Thursday, April 27, 2017

कायदा म्हणजे धाक

kashmir human shield के लिए चित्र परिणाम

सोमवार मंगळवारी दोन घटनांची माध्यमात खुप चर्चा चालली होती. त्यात एक घटना छत्तीसगड राज्यातील, तर दुसरी काश्मिरमधील होती. सुकमा येथील जंगली भागात नक्षलींनी केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांची केलेली सामुहिक हत्या, हा विषय चर्चेत असणे स्वाभाविक आहे. कारण तिथे कायद्याचाच मुडदा पाडला गेला आहे. पण तशीच काहीशी घटना काश्मिरातही घडली आहे. तिथे कॉलेजच्या विद्यार्थिनी म्हणजे मुलींनीही लष्कराच्या जवानांवर दगडफ़ेक करण्यात पुढाकार घेतल्याचे चित्रण समोर आले आहे. काही दिवसांपुर्वी अशाच स्वरूपाचे एक चित्रण खुप गाजले होते. निवडणूक केंद्रात जायला निघालेल्या सशस्त्र सैनिकाला रस्त्यातून सतावण्याचे काम चालू होते. त्याची खिल्ली उडवण्यापासून टोपी उडवण्यापर्यंत सर्व प्रकार चालले होते. मग त्यात त्या जवानाने दाखवलेला संयम कसा कौतुकास्पद होता, त्याचेही खुप कौतुक झाले. ह्या सगळ्या चर्चेतून काय साधले जाते? कायदा नावाची वस्तु नेमकी काय आहे, त्याचे तरी भान देशातील शहाण्यांना उरले आहे काय? अशी आता शंका येऊ लागली आहे. कुठल्याही देशातले सरकार वा सत्ता असते, तिचा खरा अंमलदार पोलिस किंवा सैनिक असतो. ज्याच्या हातात असलेले हत्यार सत्तेचे प्रतिक असते. त्याच शस्त्राच्या बळावर सत्ता राबवली जात असते. बाकी कागदावरचे कायदे किंवा आदेश निव्वळ दिखावू असतात. कारण जो काही कायदा असेल वा त्यानुसार सोडलेले आदेश असतात, त्याची अंमलबजावणी करण्याची शक्ती त्या सैनिकाच्या हातातल्या शस्त्रानेच कमावलेली असते. जोवर त्या शस्त्राचे बळ शिरजोर असते, तोवर ती सत्ता चालू शकत असते. जेव्हा त्या शस्त्राची अवहेलना वा टवाळी सुरू होते, तिथून सत्ता डळमळीत झाली म्हणून खुशाल समजावे. जगातल्या कुठल्याही लोकशाही व्यवस्थेची आज तशीच दयनीय अवस्था झालेली आहे.

लोकशाही म्हणजे शस्त्राने चालणारी व्यवस्था नाही, अशी एक ठाम समजूत शहाण्यांनी करून घेतली आहे आणि तीच समजुत राज्यकर्त्यांच्याही माथी मारलेली आहे. सहाजिकच सत्तेच्याच मुसक्या बांधणारे कायदे बनवण्यात आलेले असून, सत्ता राबवणार्‍यांच्या पायात अशा कायद्यांच्या बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत. त्याचाच दृष्य परिणाम आपण सुकमा वा श्रीनगरमध्ये बघत असतो. इथे नक्षली सशस्त्र दलाला किडामुंगीसारखे ठार मारतात आणि श्रीनगरमध्ये मुलीही गंमत म्हणून सैनिकांवर दगड मारू शकतात. कारण शस्त्राचा कोणालाही धाक उरलेला नाही. खरे तर शस्त्राचा धाक अजीबात संपलेला नाही. शस्त्र हे निर्जीव असते आणि कुणातरी माणसानेच ते चालवावे लागत असते. सहाजिकच शस्त्राचा धाक नसतो, तर ते कोणाच्या हातात आहे, त्याचा धाक असतो. त्याच्या मनगटात शक्ती व मनात हिंमत असेल, तरच शस्त्राला धार असू शकते वा भेदकता असू शकते. त्या धारेला वा भेदकतेला लोक घाबरत असतात. सहाजिकच ती भितीच लोकांना काही करायला वा न करायला भाग पाडत असते. एकाकी नि:शस्त्र गावकरी नागरिकांना दहशतवादी वा नक्षलवादी ओलिस ठेवतात, ते शस्त्राचाच धाक घालून. तेव्हा ज्यांना शस्त्राचा धाक वाटत असतो, ते गुपचुप अशा घातपात्याचे आदेश मानत असतात. कारण पुस्तकातले वा न्यायालयातले कायदे त्या ओलिसांचे संरक्षण करू शकत नसतात. तो घातपाती पुस्तकातल्या कायद्यांना जुमानत नसतो. म्हणूनच त्याने रोखलेले वा हाती धरलेले हत्यारच, त्यावेळी कायदा असतो. ही हत्याराची महत्ता असते. ते हत्यार कोणाच्या हातात आहे व तो त्याचा कसा वापर करू शकतो, यावरच हत्याराचा धाक असतो. सैनिकाच्या हातातले हत्यार आपल्यावर होणार्‍या हल्ल्याचा बंदोबस्त करू शकत नसेल, तर त्याच शस्त्राला कोणी कशाला घाबरावे? ते शस्त्र काय उपयोगाचे? अशा शस्त्राने कुठला कायदा राबवला जाऊ शकतो?

पाकिस्तानात दडी मारून बसलेला दाऊद वा अन्य कुठून धमकी देणारा शकील असे गुन्हेगार धमक्या देतात, तेव्हा त्यांच्या हाती कुठलेही कायद्याचे अधिकार नसतात. पण तरीही मोठमोठे नावाजलेले उद्योगपती, व्यापारी वा अधिकारी निमूटपणे त्या गुंडांच्या धमक्या आदेश असल्याप्रमाणे पाळतात. कारण त्याला जुमानले नाही, तर असा माफ़िया गुंड धमकीचा अवलंब करील आणि विनाविलंब आपले शब्द खरे करून दाखवील, याची प्रत्येकाला खात्री आहे. पण त्याला झुगारून पोलिसांची सरकारची मदत घेण्याची हिंमत नागरिकांना होत नाही. कारण सरकार कितीही बोलले व कायदा आपल्या बाजूने असला, सरकारी शस्त्र चालण्याची कोणी हमी देऊ शकत नाही. थोडक्यात प्रत्येकजण शस्त्राचा धाक मानतो. मग तो पोलिस असो, सैनिक असो, सरकार असो किंवा गुंडगुन्हेगार असो. ज्याच्यापाशी हत्यार आहे व ते वापरण्याची कुवत आहे, त्यालाच जग घाबरत असते आणि मानत असते. त्याचा शब्द हाच कायदा असतो. आजचा कुठलाही पोलिस वा सैनिक तसा दावा करू शकत नाही आणि केलाच तर पुर्णत्वास नेऊ शकत नाही. हीच मग गुंड दहशतवादी लोकांची शक्ती बनली आहे. म्हणून मुठभर नक्षलवादी भारतीय सेनेला आव्हान देऊ शकतात. म्हणुन काश्मिरात सैनिकांवर दगड मारण्याची हिंमत शाळकरी मुलीही करू शकतात. कारण समोरचा सैनिक बंदुका रोखणार, पण गोळी झाडणार नसल्याची त्यापैकी प्रत्येकाला खात्री पटलेली आहे. ज्या शस्त्रातून गोळी सुटत नाही वा जे हत्यारच बोथट झालेले आहे, त्याच्या बळावर हुकूमत करू बघणार्‍या सरकारच्या कायद्याला कशाला कोण भीक घालणार? सुकमा असो की काश्मिरातली घटना असो, त्यात हेच साम्य साधर्म्य आढळून येईल. दोन्हीकडे गणवेशातील पोलिस व कायदेशीर हत्यारे आहेत. पण त्यापैकी कशाचाही धाक लोकांना उरलेला नाही.

कायदा म्हणजे हिंसेचा धाक असतो. गुंडगिरी वा हिंसा करणार्‍यालाही काबुत आणण्यासाठी त्याहून अधिक हिंसेचेच भय घालावे लागते. ज्याला असा धाक घालता येतो वा प्रस्थापित करता येतो, त्यालाच आपला कायदा प्रस्थापित करता येत असतो. भारतात आधुनिक कायद्याचे राज्य आणणार्‍या ब्रिटीशांनीही अशीच अमानुष कत्तल करून, आपली सत्ता प्रस्थापित केलेली होती. त्यांची हिंसक वा मारेकरी क्षमता सिद्ध झाल्यावर, त्या धाकालाच त्यांनी कायदा असे नाव दिले आणि कागदावरचा कायदा भारतीयांच्या माथी मारला. कागदावरच्या कायद्याला जुमानणार नाही, त्याचा प्रतिवाद हत्याराने केला जाईल, असा विश्वास जनमानसात ब्रिटीशांनी निर्माण केल्यावरच भारतातील आजच्या प्रशासकीय व्यवस्थेचा पाया घातला गेला होता. १८६० सालात पहिले दंडविधान अस्तित्वात आले. पण त्याच्या तीन वर्षे आधी स्वातंत्र्याचे बंड अतिशय क्रुरपणे मोडून काढले गेले होते. सत्तेला आव्हान देणारे म्हणून हजारोच्या संख्येने कोणालाही फ़ासावर लटकावून ठार मारले गेले होते. ब्रिटीश सत्तेला आव्हान म्हणजे साक्षात मृत्यू; असे त्यातून लोकांच्या मनात भरवले गेल्यानंतर कागदी वा पुस्तकी कायदा बनवला गेला, त्या पुस्तकाच्या वा अक्षराच्या मागे शस्त्राची भेदकता ठामपणे उभी होती, तोवरच त्याचा धाक दबदबा राहिला. आज तीच शस्त्राची हिंसक क्षमता कायद्यातून निपटून काढली गेल्याने, शिल्लक उरले आहे त्याला कायद्याचे बुजगावणे म्हणता येईल. त्याला शाळकरी पोरीही घाबरत नाहीत. त्याच्यावर धोंडे म्हणूनच मारले जाऊ शकतात. त्या बुजगावण्याच्या हातातल्या बंदुकीमधून गोळीबार होऊ लागेल, तेव्हा काश्मिरात शांतता प्रस्थापित व्हायला आठवडाभरही वेळ लागणार नाही. कायदा म्हणजे शस्त्राचा धाक असतो. शस्त्राच्याच धाकाने कायदा राबवला जातो. हे जेव्हा अंमलात आणले जाईल, तेव्हाच भारतात शांतता नांदू शकेल. मग ते काश्मिर असो की नक्षलप्रभावित प्रदेश असो.


1 comment:

  1. Wah bhau mast, nehmicha dhacha sodun lihilat...jara vegala vachayala milala.. he amalat alala modi sarkaar ne tar lokana havay

    ReplyDelete