Friday, January 5, 2018

नक्षली मोडस ऑपरेन्डी

Image result for koregaon violence

भीमा कोरेगावचे निमीत्त करून जे रणकंदन मागल्या दोनचार दिवसात माजवण्यात आलेले आहे, त्यात नवे काहीच नाही. निमीत्त बदलते तरी हेतू कायम असतात. असे पेटलेले वातावरण आणि जीव मुठीत धरून सैरावैरा होणारी लोकसंख्या बघितली, मग भ्रमिष्टांना त्यात क्रांतीची बीजेही दिसू लागतात. ही बीजे किती फ़ळतात, त्याचे अनुभव ज्यांच्या गाठीशी असतात, त्यांना त्यातला फ़ोलपणा उमजलेला असतो. पण त्याचे राजकीय आर्थिक लाभ उठवणार्‍यांना मात्र त्यातून येऊ घातलेल्या क्रांतीची मोहात टाकणारी स्वप्ने रंगवावीच लागतात. जिग्नेश मे्वानी वा उमर खालीद ही त्यातली नवी नावे आहेत. पण बाकीचे पडद्याआडून सुत्रे हलवणारे कोणी वेगळेच आहेत. हळुहळू त्याचे धागेदोरे समोर येतील व काही झाकलेलेच रहातील. पण ज्या पद्धतीने हा संघर्ष मराठा-दलित वा पेशवाई विरुद्ध दलित असा रंगवण्याचा प्रयास आहे, त्यामागे एक सुत्रबद्धता दिसून येते. खुप दूर जाण्याची गरज नाही. आज जसे दलित त्यात ओढले गेले आहेत, तसेच चारपाच वर्षापुर्वी मराठा तरूणही ओढले गेले होते. तेव्हाही त्याला जातीसंघर्षाचा रंग देण्याचा प्रयत्न झालेला होता. त्यातही काही राजकारण्यांनी आपापले हातपाय धुवून घेण्याचा प्रयत्न केलेला होता. मराठा आरक्षण असे गोंडस नाव देऊन खुप भडकावू कारवाया झाल्या होत्या आणि पुतळे हलवणे फ़ोडण्यापर्यंत मजल गेली होती. त्याचे नामोनिशाण आज शिल्लक राहिलेले नाही. कोपर्डीच्या घटनेनंतर मूक मोर्चाचे आयोजन झाले, त्यात अशा नेत्यांना वा म्होरक्यांना कोणी स्थान दिले नाही. आजही पेटलेल्या तापलेल्या वातावरणाने काहीसा धुरळा उडालेला आहे. पण जे सुत्रधार आहेत, त्यांची स्वप्ने त्यातून पुर्णत्वास जाण्याची बिलकुल शक्यता नाही. सामान्य माणूस कुठल्याही जातीपंथाचा असो, त्याची मतलबी लोकांचे हेतू ओळखून त्यापासून दूर रहाण्याची विवेकबुद्धी शाबुत असल्यानेच या देशातली लोकशाही आजवर टिकून राहिलेली आहे.

भीमा कोरेगावच्या निमीत्ताने जी एल्गार परिषद योजण्यात आलेली होती, त्यात अनेक संघटना असल्याचा दावा केला जातो. त्यांची नावी समोर आलेली नाहीत. पण अशा अनेक साध्या भासणार्‍या नावांमागची प्रेरणा शहरी नक्षलवाद असल्याचे आता लपून राहिलेले नाही. कधी कबीर कला मंच वा तत्सम नावे घेऊन पुढे यायचे. तर कधी कुठल्याही अन्य जाती समुहांच्या संस्था संघटनांमध्ये शिरकाव करून, त्यांच्या दुखर्‍या भागावर फ़ुंकर घालत आगी पेटवायच्या; ही रणनिती राहिलेली आहे. त्यात काही भूमीगत असतात, तर काही बाकीच्या समाजात मिसळून उजळमाथ्याने आपले उद्योग चालवित असतात. जितके म्हणून निराश वैफ़ल्यग्रस्त राजकीय गट व संघटना आहेत, त्यांनी त्यात परस्परांशी सहकार्य करीत आपापले हेतू साध्य करण्याचा समझोता केलेला असतो. नक्षलवादी प्रवृत्तीचे लोक त्यात साळसूदपणे शिरकाव करून बसलेले आहेत. देशात सत्तांतर झाल्यापासून सत्ताभ्रष्ट झालेले कॉग्रेसी त्यांना रसद पुरवण्याचे काम करीत असतात. त्यांचा हेतू भाजपा वा हिंदूत्ववादी विचारांच्या विरोधात वातावरण उभे करण्याचा आहे. म्हणून जिथे शक्य असेल तिथे कुठल्या तरी समाज समुहाच्या दुखर्‍या जागा शोधून त्यात ठिणगी टाकण्याचा उद्योग चालूच असतो. पुरस्कार वापसीतून काही साध्य झाले नाही, तेव्हा हा नवा मार्ग शोधण्यात आलेला आहे. सहाजिकच दोन वर्षापुर्वी नेहरू विद्यापीठातला कन्हैयाकुमार तेजीतला हिरो होता आणि आज जिग्नेश मेवाणी आघाडीवर आहे. यांचे गौरी लंकेश सोबतचे फ़ोटो दोन दिवसात बघायला मिळाले आणि त्यामुळे महाराष्ट्रात उफ़ाळलेल्या हिंसेचे हेतू उघड झालेले आहेत. त्याचा नक्षली चेहरा लपू शकलेला नाही. अर्थात रस्त्यावर उतरलेल्या शेकडो हजारो दलित आंबेडकरवादी लोकांना कोणी नक्षली म्हणू शकणार नाही. पण चेहरा त्यांचा आणि हेतू नक्षल्यांचा, असा हा खेळ आहे.

यापुर्वीही दलित वस्त्यांच्या भागात अशी हिंसा व बंद झालेले आहेत. पण बुधवारी ज्याप्रकारे रस्त्यावर जमाव फ़िरून बंदसाठी धुमाकुळ घालत होते, त्यातकी कार्यशैली वेगळीच होती. दोन वाहिन्यांच्या वार्ताहरांनी एकाच नाक्यावरून तासभर केलेल्या चित्रण वार्तांकनामध्ये तो फ़रक नजरेत भरणारा होता. दोनतीनशे लोकांचा एक जमाव घोषणा देत, झेंडे फ़डकावर वहाने दुकाने बंद करण्यासाठी फ़िरत होता आणि तो मैलभर पुढे सरकला, की दुसरा दोनतीनशेचा जमाव अन्य कुठून तरी तिथेच अवतीर्ण व्हायचा. यापुर्वी हजारोचा जमाव घोषणा देत निघून गेल्यावर माघारी शांतता असायची. ही नवी कार्यशैली अनेक जागी दबा धरून बसणार्‍या व एकामागून एक हल्ले करीत दहशत माजवणार्‍या नक्षली यादवीची होती. हा फ़रक नजरेत भरणारा आहे. यातून कुठेतरी पोलिसांचा संयम सुटावा किंवा अन्य कुठल्या समाजसमुहाने रस्त्यात उतरून दोन हात करावेत, ही अपेक्षा लपून राहिली नाही. शिवसेना वा अन्य कुठल्या तत्सम संघटनेने प्रत्युत्तर द्यावे आणि हिंसेचा भडका उडावा, अशीच अपेक्षा होती. पण ती फ़ोल ठरली. पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला नाही, की बाकी कुठली संघटना वा लोकसमुहाने प्रत्युत्तर दिले नाही. सहाजिकच बंद समर्थकांनी केलेल्या हिंसेपलिकडे कुठलीही हिंसा होऊ शकली नाही. नेमक्या भाषेत सांगायचे तर कुठलीही जातीय वा सामुहिक दंगल त्यातून उसळू शकली नाही. हिंसा वा धुमाकुळाला कुठूनही थोडातरी प्रतिसाद वा प्रतिकार झाला असता, तरी मुंबई वा अन्य शहरात काही दिवसांची दंगल पेटत राहिली असती. आताही तसाच प्रकार गुरूवारी गुजरातच्या राजकोट शहरात झाल्याच्या बातम्या आहेत. भीमा कोरेगाव आणि राजकोटचा दुरान्वये तरी संबंध येतो काय? नसेल तर तिथे बसेस पेटवल्या जाणे वा वहानांवर दगडफ़ेक व्हायचे काय कारण आहे? ही खास गोरिला वॉर किंवा घातपाती युद्धाची संकल्पना आहे.

ही रंगीत तालिम समजायला हरकत नाही. आजवर जंगलात किवा दुर्गम खेड्यात अकस्मात उफ़ाळणारा नक्षली हिंसाचार, आता शहरी भागात सरकू लागल्याची चिन्हे या दोन दिवसातल्या घटनांनी दाखवली आहेत. राज्याच्या गुप्तचर विभागाने मिळवलेल्या माहितीनुसार यामागे नक्षली नियोजन असल्याच्याही बातम्या आल्या आहेत. त्याची पत्रके वा अन्य काही पुरावे मिळणे ही वेगळी बाब आहे. पण या दोन दिवसांच्या धुमश्चक्रीची कार्यशैली त्याचीच साक्ष देणारी आहे. म्हणूनच या उद्रेकाचे समर्थन करणार्‍यांच्या राजकीय भूमिका तपासून बघितल्या, तर त्यामागचे हेतू उघड होऊ शकतील. नेहरू विद्यापीठात भारताचे तुकडे व बरबादी करण्याच्या गर्जना करणार्‍यांनी आता संविधानाच्या मुखवट्याखाली नक्षलवाद विकायचे दुकान उघडले आहे. ज्यांचा लोकशाही वा निवडणूकांच्या मार्गाने सत्तांतर करण्यावर विश्वास नाही वा बंदुकीच्या हिंसेच़्या मार्गानेच सत्ता बळकावण्यावर निष्ठा आहे, तेच आता गांधी आंबेडकरांच्या नावाने क्रांतीची स्वप्ने बघत असल्याचा हा साक्षात्कार आहे. आज जे दलितांच्या अस्मिता घेऊन आपला चेहरा त्यामागे लपवित आहेत, तेच उद्या अल्ला हो अकबरची डरकाळी फ़ोडून मुस्लिमांच्य अस्मितेचा मुखवटा पांघरतील, याबद्दल खात्री बाळगायला हरकत नसावी. कधी प्रादेशिक अस्मिता, तर कधी पर्यावरणाचे बुरखे पांघरून आपला अजेंडा पुढे रेटण्याचा हा खेळ आहे. त्यात उदारमतवादी मनोरंजन करून घेण्य़ासाठी सहभागी होणार आणि त्यांचाच त्यात बळी पडण्याची शक्यता नेहमी असते. रोहित वेमुलापासून मेवाणी खालीदपर्यंत हेही त्यातले मोहरेच आहेत. त्यांच्याच तात्कालीन भावना प्रक्षोभाच्या इंधनावर अशा हिंसक क्रांतीच्या सोहळ्यांचे आयोजन केले जात असते. मात्र त्यात सरपणासारखे होरपळून गेल्यावर त्यांच्याकडे तक्रार करण्याचेही अवसान शिल्लक राहिलेले नसते. असे एल्गार स्वातंत्र्योत्तर काळात शेकड्यांनी होऊन गेलेत. पण भारतीय लोकशाही त्याला पुरून उरलेली आहे.

Thursday, January 4, 2018

पाकचा झिंबाब्वे होतोय?

sharif musharraf bajwa के लिए इमेज परिणाम

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी पाकिस्तानला खुलेआम दहशतवादी देश ठरवण्यापर्यंत मजल मारली आणि त्यावर पाकिस्तान लगेच काही उत्तर देऊ शकला नाही. त्यामुळे भारतातील माध्यमे उत्साहात आली. पाकिस्तानच्या नाडया कशा आवळल्या गेल्या, त्यावरच वाहिन्यांनी सोमवारी आनंदोत्सव सुरू केला होता. पण पाकिस्तानात ज्या काही घडामोडी अलिकडल्या आठवडाभरात चालल्या होत्या, त्याचा कुठलाही संदर्भ या चर्चांमध्ये दिसत नव्हता. पाकिस्तान जिहादी मानसिकतेच्या आहारी गेलेला देश व समाज आहे, यात शंका नाही. पण म्हणून तिथला प्रत्येकजण जिहादीच असतो असेही नाही. त्यातल्या कष्टकरी लोकांना आपले नित्यजीवन सुसह्य झाले तरी पुरे आहे. सुशिक्षीत सुखवस्तु लोकांनाही आपल्या ऐषारामात कुठली बाधा येऊ नये, असेच वाटत असते. पण त्यांच्यापलिकडे अशीही लोकसंख्या असते, ज्यांना धर्म व अन्य काही गोष्टीत रस असतो. असे भारावलेले लोक नेहमी आक्रमक असतात. त्याचा लाभ उठवून काही धर्मांध वा राजकीय पुढारी आपल्या पोळ्या भाजून घेण्याची संधी शोधत असतात. त्यांना लगाम लावण्याची क्षमता प्रशासनात व कायद्यात असली, तरच त्या देशाला ठामपणे उभे रहाता येत असते. दुर्दैवाने पाकिस्तानची निर्मितीच धर्माच्या पायावर झालेली असल्याने, तिथे कधी आधुनिक विचार रुजला नाही आणि नेतृत्व कायम भारतविरोधी नेत्यांच्याच हातात राहिल्याने त्याच विस्तवाला हवा देण्यापलिकडे त्या देशाचे राजकारण जाऊ शकले नाही. मग त्यात अधिक भडकावू व चिथावणीखोर लोकांनी आपले स्वार्थ साधण्याच्या राजकारणात, त्या देशाला धर्मांधतेच्या गर्तेत लोटून दिले. त्यातून जिहादी व दहशतवादी मानसिकता जोपासली गेलेली आहे. ट्रंप वा अमेरिकेच्या कुठल्या एका धमकीने वा कृतीने पाकिस्तान त्या गर्तेतून बाहेर पडू शकणार नाही.

पाकिस्तान असा धर्माच्या आहारी गेला आणि त्याला आपला आर्थिक औद्योगिक विकास करण्यापेक्षा हिंदू भारताला शह देण्यापलिकडे काही उद्दीष्टच राहिले नाही. मग भारताचा द्वेष इतकेच त्याचे ध्येय बनले. म्हणूनच त्या धारणेचा लाभ उठवत जगातल्या महासत्तांनी व पुढारलेल्या देशांनी आपापले हेतू साध्य करण्यासाठी पाकिस्तानच यथेच्छ वापर करून घेतला. उपयोग संपल्यावर पाकला उकिरड्यात फ़ेकून दिलेले आहे. असा पुर्ण विस्कळीत व दिवाळखोर देश, ही आजच्या पाकिस्तानची ओळख आहे. हळुहळू भारताचा दुसरा शेजारी चीननेही पाकचा तसाच भारताला शह देण्यासाठी उपयोग करून घेतला. या गडबडीत पाकिस्तान कधीही स्वयंभूपणे आपल्या पायावर उभा राहिला नाही आणि सतत अनुदान, कर्ज वा खिरापतीवर जगण्याची वेळ त्याच्यावर आली. अब्जावधी रुपयांचे कर्ज आणि कुठलेही उत्पन्नाचे साधन नाही, अशा चमत्कारीक अवस्थेत तो देश सापडला आहे. पण व्यसनाधीन दारुडा जुगारी जसा अधिकाधिक कर्ज काढून वा उसनवारीने चैन उधळपट्टॊ करीत असतो, तशी पाकिस्तानची दशा झालेली आहे. असे दिवाळखोर नेहमी सावकारासमोर लाचार असतात. मग पाकिस्तान चीन, अमेरिका वा सौदी अरेबियासमोर अगतिक झालेला दिसला तर नवल नाही. ट्रंप म्हणजे त्यातला सर्वात मोठा सावकारच. त्याने एकप्रकारे पाकला यापुढे एक छदाम मिळणार नाही, असे धमकावले तर पाक राज्यकर्त्यांनी गाळण उडणारच ना? पण हे कमी म्हणून की काय, देशाच्या अंतर्गत सत्तास्पर्धेलाही उधाण आलेले आहे. सेना व नागरी राज्यकर्ते यांच्यात सतत बेबनाव असतोच. अधूनमधून घटना गुंडाळून तिथल्या सेनापतींनी सत्तासुत्रे हाती घेतलेली आहेत. आता तो बेबनाव शिगेला पोहोचला आहे आणि त्यात चीनसह सौदी अरेबियाही हस्तक्षेप करताना दिसतो आहे. त्याचवेळी ट्रंप यांनी अनुदान बंद करणे, म्हणूनच दुष्काळातला तेरावा महिना झाला आहे.

ट्रंप यांची धमकी व पाकची दिवाळखोरी यावर खुप चर्चा दोन दिवसात झाली. पण त्याच दरम्यान पाकचे पदच्युत पंतप्रधान नवाज शरीफ़ व सुरक्षा सल्लागार जंजुवा यांच्यातल्या गोपनीय बैठकीचा कु्ठे फ़ारसा उल्लेखही आलेला नाही. घटनात्मक पदी नसलेल्या नवाजना जंजुवा कशाला भेटले व त्यांच्यात काय खलबते झाली? नंतर लगेच सौदी राजपुत्राने पाठवलेल्या विमानातून नवाज सौदीला कशासाठी गेले? तिथे खाजगी भेटीसाठी नवाज यांचे धाकटे बंधू आधीपासूनच पोहोचलेले आहेत. नवाज यांनी पाक सोडताच ट्रंप यांनी अनुदानबंदीची घोषणा कशाला करावी? सुरक्षा सल्लागार हे पाकसेना व नागरी सरकार यांच्यातले मध्यस्थ मानले जातात. सौदी राजांचे आमंत्रण लक्षात घेऊनच पाकसेना अधिकार्‍यांनी नवाजना काही डोस दिलेले होते काय? सौदी व अमेरिका यांचा पाकिस्तानात काय खेळ चालू आहे? बाहेरच्या सत्ता मिळून पाकिस्तानची राजकीय घडी बदलण्याचे डाव खेळत आहेत काय? आपल्याला सत्तेतून पदच्युत करण्यासाठी सेनेनेच न्यायालयाचा वापर केला, असे नवाज बोलत असतात. त्यातून सेना व राजकारण यांचातली दुफ़ळी समोर आलेली आहेच. नागरी समाज वा राष्ट्र म्हणून आज पाकिस्तान शिल्लक उरलेला नाही. अशा स्थितीमध्ये ह्या एकाचवेळी घडणार्‍या घडामोडी शंकास्पद आहेत. त्याला आणखी एक पदर आहे. पाकसेनेची कठपुतळी मानल्या जाणार्‍या इमरान खान याच्या पक्षाने सरकारविरोधी मोर्चाची घोषणा केलेली होती, तीही अकस्मात गुंडाळली गेली आहे. ह्या कित्येक परस्परांशी संबंध नाही अशा वाटणार्‍या घटना आहेत. पण त्याच पाकिस्तानात मोठी राजकीय घालमेल चालू असल्याची साक्ष देणार्‍याही घटना आहेत. पाकिस्तानी सेनेच्या अधिकार्‍यातही आजकाल एकवाक्यता राहिली नसल्याच्या बातम्या सारख्या येत असतात. आतून व बाहेरून चालू असलेली ही धक्काबुक्की या देशाच्या अतित्वावरचे संकट ठरू शकेल काय?

एकूणच जगाच्या राजकारणात इस्लामी देश म्हणून जो गट तीनचार दशके कार्यरत होता, त्यात आता मोठी दुफ़ळी माजली असून मध्यपुर्वेतही उलथापालथी चाललेल्या आहेत. शिया सुन्नी असे भेद आहेतच. पण सत्ताधार्‍यांच्या मतलबानुसारही मुस्लिम देशांची गटबाजी शिगेला पोहोचलेली आहे. सौदी व इराण यांच्यात मुस्लिम जगाचे नेतृत्व करण्याच्या स्पर्धेला हिंसक व युद्धाचे स्वरूप प्राप्त झालेले आहे. त्यातच शिया मुस्लिम जगाचे नेतृत्व करणार्‍या इस्लामिक क्रांतीचा झेंडा जगभर फ़डकावू बघणार्‍या इराणमध्ये सामान्य जनताही रस्त्यावर उतरू लागलेली आहे. सौदीमध्ये बदलते वारे ओळखून तिथला राजपुत्र धार्मिक बंधने सैल करण्याच्या कामाला लागला आहे. दुसरीकडे अशाच मुस्लिम सत्ता व तिथल्या धर्मपंडिताच्या चिथावण्यांनी पेटलेले जिहादचे यज्ञकुंड अजून विझलेले नाही. त्यातच पाकिस्तानमध्ये होणार्‍या घडामोडी गंभीर आहेत. बलुच व सिंधी-पठाणांच्या उठावाने पाक बेजार झालेला आहे. पण त्याला शिस्त लावायचे बाजूला पडून सेना व राजकारणी एकमेकांचा उरावर बसलेले आहेत. त्याचे परिणाम तात्काळ दिसणारे नसतात. जागतिक राजकारणात इस्लामी देशांचा गट म्हणून दबाव आणणारी शक्ती क्षीण झालेली आहे. म्हणून तर अमेरिका इस्त्रायलच्या जेरूसेलम राजधानीला मान्यता देऊ शकली. तर सौदीसारखे देशही काही करू शकलेले नाहीत. अशावेळी काश्मिरचा विषय भारताने युद्धाच्या मार्गाने निकाली काढायचा ठरवला, तर पाकिस्तान प्रतिकारही करण्याच्या स्थितीत उरणार नाही. म्हणूनच पाकिस्तानातल्या घडामोडी बारकाईने बघण्याची गरज आहे. सात दशके उलटल्यावर पाकिस्तान नावाचा बुडबुडा फ़ुटण्याची वेळ जवळ आली, असे समजायचे काय? २०१८ हे त्यासाठी निर्वाणीचे वर्ष ठरेल काय? पाकिस्तानचा झिंबाब्वे होऊ घातला आहे काय? दिवाळखोर देशाचे दिवाळखोर नेते आणखी काय साधू शकतात?


Wednesday, January 3, 2018

समाजहितासाठी खोटेपणा?

pawar के लिए इमेज परिणाम

भीमा कोरेगाव सोहळ्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागात उमटलेले हिंसक प्रतिसाद बघून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘हल्लाबोल’ केल्याच्या बातम्या झळकल्या आहेत. या ऐतिहासिक लढाईच्या स्थळाला दिर्घकाळ अनेक लोक सदभावनेने भेट देत आलेले आहेत आणि यावर्षी त्या लढाईला दोनशे वर्षे पुर्ण होत असल्याने, अधिक संख्येने लोक येतील ही अपेक्षा होती. म्हणूनच तिथे सावधानतेचे उपाय योजायला हवे होते. इथपर्यंत पवारांची भाषा योग्य आहे. पण पुर्ण सत्य बोलणे वा दिशाभूल न करणे, ही पवारांच्या स्वभावातील गोष्ट नाही. म्हणूनच जाता जाता त्यांनी वढू गावाचा संदर्भ देऊन दडपून खोटे बोलून घेतले आहे. स्वत: चार वेळा मुख्यमंत्री असलेले शरद पवार प्रशासनाच्या व सरकारच्या मर्यादा चांगल्या ओळखतात. म्हणूनच त्यांच्याकडून अशा संकटकाळात समतोल वक्तव्याची अपेक्षा असते. पण उचापतखोरी अंगी बाणवलेल्या नेत्याकडून तशी अपेक्षा बाळगणे गैरलागूच नाही काय? स्वत: राज्य करताना अद्डपून खोटे बोलत जनतेची साफ़ दिशाभूल करण्याला समाजहिताचे नाव देणार्‍या पवारांनी म्हणूनच मागल्या दोन दशकात आपली विश्वासार्हता गमावली आहे. अन्यथा त्यांनी महाराष्ट्रात भडकू बघणार्‍या जातीय तेढीतही आपला राजकीय लाभ शोधला नसता. आजपासून दोन दशके मागे राज्यात युतीची सत्ता होती आणि तेव्हाही असाच हिंसाचार माजलेला होता. नेमक्या त्याच जागी यावेळीही तसाच हिंसाचार माजावा, याला योगायोग मानता येणार नाही. तेव्हा रमाबाई आंबेडकर नगर येथे गोळीबार झाल्याची घटना घडली होती आणि पुढले दोनतीन दिवस हिंसक जमावाने मुंबईभर थैमान घातलेले होते. याचे पवारांना स्मरण नाही काय? तेच तिसर्‍यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले, तेव्हा अवघ्या आठवड्याभरात मुंबईच्या विविध भागात बॉम्बस्फ़ोटाची मालिका झाली, त्याचे श्रेय कोणाचे होते?

१२ मार्च १९९३ रोजी दुपारपासून मुंबईच्या विविध भागात मिळून अकरा बॉम्बस्फ़ोट झालेले होते. त्यापुर्वी मुंबईत लागोपाठ दोनदा दंगली उसळल्या होत्या. किंबहूना त्यामुळेच पवारांना दिल्ली सोडून पुन्हा महाराष्ट्रात यावे लागलेले होते. आधीचे त्यांचेच लाडके मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांना दंगली हाताळता आल्या नाहीत, म्हणून पवार अस्वस्थ झालेले होते. त्यांच्याच आग्रहाखातर नाईकांना बाजूला व्हावे लागलेले होते. मग पवार आल्यावर मुंबई किती सुरक्षित झाली होती? अवघ्या आठ दिवसात मुंबईत अकरा बॉम्ब फ़ुटले आणि दोनशेहून अधिक निरपराध माणसे जीवाला मुकली होती. शेकड्यांनी जखमी व जायबंदी झाले होते. त्यानंतर काही तासातच दुरदर्शनच्या पडद्यावर मुख्यमंत्री पवार झळकले आणि लोकांना शांततेच आवाहन करण्याची जबाबदारी बाजूला ठेवून, त्यांनी दिशाभूल करण्याची संधी साधलेली होती. मुंबईने अकरा बॉम्बस्फ़ोट अनुभवले असताना पवारांनी बारावा बॉम्बही फ़ोडला होता. केवळ हिंदू वा बिगरमुस्लिम भागातच बॉम्बस्फ़ोट झालेले असताना, मुस्लिमांच्या भागातही स्फ़ोट झाल्याची लोणकढी थाप पवारांनी काही तासात ठोकलेली होती. दोन समाजात दुफ़ळी माजून हिंसेला चालना मिळू नये म्हणून आपण जाहिरपणे असे खोटे बोललो होतो, याची कबुली पुढल्या काळात पवारांनीच दिलेली होती. ज्यांना आपण मुख्यमंत्री असताना निरागस मुंबईकरांना जनहितासाठी खोटे बोलण्याची गरज वाटली, त्यांनी आता महाराष्ट्रात दंगली पेटल्या असताना किती खरे बोलावे? अर्थात आज मराठी समाजाच्या भिन्न घटकांमध्ये तेढ माजलेली दिसत असताना शरद पवार त्यात आणखी वैमनस्य निर्माण व्हावे असे विधान का करावे? तेही जनहिताचे असणार हे आपण गृहीत धरले पाहिजे. कारण पवार हे जाणता राजा आहेत ना? आपले हेतू साध्य करण्यासाठी सोयीनुसार खरे खोटे करण्याचा अधिकार त्यांना आपोआपच मिळालेला असतो ना?

महाराष्ट्रातील सत्ता व लोकप्रियता गमावल्यापासून पवार यांना खुप बेचैनी आलेली आहे. सतत विविध समाज घटकांना एकमेकांच्या विरोधात खेळवण्याचेच राजकारण करण्यात पवारांची हयात गेलेली आहे. त्यामुळे त्यांना ओळखायला महाराष्ट्राला खुप वेळ लागला, हे मान्य करायलाच हवे. पण ती ओळख पटल्यावर कितीही चलाखीचे डावपेच खेळूनही त्यांना गमावलेली राजकीय पत पुन्हा मिळवणे शक्य झालेले नाही. त्यातूनही ही बेचैनी आलेली आहे. इतकी वर्षे जी सामाजिक तेढ माजवण्याची जादू पवारांनी यशस्वीरित्या चालविली होती, तिचा प्रभाव क्षीण झालेला आहे. तरीही त्यांना अजूनही तीच जादू कामी येईल असे वाटत असावे. म्हणून अधूनमधून त्यांनी तिचे प्रयोग चालू ठेवलेले असतात. काही वर्षापुर्वी कोल्हापूर संस्थानचे युवराज संभाजी राजे यांची भारत सरकारने राज्यसभेत मनोनित सदस्य म्हणून नेमणूक केलेली होती. तर राज्यात ब्राह्मण जातीचा मुख्यमंत्री असल्याचा संदर्भ घेऊन पेशव्याने छत्रपतींना वस्त्रे दिल्याचा हिणकस आरोप पवारांनी केला होता. तेव्हाच त्यांच्या खर्‍या चेहर्‍याचे प्रदर्शन झालेले होते. तेही कमी पडाले म्हणून की काय, त्यांनी कोकाटे नावाच्या कुणाच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्याचे प्रयोजन साधले. आपण जातपात मानतो आणि जातीय संघटनेतही सहज मिसळून जाऊ शकतो, याची ग्वाही दिलेली होती. मात्र त्यामुळे फ़ारसे काही साधले नाही. कारण ग्रेट मराठा वा स्ट्रॉग मराठा म्हणून दिर्घकाळ मिरवलेल्या पवारांचा खरा चेहरा आता मराठ्यांनीही ओळखलेला आहे. म्हणून तर मध्यंतरी मूक मोर्चे निघाले, त्यापासूनही साहेबांना दूर ठेवण्यात आले होते. पवारांच्या धरसोडवृतीमुळेच मराठा समाजाची होरपळ झाल्याची ती साक्ष होती. मात्र अजून हा विक्रमादित्य आपला हट्ट सोडायला तयार नाही. तो पुन्हा पुन्हा वेताळाचे प्रेत खांद्यावर घेऊन धावण्याचा खेळ खेळतच राहिला आहे.

कुठलाही कर्तबगार माणूस उमेदीच्या काळात आपले कर्तृत्व गाजवत असतो आणि जितक्या उंचीवर पोहोचतो, त्या उंचीची प्रतिष्ठा त्याला पुढल्या काळात जपावी लागत असते. पुढल्या काळात अशी माणसे उच्चस्थानी नसली तरी त्यांच्या कर्तॄत्वाला लोक म्हणूनच मान देत असतात. क्लिंटन, ओबामा, बुश असोत किंवा देवेगौडा वगैरे असोत. त्यांनी पुढल्या काळात आपल्या पदाची शान राखण्यासाठी अलिप्तपणे जगाकडे बघण्याचा शहाणपणा दाखवला आहे. पवारांची गोष्ट वेगळी नाही. वयाची ऐंशी वर्षे होत आल्यावर त्यांनी आपल्या शब्द व विधानात एक जबाबदारीचे वजन राखण्याची गरज आहे. त्याचे भान त्यांना उरलेले नाही. म्हणून कुठल्याही बाबतीत बेताल बोलण्याचा प्रकार वारंवार होऊ लागला आहे. यांच्यापेक्षा पुतणे अजितदादा शहाणे म्हणायचे. त्यांनी सत्ता गमावल्यापासून आपल्या बोलण्याला खुप मर्यादा ठेवल्या आहेत. आताही भीमा कोरेगावचा विषय पेटला असताना पवार कुठल्या हेतूने बिनबुडाची विधाने करीत आहेत? पुण्यातल्या काही संघटनांनी वडू वा भीमा कोरेगावच्या गावांमध्ये जाऊन जातीय तेढ माजवली असे त्यांना ठाऊक होते, तर त्यांनी शासनाला कळवण्याचे कर्तव्य कशाला पार पाडले नाही? राज्यात नव्हेतर आपल्याच पुणे जिल्ह्यात धुमसू घातलेल्या आगडोंबाचा थांगपत्ता पवारांना नव्हता काय? नसेल तर ते जाणता राजा कशाला म्हणवून घेतात? थट्टामस्करी व थिल्लरपणा करण्याचे वय आपण केव्हाच ओलांडले आहे आणि आपण अतिशय नाजूक अशा संवेदनाशील वातावरणात काम करतो, याचेही भान त्यांना उरलेले नाही काय? कधीकाळी मराठी माणूस ज्याच्याकडे भावी पंतप्रधान म्हणून बघत होता, त्याचे असले चाळे बघून मराठी माणसाचे मन किती खट्टू होत असेल ना? सुनील गावस्कर विराट कोहलीला शहाणपण शिकवण्याचा आगावूपणा का करत नाही, हे क्रिकेटशी संबंधित पवारांना इतर कोणी सांगायला हवे काय?

Tuesday, January 2, 2018

अशीही इशरत जहान

Image result for isharat joins BJP

कालपरवा जे तिहेरी तलाक विरुद्धचे विधेयक लोकसभेत संमत झाले, त्यामागे सुप्रिम कोर्टाची प्रेरणा होती. त्यासाठी त्या कोर्टात दाद मागणार्‍या ज्या अनेक मुस्लिम तलाकपिडीत महिला होत्या, त्यामध्येही एक इशरत जहान होती. हे नाव आपल्याला अहमदाबादच्या वेशीवर एक तपापुर्वी झालेल्या चकमकीमुळे लक्षात राहिलेले आहे. पण ती पाकिस्तानी जिहादींच्या सोबत मारली गेलेली इशरत आणि आता प्रकाशात आलेली इशरत, यांच्यात मोठा फ़रक आहे. जाणता राजा शरद पवारांना पोटच्या पोरीगत वाटलेली इशरत ठाण्यजवळच्या कळव्याची आणि कॉलेजात शिकत असतानाही जिहादच्या धर्मांध हिंसेला प्रवृत्त झालेली मुलगी होती. उलट आज नावारुपाला आलेली इशरत जहान कोलकात्याच्या हावडा भागातील तलाकपिडीत मुस्लिम तरूणी आहे. तिच्या नवर्‍याने २०१४ सालात तिला दुबईतूनच फ़ोनवर तिहेरी तलाक देऊन वार्‍यावर सोडलेले होते. तर हिने कोर्टात दाद मागून नवर्‍याला धडा शिकवण्याचा चंग बांधला. त्याचेही कारण आहे. आता देशात कॉग्रेस वा पुरोगामी सरकार नसल्याने आपल्याला न्याय मिळू शकेल आणि मिळालेल्या न्यायाला दडपून टाकले जाणार नाही, अशी तिला खात्री वाटलेली होती. तिच्यासारख्या अनेक मुस्लिम महिलांना आज देशात खंबीर पंतप्रधान असल्याने किती दिलासा मिळाला आहे, त्याचे वेगळे उदाहरण द्यायला नको. अशा इशरतने आता थेट भाजपात येऊन राजकारण प्रवेश केला आहे. हावडा येथील भाजपाच्या कार्यालयात जाऊन तिने रितसर सदस्यत्व स्विकारले आणि तिचे भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी स्वागत केले. अर्थात असे तोंडी लावण्यापुरते मुस्लिम भाजपात आहेत वा दाखवले जातात, अशी पुरोगामी टवाळी अखंड चालू असते. पण म्हणून ती सत्य नसते. इशरत त्याचाच दाखला आहे. पण तिची महत्ता तितकीच नाही. तिची ताकद ममतांनाही भयभीत करून टाकणारी आहे.

गुजरात विधानसभा कालखंडात अकस्मात कॉग्रेसला पंडित नेहरू हे जानवेधारी हिंदू असल्याचा शोध लागला होता आणि त्याचा लाभ राहुलनी मंदिरांना भेटी देऊन उचलण्याचा खेळ केला. त्यातून बहुधा बंगालच्या मुख्यमंत्री ममता बानर्जींनाही त्या हिंदू असल्याचा शोध लागला आहे. कारण मागल्या सहासात वर्षात त्यांनी सातत्याने मुस्लिम धर्मांधांचे लांगुलचालन करण्याचा अतिरेक केलेला होता. पाकिस्तानचा गायक गुलाम अलीचा कार्यक्रम मुंबईत बंद पाडला गेल्यावर त्याला मुद्दामच सरकारी खर्चाने बंगालमध्ये आमंत्रित करण्यात आलेले होते. तिथल्या कडव्या धर्मांध बरकती नावाच्या मौलवीला महत्व देण्यात आले आणि मदरश्याच्या मौलवींना सरकारतर्फ़े अनुदान देण्यातही ममता पुढे होत्या. पण दुर्गापुजेच्या विसर्जनावर निर्बंध घालून व मोहरमच्या मिरवणूकांना सुविधा देण्यातून त्या अधिक बदनाम झाल्या. त्यांचे असले उपदव्याप बघून बंगालचा पुरोगामी हिंदू मतदारही थक्क झाला आणि त्याचे परिणाम मतांवर होताना दिसले. तेव्हा ममतांना आपण जन्माने हिंदू असण्याचा अचानक साक्षात्कार झालेला आहे. त्या साक्षात्काराची जागा सबंग नावाचा विधानसभा मतदारसंघ आहे. २०१६ च्या आरंभी झालेल्या विधानसभा निवडणूकीत तिथून कॉग्रेसचा आमदार निवडून आला होता आणि त्याच्याच मृत्यूमुळे तिथे पोटनिवडणूक झाली. या पावणे दोन वर्षात मतांमध्ये किती फ़रक पडला? आधी कॉग्रेसचा उमेदवार जिंकला होता आणि आता ती जागा तृणमूलने जिंकली. पण पावणे दोन वर्षापुर्वी भाजपाला तिथे अवघी ६ टक्के मते होती आणि आता ३७ टक्के मते मिळालेली आहेत. त्या गडबडीत कॉग्रेस व डाव्या आघाडीचे नामोनिशाण पुसले जाते आहे. इतकी म्हणजे ३२ हजार मते अकस्मात पुरोगामीची हिंदूत्ववादी होत नसतात. तर पुरोगामी ढोंगाला कंटाळून तो मतदार भाजपाकडे झुकत असल्याची ती साक्ष आहे.

बंगाल हे देशातील सर्वाधिक प्रमाणात मुस्लिम लोकसंख्या असलेले राज्य आहे. तिथे मुस्लिमांचा आशीर्वाद असेल त्यालाच सत्ता राखता येते आणि म्हणूनच भाजपातर्फ़े गेल्या दोनतीन वर्षात कटाक्षाने मुस्लिमांना पक्षाकडे आणण्याचा कार्यक्रम राबवला जात आहे. त्यात प्रामुख्याने तलाकपिडीत महिला व सुशिक्षीत मुस्लिमांना हाताशी धरण्याचे धोरण पद्धतशीर राबवले जात आहे. तिथे भाजपाची जी मुस्लिम आघाडी कार्यरत आहे, त्यातल्या महिला कुठेही तरूण विवाहितेला तलाक दिला गेला, की धाव घेतात. त्या तलाकपिडीतेला मदत देण्यापासून जनजागृतीचे काम हाती घेतले जाते. सहाजिकच मोठ्या संख्येने तलाकपिडिता किंवा तलाकच्या भयाखाली जगणार्‍या मुस्लिम महिला, भाजपाकडे ओढल्या गेल्या आहेत. तेवढेच नाही. आपल्या तरूण मुलीच्या असल्या यातनांनी व्यथित झालेले मातापिता व कुटुंबीयही त्यात ओढले जात आहेत. इशरत हे त्यातले लक्षणिय नाव आहे. किंबहूना गेल्या वर्षभरात तिहेरी तलाक विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उघड भूमिका मांडायला आरंभ केल्यापासून अनेक राज्यातील अशा तलाकपिडीता भाजपा व मोदींकडे मोठ्या अपेक्षेने बघत होत्या. त्याचा लाभ उठवून पक्षानेही तिथे आपले बस्तान बसवण्यात पुढाकार घेतला. त्याला प्रामुख्याने बंगालमध्ये मोठा प्रतिसाद मिळाला व मिळतो आहे. महिलाच नव्हेतर मुस्लिम तरूण व पुरूषही भाजपात येताना दिसत आहेत. तसेच होत राहिले तर मुस्लिम व्होटबॅन्क दिवाळखोरीत जाऊन ममता बानर्जी याचा विजय मल्ल्या होऊ शकेल. म्हणूनच मुस्लिमांच्या लांगुलचालनाला बाजूला ठेवून त्या आता हिंदूमतांची बेगमी करण्याकडे वळल्या आहेत. कारण इशरत जहानची महत्ता त्यांना नेमकी उमजलेली आहे. तलाकचा खटला सुप्रिम कोर्टात लढवणारी इशरत व मोदी यांचे एकत्रित पोस्टर यापुढल्या निवडणूकीत मतांना इकडून तिकडे फ़िरवण्यास चालना देऊ शकणार आहे.

पुरोगामी राजकारण्यांचे इथेच दिवाळे वाजलेले आहे. किंबहूना मुस्लिम व्होटबॅन्केच्या मागे धावण्याच्या अशा दिवाळखोरांच्या उतावळेपणाचा मोठा लाभ मुस्लिम मौलवी धर्ममार्तंडांनी उचलला आणि त्याचे दुष्परिणाम भोगावे लागलेले मुस्लिम पुरूष वा महिला संतापत गेलेले आहेत. म्हणून तर इशरत म्हणते मोदींमुळे आम्हाला न्याय मिळाला आणि यापुढे कुठल्या मुस्लिम विवाहितेला भयाच्या दडपणाखाली जगावे लागणार नाही. मुस्लिम महिला याचा अर्थ व्होटबॅन्केतील अर्धी ठेव आहे आणि तीच बुडीत जाणार असेल, तर अन्य बॅन्क शोधायला हवी ना? त्यातून राहुलना मंदिरात जाण्याची चटक लागली आणि आता ममता त्यांचे अनुकरण बंगालमध्ये करीत आहेत. खरे तर त्याची अजिबात गरज नाही. हिंदूंच्या धर्मांधतेच चोचले करण्याची काहीही गरज नाही. कारण हिंदू धर्माच्या नावाने कधी मतदान करत नाही. पण तुम्ही हिंदूविरोधी मानसिकतेतून अन्य गटांच्या धर्मांधतेचे चोचले करणार असाल, तर लोक तुमच्या विरोधात मताचे हत्यार उपसतात. पण फ़क्त धर्माच्या लांगुलचालनालाच पुरोगामीत्व समजून बसलेल्या दिवाळखोरांना हे कोणी समजवायचे? मोदी वा भाजपाला मुस्लिमांचे धार्मिक चोचले न करता मुस्लिम मतदार मिळवता येत असेल, तर हिंदूचे चोचले तरी कशाला हवेत? त्यालाच सबका साथ सबका विकास म्हटलेले आहे. पण ते समजण्यासाठी पुरोगामीत्वाच्या भ्रमातून बाहेर पडावे लागेल. इशरतसारख्या मुली व तलाकपिडीता भाजपाच्या मदतीला पुढे येत असतील, तर बंगालमधला तृणमूलचा डोलारा उध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही. डाव्यांचे साम्राज्य कसे कोसळत गेले, त्याच्या ममतादिदींच साक्षीदार आहेत. अंगावर पांघरलेली पुरोगामीत्वाची झुल उतरवून त्या समानतेच्या न्यायाने वागल्या, तरी त्यांना भाजपाच काय अन्य कोणी हरवू शकणार नाही. पण ढोंगीपणा चालूच ठेवला तर हावड्याची इशरत जहानही ममता संपवायला पुरेशी आहे.

कळपाची मानसिकता

 caste clashes mumbai के लिए इमेज परिणाम

झुंडीतली माणसं   (लेखांक पहिला)

दोन आठवड्यापुर्वीच्या दोन घटना लक्षणिय होत्या. पण त्यावर माध्यमात फ़ारशी चर्चा झाली नाही. त्यापैकी एक घटना स्पष्ट होती आणि दुसरी पुसटशी होती. गुजरात विधानसभा निवडणूकीत राहुल गांधी यांनी नेहमीपेक्षा खुप कष्ट घेतले होते आणि बर्‍याच मोदी विरोधकांना मोठा हुरूप आला होता. अखेरीस विधानसभेची मतमोजणी सुरू झाली आणि काही काळ त्यात भाजपापेक्षाही कॉग्रेसने अधिक जागांवर आघाडी घेतल्याचे ओझरते चित्र तयार झाले होते. सहाजिकच मोदींना त्यांच्या गुजरातमध्ये दणका बसण्याची स्वप्ने रंगवणार्‍यांना झिंग चढल्यास नवल नव्हते. पण अल्पावधीतच पुन्हा भाजपाने आघाडी घेतली आणि तो विषय तसाच मागे पडला. नंतर अर्णब गोस्वामी याने आपल्या रिपब्लिक वाहिनीवर त्याकडे बोट दाखवून ल्युटीयन्स दिल्लीच्या बुद्धीमंत व संपादकांची चांगली हजेरी घेतली. पण त्या उतावळेपणावर फ़ारशी कुठे चर्चा झाली नाही, होतही नाही. लोकसभा निवडणूकीतही कोणी मोदींना यशाची हमी देत नव्हता आणि एनडीए म्हणून तयार झालेल्या आघाडीलाही कोणी बहूमत देऊ इच्छित नव्हता. मात्र निकाल लागले तेव्हा एनडीए सोडाच, खुद्द भाजपालाच बहूमताचा पल्ला ओलांडता आलेला होता. पण देशातल्या कुणाही राजकीय अभ्यासक वा संपादकाला आपले आकलन कुठे व का चुकले, याचे आत्मपरिक्षण करायची गरज वाटली नाही. देशाच्या किंवा सव्वाशे कोटी भारतीयांच्या वतीनेच आपण बोलत असल्याचा आव आणणार्‍या अशा लोकांची भाकिते वा अंदाज इतके चुकीचे का ठरतात? त्याचे आत्मचिंतन त्यांनी नाही तर सामान्य जनतेने करावे काय? आणखी एक अशी घटना आहे ती लालूंच्या चारा घोटाळा प्रकरणातील दुसर्‍या खटल्याच्या निकालाची. तेव्हाही जवळपास सर्व वाहिन्यांनी लालूंची निर्दोष मुक्तता झाल्याची ब्रेकिंग न्युज दाखवून झाली होती. पण काहीक्षणात अशा लोकांना आपलेच शब्द गिळावे लागले होते.

गुजरात निकालात भाजपाची थोडी पिछेहाट झाली होती आणि नंतर २ जी घोटाळा खटल्यात युपीएच्या भ्रष्ट मंत्र्यासह सर्व आरोपींची पुराव्यावभवी मुक्तता झालेली होती. त्याच्या दुसर्‍याच दिवशी आदर्श घोटाळ्यातले आरोपी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर खटला भरण्यास राज्यपालांनी दिलेली परवानगी कोर्टाने फ़ेटाळली आणि ल्युटियन्स दिल्लीतल्या तमाम शहाण्यांना युपीए निर्दोष असल्याची लाट आल्याचे साक्षात्कार झालेले असावेत. मग त्याच क्रमात लालूंचा खटला आलेला होता आणि म्हणूनच त्यांना लालूही सुटणार, अशी आशा वाटली तर चुकीचे म्हणता येणार नाही. पण त्या खटल्याचा निकाल व्हायचा असताना आधी कोर्टाने अन्य एका खटल्यातील आरोपीला पुराव्याअभावी मुक्त केले. त्याचे वकील बाहेर येऊन ती माहिती देत असताना, अनेक वाहिन्यांकडून उतावळेपणाने तो निकाल लालूंसाठी असल्याच्या समजूतीने चुक झालेली होती. यातला मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. त्यातले अनेकजण दिल्लीकर विचारवंत संपादक लालूंचे समर्थक अजिबात नाहीत. उलट अशाच लोकांनी कधीकाळी लालूंना चारा घोटाळ्यातला आरोपी म्हणून यथेच्छ बदनाम केलेले आहे. पण आज लालू मोदी विरोधातले आघाडीचे योद्धा असल्याने दिल्लीच्या किंवा देशातल्या तमाम पुरोगामी शहाण्यांसाठी लालू गंगास्नान केल्यासारखे पवित्र आहेत. त्यामुळेच लालूंना व पर्यायाने युपीएच्या पापक्षालनाच्या बातम्या देण्यासाठी उत्सुक असलेल्यांनी ती चुक केलेली होती. पण त्याचा गाजावाजा झाला नाही. मुद्दा तेवढा किंवा तोच नाही. स्वत:ला शहाणे व विचार करणारे लोक समजणार्‍यांकडून असा मुर्खपणा वा चुका होतात कशा? सत्य समोर येईपर्यंत किंवा सत्य समोर आल्यानंतरही त्यांना ते स्विकारण्याची सारासार बुद्धी कशाला नसावी? रस्त्यावरच्या झुंडी व विचार करू शकणार्‍या शहाण्यांमध्ये काही फ़रक असतो की नाही?

सुशिक्षित शहाणा वा सामान्य बुद्धीचा अडाणी, असा माणसात कुठलाही फ़रक नसतो. प्रत्येक माणसाची बुद्धी व विचार करण्याची क्षमता कमीअधिक असली, तरी अखेरीस तो माणूस असतो आणि मानवी भावना विकारांपासून त्याची मुक्तता असू शकत नाही. क्लिंटन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते, तरीही त्यांना एका तरूण मुलीच्या आकर्षक देहापासून स्वत:ला आवरता आले नाही. ही त्यांच्यातल्या बुद्धीपेक्षा ते माणूस असल्याची साक्ष असते. तशीच इतरही माणसे कितीही अडाणी वा विचारवंत असली, तर मुलत: माणसेच असतात आणि त्यांनाही आपल्या भावना व विकारांपासून सहजासहजी अलिप्त होता येत नसते. निसर्गाच्या रचनेत माणुस एक पशू वा सजीव आहे आणि निसर्गाने ज्या मर्यादा त्याला घालून दिलेल्या आहेत, त्यावर मात करणे माणसाला क्वचितच साधलेले आहे. अशा लोकांकडे आपण अपवाद म्हणून बघितले पाहिजे. बाकीची माणसे कमीअधिक बुद्धीची असली तरी माणूस नावाचा पशूच असतात आणि त्यातले सर्व गुणदोष त्याच्यातही तसेच्या तसे असतात. नागरी मूल्ये पाळणारा प्राणी म्हणून जो माणूस ओळखला जातो, तो एक मुखवटा असतो आणि त्याच्याआड असलेला पशूच अखेरीस निर्णायक असतो. जेव्हा कसोटीची वेळ येते, तेव्हा ज्याचा साक्षात्कार होतो, तोच खरा असतो. मग तो किती सुशिक्षित आहे आणि किती बुद्धीमान वा अडाणी आहे, यामुळे कोणताही फ़रक पडत नाही. एकूण पशूंप्रमाणेच माणूसही कळपाने वागणारा व जगणारा प्राणी असतो. म्हणूनच तो कुठल्याही बाबतीत कळपाच्या वृत्तीने प्रतिसाद देताना वा पुढाकार घेताना दिसतो. उपरोक्त घटना वा अनेक प्रसंगी म्हणूनच असे शहाणे विचारवंतही तसेच बेताल वागलेले आपल्याला दिसतात. त्यांनी वैचारिक मंथनातून घेतलेला निर्णय असे कितीही काही भासवले, तरी प्रत्यक्षात त्यात एक कळपवृत्ती वा झुंड सामावलेली असते.

गेल्या चार वर्षात भक्त किंवा मोदीभक्त असे एक विशेषण प्रचलीत झालेले आहे. म्हणजे ज्यांना मोदी आवडतात वा जे कोणी मोदींचे समर्थन करतील, त्यांची हेटाळणी करण्यासाठी हा शब्द वापरला जातो. त्यामागचा हेतू साफ़ असतो. जे कोणी भक्त असतात, ते विचार करत नाहीत किंवा त्यांची बुद्धी निकामी झालेली आहे, असे त्यातून सूचवायचे असते. पण जितके भक्त आहेत तितक्याच प्रमाणात मोदी विरोधक दिसतील. तेही तितक्याच तावातावाने मोदींच्या विरोधात आवेशपुर्ण बोलताना लिहीताना दिसतील. त्यापैकी कितीजण विचारपुर्वक तसे बोलत लिहीत असतात? कुठेतरी एकाने मोदींचे समर्थन करणारे लिहिल्या बोलल्यावर त्याचे आंधळे समर्थन चुकीचे असेल. पण व्यक्तीगतरित्या कोणाला मोदींची कृती पटली असेल, तर त्याला भक्ती म्हणता येणार नाही. उलट मोदी विरोधातही तसाच आंधळा विरोध आवेशात होताना दिसतो. गुजरातमध्ये मोदींना राहुलनी घाम आणला, किंवा थोडक्यात भाजपाची सत्ता वाचली, तर त्याला आपला पुरोगामी विजय संबोधणारे किती विचारपुर्वक भूमिका मांडत होते? राहुल वा कोणा पुरोगाम्याने भाजपा विजयाला नैतिक पराभव ठरवले आणि तात्काळ जे लोक नैतिक विजय वा पराजयाच्या गोष्टी बोलू लागले; त्यांना भक्त म्हणण्य़ापेक्षा कोणते वेगळे संबोधन लावता येईल? पण मुद्दा भक्ती वा आंधळेपणाचा नाही, तर प्रवृत्तीचा आहे. असे आवेशपुर्ण बोलणारे वा आंधळेपणाने विरोधाच्या समर्थनाच्या भूमिका घेणारे, सारखेच निर्बुद्ध असतात. त्यांच्यापाशी स्वत:ची आकलनशक्ती वा बुद्धी नसते, तर कळपाने अमूक बाजूने वळण घेतले, मग ते डोळे उघडून समोर बघण्यापेक्षा बिनदिक्कत तसे वळण घेत असतात. त्यानुसार आ्पली बुद्धी वाकवत वळवत असतात. त्यालाच पशूची कळपवृत्ती वा झुंडशाही म्हणतात. शहाणे असोत किंवा निर्बुद्ध लोक असोत, ते जेव्हा झुंडीसारखे वागू लागतात, तेव्हा बुद्धीचा विषय आपोआप निकालात निघालेला असतो.

अर्थात प्रत्येक माणूस आपण बुद्धी वापरतो, अशी ठाम समजूत घेऊनच जगत असतो. मग त्यात भक्त कोणाला म्हणायचे? उपरोक्त दोन घटना बघितल्या तर त्यात वास्तवाला सामोरे जाण्यापेक्षा ज्यांनी गुजरात पराभवाचा आनंदोत्सव सुरू केला ते, किंवा लालूंना निर्दोष मुक्त केल्याच्या बातम्या देणारे बुद्धीमान कसे म्हणता येतील? तेही भक्तांच्याच रांगेत उभे असतात. प्रत्येकाचे दैवत वेगवेगळे असते. कारण ज्याच्यापाशी स्वतंत्र बुद्धी असते आणि विचार करण्याची कुवत असते, तो कळपाच्या मागे दौडत नाही. समोरची स्थिती बघून आपल्यापुरता निर्णय घेत असतो. तसे करताना आपल्याला नावडत्या व मनाविरुद्ध असलेल्या गोष्टीही समजून घ्याव्या लागतात. अलिकडल्या प्रसार व सोशल माध्यमांनी ती सुविधा माणसाकडून काढून घेतली आहे. विसाव्या शतकात प्रसार माध्यमे ठराविक कंपूच्या हाती होती. म्हणून ते जितकी महिती सर्वसाधारण माणसापर्यंत पोहोचू देत होते, त्यापेक्षा अधिक माहिती मिळवण्यासाठी लोकांना कष्ट घ्यावे लागत होते. आज सोशल माध्यमांनी जग इतके वेगवान झालेले आहे, की सामान्य माणसालाही आपल्या मनातले जगाला ओरडून सांगण्याची सुविधा सोपी व स्वस्त करून टाकलेली आहे. जगभरची माहितीही इंटरनेटच्या रुपाने सहजगत्या उपलब्ध झालेली आहे. पण ती माहिती खरी किती व परिपुर्ण किती, याची कोणी खात्री देऊ शकत नाही. त्याखेरीज अशी माहिती मुख्यत: तंत्रज्ञानावर आधारलेली असल्याने त्यातही तुमच्यापर्यंत कोणती माहिती यावी किंवा टाळली जावी, यावरही नियंत्रण राखले जाऊ शकते. म्हणूनच समोर येणारी माहिती तारतम्याने तपासण्याच्या बुद्धीला महत्व आहे. ते नसेल तर तुमच्याकडून तुमच्या नकळत मला हवे ते मी वदवून घेऊ शकतो. किंबहूना अन्य कुणाचे मत आपण आवेशात आपले म्हणूत तावातावाने मांडू लागतो. कारण आपल्या नकळत आपण कुठल्या तरी कळपाचे झुंडीचे एक सदस्य होऊन गेलेले असतो.

त्या नॅट जिओ किंवा डिस्कव्हरी वाहिन्यांवर दाखवतात त्या झेब्रे, रानरेडे व हरणांसह सिंह, जंगली कुत्र्यापेक्षा माणसाच्या झुंडी किंचीतही वेगळ्या नसतात. त्या झुंडीत सगळे जसे कळप मनोवृत्तीने वागतात, त्यापेक्षा आपण किती वेगळे असतो? अंगावरच्या कपड्यापेक्षा अन्य कुठला व कितीसा फ़रक दाखवता येईल? ही बाकीची सजीव मंडळी निसर्गाने त्यांना जे रूप बहाल केलेले आहे, तसे जगतात आणि माणसाला त्यांच्यापेक्षा अधिक बुद्धी दिली म्हणून माणसाने सजीवांपेक्षा आपले बाह्यरूप काहीसे बदलून घेतले आहे. आपण देखावा म्हणून अंगात कपडे घालून वावरतो, तितके झाकलेले असतो. पण जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन व मनातल्या गोष्टी यांचे परिशीलन केले, तर आपल्यातील पाशवीवृत्ती लपून रहात नाही. नेमक्या तशा व त्याच कळप मानसिकतेने आपले वागणे होत असते. आपणही आपले कळप बनवले आहेत, जातीपाती, वर्णभेद उभे केले आहेत. त्याच्यापलिकडे जाणार्‍या माणसात तशाच भिंती वैचारिक, सांस्कृतिक स्वरूपात उभ्या राहिलेल्या दिसतील. पण अशा प्रत्येक कळपाच्या विविध घडामोडीतल्या कळपवृत्ती वा झुंडीच्या मानसिकतेचा अविष्कार जसाच्या तशा पाशवी असतो. तितकाच क्रुर, निर्दयी व निष्ठूर असतो. कधी एकमेकांना रक्तबंबाळ करणारा असतो, तर कधी शब्दांनी विव्हल करून टाकणारा असतो. त्यातले माणूसकीचे वा संस्कृतीचे नाटक निव्वळ देखावा असतो. आपापल्या कळपाशी निष्ठा दाखवल्या जात असतात आणि त्यासाठी स्वतंत्रपणे विचार करून कृती करण्याचा अधिकार गहाण टाकलेला असतो. अन्यथा तुम्हाला कुठल्या कळपात वा झुंडीत सामावून घेतले जात नाही. कळपा बाहेरच्या कुठल्या कृतीचे नुसते समर्थन केले, तरी तुमचाच कळप तुमच्यावर इतके भेदक जिव्हारी घाव घालणारे हल्ले करतो, की तुम्हाला अगतिक करून टाकले जाते आणि निमूट तुम्ही कळपाला शरण जात असता.

थोडक्यात ज्याला आपण मानवसंस्कृती म्हणतो, ती पाशवी झुंडशाहीचा सुधारीत अवतार असतो. त्यातला पाशवी रक्तपात टाळण्याचा प्रयास केलेला आहे. बाकी इथेही तितकेच जंगली वातावरण कायम असते आणि झुंडी परस्परांशी लढत असतात, एकमेकांना नामोहरम करण्यासाठी उतावळ्या झालेल्या असतात. जबडे वा नख्यांपेक्षा सौम्य भासणारे धारदार शब्द आपण हत्यार बनवलेले आहेत. त्यातून काम झाले नाही तर विध्वंसाची विदारक हत्यारे शस्त्रास्त्रेही निर्माण करून ठेवलेली आहेत. म्हणूनच जगाचे वा मानवी समाजाचे प्रश्न व गुंतागुंत समजून घ्यायची, तर कळपाची मानसिकता समजून घेतली पाहिजे. हजारो वर्षाच्या इतिहासात माणसाने बुद्धीच्या बळावर आपल्याहून शक्तीशाली व बलदंड सजीव सृष्टीला आपले गुलाम करून टाकले. त्यातल्या अमानुषतेने हा इतिहास भरलेला आहे. कुठल्याही हिंस्र पशूलाही लाजवेल इतकी पाशवी कृत्ये माणसाने झुंडीच्या रुपाने केलेली आहेत. पण त्याचवेळी या मानवी झुंडींनी निसर्गालाही थक्क करून सोडणारे भौतिक चमत्कारही घडवलेले आहेत. त्याचे विवेचन व विश्लेषण विश्वास पाटील या व्यासंगी मराठी लेखक अभ्यासकाने करून ठेवलेले आहेत. ‘झुंडीचे मानसशास्त्र’ या ग्रंथातून त्यांनी अतिशय मेहनतीने मानवी संस्कृतीतला हा विरोधाभास सविस्तर मांडला आहे. पण त्यांची भाषा क्लिष्ट असल्याने त्याचा सोप्या भाषेत व सविस्तर गोषवारा आवश्यक आहे. मानवतेचा मुखवटा टरटरा फ़ाडून टाकणार्‍या या पुस्तकातला एखादा परिच्छेदही एका स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकतो. इतके गहन अभ्यासपुर्ण विवेचन त्यात विश्वास पाटिल यांनी केलेले आहे. पुढल्या काही लेखातून तेच काम करायचा व त्यातल्या विविध सिद्धांतांना प्रासंगिक उदाहरणांनी समजावण्याचा माझा प्रयत्न असेल. पण मुळात प्रत्येकाने पाटलांचे हे ‘झुंडीचे मानसशास्त्र’ वाचावे व त्याचे बारकाईने परिशीलन करावे असेच मला वाटते.
http://www.inmarathi.com/

पुरोहित आणि कुलभूषण

aiyar manmohan के लिए इमेज परिणाम

गेल्या आठाड्यात अनेक महत्वाच्या घटना घडल्या. त्यात पाकिस्तानी कब्जात असलेल्या कुलभूषण जाधवच्या आई व पत्नीला पाकच्या अधिकार्‍यांनी दिलेली वाईट वागणूक हा जसा विषय आहे, तसाच कर्नल पुरोहित यांच्यावरून दहशतवादाचा कलंक पुसला जाण्याचाही विषय आहे. दोन्ही विषय पुरोगामी जगतावर चांगलेच शेकलेले आहेत. कारण जितक्या उत्साहात इथले पुरोगामी जिहाद व इस्लामी दहशतवादाचे समर्थन करण्यासाठी माणूसकीचा मुखवटा पांघरतात, तितका उत्साह त्यांच्यापैकी कोणी कुलभूषणच्या आई पत्नीच्या छळाविषयी दाखवला नाही. खरे तर अशा लोकांकडून तशी अपेक्षा बाळगणेही गैरलागू आहे. पण योगायोग असा, की त्याच दरम्यान मागली नऊ वर्षे देशात माजवल्या गेलेल्या पुरोगामी कारस्थानाचा मुखवटाही फ़ाडला गेला. हिंदू दहशतवाद म्हणून गेली नऊ वर्षे पुरोहित व काही लोकांना गजाआड डांबलेले होते आणि कसल्याही पुराव्याशिवाय त्याचाच अखंड डंका पिटला जात होता. ते थोतांड खरे सिद्ध करण्यासाठी कायद्याशी व न्यायाशीही पोरखेळ खेळला गेला होता. त्याचे पितळ उघडे पडले आहे. कारण पुरोहित व अन्य आरोपींच्या विरोधातला दहशतवाद व मोक्का, असे दोन्ही आरोप सत्र न्यायालयाने झटकून टाकलेले आहेत. मग इस्लामी दहशतवादाला तोंड देण्य़ासाठी तयार करण्यात आलेले हिंदू दहशतीचे हत्यार गमावलेल्यांनी रडगाणे सुरू केले तर नवल नव्हते. अर्थात त्यांची भाजपा वा संघाच्या विरोधात कारस्थानी नाटके नवी नाहीत. पण त्यात त्यांनी पुरोहित सारख्या एका देशप्रेमी लष्करी अधिकार्‍याला गोवून, त्याचा अनन्वीत छळ केला. सरकारची यंत्रणा वापरून पोलिस व अन्य अधिकारात या कुशल अधिकार्‍याचा अमानुष छळ करण्यात आला होता. जे लोक देशद्रोही कारवाया शोधून त्याचा बंदोबस्त करण्यात गुंतलेल्या भारतीय सैन्याधिकार्‍याला खच्ची करण्यासाठी इतके कष्ट घेतात, ते कुलभूषणसाठी दोन अश्रू कशाला ढाळतील?

अशा लोकांचे भाईबंद पाकिस्तानात बसून कुलभूषणचे अपहरण करतात. त्याच्याकडून खोटेनटे कबुलीजबाब वदवून घेतात आणि त्याच लोकांच्या पैशावर चालणार्‍या कुणा संस्थेने दिलेल्या मेजवान्या आपले पुरोगामी पाकिस्तानात जाऊन झोडत असतात. मग त्यांच्यासाठी पुरोहित व कुलभूषण यात कुठला फ़रक पडतो? भारतीय देशप्रेमी व्यक्ती वा सैनिकाला छळणारे गद्दार देशी आहेत, की पाकिस्तानचे पोलिस आहेत, याच्याशी पुरोगाम्यांना कसला फ़रक पडणार असतो? कुठूनही भारतातील राष्ट्रवाद व देशप्रेम खच्ची होण्याशी मतलब असतो. म्हणून तर त्यांच्यातले कुशल पाकप्रेमी वकील, आपली बुद्धी अफ़जल गुरू वा याकुब मेमनसाठी पणाला लावतात. पण त्यातल्या एकालाही पुरोहित यांच्या छळवादातला अमानुषपणा दिसत नाही, की जाणवत नाही. त्याच्यासाठी न्यायालयात जाऊन दाद मागण्याची इच्छा होत नाही. हा आजचा पुरोगामी चेहरा आहे. त्यांना पुरोहितला न्याय देण्यापेक्षा छळवाद करण्यात धन्यता वाटली असेल, तर त्यांनी कुलभूषणसाठी अश्रू का ढाळवेत? योगायोगही समजून घेण्यासारखा आहे. पाकिस्तानने कुलभूषणवर त्यांच्या देशात घातपात केल्याचा आरोप ठेवला आहे. तो खोटा असल्याचा भारताचा दावा आहे. पण भारतातही असाच आरोप एका सेवेतील भारतीय अधिकार्‍यावर ठेवला गेला. त्याचा तसाच छळ भारतीय तुरूंगात झाला, तेव्हा देशात कोणाची सत्ता होती? पुरोगामी युपीए सत्ता होती ना? जे काही आरोप आज पाकिस्तान कुलभूषण जाधव यांच्यावर करीत आहे, तेच मागल्या नऊ वर्षात इथल्या पुरोगामी सरकार व पुरोगामी पक्षांनी पुरोहितांवर केलेले आहेत. ह्याला निव्वळ योगायोग मानता येत नाही. आताही सत्ता गमावल्यावर मनमोहन सिंग व अन्य पुरोगामी नेते तितक्याच अगत्याने इथे पाकिस्तानी नेते अधिकार्‍यांना मेजवान्या कसल्या देत असतात?

गुजरातच्या निवडणूक प्रचारात अशा मेजवानीचा उल्लेख मोदींनी केला, तर त्यावर हे लोक खवळले होते आणि पुरावे मागत होते. पण तिथे काय शिजवले गेले, त्यावर मौन धारण करून आहेत. आपण दोन देशातील संबंध सुधारण्याच्या बाबतीत चर्चा केली, असे माजी सेनाप्रमुख दीपक कपूर यांनी जाहिरपणे सांगितलेले आहे. पण ज्या घरात ही मेजवानी झाली, त्याचे दोन देशातील संबंधाविषयीचे सुत्र काय आहे? पाकिस्तानने मोदींना भारताच्या सत्तेवरून हटवण्यात कॉग्रेसला मदत करावी, मगच दोन देशातील संबंध सुधारतील, ही मणिशंकर अय्यर यांची जाहिर भूमिका आहे ना? मग त्यांच्याच घरात मेजवानी झाली व पाकिस्तानी मुखंडांना बोलावण्यात आले’; तर तिथे मोदींना संपवण्यापलिकडे कुठली खलबते शिजू शकतात? किंवा आणखी एक शक्यता आहे. पाकिस्तानचे व त्यांच्या इथल्या बगलबच्च्यांचे कारस्थान मागल्या काही महिन्यात पुर्णपणे उधळले गेल्याने डागडुजी करण्यासाठी त्ती मेजवानी योजलेली होती काय? २०१७ च्या मध्यास कुलभूषणला फ़ाशी देण्याचा पाकिस्तानचा डाव आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या निकालामुळे उधळला गेला. तसाच इथे कर्नल पुरोहितना संपवण्याचा डावही सुप्रिम कोर्टाने जामिन दिल्यामुळे उध्वस्त झाला. असा दुहेरी फ़टका बसल्याने विचलीत होऊन ही खलबते झालेली असतील काय? आधीच्या दहा वर्षात देशाची अधिकाधिक हानी व नुकसान करीत पाकला शिराजोर करून ठेवण्यापेक्षा या पुरोगामी सत्ताधार्‍यांनी काय केले होते? त्यात पुरोहितांना होरपळावे लागले. ते लष्करात म्हणजे सेनादलाच्या गुप्तचर विभागात काम करत होते आणि म्हणूनच त्यांना पाकचे हस्तक असलेल्या अनेक गद्दारांची नेमकी माहिती मिळालेली असू शकते. म्ह्णूनच त्याना दहशतवादी ठरवुन काटा काढण्याचा डाव खेळला गेला. पाकिस्तानात आता वेगळ्या प्रकारे तोच डाव खेळला आहे आणि त्यात कुलभूषणला छळण्यात आलेले आहे.

जे आरोप कुलभूषणवर पाकिस्तानने केले आहेत, तेच नेमके काम भारतात पुरोहित करत होते आणि त्यांना अमानूष वागणुक देऊन छळणार्‍या सरकारला देशहिताची सत्ता म्हणता येईल काय? असे सरकार मतदाराने साडेतीन वर्षापुर्वी जमिनदोस्त केले, म्हणून त्यातून पुरोहित यांची मुक्तता होऊ शकलेली आहे. मात्र पाकिस्तानातच खितपत पडलेल्या कुलभूषणची अजून सुटका झालेली नाही. पण दोन्ही प्रकरणातला कुटील मेंदू समान निर्णय घेताना दिसेल. दोघांच्या विरोधात खोटे कुभांड रचून न्यायसंस्थांचा वापर त्यांना छळण्यासाठी झालेला आहे. कुठल्याही पुराव्याशिवाय दोघांना दिर्घकाळ सडवण्याचे कारस्थान जसेच्या तसे समान आहे. फ़रक इतकाच आहे. आहे, की कुलभूषणला छळणारी यंत्रणा पाकिस्तानची सरकारी व्यवस्था आहे. इथल्या पुरोगाम्यांनी भारतातही देशभक्त सैनिकाला जगणे अशक्य करून सोडलेले होते. मग प्रश्न असाही पडतो, की युपीएच्या दहा वर्षात भारतातले सरकार कुणाच्या इशार्‍यावर चालत होते? ज्यात इशरत जहानला निर्दोष ठरवण्यासाठी अर्धा डझन ज्येष्ठ पोलिस अधिकार्‍यांना मारेकरी ठरवले गेले. त्यासाठी गृहखात्याच्या महत्वपुर्ण कागदपत्रात खडाखोड व हेराफ़ेरी करण्यात आली. पुरोहितांना विनाचौकशी व विनापुरावा  छळ्ण्यात आले. हे सर्व पाकिस्तानला हवे तसेच होत गेले असेल, तर भारत सरकार मनमोहन, सोनिया वा चिदंबरम चालवत होते, यावर कोणी विश्वास ठेवावा? याकुब व अफ़जल यांना सोडवण्यासाठी आकाशपाताळ एक करणार्‍यांना पुरोहितसाठी पाझर फ़ुटत नाही, त्यांच्या माणूसकीवर कोणी विश्वास ठेवावा? देशात सत्तांतर झाल्यानंतरही छुप्या मेजवान्या उठवून पंतप्रधानाला नीच संबोधण्यापर्यंत मजल जात असेल, तर देश किती पोखरला गेला आहे, त्याचा अंदाजही अंगावर शहारे आणतो. कुलभूषण वा पुरोहितांसारखे सुपुत्र या भूमीत जन्मले म्हणून तो टिकून राहिला म्हणायचे.

Monday, January 1, 2018

बदमाशांची टोळी

Image result for kumar arawind ashutosh

चार वर्षापुर्वीच्या लोकपाल आंदोलनातून आम आदमी पक्ष नावाची एक संघटना जन्माला आली. तिची व्याप्ती मुळातच दिल्लीपुरती होती. स्थानिक पातळीवर काम करत आपले स्थान व समर्थक निर्माण करणार्‍या अरविंद केजरीवाल यांनी अण्णा हजारे व तत्सम इतरांचा खुबीने वापर करून, ह्या पक्षासाठी पाया तयार केला होता. शिवाय त्यांनी माध्यमातील काही मुखंडांना हाताशी धरूनही आपली प्रतिमा उभारून घेतली होती. जेव्हा असा काही तमाशा सुरू होतो, तेव्हा आसपासचे रिकामटेकडे त्यामध्ये अलगद सामील होतात आणि भरकटतात. प्रशांत भूषण नावाचे अनुभवी वकील, किंवा योगेंद्र यादव यांच्यासारखे अभ्यासू प्राध्यापक त्यात सहभागी झाले. किरण बेदी यांच्यासारख्या जाणात्या प्रशासकीय अधिकारी व कुमार विश्वाससारखे लोकप्रिय कविही त्यात स्वत:ला झोकून मोकळे झाले. इतका तमाशा रंगल्यावर मेधा पाटकर किंवा इतर काहीजणांचे राजकीय ब्रह्मचर्य संपुष्टात आले नसते, तरच नवल होते. पण या लोकांना उल्लू बनवण्याची क्षमता असलेल्या केजरीवाल वा दिल्लीतल्या भामट्या संपादक पत्रकारांना तितक्या सहजपणे सामान्य भारतीय मतदाराला मुर्ख बनवता आले नाही. मात्र अन्य बुद्धीमान बेअक्कल तरीही केजरीवाल यांच्या मोहजालात गुरफ़टून पडलेले होते आणि त्यांचा पुरता लाभ केजरीवाल घेत होते. आपण सामान्य माणसे पुढच्याच ठेच मागचा शहाणा, ह्या नियमाने वागतो. समोरच्या कोणाला दणका बसला तर सावध होऊन जातो. पण शहाण्यांना प्रत्येक अनुभव स्वत:ला घेऊनच मरायची हौस असते. तसे नसते, तर कुमार विश्वास या हुशार कविवर्याला आज इतके अपमानित होऊन बसावे लागले नसते. ज्या केजरीवालचे ढोल वाजवले, तोच चांगुलपणाचे बारा वाजवताना हतबल होऊन सहन करण्याची वेळ भूषण यादव यांच्यावर आली नसती, की आज कुमार विश्वास यांच्यावर आली नसती. 

अण्णांशी फ़ारकत घेऊन केजरीवाल यांनी राजकारणात उडी घेतली, तेव्हा किरण बेदी यांनी त्यांची साथ सोडली होती. पण इतर मंडळी त्यानाच चिकटून बसली होती. त्यात पहिला भ्रमनिरास शाझिया इल्मी व काही लोकांना झाला आणि त्यांनी नाराजी बोलून दाखवायला सुरूवात केली. तर केजरीवाल यांनी कुटीलपणे त्यांचा परस्पर काटा काढला होता. मग जी काही नाटके रंगवली त्यात टाळ्या पिटणारे म्हणून भूषण, यादव किंवा विश्वास यांचाही उपयोग करून घेतला. मात्र दुसर्‍यांदा विधानसभेत यश मिळवल्यानंतर एकेकाला केजरीवाल खड्यासारखे बाजूला करत गेले. भूषण-यादव यांना तर रितसर गुंड अंगावर घालून पळवून लावण्यात आले. खरे तर त्यावेळीच कुमार विश्वास यांनी सावध होण्याची गरज होती. भूषण यांनी आपल्या खिशातून एक कोटी रुपये देणगी देऊन पक्षाच्या कार्याला आरंभ करून दिलेला होता. त्यांच्यावर केजरीवाल यांनी नंतर पक्षच बळकावत असल्याचा आरोप करून पळवून लावले होते. जे केजरीवाल मुख्यमंत्री म्हणून भ्रष्ट साथीदारांना पैसे खाण्याची व गरीबांची लूट करण्याची मुभा देत होते, त्यांनी भूषण यांच्यावर आरोप करण्यातला धडधडीत खोटेपणा बघूनही नजरेआड करण्यातून विश्वास यांनी आपली विश्वासार्हता संपवली होती. आपली प्रतिमा उभी करण्यासाठीच केजरीवाल यांना अशा प्रतिष्ठीतांची गरज होती. ती सार्वजनिक ओळख निर्माण झाल्यावर हे सर्व लोक निव्वळ अडगळ झाली होती. त्यांनी आपणहून बाजूला व्हावे ही अपेक्षा पुर्ण झाली नाही, तेव्हा केजरीवालनी त्यांन जवळपास धक्के मारून पक्षातून हाकून लावले. मग आपला पुढचा नंबर आहे याचे भान विश्वासना आलेले नसेल, तर त्याचे खापर केजरीवाल यांच्या माथी मारण्यात अर्थ नाही. कधीतरी आपल्यालाही सत्तेची फ़ळे चाखता येतील, या आशेवर पक्षामध्ये टिकून रहाताना विश्वास यांनी ठेवलेला विश्वास आता संपला आहे.

दिल्लीच्या ७० आमदारांच्या विधानसभेतून दर सहा वर्षांनी राज्यसभेच्या तीन सदस्यांची निवड होत असते. यावर्षी त्या तीन जागा मोकळ्या होत असून, विधानसभेत ६७ आमदार असलेल्या आम आदमी पक्षाला सर्व म्हणजे तिन्ही जागा जिंकणे शक्य आहे. पण तिथे कोणाला उमेदवारी मिळणार हा गहन प्रश्न आहे. राज्यसभेमध्ये जाणार्‍या व्यक्तीला अधिकारही मिळतात आणि म्हणूनच असा सदस्य दिल्लीच्या मुख्यमंत्र्या इतका प्रभावशाली होऊ शकतो. केजरीवाल यांना तिथेच अडचण आहे. आपण सोडून पक्षात इतर कोणाचे महात्म्य असता कामा नये, असा त्यांचा हव्यास आहे. म्हणूनच त्यांनी वर्षभर शक्ती पणाला लावून पंजाब विधानसभा जिंकण्याचा प्रयास केला होता आणि तिथला मुख्यमंत्री होण्याचे मनसुबे रचले होते. पण ते धुळीस मिळाले. लोकसभेतले चारही पक्ष सदस्य पंजाबचे आहेत आणि त्यातला कोणी केजरीवालना दाद देत नाही. म्हणूनच आता त्यांना संसदेचा स्वपक्षीय कोणीही सदस्य नको आहे. कुमार विश्वास त्याच आशेवर होते आणि त्यांची संधी हुकलेली आहे. किंबहूना अशा कुठल्याही सहकार्‍याला खासदारकी द्यायची नाही, म्हणून केजरीवाल यांनी वेगळी शक्कल लढवली होती. पक्षाबाहेरचे कोणी नामवंत घेऊन त्यांनाच आपतर्फ़े राज्यसभेत पाठवण्याची कल्पना मांडलेली होती. पण रघुराम राजन, माजी न्यायमुर्ती ठाकुर वा नोबेल विजेते कैलाश सत्यार्थी; अशा लोकांकडे तशी विचारणा करण्यात आलेली होती. पण केजरीवालना वाटले तितके ते बुद्दू नाहीत. आपला भूषण वा योगेंद्र होण्याचा धोका त्यांना कळतो. म्हणूनच त्यांनी विनम्रपणे ही ऑफ़र नाकारली. मात्र त्यात केजरीवाल यांचा सहकार्‍यांना वंचित ठेवण्याचा डाव उधळला गेला आहे आणि आता अर्ज भरण्याची मुदत जवळ आल्याने उमेदवार उभे करण्याची धावपळ झालेली आहे. त्यातून पक्षाची घालमेल समोर आलेली आहे.

आता मुदत संपण्यापुर्वी तीन उमेदवार मैदानात आणणे भाग आहे. त्यात विश्वास यांची वर्णी लागावी, म्हणून त्यांच्या समर्थकांनी पक्षाच्या कार्यालयाच्या बाहेर धरणे धरले आणि त्याविरुद्ध पक्षानेच पोलिसात तक्रार नोंदवली. यामुळे एक गोष्ट लक्षात येते, की कुठल्याही अन्य पक्षाच्या नेत्यापेक्षाही केजरीवाल व त्यांच्या पक्षाचे नेते अधिक निर्ढावलेले आहेत. ते अशा धरण्याला घाबरून बदलतील, अशी अपेक्षा बाळगता येत नाही. ‘पुरूष’ नावाच्या मराठी नाटकामध्ये असा बेशरम राजकीय नेता नाना पाटेकरने रंगवलेला आहे. ज्या तरूणीवर बलात्कार केला, तिचा पिता गांधीवादी थाटात त्या पुढार्‍याला दारात सत्याग्रह करण्याची धमकी देतो. तर पुढारी झालेला नाना उत्तरतो, अहो मास्तर सत्याग्रहाला घाबरणारे देश सोडून १९४७ सालातच विलायतेला निघून गेलेत. आम्ही सत्याग्रहाला घाबरत नाही. केजरीवाल त्याच वंशातले पुढारी आहेत. म्हणूनच सहकारी मंत्री बलात्कार खोटी प्रमाणपत्रे देऊन वा लाच मागून मोकळे झाले असताना; केजरीवाल अजून स्वच्छ राजकारणाचे हवाले देतातच ना? अशा बदमाशाकडून सभ्य वर्तनाची अपेक्षा कुमार विश्वास बाळगत असतील, तर ते मुर्खाच्या नंदनवनात बागडत असतात. लोकपाल आंदोलनाचे पावित्र्य कधीच संपले आहे. म्हणून तर अण्णांनी कालपरवा नव्या आंदोलनाची घोषणा करतानाच त्यातून नवा केजरीवाल जन्माला येऊ नये, अशी प्रार्थना केलेली आहे. त्याचा अर्थ कोणालाही सहज लक्षात येऊ शकतो. असली आंदोलने वापरून त्यात घुसलेले बदमाश मायावी सैतानाचा अवतार धारण करतात, असेच अण्णा सांगत नाहीत काय? विश्वास या कविला तेही उमजत नसेल तर त्याची कींव करावी लागेल. बदमाशांच्या टोळीत नव्या टोळीची भर, यापेक्षा केजरीवाल टोळीची अन्य ओळख असू शकत नाही. प्रचलीत राजकारणी परवडले, इतके या लोकांनी राजकारण बदनाम केलेले आहे.