Friday, May 8, 2015

हा नूर उल्ला खान कोण?



गेल्या तीन दिवसांपासून तमाम वृत्तवाहिन्यांवर अभिनेता सलमान खान याला झालेल्या शिक्षेच्या निमीत्ताने गदारोळ चालू आहे. त्यात त्याच्या समर्थनाला आलेल्या चहात्यांचा समावेश आहे, तसाच त्याला कठोर शिक्षा व्हावी असा आग्रह धरणार्‍यांचाही समावेश आहे. काहूर माजले आहे, त्यात सतत सलमान खान हे नाव कानी येते आहे. तसेच त्याचा पिता सलीम खान व अन्य विविध सहानुभूतीदार कलावंतांचाही उल्लेख येतो आहे. मात्र इतक्या गोंधळात एका नावाविषयी मला खुप कुतूहल होते आणि तेच नाव शोधून काढण्याची वेळ आली. खुप तपास केल्यावर नूर उल्ला खान हे नाव सापडले. हाच तो इसम जो तेरा वर्षापुर्वी अपरात्री वांद्रे पश्चिम इथे एका बेकरीच्या बाहेर थकूनभागून झोपलेला असताना, अंगावर आलेल्या भरधाव गाडीखाली सापडून ठार झाला. त्याच्याखेरीज इतरजण जखमीही झाले. मग त्या गाडीचा मालक असलेला दबंग सलमान खान गर्दी जमताना बघून निसटला आणि खुप बोंबाबोंब झाल्यावर दुसर्‍या दिवशी पोलिस ठाण्यात हजर झाला. तिथे किरकोळ जामिनावर त्याची मुक्तता झाली होती. बेताल गाडी हाकण्याच्या गुन्ह्यासाठी त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आणि जामिन देवून त्याला विनाविलंब घरी पाठवण्यात आलेले होते. मग काही जागरूक नागरिकांनी त्यात एक नागरिक हकनाक मारला गेल्याने मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा हट्ट केला आणि कोर्टाने हस्तक्षेप केल्यावर सलमानवर हा खटला दाखल केला गेला. पुढे खटल्याची रितसर सुनावणी होऊन निकाल लागण्यात तेरा वर्षाचा कालावधी उलटलेला आहे. पण त्या दरम्यान कधी कोणी नूर उल्ला खानचे नावही घेतले नाही. आताही सलमान दोषी ठरल्यानंतर चर्चा चालू आहे, ती सलमानचीच. पण नूर उल्लाचा उल्लेख कुठे आढळत नाही. जणू हकनाक बळी पडलेल्या नूर उल्लाच्या जगण्याला वा जिवंत असण्याला कुणाच्याच लेखी कवडीचे मोल नाही.

आताही सलमानचे समर्थक वा विरोधक तत्वाची भाषा बोलत आहेत. बुद्धीचा व कायद्याचा कीस पाडला जात आहे. त्यात नामवंत वा प्रसिद्ध म्हणून सलमानच्याच भविष्याचा विषय चर्चेत आहे. त्याला शिक्षा होण्याचे समर्थन करणार्‍यांनाही कोण मारला गेला, त्याची फ़िकीर दिसत नाही. कारण त्यांनाही बहुधा नूर उल्ला ठाऊक नसेल. किंबहूना त्यांनाही नूरच्या मरण्याविषयी कुठली आपुलकी वा वेदना नसावी. अन्यथा त्यांच्या तोंडी तरी त्याचे नाव आलेच असते. पण तसे होताना दिसले नाही. याचा अर्थ सलमानच्या शिक्षेतून कायद्याची व न्यायाची प्रतिष्ठा वाढण्याची भाषा बोलणारेही कितपत खरे आहेत, याचीच शंका येते. कारण त्यांना मेला त्याच्याविषयी कुठली आस्था नाही, तर सलमानसारख्या मुजोर श्रीमंत वा पैसेवाल्यांचा राग अधिक आहे. थोडक्यात ज्याला सूडबुद्धी म्हणता येईल, असाच त्यांच्या आग्रहामागचा हेतू लपून रहात नाही. म्हणजेच जो कोणी मेला, त्याने मरायला त्यांचीही हरकत नाही, त्यातून यांच्या सूडबुद्धीला खाद्य मिळते, त्यासाठी झुंबड उडालेली आहे. दुसरीकडे पैसेवाले श्रीमंत असल्याने कायदा विकत घेता येतो, किंवा वाकवता येतो; अशी धारणा असलेला एक वर्ग आहे. त्याच्या लेखी मेला वा मारला गेला, त्याला भरपाई दिली म्हणजे झाले. होतात चुका माणसाकडून. सलमानही माणुस आहे आणि त्याची चुक झालेली आहे. त्याच्याकडून किंमत वसुल करा आणि विषय संपवून टाका, अशी काही लोकांची धारणा आहे. त्यात हेमामालिनी या अभिनेत्रीपासून अभिजीत या गायकापर्यंत व सलमानच्या हजारो चाहत्यांपर्यंतचा समावेश होतो. हे सगळेच पैसेवाले श्रीमंत नाहीत. त्यातले अनेकजण निव्वळ श्रीमंतीची भक्ती करणारे आहेत. चुका व गुन्हे थोरामोठ्यांनी नाही तर कोणी गरीबाने करावेत काय? पैसेवाल्यांना परवडणारा तो जुगार आहे, अशी धारणा असलेलेही अनेकजण आहेत. अशा विचित्र सरमिसळ मानसिकतेने आपला समाज बनलेला आहे. त्यात कायद्याचे, समतेचे वा बंधुभावाचे संदर्भ वा पावित्र्य, आपण कधीकाळी हरवून बसलो आहोत. त्याचा विकृत परिणाम या निमीत्ताने आपल्याला बघायला मिळतो आहे. म्हणूनच त्यामध्ये कुठलेही कारण नसताना मारला गेलेला नूर उल्ला याच्याविषयी एका शब्दाचा उल्लेख आढळत नाही. क्रिकेटच्या नशेत चौकार-षटकाराची आतषबाजी डोक्यावर घेणार्‍यांना त्यात सोलवटून निघणार्‍या चेंडूची कुणाला फ़िकीर असते काय? तेच खर्‍या आयुष्यात नूर उल्लाच्या बाबतीत घडलेले नाही काय?

नूर उल्ला किंवा तत्सम कोट्यवधी भारतीय नागरिक असे आहेत, ज्यांच्या जगण्याला एखाद्या श्रीमंत ‘ग्राहकोपयोगी’ वस्तुपेक्षा अधिक मूल्य नसावे, अशीच एकूण वेळ आलेली आहे. कधी असे सामान्य नागरिक कसाबच्या गोळ्यांची शिकार होतात, तर कधी बॉम्बस्फ़ोटात बळी पडतात. कधी त्यांच्या वेदना यातनांचा उल्लेख होतो अशा चर्चेत? चर्चा चालतात, त्या कसाबच्या मनोवृत्तीच्या, अफ़जल गुरूच्या मानवी हक्काबद्दल आणि सलमानच्या अभिनयात गुंतलेल्या चारपाचशे कोटी रुपयांच्या गुंतवणूक धंद्याबद्दल. वाद होतात, सलमान संजय दत्तच्या अडकून पडलेल्या चित्रपटासाठी. नूर उल्ला दिवसभर कष्ट उपसून काही तास थकल्या शरीराला विश्रांती मिळण्यासाठी झोपला, त्याची झोप कवडीमोल असते. त्या झोपेसाठी त्याने प्राणाचे मोल मोजले, त्याची नोंद कुठे होत नाही आणि सलमानच्या चित्रपटातल्या गुंतवणूकीला मोल असते. मग अभिजीत म्हणतो रस्त्यावर भटक्या कुत्र्याप्रमाणे झोपणार्‍यानेही गुन्हा केला. नूर उल्ला रस्त्याच्या मधोमध झोपला नव्हता, तर कडेला सुरक्षित झोपायची त्याला अक्कल होती आणि महागडी गाडी रस्त्याच्या कडेला नेवून आदळू नये, इतकेही भान सलमानला नव्हते. एकाला नुसते तुरूंगात पाच वर्षे जावे लागणार आहे आणि दुसरा कायमचा या जगातून बाहेर फ़ेकला गेलेला आहे. यातला फ़रक ज्यांना समजू शकत नाही, त्यांच्यात असा वाद रंगला आहे. त्यात कुठल्याही बाजूने नियम कायद्याचे युक्तीवाद करणार्‍यांना नूर उल्ला नावाचा एक चालताबोलता माणूस या जीवनातून कायमचा हद्दपार केला गेला, याविषयी काडीमात्र आस्था तरी आहे काय? कुठल्या युगात आणि कुठल्या जगात आजचे प्रतिष्ठीत व नामवंत लोक जगतात; तेच समजेनासे झाले आहे. स्मगलिंग करणारा सोहराबुद्दीन गुजरात पोलिसांच्या खोट्या चकमकीत मारला गेला, म्हणून दौडत खालपासून सुप्रिम कोर्टापर्यंत आपली बुद्धी व पैसा पणाला लावणार्‍या मानवाधिकारी प्रेषितांनाही नूर उल्ला नावाच्या एका फ़ुटपाथनिवासी भारतीयाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार असतो, हे अजून उमगलेले नाही.

तेरा वर्षातल्या बातम्या आणि तीन दिवसातला गदारोळ ऐकून प्रश्न पडला; कोण हा नूर उल्ला खान? माणूस होता की कधीही कुठेही मरायला जन्माला आलेली किडामुंगी?

मी मराठी लाईव्ह (खुसपट) ९/५/२०१५

4 comments:

  1. अप्रतिम लेख

    ReplyDelete
  2. भाऊ हे सर्वच काम मिडियाचे आहे असे आपल्याला नाही वाटत? खरे तर रवींद्र पाटील हा पोलिस सुद्धा लोकांना आठवला नसता. परंतु मिडियात त्याचे नाव आले आणि तो पुन्हा प्रसिद्धी झोतात आला. तसेच नुल उल्ला खानचे आहे. आजपण नेटवर सलमानच्या गाडीखाली मरणारा कोण होता. त्याचे नाव काय होते. याचा कितीही शोध घेतला तरी मिळत नाही. त्याच्या बायका पोरांवर काय परिस्थिती ओढवली याची माहिती मिळत नाही. लोकांची स्मरणशक्ती कमी असते. पण मिडीयाला तर सर्वच गोष्टी माहित असतात. त्याची नोंद त्यांच्या दप्तरात असते. मग ते लोक का नाही लोकांसमोर आणत अशा गोष्टी. मलातरी लोकांपेक्षा मिडियाच याला कारणीभूत आहे असे वाटते.

    ReplyDelete
  3. भाऊ, खूप विचार करायला लावतो हा लेख.... आणि फक्त विचार करावा लागतोय हा सुद्धा खेद वाटतोय..."एकाला नुसते तुरूंगात पाच वर्षे जावे लागणार आहे आणि दुसरा कायमचा या जगातून बाहेर फ़ेकला गेलेला आहे." ह्या वाक्यामध्ये सगळच आलं...

    ReplyDelete