Saturday, November 2, 2013

नटसम्राट आणि अभिनयसम्राज्ञी?


  मागल्या रविवारी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी पाटणा येथे हुंकार मेळावा घेण्यासाठी गेले असताना, तिथे स्फ़ोटमालिका घडवली गेली. त्यात सहा सात माणसांचा बळी गेला आणि पाऊणशे लोक जखमी झाले. त्यानंतर सहा दिवसांनी सवड काढून मोदी यांनी पुन्हा बिहारला धाव घेतली. त्या स्फ़ोटमालिकेत ज्यांचा बळी पडला, त्यांच्या आप्तस्वकीयांचे सांत्वन करून सहाय्य देण्यासाठी मोदी मुद्दाम गेलेले होते. त्यापैकी काही जागी ते पोहोचू शकले तर दोन ठिकाणी त्यांना विपरीत हवामानामुळे शक्य झाले नाही. मग त्यांनी फ़ोनवर थेट संपर्क साधून त्यांचेही सांत्वन केले. आता मोदींनी जे केले ते माणूसकी म्हणून, असे त्यांचे समर्थक म्हणणारच. आणि आपोआपच त्यांच्या विरोधकांना त्यात धुर्तपणा व नाटक दिसणेही तितकेच स्वाभाविक आहे. सांत्वनाच्या या दौर्‍यामागे कुठलेही राजकारण नव्हते, असा दावा जितका भंपक आहे; तितकाच त्यात निव्वळ नाटक असल्याचा सात्विक आक्षेपही बदमाशी आहे. कॉग्रेसचे नेते राहुल गांधी हल्ली नेहमी भाजपावर आगी लावतो व ती आग विझवून सांत्वन आपल्यालाच करावे लागते, आरोप करीत असतात. भाजपावाले सांत्वन करा्यलाही जात नाहीत असाही त्यांचा आक्षेप असतो. पाटण्यात आग कोणी लावली ते सर्वश्रूत आहे. मात्र तिथे आग विझवायला किंवा सांत्वन करायला राहुल वा त्यांची मम्मी पोहोचली नाही. तिथे मोदी जाऊन पोहोचले. मग तक्रार कशाला? मोदी सांत्वनाचे नाटक करीत असतील, तर मुझफ़्फ़रनगर येथे सांत्वनाला गेलेले पंतप्रधान, राहुल व सोनिया सुद्धा नाटकच करीत नव्हते काय? मग कशाला नाटक म्हणायचे आणि कोणाला नटसम्राट ठरवायचे? की मोदींनी केले तर पाप आणि सेक्युलर बिल्ले लावलेल्याने तेच कृत्य केल्यास पुण्य़ असते काय?

   असो, अशा सांत्वनाला नाटकच म्हणायचे असेल तर असल्या नाट्य चळवळीची सुरूवात कोणी कधी केली त्याचाही इतिहास सांगणे अगत्याचे ठरावे. राहुल गांधी हल्ली अनेकदा आपल्या दादीची आठवण काढत असतात. त्यांच्या दादी म्हणजे इंदिरा गांधी १९७७ सालात निवडणूकीत पराभूत झाल्या होत्या आणि देशभरात त्यांच्या विरोधात एक संतापाची लाट उसळली होती. त्यातून पुन्हा सावरण्यासाठी इंदिराजी धडपडत होत्या. एकीकडे त्यांच्यावर आणिबाणीतल्या अन्याय अत्याचाराच्या आरोपांची चिखलफ़ेक रात्रंदिवस उडवली जात होती आणि दुसरीकडे त्यांच्या विरोधात अनेक चौकशी आयोगांचे शुक्लकाष्ट लावण्यात आले होते. त्याच प्रकरणात एकेदिवशी तात्कालीन गृहमंत्री चौधरी चरणसिंग यांनी इंदिराजींना अटक केली. मात्र चोविस तासही त्यांना गजाआड ठेवणे चरणसिंगांना साधले नाही. त्यांच्या विरुद्धच्या आरोपांचा प्रथमदर्शनी दुजोरा देणारे पुरावे न्यायालयाने मागितले व सरकारी पक्षाला देता आले नाहीत; म्हणून तिथल्या तिथे कोर्टाने इंदिराजींची सुटका केली होती. त्यातून इंदिराजींना पहिला दिलासा मिळाला होता. निराशाग्रस्त इंदिराजी राजकारणाचा संन्यास घेण्याचा विचार करीत असताना, या अटक, आरोप नाट्यातून त्यांना पहिला आशेचा किरण दिसला आणि त्यांनी जनता लाटेच्या विरोधात पोहण्याचा पहिला प्रयास करायचे मनावर घेतले. त्यांचे मुठभर समर्थक त्यांच्या पाठीशी असले, तरी कॉग्रेस पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांनी इंदिराजींकडे पाठ फ़िरवलेली होती. अशा वेळी योगायोगाने याच बिहारमध्ये अशी एक घटना घडली, की तिथूनच इंदिराजींनी पुनश्च हरीओम करण्याचा निर्णय घेतला. समस्तीपुर जिल्ह्यातील बेलची नामक एका दुर्गम, दुर्लक्षित खेड्यात दलितांचे एक सामुहिक हत्याकांड घडले होते.

   इंदिराजींनी तिथे जाऊन त्या दलित पिडीतांचे सांत्वन करण्याच धाडसी निर्णय घेतला. कारण तिथे पोहोचण्यासाठी कुठलेही वाहतुक साधन त्या काळामध्ये उपलब्ध नव्हते. विविध मार्गाने आपल्या मोजक्या सहकार्‍यांना सोबत घेऊन समस्तीपुरला पोहोचलेल्या इंदिराजींना बेलचीपर्यंत पायी वा वाहनाने पोहोचणे शक्यच नव्हते. कारण मधल्या नदीला पूर आलेला होता. त्यात होडी घालायलाही नावाडी राजी नव्हते. अशावेळी इंदिराजींनी हत्ती मागवला आणि हत्तीवर बसून नदी पार करीत त्या बेलचीला पोहोचल्या. तिथे भयग्रस्त पिडीत दलितांना आभाळ ठेंगणे वाटले होते. मृतांच्या नातलगांनी पदभ्रष्ट पंतप्रधानांचे स्वागत केले. आणि मग त्या बातमीने राजकारणात मोठेच काहुर माजवले. पुढे बेलचीच्या त्या दलितांना कुठल्या न्याय मिळाला वा इंदिराजींच्या सांत्वनाने काय लाभ मिळाले; हा संशोधनाचा विषय आहे. पण तिथून मग इंदिरा विरोधाची जनभावना अस्तंगत होत गेली. राजकारणातील जनता पक्षाची जादू ओसरत गेली. आणिबाणी व त्यातले अत्याचार विसरून लोक वास्तविक जीवनातील जनता पक्षाच्या अराजकाकडे डोळसपणे बघू लागले होते. त्यामुळेच इंदिराजींच्या समर्थ कारभाराची लोकांना गरज वाटू लागली आणि राजकारण उलटत गेले. त्यात बेलचीच्या पिडीतांचा विषय केव्हाच मागे पडला. म्हणूनच इंदिराजींनी सांत्वनाचे केले तेही नाटकच म्हणायला हवे. पण त्यातून त्यांनी राजकीय बदलाचा मुहूर्त साधला होता आणि लोकांपर्यंत तो संकेत नेमका पोहोचवला होता. आता मोदींनी सांत्वनाचे नाटक केले असाच दावा असेल, तर त्यांना नटसम्राटच म्हणायला हवे. पण मग अशी ही राजकारणातल्या सांत्वनाची नाटक चळवळ सुरू करणार्‍या इंदिराजींना अभिनय सम्राज्ञीच म्हणायला हवे ना? राहुल या दादीला कधी ओळखणार?

No comments:

Post a Comment