Wednesday, August 16, 2017

रोगप्रसार आणि रोगानिदान

gorakhpur tragedy के लिए चित्र परिणाम


"Nothing in the world is more dangerous than sincere ignorance and conscientious stupidity."   - Martin Luther King Jr.

२००९ सालात देशात असेच काहुर माजलेले होते. तेव्हा कोणाला गोरखपूरात बालरोगाची साथ असल्याचे ठाऊक नव्हते. त्यावेळी देशात स्वाईनफ़्लू नावाची प्रणघातक साथ आलेली होती आणि कुठल्याही महानगरात लोक तोंडावर कपडा झाकूनच फ़िरत वावरत होते. या साथीच्या आजाराचा अकस्मात फ़ैलाव होईल अशी तात्कालीन सरकारला कल्पना नव्हती आणि जेव्हा त्याची लागण झालेले रुग्ण आढळू लागले, तेव्हा धावपळ सुरू झाली. त्या आजाराचा पहिला बळी पुण्यात पडलेला होता. मात्र त्या रुग्णाला स्वाईनफ़्लूची बाधा झालेली असली, तरी त्याचा बळी त्या आजाराने घेतलेला नव्हता. अज्ञान व अर्धवट अकलेने त्याला मृत्यूच्या दाढेत ढकलून दिले होते. त्या रुग्णाचे नाव रिदा शेख असे होते. ती कुठल्या दुर्गम खेड्यातल्या अडाणी मातापित्यांच्या पोटी जन्माला आलेली मुलगी नव्हती, की घरात अठराविश्वे दारिद्र्य नव्हते. चांगल्या घरची श्रीमंती होती आणि पुण्यातल्या अत्यंत नामवंत अत्याधुनिक इस्पितळात तिच्या पालकांनी धावपळ करून रिदाला उपचारार्थ दाखल केलेले होते. तिथे प्राणवायूचा तुटवडा नव्हता की कुठल्या औषधे व साधनांची कमतरता नव्हती. अतिशय निष्णात डॉक्टर रिदावर उपचार करत होते आणि रिदा शुद्धीत येण्यापुर्वीच इहलोकीची यात्रा संपवून निघून गेली. तिच्या मृत्यूचे कारण चुकीचे रोगनिदान आणि डॉक्टरांची बुद्धीवादी अंधश्रद्धा असेच होते. ही अवस्था सुशिक्षीत डॉक्टरांची असेल. तर ज्यांना वैद्यकीय शास्त्रातले काहीही उमजत नाही, अशा तथाकथित शहाण्यांनी आपल्या अडाणीपणाचे प्रदर्शन मांडल्यावर काय होईल? आज गोरखपूर बालमृत्यूच्या बाबतीत रस्त्यावरचा कोणीही जाणता व विशेषज्ञ झालेला आहे. त्यामुळेच पुढल्या काळात आणखी मुले त्यात दगावली, तर नवल मानण्याचे कारण नाही. कारण रिदा शेखच्या मृत्यूने आपल्याला काहीही शिकवलेले नाही.

रुबी हॉल नामक पुण्यातल्या अतिशय प्रतिष्ठीत रुग्णालयात रिदा शेख उपचारार्थ दाखल झाली होती आणि तिच्यावर नामवंत डॉक्टर्स सलग उपचार करीत होते. कुठेही दुर्लक्ष झालेले नव्हते. मग रिदाचा मृत्यू कशामुळे झाला असेल? रिदा डॉक्टरांच्या अविरत उपचारांना प्रतिसादच देत नव्हती. त्यातच तिचा मग मृत्यू झाला. मुद्दा असा, की डॉक्टर उपचार करतात, तेव्हा ते रुग्णाच्या प्रतिसादाचाही अभ्यास करत असतात. आपण केलेला उपचार व दिलेली औषधे यांचा रुग्णाला कितीसा लाभ होतो आहे वा त्याच्यावर प्रतिकुल परिणाम होतो आहे, याचीही दखल घेतली जात असते. पण इथे डॉक्टरांचे एकामागून एक जालीम उपाय चालले होते आणि रिदा त्यापैकी कशालाही प्रतिसाद देत नव्हती. असे असताना त्यात सहभागी असलेल्या कुणाही डॉक्टरला आपल्या उपचारांचा फ़ेरविचार करायची बुद्धी झाली नाही. कुणाला आपण केलेले निदान योग्य आहे का फ़सलेले आहे, त्याचाही फ़ेरविचार करण्याची गरज वाटली नाही. परिणामी चुकीच्या उपचारांनी रिदाची आबाळ झाली आणि तिला जगाचा निरोप घेण्य़ाखेरीज अन्य कुठला पर्याय राहिला नाही. तिला स्वाईनफ़्लूची बाधा झालेली होती. पण त्या अत्याधुनिक रुग्णालयाला ह्या आजाराची ओळखच नव्हती. हा आजार न्युमोनियाशी सादृष असल्याने रुग्णालयात आलेल्या रिदाचे निदान न्युमोनिया असे झालेले होते. सर्व उपचार न्युमोनिया म्हणूनच चाललेले होते. त्याला रुग्णाईत रिदाकडून प्रतिसाद मिळण्याचा मग विषयच येत नव्हता. थोडक्यात निदान चुकले आणि उपचारही चुकत गेले. परिणामी उत्तम इस्पितळात असूनही रिदाचा बळी गेला होता. स्वाईनफ़्लू झालेला असताना त्यासंबंधी कुठलाच उपचार होऊ शकला नाही आणि रिदाचा त्यात हकनाक बळी गेला. ते डॉक्टर्स असे मुद्दाम वागलेले नव्हते. तर स्वाईनफ़्लू या विषयातले त्यांचे अपुरे ज्ञान तशा वर्तणूकीला कारणीभूत झालेले होते.

मार्टीन ल्युथर किंग यांची उपरोक्त उक्ती तेच भयंकर सत्य आपल्याला सांगते. पण त्यातला आशय समजून घेण्याचीही विवेकबुद्धी आपण गुंडाळून ठेवलेली असेल, तर रोगनिदान बाजूला रहाते आणि रोगप्रसाराला हातभार लावण्याचे पाप आपल्याकडून घडते. गोरखपूर येथे प्राणघातक ठरलेल्या आजाराविषयी अपुर्‍या ज्ञान व महितीच्या आधारे माध्यमातून उठवलेले वादळ; म्हणूनच रोगापेक्षाही घातक आहे. तिथे प्राणवायूचा पुरवठा अपुरा पडला म्हणून मुलांचा बळी गेल्याचे काहूर माजवण्यात आलेले आहे. पण तशा विषयातून सत्ताधारी व प्रशासनाला अलगद निसटताही येऊ शकते. कारण हे प्रश्नाचे वा मृत्यूचे वास्तविक निदानच नाही. हे मृत्यूकांड प्रतिबंधक उपचारात दिरंगाई व त्रुटी यामुळे घडलेले आहे. ज्या रोगावर अजून कुठलेही औषध वा उपचार सिद्ध झालेला नाही. त्याची बाधा होऊ नये म्हणून योजलेले उपाय, हाच त्यावरचा जालीम उपाय असू शकतो. पण त्यावर संपुर्ण पांघरूण घातले गेले आहे. ते वास्तविक रोगापेक्षा घातक आहे. कारण आज ज्या नागरिकांनी आपली मुले गमावली आहेत, त्यांच्याच घरात कुटुंबात पुन्हा कधीतरी अन्य मुलाला अशी बाधा होऊ शकणार आहे. ते आपल्या मुलासाठी प्रतिबंधक उपायाविषयी पुन्हा बेसावधच रहातील. म्हणजे मुलांना अशा आजाराची बाधा होऊ नये, म्हणून काही करण्यापेक्षा इस्पितळात प्राणवायू आहे किंवा नाही, याची सरकारही अधिक काळजी घेईल. परंतु त्यामुळे भविष्यकाळात बाधा होणार्‍या बालकांना त्या आजारापासून मुक्ती मिळू शकणार नाही. कारण रोगप्रतिबंध हाच त्यावरचा उपाय आहे आणि चार दशकात तशा मोहिमा चालवूनही त्यात यश येऊ शकलेले नाही. पण आज जो राजकीय आरोपांचा तमाशा चालला आहे, त्याने त्या खर्‍या समस्येकडे कुणाचेही लक्ष वेधलेले नाही वा तशी मागणीही होताना दिसलेली नाही.

प्राणवायूचा तुटवडा किंवा त्यातला भ्रष्टाचार ही अत्यंत दुय्यम गोष्ट आहे. कारण गाजावाजा झाल्यावरही तितक्याच संख्येने बालकांचा मृत्यू होतोच आहे. कारण त्यांना या आजाराची गंभीर बाधा झालेली असून, अपुर्‍या वेळात त्यावर उपाय सुरू होऊ शकलेले नाहीत. प्राथमिक केंद्र वा खाजगी दवाखान्यातून इस्पितळात रुग्ण बालकाला घेऊन जाईपर्यंतच विलंब होत असतो. म्हणूनच उपचाराविषयी गैरसमज अधिक घातक आहे. आपल्या बाळाला अशी बाधाच होता कामा नये आणि वेळच्यावेळी आधीच प्रतिबंधक डोस, हाच उपाय असल्याचे पालकांच्या मेंदूत शिरण्याला अधिक महत्व आहे. ती बाव संपुर्ण दुर्लक्षित केली गेलेली आहे. प्राणवायू तुटवडा, त्यातला भ्रष्टाचार उकरून काढण्याने विषयातले गांभीर्य संपवलेले आहे. तो एक राजकीय आरोपबाजीचा विषय झालेला असून, पुढल्या वर्षी तितक्याच आवेशात त्यावर चर्चा रंगवल्या जाऊ शकतील. पण बालमृत्यूचे प्रमाण कमी होण्याची बिलकुल शक्यता नाही. सवाल मृत्यूला पायबंद घालण्याचा आहे आणि ते काम सरकारपेक्षाही प्रभावीपणे जागृत पालक करू शकतात. शंभर टक्के पालकांनी आपल्या मुलांना तसे डोस मुदतीमध्ये देण्याची काळजी घेतली, तर रुग्णालयातच जाण्याची वेळ येऊ शकणार नाही. आपापल्या बालकांना या आजारापासून वाचवण्यात सरकारच्या डोस मोहिमेत पालकांनी अगत्याने सहभागी होणे, इतरांना सहभागी होण्यास प्रवृत्त करणे आवश्यक आहे. आजच्या बातम्यांचे काहूर बघितल्यास पुढल्या वर्षीच्याही डोस मोहिमेतही तितके यश मिळू शकणार नाही. त्यापेक्षा लोक इस्पितळातील व्यवस्था व प्राणवायूची नळकांडी मोजत बसतील. मग रिदा शेखला अत्याधुनिक इस्पितळ वाचवू शकत नसेल, तर अशा चुकीच्या रोगनिदानाने गोरखपूर वा पुर्व उत्तर भारतातील बालकांना कोण वाचवू शकेल? विवेकबुद्धी हरवलेला शहाणपणा आजारापेक्षाही घातक असतो ना?

1 comment:

  1. भाउ तुमचा युक्तीवाद बिनतोड असतो खरच.

    ReplyDelete