मागे पडला आहे. पण अन्य कुणा समविचारी पक्षाच्या मदतीने लढणेही अशक्य झालेले आहे. कारण नव्या परिस्थितीत नितीश व लालूंची दोस्ती झाली असून, त्यांनी कॉग्रेसला नगण्य जागा देऊ केल्या आहेत. त्यावर समाधान मानले तर आहेत त्यापेक्षा एकदोन आमदार वाढतील. पण कॉग्रेस राष्ट्रीय पक्ष म्हणून बिहारमध्ये मिरवू शकणार नाही. म्हणूनच मग स्वबळावर नाही तरी नितीश वा लालू यापैकी एकाशी संगनमत करून लढायचे डावपेच कॉग्रेस लढवत आहे. पण ते बोलण्याइतके सोपे काम नाही. कारण लालू व नितीश यांची आधीच आघाडी झालेली आहे.

लोकसभेत दोघांना दणका बसल्यावर घाईगर्दीने नितीश यांनी लालूंशी दोस्ती केली आणि नंतरच्या पोटनिवडणूकात भाजपाला शह देऊन दाखवला होता. तिथून मग य जुन्या दुष्मनांची जवळीक सुरू झाली. नितीशना पुन्हा मुख्यमंत्री होतानाही लालूंनी मदत केली. अधिक जुन्या जनता परिवारातले विखुरलेले विविध गट एकत्र आणायची प्रक्रियाही सुरू झाली. मात्र अजून त्याला फ़ळ आलेले नाही. तत्वत: जुन्या जनता दलाचे सर्व गट एकत्र यायला तयार असले, तरी खरोखरच एकत्र येण्याची त्यांची ‘तयारी’ दिसत नाही. निदान बिहार विधानसभा निकाल लागेपर्यंत तरी त्यात यश मिळणार नाही. सहाजिकच आजच्या स्थितीत नितीश व लालू यांना आपापल्या पक्षाच्या बळावर जागावाटप करून मोदी लाट थोपवण्याचे आव्हान पेलायला हवे आहे. मात्र हे जागावाटप सुखनैव होण्याची चिन्हे नाहीत. लालू समसमान वाटपाला राजी नाहीत. लोकसभेच्या मतदानात जिथे लालूंच्या राजदला अधिक मते असतील, त्या जागा आपल्या असा लालूंचा दावा आहे. तो मानला तर नितीशना फ़ार जागा शिल्लक उरत नाहीत. म्हणूनच नितीशना अधिक वाटा हवा आहे. शिवाय नितीशनाच मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून पेश करण्याचा त्यांच्या पक्षाचा आग्रह आहे. पण लालूंना निकालापुर्वी नेत्याचे नाव घोषित करायची घाई नको आहे. थोडक्यात मोदी वा भाजपाला रोखण्यात एकमत असले, तरी आपल्यातला दुसरा पुढे जाऊ नये याची अधिक फ़िकीर या दोघा जुन्या लोहियावादी मित्रांना सतावते आहे. सहाजिकच त्यांच्यात बिनसले असेल, तर अधिक वितुष्ट यावे आणि नितीशनी लालूंपेक्षा कॉग्रेसशी जागावाटप करून दोघात वाटणी व्हावी, अशी कॉग्रेसची रणनिती आहे. त्यामुळे नितीशना मोठा वाटा मिळू शकेल. पण कॉग्रेसलाही ४३ पेक्षा अधिक जागी उमेदवार उभे करता येतील. ते सगळे जिंकणार नसले, तरी त्यातून पक्षाला नवी उभारी येण्य़ाची प्रक्रिया सुरू होईल अशी अपेक्षा आहे.

लालूंच्या अराजकाला रोखण्यासाठी सेक्युलर मुखवटा बाजूला ठेवून नितीशनी भाजपाशी युती केली होती. पण मोदीद्वेष विकोपाला जाऊन त्यांनी आपलेच बिहारमधील वर्चस्व नामशेष करून घेतले. मागल्या लोकसभेत २० खासदार असलेला नितीशचा पक्ष एनडीएमध्ये दुसर्‍या क्रमांकाचा मोठा पक्ष होता. एनडीएत असते तर आजही लोकसभेत तसेच चित्र राहिले असते आणि भाजपाला बिहारमध्ये मोठा पक्ष होण्याची शक्यताच नाकारली गेली असती. नितीशची लोकप्रियता निदान बिहारमध्ये झाकली मूठ राहिली असती. पण हवेची दिशा ओळखून ती संधी पासवान यांनी साधली व नितीश मुख्यमंत्री असूनही राजकीय अडचणीत सापडले. मागल्या दहा वर्षात कमावलेली राजकीय शक्ती त्यांनी मागल्या दिड वर्षात उतावळेपणा करून गमावली आणि आता कॉग्रेस त्याच अगतिकतेचा लाभ उठवून आपला जिर्णोद्धार करायची संधी शोधत आहे. भाजपा जिंकायला नको असला, तरी आपल्या जीवावर शिरजोर झालेल्या लालू व अन्य सेक्युलर पक्षांना रोखण्याचाही विचार कॉग्रेस करते आहे. मात्र त्यासाठी नितीश व लालू यांच्यात कायमचे बिनसले पाहिजे. निदान त्यांच्यातले जागावाटप फ़िसकटले पाहिजे. त्याचा लाभ भाजपाला मिळणार हे कॉग्रेसलाही कळते. तरीही आपल्या पक्षाचे पुनरुज्जीवन हा कॉग्रेससाठी प्राधान्याचा विषय आहे. म्हणूनच तोंडाने सेक्युलर मतांची विभागणी नको असली भाषा कॉग्रेसनेते बोलत असले, तरी त्यांचे प्रयास लालू-नितीश यांच्यात बेबनाव अधिक विस्तारीत होण्याच्या दिशेने चालू आहेत. शिवाय लालू व राहुल यांच्यातील शत्रूत्व लपलेले नाही. लालूंना वाचवण्यासाठीच युपीएने काढलेल्या अध्यादेशाला जाहिरपणे फ़ाडून राहुलनी प्रत्यक्षात लालूंना निवडणूकीच्या राजकारणातून बाद केले, ही वस्तुस्थितीही बोलकी आहे. राजकीय सक्तीमुळे हे सेक्युलर एकत्र यायची भाषा बोलत असले, तरी मोदी विरोधात कितपत त्यांची मैत्री अखेरपर्यंत टिकेल याची शंकाच आहे.

1 comment:

  1. उत्तम विवेचन, भाऊराव!

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete