Wednesday, August 30, 2017

मोहेनजोदारो

mumbai metropolitan region के लिए चित्र परिणाम

मंगळवारी मुंबई अतिवृष्टीने बुडाली तेव्हा हजारो वर्षापुर्वीच्या एका मानवसंस्कृतीचे स्मरण झाले. आपणही प्रत्येकाने शालेय जीवनात कधीतरी त्याचा उल्लेख ऐकलेला आहे. सिंधू नदीच्या खोर्‍यात येऊन वसलेल्या टोळ्यांनी मस्त सुपिक जमिन व नदीचे भरपूर पाणी बघून, तिथेच वस्ती केली आणि त्यांची संस्कृती तिथे भरभराटली. मग काही काळानंतर सिंधू नदीला महापूर आला आणि त्या पुराच्या पाण्यात ती संस्कृती बुडाली. जी काही शहरे वसाहती होत्या, त्या महापुरासोबत आलेल्या गाळात बुडून गेल्या. त्यांचे नामोनिशाण शिल्लक राहिले नाही. त्यानंतर काही वर्षे व काळ उलटला आणि आणखी कुठल्या टोळ्यांनी येऊन तिथेच आपले बस्तान मांडले. सुपिक जमिन व नदीच्या पाण्याने संपन्न असलेला प्रदेश त्यांना आकर्षित करून गेला आणि त्यांच्याही काही पिढ्या तिथे सुखवस्तु होऊन पुढारल्या. त्यांचीही संस्कृती उभी राहिली आणि पुन्हा एका महापुराने त्यांनाही गाडून टाकले. असा सिलसिला चालूच राहिला आणि इसवीसनाच्या आरंभापुर्वी वा आरंभी सिंधू नदीच्या खोर्‍यातील त्या अत्यंत पुढारलेल्या संस्कृतीचे नामोनिशाण शिल्लक राहिले नाही. शंभर सव्वाशे वर्षापुर्वी कुणा संशोधकाला उत्खनन करताना या संस्कृतीचे अवशेष सापडले आणि जितका हा संशोधक ‘खोलात’ गेला, तितके त्याला अधिकच अवशेष मिळत गेले. एकाखाली एक अशी सात नगरे गाडली गेलेली सापडली. त्याला मोहेनजोदारो नावाने ओळखले जाते. हे कसे झाले व का होऊ शकले, त्याचाही शोध व अभ्यास अजून चालू आहे. इतकी पुढारलेली संस्कृती व त्यातली माणसे नष्ट होऊन गेली, त्यामागची कारणे शोधण्याचे काम चालू आहे. पण ते करताना आपणही त्यांच्याच पद्धतीने जगत आहोत, याचा विचार कोणाच्याही मनाला शिवत नाही, ही बाब धक्कादायक नाही काय? मोहेनजोदारोची संस्कृती का नष्ट झाली? एकाखाली एक सात नगरे गाडली का गेली?

पहिल्या टोळीचा विनाश कशामुळे झाला, त्याचा पुढल्या टोळीने विचार केला नाही, की शोध घेतला नाही. समोरच्या संपन्नतेला भुलून त्या टोळ्या वा त्यांच्या म्होरके नेत्यांनी तिथे वस्त्या केल्या. पण भविष्यात काय वाढून ठेवले आहे किंवा पायाखाली काय गाडलेले आहे, त्याची कुणालाही फ़िकीर करावी असे वाटले नाही. मोहेनजोदारोची ही समस्या होती. आज इतक्या हजारो वर्षानंतर आपणच त्या पुर्वजांपासून काही शिकलो आहोत काय? विभिन्न काळातील सात टोळ्यांनी आपापली नगरे नव्याने उभी करताना आधी काय झाले व त्यातले धोके टाळण्याचा विचार केला नाही. आज आपण तरी आधी आलेली संक्टे वा नैसर्गिक कोपाची मिमांसा करून, त्यावरचे उपाय वगैरे शोधण्याच्या फ़ंदात पडतो काय? २००५ सालात अतिवृष्टीने मुंबईच्या नाकातोंडात पाणी गेलेले होते. म्हणून आपण काही करू शकलो काय? तेव्हा मुंबईची एकमेव नदी मानल्या जाणार्‍या मिठी नदीचे पात्र रुंद करून, पाण्याच्या निचर्‍याचा विषय युद्धपातळीवर सोडवण्याचा निर्णय झालेला होता. त्याची आज बारा वर्षानंतर अवस्था काय आहे? तिथले अतिक्रमण निकालात निघाले आहे काय? मुंबईच्या समस्या थोड्याथोडक्या नाहीत. शेकडो समस्या अंगाखांद्यावर खेळवित मुंबईकर जगत असतो. त्याला सभोवताली वा पायाखाली काय जळते वा नासलेले आहे, त्याकडे बघायला वेळ नाही. सिंधू नदीच्या खोर्‍यात सुपिक जमिन होती आणि मुंबईत भरपूर पैसासंपत्ती आहे. तिच्या मोहात सापडलेल्या टोळ्या नित्यनेमाने मुंबईत येत असतात. कुठेही आडोसा शोधून आपला निवारा मिळवत असतात. पण मुंबईला भेडसावणार्‍या समस्या एक दिवस आपल्याला गिळंकृत करतील. किंवा आपले नामोनिशाण संपवून टाकतील, अशी कोणाच्या तरी मनात शंका आलेली आहे काय? दार ठोठावणार्‍या विनाशाची कोणी दखल तरी घ्यायला राजी आहे काय? बोट दुसर्‍याकडे दाखवून पळ काढणे, ही आपली जीवनशैली झालेली आहे.

 mumbai deluge के लिए चित्र परिणाम

मुंबईत गटारे तुंबली, नाल्यात कचरा साठून पाण्याचा निचरा थांबला, किंवा खाड्या वा दलदलीच्या भागात अतिक्रमण होऊन पर्यावरणाचा नाश झाला, याची कोणीतरी फ़िकीर करतो आहे काय? अतिवृष्टी म्हणजे चोविस तासात सोळा इंच पाऊस कोसळला. याचा अर्थ तरी गेल्या दोन दिवसात कोणी समजावण्याचे कष्ट घेतलेले आहेत काय? मुंबईत इतका पाऊस पडला, याचा अर्थ मुंबईचे जे क्षेत्रफ़ळ आहे, त्या प्रत्येक इंच क्षेत्रावर सोळा इंच उंचीचे पाणी पडलेले आहे. पडलेले पाणी उतार पकडून वहात असते. पुढे ते समुद्रात जमा व्हायला हवे असेल, तर वस्ती व शहराची जमिन समुद्र सपाटीपेक्षा अधिक उंचीवर असायला हवी. अन्यथा आभाळातून पडणारे जादा पाणी समुद्रात जाऊ शकत नाही. ते पडेल तिथेच ठाण मांडून रहाते. त्यातल्या त्यात जिथे म्हणून सखल भाग मिळेल तिथे सरकू लागते. परिणामी सखल भागात पाण्याचा तलाव तयार होतो. मागल्या चारसहा दशकात मुंबईच्या परिसरातील कुलाबा ते डहाणू व ठाणे ते अलिबाग अशा परिसरातल्या बहुतांश खाड्या व दलदलीचे भाग भराव घालून बुजवण्यात आलेले आहेत. त्यातून नवनव्या आधुनिक आलिशान वसाहती उभ्या राहिल्या आहेत. ज्यांना त्या वस्त्यांमध्ये घर घेणे परवडत नाही, त्यांनी आपल्या कुवतीवर किंवा कुणा गुंड वा भ्रष्ट अधिकार्‍यांच्या मदतीने, अशा प्रदेशात झोपड्या उभारून आपला निवारा शोधलेला आहे. सरकारने चटईक्षेत्र वाढवून देतानाही अशा निर्णयाच्या दुष्परिणामांचा विचार केलेला नाही. त्यातून मुळ मुंबईचे बेट सखोल प्रदेश व नवी भर घातलेला भाग तीनचार फ़ुट उंच झालेला आहे. सागरी पाण्याची पातळी त्यामुळे जमिनीपेक्षाही उंच वा बरोबरीची होत गेली आहे. त्यात भरतीची वेळ आली, म्हणजे तिथलेही पाणी खाडी नसल्याने मुंबईच्या जमिनीकडे धावू लागलेले आहे. दोनतीन इंच पावसाचे पाणी सामावून घेण्याची सागराची क्षमता संपली, मग उरलेले पाणी मुंबईलाच बुडवू लागते आहे.

इतकी साधीसरळ गोष्ट आहे. मागली पन्नास वर्षे अतिवृष्टी मुंबईच्या नाकातोंडात पाणी घुसवत असते. चारपाच इंच पाऊस झाला, की सागरी मार्गाने जाणारे पावसाचे पाणी ‘नो एन्ट्री’चा फ़लक बघून मागे फ़िरते. तिथून मुंबई बुडायला सुरूवात होत असते. त्यामुळेच मुंबईतली बांधकामे रोखणे व नव्याने दलदलीचा प्रदेश वा मीठागरे व खाड्या बुजवण्याला प्रतिबंध घातला पाहिजे. हे काम चार दशकापुर्वीच व्हायला हवे होते. ते दुर राहिले आणि मुंबईपलिकडे डहाणू व पनवेलपर्यंतच्या खाड्या दलदल बुजवून नवी जमिन निर्माण करण्यात आली. मग पावसाच्या पाण्याने जायचे कुठे आणि कसे? हजारो वर्षापुर्वी मोहेनजोदारोच्या टोळ्या वा त्यांच्या म्होरक्यांपाशी आज उपलब्ध असलेले तंत्रज्ञान वा साधने नव्हती. अन्यथा त्यांनी काळजी घेतली असती. पण आजच्या युगात सर्व साधने व धोक्याचे इशारे देणार्‍या यंत्रणा असूनही, आपण मोहेनजोदारो काळापेक्षाही मागास मनोवृत्तीने जगत असतो. कुठल्याही समस्या प्रश्नातील आपली जबाबदारी ओळखणे दुर राहिले. अन्य कुणावर खापर फ़ोडण्यात आपण धन्यता मानत असतो. त्या संस्कृतीमध्ये एकाखाली एक नगरे गाडली गेलेली होती आणि आधीच्या टोळ्यांचे अनुभव पुढल्या पिढी वा टोळ्यांना मिळू शकलेले नव्हेत. आपल्यापाशी सर्व अनुभव व त्यांच्या नोंदी आहेत. पण त्यातून धडा घेण्यापेक्षा आपण समस्या व प्रश्नांचीच मोहेनजोदारो संस्कृती बनवून टाकलेली आहे. कुठला प्रश्न वा समस्या सोडवण्यापेक्षा त्यांना नव्या समस्या प्रश्नांखाली गाडून, नवी भूमी निर्माण करण्यात आपण गर्क आहोत. लोकसंख्या व वाहन संख्या आवरती घेतली, तरीही मुंबईचे रस्ते पुरेसे ठरू शकतात. आपण नवे पुल व उभारलेले रस्ते अशी नवी समस्या निर्माण करत असतो. मुंबईचा विस्तार अशक्य असल्याने भोवताली नवी शहरे वसवण्यापेक्षा मुंबई केंद्रीत विकासाचे भुलभुलैया निर्माण केले जातात. विज्ञान साधने देते मनोवृत्ती देत नाही ना? आपण आधुनिक मोहेनजोदारोचे प्रणेते आहोत ना?


7 comments:

  1. मोहेन्जोदारोच्या ह्रासामागाची एक शक्यता वर्तविली जाते.
    मोहेंजोदारो हे जगातील अत्यंत संपन्न शहर होते. देश-विदेशातील व्यापाऱ्यांनी तेथे हवेल्या बांधल्या होत्या. या दुमजली मोठ्या हवेल्या विटांनी बांधलेल्या आहेत. तेथील रस्ते प्रशस्त असून ते ही विटांनी बांधलेले आहेत. या विटा भाजलेल्या आहेत (त्या काळी युरोपमध्ये भाजलेल्या विटा माहित नव्हत्या). भाजलेल्या विटा भक्कम असतात. त्यामुळेच दुमजली घरे बांधणे शक्य झाले.
    या विटा भाजण्यासाठी आसपासची जंगले तोडली गेली. तसेच विटांसाठी नदीकाठची सुपीक जमीन खणली गेली. जंगले तोडल्याने हिमालयातील पाणी वाहून आणणाऱ्या नद्यांनी भरपूर माती आपल्याबरोबर वाहून खाली आणली आणि नदीने मार्ग बदलला. त्यामुळे हे संपन्न शहर गाळाखाली गाडले गेले आणि नष्ट झाले.
    आताची उंच इमारती उभी रहात असलेली मुंबई पाहून मोहेन्जोदारोची आठवण येते.

    ReplyDelete
  2. मुंबईची पावसातली परिस्थिती आणि नाश पावलेली मोहेंजोदरो संस्कृती यांतील साम्य छान दाखवलेत. कृपया
    http://lekhanachaudyog.blogspot.in/2017/08/spirit-of-mumbai.html?m=1
    या माझ्या ब्लॉगवर प्रतिक्रिया द्यावी.

    ReplyDelete
  3. सर, जयंत नारऴीकरांच्या 'एका महानगराचा अंत' ह्या कथेची आठवण झाली....

    ReplyDelete
  4. teevra rajkiya iccha shaktee ani kathor prashashan, nagrikancha support shivay he hone nahi, fadnavis saheba kadun kahi apeksha balgayvya ka ? bhau

    ReplyDelete
  5. Mumbai budun jaavi, hech kadachit vidhi-likhit aahe...

    ReplyDelete
  6. अतिशय मर्मभेदी विचार करणारा लेख. आजच्या समाजाचे चंगळवादामुळे कसलाच विधिनिषेध नसलेले रूप पाहता हा लेख अजून ५० वर्षानंतर कुणाला सापडला तर भाऊ हे किती द्रष्टे लेखक होते हे पुन्हा एकदा सिद्ध होईल कारण तोपर्यंत भाऊनी मांडलेला धोका खरा होऊन मुंबईवर समुद्री वाळूचे अनेक थर जमलेलेच असतील. इलाज नाही. अहंकार ही अधोगती आणि विनाशकाले विपरीतबुद्धी या दोन्ही म्हणी आपल्या काळाला १००% नाही १००० % लागू पडतात त्याला काय इलाज !

    ReplyDelete
  7. मुंबईच्या पाऊस संबंधीचे आपलेच बरेच लेख इथेच वाचलेले आहेत व त्यातील महत्वाचा मुद्दा दरवेळी अधोरेखीत केला गेले ला आहे. त्यावर आता उपाय आता निसर्गच शोधून काढणार आहे !

    ReplyDelete