Monday, May 11, 2015

जयललिता जिंकल्या, हरली द्रविड चळवळ



सोमवारी कर्नाटकाच्या हायकोर्टातील खंडपीठाने जयललिता यांना एका खटल्यातून निर्दोष मुक्त केल्याने संपुर्ण तामिळनाडूमध्ये आनंदोत्सव सुरू झाला. अण्णा द्रमुक पक्षाच्या सर्वेसर्वा असलेल्या जयललिता यांना मागल्या सप्टेंबर महिन्यात विशेष न्यायालयाने दोषी ठरवल्याने व शिक्षा फ़र्मावल्याने मुख्यमंत्रीपद सोडावे लागले होते. थेट कोर्टातूनच त्यांची तुरूंगात रवानगी झाली होती. मग रामायणातल्या भरताप्रमाणे पन्नीर सेल्व्हम यांनी राज्याचे मुख्यमंत्री होऊन आठ महिने कारभार हाकला. पण शपथ घेताना हा मुख्यमंत्री व त्याचे इतर मंत्री शोकसभेत बोलावे तसे शोकाकुल होऊनच रडत होते. पुढे सुप्रिम कोर्टाने जामिन दिल्यावरच जयललिता आपल्या घरी पोहोचल्या आणि आधीच्या निकालावर त्यांनी अपील केले होते. त्याच अपिलाचा आता निकाल लागला आहे. मजेची गोष्ट म्हणजे आधीच्या कोर्टाने जे पुरावे तपासून त्यांना व इतरांना दोषपात्र ठरवले व शिक्षा फ़र्मावली होती, तेच पुरावे फ़ेटाळून हायकोर्टाने जयललितांना आरोपमुक्त केले आहे. त्यात नुसतीच तुरूंगवासाची शिक्षा दिलेली नव्हती, तर शंभर कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. पण हायकोर्टाने ते सगळेच बाजूला सारून जयललिता यांना निर्दोष ठरवले आहे. असा हा पहिलाच अनुभव नाही. आजवर किमान अर्धा डझन अशा खटल्यातून जयलालिता खालच्या कोर्टात दोषी व अपिलात निर्दोष ठरल्या आहेत. त्यामुळे दोन भिन्न कोर्टात कुठले कायदे व निकषानुसार निकाल लागतात, असा प्रश्न निर्माण होतो. अर्थात तो कायद्याचा व न्याय व्यवस्थेच्या चिकित्सेचा विषय आहे. पण इथे आरोपी व्यक्ती राजकीय नेता असल्याने या निकालाचा राजकीय परिणाम महत्वाचा आहे. या निकालाने तामिळनाडूच्या द्रविडी राजकारणाला मोठी कलाटणी मिळणार आहे. त्याच वेळी द्रविडी चळवळ कशी व किती भरकटत गेली त्याचाही विचार करण्याची गरज आहे.

मागल्या विधानसभेत विजयकांत या अभिनेत्याच्या पक्षाला सोबत घेऊन जयललितांनी बहुमत संपादन केले होते. मात्र द्रमुकला पराभूत केल्यावर विजयकांत यांनी सत्तेत सहभागी होण्यापेक्षा विरोधात बसणे पसंत केले. पुढे लोकसभा निवडणूकीत जयललिता यांच्या अण्णा द्रमुक पक्षाने स्वबळावरच मोठे यश संपादन केले. मात्र त्यानंतर अल्पावधीतच त्यांना मुख्यमंत्रीपद सोडायची वेळ आली. सोमवारी ज्या अपिलाचा निकाल लागला, त्याच प्रकरणात दोषी ठरल्याने जयललितांना मुख्यामंत्रीपद सोडावे लागले होते. आता विधानसभेची चार वर्षे संपलेली असून पुढल्या वर्षीच तिथे पुन्हा विधानसभा निवडणूक व्हायची आहे. त्याला आणखी दहा महिन्यांचा कालावधी आहे. त्या काळासाठी सत्तेत बसायचे तर जयललिता यांना आमदारकीची पोटनिवडणूक लढवावी लागेल. कारण आधीच्या निकालाने त्यांची आमदारकी रद्दबातल झाली आहे. पण आमदारकीशिवाय सहा महिने त्या मुख्यमंत्रीपदी राहू शकतील आणि सर्व निर्णय घेऊ शकतील. पण त्याहीपेक्षा महत्वाची बाजू म्हणजे ताज्या निर्णयाने त्यांची लोकप्रियता व सहानुभूती कळसाला पोहोचली आहे. त्याचा लाभ घ्यायचा तर विधानसभा बरखास्तीचा निर्णय त्या घेऊ शकतील. तो मुख्यमंत्र्याचा विशेषाधिकार असतो. सहानुभूती मतांमध्ये रुपांतरीत करायला त्यांनी तसे केले, तर विरोधकांचा धुव्वा उडवणे त्यांना शक्य आहे. एकट्याच्या बळावर जयललिता प्रचंड बहूमत संपादन करू शकतील, असे आज तामिळनाडूचे वातावरण आहे. १९९१ सालात त्यांनी तितके मोठे यश प्रथमच संपादन केले होते. साहसवादी राजकारणी असल्याने जयललिता तसे करतील, असे विश्लेषकांना वाटते आहे. पण द्रविडी राजकारणाची ही शोकांतिका म्हणावी लागेल. हा नुसता जयललितांच्या राजकीय विरोधकांचा पराभव नाही, तर द्रविडी राजकीय तत्वज्ञान व भूमिकेचा भरकटण्याने ओढवलेला पराभव आहे.

आज जे काही तामिळनाडूत चालले आहे, त्याला व्यक्तीस्तोम वा व्यक्तीपूजा असेच म्हणायला हवे. ते सर्वच पक्षात व भारतीय सार्वजनिक जीवनात सातत्याने होत आले आहे. त्यामुळे तामिळनाडूत काही नवे घडते आहे, असे म्हणायचे कारण नाही. पण सवाल तामिळनाडूचा नसून द्रविडीयन राजकारणाचा व सामाजिक चळवळीचा आहे. आज ज्यांना आपण अण्णा द्रमुक व द्रमुक अशा नावाने ओळखतो, त्या पक्षांच्या राजकीय सामाजिक विचारांचा वारसा द्रविड कझागम या चळवळीतून आला आहे. रामस्वामी नायकर यांनी स्वातंत्र्यपुर्व काळात जे सामाजिक राजकीय अभिसरणाचे आंदोलन सुरू केले, त्याचीच परिणती पुढे द्रविड मुन्नेत्र कझागम या राजकीय पक्षात झालेली होती. रामस्वामी नायकर यांची चळवळ व्यक्तीपुजा, कर्मकांडाच्या विरोधात होती, तशीच ती ब्राह्मण वर्चस्वाच्या विरोधातली चळवळ होती. रामस्वामींचे निकटवर्ती शिष्य म्हणून ओळख असलेल्या अण्णादुराई यांनी विभक्त होऊन द्रविड मुन्नेत्र कझागम या राजकीय संघटनेची स्थापना केली. त्याचाच पुढे द्रमुक नामक पक्ष तयार झाला. स्वातंत्र्योत्तर काळात ब्राह्मणेतर विचारांच्या या चळवळ व पक्षाने तामिळनाडूत द्रविडी अस्मितेच झेंडा बुलंद केला आणि १९६७ सालात कॉग्रेसची मक्तेदारी मोडून सत्ताही हस्तगत केली. या चळवळीला जोश यावा आणि प्रोत्साहन मिळावे म्हणून ज्या विविध प्रसार माध्यमांचा अण्णादुराई यांनी सढळ हस्ते वापर केला, त्यात चित्रपट माध्यमाचा प्रभाव अधिक होता. म्हणूनच अण्णादुराई यांचे बहुतांश निकटवर्तिय चित्रपट उद्योगशी संबंधित होते. मात्र अण्णांनी त्यातल्या नामवंत लोकांना पक्ष संघटनेपासून दूर ठेवले होते. त्यांच्या निधनाने पक्षाची सुत्रे करूणानिधी यांच्या हाती आली आणि त्यांनीच एम. जी. रामचंद्रन या लोकप्रिय अभिनेत्याला पक्षात आणून मानाचे स्थान दिले. त्याचे प्रायश्चित्त त्याच करुणानिधींना आज भोगावे लागते आहे.

एमजीआर यांनी लौकरच करूणानिधी यांच्याशी सवतासुभा मांडला आणि अण्णा द्रमुक हा वेगळा पक्ष काढून द्रमुकला आव्हान उभे केले. त्याला साथ देणार्‍या कॉग्रेसने मग राज्यातील उरलीसुरली प्रतिष्ठा गमावली आणि तामिळी राजकारण दोन द्रविडी पक्षात विभागले गेले. पुढे द्रमुकला गुंडाळून एमजीआर सत्ताधीश झाल्यावर त्यांनी आपली लाडकी हिरोईन जयललिता यांना राजकारणात वारस म्हणून आणले आणि तिथून जयललितांची राजकीय कारकिर्द सुरू झाली. १९९० पुर्वी रामचंद्रन यांचे निधन झाले आणि त्यांच्यामागे पक्षात कोणी लोकप्रिय वा प्रभावी नेता नसल्याने अण्णा द्रमुकची सुत्रे जयललिताकडे आली. मग लोक एमजीआर यांना विसरून गेले आणि जयललिता तामिळनाडू वा द्रविडी चळवळीच्या अम्मा बनून गेल्या. आज त्याचेच परिणाम आपण बघत आहोत. व्यक्तीपुजा व कर्मकांडाच्या विरोधातली चळवळ आणि राजकीय संघटना व्यक्तीपूजक झाली आहे. त्यातली शोकांतिका इतकीच आहे, की द्रविडी अस्मितेवर उभ्या असलेल्या या पक्ष संघटनेवर ज्या दोन व्यक्तींचा अफ़ाट प्रभाव पडला, त्यातले रामचंद्रन केरळी मल्याळी भाषिक होते आणि जयललिता या कानडी ब्राह्मण आहेत. थोडक्यात तामिळनाडूच्या राजकारणाला चित्रपटाने प्रभावित करणार्‍या द्रविडी करुणानिधींचा पराभव बिगरद्रविडी व कानडी ब्राह्मणांकडून झाला आहे. चळवळ व लढ्याचे सोपे मार्ग नसतात. ते चळवळ व आंदोलनाला कुठल्या कुठे भरकटून घेऊन जातात, त्याचा हा जळजळीत पुरावा आहे. जयललितांच्या भ्रष्टाचार खटल्यातून मुक्तीचा तामिळनाडूत चाललेला उत्सव प्रत्यक्षात रामस्वामी व अण्णादुराई यांच्या द्रविडी अस्मितेच्या चळवळीचा दारूण पराभव आहे. ती एका प्रखर पुरोगामी चळवळीची केविलवाणी शोकांतिका आहे. जयललिता जिंकल्या असल्या, तरी आज तामिळनाडूत द्रविडी अस्मिता व चळवळ मात्र पराभूत झाली आहे.

1 comment:

  1. भाऊराव,

    या चळवळीला द्रविडी संबोधणे कितपत योग्य? हां नायकर म्हणवून घेत असतील, पण द्रविड ही अतिशय व्यापक संज्ञा आहे. प्राचीन भारतात ज्याला पंचद्रविड म्हणत असंत ते पाच प्रांत म्हणजे गुजरात, महाराष्ट्र, तेलंग, कर्नाटक आणि द्रविड (आजचा तामिळनाडू) असे आहेत. जरी द्राविड म्हणजे तामिळी असा अर्थ घेतला तरी ही संज्ञा द्राविडी ब्राह्मण या संज्ञेवरून पडलेली आहे. त्यामुळे ब्राह्मणविरोधी चळवळीच्या नावात ब्राह्मणी शब्द वापरल्याचा दोष येतो.

    सांगायचा मुद्दा काये की द्रविड म्हणजे नक्की काय हे निश्चित नाही. असली चळवळ म्हणे नुसती वळवळ असते. ती मेली काय अन जगली काय, कोणाला पडलीये.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete