Thursday, May 21, 2015

नितीशकुमारांना ‘अच्छे दिन’ येणार?



देशातील सत्तांतर आणि नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान कारकिर्दीला एक वर्ष पुर्ण होत असताना, सतत ‘अच्छे दिन’ कुठे आहेत असा सवाल केला जातो आहे. कारण गेल्या वर्षी लोकसभा निवडणूक प्रचारात त्याच प्रचार गीताने धमाल उडवून दिली होती. परिणामी ऐतिहासिक यश मोदींना मिळू शकले. पण ज्या अच्छे दिनांसाठी नित्यनेमाने मोदींना जाब विचारला जातो, त्याचा जनक भलताच आहे. त्याचे नाव प्रशांत किशोर असून मोदींच्या यशाने राजकारण्यांचे लक्ष त्याच्याकडे वेधले गेले आहे. राजीव गांधी यांच्या अपुर्व यशानंतर माध्यमे व जाहिरातबाजी हा राजकारणातला महत्वाचा पत्ता झाला होता. अनेक जाहिरात कंपन्या व प्रचार व्यावसायिक राजकारणात धंदा शोधू लागले. करोडो रुपयांचा जाहिरात धंदा त्यातून उभा राहिला. सहाजिकच गेल्या लोकसभेपर्यंत त्याला पर्याय कोणी शोधला नाही. तो पर्याय घेऊनच नरेंद्र मोदी मैदानात आले आणि तीन दशकातल्या मार्केटींगला शह देत, त्यांनी मोठे यश संपादन केले. त्याचे श्रेय बहुतेक विश्लेषक व राजकारणी मार्केटींगला देत असले, तरी प्रत्यक्षात हा सगळा प्रकार मार्केटींगच्या पलिकडे जाणारा होता. ज्याचा जनक प्रशांत किशोर होता. अमेरिकेत एखाद्या राजकीय भूमिकेला वा धोरणाला जनमानसात प्रस्थापित करणारे काही जाणत्यांचे गट असतात. त्याचप्रकारे प्रशांतने रणनिती आखली होती आणि मोदींनी त्याला हाताशी धरून निवडणूकांची युद्धनितीच पालटून टाकली. प्रशांत सिटीझन्स फ़ॉर अकौंटेबल गव्हर्नन्स या गटातर्फ़े मोदींना पोषक वातावरण तब्बल तीन वर्षे आधीपासून तयार करत होता. म्हणजेच निवडणूका येण्याची प्रतिक्षा त्याने वा मोदींनी केलेली नव्हती. तर पक्षाला उमेदवार देण्यापासून शेवटी प्रत्यक्ष मते मिळवण्यापर्यंतची मांडणी करूनच मोदी मैदानात आलेले होते. आता तोच गट नितीशकुमार यांना ‘अच्छे दिन’ येण्यासाठी राबणार असल्याची बातमी आहे.

२०११ सालात अमेरिका व राष्ट्रसंघातील नोकरी सोडून नशीब अजमावण्यासाठी प्रशांत कुमार मायदेशी परतला आणि असलेल्या राजकारणाविषयीची जनतेतील उदासिनता बघून त्याने एक जाणत्यांचा गट प्रथम निर्माण केला. देशातील अनागोंदी व अराजक नकोसे झालेले अनेकजण त्याला सामील झाले. यातून हा ‘कॅग’ नामक गट अस्तित्वात आला. त्यांनी तेव्हापासून भारताचा पंतप्रधान म्हणून मोदींना पेश करण्याच्या हालचाली आरंभल्या होत्या. त्यात आधी मोदींची उमेदवारी भाजपाच्या गळ्यात घालण्यापासून पुढे प्रत्यक्ष निवडणूक प्रचारात बाजी मारण्यापर्यंतचे व्यापक नियोजन केलेले होते. चायपे चर्चा किंवा व्हिडीओ माध्यमातून एकाच वेळी शेकडो जागी थेट भाषणाची कल्पनाही त्यापैकीच एक. मात्र लोकसभा जिंकून सत्ता हाती घेतल्यावर मोदींनी या गटाला फ़ारसे महत्व दिले नाही किंवा पुढल्या कारभारात त्यांची दखल घेतली गेली नाही. म्हणून ती मंडळी नाराज असल्याचे बोलले जाते. त्याचाच लाभ उठवत संयुक्त जनता दलाचे नितीशकुमार यांच्या काही सहकार्‍यांनी प्रशांतशी संपर्क साधला आणि त्याची मदत घेण्याचा घाट घातला आहे. खुद्द ह्या तरूणाने त्याबद्दल कसली वाच्यता केलेली नाही. पण नितीश यांच्या गोटातून त्याला दुजोरा दिल्याने म्हटले जाते. आणखी काही महिन्यात बिहारच्या विधानसभा निवडणूका व्हायच्या असून तितक्या अवधीत प्रशांत मोठ्या यशाची कितपत हमी देऊ शकेल, हा कळीचा प्रश्न आहे. शिवाय मोदींच्य़ा नावाची व कामाची जादू जशी उपलब्ध होती, तितकी किमया नितीश यांच्या कारभाराची आहे काय, हा गहन प्रश्न आहे. पण या निमीत्ताने भारतीय राजकारणाने कुस बदलायला आरंभ केला हे मान्य करावे लागेल. नुसता प्रचार नव्हे, तर एक भूमिका घेऊन नेता व पक्षाला राजकीय रणमैदानात उभे करायचा हा व्यावसायिक प्रकार भारतात प्रस्थापित व्हायची चिन्हे आहेत.

मोदी यांच्या प्रचाराच्या रणधुमाळीत कधी कॅगचा उल्लेख फ़ारसा झाला नाही. पण एकूणच प्रचार मोहिम व त्यातले मुद्दे याविषयीची सुत्रे हीच मंडळी पडद्यामागून हलवत होती. त्यापैकी कोणाचा तसा थेट भाजपाच्या राजकारणाशी संबंध नव्हता. जनमानसला भुरळ घालणार्‍या कल्पना व लोकमत फ़िरवण्याची किमया त्यांनी घडवली. त्याचे श्रेय जरी त्यांचे असले तरी तितकी ताकद व क्षमता मोदींपाशी होती, हे विसरता कामा नये. राहुल गांधी यांच्याही पाठीशी त्याच काळात प्रचाराच्या क्षेत्रातील मोठे लोक उभे करण्यात आलेले होते. पण ते शिवधनुष्य पेलण्याची कुवत राहुलना दाखवता आलेली नव्हती. म्हणून कॉग्रेस भूईसपाट व्हायची वेळ आली. पण मोदींनी कॅगसह पक्षातील अनेक साधनांचा धुर्तपणे वापर करून घेतला. म्हणूनच सगळे श्रेय कॅग वा प्रशांत किशोर यांना देता येत नाही. मोदींच्या क्षमतेखेरीज प्रशांतचा प्रयोग यशस्वी होऊ शकला नसता. आताही त्याला नितीशकुमार यांना अच्छे दिन आणून दाखवायचे असतील, तर त्याच्या कल्पना व योजना यानुसार नितीशना खुप आटापिटा करावा लागेल. नव्या कल्पना व तंत्राचा अवलंब करण्याची मानसिकता नितीशसारख्या मुरब्बी राजकारण्याला अंगी बाणवावी लागेल. ते काम सोपे नाही. म्हणूनच प्रशांतला आपल्या गोटात आणल्याने नितिश वा जनता दल मोठी बाजी मारू शकतील की नाही, याची शंका आहे. कदाचित प्रशांतकिशोर यालाही तशीच शंका असावी. म्हणूनच नितीशचे सहकारी होकार देत असले, तरी या तरूण प्रचार तज्ञाने कुठलेही भाष्य करण्यास नकार दिला आहे. इथे एक फ़रक लक्षात घेण्याची गरज आहे. जाहिरात कंपन्या प्रचार व प्रसिद्धीची रणधुमाळी उडवून देण्यापुरती हमी घेतात. पण जनमानस फ़िरवण्य़ाची हमी देत नाहीत. प्रशांत याची कल्पनाच भिन्न आहे. माहोल बनवून विजयापर्यंत जाण्याची त्याची प्रणाली आहे.

भले प्रशांत वा त्याचे सहकारी मोदींवर नाराज असोत. पण दुसर्‍याच्या मदतीला जाऊन त्याला यशस्वी करून दाखवणे सोपे काम नाही. त्यात अपयश आले, तर कॅगने मिळवलेली ‘अच्छे दिन’ची प्रतिष्ठा कायमची नाकर्ती ठरू शकेल. त्यात कल्पना व योजना जितकी महत्वाची, तितकाच समोर पेश केलेला नेता व चेहरा निर्णायक मोलाचा आहे. समोर सचिन तेंडूलकर म्हणून पेश करायचा आणि तो युवराजसारखा अवसानघातकी खेळणारा निघाला, तर खेळच संपू शकेल. मोजक्या काळात साडेचारशे प्रचारसभा व लाखभर किलोमिटर्सचा अथक प्रवास करण्याचे शारिरीक कष्ट मोदींनी घेतले आणि आपली उर्जा जपून वापरली. अनेक व्यवधाने संभाळून काम केले आणि प्रचाराची धुराही संभाळली. कॅग व प्रशांत यांनी योजलेल्या थकवणार्‍या मोहिमेत मोदी अफ़ाट राबले. तशी कुवत नेता दाखवू शकला नाही, तर नुसत्या योजना कल्पनेला यश मिळू शकत नाही. प्रचाराची गाणी, साहित्य व सुविधा किंवा शब्द दुय्यम व चित्रपटातल्या लिखीत संवादासारखे निर्जीव असतात. त्यांना जिवंतपणा देणारा कलावंत अभिनेता निर्णायक असतो. मोदींनी ते शिवधनुष्य पेलून दाखवले. नितीश त्या कसोटीला कितपत उतरू शकतील? राहुलचे अपयश त्यातच दडलेले आहे. पाठीशी लढणारी मोठी फ़ौज असली तरी आघाडीवरून नेतृत्व करणारा धाडसी सेनापती युद्ध जिंकण्यासाठी महत्वाचा असतो. राहुल तिथेच तोकडे पडत गेले आणि परिणाम आपल्या समोर आहे. जुन्या राजकीय पठडीत आयुष्य़ घालवलेल्या नितीशना प्रशांत वा कॅग गटाचे नवे तंत्र आत्मसात करून पुढे जाता येऊ शकेल काय? सगळा मामला तिथेच कठीण दिसतो. अत्याधुनिक बोईंग विमान आणले, तरी ते उडवण्याची जिद्द व हिंमत असलेला पायलटही महत्वाचा असतो. प्रशांत किशोर यांनी उघड नितीशना मदत करण्याविषयी मौन पाळण्याचे तेच कारण असावे. अशा लोकांच्या नादाला लागून आपले बुरे दिन येण्याचे भयही त्यात असू शकेल.

1 comment:

  1. The results from Bihar have re-inforced the CAG Prashant Kishor magic with deadly perfection..Nitish & Lalu benefitted the same way Modi Benefitted..

    ReplyDelete