Monday, August 28, 2017

जपून टाक पाऊल जरा

republic TV at cong HQ के लिए चित्र परिणाम

मागल्या चार वर्षात मला आवडलेली दोन माणसे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुसरा अर्णब गोस्वामी! देशातील पत्रकारितेला पाखंडी पुरोगामी विळख्यातून बाहेर काढण्यासाठी आपली सर्व शक्ती व बुद्धी पणाला लावणारा पत्रकार, म्हणून अर्णब मला खुप आवडला. कारण त्याने दिल्लीत बसून देशावर दिर्घकाळ यशस्वीपणे राज्य करणार्‍या बौद्धीक नोकरशाही उर्फ़ ब्युरोक्रसीला उखडून चव्हाट्यावर आणायचे मोठे काम हाती घेतलेले आहे. त्यासाठी त्याला एका वाहिनीच्या संपादक पदाचा त्याग करावा लागला आणि अनेकांचे शिव्याशापही पत्करावे लागलेले आहेत. पण आपल्या विवेकबुद्धी व शहाणपणाला त्या ब्युरोक्रसीसमोर शरणागत होण्यास नकार देणारा झुंजार पत्रकार, म्हणून अर्णब मला आवडला. मात्र अलिकडे त्याने आपल्या प्रतिष्ठेच्या भांडवलावर आरंभ केलेल्या रिपब्लिक या नव्या वाहिनीची वाटचाल हळुहळू त्याच ब्युरोक्रसीच्या दिशेने होऊ लागल्याची शंका येऊ लागली आहे. ज्या कंपूशाहीच्या विरोधात अर्णबने संघर्ष सुरू केला, त्यांच्या बौद्धिक वा वैचारिक भूमिकेशी मतभेद असणे एक गोष्ट आहे. पण त्यांच्याच पद्धतीने शैलीने उचापतखोरी करणे, ही वेगळी गोष्ट आहे. पुरोगामी विचारसरणी ही एक भूमिका आहे आणि ती काही लोकांनी आपली बटिक करून टाकली. त्यामुळे एका उदात्त विचारसरणीला बिकट दिवस आलेत. तिची जनमानसातील पत संपलेली आहे. ठराविक ढुढ्ढाचार्य एक भूमिका घेणार आणि बाकी पत्रकारांनी व माध्यमांनी त्याचीच री ओढावी, अशी जी शैली मागल्या दोनतीन दशकात उदयास आली, तिने पत्रकारितेची तटस्थता मारून टाकली आहे. त्याला प्रादेशिक वा भाषिक माध्यमातून आव्हान मिळत असले, तरी ते किरकोळ होते. अर्णबने इंग्रजी व राष्ट्रीय माध्यमात ते आव्हान उभे केले, म्हणून त्याला प्रतिसाद मिळाला होता. त्यालाच आता बाधा येऊ लागली काय, अशी शंका येते आहे.

टाईम्स नाऊ ही राष्ट्रीय माध्यमातील बहुधा एकमेव वाहिनी अशी होती, जिचे मुख्यालय मुंबईत होते, दिल्लीपासून दूर होते. म्हणून असेल ल्युटियन दिल्ली म्हणतात त्या मुठभर सत्ताधीशांच्या दिल्लीची हुकूमत अर्णब वा टाईम्स नाऊवर चालू शकली नाही. केवळ अंतरामुळे नाही तर अर्णबकडे त्यापासून मुक्त रहाण्याची हिंमत व इच्छा असल्यानेच ते शक्य झाले. अन्यथा मुंबई, चेन्नई वा कोलकात्यातील माध्यमेही सतत दिल्लीची मांडलीक म्हणूनच पत्रकारिता करत राहिली आहेत. ल्युटियन दिल्ली म्हणजे तमाम भारतीय लोकसंख्येला क्षुद्र मानून त्या गुलामांवर हुकूमत गाजवण्याची प्रवृत्ती होय. जेव्हा या नव्या दिल्लीची उभारणी झाली, तेव्हाच तिथे उपर्‍या ब्रिटीश राज्यकर्त्यांचे वर्चस्व गृहीत धरलेले होते. नेटीवांवर हुकूमत गाजवायची व त्यांच्यात न्युनगंड जोपासून आपल्या वर्चस्वाचा खुंटा पक्का करायचा, ही त्यातली वृत्ती हळुहळू त्या ल्युटियन दिल्लीत प्रवेश मिळालेल्या भारतीयांमध्येही रुजत फ़ोफ़ावत गेली. मागल्या सात दशकात ती प्रवृत्ती समाजाच्या विविध घटकातही चांगलीच रुजली. अशा प्रवृत्तीला ल्युइटीयन दिल्ली म्हटले जाते. ती तिथल्या राजकारण्यात, पत्रकार लेखकात, वकील अधिकार्‍यात, विचारवंत प्राध्यापकात मुरलेली दिसेल. विषय कुठलाही असो. अशा ल्युटियन लोकांनी परस्परांची वकिली केलेली दिसेल. किंवा त्यांच्या बाहेरच्या कुणालाही खतम करताना हे सर्व व्यावसायिक घटक एकजुटीने उभे ठाकलेले दिसतील. अशा ल्युटियन दिल्लीला हादरा देणारा राजकारणी नरेंद्र मोदी पहिला, तर ल्युटियन माध्यमांच्या पीठाधीशांना झुगारणारा अर्णब धाडसी. म्हणूनच त्याचे कौतुक होते. पण नवी वाहिनी सुरू केल्यावर अर्णब बेताल होण्याची लक्षणे दिसू लागली आहेत. ज्यांच्या विरोधात दंड थोपटून अर्णब उभा राहिला, त्यांचीच शैली घेऊन तो दहशत निर्माण करू बघत असेल, तर त्याला जाब विचारणे भाग आहे.

रिपब्लिक वाहिनी सुरू केल्यावर अर्णब व त्याच्या सहकार्‍यांनी अनेक जुन्या नव्या भानगडी चव्हाट्यावर आणलेल्या आहेत. आजवर दडपून ठेवलेल्या या सर्व भानगडी तथाकथित पुरोगामी राज्यकर्ते, राजकारणी वा त्यांनी मानदंड बनवलेल्या प्रतिष्ठीतांच्या आहेत. त्याचे कागदोपत्री वा अन्य स्वरूपाचे पुरावे उकरून काढून पर्दाफ़ाश करणे योग्यच आहे. त्यापैकीच एक सुनंदा पुष्करचा संशयास्पद मृत्यू होय. ज्या प्रकारे शशी थरूर या केंद्रीय मंत्र्याच्या सुंदर पत्नीचा मृतदेह एका पंचतारांकित हॉटेलात आढळून आला, ती बाब गुंडाळून टाकण्यासारखी घटना नव्हती. त्या घटनेच्या पुढल्या मागल्या घटनाही संशय गडद करणार्‍या आहेत. पण कुठल्याही गंभीर चौकशीविना त्यावर पडदा पाडला गेला होता. अन्य कुठल्या नवर्‍याची गोष्ट असती तर प्रथम त्याला आटक झाली असती. पण दिल्लीचे पोलिस निष्क्रीय राहिले. त्यांच्या त्याच नाकर्तेपणाला कुणा माध्यमाने प्रश्न विचारले नाहीत. कुणा बुद्धीमंताला त्यावर शंका घेण्याची इच्छाही झाली नाही. हा सगळा मामला म्हणूनच अधिक संशयास्पद होता. कारण सुनंदा बोलली तर शशी थरूर सोडा, ल्युटियन दिल्लीतले भलेभले चेहरे फ़ाटत गेले असते. सहाजिकच आज त्याचे काही भक्कम पुरावे वा लपवाछपवी हाती लागली असेल, तर तिचा गौप्यस्फ़ोट करणे ही अर्णाबच्या वाहिनीची पत्रकारिता योग्य व धाडसी नक्कीच आहे. पण त्यातून सत्य समोर आणण्याचा आग्रह असला पाहिजे. त्यातून शशी थरूर वा कॉग्रेस पक्षाची नाचक्की करण्याचा हट्ट असेल, तर ती शैली प्रामाणिक पत्रकारितेची वाट सोडून ल्युटियन दिल्लीच्या बदमाशीचे वाटा धरू लागत असते. कॉग्रेस मुख्यालयात शशी थरूर यांच्या पत्रकार परिषदेतून रिपब्लिकच्या वार्ताहरांना बाहेर काढल्यानंतरचे त्यांचे वर्तन व रिपब्लिक वाहिनीने आरंभ केलेली मोहिम, ल्युटीयन दिल्लीचेच अनुकरण करताना दिसली. त्यात अर्णब विरघळून गेला असे वाटले.

शशी थरूरची पापे उकरून काढणे, त्यावर चर्चा घडवणे किंवा त्याच्यासह कॉग्रेस पक्षाला उघडे पाडणे योग्यच आहे. पण ते करताना त्याच्याशी काडीमात्र संबंध नसलेल्या कुठल्या कार्यक्रमात वा पत्रकार परिषदेत जाऊन धुमाकुळ घालण्याचा प्रयास करणे, ही पत्रकारिता असू शकत नाही. ती चळवळ व पत्रकारिता यांची सरमिसळ होते. तेच गेल्या दोनतीन दशकात ल्युटीयन दिल्लीच्या टोळीने केलेले पाप आहे. कन्हैयाकुमार या विद्यार्थी नेत्यावर बालंट आले, तेव्हा त्याच्या सुटकेनंतर त्याचे भाषण लिहून देण्यापर्यंत बरखा दत्त लुडबुडत होती. युपीए सरकार बनत असताना बरखा, प्रभू चावला किंवा वीर संघवी यांच्यासारखे मान्यवर ल्युटीयन पत्रकार, सत्तापदांची सौदेबाजी करण्यात गर्क झालेले होते. लोकपाल आंदोलनाच्या काळात अनेक पत्रकार केजरीवाल टोळीला पर्याय म्हणून उभा करण्यासाठी आपली बुद्धी झिजवत होते. गुजरात दंगलीचे निमीत्त करून भाजपा व प्रामुख्याने नरेंद्र मोदींना लक्ष्य बनवण्यासाठी ल्युटीयन पत्रकार व बुद्धीमंत राजकारण्याच्या खांद्याला खांदा लावून मैदानात उतरले होते. त्यासाठी मोदी कुठेही दिसले वा भेटले; मग त्यांना बाकीचे विषय सोडून दंगलीवर प्रश्न विचारण्याचा सपाटा लावलेला होता. अनेकदा त्या प्रश्नांची उत्तरे देऊनही तेच तेच प्रश्न वारंवार विचारून हैराण करून सोडायचे, अशी ती मोडस ऑपरेन्डी आहे. त्यामुळे मोदींनी पत्रकारांना मुलाखती देणेच बंद केले. तर मोदी माध्यमांना घाबरून पळाले, अशी आवई उठवण्यातही ल्युटीयन दिल्लीचाच प्रेरणा होती. सुनंदा पुष्कर प्रकरणात रिपब्लिक वाहिनी व अर्णबने काय वेगळे चालविले आहे? शशी थरूर त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत नाहीत, म्हणून दिसतील तिथे त्यांच्या पाठलाग करून त्याच प्रश्नांची सरबत्ती करणे, हा अतिरेक व दहशतवाद नाही काय? त्यासाठीच कॉग्रेसने थरूर यांच्या पत्रकार परिषदेत व्यत्यय नको म्हणून अर्णबच्या सहकार्‍यांना बाहेर काढले असेल, तर त्यात वावगे काय आहे?

ती पत्रकार परिषद एका ठराविक विषयासाठी होती आणि तिथे जाऊन रिपब्लिकच्या वार्ताहरांना त्या विषयातले प्रश्न विचारायचे नव्हतेच. तिथेही कारण नसताना सुनंदा पुष्कर मृत्युविषयी प्रश्न विचारून गोंधळ घालण्याचाच त्यांचा हेतू होता. तो उघडपणे दिसत असतानाही कॉग्रेस पक्षाने अशा वार्ताहरांना प्रवेश देऊन गोंधळाला आमंत्रण कशाला द्यायचे? त्या पक्षाचे कार्यालय आहे आणि त्यांना त्रसदायक ठरतील अशा पत्रकारी वेशातल्या गोंधळ्यांना तिथून बाहेर ठेवणे, हा कुठल्याही पक्ष वा संघटनेचा पुर्ण अधिकार आहे. भारतीय राज्यघटनेने लेखन वा अविष्कार स्वातंत्र्य दिले आहे, तो कुठेही घुसखोरी करण्याचे वा गोंधळ घालण्याचा परवाना नाही. ज्या बाबतीत तुम्हाला काही म्हणायचे असेल वा सांगायचे असेल, ते कथन करण्याची ती मोकळीक आहे. त्यात शशी थरूर वा कॉग्रेस पक्षाने कुठलीही बाधा रिपब्लिक वाहिनीला आणलेली नाही. पण आपल्या अधिकार वा स्वातंत्र्याची व्याप्ती परस्पर वाढवून कॉग्रेस वा कुठल्याही पक्ष संघटनेच्या कार्यक्रमात गोंधळ घालण्याचा अधिकार रिपब्लिक वा अर्णबच्या सवंगड्यांनी सांगण्याचा अट्टाहास चालविला होता. त्याला स्वातंत्र्याधिकार नव्हेतर उचापतखोरी म्हणतात. कारण शशी थरूर कॉग्रेसच्या एका नव्या शाखेचे प्रमुख म्हणून तिथे भूमिका मांडणार होते आणि सुनंदा मृत्यूचा त्याच्याशी काडीमात्र संबंध नव्हता. तरीही तिथे व्यत्यय आणण्याच्या हट्टाचा पत्रकारितेशी काडीमात्र संबंध नाही आणि म्हणूनच रिपब्लिक वाहिनीची कुठलीही गळचेपी कॉग्रेसने केल्याचा दावा धांदांत कांगावखोरीच म्हणावी लागेल. आजवर अशी कांगावखोरी ल्युटीयन दिल्लीचे बुद्धीमंत, पत्रकार व राजकारणी सातत्याने करीत आलेले आहेत. या निमीत्ताने अर्णबने त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून दाखवलेले आहे. म्हणूनच तसे वागणे निषेधार्हच आहे. मग अर्णबने काय करायला हवे होते?

वाजपेयी यांच्या कारकिर्दीत ‘टहलका’ नावाच्या वेबसाईटने काही भानगडी छुप्या कॅमेराने टिपून प्रकाशित केल्या होत्या. तेव्हा त्याचा संपादक पत्रकार तरूण तेजपाल याला ल्युटियन दिल्ली व पत्रकार डोक्यावर घेऊन ना़चले होते. त्यांचे अनुकरण देशभरच्या पत्रकार माध्यमांनी करून त्याला वारेमाप प्रसिद्धी दिलेली होती. भाजपाचे अध्यक्ष बंगारू लक्ष्मण व पर्यायाने त्या पक्षाला गोत्यात आणण्यासाठी तेजपालने एक राजकीय अजेंडा हाती घेतला होता आणि अवघी ल्युटीयन दिल्ली त्याच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली होती. पण त्यातले तर्कशास्त्र तेजपालचे समर्थन वा भाजपा विरोधाची पाठराखण असे नव्हते. सत्य प्रस्थापित होण्याची लढाई असे त्यातले चित्र उभे करण्यात आलेले होते. नंतरच्या काळात तशाच बातमीदारीसाठी तेजपाल याला ल्युटीयन दिल्लीच्या राज्यकर्ते, बुद्धीमंत व माध्यमांनी निर्विवाद सहाय्य केले होते. पण चार वर्षापुर्वी तोच तेजपाल गोव्यात एका लैंगिक भानगडीत अडकला, तेव्हा सत्याचा शोध घेणारे ल्युटीयन दिल्लीचे तमाम शहाणे तेजपालच्या सुरक्षेसाठी सरसावले होते. त्यातल्या पिडीत मुलीविषयी कोणाला आस्था नव्हती. त्यांच्या पुरोगामीत्वाचा बुरखा तेजपालनेच एका वक्तव्यातून फ़ाडला होता. आपण पुरोगामी पत्रकार आहोत म्हणून गोव्यातले भाजपा सरकार आपल्याला गोत्यात घालत असल्याचा अजब बचाव तेजपालने मांडलेला होता. जे काही घडल्याची तक्रार होती, त्याचा कुठलाही इन्कार तेजपालने केला नव्हता. तरीही ल्युटीयन दिल्ली त्याचा निषे़ध करायला राजी नव्हती. अटकेच्या भयाने भूमिगत झालेल्या तेजपालचे निर्लज्ज समर्थन ल्युटीयनवासी करीत होते. तेजपालच्या बदमाशीला पत्रकारिता ठरवून त्याच्या बचावाला उतरले होते. आता सुनंदा वा अन्य भानगडी चव्हाट्यावर आणणार्‍या अर्णबच्या पाठीशी त्यापैकी कोणी उभा राहिलेला नाही. तेजपालप्रमाणे कोणी रिपब्लिकच्या समर्थनाला पुढे आलेला नाही.

कुठल्याही चिरकुट कारणासाठी पत्रकारितेवर हल्ला वा अन्याय म्हणून बहिष्काराचे पवित्रे घेणारे ल्युटीयन दिल्लीचे पत्रकार अशावेळी रिपब्लिक वार्ताहरांच्या सोबतच कॉग्रेस कार्यालयातून बाहेर पडायला हवे होते. कारण ती आजवरची कार्यशैली राहिली आहे. पण कॉग्रेस मुख्यालयातून शशी थरूर पत्रकार परिषदेपुर्वी रिपब्लिकच्या एकेक वार्ताहराला शोधून बाहेर काढले जात असताना कोणी अन्य माध्यमाचे पत्रकार निषेधाला उभे राहिले नाहीत की त्यांन सहानुभूती दाखवायला बाहेर पडले नाहीत. म्हणून यातला खरा आरोपी बदमाश ल्युटियन दिल्लीची पत्रकारिता आहे. किंबहूना आपल्या त्यावेळच्या प्रक्षेपणात रिपब्लिक वाहिनी सातत्याने तोचस आअल जाहिरपणे विचारत होती आणि रात्रीच्या चर्चेत अर्णबनेही त्याच विषयाला हात घातला होता. तोही रास्त होता. पण त्या घटनेसाठी कॉग्रेस पक्षाला वा नेत्यांना जबाबदार धरणे साफ़ चुकीचे होते. त्यानंतर अर्णब वा त्याच्या सवंगड्यांना निदर्शने वा निषेधच करायचा होता, तर त्यांनी कॉग्रेस मुख्यालयाच्या बाहेर ठाण मांडण्याला अर्थही नव्हता. त्यांनी याप्रकरणी ल्युटीयन माध्यमे व पत्रकारितेचे मुखवटे फ़ाडण्यासाठी राष्ट्रीय पत्रकार संघटनांच्या दाराबाहेर येऊन प्रदर्शन मांडायला हवे होते. पत्रकारितेचा मुखवटा लावून जो दुटप्पीपणा राजरोस चालू असतो, त्याचा पर्दाफ़ाश अशा प्रसंगी आवश्यक होता. यापुर्वी अस्जी किरकोळ घटना कुठे घडली तर राष्ट्रीय आपत्ती असल्याप्रमाणे प्रत्येक वाहिनी वा दिल्लीच्या वृत्तपत्रात त्यावर आवाज उठवला गेलेला आहे. मग रिपब्लिकच्या वाट्याला तशीच वागणुक आल्यावर तमाम माध्यमे त्यावर इतकी गप्प कशाला होती? त्याचेही कारण समजून घेतले पाहिजे. ल्युटीयन माध्यमे वा त्यांचे अन्य व्यवसायातील साथीदार यांचा एक दंडक आहे. त्यांच्या वर्तुळाच्या बाहेरील कुणाला त्यात स्थान नसते किंवा त्याच्यावरील अन्यायालाही वाचा फ़ोडण्याची गरज नसते. दिवंगत रेगेसरांनी याचे विश्लेषण केलेले आहे.

‘समाजात जेव्हा एखादा वरिष्ठवर्ग अभिजनवर्ग असतो तेव्हा त्याचे सदस्य एकमेकांशी वागताना अतिरेकी सभ्यतेचे संकेत पाळताना आढळतात. त्याची उलट बाजू अशी की, या वर्तुळाबाहेरच्या व्यक्तीशी, कनिष्ठ व्यक्तीशी वागताना, ते जाणूनबुजून असभ्यरितीने वागतात. सामाजिक समतेच्या दिशेने वाटचाल करताना या कृत्रिम सभ्यतेवर आणि कृत्रिम असभ्यतेवर आघात करावेच लागतात. अधिकाधिक व्यक्तींना सभ्यतेच्या परिघात आणावे लागते आणि कृत्रिम सभ्यपणा अधिक सुटसुटीत करावा लागतो. या प्रक्रियेत एकेकाळी असभ्य मानल्या गेलेल्या वागण्याच्या रिती सभ्य म्हणून स्विकारल्या जातात.’  (प्रा. में पुं रेगे.- ‘नवभारत’ जाने-फ़ेब्रु १९९७)

ल्युटीयन दिल्ली म्हणजे असा वरीष्ठ अभिजन वर्ग आहे. त्याच्या तुलनेत बाकीचे भारतीय वा दिल्लीतलेही परिघाबाहेरचे लोक हे क्षुल्लक असतात. त्यांना परिघाबाहेरचे म्हणूनच असभ्य वा असंस्कृत ठरवलेले असते. सहाजिकच त्यांना कुठलेही अधिकार वा स्वातंत्र्ये नसतात. त्यांनी गुलाम वा पाळीव जनावराप्रमाणे जगावे हीच अभिजन वर्गाची अपेक्षा असते. मग त्यातला कोणी पंतप्रधान वा राष्ट्रपती झाला म्हणून फ़रक पडत नाही. त्याची लायकी क्षुद्रच असते. लागोपाठ यश मिळवूनही मोदी ल्युटियन दिल्लीत तुच्छ व सतत पराभूत होऊनही सोनिया राहुल तिथे कौतुकाच्या कशाला असतात, त्याचा अर्थ उलगडू शकतो. तेजपालच्या क्षुल्लक पत्रकारितेचे महात्म्य मोठे व अर्णबच्या यशाची पायमल्ली का होते, त्याचे उत्तर रेगेसरांच्या विश्लेषणाय सापडू शकेल. इथेच मग मोदी आणि अर्णब यांच्यातला फ़रक समोर येतो. मोदीं ल्युटियन दिल्लीच्या मान्यतेसाठी धडपडताना कधी दिसले नाहीत. त्यांनी अभिजन म्हणवून घेणार्‍या या वर्गाच्या अन्यायकारन वर्तनाला काडीमात्र किंमत दिली नाही. परंतु अर्णब मात्र त्याच ल्युटीयन विरोधात संघर्ष करताना त्यांनीच आपल्याला मान्यता द्यावी म्हणून धडपडतो आहे काय अशी शंका येते. तसे नसेल तर स्टुडीओमधून ल्युटियन माध्यमांवर दुगाण्या झाडणार्‍या अर्णबने कॉग्रेस व शशी थरूर यांच्यापेक्षा ल्युटीयन माध्यमे व विचारवंतांना आंदोलनाचे लक्ष्य बनवायला हवे होते. इतर प्रसंगी निषेधाचे सूर आळवणार्‍यांच्या दारात जाऊन द्जरणे धरावे किंवा घोषणाबाजी करायला हवी होती. अशा लढाईत उतरणे सोपे असले तरी टिकून रहाणे खुप अवघड गोष्ट असते. पण त्यांना झुगारताना आपल्या पाठीशी सामान्य लोक जमा होत असतील तर फ़िकीर करण्याची गरज नसते. आसे अभिजन आपल्याशी अतिरेकी असभ्यपणे वागणार हे त्यातले गृहीत असते. तरीही त्यांच्यातला एक व्हायचा मोह टाळून आपला संघर्ष कायम ठेवावा लागतो.

ज्यांना इथे ल्युटीयन दिल्लीचे पिठाधीश संबोधलेले आहे, त्यांची पात्रता फ़क्त इतरांमध्ये न्युनगंड निर्माणा करण्याची असते. एकदा तो न्युनगंड तुम्ही स्विकारला व जोपासलात मग तुम्ही त्यांचे गुलाम होत असता. तुमची विवेकबुद्धी गहाण टाकून त्यांच्या भूमिकेची चाकोरी अपरिहार्य होऊन जात असते. ती चाकोरी झुगारली तरच स्वतंत्रपणे उभे रहाता येते. ही चाकोरी झुगारणारे संख्येने जितके अधिक होत जातात तितका अभिजन वर्गाचा धीर सुटत जातो आणि ते बंडखोरांना सामावून घेण्याची खेळी करून आपले वर्चस्व जुनेच डाव खेळू लागतात. असा कालबाह्य दुटप्पी अभिजन वर्ग निकालात निघण्याची गरज असून त्याची नक्कल करण्यातून ते उद्दीष्ट साध्य होऊ शकत नाही. त्यांच्या शैलीने राजकीय अजेंडा घेऊन चालण्याने त्यातून बाहेर पडता येणार नाही. तुम्ही बंडाखोरी करता करता त्यांचेच पुढले वारस होऊन जाण्याची शक्यता अधिक असते. कॉग्रेस वा शशी थरूर यांच्या विरोधात ससेमिरा लावण्यातून रिपब्लिक वा अर्णब गोस्वामी ल्युटीयन दिल्लीचा पीठाधीश व्हायला धडपडू लागला आहे काय अशी शंका येते. चुकीच्या प्रवृत्तीचे अनुकरण करून धुळीस मिळालेली पत्रकारितेची प्रतिष्ठा व पत पुन्हा प्रस्थापित होऊ शकणार नाही. भाजपा असो किंवा कॉग्रेस त्यांच्या चुका दाखवण्याचे स्वातंत्र्य पत्रकारांना आहे. पण त्यापैकी कुणाला संपवण्याचा वा नामोहरम करण्याचे काम राजकीय प्रतिस्पर्ध्यांचे आहे. ते आपल्या अंगावर घेऊन पत्रकारिता करणे ही सुपारीबाजी होते. कॉग्रेसच्या विरोधात भूमिका घेण्याचे व तिचा प्रसार करण्याची मुभा अर्णबला आहे. त्यसोबत ल्युटीयन माध्यमे व पत्रकारांचा मुखवटा फ़ाडण्य़ाचा अधिकारही त्याला आहे. पण कॉग्रेस वा अन्य कुणाच्या कामात वा कार्यक्रमात व्यत्यय आणण्याचा अधिकार राज्यघटना वा अन्य कुठल्याही कायद्याने पत्रकार वा अर्णबला दिलेला नाही.

 (मुकुल रणभोरच्या ‘अक्षर मैफ़ल’ या नव्या मासिकाच्या प्रारंभीच्या अंकातील माझा लेख. लेखन दिनांक १ ऑगस्ट २०१७)


http://aksharmaifal.com/arnab-goswami-republic-now-following-retrograde-style-of-journalism-1/

4 comments:

  1. भाऊ रिपब्लिक हे चॅनल भाजपा ह्या पक्षाने स्पॉन्सर केलेले आहे...
    भाजपा च्या एका खासदाराने ह्यात गुंतवणूक केली आहे.. म्हणून साहजिक आहे की हे चॅनल कधीही भाजपा विरोधात बोलणार नाही..आणि सतत बाकीच्या पक्षांच्या विरोधात कुरघोडी करत राहणार...
    त्यामुळे अर्णब गोस्वामी हा भाजपा च्या गोटामधील पत्रकार असेच म्हणायला हरकत नाही?

    ReplyDelete
    Replies
    1. हे चॅनेल bjp च नाही... माझ्यामते गोयंका ह्यांचे आहे.. ज्यांनी इंदिरा गांधी यांना आणीबाणीत पण विरोध केला होता.... त्यामुळे साहजिकच थोडं झुकत मापं देणारच... पण सर्वच चँनेल्स bjp विरोधी झाली तर ह्या देशाची वाट लागायला वेळ नाही लागणार.. त्यामुळे जेहोत आहे ते चांगलाच आहे

      Delete
  2. Republic TV can report on Tharoor, can't compel him to speak on Pushkar death: HC
    http://dhunt.in/3aLWa?s=a&ss=pd
    via Dailyhunt

    Download Now
    http://dhunt.in/DWND

    भाऊ तुमच्या पत्रकारितेला नमस्कार
    100% accurate

    ReplyDelete
  3. Arnab sadhya fakt BJP chi gulami kartoy...Maharashtrabddal batmya detana to ugach senela kamipana dakhvto...ugach soniasena mhnto....reporting kartana hya goshti kontach news channel bolu shakat nahi...pn hyncha he roj suruch asta.

    ReplyDelete