चोराच्या मनात चांदणे अशी मराठी उक्ती आहे. नेमकी त्याची आठवण करून देणारी कृती कॉग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची कन्या प्रियंका गांधी वाड्रा, यांनी केली आहे. प्रियंकाचा पती रॉबर्ट वाड्रा हे दिर्घकाळ कॉग्रेस पक्षाच्या गळ्यातले लोढणे झालेले आहे. युपीएच्या सत्तेची सर्व सुत्रे संपुर्णपणे सोनियांच्या हाती होती, हे आता लपून राहिलेले नाही. मनमोहन सिंग हे नामधारी पंतप्रधान होते आणि त्यांच्या अपरोक्ष पंतप्रधान मंत्रालयाचा कारभार चालू होता. सहाजिकच सोनिया वा त्यांचे निकटवर्तिय कुठल्याही सरकारी कामकाजात ढवळाढवळ सहजगत्या करू शकत होते. रॉबर्ट वाड्रा त्यापैकीच एक होते, यात शंका नाही. म्हणूनच तर त्यांनी बॅन्क खात्यात केवळ लाखभर रुपये असताना करोडो रुपयांचे व्यवहार केले आणि करोडो रुपयांची अल्पावधीत कमाई सुद्धा केली. पुढे ही प्रकरणे चव्हाट्यावर येऊ लागली, तेव्हा कॉग्रेससाठी एकच पक्षकार्य बनुन गेले होते. गांधी घराण्याच्या पापावर पांघरूण घालणे. मात्र त्यामुळे त्या घराण्याच्या सदस्यांना मुक्ती मिळू शकलेली नाही आणि हा शतायुषी राजकीय पक्ष रसातळाला गेलेला आहे. अशा रॉबर्ट वाड्रा यांच्या हरयाणातील जमिन व्यवहारावर तिथल्या एका वरीष्ठ सनदी अधिकार्याने प्रश्नचिन्ह लावले होते, तर त्यालाच उचलून कुठल्या कुठे फ़ेकून देण्यात आले. त्यातून हा विषय चव्हाट्यावर आला. आम आदमी पक्षाची स्थापना केल्यावर केजरीवाल यांनी भ्रष्टाचाराच्या भानगडी उघड करण्याचा सपाटा लावला. त्यातला पहिला गौप्यस्फ़ोट याच वाड्रा उलाढालीचा केलेला होता. आता त्यातच प्रियंका गांधी फ़सण्याची पाळी आलेली आहे. त्यामुळेच प्रियंकाने प्रथमच पतीच्या व्यवहाराशी आपला संबंध नसल्याचा खुलासा घाईघाईने केला आणि त्यामुळेच त्या अधिक फ़सल्या आहेत. त्यांचा कुठेही उल्लेख झालेला नसताना त्यांनी खुलासा कशाला करावा, असा प्रश्न विचारला जातो आहे.
इकॉनॉमिक टाईम्स या आर्थिक विषयाच्या इंग्रजी नियतकालिकाने वाड्रा जमिन व्यवहाराची एक भानगड छापण्यापुर्वी प्रियंकाकडे काही प्रश्न पाठवले होते. त्याची उत्तरे तिने दिली नाहीत. पण ती भानगड छापून येणार असल्याचा सुगावा लागताच घाईगर्दीने त्याविषयी खुलासा अन्य वर्तमानपत्रात करून टाकला. जी बातमी वा आरोपही प्रसिद्ध झालेले नाहीत, त्याविषयीचा खुलासा करण्याची घाई कशाला? नेमके आरोप काय आहेत आणि त्या आरोपासाठी कुठला तपशील वापरला गेला आहे, त्याचीही माहिती नसताना प्रियंकाने असा खुलासा कशाला करावा? आपला पती यावेळी नक्कीच फ़सणार असल्याचा आत्मविश्वास त्या खुलाश्याचे कारण असू शकते काय? ही भानगड साफ़ आहे. किंबहूना राजकारणात चोरट्या मार्गाने लूटमार कशी करावी, त्याचा वस्तुपाठच वाड्रा यांनी घालून दिला आहे. स्कायलाईट हॉस्पिटालिटी नावाच्या त्यांच्या कंपनीच्या खात्यामध्ये एक लाख रुपये जमा असताना, काही करोड रुपयांची मालमत्ता त्यांनी पहावा नावाच्या व्यक्तीकडून खरेदी केली. ही मालमत्ता म्हणजे साधी शेतजमिन होती. दिल्लीलगतच्या फ़रीदाबाद या हरयाणाच्या क्षेत्रातली जमिन विकासाला काढली, तर कोट्यवधी रुपयांची मालमत्ता होती. पण शेतजमिन असल्याने त्यावर काहीही बांधकाम करण्याची मुभा नव्हती. सहाजिकच जमिन मालकाने कवडीमोल भावात ती वाड्रा यांना विकली आणि नंतर अल्पावधीतच हरयाणा सरकारने त्याच परिसरातील जमिनींना विकासाची मुभा देण्यासाठी जमिनीच्या वापरात बदल करण्यास मंजुरी दिली. ती संमती मिळाल्यानंतर वाड्रा यांनी तीच जमिन पुन्हा मुळच्या मालकाला कित्येक पटीने अधिक किंमत लावून विकली. थोडक्यात अशा व्यवहारामुळे खिशात दमडा नसतानाही वाड्रा यांना करोडो रुपयांचा नफ़ा मिळाला. सवाल वाड्रा यांचा नसून, त्या मूळ जमीन मालकाचा आहे. त्याने हा द्राविडी प्राणायाम कशाला करावा?
म्हणजे असे, की ती जमिन तशी आपल्याच खात्यात ठेवून त्याने सरकारकडे विकासाची परवानगी मागायला काय हरकत होती? जमिनीची कित्येक पटीने वाढणारी किंमत त्याच्याच खिशात गेली असती ना? पण त्याने तसे केले नाही. उदार होऊन त्याने आपल्या जमिनीचा मोठा लाभ वाड्रा यांना मिळावा, म्हणूनच इतकी उचापत केली ना? त्याचे साधे कारण असे, की त्याने सरकार दरबारी विकासाची वा वापर बदलण्याची मागणी केली असती, तर ती कधीच मिळाली नसती. ती मिळवण्याची जादू सोनियांच्या जावयापाशी असल्याचे कोणीतरी त्याला पटवून दिले आणि म्हणूनच ही जादूई किमया होऊ शकली. जमिन सोनियांच्या जावयाच्या नावावर झाली अणि हरयाणा सरकारला त्या भागात विकासाची स्वप्ने पडू लागली. तात्काळ तशा विकासासाठी वाड्रा यांच्या कंपनीने त्या जमिनीची कागदपत्रे सादर केली आणि तशी परवानगी मिळूनही गेली. अर्थात काम इतके सोपेही नव्हते. कुणा प्रशासकीय अधिकार्याने त्यातली त्रुटी दाखवून दिली होती. विकासाची संमती मागणात्या वाड्राच्या कंपनीपाशी पुरेसे भांडवल नाही व बॅन्क खात्यात पुरेसे पैसेही जमा नसल्याची त्रुटी समोर आलेली होती. पण त्या अधिकार्याच्या अजिबात अक्कल नसावी, सोनियांचा जावई अर्ज करतो, तेव्हा बॅन्क खात्यातले पैसे तपासायचे नसतात. त्याची सरकार दरबारातील पत बघायची असते. हे अधिकार्याला ठाऊक नसले तरी हरयाणाचे तात्कालीन कॉग्रेस मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुड्डा यांना पक्के ठाऊक होते. म्हणूनच त्यांनी तसा धोरणात्मक बदल करून, वाड्रा यांच्या कंपनीला तीच जमिन विकासित करण्याची संमती देऊन टाकली. आता वाड्रांनी काहीही करायचे शिल्लक राहिलेले नव्हते. त्यांनी तीच जमिन पुन्हा मूळ मालकाला परत करून टाकली. बदल फ़क्त किंमतीत झालेला होता. कित्येकपटीने त्या जमिनीची किंमत वाढलेली होती.
योगायोगाची गोष्ट अशी, की त्याच परिसरात व त्याच जमिन मालकाकडून तेव्हाच वाड्राच्या धर्मपत्नी प्रियंका गांधी वाड्रा यांनीही पंधरा लाख रुपयात काही जमिन खरेदी केली होती. पतिच्या कृपेने त्यांचीही जमिन विकास आराखड्यात येऊन तिचीही बाजार किंमत अवाच्या सव्वा वाढली होती. जी जमिन दोनतीन वर्षापुर्वी प्रियंकानी पंधरा लाखाला घेतली होती, तिचे बाजारमूल्य ऐंशी लाख होऊन गेले. सगळे व्यवहार कसे कायदेशीर झालेले आहेत. व्यवहार पतीचा असो किंवा पत्नीचा असो. मग त्यात पतीच्या व्यवहाराशी संबंध नसल्याचा खुलासा प्रियंकाने आताच कशाला करावा? हरयाणात सत्तांतर झाल्यावर नव्या सरकारने या व्यवहाराची चौकशी करण्यासाठी एक आयोग नेमला होता. त्याचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे आलेला असून, त्याचाच काही भाग वर्तमानपत्राला मिळाला. त्याचीच भानगड छापली जाणार म्हणून त्यांनी प्रियंकाला प्रश्नावली पाठवलेली होती. त्याची उत्तरे देण्यापेक्षा ही पत्नी बिथरली व तिने पतीच्या व्यवहाराशी आपला संबंध नसल्याचा खुलासा करून टाकला. आपण खरेदी केलेल्या जमिनीत घातलेले पैसे आपल्या आजीच्या मिळकतीतून लाभले होते. त्याचा पती वाड्राच्या व्यवहाराशी संबंध नसल्याचा खुलासा आला आहे. म्हणजे़च आपल्या पतीचे व्यवहार गफ़लतीचे आहेत, अशी भिती या पतिव्रतेला भेडसावते आहे काय? नसेल तर असा घाईगर्दीने खुलासा देण्याचे काहीही कारण नव्हते. ज्या पतीच्या उचापतीसाठी अख्खी कॉग्रेस गेल्या चार वर्षापासून सति जाते आहे, त्याच पतीला संकटात साथ देण्याची वेळ आल्यावर प्रियंकाने त्याविषयी हात झटकण्याचे कारण काय असावे? ही भानगड वाड्राला घेऊन डुबणार असल्याचा सल्ला कोणी प्रियंकाला दिला आहे काय? यात फ़सलात तर जावई सासुबाईसकट सर्वांना घेऊनच बुडणार; अशी भिती कोणी या खानदानाला घातली आहे काय?