Thursday, April 13, 2017

आरशात आपला चेहरा बघा

Image result for kulbhushan jadhav

नियम हा सर्वांना सारखा असतो, यावरच नियमाचे कौतुक असते. ज्याक्षणी एक बाजू नियम धाब्यावर बसवते, तेव्हा नियमांचे वा कायद्याचे ताबेदार असतात, त्यांनी त्यात हस्तक्षेप केला नाही, तर दुसर्‍या बाजूलाही नियमांच्या बंधनातून मुक्ती मिळत असते. भारतातले जे कायदे आहेत, तसेच जगातले काही कायदे आहेत. त्यामुळेच त्या कायद्याचे पालन करण्याचे जगातल्या प्रत्येक देशावर बंधन आहे. ते जसे भारतावर बंधनकारक असतात, तसेच पाकिस्तानलाही बंधनकारक असतात. सहाजिकच कुलभूषण जाधव संदर्भात कुठल्या स्वरूपात कारवाई व्हावी, हा विषय पाकिस्तान परस्पर निकालात काढू शकत नाही वा त्यात मनमानी करू शकत नाही. कारण त्याच देशाने म्हटल्याप्रमाणे जाधव हा पाकिस्तानचा नागरिक नाही, तर भारतीय नागरिक आहे. त्याच्यावर कुठलेही आरोप पाकिस्तान करू शकतो. पण त्याबाबत करायच्या कारवाईचे निकष जागतिक कायद्याने ठरवलेले आहेत. त्याला व्हिएन्ना करार म्हणतात. त्यानुसारच कारवाईचे बंधन आहे. जाधवला पाकच्या लष्करी कोर्टाने खटला चालवून फ़ाशी ठोठावली आहे. पण अशारितीने त्याला शिक्षा देता येत नाही, किंवा त्याच्यावर खटलाही चालवला जाऊ शकत नाही. त्याला त्याच्या देशाच्या वकीलात वा सरकारची मदत हवी असेल, तर मिळाली पाहिजे आणि नागरी कोर्टातच त्याच्यावर गुन्हा सिद्ध करण्याची मुभा आहे. पण पाकिस्तानने यापैकी काहीच केले नसून, त्याच्या खटल्याविषयी संपुर्ण गुप्तता राखून परस्पर फ़ाशीची घोषणा केलेली आहे. सहाजिकच आपण व्हिएन्ना करार जुमानत नसल्याचे पाकने कृतीतूनच दाखवले आहे. म्हणूनच त्यात थेट जागतिक संस्थांनी हस्तक्षेप करण्याची गरज असून, भारत सरकारने तशी मागणी केली आहे. पण विषय तिथेच संपत नाही. पाकिस्तान तसे करणार नसेल तर पाक नागरिकांच्या बाबतीत भारतानेही त्या नियमांचे पालन करण्याची गरज उरत नाही.

कुलभूषण जाधव याच्या बाबतीत चाललेल्या गोष्टींसाठी भारत सरकारने जागतिक संस्थांकडे दाद मागणे, ही एक गोष्ट झाली. पण त्याच्याही पुढे जाऊन पाकिस्तानला जग शहाणपणा शिकवणार नसेल, तर तोच शहाणपणा पाक नागरिकाविषयी भारताला शिकवला जाऊ नये, असाही इशारा भारत देऊ शकतो. म्हणजे असे, की भारतात कोणी पाक नागरिक पकडला गेला वा सापडला, तर त्यालाही व्हिएन्ना करारानुसार संरक्षण देण्यास यापुढे भारत बांधील असणार नाही. असा इशारा जागतिक संस्थांना तात्काळ दिला गेला पाहिजे. नियम एका बाजूने लागू होत नसतात. दुर्दैव असे आहे, की तिकडे जाधबच्या गळ्याभोवती फ़ास आवळला जात असताना, अरबी सागरात बेपत्ता असलेल्या पाक मच्छिमारांना सुखरूप वाचवून पाकच्या हवाली करण्याचे पुण्यकर्म भारतीय तटरक्षक दलाने पार पाडले आहे. भारताला या अतिरेकी सभ्यपणातून बाहेर पडण्याची गरज आहे. यापुर्वी विविध मार्गाने आपल्या चांगुलपणाची साक्ष भारताने पाकला व जगाला दिलेली आहे. पण हळुहळू हा सभ्यपणाचा भारताची कमजोरी असल्याची समजूत पाकिस्तानने करून घेतलेली आहे. त्या भ्रमातून या शेजार्‍याला बाहेर काढण्याची गरज आहे आणि त्याचा आरंभ पाकच्या इथल्या हितचिंतकांना धडा देण्यापासून होऊ शकतो. त्यात आझादी ब्रिगेडपासून पाकप्रेमी ब्रिगेडपर्यंत अनेकांचा समावेश होतो. त्यांना इथे पाकिस्तानची वकिली करण्याला कायद्याने प्रतिबंध घालता येत नसेल, तर जनतेलाच त्यात पुढाकार घ्यावा लागणार आहे. दोन वर्षापुर्वी अशाच एका कारणास्तव पाकप्रेमी सुधींद्र कुलकर्णी यांच्या तोंडाला काळे फ़ासण्याचे काम शिवसैनिकांनी केलेले होते. त्याची देशव्यापी मोहिमच करावी लागणार आहे. जो कोणी पाकिस्तानची वकिली करील तोही जाधवचा खुनी ठरवून, त्यांचा इथे बंदोबस्त करावा लागणार आहे. तो कायद्यात बसत नसेल तर जनतेला करावा लागेल.

जितक्या उजळमाथ्याने मंगळवारी पाक वकिलातीमध्ये अनेक भारतीय मान्यवर चहापानाला गेले, तेही जाधवच्या हत्येतले भागिदार असतात, हे विसरता कामा नये. त्यांना इथला कायदा संरक्षण देतो आणि पाकिस्तानात मात्र भारतीय नागरिकांना बळीचा बकरा बनवले जात असते. मंगळवारी पाकच्या कराची शहरातून उझेर बलुच नावाच्या व्यक्तीला अटक झाली. त्याचा कुलभूषण जाधवशी संबंध असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. तसाच आरोप इथे पाकिस्तानी वकिलातीमध्ये मेजवान्या झोडायला जाणार्‍यांवर ठेवून, कारवाई करण्यास काय हरकत आहे? भारतीय लष्करानेही अशा भारतीयांना इथे ताब्यात घेऊन त्यांच्यावर लष्करी कोर्टात खटले चालवले तर काय बिघडणार आहे? कारण इथे पाकिस्तानचे हितचिंतक उजळमाथ्याने वावरणार आणि तिथे मात्र कुणाही भारतीयाला पाकिस्तान फ़ाशीवर चढवणार. म्हणूनच दोनप्रकारे हा विषय हाताळण्याची गरज आहे. एका बाजूला भारत सरकारने राजनैतिक मार्गाने काम करावे आणि जगालाही स्पष्ट शब्दात इशारा द्यावा. तर भारतात सामान्य जनतेने आपल्या परीने अशा पाक हितचिंतकांवर आपली कारवाई सुरू करावी. त्यातला पहिला उपाय म्हणजे असे जे कोणी पाकमित्र आपल्या समाजात दिसतात, त्यांच्यावर सार्वजनिक बहिष्कार घातला जावा. त्यांच्याशी संबंध राखतील वा त्यांना विविध स्वरूपातली मदत करताना दिसतील, त्या प्रत्येकाला पाकचा हस्तक समजून असा बहिष्कार घातला गेला, तर निदान पाकिस्तानला इथून मिळणारी रसद तोडली जाऊ शकेल. अशा पाकमित्रांच्या संस्था कुठल्या आहेत? त्यांचे थेट कोणाशी संबंध आहेत? त्यांच्याशी कोण संबंधित आहेत? अशा लोकांना हुडकून काढून समाजात त्यांना लज्जास्पद जीवन कंठण्याची वेळ आणणे, हाच त्यातला सर्वोत्तम उपाय असू शकतो. सरकारने काय करावे, त्याचे प्रवचन देण्यापेक्षा सामान्य नागरिक काय करू शकतो, तेही करता आले पाहिजे.

सोशल मीडियात आपले शहाणपण शिकवण्याची नेहमी स्पर्धा चाललेली असते. ते एक प्रभावी माध्यम आहे. तिथे जाधवविषयी आस्था असलेल्यांना खुप काही करणे शक्य आहे. उदाहरणार्थ पाकप्रेमी सुधींद्र कुलकर्णी हे कुठल्या तरी फ़ौंडेशनचे संचालक आहेत. त्यातून मिळणार्‍या पैशावर त्यांची गुजराण होते. हा पैसा त्यांना कुणाकडून मिळतो? अशा कंपन्या वा उद्योगांवर बहिष्कार घातला जाऊ शकतो. अशा कंपन्या वा व्यावसायिकांच्या सेवा किंवा उत्पादनावर प्रचंड संख्येने बहिष्कार घातला गेला, तरी अशा पाकप्रेमींच्या नाड्या आखडल्या जाऊ शकतात. कंपन्यांना नफ़ा होत असतो, तोवरच देणग्या देणे शक्य असते आणि एकप्रकारे अशा कंपन्यांचे सेवा वा माल घेऊन, आपणच जाधवच्या मारेकरी पाकप्रेमींचे पालनपोषण करीत असतो. आपण अशा कंपन्यांवर बहिष्काराचे हत्यार उपसले, तरी इथल्या पाकप्रेमींचा जीव कासावीस होऊ शकतो. सिनेमा लागला नाही तर बुडीत जाण्याच्या भयाने करण जोहर वा शाहरुख खान कसे घुसमटून जातात, हे आपण बघितले आहे. आपण त्या चित्रपटांवर अन्य माल सेवांवर बहिष्कार घालत नसू, तर आपणही कुलभूषणचे मारेकरी असतो. जाधवला फ़ाशी देणारे वा त्याचे समर्थन करणारे पाकप्रेमी आणि आपल्यासारखे बोलघेवडे जाधवप्रेमी, यांच्यात फ़रक तो काय राहिला? पाकिस्तानच्या नावाने बोटे मोडणे ही लबाडी आहे. इथल्या पाकप्रेमी व त्यांच्या पोशिंद्यांची नाकाबंदी करणे आपल्या हाती आहे. त्यासाठी सरकारने काही करायला नको आहे. सोशल मीडिया वा अन्य मंचावर तोंडाची वाफ़ दवडणे सोडून, आपण काय करणार त्याचे उत्तर आता प्रत्येक भारतीयाने शोधण्याची गरज आहे. आपण तितके प्रामाणिक आहोत काय? आरशासमोर उभे राहुन प्रत्येकाने स्वत:लाच हा प्रश्न विचारावा आणि त्याचे उत्तरही द्यावे. आपल्याला इतकी हिंमत झाली तरी पाक सरकार व लष्कर निमूट जाधवला मुंबईत आणून सोडायला तयार होईल.

No comments:

Post a Comment