१९७८ सालची गोष्ट आहे. तेव्हा मुंबईतून प्रकाशित होणार्या ब्लिट्झ नावाच्या साप्ताहिकात मी वर्ष भर काम केले. ते मुळातच इंग्रजी साप्ताहिक होते. त्याच्या हिंदी, उर्दू व मराठी अशा अन्य भाषेतील आवृत्त्या निघत असत. मी मराठी आवृत्तीमध्ये काम करत होतो. त्या साप्ताहिकाचे संपादक मालक रुसी करंजिया हे पारसी गृहस्थ थेट इंदिरा गांधी वगैरे मोठ्या नेत्यांना जाऊन भेटायचे, त्यांच्या मुलाखती घ्यायचे म्हणून त्यांच्या ना्वाचा तेव्हा राजकीय वर्तुळात मोठाच दबदबा होता. ते करंजिया सत्य साईबाबाचे मोठे भक्त होते. तसे ते कम्युनिस्ट विचारसरणीचे म्हणूनही मानले जायचे. पण त्यांची ही साईभक्ती अजब कोडे होते. त्या साप्ताहिकाच्या कार्यालयात निरंजन माथूर नावाचा एक जादूगार यायचा व तिथल्या सर्वांशी तो चांगला परिचित होता. आमच्याही विभागात येऊन गप्पा मारायचा. त्याने करंजिया यांचे साईभक्तीपासून मन वळवण्याचा खुप प्रयत्न केला. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. सत्यसाईबाबा कुठलीही वस्तू रिकाम्या हातातून काढून भक्तांना विस्मयचकित करीत असत आणि ती वस्तू भक्ताला प्रसाद म्हणून देत असत. त्यांच्या प्रमाणेच आपणही चमत्कार करून दाखवतो, असे या जादूगाराने करंजियांना आव्हान दिले. एकदा ते त्याला घेऊन सत्यसाईबाबांकडे गेले. बाबांनी जी वस्तू काढली ती त्याने तिथल्या तिथे काढून दाखवली. तरीही करंजियांची साईभक्ती कमी झाली नाही. तो किस्सा तो सर्वांना सांगायचा. पण तो महत्वाचा नाही. त्या अनुभवातून तो माथुर काय शिकला ते त्याचे निरुपण महत्वाचे होते. मी ते कधीच विसरणार नाही. त्याचे म्हणणे काय होते?
ज्या दिवशी तो सत्यसाईंकडे करंजियांच्या सोबत गेला होता, तेव्हा त्याने आपल्या सोबत अशा सर्व वस्तू नेलेल्या होत्या, ज्या सत्यसाई अकस्मात काढून भक्तांना चकित करतात. त्यात अंगारा, सफ़रचंद अशा वस्तूंचा समावेश होता. हातचलाखीने त्याने त्या सर्व काढून दाखवल्या होत्या. पण जर त्यादिवशी सत्यसाईंनी नेहमीपेक्षा भलतीच म्हणजे जिलबी किंवा अंडे वगैरेसारखी वस्तू काढून दाखवली असती तर या निरंजनची फ़टफ़जिती झाली असती. कारण सत्यसाई ज्या वस्तू काढून दाखवतात, त्या त्याला ऐकून माहिती होत्या, तेवढ्य़ाच त्याने आपल्या शरीरावर कुठ्तरी दडवून ठेवल्या होत्या. बाकी काम होते हातचलाखीचे. त्याबद्दल त्याला आत्मविश्वास होता. पण अकस्मात कुठली वस्तू निर्माण करता येत नाही, अशीही त्याची वैज्ञानिक श्रद्धा होती. पण तो त्यात यशस्वी ठरला. मात्र त्याचे दु:ख होते वेगळेच. इतके सिद्ध करूनही त्याला करंजियासारख्या सत्यसाई भक्ताला अंधश्रद्धेपासून दुर करता आलेले नव्हते. मग तो म्हणायचा, की मी सगळी जादू करून लोकांना थक्क करतो, पण ती चलाखी आहे म्हणून सांगतो. ते न सांगता मी भगवी वस्त्रे परिधान करून बुवा महाराज झालो असतो; तर लाखो रुपये कमावले असते. कारण जादू किंवा चलाखी हाती आहे म्हणून तुम्ही बुवाबाजी करू शकत नाही. तुमची खरी दैवीशक्ती समोरच्या भक्ताच्या मनात वसत असते. एकदा त्याची भक्ती संपादन करा, मग त्याला चलाखी कळली तरी बिघडत नाही. कारण श्रद्धेने मनाचा कब्जा घेतला, मग खोटेही खरे ठरवता येत असते. कारण सामान्य माणसाला किंवा कुठल्याही बुद्धीमान माणसाला त्याच्या मनाच्याच ताब्यात रहावे लागते. त्याच्या विवेकबुद्धीला मनावर निर्णायक ताबा मिळवता येत नाही. तिथूनच माणसाच्या बुद्धीचा पराभव होत असतो आणि बुवाबाजीचे साम्राज्य सुरू होत असते.
मी आजवर अनेक बुद्धीमंत, विचारवंत ऐकले वाचले आहेत. पण त्या जादूगार निरंजन माथुरने जी बुवाबा्जीची सोपी सरळ व्याख्या केली तितके सोपे विवेचन कोणाकडून मला कधीच ऐकायला मिळालेले नाही. किंबहूना त्याच्याच त्या विवेचनामुळे धार्मिक वा अन्य कुठल्याही क्षेत्रातील बुवाबाजी व अंधश्रद्धेवर मी टिकेचे आसूड ओढू शकलो, असेच मी मानतो. आणि आज जेव्हा अंधश्रद्धेच्या विरोधातला नवा कायदा येऊ घातला आहे; तेव्हा तर मानवी जीवनातील अन्य क्षेत्रातही बुवाबाजी भयंकर बोकाळली आहे. त्याकडे डोळसपणे बघायची मला अधिक गरज वाटते. मी आयुष्य खर्ची घातले त्या माध्यम व पत्रकारितेच्या क्षेत्राचा समावेशही अशा बिघडत चाललेल्या बुवाबाजीच्या क्षेत्रात होतो. मागल्या दोन दशकात कधी नव्हे इतका संचार व प्रसार साधनांचा आणि तंत्रज्ञानाचा विकास झाला आहे. त्यातून माध्यमांनी व पत्रकारितेने अधिक मोठ्या जनमानसावर आपला प्रभाव निर्माण केला आहे. सहाजिकच त्यातला पेशा व उदात्त उद्दीष्ट मागे पडून, त्या क्षेत्राला व्यापाराचे हिडीस स्वरूप आले आहे. म्हणजे जसा कोणी बुवा किंवा महाराज त्याग व संन्यस्त वृत्तीचे दुकान थाटून ऐषारामी जीवन जगतो आणि वरती समाज उद्धाराच्या मोठ्या उदात्त वल्गना करत असतो, त्यापेक्षा आजची पत्रकारिता वेगळी राहिलेली नाही.
बुवाबाजी म्हणजे तरी नेमके काय असते? जे लोक आपल्या नित्यजीवनातील समस्या अडचणींनी गांजलेले असतात आणि त्यांना त्यावर कुठले व्यवहारी उपाय सापडत नसतात, त्यांना आपल्यापाशी काही अलौकिक दैवी चमत्कारी शक्ती असल्याचे भासवून त्यांची फ़सवणूक करण्यालाच बुवाबाजी म्हणतात ना? मग आजची माध्यमे किंवा पत्रकारिता त्यापेक्षा कोणता वेगळा धंदा करीत आहेत? वृत्तपत्र हे वाचण्यासाठी असते, प्रसार माध्यमे ही लोकशिक्षण व प्रबोधनाचे साधन आहे, त्यांची आजची सगळी मदार माल खपवायच्या जाहीरतीवर अवलंबून असेल आणि त्यासाठी प्रबोधन, लोकशिक्षणाची त्यात गळचेपी चालू असेल; तर त्या व्यवसायात गुंतलेल्यांना आपण काही महान लोक उद्धाराचे कार्य करीत आहोत असा दावा करता येईल काय? कोणी डॉक्टर स्त्रीभृणहत्येचे वा गर्भलिंग चिकित्सेचे काम करून समाजविघातक धंदा करत असेल आणि कोणी आक्षेप घेतल्यावर त्याने आपले वैद्यकीय प्रमाणपत्र दाखवून सेवाभावाचा मुखवटा चढवणे, ही बुवाबाजी नाही काय? ज्याने जीव वाचवायचा असतो त्यानेच जन्मापुर्वी गर्भाच्या हत्येला सहकार्य करणे किंवा त्यातून कमाई करणे गुन्हा असतोच. पण त्यानंतर पुन्हा तोंड वर करून आपण जनसेवा करतो, असे सांगणे बदमाशीच नाही काय? त्यालाच पाखंड किंवा बुवाबाजी म्हणतात. आज पत्रकारिता व माध्यमे तेवढेच करीत नाहीत काय? अधिक पाने व कमी किंमत असे आमिष दाखवून लोकांच्या ज्ञानात भर घालण्याऐवजी लोकांची दिशाभूल ही सुद्धा तशीच बुवाबाजी असते ना?
लोकांना अधिक पाने व रंगीत पाने देण्याचा भुलभुलैया तयार करून अधिक खप मिळवणे व त्यातून अधिक जाहीरातीचे उत्पन्न मिळवण्यासाठी वाटेल त्या मार्गांचा अवलंब करणे ही पत्रकारिता आहे काय? ज्याच्या उत्पादन खर्चात प्रचंड वाढ झाली असताना, जवळपास मोफ़त वर्तमानपत्रे वितरित केली जात आहेत, त्यात फ़क्त अधिक खप मिळवणे एवढाच हेतू आहे. मग त्यासाठी बहुतेक वृत्तपत्रांच्या संपादकांना विक्री व जाहीरात विभागाच्या तालावर नाचावे लागत असते. तसे नाचणार्यांनी अविष्कार स्वातंत्र्याच्या गप्पा ठोकणे ही बुवाबाजी नाही तर काय आहे? कधी आपल्या राजकीय हेतूने कुठल्या पक्षाची वा नेत्यांची कुरापत काढायची आणि त्यांनी खुलासा दिल्यास प्रसिद्ध करायचा नाही, याला बदनामी म्हणतात. अशा बदनामीच्या सुपार्या घेतल्या जातात. ती कुठली पत्रकारीता आहे? अविष्कार स्वातंत्र्याच्या नावावर हे जे सुपारीबाजीचे उद्योग चालतात, ते उघडे पडले आणि कोणी अंगावर आले, मग लगेच पत्रकारितेचा मुखवटा लावायचा; अशीच आजच्या पत्रकारितेची अवस्था झालेली नाही काय?
सहा महिन्यांपुर्वी मुंबईसह अनेक महापालिकांच्या निवडणूका ऐन रंगात आल्या होत्या. विविध पक्षांचे उमेदवार किंवा आमदार, खासदार फ़ोडण्याचे उद्योग चालू होते. त्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधूकर पिचड यांनी शिवसेनेचा कोणी खासदार आपल्या पक्षात येणार असल्याची वावडी उडवली. मग प्रत्येक वृत्तपत्राने आपापले अंदाज सुत्रांच्या हवाल्याने थापा ठोकाव्यात तसे प्रसिद्ध केले. त्यात एकेकाळचे मान्यवर दैनिक महाराष्ट्र टाईम्सचाही समावेश होता. त्यांनी तर बेधडक शिवसेनेचे खासादार आनंदराव अडसूळ यांचा नावानिशी उल्लेख करून बातमी दिली. मग त्यांच्या संतापलेल्या पाठीराख्यांनी टाईम्सच्या कार्यालयात घुसून धिंगाणा केला. मग सर्वत्र एकच कल्लोळ माजला. काय केले होते त्या अडसुळवाद्यांनी? टाईम्सच्या कार्यालयातील पाच दहा संगणक व काही टेबले खुर्च्या मोडून फ़ोडून टाकल्या. तेवढ्याने संपुर्ण देशातील आविष्कार स्वातंत्र्यावर गदा आली म्हणुन काहूर माजवण्यात आले. काही वाहिन्यांनी त्यावर तास अर्ध्या तासाच्या चर्चा घड्वून आणल्या. प्रत्यक्षात महाराष्ट्र टाईम्सने जे छापले होते ती शुद्ध थाप होती. म्हणजेच अफ़वा पसरवण्याचे काम त्यांनी केले होते. पण ते पत्रकार म्हणुन केले तर त्याला उदात कार्य म्हणावे, असा त्यांचा आणि तमाम अविष्कार स्वातंत्र्यवाद्यांचा दावा होता. एकवेळ तो दावा वादासाठी मान्य करू. पत्रकार किंवा त्यांच्याशी संबंधीत कामावर हल्ला झाल्यास त्यालाच अविष्कार स्वातंत्र्यावरचा हल्ला म्हणायचे असेल, तर परवा ११ ऑगस्टला आझाद मैदानावर घडले ती काय अविष्कार स्वातंत्र्याची महापूजा होती का? तिथे पोलिसांसह माध्यमांचे प्रतिनिधी व त्यांच्या थेट प्रक्षेपणाच्या गाड्यांवर रझा अकादमीच्य गुंडांनी जीवघेणा हल्ला चढवला. त्याला काय म्हणायचे? त्याबद्दल कुठल्याच वृत्तपत्राने, वाहिन्यांनी वा पत्रकारांच्या संघटनेने साधा निषेधाचा शब्द का उच्चारला नाही? की शिवसैनिकांनी वा संभाजी ब्रिगेड, बजरंग दल अशापैकी कोणी मारहाण, मोडतोड केली तरच अविष्कार स्वातंत्र्यावर हल्ला होतो? आणि रझा अकादमी वा अन्य कुठल्या मुस्लिम संघटनेने जीवघेणा हल्ला केला तरी ती सत्यनारायणाची पूजा असते का?
अरबी समुद्रातल्या शिवस्मारकाच्या संबंधाने लोकसत्तेचे संपादक असताना कुमार केतकर यांनी उपहासात्मक लेख लिहिला होता. तेव्हा ठाण्यातील त्यांच्या घराला शिवसंग्राम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी डांबर फ़ासले. तर त्यालाही मोठाच हल्ला मानले गेले होते व आक्रोश करण्यात आला होता. मग रझा अकादमीच्या हल्ल्याबद्दल मौन कशाला? याला पक्षपात म्हणत नाहीत, याला भंपकपणा व थोतांड म्हणतात. यालाच बुवाबाजी म्हणतात. बुवा जसे काही मोजक्या भक्तांना व्यक्तीगत दर्शन देतात, त्यांच्यावर खास अनुग्रह करतात आणि बाकीच्या भक्तांना गर्दी म्हणुन तुच्छ वागणुक दिली जात असते. आजची माध्यमे व पत्रकारिता तशीच झालेली नाही काय? काही पक्ष किंवा नेते यांना प्रसिद्धी मुद्दाम द्यायची आणि इतरांना मुद्दाम अपायकारक प्रसिद्धी द्यायची, असे चालत नाही काय? जो लाखो करोडो रुपये दानदक्षीणा देईल, त्याच्यावर विशेष कृपा आणि ज्यांच्याकडे तेवढी दक्षीणा देण्याची कुवत नाही त्यांच्यावर अवकृपा, असा प्रकार सर्रास चालत नाही काय? अगदी सामान्य माणसाच्या व वाचकाच्या नजरेत येण्याइतपत आता ही पत्रकारितेची बुवाबाजी उघडी पडू लागली आहे. आणि ती उघडी पडत असली तरी हे भंपक लोक तेवढ्याच बेशरमपणे आपापले मठ चालवितच आहेत.
लोकमत नावाच्या दैनिकाने मागल्या विधानसभा निवडणूकीत अशोकपर्व, विकासपर्व अशा पुरवण्य़ा छापल्या आणि त्याचे पैसे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडुन घेतले असा एक खटला चालू आहे. जाहिरातीच बातम्या किंवा लेख म्हणुन छापून मतदार वाचकांची दिशाभूल केली जाते. त्याकडे निवड्णूक आयोगाचे लक्ष वेधण्यात आल्यावर कारवाई सुरू झालेली आहे. पण त्याबद्दलचे अवाक्षर आयबीएन लोकमत वाहिनीवर कधी आले काय? दुसर्या कोणी पॅन्ट घातली आहे तर त्या पॅन्टच्या आत कुठले अंतर्वस्त्र आहे, त्याला किती भोके किंवा चुण्या पडल्या आहेत, ते भिंग घेऊन आपण तपासतो असा आव आणणार्या त्या वाहिनीच्या संपादक निखिल वागळे यांनी कधी त्या पेडन्युज प्रकरणी चर्चा का केलेली नाही? ‘उत्तर द्या’ म्हणून इतरांच्या अंगावर भुंकणार्यांनी कधीतरी आपल्या मालकांच्या पायाला निदान दात तरी लावावेत ना? मालकाचे पाय चाटायचे आणि इतरांवर भूंकायचे याला इमान दारी बांधलेली पत्रकारिता म्हणतात. आणि त्यातूनच पत्रकारितेची बुवाबाजी सुरू होत असते. मंत्रालयात राजेंद्र दर्डा यांच्या स्वीय सहाय्यकाला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आल्यावर त्याची बातमी वागळे देत नाहीत, पण सुनिल तटकरे किंवा छगन भुजबळ यांच्या संडासात काय पडते, त्याचा वास हुंगून घ्यायला खास वार्ताहर पाठवतात, त्याला बुवाबाजी नाही तर काय म्हणायचे? त्याच वाहिनीवर येणारे प्रकाश बाळ, हेमंत देसाई असे जाणकार नेहमी नरेंद्र मोदींचे वाभाडे काढत असतात. पण वाहिनीचे मालक विजयभाई दर्डा अहमदाबादला जाऊन एकाच व्यासपीठावरून त्याच मोदींना राष्ट्रसंत ठरवतात. मात्र माघारी आल्यावर तेच विजयभाई तोच मोदी हा सैतान असल्याचेही सांगून पळवाट काढतात. मग मुद्दा इतकाच की अशा दुतोंडी माणसाला ठाममत वाहिनीसमोर आणायची हिंमत वा्गळे यांच्यात आहे काय? बाकी संघटना पक्षांच्या नेत्यांवर भुंकण्यात पुरूषार्थ व धन्यता मानणार्या या जातिवंत पत्रकाराने एकदा तरी आपण ‘चावू’ शकतो हेसुद्धा दाखवावे. पण बुवाबाजी करणार्यांना लाजलज्जा नसते.
इतक्या तक्रारी व पर्दाफ़ाश झाले म्हणून निर्मल बाबांनी आपले दुकान बंद केले आहे काय? लोक काय म्हणतात त्याची बुवाबाजी करणार्यांना कधीच फ़िकीर नसते. चार संगणक अडसूळच्या पाठिराख्यांनी फ़ोडले म्हणुन ‘तोडफ़ोड संस्कृतीचे पाईक’ असा पांडित्यपुर्ण अग्रलेख लिहिणार्या महाराष्ट्र टाईम्सच्या संपादकांना रझा अकादमीच्या हिंसाचारानंतरही त्यातली विधायक विकासाची संस्कृती अभिमानास्पद वाटली आहे. म्हणुनच त्यांनी आझाद मैदानच्या धिंगाण्याबद्दल बोलायचे टाळले आहे. हा दुटप्पीपणा नाही काय? सर्वत्र हेच चाललेले दिसेल. आजची पत्रकारिता अशाच बुवाबाजी करणार्यांनी ओलिस ठेवली आहे. वृत्तपत्रे व माध्यमे ही जाहीरातीसाठीचे प्लॅटफ़ॉर्म बनले आहेत. फ़रक इतकाच आहे, की तिथे निदान रस्ते, वाहन किंवा रेल्वे अशाही अन्य सुविधा उपलब्ध आहेत. जाहिरातीचे फ़लक झळकवायचे म्हणुन प्लॅटफ़ॉर्म उभे केलेले नाहीत. वृत्तपत्रे व माध्यमे मात्र आता जाहीरातीसाठीच चालविली जातात, हे लपून राहिलेले नाही. त्यातला अविष्कार स्वातंत्र्याचा आवेश व लढा किंवा लोकप्रबोधनाचा आव; निव्वळ ढोंगबाजी झालेली आहे. मालकाने डोळे वटारताच लोळण घेणारी बुद्धीमत्ता ही आजची संपादकीय पात्रता झालेली आहे. पण मुळात बुवाबाजीप्रमाणे अलौकिक शक्ती अंगी असल्याचा दावा करून लोकांची फ़सगत करणे; हा पत्रकारितेचा मुख्य धंदा बनला आहे. कारण आता त्या पेशामध्ये ध्येयवाद संपला आहे व सच्चाई लयास गेली आहे. व्यवसायनिष्ठा दोष बनला आहे. त्यामुळे मग पत्राकारीतेवर हल्लेही होऊ लागले आहेत. उदात व नैतिक शक्ती हेच पत्रकारितेचे खरे बळ असते. ते गमावले मग उरते ती शुद्ध बुवाबाजी. तिला कायदा संरक्षण देऊ शकतो; पण लोकांच्या प्रक्षोभातून तिची सुटका होत नसते. त्यामुळे पत्रकारीता ही आता नुसतीच बुवाबाजीसुद्धा राहिलेली नाही ती सुपारीबाजही झाली आहे. हा माझाच व्यक्तीगत आरोप नाही. लढवय्याचा मुखवटा लावून रोज मिरवणार्या इमान दारी बांधलेल्या झुंजार संपादक निखिल वागळे यांच्या ‘मालकाचा’ तो अनुभवी दावा आहे. गुजरातमध्ये जाऊन मोदी स्तुतीस्तवन म्हणुन परतल्यावर, लोकमत समुहाचे अध्यक्ष विजयभाई दर्डा यांना झालेला तो महान साक्षात्कार आहे. त्यांनीच त्याचे निरुपण १० ऑगस्ट २०१२ च्या ‘लोकमत’ अंकात एक खास लेख लिहून केलेले आहे. अजून निखिलने ते वाचलेलेही नसावे बहुतेक. "मोदी, माध्यमे आणि मी.." शिर्षकाच्या त्या लेखात विजय दर्डा लिहितात,
‘गेली अनेक वर्षे मी सक्रिय राजकारणात व प्रभावी वृत्तकारणात आघाडीवर राहिलेला कार्यकर्ता आहे. संसदेच्या कामकाजाची १४ तर वृत्तपत्रीय नेतृत्वाची ४0 वर्षे माझ्या उपलब्धीत जमा आहेत. यातल्या प्रत्येकच क्षेत्रातील अनवधानाने घडलेल्या लहानशाही चुकीसाठी, मग ती प्रामाणिक का असेना, फारशी दयामाया कोणी दाखवीत नाही आणि तिचा जेवढा म्हणून राजकीय वापर करता येईल तेवढा केल्यावाचून कोणी थांबत नाही याची मला पूर्ण जाणीव आहे. आपल्या भक्ष्यावर क्रूरपणे तुटून पडणे हा राजकारण आणि वृत्तकारण या दोहोंचाही आताचा व्यवसायधर्म आहे.’
भक्ष्यावर तुटून पडणे कोण करतो? ही कोणाची प्रवृत्ती असते? एकीकडे श्वापदांची व गिधाडांची किंवा दुसरीकडे भोंदूभगत वा भामट्यांचीच ना? मग मी करतो ते आरोप आहेत, की एका त्यात व्यवसाय करणार्याचे ते अनुभवी बोल आहेत? फ़रक थोडाच आहे. मी अशा प्रकारे कधीच पत्रकारिता केली नाही. तो एक पेशा आहे समजून त्यात मिळणार्या कमाईची कधीच पर्वा केली नाही, पण समाधान व वाचकांची विश्वासार्हता मिळवण्यात धन्यता मानली. विजयभाई यांनी जे आजवर केले त्याचे चटके त्यांनाच बसेपर्यंत त्यांना त्यातले दु:ख ठाऊक नव्हते. कारण त्यांनीही त्यालाच व्यवसाय धर्म समजून तेच केले व आपल्या संस्थेतून चालविले. माझे तसे नाही. मी पत्रकरितेला लोकशिक्षणाचे व्रत समजून चार दशकाहून अधिक काळ कार्यरत आहे. त्यातून पोटापुरते मिळाले तरी खुश राहिलो. पण कुठली बुवाबाजी करण्याचा मोह मला झाला नाही. कदाचित मी ज्याला पत्रकारिता समजून जगलो व तीचा पाठपुरावा आजपर्यंत हट्टाने करतो आहे, ती पत्रकारिता आज कालबाह्य झाली आहे. त्यातली उदात्तता, व्रत व पेशा संपला आहे. तो पैसे फ़ेकणार्या समोर नाचण्याचा धंदा झाला आहे. पण त्यातही सोवळेपणाचा मुखवटा सोडायचा नाही, म्हणुन आजचे पत्रकार त्याची बुवाबाजी बनवत असतील. खर्या बुवाबाजीपेक्षा ही साळसुद बौद्धिक बुवाबाजी समाजाला अधिक घातक आहे. कारण सामान्य बुवाबाजीत एखादा भक्त वा त्यांचा गटच फ़सत असतो. पत्रकारितेच्या बुवाबाजीत अवघा समाजच भरकटत जाऊन अखेर रसातळाला जाण्याचा धोका असतो
पूर्वप्रसिद्धी ‘रोखठोक’ दिवाळी अंक २०१२