Wednesday, August 16, 2017

विनाशकाले विपरीत बुद्धी

netaji statue birbhum के लिए चित्र परिणाम

महत्वाकांक्षा आणि द्वेष या दोन गोष्टी विनशाला आमंत्रण देणार्‍या असतात. जगाच्या इतिहासात अनेक साम्राज्ये आणि राजघराणी त्यातून लयास गेलेली आहेत. पण त्यापासून धडा घेण्याची इच्छा वा आवश्यकता पुढल्या कालखंडातील महत्वाकांक्षी लोकांना कधी झालेली नाही. भारतीय राजकारणात व इतिहासातही त्याची उदाहरणे कमी नाहीत. साडेतीन वर्षापुर्वी दिल्लीतल्या लोकपाल आंदोलनातून पुढे आलेल्या अरविंद केजरीवाल यांना असेच मह्त्वाकांक्षेने पछाडले आणि दोनदा संधी मिळूनही त्यांनी त्याची माती करून दाखवलेली आहे. त्याच दरम्यान राजकारणात प्रस्थापित असलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पंतप्रधानपद वा मोदी द्वेषाच्या आहारी जाऊन एक आत्मघातकी पाऊल उचलले. त्यांना नाक मुठीत धरून त्याच मोदींना शरण जाण्याची नामूष्की कालपरवा आलेली आपण बघितलेली आहे. ही अलिकडली ताजी उदाहरणे आहेत. पण म्हणून त्यापासून बंगालच्या मुख्यमंत्री ममता बानर्जी शहाण्या होतील, अशी कोणाची अपेक्षा नव्हती. म्हणूनच त्या आपल्या विनाशाचा खड्डा आपणच खोदून काढत आहेत. मागल्या दोन वर्षात त्यांनी पुन्हा एकदा बंगालची सत्ता स्वबळावर संपादन केली आणि त्यातून येणारी जबाबदारी वा कर्तव्ये विसरून त्यांनी मोदींना नेस्तनाबूत करण्याचा विडा उचलला आहे. पण तसे करताना त्यांच्याच पायाखालची वाळू सरकताना दिसू लागली आहे. पण त्यातून काही शहाणपण शिकण्याची त्यांची तयारी दिसत नाही. अन्यथा त्यांच्याच राज्यात बंगालचा सुपुत्र म्हणून जगभर ओळखल्या जाणार्‍या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्मारक वा पुतळ्याची स्वातंत्र्यदिनी विटंबना होण्याची घटना वीरभूम जिल्ह्यात घडली नसती. त्यावरून जे काहूर माजले आहे, त्याचे उत्तर देण्याऐवजी ममतांना तोंड लपवायची वेळ आली नसती. आपलेच साम्राज्य अतिरेकी राजा कसे गमावतो, त्याचे हे उत्तम उदाहरण आहे.

मागल्या दोन दशकात ममता बानर्जी यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे बंगालमधील अजिंक्य मानले जाणारे साम्राज्य उध्वस्त करण्याचा विडा उचलला होता आणि तो निर्धार तडीस नेवून दाखवला. १९७७पासून डाव्या आघाडीने बंगालमध्ये इतका जम बसवला होता, की तीन दशके त्यांना कोणी झुंज देणाराही शिल्लक उरलेला नव्हता. अशा बंगालमध्ये कॉग्रेस हाच एकमेव विरोधी पक्ष होता. पण त्याच्यातही लढण्याची इच्छा नव्हती. अशा कॉग्रेसमधल्या एक खासदार ममतांनी तो निर्धार केला व काही कॉग्रेसजन त्यांच्या पाठीशी उभे राहिले. त्यांनी श्रेष्ठींना झुगारून वेगळी चुल मांडली आणि सलग बाराचौदा वर्षाच्या संघर्षातून मार्क्सवादी डाव्या आघाडीला २०१० सालात पाणी पाजून दाखवले. कधी भाजपा तर कधी कॉग्रेस यांना हाताशी धरून ममता आपली झुंज चालवत गेल्या आणि मागल्या पाचसहा वर्षात त्यांनी बंगालवर आपली पकड भक्कम केली. दोन वर्षापुर्वी त्यांनी एकहाती बंगालमध्ये सत्ता व प्रचंड बहूमत मिळवले. कॉग्रेस व मार्क्सवादी एकत्र येऊनही ममतांना आपली सत्ता मजबूत करणे शक्य झाले. मात्र या गडबडीत तिसरा एक घटक बंगालमध्ये उदयास आला. भाजपा नव्याने त्या प्रांतामध्ये आपली पाळेमुळे रुजवू लागला. किंबहूना या नव्या पक्षाच्या आगमनाला मिळणारा प्रतिसाद कॉग्रेस व डाव्यांना दुबळा करून गेला आणि त्याच्याच परिणामी ममतांना मिळालेले यश अधिक मोठे भासत होते. तो धोका ओळखून नंतरच्या काळात ममतांनी भाजपाला प्रमुख विरोधक मानून आपले राजकारण चालविले आहे. पण ते करताना जो आक्रस्ताळेपणा त्यांनी आरंभला, तोच आता त्यांच्या मुळावर येत चालला आहे. त्यातून त्यांची प्रतिमा अधिकाधिक मलीन होऊन भाजपाला अधिक प्रतिसाद मिळू लागला आहे. एकप्रकारे असेही म्हणता येईल, की आपले शत्रू संपवताना ममतांनी आपलाच नवा शत्रू प्रयत्नपुर्वक मजबूत करण्याचा चंग बांधला आहे.

बंगालमधून डाव्यांची मक्तेदारी संपली, ती केवळ त्यांच्या नाव वा चेहर्‍याला लोक वैतागलेले होते म्हणून नाही. डाव्यांच्या नुसत्या तात्विक व गलथान कारभाराला लोक कंटाळलेले होते. त्यातून मतदार ममताकडे आलेला होता आणि तीच ममतांना आपली शक्ती वाटलेली होती. खरेतर लोक सत्तांतरासाठी ममताकडे झुकलेले नव्हते, तर त्यांना स्थित्यंतर हवे होते. पहिल्या पाच वर्षात त्या अपेक्षा पुर्ण झाल्या नाहीत, तरी दुसरा पर्याय नसल्याने ममतांना पुन्हा यश मिळाले आणि तेच त्यांच्या डोक्यात गेलेले आहे. बंगाल ही आपली जागीर असल्यासारख्या त्या वागू लागल्या आहेत. त्यातच भाजपाच्या वाढत्या प्रभावाचे कारण केंद्रातील भाजपाची सत्ता असल्याच्या समजुतीने त्यांना भेडसावलेले आहे. तसे असते, तर केंद्रात कधीही सत्तेत नसलेल्या डाव्यांना बंगाल ३६ वर्षे आपल्या कब्जात ठेवता आला नसता. सवाल केंद्राचा वा तिथे सत्तेत असलेल्या भाजपाचा नसून, राज्यात वेगाने आपले हातपाय पसरणार्‍या भाजपाचा आहे. केंद्राशी शत्रूत्व घेऊन त्याला पायबंद घालता येणार नाही. त्यापेक्षा मतदाराच्या अपेक्षा काही प्रमाणात पुर्ण करण्यानेही भाजपाच्या वाढीला लगाम लावता येईल. तेच दिल्लीत केजरीवाल करू शकले नाहीत की ममतांना त्याची गरजही वाटलेली नाही. परिणामी जो सत्ताधिकार मिळाला आहे, त्यातून जनतेच्या अपेक्षा पुर्ण करण्याकडे दुर्लक्ष होऊन, दोन वर्षात केजरीवालांना दणका बसला. आता ममतांनाही राज्यातील भाजपाचा पर्याय उभा रहाण्यातून भिती वाटू लागली आहे. राज्याचा कारभार सुखकर होण्याकडे लक्ष देण्यापेक्षा आक्रस्ताळेपणा करून त्यांनी चालविलेले राजकारण, त्यांना अधिक गोत्यात घेऊन चाललेले आहे. भाजपाच्या हिंदूत्वाच्या आपणच खंबीर विरोधक असल्याचे भासवताना त्यांनी बंगाली जनतेच्या भावना दुखावणे हा कार्यक्रम केला आहे. त्यातूनच आता वीरभूम जिल्ह्यात नेताजींच्या प्रतिमेची विटंबना होण्याची घटना घडलेली आहे.

केंद्र सरकारने स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासंबंधी एक सूचनावजा पत्र पाठवलेले होते. त्याच्याकडे काणाडोळा करण्याचा फ़तवा ममतांनी काढला आणि केंद्राने आपल्याला राष्ट्रवाद शिकवू नये, अशी मल्लीनाथीही केलेली होती. त्यामुळे देशापेक्षाही धर्म प्राधान्याचा अशी भूमिका घेणार्‍या मुस्लिम मौलवी व नेत्यांना जोर चढला आणि त्यांनी भारतीय राष्ट्रीयत्वाची प्रतिके असलेल्या गोष्टीना अपमानित करण्यापर्यंत मजल मारल्यास नवल नाही. भाजपा व त्याचे हिंदूत्व बाजूला ठेवले, तरी नेताजी ही बंगाली माणसाच्या अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळेच आता त्यांच्याच स्मारकाची अवहेलना झालेली असेल, तर त्याची मोठी किंमत ममतांना राजकारणात मोजावी लागणार आहे. कारण ममतांच्या आततायीपणाचा तो पुरावा झाला असून, त्यांच्या राज्यात देशद्रोह कसा प्रतिष्ठीत झाला आहे, ते सांगण्याचे कोलित भाजपाच्या हाती लागलेले आहे. मुस्लिम मतांसाठी धर्मांध मुस्लिमांना चुचकारणे वा हिंदू सणाच्या आयोजनात अडथळे आणण्याच्या कृतीने, आधीच ममतांनी लोकांच्या मनात आशंका निर्माण केलेल्या होत्याच. आता नेताजींच्या स्मारकाच्या विटंबनेने सामान्य बंगाली माणसाच्या अस्मितेलाही लाथाडले गेले आहे. यासाठी ममतांना जनतेने सत्ता दिलेली नव्हती की भाजपा विरोधात आक्रस्ताळेपणा करण्यासाठी बहूमत दिलेले नव्हते. बंगाली नागरिकांचे जीवन सुसह्य होण्याची अपेक्षा त्यामागे होती. पण आपल्या बेफ़िकीर वर्तन व कारभारातून ममतांनी लोकांचा त्याच बाबतीत मुखभंग केलेला आहे. सहाजिकच डाव्यांच्या विरोधात जसा मतदार पर्याय शोधत गेला, तसाच ममतांना पर्याय बंगाली माणुस आता शोधू लागला असेल, तर नवल नाही. अशा स्थितीत नेताजींच्या प्रतिष्ठेसाठी संघर्षाला उतरणारा भाजपा व विटंबनेला पाठीशी घालणार्‍या ममता, यातून बंगालीबाबू कोणाची निवड करील? याचे उत्तर सोपे आहे. म्हणूनच याला विनाशकाले विपरीत बुद्धी असे म्हणावे लागते.

3 comments:

  1. ममतांचा विजय हा केवळ ममतांचा विजय नव्हता.माध्यमे ही उजवीकडे झुकणारी आहेत त्याना कम्युनिस्टांना ऊखडून टाकण्याची घाई आणि गरज झालेली होती.त्यानी ममतांना पुरेपूर उचलून धरून कम्युनिस्टांची हकालपट्टी केली.माध्यमांची डाव्या किंवा समाजवादी नेत्यांची भलावण केवळ भाजपाच्या विरोधापुरतीच आहे.कॉंग्रेससारखा भ्रष्टाचारास पोषक पक्षच त्याना हवा असतो.ममता मुळच्या काँग्रेसच्याच कुळातील आहेत

    ReplyDelete
  2. भाउ तुमच हे भाकित पन २०१९ साली खर होइल अस वाटतय.

    ReplyDelete
  3. Bhau,I doubt how much your prediction will come true though we all wish for it. Recent clean sweep in local elections by TMC is worrisome.

    ReplyDelete