Saturday, May 9, 2015

आमची तीस्ता, तुमचा सलमान







सलमान खान याला सत्र न्यायालयाने दोषी ठरवून पाच वर्षाची शिक्षा फ़र्मावली आणि पुढल्या तीन दिवसात ज्याप्रकारे माध्यमांनी गदारोळ केला, ते नाटक होते की गरीबांसाठी फ़ोडलेला टाहो होता? माध्यमांनी न्यायालयीन प्रक्रियेविषयी ज्याप्रकारे शंका काढल्या, त्या बघता न्यायाची चाड फ़क्त माध्यमातल्याच शहाण्यांना आहे, असा भ्रम निर्माण झाला. खरेच न्याय आणि न्यायप्रक्रियेविषयी माध्यमे इतकी संवेदनाशील आहेत काय? सलमानला शिक्षा झाली आणि त्याला तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेतले नाही. काही तासातच त्याच्या वतीने हायकोर्टात दाद मागितली गेली आणि त्याच्या अटकेला हायकोर्टाने प्रतिबंध घातला. कोणी गरीब असता तर तात्काळ त्याच्या मुसक्या बांधून गजाआड टाकले गेले असते, असेही सातत्याने सांगितले जात होते. एकूणच माध्यमातला सूर असा होता, की सलमान खानकडे प्रचंड पैसा आहे, म्हणूनच त्याच्यासाठी न्यायप्रक्रिया वाकते आ नतमस्तक होते. जणू आजवर असे इतर बाबतीत झालेच नसावे, अशा थाटात सगळा शहाणपणा चालला होता. पण वास्तविकता तपासली तर माध्यमातून चालला होता, तो निव्वळ शहाजोगपणाच होता. धडधडीत खोटारडेपणा होता. याहीपेक्षा थक्क करून सोडणारी तत्परता यापुर्वी न्यायालयीन प्रक्रियेने वारंवार दाखवलेली आहे आणि त्यातही गरीबाचाच बळी गेलेला आहे. तेव्हा त्या अपवादात्मक गोष्टीचे टाळ्या पिटून माध्यमांनी स्वागत केलेले आहे. तेव्हा त्यांना त्यातला धडधडीत पक्षपात दिसला नव्हता? अगदी कालपरवाची गोष्टच घ्या. फ़ेब्रुवारी महिन्या नेमकी अशीच घटना घडली होती, पण तिचा असा गाजावाजा कशाला झाला नाही? सलमानच्या शिक्षेचा निकाल आल्यावर काही तासात हायकोर्टाने त्याच्या अटकेला स्थगिती दिली, तशीच स्थगिती फ़ेब्रुवारी महिन्यात तीस्ता सेटलवाड यांच्याही बाबतीत दिली गेली होती. तेव्हा यातल्या कोणी टाहो फ़ोडला होता काय?

गुजरात दंगलीत पिडितांना न्याय देण्यासाठी मागल्या बारा वर्षात माध्यमांनी ज्या एका महिलेला प्रेषित म्हणून जगासमोर पेश केले, तिचे नाव तीस्ता सेटलवाड असे आहे. त्याच दंगलीत अहमदाबाद येथील गुलमर्ग सोसायटीत जाळपोळ होऊन ६९ माणसांची हत्या झाली होती. त्यात कॉग्रेसचे माजी खासदार अहसान जाफ़री यांचाही मृत्यू झाला होता. त्यांच्या पत्नीने कोर्टात दाद मागितली, त्यात हस्तक्षेप करून तीस्ताने सहभाग घेतला आणि गुलमर्ग सोसायटीच्या रहिवाश्यांचे पुनर्वसन करण्याचा विडा उचलला होता. त्यासाठी विविध परदेशी संस्थांकडून मोठ्या रकमांच्या देणग्या मिळवल्या होत्या. ते पुनर्वसन मात्र अजून होऊ शकले नाही आणि त्यासाठी जमा केलेल्या करोडोच्या देणग्या तीस्ता व तिचा पती विश्वस्त असलेल्या ट्रस्टच्या खात्यात होत्या. त्यांचा वापर तीस्ताने व्यक्तीगत चैनीसाठी केला आणि पुनर्वसनाचा विषय वार्‍यावर सोडून दिला, असा आक्षेप आहे. दोन वर्षापुर्वी तिथल्याच एका दंगलग्रस्ताने त्या रकमेच्या अफ़रातफ़रीची माहिती गोळा करून पोलिसात तक्रार दिली आणि तेव्हापासून गुजरात पोलिस तपास करीत आहेत. पण त्यात तीस्ता कुठलेही सहकार्य करत नसल्याने कोर्टातर्फ़े तिच्या अटकेचा आदेश पोलिसांना घ्यावा लागला. त्याच आदेशाचे पालन होण्याच्या भयाने तीस्ताने एकामागून एक कोर्टाच्या पायर्‍या झिजवण्यास सुरूवात केली होती. पण मुंबईत हायकोर्टाने त्या अटकेच्या आदेशाला स्थगिती द्यायचे नाकारून गुजरात हायकोर्टात दाद मागायला सांगितले. तिथेही अटकपुर्व जामिन नाकारला गेला होता. तपासात मदत न करणे व टाळाटाळ करण्याचा तीस्तावर आरोप आहे. म्हणूनच पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन तपास पुढे नेण्याचा मार्ग चोखाळला होता. त्यामुळे तीस्ताला पळता भूई थोडी झाली होती. पण सुप्रिम कोर्टाने तिला ‘दिलासा’ दिला. हा दिलासा शब्द कुठून आला?

सलमानला जामिन मिळाला वा जामिन वाढवला मग पक्षपात होत असेल, तर तीस्ताच्या अटकेत कोर्टाने हस्तक्षेप करण्याला ‘दिलासा’ कसा म्हणता येईल? सलमान जसा आरोपी होता आणि त्याला जामिन घेऊनच तेरा वर्षे काढावी लागली, तर तीस्ताला अफ़रातफ़रीच्या गुन्ह्यातून अटकेत दिलासा कसा मिळू शकतो? पण हायकोर्टाने तिला दिलासा नाकारला आणि काही तासात तिच्या वकीलांनी दिल्लीत सुप्रिम कोर्टाचे दार वाजवले. विनाविलंब तीस्ताच्या अर्जाची दखल घेतली गेली आणि अटकेवर स्थगितीचा आदेश काढण्यात आला. आधी दोन दिवसासाठी स्थगिती देण्यात आली आणि ते प्रकरण खंडपीठाकडे सोपवण्यात आले. तिथेही पुन्हा तीस्ताला प्रश्नाला उत्तरे द्यावी लागली आणि अटकेवर प्रतिबंध घालून मोठ्या पिठाकडे ते प्रकरण सोपवण्यात आले. सलमान आणि तीस्ताच्या प्रकरणात कितीसा फ़रक आहे? सलमानने पोलिस व कायद्याशी सहकार्य केलेले आहे आणि तीस्ताने सतत पोलिस व कायद्याच्या तपासाला हुलकावण्या दिल्या होत्या. म्हणूनच गुजरात हायकोर्टाने तिच्या अटकपुर्व जामिनाला नकार दिला. इथे सलमानला हायकोर्टाने जामिन दिला तर तिथे सुप्रिम कोर्टाने तीस्ताच्या अटकेवर प्रतिबंध घातला. म्हणजे दोन्ही घटना जशाच्या तशाच आहेत. पण अफ़रातफ़रीनंतर तपासाला सहकार्य नाकारणार्‍या पळपूट्या तीस्ताच्या अटकेवर प्रतिबंध आल्यावर हीच माध्यमे कोणता शब्द वापरत होती? तीस्ताला ‘दिलासा’ मिळाला. आणि सलमानला जामिन दिल्यावर पक्षपात कसा दिसतो? वास्तविक कुठल्याही गुन्हेगाराला शिक्षा झाल्यावर अपील करण्याचा अधिकार आहे. त्यानुसार त्याच्या शिक्षेला स्थगिती देऊन जामिनावर मुक्त केले जात असते. संजय दत्तपासून लालूंपर्यंत अनेक नावाजलेल्या आरोपींना त्याचा लाभ मिळालेला आहे. मग सलमानला तो नाकारता येईल काय? त्यात नवे काहीच नाही.

इतकी न्यायाची चाड दाखवायची होती, तर माध्यमांनी सलमान प्रकरणापेक्षा तीस्ताच्या अटकेला प्रतिबंध होताच अकाशपाताळ एक करायला हवे होते. कारण देशातल्या न्यायप्रक्रियेत एका अफ़रातफ़र प्रकरणाच्या साध्या अटकेसाठी आजवर कुणाला कुठल्याही कोर्टाने इतकी खास सवलत दिलेली नाही, किंवा अटक स्थगित करण्यासाठी इतकी तत्परता दाखवलेली नाही. मागल्या दहाबारा वर्षात सुप्रिम कोर्टात तीस्ता सेटलवाड यांना मिळालेली वागणूक कायम अपवादात्मक आढळून येईल. जितक्या आस्थेने तीस्ताच्या बाबतीत सुप्रिम कोर्टाने कल दाखवला आहे, तितका अन्य कुठल्याच व्यक्तीच्या बाजूने दाखवलेला नाही. गुजरात हायकोर्टाने अटकपुर्व जामिन नाकारताच काही तासात दिल्लीत सुप्रिम कोर्ट ज्या तत्परतेने तीस्ताच्या अटकेला प्रतिबंध घालते, त्यात कुठलेही तर्कशुद्ध कायदेशीर कारण दिसत नाही. सलमानच्या बाबतीत हरीष साळवे यांनी निदान रास्त कायदेशीर मुद्दा उपस्थित केला आणि त्यामुळे सलमानला दिलासा मिळाला होता. पण तीस्ताला प्रत्येक बाबतीत अपवादात्मक दिलासा कशाला मिळू शकतो? तीन दिवस न्यायाची चाड आपल्यालाच आहे म्हणत न्यायालयांच्या कृती व निर्णयावर शंका उपस्थित करणार्‍या माध्यमातील मुखंडांनी खरेतर तीस्ताविषयी मौनव्रताचे कारण द्यायला हवे आहे. तीस्ताला सुप्रिम कोर्ट झुकते माप देते काय, असा सवाल तेव्हा कशाला विचारला गेला नाही? कारण तीस्ता हे मुळातच माध्यमातल्या मुखंडांनी उभे केलेले भूत आहे. म्हणूनच तीस्ताला ‘दिलासा’ मिळाल्याचे शब्द तयार होतात आणि सलमानला श्रींमंती म्हणून झुकते माप मिळाल्याचा गवगवा केला जातो. सलमान गरीबांचा ‘हिरो’ असतो म्हणून त्याचा खटला जाड भिंगातून बघितला जतो. कारण तीस्ता ‘आपली’ असते म्हणून तिच्या निकालाकडे आस्थेने बघून वास्तवावर पांघरूण घातले जाते.

सलमान असो किंवा तीस्ता असो, दोघांना न्यायप्रक्रियेत खास वागणूक वा सवलत मिळालेली आहे. किंबहूना सलमानपेक्षा तीस्ताला अधिक ‘खास’ वागणूक मिळाली आहे. पण त्याविषयी एक प्रतिकुल शब्द माध्यमांनी उच्चारला नाही. कारण माध्यमातल्या तथाकथित सेक्युलर अजेंडातील तीस्ता एक भागिदार आहे. सलमान त्यातला नाही म्हणूनच ‘आपला’ नाही; म्हटल्यावर त्याच सेक्युलर शहाजोगांना न्यायाचा काटेकोरपणा वा कठोरपणा हवासा वाटतो. त्यांना तीस्तासाठी वापरलेला ‘दिलासा;’ हा शब्दही आठवत नाही. कसा आठवणार? तीस्ता ह्या बुद्धीवाद्यांची आपली बेबी असते आणि सलमान रस्त्यावरच्या अडाणी सामान्यांचा कारटा असतो ना?

2 comments:

  1. बरोबर पकडले आहे भाऊ! तिस्ताच्या विरोधात कोणीही गदारोळ करताना दिसत नाही. संपूर्ण मिडीया तिचा तारणहार झाला आहे असे वाटते.

    ReplyDelete
  2. Bhau, ha vichar tar aajibatch kela navhata...

    ReplyDelete