Tuesday, May 12, 2015

खडसे साहेब अशोक इंगावलेला भेटा



गायमहात्म्य कथन करणारा (उजवीकडे पाठमोरा) अशोक इंगावले

गेल्या आठवड्यात महाराष्ट्राचे महसुलमंत्री एकनाथराव खडसे यांनी केलेले एक विधान चक्रावून गेले. महाराष्ट्रात यंदा अवकाळी पाऊस व शेतकरी आत्महत्यांनी गदारोळ झालेला आहे. अशावेळी नुकसान भरपाई आणि शेतकर्‍यांना दिलासा देण्याचे काम सरकारच्या वतीने महसुलमंत्र्याचे आहे. आणि नेमका तोच मंत्री असे म्हणत असेल, तर सामान्य उध्वस्त शेतकर्‍याने कुणाच्या तोंडाकडे बघायचे, असा प्रश्न निर्माण होतो. सरकारच असे हातपाय गाळून बसते, तेव्हा टिकेचे लक्ष्य होणारच. सवाल काय शक्य आहे वा मुद्दा शेती तोट्यात जाणे वा नैसर्गिक आपत्ती येणे इतकाच नाही. तर शेतीविषयक धोरण हा सुद्धा यातला गंभीर मुद्दा आहे. इतकी वर्षे सतत शेतीला अनुदाने देवून आणि भरपाई देवून, कर्जमाफ़ीने आत्महत्या थांबू शकत नाहीत, हे सत्यच खडसे बोलले आहेत. पण ते सत्य असेल, तर त्यापेक्षा कुठला वेगळा मार्ग कशाला चोखाळला गेलेला नाही? आधीच्या सरकारने ते केले नाही, असे आता नव्या सरकारला बोलता येणार नाही. आधीचे कॉग्रेस-राष्ट्रवादी सरकार दिवाळखोर होते, म्हणून लोकांनी त्यांना बाजूला केलेले आहे. किंबहूना म्हणूनच खडसे साहेबांना मंत्रीपदावर बसायची संधी मिळालेली आहे. आपण असतो तर दुष्काळ वा आत्महत्या थोपवल्याच असत्या, अशा थाटात विरोधात बसलेले खडसे नेहमी बोलायचे. म्हणून आता समस्या कितीही मोठी वा कशीही असो, तिचे निवारण करणे ही त्यांची व त्यांच्या सरकारची जबाबदारी आहे. मात्र आधीचे सरकार चुकले, त्याच चुका करून ह्या समस्यांचे निवारण होऊ शकणार नाही. त्यासाठी आधी झालेल्या चुकांना टाळून नवे मार्ग चोखाळावे लागतील आणि नवे पर्याय शोधून शेतीला लाभदायक बनवावे लागेल. ते अशक्य आहे काय? तसे खडसे साहेबांना वाटत असेल, तर त्यांनी सत्ता सोडावी किंवा पर्याय देऊ शकेल, अशा कोणाची मदत घ्यावी.

होय, अशा अनेक व्यक्ती या महाराष्ट्रात आहेत, ज्यांनी अनुदान व भरपाई याकडे पाठ फ़िरवून दुष्काळी भागातही शेती लाभदायक करून दाखवली आहे. त्यापैकीच एक आहेत अशोक इंगावले. राज्यातले जे अनेक दुष्काळी तालुके-जिल्हे म्हणून दिर्घकाळ ओळखले जातात, त्यात सातारा जिल्हा व त्याचा माण तालुका समाविष्ट आहे. त्याच माण तालुक्यात बिदाल नावाचे गाव आहे, ऐतिहासिक महिमानगड या किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेल्या अनेक गावांपैकी बिदाल नावाच्या गावाचा समावेश होतो. त्या बिदाल गावातला एका सामान्य कुटुंबातला अशोक इंगावले कृषी विषयात पदवीधर झाला. सामान्यत: असा पदवीधर मातीत कपडे मळवून शेती करीत नाही. तर सरकारी खात्यात नोकरी मिळवून बुडित शेतीला अनुदाने वाटण्याचे काम करतो. अशोक त्याला अपवाद होता. पदवी संपादन केल्यावर त्याने घरच्याच शेतीत काम करायचे ठरवले आणि वडिलधार्‍यांनी कपाळावर हात मारून घेतला. कारण ज्या दुष्काळी शेतीत अनेक पिढ्या पिचून गेल्या, तिथे हा सुशिक्षित मुलगा काय करणार होता? पण अशोकने जिद्दीने आपले शेती शिक्षण पणाला लावून मातीत त्या शिक्षणाचा अनुभव गाडला आणि आत्महत्या करण्यापर्यंत पाळी आली. अशा अनुभवाने खचलेल्या अशोकला एक दिवस गोमातेने साक्षात्कार घडवला आणि पुढल्या काळात त्याने आपल्या झालेल्या शिक्षणाकडे पाठ फ़िरवून, त्याच पर्जन्यछायेच्या प्रदेशात खडकाळ जमिनीत नंदनवन फ़ुलवून दाखवले. जिथे पुरेशा पावसाअभावी शेती होत नाही आणि घरातले तरूण पुणे मुंबईकडे रोजंदारीसाठी रवाना होतात, तिथे अशोकने करोडो रुपये शेतीतून कमावून त्यातच गुंतवण्याचा चमत्कार करून दाखवला. त्याचे श्रेय तो आपल्या शिक्षण वा बुद्धीला देत नाही, तर गोमातेला देतो. खडसे साहेब तुम्ही धीर सोडला असताना, अशोक इंगावले मात्र आत्महत्या व्हायची गरज नाही अशी हमी देतोय.

एकरी एक देशी गाय पाळा आणि सुखवस्तू व्हा, असा अशोकचा संदेश आहे. अगदी दुभती नव्हेतर भाकड झालेली देशी गाय सुद्धा शेतकर्‍याला सुखवस्तू बनवू शकते, असा या तरूणाचा दावा आहे. आणि ते नुसते तत्वज्ञान नाही, कल्पना नाही. आपल्या गावात आणि शेतात त्याने हा चमत्कार करून दाखवला आहे. १९९१ पासून आधुनिक शेती करून आपले नशीब बुडवणार्‍या या शेतकर्‍याने १९९७ नंतर केवळ देशी गाय़ीच्या नादी लागून आणखी २० एकर नवी शेती खरेदी केली आणि गायीच्याच भरवश्यावर करोडोची उलाढाल केलेली आहे. घरात वा दारात एक देशी गाय पाळावी आणि ती तुम्हाला सुबत्ता आणून देते, असा या माणसाचा दावा आहे. त्यासाठी आता भरपूर पैसे मिळवून देणारा रोपवाटिका वा अन्य आधुनिक शेतीचा व्यापार त्याने सोडायचा निश्चय केला आहे. शंभर गायींची गोशाळा उभी करणार्‍या अशोककडे आत्महत्येपासून शेतकर्‍याला रोखण्याचा उत्तम उपाय आहे. तो करोडो रुपयांचे अनुदान वाटण्याचा वा कर्जमाफ़ीचा सोपा मार्ग नाही. तर शेती व माती यांच्याशी नाते जोडून शेतीला लाभदायक बनवण्याचा मार्ग आहे. ज्या परिसरातले पन्नास साठ टक्के कष्ट उपसू शकणारे लोक महानगरात पळून गेलेत आणि शेती ओसाड पडलेली आहे, त्याच परिसरातला हा माणुस आहे. जो अपुरा पाऊस व दुष्काळावर मात करू शकला आहे. एका बाजूला देशी गायीचे संवर्धन आणि गोहत्येवर बंदी सरकारने घातली आहे, तिचेच कृतीतून समर्थन करणारा हा माणुस खडसे यांना ठाऊकही नसावा, यासारखे दुर्दैव नाही. कारण त्याने कृतीतून गोवंश संवर्धनानेच दुष्काळावर मात करून दाखवली आहे. खडसे साहेब, तुम्हाला तिथल्या तहसिलदार वा जिल्हाधिकार्‍याने याची माहिती द्यायला हवी होती. मग तुम्ही असे निराशाग्रस्त वैफ़ल्यग्रस्त शब्द बोलला नसता. पण तुमच्यापर्यंत अशोक इंगावले पोहोचला तरी पाहिजे ना?

मागल्या दहा वर्षात एका गायीपासून शंभर गाय़ींपर्यंत मजल मारताना, या शेतकर्‍याने करोडो रुपये कमावले आणि ते पुन्हा गाय व शेतीमध्येच गुंतवून प्रचंड पसारा उभा केला आहे. लौकरच शेतीसह दूध व दूधाच्या पदार्थामध्ये आपला ब्रान्ड उभा करायचा चंग बांधलेला हा शेतकरी उद्योजक, घराघरात एक देशी गाय पाळा इतकाच आग्रह धरतो आहे. एक गाय एक एकर जमिनीला पोसते आणि किमान दिडदोन लाखाचे उत्पन्न हमखास देते, असा त्याचा दावा आहे. एका गायीची किंमत कुठल्याही कर्जबाजारी शेतकर्‍यासाठी मोठी नाही. पण तो सुबत्तेकडे वाटचाल करण्याचा हुकमी मार्ग आहे. ती अंधश्रद्धा वा धार्मिक भक्तीभाव नाही, तर साधासरळ हिशोब असल्याचे या शेतकर्‍याने प्रयत्नपुर्वक मागल्या दहा वर्षात सिद्ध केलेले आहे. आपल्या देशात आता अस्सल देशी गाय मिळणेच बंद होत चालल्याची वेदना त्याच्याकडून ऐकायला मिळते. भारतीय गायीचे मोल ब्राझिलसारख्या दक्षीण अमेरिकन देशाला उमगले असून, त्याच्यासह अनेक पुढारलेले देश भारतीय देशी गायीच्या पैदाशीच्या मागे धावत असल्याची माहिती अशोक पोटतिडकीने देतो. थोडक्यात कामधेनू ही कल्पना त्याने दुष्काळी माण तालुक्यात सिद्ध करून दाखवली आहे आणि तीच कामधेनू मायभूमीतून अस्तंगत होत असल्याची मनोव्यथा त्याच्या बोलण्यातून लपत नाही. अशोक इंगावलेने सांगितलेला उपाय करोडो रुपयांच्या अनुदान वा खर्चाचा अजिबात नाही, अगदी सोपा आणि सामान्य शेतकर्‍याच्या खिशालाही परवडणारा आहे. पर्यावरणाला पोषक व प्रोत्साहन देणारा आहे. सवाल आहे तो फ़क्त सामान्य शेतकर्‍यात त्याविषयी जागृती करण्याचा आणि आधुनिक शेती म्हणून मागल्या सहा दशकात बोकाळलेल्या रासायनिक शेतीच्या अंधश्रद्ध समजुतीच्या जंजाळातून बाहेर पडण्याचा. खडसे साहेब सवड काढून अशोकला भेटा, निदान तुमचे नैराश्य संपले तरी खुप होईल.

9 comments:

  1. तुमच्या लेखात अशोक इंगावले यांनी प्रत्यक्षात काय करून हा चमत्कार घडवला आहे याचा पूर्ण अभाव आहे आणि परत परत अशोक इंगावले यांनी हा चमत्कार केला हेच लिहिले आहे. <> हा चमत्कार इंगावले यांनी कसा केला हे लेखात कुठेच नाही - त्यामुळे लेखाची value कमी झाली आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. बरोबर आहे तुमच मत

      Delete
    2. Vijay Tase साहेब!
      अशोक इंगवले यांनी सांगितलेले देशी गाईंचे महत्व याबद्दलचा व्हीडीओ खाली प्रमोद देव यांच्या उत्तरात त्याची लिंक दिली आहे. तसेच हा विजय भटकर यांनी मुलाखत घेतलेला व्हीडीओ देत आहे. कृपया पाहावा. सर्व माहिती मिळेल.

      https://youtu.be/yq2w2lKvbEI

      Delete
  2. भाऊ खरे आहे. आमच्याकडे गावाला तर असे बोलतात की ज्याच्याकडे गाय आहे तो आत्महत्या करुच शकत नाही. या सरकारने सुद्धा कमीतकमी एक तरी गाय शेतकर्‍याकडे असावी यासाठी प्रयत्न करायला हवा.

    ReplyDelete
  3. इतका मोठा लेख लिहून, शेतीसाठी गाईचा(त्यातूनही भाकड गाय) नेमका काय आणि कसा उपयोग होतो....हे लिहायला मात्र भाऊ विसरले.
    (शेण आणि मूत्र ह्यांचा खत म्हणून उपयोग?)

    ReplyDelete
    Replies
    1. प्रमोद देवसाहेब!
      हा खाली युट्युब व्हीडीओ दिला आहे. त्यात अशोक इंगवले यांनी महिती दिली. कृपया पहावी.

      https://youtu.be/jK0uXscirr8

      Delete