लता मंगेशकर यांनी पुण्यातल्या एका कार्यक्रमात जाहिरपणे नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत अशी नुसती सदिच्छा व्यक्त केली आणि स्वत:ला बुद्धीमान व शहाणे म्हणवणारा वर्ग त्यांच्यावत तुटून पडला आहे. ज्या गायिकेवर अतोनात प्रेम केले तिचीच विनाविलंब निंदानालस्ती करण्याची अशी स्पर्धा होताना पाहिल्यावर सामान्य माणसाला त्याचे आश्चर्य वाटले तर नवल नाही. पण त्याहीपेक्षा सामान्य माणसाला इतक्या असहिष्णू प्रतिक्रिया अपेक्षित नसतात. ज्यांना आपण बुद्धीमान वा विचारस्वातंत्र्याचे पुरस्कर्ते मानतो; त्यांनी एका नावाजलेल्या गायिकेच्या मतस्वातंत्र्यावर असा हल्ला कशाला चढवावा, त्याचेच मग सामान्यजनांना कोडे पडते. देशात अनेक उद्योगपती, मान्यवरांनी आजवर मोदींना अशाच शुभेच्छा दिलेल्या आहेत, त्याचप्रमाणे त्यांच्या विरोधातही अनेक जाणकार नामवंतांनी मतप्रदर्शन केलेले आहे. अमर्त्य सेन नामक अर्थशास्त्रज्ञ किंवा नावाजलेले साहित्यिक अनंतमुर्ती यांनी मोदींच्या विरोधात आपली कडवी मते मांडलेली आहेत. तेव्हा मोदी समर्थकांनी त्यांच्यावर हल्ला चढवला होता. मग त्यांच्या मतस्वातंत्र्याचे जे कोणी समर्थक होते, त्यांना आज लतादिदीच्या स्वातंत्र्याचे समर्थन करावेसे कशाला वाटलेले नाही? तर त्यांची बुद्धीमत्ताही मोदीभक्ताप्रमाणे एका भूमिकेकडे गहाण पडलेली आहे. असे लोक कधी विचारस्वातंत्र्याचे समर्थक पाठीराखे नसतात. ते आपापल्या सोयीनुसार नियम व तत्वांचा वापर करून घेत असतात. पण त्याच्याही पलिकडे अशा लोकांना एका भयगंडाने पछाडलेले असते; हे विसरता कामा नये. आत्मविश्वास गमावलेले असे लोक कुठल्या तरी एका बाजूला चिकटून बुद्धीवादाचा मुखवटा लावून वावरत असतात. मार्टीन ल्युथरने अशा भयगंडाची स्पष्ट शब्दात कबुली दिलेली आहे.
ख्रिश्चन धर्मातील सुधारणावादी बंडखोर प्रोटेस्टंट पंथाचा संस्थापक मार्टीन ल्युथर म्हणतो, ‘परमेश्वराचे नाव घेण्याइतका उत्साह माझ्या मनाला वाटत नाही; तेव्हा मी माझ्या शत्रूच्या, पोपच्या आणि त्याच्या हस्तकांच्या दगलबाजीच्या, त्यांच्या ढोंगबाजीच्या आठवणी आठवतो. या आठवणी जाग्या होताच, माझा संताप आणि द्वेष फ़ुलून येतो, माझा नैतिक अहंकार खुलतो आणि नव्या उत्साहाने मी देवाचे नाव घेऊ लागतो. माझ्या संतापाचा पारा वाढताच; परमेश्वरा, तुझ्या नावाचा जयजयकार असो, या भूतलावर तुझे राज्य येवो, मी तुझ्या मनासारखे करीन, ही प्रार्थना मी दुप्पट जोराने म्हणू लागतो.’ मोदी विरोधकांची मानसिकता नेमकी अशाच दुबळ्या आत्मविश्वासाचे द्योतक आहे. मोदींना विरोध करणार्यांचा स्वत:च्याच भूमिकेवर पुरेसा विश्वास नाही आणि आपल्या विचार भूमिकेबद्दल त्यांना खात्री राहिलेली नाही. म्हणूनच त्या भूमिकेला यशस्वी करण्यासाठी कार्यरत होण्यापेक्षा मोदी विरोधाचे बुडबुडे उडवण्यापलिकडे त्यांच्या हाती काही उपाय उरलेला नाही. मग अशा माणसांना आपण मोदी विरोधक आहोत, यापेक्षा आपण मोदीभक्त नाहीत; हे सिद्ध करण्यास सातत्याने प्रयत्नशील रहावे लागते. आपणही मोदींना स्विकारलेले नाही, हे स्वत:लाच पटवत रहाणे ही त्यांची गरज बनलेली आहे. त्यासाठी त्यांना आपल्या विचार व भूमिकांचा प्रसार-प्रचार, समर्थन करण्यापेक्षा मोदींच्या विरोधात निंदानालस्ती करण्याखेरीज गत्यंतर उरलेले नाही. मोदींना अपशब्द वापरले, तरच मग त्यांना आपल्या तथाकथित सेक्युलर विचारांच्या सामर्थ्याची अनुभूती होत असते. म्हणूनच असे लोक सातत्याने मोदीं विरोधाची संधी शोधत असतात, नसेल तर निर्माण करून मोदींच्या नावाने शंख करीत असतात. लतादिदींवरची टिका त्यातूनच आलेली आहे.
ज्याला सेक्युलॅरिझमचे राजकारण म्हणतात, त्याचे गोडवे गाण्यासारखे काही उरलेले नाही. त्याचा फ़ोलपणा सामान्य जनतेप्रमाणेच आता त्या विचारधारेचे अवडंबर माजवणार्यांनाही लक्षात आला आहे. मागल्या दिडदोन दशकात सेक्युलर म्हणून जो राजकीय व सार्वजनिक जीवनाचा बट्ट्याबोळ करण्यात आला, त्याची अनुभूती खुद्द सेक्युलरांनाही आलेली आहे. म्हणूनच आग्रहपुर्वक त्या तथाकथित पुरोगामी राजकारणाचे ढोल पिटण्याची इच्छाशक्तीही हे लोक गमावून बसले आहेत. पण आपला मुर्खपणा किंवा चुका कबुल करण्याची दानत, प्रामाणिकपणा शहाण्यांकडे सहसा नसतो. म्हणुनच त्यांना पळवाटा शोधाव्या लागतात. तो उत्साह संपलेला असल्याने उसने अवसान आणावेच लागते. मग मार्टीन ल्युथर म्हणतो, तसा प्रतिक्रियेतून खोटा उसना उत्साह आणावाच लागतो. शत्रूचे नाव घेतले वा आठवले की असे उसने अवसान आणणे सोपे जात असते. म्हणूनच मग सभा मेळावे घेऊन आपले फ़सलेले विचार धोरणे लोकांना समजावण्याची हिंमत गमावलेले लोक मोदींच्या नावाने शिमगा करण्यात धन्यता मानू लागले आहेत. स्वत:विषयी चांगले उत्साहवर्धक काही शिल्लक उरलेले नाही, त्यातून मग मोदींनी काही करावे की ते कसे चुक आहे, तेवढेच पदोपदी सांगत बसण्यापलिकडे या लोकांकडे दुसरा उद्योगच राहिलेला नाही. मार्टीन ल्युथर जसा पोप वा त्याच्या हस्तकांच्या दगाबाजी ढोंगबाजीचे स्मरण करतो; तसेच भारतातले सेक्युलर गुजरातच्या बारा वर्षे जुन्या दंगलीचे स्मरण करतात. त्यातून त्यांचा नैतिक अहंकार फ़ुलून येतो. द्वेषाचा पारा चढला, की सेक्यु्लर विचारांचा जयजयकार शक्य असतो. आपल्या देशातील सेक्युलर राजकारण आता मोदी या एका व्यक्तीभोवती घुटमळून राहिले आहे. तेव्हा मोदीबद्दल चार शब्द कोणी खरे वा चांगले बोलला, तरी त्याच्यावर हल्ला करणे ही सेक्युलर अगतिकता आहे. मग ते चार शब्द लतादिदीच्या मधूर कंठातून का निघालेले असेनात, ते कर्कश व भेसूरच असल्याचे सिद्धांतही मांडले जाऊ शकतात. हा कावळ्यांनी कोकीळेला प्रमाणपत्र देण्य़ासारखाच उद्योग नाही का?






