मुंबई पुण्य़ाच्या शहरी जीवनाला आणि एकूणच माध्यमे व माहितीच्या भडिमाराने जीव व्याकुळ झाला, मग मी दोनतीन दिवस विश्रांती घ्यायला गावी जातो. अर्थात गावी म्हणजे परखड निर्भीड पत्रकार संपादक नसल्याने माझे तिथे फ़ार्महाऊस वगैरे काहीही नाही. एका गावकर्याच्या घरात एक छोटीशी खोली भाड्याने घेतली आहे आणि तिथे आटोपशीर संसार मांडलेला आहे. पोटभर जेवण आणि लोळायला पलंग, इतकेच फ़र्निचर आहे. बाकी गावकरी वा घरमालकाला उपलब्ध आहेत, त्याच घरगुती सुविधा पुरेशा आहेत. टिव्ही किंवा स्मार्ट फ़ोनही नसल्याने कटकटी आपोआप कमी होतात. जुना २-जी फ़ोन असल्याने उर्वरीत जगाशी संपर्क असतो आणि तोही पुरेसा वाटतो. पण बाकीच्या दगदगीतून पुर्ण मुक्ती मिळते. हा झाला नित्यजीवनाचा भाग. तसे ते मित्राचे गाव आहे. पण त्याच्यासोबत अनेकदा जाता जाता तिथले गावकरी असे जीवाभावाचे मित्र बनून गेलेत, की मीच एकटा जाऊन मुक्काम करतो. कारण मोठे चमत्कारीक आहे. शहरी जीवन व पत्रकार म्हणून असलेला मानसिक ताण, किंवा घालमेल अति झाली; मग त्या ओसाड दुष्काळी गावातील माया आपुलकी मोठे सुख असते. त्यापैकी कोणालाही मी कोणी पत्रकार आहे वा लेख छापून येतात, याचे अजिबात कौतुक नाही. आपल्यातला एक किंचीत शहाणा यापेक्षा मला अधिक किंमत नाही. पण तिथे त्या निरागस गावकरी वा तरूण पोरांशी गप्पा हाणताना बुद्धीला इतका रिचार्ज मिळतो, की पुढला महिना दिड महिना कितीही बौद्धिक अत्याचार सोसण्याची उर्जा मिळून जाते. अनेकदा तर आजच्यासारखे राजकीय पेचप्रसंग असताना मी गावात दोनचार दिवस मुक्काम ठोकलेला आहे. कारण तिथे अनेक राजकीय पेचप्रसंग वा कोड्याची अलगद उकल त्या सामान्य लोकांनी सहज करून दाखवलेली आहे. किंबहूना माझ्या लिखाणात त्यांचेच विचार सहजगत्या येऊन जात असतात. प्रामाणिकपणे सांगायचे तर मी त्यांच्याकडून चोरलेले असतात.
ही खेड्यातली माणसे इतकी व्यवहारी वास्तव जीवन जगत असतात, की अडचणी वा संकटावर मात करण्याची हिंमत त्यांच्याकडून शिकायला हवी असे वाटते. किमान अपेक्षा आणि कमाल धैर्य, हा त्यांचा पिंड असतो आणि मला खात्री आहे, की महाराष्ट्राच्या व देशाच्या कानाकोपर्यात पसरलेल्या लाखो गावातही हेच असेच असणार. कुठल्याही शाळा कॉलेज विद्यापीठात जे शिकता येणार नाही, इतके व्यवहारी ज्ञान तिथे उपलब्ध असते. याचा वारंवार अनुभव मी घेतलेला आहे. म्हणून तर सरकार स्थापनेचा गोंधळ माजलेला असताना कंटाळलेला मी बॅग भरली आणि गावचा रस्ता धरला. रविवार ते मंगळवार गावी मुक्काम होता आणि तिथल्याही लोकांना सरकार कधी स्थापन होईल, याविषयी उत्सुकता होती. पण गंमत अशी, की कोणालाही कोणाचे सरकार येण्याविषयी फ़ारशी उत्सुकता नव्हती. जशी उत्सुकता उत्कंठा आपण चोविस तास चालणार्या वाहिन्यांवर बघत ऐकत असतो, त्याचा मागमूस गावी नव्हता. तरीही मला गावी आलेला बघताच दोनही दिवस गावातल्या अशा लोकांचा घेरा पडलेला होता. न्हाव्यापासून चहाच्या टपरीपर्यंत, पतपेढीतही मला तेच तेच प्रश्न विचारले जात होते. पण शहरी चर्चा आणि गावातली चर्चा, यात एक मूलभूत फ़रक मला जाणवला. शहरी भागात कुठल्या पक्षाचे, कुठल्या आघाडीचे सरकार होईल किंवा कुठले पक्ष सत्तास्थापनेसाठी एकत्र येतील, त्यावरून हलकल्लोळ चालू आहे. या बाजूने वा त्या बाजूने आरोप खुलासे चाललेले असतात. पण त्या गावात कोणीही मला कुठले सरकार होईल याविषयी उत्सुकता दाखवली नाही. आजच्या स्थितीत कुठलेही वा कुणाचेही सरकार आले, तरी त्याच्यासमोर कुठले प्रश्न व समस्या आहेत, त्याविषयी तिथे उत्कंठा मात्र पुरेपुर होती. म्हणून प्रत्येकाचा मला एकच प्रश्न होता, जे कुठले सरकार येईल, ते किती दिवस चालेल? किती काळ टिकून राहिल वा कारभार करू शकेल? अशी सरकारे यापुर्वी कधी चालली आहेत का? नसतील तर का चाललेली नव्हती?
शिवसेना हिंदूत्ववादी वा जातियवादी आहे, किंवा कॉग्रेस राष्ट्रवादी पुरोगामी सेक्युलर आहेत. त्यांनी एकत्र येऊन सत्तास्थापन करणे योग्य आहे का? त्यांचे कितीकाळ वैचारिक सामंजस्य राहू शकेल? यापैकी कुठलाही प्रश्न त्या खेडूतांमध्ये नव्हता. कुठलाही पक्ष वा कुठल्याही पक्षाचा नेता अन्य कुठल्याही पक्षात सहजगत्या जाऊ शकतो आणि त्याविषयी कोणालाही काहीही आक्षेपार्ह वाटत असल्याचे जाणवले नाही. कुठूनही विधानसभेतील बहूमताचा आकडा जुळवून आणला, मग सरकार स्थापन होऊ शकते. त्या आकड्यांच्या बेरजेसाठी तत्वज्ञान वा विचारधारेशी जुळते पक्ष असायचे काहीही कारण नाही, याबद्दल गावकर्यात एकमत होते. सहाजिकच शिवसेना, राष्ट्रवादी व कॉग्रेस एकत्र येऊन सरकार स्थापन करू शकतात, याविषयी त्यांच्या मनात तीळमात्र शंका संशय नव्हता. चिंता एकाच गोष्टीची होती. जे बनेल ते सरकार टिकेल का? ते कारभार हाकण्यासाठी चालू शकेल का? किती काळ चालू शकेल? शिवसेना आपला सावरकरवाद कॉग्रेसच्या गळ्यात कसा बांधणार? राष्ट्रवादीची पुरोगामी विचारसरणी सेना कशी पचवणार? हे त्यापैकी कोणालाही सतावणारे प्रश्न नव्हते. त्यांच्यासाठी प्रश्न होता असे परस्पर विरोधातले सरकार किती काळ चालू शकेल हा आणि इतकाच होता. मला त्यांच्या व्यवहारवादी राजकीय समजूतीचे कौतुक वाटले आणि आपल्या वास्तवाशी काडीमोड घेतलेल्या पत्रकारितेची चक्क लाज वाटली. जी राजकीय स्थिती आज निर्माण झालेली आहे, त्यातून सरकार स्थापन होण्यात अडचण नाही, कारण आमदारांची बेरीज राज्यपालांना दाखवली म्हणजे सरकारचा शपथविधी होऊ शकतो. तीच बेरीज विधानभवनात सिद्ध केली म्हणजे सरकार बहूमताचे असल्याचेही सिद्ध होते. मुद्दा सरकार बनवण्याचा नसून चालवण्याचा असतो आणि तितकेच त्यांना उमजलेले आहे. अर्थात ते त्यांनाच समजलेले नव्हते, तर देशात एकहाती राजकीय हुकूमत प्रस्थापित करणार्या इंदिराजींनाही खुप पुर्वी समजलेले होते. त्याचे स्मरण झाले.
ही आकड्यांची वा बहूमताची लोकशाही नवी नाही. देशातल्या बुद्धीजिवी अभ्यासक विश्लेषकांना सोडून ती इतर सर्वांना समजलेली आहे. म्हणून बाकी देश निश्चींत असतो आणि वाहिन्यांवर जमून वा आपापल्या वर्तमानपत्रातून संपादक मंडळी वगैरे शोकाकूल झालेली असतात. इंदिराजींनी म्हणूनच कधी पत्रकार माध्यमांची फ़िकीर केली नाही आणि नरेंद्र मोदीही अशा संपादकीय सल्ल्यांना हिंग लावुनही विचारत नाहीत. इंदिराजींना काय उमजलेले होते? त्या माझ्या गावातील लोकांना काय कळलेले आहे? १९७९ सालची गोष्ट आहे. असाच पेचप्रसंग देशपातळीवर निर्माण झालेला होता. आणिबाणीनंतर कॉग्रेसला हरवून जनता पक्ष सत्तेत आलेला होता आणि रायबरेलीत खुद्द इंदिराजीही पराभूत झालेल्या होत्या. मात्र त्यानंतर जनता पक्षात कुरबुरी सुरू झाल्या आणि कॉग्रेसमध्येही दुफ़ळी झालेली होती. इंदिराजींनी वेगळी इंदिरा कॉग्रेस सुरू केली होती आणि जनता पक्षातून बाजूला होत चरणसिंग यांनी वेगळी चुल मांडलेली होती. त्यांचे खासदार बाजूला झाल्याने जनता पक्षाचे मोरारजी देसाई सरकार पडले आणि नवे सरकार स्थापन करण्याचे संकट उभे राहिलेले होते. तर मुळची कॉग्रेस व चरणसिंग यांच्या जनता पक्षाने एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याचे योजले होते. पण त्यांच्यापाशी संख्याबळ बहूमताचा पल्ला पार करू शकणारे नव्हते. तेव्हा त्यांना इंदिराजींनी आपल्या पक्षातर्फ़े बाहेरून पाठींबा दिलेला होता. म्हणून चरणसिंग पंतप्रधान तर यशवंतराव चव्हाण उपपंतप्रधान झालेले होते. राष्ट्रपतींनी शपथविधी उरकला आणि नंतर ते बहूमत लोकसभेत सिद्ध करण्याची वेळ आली. तेव्हा इंदिराजी शांतपणे एका मुलाखतीत पत्रकाराला प्रश्नाचे उत्तर देताना म्हणाल्या, मी सरकार बनवायला पाठींबा दिलेला होता, सरकार चालवायला पाठींबा दिलेला नाही. त्याचा परिणाम काय झाला? दोनतीन महिन्यात चरणसिंग यांना गाशा गुंडाळावा लागला होता. त्यांनी अधिवेशन सुरू होण्याच्या दिवशीच भवितव्य ओळखून राजिनामा दिला होता.
इंदिराजींनी कोणाचा पाठींबा काढून घेतला नव्हता, तर आकड्यांच्या वा बेरीज वजाबाकीच्या लोकशाहीतले महत्वाचे सुत्र सांगितले होते. तत्वज्ञान वा विचारधारेला धाब्यावर बसवून जेव्हा लोकशाही निव्वळ डोकी मोजणार्या आकड्यांची होते, तेव्हा सरकार स्थापन करणे सोपे असते, चालवणे शक्य नसते. सत्तास्थापनेतले हे सुत्र निर्णायक मोलाचे आहे. म्हणून वाहिन्यांच्या वातानुकुलीत स्टुडीओत बसून आकड्यांचे अंकगणित मांडून बनलेली सरकारे टिकत नसतात किंवा चालतही नसतात. सरकार चालवण्यासाठी गुंतागुंतीची बीजगणिते सोडवावी लागतात. त्यात विचारधारा, भूमिका वा धोरण कार्यक्रमांची अनाकलनीय अक्षरेही समाविष्ट असतात. चरणसिंग व यशवंतरावांनी लोकशाही आकड्याची समजून बहूमताचे सरकार स्थापन केले होते. त्यात अंकगणित जुळलेले होते. पण बीजगणित कुठेही साधलेले नव्हते. सरकार बनवून चालत नाही, चालणारे सरकार बनवण्याला प्राधान्य असते. अन्यथा रोजच्या रोज सरकारे स्थापन होऊन बारगळू शकत असतात. सहाजिकच इंदिराजी काय म्हणत आहेत, ते चरणसिंग यांच्या लक्षात आले. अधिवेशनात बहूमत सिद्ध करायला लोकसभेत जाण्यापेक्षा त्यांनी थेट पहिल्या दिवशी राष्ट्रपती भवन गाठले आणि आपल्या सरकारचा राजिनामा दिला होता. त्याला आता चाळीस वर्षे उलटून गेली आहेत. पण राजकीय अभ्यासक विश्लेषकांना सरकार चालवण्यासाठी काय हवे. त्याचा थांगपत्ता लागलेला नाही. मात्र आमच्या महिमानगड गावात चावडी वा टपरी, एसटी थांब्यावर चकाट्या पिटत बसलेल्या सामान्य गावकर्यांना इंदिराजींचे सुत्र नेमके अवगत झालेले आहे. म्हणून प्रत्येकजण मला एकच प्रश्न विचारत होता, सरकार किती काळ चालू शकेल? सरकार स्थापणे बनवणे सोपे आणि चालवणे अवघड असते, इतकीच लोकशाही त्यांना उमजलेली आहे आणि त्यांच्या मतांवरच नेते व आमदार खासदार निवडून येत असतात. म्हणून आपल्या देशातली लोकशाही तगलेली आहे.
असे राज्यशास्त्र शिकण्यासाठी मी नित्यनेमाने त्या गावी जात असतो. कुठल्याही सार्वजनिक बस वा रेलगाडीने प्रवास करीत असतो. लोकांचा संवाद ऐकत असतो. त्यांच्याशी संवाद साधत असतो. त्यातून खुप काही शिकायला समजायला मदत होत असते. पण ह्यावेळी मला साक्षात गुरू़च भेटले. मंगळवारी पुण्याला यायला निघालो आणि गावच्या स्टॅन्डवर एसटीची प्रतिक्षा करत थांबलो होतो. सव्वा तास बसचा पत्ता नव्हता आणि तिथेही भोवती घोळका होता. गप्पा चाललेल्या होत्या. इतक्यात शेजारच्या गावातले एक बुवा म्हणजे किर्तनकार तिथल्या टपरीत चहा प्यायला थांबले. बाहेरून आलेले होते आणि दिड किलोमिटर पायपीट करून घरी जाण्यापुर्वी चहा घ्यायला अडखळले होते. त्यांचा कान आमच्या गप्पात गुंतलेला होता. चहा उरकून बुवा निघाले आणि माझ्याकडे वळून म्हणाले, भाऊ जरा काम आहे. मी घोळक्यातून त्यांच्याकडे गेलो. तर मला थोडे नाराजीच्या सुरात बुवा म्हणाले, ह्या पोरांमध्ये काय बडबडत वेळ घालवता आहात? म्हटले बसची वाट बघता बघता गप्पा चालल्यात, त्यांनीही आम्हाला ऐकलेले होते. म्हणून ते उत्तरले अशा बडबडीने राजकारण समजत नाही. जीवनाचा पटही उलगडत नाही. जगण्याचा आशय समजणार नाही. नुसते लपंडाव खेळत बसल्यासारखे आयुष्य हातातून निसटून जाते. हाती उरते फ़क्त धुपाटणे. त्यापेक्षा तुकोबांची गाथा वाचा, माऊलींची ज्ञानेश्वरी वाचा. अभ्यास करा. मी पत्रकार आहे याची त्यांना पुन्हा आठवण करून दिली तर म्हणाले अहो तुमच्यासाठीही माऊलींनी खुप काही समजावून सांगितले आहे. वेळ काढून समजून घ्या, शिका. मी म्हटले, माऊलींनी? म्हणजे संत ज्ञानेश्वरांनी? त्यांचा विद्यमान राजकारण, राजकीय घडामोडी वा सरकार स्थापनेशी संबंधच काय? बुवा मनमोकळे हसले आणि म्हणाले माऊलींच्या दोनच ओळी सांगतो, बाकीचे भारूड काव्य शोधा आणि अगत्याने वाचा. विषय विविध पक्षांच्या सरकार स्थापनेतील सर्कशीचाच आहे ना? अशक्य ते शक्य करायला राजकीय पक्ष आणि नेते निघालेत ना? त्यांचे भवितव्य काय असेल? माऊलींनी म्हटले आहे. ‘काट्याच्या अणीवर वसले तीन गाव, दोन ओसाड एक वसेचिना’.
बुवा इतकेच बोलून निघाले आणि रात्री पुण्याला पोहोचल्यावर मी आधी नेट लावून त्या भारूड काव्याचा शोध घेतला तेव्हा धक्काच बसला. सरकार स्थापनेसाठी जी अशक्य वाटणारी कसरत मागले दोन आठवडे चालू आहे, त्या परिस्थितीचे वर्णन काही शतकापुर्वी ज्ञानेश्वर माऊलींनी खरोखरच नेमक्या शब्दात करून ठेवलेले आहे. जमल्यास प्रत्येकाने आपापली बुद्धी वापरून त्यातला आशय समजून घ्यावा.
काट्याच्या अणीवर वसली तीन गावें ।
दोन ओसाड एक वसेचिना ॥१॥
वसेचिना तिथे आले तीन कुंभार ।
दोन थोटे एका घडेचिना ॥२॥
घडेचिना त्याने घडली तीन मडकी ।
दोन कच्ची एक भाजेचिना ॥३॥
भाजेचिना त्यांत रांधले तीन मुग ।
दोन हिरवे एक शिजेचिना ॥४॥
शिजेचिना तेथे आले तीन पाहुणे ।
दोन रुसले एक जेवेचिना ॥५॥
जेवेचिना त्याला दिल्या तीन म्हशी ।
दोन वांझ्या एक फळेचिना ॥६॥
फळेचिना तिला झाले तीन टोणगे ।
दोन मेले एक जगेचिना ॥७॥
जगेचिना त्याचे आले तीन रुपये ।
दोन खोटे एक चालेचिना ॥८॥
चालेचिना तिथे आले तीन पारखी ।
दोन आंधळे एका दिसेचिना ॥९॥
दिसेचिना त्याला मारल्या तीन बुक्क्या ।
दोन हुकल्या एक लागेचिना ॥१०॥
ज्ञानदेव म्हणे याचा तो अनुभव ।
सद्गुरूवाचुनि कळेचिना ॥११॥
सत्य वचन.
ReplyDeleteबोलाचाच भात .. बोलाचीच कढी🤣🤣
ReplyDelete👌👌👌👌👌👌👌👌👌
ReplyDeleteDhanya aahat bhau tumhi....👍
ReplyDeleteअप्रतिम भाऊ
ReplyDeleteभाऊ, फारच भन्नाट होता आजचा लेख, तुम्ही तर नेहमीपेक्षा अधिक कमाल केलीत. ज्ञानेश्वर माऊलींच्या संदर्भाने तर वेगळीच अनुभूती मिळाली!!!
ReplyDeleteकाय बोलू हेच कळेना
ReplyDeleteसर मी आपल्या मताशी सहमत आहे पण प्राप्त परीस्थितीमध्ये जेव्हा भाजपा शिवसेना संपवण्यासाठी प्रयत्नशील आहे त्यामध्ये शिवसेनेसमोर कोणते पर्याय शिल्लक असणार.कारण मी ज्या मतदारसंघात आहे तेथील शिवसेनेचा विद्यमान आमदार पडावा म्हणून भाजपा नेतृत्वाने बंडखोर उमेदवाराला सर्व प्रकारची मदत पुरवली हे असं बऱ्याच ठिकाणी झालंय असं असताना शिवसेनेनं पक्ष म्हणून काय करायला पाहिजे
ReplyDeleteAadrniy Bhau , tumchysarkhe sadguru aahet, parantu, he political party wale, shisya honar nahi, aani sudharnar nahi.
ReplyDelete*काट्याच्या अणीवर वसली तीन गावे*
ReplyDelete🏹 🤝🏻
माउलींचे वरील भारूड आज अनेकांच्या व्हाट्सअप ग्रुपवर आले असेल . अनेकांनी वाचून ते इतरांना पुढे ही ढकलले असेल. मुळ लेखनकर्त्याने या भारुडाचा संबंध सध्याच्या महाराष्ट्रातील घडामोडी आणि सत्येसाठी ज्या तीन राजकीय पक्षांच्यात सत्ता स्थापनेसाठी चर्चा सुरु आहेत त्याच्याशी लावला आहे.
हे भारूड सध्याच्या परिस्थितीला कितपत लागू पडतंय हे ज्याने त्याने ठरवावे पण यानिमित्याने माउलींना अभिप्रेत असलेला अर्थ ( अर्थात या भारूडाचे निरूपण ) एका संकेतस्थळावर मिळाले , ते संक्षीप्त स्वरूपात इथे देत आहे 📝🚩
*काट्याच्या अणीवर वसली तीन गावें | दोन ओसाड एक वसेचिना* ||१|
काळ नावाच्या काट्यावर तीन गावें वसली आहेत
तीन गावे:- स्थुलदेह, सुक्ष्मदेह आणि लिंगदेह
दोन ओसाड:- स्थुलदेह, सुक्ष्मदेह हे नाशवंत म्हणून ओसाड
एक वसेचिना:- लिंगदेह हा अदृष्य, अनाकलनिय म्हणून वसेचिना
*वसेचिना तिथे आले तीन कुंभार | दोन थोटे एका घडेचिना* ||२||
तीन कुंभार = ब्रह्मा, विष्णु, आणि महेश्वर,
दोन थोटे = विष्णुआणि महेश्वर हे निर्मिती बाबत तटस्थ,
एका घडेचिना = एक कुंभार ब्रह्मा याचेकडे निर्मिती आहे पण तो वसवतो ते आत्मतत्व. याच अधारावर जो त्याचाच आधार आहे.
*घडेचिना त्याने घडली तीन मडकी | दोन कच्ची एक भाजेचिना ||३||*
तीन मडकी = स्थुलदेह, सुक्ष्मदेह, आणि लिंगदेहात्मक मडकी,
दोन कच्ची = स्थुलदेह, सुक्ष्मदेह नाश पावणारी कच्ची मडकी,
एक भाजेचिना = या लिंगदेहात अविनाशी आत्मतत्व आहे, यावर आग्निचा परिणाम नाही, म्हणून भाजण्याचा प्रश्नच नाही.
*भाजेचिना त्यांत रांधले तीन मुग | दोन हिरवे एक शिजेचिना ||४||*
तीन मुग = सत्व, रज ,तम
दोन हिरवे = रज तम हे हिरवे, कधीच पक्व न होणारे,
एक शिजेचिना = सत्व मात्र रांधण्याचा प्रश्नच नव्हता.
*शिजेचिना तेथे आले तीन पाहुणे | दोन रुसले एक जेवेचिना ||५||*
तीन पाहुणे = भूत, भविष्य, वर्तमान हे तीन काळ हे तेथील पाहुणे,
दोन रुसले = भूतकाळ रुसून बाजुला झाला, वर्तमान प्रत्येक क्षणाला रुसून मागे जात आहे,
एक जेवेचिना = भविष्य आजून नंबर न लागल्यामूळे जेवत नाही. म्हणून कर्म आद्याप उदित व्हायचे आहे.
*जेवेचिना त्याला मारल्या तीन बुक्क्या | दोन हुकल्या एक लागेचिना ||६||*
जेवेचिना त्याला मारल्या तीन बुक्क्या = न जेवणारा भविष्य काळ याला क्रियमाण, संचित, व प्रारब्ध या तीन म्हशी.
दोन हुकल्या = या पैकी संचित व प्रारब्ध यांचा नवनिर्मितीचा काळ संपलेला,
एक लागेचिना = क्रियमाणाचा कर्म झाल्याशिवाय कसा फळणार?
*ज्ञानदेव म्हणे याचा तो अनुभव | सद्गुरूवाचुनि कळेचिना ||७||*
गुरुकृपा झाली व भक्ती पक्व झाली तर काय घडते? संत म्हणतात,
प्रारब्ध, संचित, आणि क्रियमाण | भक्तालागी नाहीत जाण ||
या संचित, क्रियमाणाला सदगुरु प्रत्येकी एक अशा तीन बुक्या मारतात. पण ते आधीच नष्ट झाल्यामूळे हुकणे न लागणे हे घडणारच, हा अनुभव सदगुरु वाचून येणार नाही, याचा अर्थ “गुरुकृपेशिवाय देहभावनेतून – देवभावनेत जाता येणार नाही व त्या शिवाय त्रिगुणातित होता येणार नाही.”
ॐ राम कृष्ण हरी 🙏🏻🌺भाऊ लेख अप्रतिमच .
Thanks for explanation
Deleteवाह
Deleteखूप खूप आभार 🙏🙏
DeleteUttam,swatala Antrmukh karun samadhan denare oviyukt arthvishleshan.
Deleteनमस्कार भाऊसाहेब,
ReplyDeleteहा लेख म्हणजे , वस्तुस्थितीचा तिसरा कोन (Third Angle), तुम्हाला आलेला अनुभव आणि त्याच शब्दात केलेलं वर्णन.
लेख पूर्ण करताना ज्ञानेश्वर माउलींच्या शब्दांनी ह्या लेख वर दागिने चढवले.
म्हणून म्हणतात कि -
रामा नंतर आचरण नाही,
मारुती नंतर दास्यभक्ती नाही,
कर्ण नंतर दान नाही,
ज्ञानेश्वर माउली नंतर समाधी नाही,
तुकोबा नंतर वैकुंठ गमन नाही,
गरुड नंतर झेप नाही,
शिवाजी महाराजा नंतर छत्रपती नाही,
ह्या तुमच्या लेख नंतर 'महाआघाडीची' सरकार कशी चालेल ह्या विषया वरती काही लिहणे नाही. कारण, ज्ञानदेव म्हणे याचा तो अनुभव ।
सद्गुरूवाचुनि कळेचिना.
वा
ReplyDeleteपुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम बोला एकनाथ महाराज की जय
ReplyDeleteअतिशय चपखल
ReplyDeletehaa haa haa
ReplyDelete👌👌👌👌👌👌👌👌👌
ReplyDeleteApratim😁
ReplyDeleteभाऊ...
ReplyDeleteएकदम भन्नाट....
शिवसेनेच सावरकरवाद हा नवीन शब्द शोधल्याबद्दल धन्यवाद भाऊ . या निमित्ताने भाजप वा मोदींपाशी सत्तावाद सोडला तर काहीच नाही हेही अधोरेखित झालं .
ReplyDeleteभाऊ,
ReplyDeleteतुमच्या गावातील कीर्तनकार बुवा जे म्हणाले त्यावर तुम्ही अवश्यमेव विचार करावा असे वाटते. तुम्ही समाजाची सेवा म्हणून जे करता त्याचा ताण तुमच्याही मनावर आल्या शिवाय राहणार नाही. तुमच्या मनःशांती साठी थोडे नामस्मरण ध्यान अवश्य करा. तुमच्या विषयी कृतज्ञता वाटते, आपुलकी वाटते. म्हणून हे लिहिले. एक विनम्र सूचना म्हणून याकडे पहावे. लेख वाचून खूप दिवस झाले. परंतु त्या आधी पासून हा विचार मनात यायचा. आणि योगायोगाने कीर्तनकार बुवांनी तुम्हाला तीच सूचना केली. त्यावर अवश्य विचार करा भाऊ.
- पुष्कराज पोफळीकर