Friday, August 18, 2017

फ़ोडणीतला कढीपत्ता

Image result for rohit vemula

मागल्या आठवड्याच्या अखेरीस चंदीगड येथील वार्णिका कुंडूच्या न्यायासाठी देशव्यापी संघर्ष चाललेला होता. एव्हाना तिला बहुधा न्याय मिळून गेलेला असावा. तो मिळालाच नसता, तर आपल्याला गोरखपूर परिसरात बालके प्राणवायू अभावी मृत्यूमुखी पडत असल्याचा कदाचित सुगावाही लागला नसता. वार्णिकाला तात्काळ न्याय मिळाला, हे त्या गोरखपूरच्या मृत्यूमुखी पडलेल्या बालकांचे सुदैवच म्हणायला हवे. आता बहुधा त्या मृत बालकांच्या पालकांना न्याय मिळालेला असावा. अन्यथा आपण हैद्राबादच्या रोहित वेमुलाच्या नावाने आक्रोश ऐकलाच नसता. त्या रोहितने आत्महत्या करून आता दोन वर्षाचा कालावधी उलटलेला आहे आणि तेव्हा उठलेले वादळ नंतर शमलेले होते. दिल्लीच्या नेहरू विद्यापीठापासून कोलकात्याच्या अन्य कुठल्या शिक्षण संकुलापर्यंत, वेमुला हा तेव्हा परवलीचा शब्द झालेला होता. नंतर त्याकडे कोणी ढुंकून बघेना, तेव्हा बिचार्‍या वेमुलाला वार्‍यावर सोडून देण्यात आले. आता त्यावेळी नेमलेल्या चौकशीचा अहवाल समोर आल्यानंतर अनेकांना रोहित वेमुला नामे कोणी होता व त्याने आत्महत्या केल्याचे स्मरण झालेले आहे. आज २० ऑगस्ट असल्याने आपल्या महाराष्ट्रात अनेकांना नरेंद्र दाभोळकरांचे स्मरण होईल. काहीजण काळा धागा मनगटाला बांधून जमतील आणि दाभोळकरांची हत्या झाली, त्याचा सोहळा साजरा करतील. अजून मारेकरी का पकडलेले नाहीत आणि पानसरे, कलबुर्गी दाभोळकरांना न्याय का मिळालेला नाही; म्हणून जाब विचारण्याचा सोपस्कार पार पाडला जाईल. आजकाल अशा उत्सवी लोकांना ही निमीत्ते हवी असतात. त्यांना कुणाच्या मृत्यू व हत्याकांडाचे काहीही सोयरसुतक राहिलेले नाही. शिजवलेल्या पदार्थाला स्वाद येण्यासाठी अशी कढीपत्त्याची पाने फ़ोडणीत वापरायला हवी असतात. बाकी घटनेशी वा त्यातल्या दु:ख भावनांशी काहीही कर्तव्य नसते.

कढीपत्ता असा शब्द वापरल्यामुळे अनेकांच्या भुवया ताणल्या जातील. तर त्यांना भाजीबाजारात मिळणार्‍या या पानांची महत्ता सांगणे भाग आहे. बाजारात भाजीखरेदी करायला जाणारा अगत्याने मिरची कोथिंबीर वा हिरवा मसाला खरेदी करीत असतो. त्यात मग पुदिना, आले किंवा कढीपत्ता अशा वस्तु अगत्याने मागितल्या जातात. हा कढीपत्ता मोठा विचीत्र पदार्थ आहे. खाद्याला चरचरीत फ़ोडणी देण्यासाठी तो पाला उकळत्या तेलात टाकला जातो आणि त्याचा गंध नंतर घरभर दरवळत असतो. अगदी शेजारच्या घरातही तो दरवळतो. कुणाच्याही तोंडाला पाणी सुटावे, असा हा दरवळ असतो. बिचारी ती पाने त्या उकळत्या तेलात होरपळून निघतात आणि त्याचा स्वाद घेणारे मात्र हुरळून जात असतात. त्या पानांच्या भाजून होरपळून जाण्याने त्या खाद्यपदार्थाला वेगळाच खास स्वाद येत असतो. म्हणून कढीपत्त्याला सन्मानाचे स्थान पंगतीत मिळत नाही. जेव्हा पंगत वाढली जाते आणि जेवण सुरू होते, तेव्हा कटाक्षाने पदार्थातील ही होरपळलेली कढीपत्त्याची काळीभोर झालेली पाने बाजूला काढली जातात, किंवा अगदी ताटाबाहेरही फ़ेकली जातात. ही त्याची पंगतीतील जागा असते. स्वाद येण्यापुरता कढीपत्ता महत्वाचा असतो. जळून होरपळून त्याने पदार्थाला स्वाद बहाल करायचा असतो. बाकी जेवणात त्याला कुठलेही स्थान नसते. कोणी त्याचे कौतुक करीत नाही, की पदार्थाचे स्वैपाकाचे गुणगान होताना कोणाला कढीपत्त्याचे नावही आठवत नाही. तेव्हा वरण, डाळ, मटकी वा चटणीचा गुणगौरव होत असतो. हे पदार्थ पोटात जात असतात आणि कढीपत्ता खरकटे म्हणून घाणीत जमा केला जात असतो. आपल्या राजकीय सामाजिक जीवनात असेच अनेक विषय असतात. ते फ़ोडणीत होरपळून विषयाला स्वाद आणण्यासाठी नेहमी वापरले जातात आणि नंतर त्यांच्याकडे पाठ फ़िरवली जाते. रोहित वेमुला त्यापेक्षा कितीसा वेगळा असतो?

नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी वा हैद्राबादला रोहित वेमुला आजच्या राजकीय उलाढालीत असेच कढीपत्ता बनवले गेलेले नाहीत काय? चंदीगडची वार्णिका कुंडू वा गोरखपूरची रोगबाधेला बळी पडलेली बालके, यांची पत किती आहे? फ़ोडणीत होरपळणार्‍या कढीपत्त्यापेक्षा त्यांना अधिक काही किंमत आहे काय? दाभोळकरांची हत्या होऊन चार वर्षे उलटली आहेत. आरंभी त्यावरून काहूर माजवण्यात आले आणि आज चार वर्षे झाल्यानंतरही या सामान्य गुन्ह्याचा शोध लागू शकलेला नाही. यापेक्षाही गुंतागुंतीचे रहस्यमय गुन्हे वा खुन पोलिसांनी सहज शोधून काढलेले आहेत. कुठलाही धागादोरा हाताशी नसलेल्या घातपात वा स्फ़ोटाच्या घटनांचा रहस्यभेद करणारे कुशल पोलिस या देशात आहेत आणि त्यांना दाभोळकर पानसरे़ंच्या मारकेर्‍यांचा सुगावा लागत नाही, यावर कोणी विश्वास ठेवावा? मुंबईत हत्याकांड घडवणारा अजमल कसाब पाकिस्तानच्या कुठल्या गावातून इथे कसा पोहोचला होता, त्याची खडा न खडा माहिती मिळवू शकणार्‍यांना पुण्याच्या हमरस्त्यावर दाभोळकरांना गोळ्या घालणार्‍याचा पत्ता लागत नसतो? पानसरेंना त्यांच्याच घरासमोर गोळ्या घालणार्‍यांची नामोनिशाणी पोलिसांना मिळत नाही? नगण्य प्रकरणातले आरोपी सहज मिळतात आणि इतक्या गाजणार्‍या विषयातील आरोपींचा थांग लागत नाही? की शोधायचेच नसते? कुठल्याही पक्षावर सत्ताधार्‍यावर याचा आळ घेण्याची गरज नाही. दाभोळकरांची हत्या झाली, तेव्हा राज्यात कॉग्रेस राष्ट्रवादी सत्तेत होते आणि पानसरेंच्या हत्येच्या वेळी सत्तांतर झालेले होते. पण दोन्ही बाबतीतला तिर्‍हाईतपणा नेमका जसाच्या तसा आहे. कारण यात गुंतलेल्या कोणालाही सत्य समोर आणायची इच्छा नाही. अगदी या मृतांच्या नावाने सोहळे करणार्‍यांनाही असे खुन व दुर्घटना फ़ोडणीतल्या कढीपत्त्यासारख्या स्वादापुरत्या हव्या असतात ना?

रोजच्या रोज कुठला तरी अन्याय दाखवून वा सांगून त्याच्या न्यायासाठी टाहो फ़ोडणारी रुदाल्यांनी एक नवी जमात आजकाल उदयास आलेली आहे. राजस्थान किंवा अन्यत्र पैसे मिळवण्यासाठी व्यावसायिक रडण्याचे कौशल्य वापरणारे लोक आहेत. पैसे घेऊन ते रडण्याची सेवा देत असतात. आता त्याचे गोलबलायझेशन झालेले आहे. वाहिन्या व माध्यमातून रडण्याचा धंदा तेजीत चालतो. चार वर्षापुर्वी दाभोळकरांची हत्या झाल्यावर आठवड्याभरात अशा तमाम रुदाल्या लालबागच्या राजाचे गुणगान सांगण्यात गढून गेलेल्या होत्या. त्यानंतर त्यांना दाभोळकर आठवले ते वर्षभरांनी. दोन आठवड्यापुर्वी तमाम रुदाल्या चंदीगडच्या वार्णिकाला न्याय मिळण्यासाठी गळा काढत होत्या. नंतर त्यांना गोरखपूरच्या बालकांसाठी रडायचे टेंडर मिळाले. आता हैद्राबादच्या रोहित वेमुलाच्या नावाने फ़ोडणी पडलेली आहे. पैशासाठी रडण्याचा धंदा किती प्रतिष्ठीत झाला आहे, ते त्यातून दिसतेच आहे. पण जेव्हा अशा मतलबाच्या उकळत्या तेलात हे बळी कढीपत्त्यासारखे होरपळताना दिसतात, तेव्हा मनाचा उद्रेक होतो. अशा बेशरमपणाला प्रतिष्ठा मिळताना बघून जिवाची काहिली होते. मीठभाकर खावून पोटाची आग विझवणार्‍या करोडो लोकांच्या माना, अशा चमचमीत फ़ोडणीचा स्वाद घेत उठणार्‍या मान्यवरांच्या पंगती बघून शरमेने खाली जातात. पण त्याची अशा शहाण्यांना कुठे पर्वा असते? उद्या रोहित वेमुलाचेही त्यापैकी कोणाला स्मरण उरणार नाही. कारण नव्या फ़ोडणीसाठी नवा कुठला तरी कढीपत्ता आलेला असेल बाजारात. त्याचा स्वाद घेतला जाईल. हीच आता नव्या युगातली, जगातली नित्याची जगरहाटी झालेली आहे. त्यात दाभोळकर, पानसरे, वेमुला वा गोरखपूरच्या बालकांनी होरपळून जायचे असते. पंगत उठली, मग खरकट्यात निमूटपणे जाऊन पडायचे असते. त्यालाच मानवी स्वातंत्र्ये, लोकशाही वा न्यायाची लढाई म्हणतात ना?

6 comments:

  1. रोहित वेमुला हा दलित नव्हताच या गोष्टीने सरकारला हायसे वाटले असेल असे त्या बातमीच्या वृत्तांकनावरून वाटते . एरवी त्याच्या दलित असण्याचा अथवा नसण्याचा मुद्दाम उल्लेख करण्याचे कारण काय ?
    रामायणात दशरथाच्या शब्दवेधी बाणाने जखमी होऊन शेवटच्या घटका मोजत असलेला श्रावणबाळ राजाला सांगतो ," घाबरू नकोस . मी ब्राम्हण नाही त्यामुळे तुला ब्रम्हहत्येचे पाप लागणार नाही . " रोहित वेमुलाच्या मृत्यूची चौकशी करणाऱ्या आयोगाने सरकारला तसाच दिलासा दिला आहे असे सामान्य वाचकाला वाटले तर त्यात काय आश्चर्य ?

    ReplyDelete
  2. bahu kadipatya chi upma far gr8 aahe

    ReplyDelete
  3. व्वा भाऊ
    ही फोडणी बाकी फुरोगामी रुदाल्यांना ठसका देणार हे नक्की

    ReplyDelete
  4. भाऊराव,

    अगदी समर्पक लेख. तत्कालीन सत्ताधारी म्हणजेच आजच्या विरोधी पक्षांतल्या अनेकांना या हत्यांचा खरा तपास व्हायला नकोय. दाभोलकरांची हत्या झाल्याझाल्या लगेच तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विनापुरावा आरोप करून तपास भरकटवला होता. त्यांना खोपच्यात घेतल्यास ते पोपटासारखे बोलू लागतील. पोलिसी खाक्या दाखवायचीही जरुरी नाही. पण मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार, असा प्रश्न आहे.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete