Showing posts with label आव्हाड. Show all posts
Showing posts with label आव्हाड. Show all posts

Thursday, August 20, 2015

आव्हाड, त्या गजानन घोटेकरला ओळखता काय?



मागल्या दोन दिवसात आम्ही सातत्याने नवे पुरोगामी विचारवंत जितेंद्र आव्हाड यांचे आख्यान लावलेले आहे आणि त्यात किती तथ्य होते, त्याची तात्काळ प्रचिती आलेली आहे. कालच्याच लेखात आम्ही आव्हाडांचे उंच उंच दहिहंड्या बांधण्याचे प्रबोधनपर प्राथमिक धडे घेण्य़ाचे काम जुन्यापान्या पुरोगामी विचारवंतांवर पवारांनी सोपवावे आणि आव्हाडांना भाषणे प्रवचने देण्य़ासाठी मोकळे करून घ्यावे; असे आवाहन केले होते. पण आमची ‘मन की बात’ परस्पर ओळखून की काय, आव्हाडांनीच स्वत:च तशी घोषणा करून टाकली आहे. यावर्षी त्यांनी आपला नेहमीचा प्रघात मोडून दहिहंडी उभारणार नसल्याची आधीच घोषणा करून टाकली आहे. महाराष्ट्रात दुष्काळ आहे आणि शेतकर्‍यांच्या आत्महत्या चालू आहेत, म्हणून यावर्षी दहिहंडीचे आयोजन रद्दबातल करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. कोणीही संवेदनशील व्यक्ती त्यासाठी आव्हाडांचे स्वागतच करील. पण आमच्यासारख्या काही विघ्नसंतोषी लोकांना मात्र त्यातही गफ़लत दिसली तर नवल नाही. तसे बघायला गेल्यास मागल्या दहा वर्षापासून महाराष्ट्राच्या विविध भागातले शेतकरी दुष्काळ व कर्जबाजारी स्थितीने पुरते बेजार झालेले आहेत. त्यामुळे सातत्याने आत्महत्येची प्रकरणे वाढलेली आहेत. पण त्याचा आव्हाडांना थांगपत्ता नसावा. अन्यथा त्याच कालखंडात त्यांनी ठाण्यात आपल्या विश्वविख्यात दहिहंडीचे आयोजन अगत्याने कशाला केले असते? त्याचेही वाहिन्यांवरून थेट प्रक्षेपण होईल याची काळजी कशाला घेतली असती? त्याचे दोन अर्थ असू शकतात. एक म्हणजे मागल्या दहा वर्षात राज्यात अशा आत्महत्या होत आहेत ही माहिती शंभर टक्के अफ़वा असावी. किंवा त्याचा कुठलाही तपशील आव्हाडांच्या कानी जाऊ नये, याची सरकारने काळजी घेतलेली असावी. अन्यथा आव्हाड इतका गाजावाजा करून ह दहिहंडीचा सोहळा कशाला साजरा करीत बसले असते?

इतर कोणी नाही तर त्यांचाच राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष ज्यात सहभागी होता, अशा आघाडी सरकारने आत्महत्येचा तपशील आव्हाडांपासून लपवलेला असावा. अन्यथा आव्हाडांसारखा संवेदनशील माणूस शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळत कोट्यवधी रुपयांचा चुराडा दहिहंडीवर कशाला करत राहिला असता? त्यापेक्षा त्यांनी गावोगावी फ़िरून गरीब शेतकर्‍याच्या घरी राहुलप्रमाणे मुक्काम केला असता आणि इशरत जहानप्रमाणे मृतांना आपल्या नातेसंबंधात जोडून घेतले असते. त्यांच्या नावाने गावात रुग्णवाहिका सेवा सुरू केल्या असत्या. मृतांच्या नातेवाईकांना घेऊन भव्यदिव्य पत्रकार परिषदा भरवल्या असत्या. पण त्यांच्याच पक्षाचे आघाडी सरकार आडवे आले आणि आत्महत्यांचा तपशील आव्हाडापासून जाणिवपुर्वक लपवून ठेवण्यात आला. बिचार्‍या आव्हाडांना पवारप्रणित शाहू फ़ुले आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी उंच उंच दहिहंड्या बांधत बसावे लागले. कर्जबाजारी होऊन आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांचे अश्रू पुसण्याची अनमोल संधी आव्हाडांना नाकारली गेली. खरे तर त्याचाही सीबीआय तपास करण्यासाठी साहेबांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आव्हाडांना न्याय दिला पाहिजे. कारण आव्हाडांच्याच प्रबोधनामुळे अनेक जिल्ह्यात व तालुक्यात एस्टी बसेस जाळण्यात आल्या, मोडतोड झाली. ते प्रबोधन कार्य खुप आधी सुरू झाले असते, तर अनेक शेतकर्‍यांना आत्महत्येची वेळ आली नसती ना? त्यांनीही आत्महत्या करण्यापेक्षा बसेस गाड्या वहाने पेटवून दुष्काळावर मात करून दाखवली असती. पण आघाडी सरकारने महत्वाचा तपशील आव्हाडांपासून लपवून ठेवला आणि बिचार्‍या आव्हाडांना फ़क्त दहिहंड्या बांधण्यात गर्क रहावे लागले. त्यात हायकोर्टाने बाधा आणल्यावर आव्हाडांना थेट सुप्रिम कोर्टाचे दार ठोठावून उंच हंड्या बांधण्याचा शेतकरी अधिकार अबाधित ठेवण्यासाठी झुंज द्यावी लागली.

म्हणजे असे की महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करतोय हे मागल्या वर्षीच आव्हाडांना उमगले असते, तर त्यांनी सुप्रिम कोर्टाचे दार ठोठावून दहिहंडीचा अट्टाहास कशाला केला असता? शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्याप्रमाणेच उंच हंडी बांधण्यापेक्षा त्यासाठी जमवलेल्या पैशाचा खर्च इमारत कोसळून ठार झालेल्या वा कुणा रिक्षात जखमी झालेल्या तरूणीच्या पुनर्वसनासाठी केला असता. पण तसे होऊ शकले नाही. मागल्याही वर्षी इतरांनी हंड्यांची उंची कमी केली असताना, आव्हाड मात्र गगनचुंबी हंड्या बांधण्याचे पुरोगामी काम जोमाने करत राहिले. त्यातून मोकळे झाल्यावर सवड मिळाली तेव्हा त्यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहीलेले शिवचरित्र वाचायला घेतले. शेतकरी आत्महत्येकडे बघणेच त्यांना शक्य झाले नाही. इतिहासात घुसले मग वर्तमानकाळाचे भान रहात नाही. आव्हाडांचे तसेच झाले. ते इतक्या वेगाने इतिहासात घुसत गेले, की मागल्या दहा वर्षाच्या भूतकाळात महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्याचे त्यांच्या गावीही नव्हते. अन्यथा त्यांनी बाबासाहेब पुरंदरेंचा पुरस्कार वा त्याच्या विरोधापेक्षा शेतकर्‍यांचे पुनर्वसन करायचे काम हाती घेतले नसते का? नक्कीच घेतले असते. पण शेतकरी आत्महत्या करतीलच कशाला? जाणता राजा देशाचा कृषिमंत्री असताना कोण कशाला आत्महत्या करील? आणि करीत असेल तर त्यावर आव्हाडांनी विश्वास तरी कसा ठेवावा? पवारनिष्ठा इतकी पक्की आहे, की आव्हाडांना आपल्या डोळ्यावर विश्वास नसेल इतका साहेबांच्या धोरण व कामावर विश्वास आहे. म्हणूनच दहा वर्षे साहेब कृषिमंत्री असतानाच महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येचे पेव फ़ुटले, तरी आव्हाडांनी त्याविषयीच्या बातम्यांवर विश्वास ठेवलेला नसेल. आता साहेब त्या पदावर नाहीत. म्हणूनच तशा बातम्या आल्यावर आव्हाडांना आत्महत्या खर्‍या वाटलेल्या असू शकतील.

पण चिंता करू नका. आव्हाडांनी त्या विषयात लक्ष घातले आहे आणि त्यांना साहेबांचा आशीर्वाद आहे, म्हटल्यावर शेतकर्‍यांच्या आत्महत्या लौकरच थांबल्याशिवाय रहाणार नाहीत. इशरतसाठी पत्रकार परिषद घेणारे आणि दहिहंडीच्या उंचीसाठी कोर्टात धाव घेणारे आव्हाड शांत बसणार नाहीत. लौकरच आव्हाड सुप्रिम कोर्टात जातील आणि शेतकर्‍यांच्या आत्महत्येवर प्रतिबंध लागू करून घेतील, याविषयी आपण खात्री बाळगली पाहिजे. एकदा कोर्टानेच बंदी घातली, मग आत्महत्या करायची कुठल्या शेतकर्‍याला हिंमत होईल? एका बाजूला सुप्रिम कोर्टाचे आदेश आणि दुसर्‍या बाजूला आव्हाडांनी खेडोपाडी जाऊन केलेले पुरोगामी प्रबोधनाचे कार्य, यांनी वेग घेतला की शेतकरी आत्महत्येपासून परावृत्त झालाच म्हणून समजा. मग पाऊस पडला नाही तरी बेहत्तर आणि कर्जात शेतकरी बुडाला तरी चिंता करण्याचे कारण नाही. आव्हाडच हे काम करू शकतील. फ़डणवीस वा मोदी सरकारच्या आवाक्यातले ते काम नाही. त्यांनी महाराष्ट्रभूषण पुरस्कार द्यावेत किंवा गोमांसबंदी असल्या फ़डतुस गोष्टी कराव्यात. चिक्क्या खरेदी कराव्यात. चिक्की विकण्याचे काम त्यांना जमणारे थोडेच आहे? तेलगी प्रकरण उकरून काढण्याची फ़डणवीस सरकारची हिंमत झाली होती काय? आव्हाडांनीच ते शिवधनुष्य पेलून दाखवले ना? आता छगन भुजबळांची जागा घ्यायची असेल तर थोडीफ़ार नाटके ही करावी लागणारच ना? त्यासाठीच तर साहेबांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आव्हाड हे ओबीसी समाजाचे धडाडीचे कार्यकर्ते असल्याचे शिफ़ारसपत्र दिलेले होते. त्यात साहेबांनी ओबीसी म्हटले होते. पण आव्हाड यांनी बहुधा ‘ओवायसी समाजाचे’ असे वाचलेले असावे. अन्यथा त्यांनी शिवशाहिराच्या विरोधात इतकी मोठी आघाडी कशाला उघडली असती? ओवायसीप्रमाणे तिरस्कार प्रमाण मानून कशाला रान उठवले असते? काहीही असो, आव्हाडांमुळे राज्यातील जनतेला व ठाणेकरांना राज्यात शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे प्रथमच कळले. शक्य झाल्यास त्यांनी गजानन घोटेकरलाही जाऊन ती बातमी सांगितली तर बरे होईल.

Friday, July 24, 2015

पहिले इस्तेमाल करे फ़िर विश्वास करे: घडी



दोन दिवसांपुर्वी राज्याचे ज्येष्ठ नेते शरदराव पवार यांना आम्ही अनावृत्त पत्र लिहीले. त्यावरून बर्‍याच उलटसुलट प्रतिक्रीया आल्या. अनेकांना ते पत्र आवडले तर अनेकजण त्यामुळे विचलीत झाले. मात्र साहेबांच्या अशा पत्राने पुत्रवत जितेंद्र आव्हाड इतके फ़ुशारून जातील अशी कोणाचीच अपेक्षा नसावी. पण फ़ुशारलेल्याला हुशार म्हटले, की तो अधिकच फ़ुशारतो व शेफ़ारतो. झालेही तसेच. जितेंद्र भय्या इतके फ़ुशारले, की दुसर्‍या दिवशी थेट विधीमंडळात पहिल्या रांगेत येऊन बसले. वर्गातला वात्रट मुलगा पहिल्या रांगेत बसला, म्हणून मस्ती करायचा थांबत नाही. किंबहूना तो वर्गात अधिकच बेशिस्त निर्माण करतो. आव्हाडांनी फ़ुशारल्या अवस्थेत नको त्या वारूळात हात घातला आणि जे काही मुंग्यांचे वारूळ उठले; त्याने त्यांच्याच पक्षाची तारांबळ उडाली. पक्षाचे विधानसभेतील नेते अजितदादांवर आव्हाडांना कानपिचक्या देण्याची वेळ आली. कुरापत काढून वात्रट मुले निदान फ़रारी होतात. इथे अनिल गोटे नावाचे भाजपाचे आमदार काही बोलले, तर आव्हाडांनी थेट तेलगीला हात घातला. नेहमीच्या उपरोधिक खोचक भाषेत त्यांनी गोटे यांना इतिहास शिकवायला सुरूवात केली. सांगलीचे सभागृह आणि विधानसभा यातला फ़रक आव्हाडांच्या लक्षात आलेला नसावा. किंवा थोरले साहेब म्हणतात, तशा ‘पुरोगामी’ पोरखेळाचा आखाडा विधानसभेत नसतो, याचे आव्हाडांना भान राहिलेले नसावे. बाकी काही नाही तरी ज्या भाजपा आमदाराची कुरापत काढायचा प्रयत्न केला, त्याचे नाव तरी समजून घ्यायचे होते ना? गोटे अण्णांची कळ काढल्यावर आपल्याच कपाळी गोटा हाणला जाण्याची शक्यता लक्षात आली असती ना? पण ‘साहेबांचे धोरण’च असे की आपणच हाणलेला गोटा आपल्याच टाळक्यात येऊन बसला पाहिजे. झालेही तसेच आव्हाडांनी भाजपाला हाणला तो गोटा उलटा फ़िरून छगन भुजवळांवर येऊन आदळला.

आधीच भुजबळ विविध घोटाळ्यांच्या जंजाळात फ़सलेले आहेत. काहीशी अशीच स्थिती दहा वर्षापुर्वी त्यांच्या बाबतीत उदभवली होती आणि त्यांना मंत्रीपद सोडायची वेळ आलेली होती. त्या घोटाळ्याचे नाव होते तेलगी प्रकरण. सहाजिकच पुढल्या अनेक वर्षात भुजबळांसह कोणी राष्ट्रवादीचा नेता चुकून तेलगी हा शब्द तोंडी येऊ देत नव्हता. तेलगी सोडाच, हलगी, सलगी असेही शब्द पवारांच्या पक्षात वर्ज्य होते. कारण उच्चारात गफ़लत होऊन तेलगी म्हटले गेले तर? पण आव्हाड तितके शुद्धीत कुठे होते? आपल्या पोरकटपणाला खुद्द साहेबांनी दाद देत मुख्यमंत्र्याला पत्र लिहील्यावर त्यांनी चेकाळल्यासारखा विधानसभेतही उंच दहीहंडी वांधण्याचा जणू निर्धार केला आणि त्यातून तेलगी शब्द त्यांच्या तोंडी आला असावा. सहाजिकच अनिल अण्णा गोटे संधी सापडल्यासारखे उठून उभे राहिले आणि तात्काळ तेलगीच्या प्रकरणाचा तपशील धडाधडा वाचून दाखवू लागले. त्यासाठी त्यांनी हाताशी कागदपत्रेही सज्ज ठेवली होती. इथे मग शंकेला जागा निर्माण होते. आव्हाड तेलगी प्रकरणाचा उल्लेख आकस्मिक केला असेल, तर गोटेंकडे ती़च कागदपत्रे इतकी सज्ज कशी होती? की तसे प्रकरण उदभवणार याची गोटे यांना पुर्वकल्पना होती वा देण्यात आली होती? म्हणून ते अगदी सज्ज होऊन भुजबळांना तोंडघशी पाडायला दस्तावेज घेऊन सभागृहात आलेले होते? तसा कुठला विषय विधानसभेत नव्हता. म्हणजेच आव्हाड यांनी तेलगीचे नाव घेऊन गोटेंना चिथावले नसते, तर पुढला विषय आला नसता. याचा एकच अर्थ निघतो, की हा उल्लेख ठरवून करण्यात आला आणि त्यासाठी गोटे अण्णांना आधीपासून सज्ज असण्याच्या पुर्वसुचना मिळालेल्या होत्या. मग जाणिवपुर्वक भुजबळांना विधानसभेत तोंडघशी पाडण्याचे संगनमत झालेले होते काय? झाला तो आव्हाडांचा उतावळेपणा होता, की गोटे आव्हाडांची मिलीभगत होती?

वरवर बघता सर्वकाही आकस्मिक असल्याचे दिसते व भासवले जाते आहे. पण घटनाक्रमाचा तपशील बारकाईने तपासला तर त्यातली पुर्वयोजना लपून रहात नाही. थोरल्या साहेबांनी आव्हाड यांचा उल्लेख ओबीसी नेता म्हणून करायचा आणि त्यानेच आजवर पक्षाचा ओबीसी चेहरा असलेल्या ज्येष्ठ नेत्याला तोंडघशी पाडायचे खेळ करायचे, यात काहीतरी शंकास्पद नक्की असावे. अन्यथा आव्हाडांनी तेलगीचे नाव घेत गोटेंना चिथावणे व त्यांनी कागदपत्रांसह भुजबळांची नचक्की करणे तर्कसंगत नाही. यात पुरोगामी राजकारणापेक्षा ‘उरोगामी’ राजकारण अधिक दिसते. म्हणजे उरात शिरून, पोटात जाऊन पोट फ़ाडून बाहेर येत बळी घेणे. अकस्मात आव्हाडांचे पहिल्या रांगेत येऊन बसणे, तेलगीचा उल्लेख करणे व त्यातून भुजबळांना खच्ची करण्याचा डाव खेळणे, याला थोरल्या साहेबांचा आशीर्वाद नक्कीच असला पाहिजे. अन्यथा हा बनाव इतका बेमालूम सादर झाला नसता. अर्थात झाल्या प्रकाराने भुजबळ व्यथीत झाले आणि त्याबद्दल गटनेते अजितदादांनी आव्हाडांना कानपिचक्या दिल्या, असेही वृत्त आहे. तेही नाट्य आहे की खरे आहे याची शंका येते. पुतण्याने मारल्यासारखे करायचे आणि काकांनी चुचाकारल्यासारखे करायचे, असा एकूण बनाव आहे काय? अन्यथा आदल्या दिवशी थोर पुरोगामी कार्य आव्हाड करीत असल्याचे प्रशस्तिपत्र साहेब मुख्यंमंत्र्यांच्या हस्ते आव्हाडांना देतात आणि दुसर्‍याच दिवशी पुतण्या अजितदादा आव्हाडांना समज देतात, यातली सुसंगती कशी लावायची? की आता भुजबळ थोरल्या साहेबांना नकोसे झालेले आहेत? त्यांच्याजागी नवा ओबीसी चेहरा म्हणून अन्य कुणाला पुढे आणायचे आहे? आव्हाड तितके समर्थ नसल्याने भुजबळ यांच्या प्रतिष्ठेला सुरूंग लावण्याचा हेतू आहे काय? अनेक प्रश्न साहेब व आव्हाड यांनी एक (जमाल)गोटा फ़ेकून उपस्थित केले आहेत.

शरद पवार यांचे आजवरचे राजकारण पाहिले, तर ते कायम अस्थीर राहिले आहेत आणि त्यांच्यावर विसंबून असलेल्यांना त्यांनी कायम अस्थीर ठेवले आहे. आव्हाडांना आज मोठी मौज वाटेल. साहेब आपल्या पाठीशी असल्याने भुजबळांना गोत्यात घालताना आव्हाड शेफ़ारलेले असावेत. पण असेच पंधरा वर्षापुर्वी भुजबळही मोकाट झाले होते आणि एका भल्या संध्याकाळी त्यांनी गृहमंत्री म्हणून शिवसेनाप्रमुखांच्या अटकेचा फ़तवा काढला होता. ती अटक कोर्टात टिकली नाही आणि फ़ुशारलेल्या त्याच भुजबळांना तीन वर्षांनी तेलगी प्रकरणात मंत्रीपद सोडावे लागले होते. अगदी सीआयडी समोर हजर होण्याची लांच्छनास्पद स्थिती आलेली होती. ज्या जखमेवर आव्हाड आज मीठ चोळत आहेत, ती तेव्हाची जखम आहे. त्यानंतर भुजबळांना संयम शब्दाचा अर्थ कळला होता, काही काळाने आव्हाडांनाही त्याचे भान येईल. हिमालयावर चढवणारे साहेब कधी गर्तेत नेवून टाकतात, त्याचा आकंठ बुडालेल्यांनाही पत्ता लागत नाही, असा इतिहास आहे. तेव्हा राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ हाती बांधून उंडारलेल्या आव्हाड यांनी संभाळून असावे. ती जहिरात आहे ना, तीच साहेबांची कार्यसुत्री आहे. ‘घडीऽऽऽऽऽऽऽऽऽ! पहले इस्तेमाल करे, फ़िर विश्वास करे’. अजून आव्हाडांना राजकारण शिकायचे आहे. त्यांच्यासारखे कितीजण वजीर व्हायला निघाले आणि प्यादे मोहरे होऊन पटावरून दूर फ़ेकले गेलेत, त्याचा अभ्यास करावा. आदर्श घोटाळा अशोक चव्हाणांना बळी घेऊन गेल्यावर कारण नसताना भुजबळांचे उपमुख्यमंत्रीपद कसे अलगद काढून घेतले गेले? ते त्यांच्याही लक्षात आले नाही आणि अजितदादांना राजिनामा देवून काही महिने बाहेर कशाला बसावे लागले, त्याचेही आव्हाडांनी परिशीलन करावे. साहेब ‘पाठ थोपटतात’, तेव्हा धोका समोरून नसतो तर पाठीमागच्या धोक्याची चिंता करायची असते. नाहीतर खोट्याच्या कपाळी गोटा असा अकस्मात येऊन बसतो.

Tuesday, July 21, 2015

माननिय शरद पवार यांना अनावृत्त पत्र



माननिय शरदरावजी पवार यांच्या सेवेशी,

बुधवारच्या वर्तमानपत्रात आपण मुख्यमंत्र्यांना लिहीलेले पत्र वाचले आणि वात्रटिकाकार रामदास फ़ुटाणे यांचे स्मरण झाले. श्रीयुत फ़ुटाणे आपले चहाते म्हणून ओळखले जातात. पण आम्ही त्यांना वात्रट समजण्याची घोडचुक केली होती. अर्थात त्याला खुद्द फ़ुटाणेच जबाबदार आहेत. कारण त्यांनीच कायम आपल्या नावामागे वात्रटिकाकार अशी बिरूदावली मिरवलेली आहे. त्यामुळे आमच्यासारखे बहुतांश लोक त्यांना वात्रट समजून कधी गंभीरपणे त्यांच्याकडे पाहू शकले नाहीत. पण वास्तवात त्यांच्या तथाकथित वात्रटिका म्हणजेच पुरोगामी वेदमंत्र असल्याचे आपल्या पत्रामुळे लक्षात येऊ शकले. आपण देवेंद्र या तरूण मुख्यमंत्र्याला तसा दृष्टांत दिल्याबद्दल तुमचे खरे तर त्यांनी आभारच मानायला हवेत. आगामी राज्यकारभार चालवताना फ़डणवीस सरकार कुठल्याही घटनात्मक व कायदेशीर तरतुदींचा अभ्यास करण्यापेक्षा आधी फ़ुटाण्य़ांच्या वात्रटिकांचा सखोल अभ्यास करतील अशी खात्री वाटते. हा फ़ुटाणे मध्येच कुठून आणला, अशी आपल्या मनात शंका येऊ नये म्हणून थोडे विस्ताराने सांगणे भाग आहे. फ़ुटाणे त्यांच्या एका वात्रटिकेने लोकाच्या अधिक लक्षात राहिले, ती म्हणजे पाठ्यपुस्तकातील शपथेवर केलेल्या भाष्यामुळे. ‘भारत हा माझा देश आहे आणि सर्व भारतीय माझे बांधव आहेत’, अशी ती शपथ आहे. त्यावर भाष्य करताना फ़ुटाणे म्हणतात, ‘भारत हा कधीकधी माझा देश आहे’. देशाचा वा महाराष्ट्राचा कारभार करताना तोच निकष असल्याचे आपण देवेंद्रना पत्र पाठवून कळवले नाहीत का? महाराष्ट्र हा कधीमधी शाहु, फ़ुले, आंबेडकरांचा असतो आणि अन्य प्रसंगी तो भलत्याच कुणाचा तरी महाराष्ट्र असतो, असाच आपल्या पत्राचा गोषवारा नाही का?

आपल्याला दंडवत घालणे प्रशस्त वाटत नाही. उभ्या महाराष्ट्रात कोण आपल्यापुढे नतमस्तक होत नाही? मागल्या चार दशकातले राज्यातील ज्येष्ठ नेते म्हणून आपल्याला मान्यता असल्याने आपले शब्द व मार्गदर्शन खुद्द देशाचे नवे पंतप्रधानच घेत असतात. म्हणूनच आपण जे काही बोलता वा सांगता, त्याकडे गंभीरपणे बघणे भाग आहे. किंबहूना आपण मार्गदर्शन केले नाही तर राज्याचे व देशाचे फ़ार मोठे नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेऊनच, आपण वेळोवेळी संबंधितांना त्यांच्या कर्तव्याची जाणिव करून देत असता, याची पुर्ण कल्पना आहे. अन्यथा आपण नवखे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांना पत्र कशाला लिहीले असते? कदाचित महाराष्ट्र हा शाहू फ़ुले आंबेडकरांचा असल्याचे फ़डणवीसांना ठाऊक नसल्याने आपण त्यांना समजावण्याचे काम केलेले असावे. तेही योग्यच आहे. कारण महाराष्ट्र कधी शाहू फ़ुले आंबेडकरांचा असतो आणि कधी तो अशा विभूतींचा नसतो, याबद्दल आपल्या इतकी जाण कदाचित अन्य कोणालाच नसावी. अन्यथा आपण आजच असे पत्र कशाला लिहीले असते? सध्या महाराष्ट्र फ़ुले आंबेडकरांचा आहे किंवा नाही, यानुसारच सरकारचा कारभार चालायला हवा असेल, तर वेळोवेळी ते सांगणारा कोणीतरी हवाच ना? तसे नसते तर असेच पत्र आपण डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची हत्या झाल्यावर तात्काळ तेव्हाचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना लिहीलेच असते. पण बहुधा तेव्हा दोन वर्षापुर्वी ऑगस्ट २०१३ मध्ये महाराष्ट्र शाहू फ़ुले आंबेडकरांचा नसावा. असताच तर असेच पत्र चव्हाण यांना पाठवण्यात आपण कशाला हलगर्जीपणा केला असता? तेच कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्याही बाबतीत म्हणता येईल. त्याही वेळेस आजचेच मुख्यमंत्री सत्तेत होते. पण महाराष्ट्र तेव्हाही बहुधा शाहू फ़ुले आंबेडकरांचा नव्हता. म्हणून आपण पत्र लिहीण्याचा उतावळेपणा केलेला नसावा. त्यासाठी आपण दाखवलेला संयम वाखाणण्याजोगा आहे.

कदाचित आमच्या अल्पमतीला यातला फ़रक समजत नसावा. पानसरे किंवा दाभोळकर भले पुरोगामी विचाराचे असतील आणि अत्यंत संयमी पद्धतीने आपले विचार मांडत असतील. पण त्यांची हत्या होऊनही आपल्याला पत्र लिहीण्याइतकी परिस्थिती गंभीर वाटली नव्हती. तितकी आज आपले पुत्रतुल्य जितेंद्र आव्हाड यांना नुसत्या धमक्या आल्यावर परिस्थिती चिंताजनक झालेली आहे. म्हणून आपण तातडी दाखवून देवेंद्रना पत्र लिहीले असणार. त्याचेही कारण समजून घ्यायचा आम्ही प्रयास करीत आहोत. आव्हाड त्यासाठी उंच उंच हंड्या उभारतात आणि त्यातून पुरोगामी विचार मांडण्याचे कष्ट घेतात, हे उमजण्यासाठी आवश्यक असलेली बारा-मती आमच्यापाशी नाही, त्याचा हा परिणाम. दाभोळकर वा पानसरे यांनी कधी अशा उंच हंड्या बांधल्या नाहीत किंवा त्याचे समारंभ थाटामाटात पार पाडण्यासाठी अभिनेते व कलावंताचा मेळा भरवला नाही. त्यांना पुरोगामी विचार मांडण्याची कला आत्मसात करता आलेली नसावी. शाहू फ़ुले आंबेडकरांच्या विचारांत दहीहंडी खेळणे, त्याच्या स्पर्धा योजणे वा त्यावर करोडो रुपयांचा चुराडा करणे; याच्या महत्तेचा थांगपत्ता पानसरे दाभोळकरांना लागला नव्हता. सहाजिकच ते पुरोगामी असले तरी त्यांच्या हत्येने बहुधा पुरोगामी विचार मागे पडण्याचे भय आपल्याला जाणवले नसावे. मग आपण त्यासाठी पत्र लिहीण्याचे कष्ट कशाला घेणार? पण ज्यांच्या खात्यात उंच दहीहंडी व करोडो रुपयांची बक्षीसे ठेवण्याचे कर्तृत्व जमा आहे, त्यांना नुसत्या धमक्या आल्याने आपण इतके हळवे व घायाळ झालात. त्यामुळे नव्या मुख्यमंत्र्यांना व उभ्या महाराष्ट्राला पुरोगामी विचार कसे कमीअधिक दर्जाचे असतात, ते समजू शकले. दाभोळकर पानसरे यांच्यापेक्षाही जितेंद्र आव्हाड हे किती अधिक प्रभावी पुरोगामी आहेत, त्याचा साक्षात्कार व्हायला मदत झालेली आहे. अन्यथा बहुतांश पुरोगामी मंडळी दहीहंडी म्हणजे पोरकट धार्मिक थोतांड समजून बसली होती.

शाहू फ़ुले आंबेडकराच्या महाराष्ट्रातच खैरलांजी वा जवखेडे नावाची गावे आहेत काहो शरदराव? कारण तिथे दलितांच्या अतिशय क्रुर हत्या झाल्या. त्यांना जिवानिशी मारणारे आणि त्यावर पांघरूण घालणारे कोणी पुरोगामी विचाराने प्रवृत्त होऊन इतके हिडीस कृत्य करीत होते काय? अवघ्या दलित समाजात त्यामुळे संतापाची लाट उठली होती आणि जागोजागी निदर्शने व रास्ता-रोको झालेला होता. पण तेव्हा आपल्याला दोन शब्द लिहून फ़ुले आंबेडकरांचे स्मरण करायची बुद्धी झालेली नव्हती. याचा एकच अर्थ निघू शकतो, की जवखेडा व खैरलांजी ही गावे पुरोगामी महाराष्ट्रातली नसावीत. किंवा तिथे झालेली हत्याकांडे पुरोगामी पराक्रम असावा. आव्हाडना मिळालेल्या धमक्यांपेक्षा तिथे मारले गेलेले सामान्य जीव नगण्य किंमतीचे असावेत. की आपल्याला अभिप्रेत असलेल्या शाहू फ़ुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात असे खेड्यापाड्यातले दलित पुरोगामीत्वाची किंमत आपल्या हत्येतून मोजायलाच जन्माला येतात असे म्हणायचे? कारण त्यांच्या हत्या, विटंबना व अत्याचार होऊन दिर्घकाळ उलटून गेला आहे. पण चार ओळीचे पत्र कुठल्या मंत्र्याला वा मुख्यमंत्र्याला लिहायची इच्छा आपल्याला झाल्याचे कुणाला दिसले नाही, शरदराव? म्हणून तर वाटते की हा महाराष्ट्र कायम स्वरूपी म्हणजे बारा महिने तेरा काळ पुरोगामी नसावा. कधी अधुनमधून तो पुरोगामी व अकस्मात कधीतरी प्रतिगामी असावा. त्यात मुहूर्त शोधून पुरोगामी काळात कार्यभार उरकला पाहिजे काय? पानसरे दाभोळकर यांच्या हत्या चुकीच्या ग्रहकाळात झाल्या काय? जवखेडा व खैरलांजीच्या घटना पुरोगामी ग्रह वक्री असताना झालेल्या होत्या काय? की त्या अत्याचार हत्याकांडे घडताना महाराष्ट्र पुरोगामी नव्हता? पुरोगामी व प्रतिगामी ह्या गोष्टी सोयीनुसार बदलणार्‍या असतात काय शरदराव? जरा उलगडून स्पष्ट शब्दात एकदा लोकांना समजावून सांगाल का?

बरे पुरोगामी प्रतिगामी बाजुला ठेवूया,. धमकी या शब्दाचा अर्थ तरी कसा घ्यायचा? कोणीतरी आव्हाडांना चार शब्दांचा इशारा दिला, मग त्याला धमकी म्हणायचे? तर मध्यंतरी सर्व वाहिन्यांवर खुद्द जितेंद्र आव्हाड ठाण्यातल्या पोलिस वरीष्ठांना जे प्रेमाने समजावताना दिसत होते, त्याला धमकी म्हणायचे की कसे? मुंब्रा कळवा भागातल्या अनधिकृत बांधकामांना पाडायला जे सरकारी पथक गेले होते, त्याला संरक्षण देणार्‍या पोलिसांना आव्हाड काय समजावत होते? ‘तुम़ची नोकरी घालवू शकतो’ हेच शब्द होते ना? वाहिन्यांवर ते शब्द स्पष्टपणे ऐकू येत होते आणि त्यातली धमकी जगाला ऐकू आली. मग आपले कान का ऐकू शकले नाहीत? आपण त्याबद्दल आव्हाडांना चार खडे बोल ऐकवले आहेत का? नसतील तर काही कारण असेलच ना? बहुधा आव्हाड पोलिसांना शाहू फ़ुले आंबेडकरांचे विचार समजावत असतील ना? आपणच तर मुख्यमंत्र्यांना लिहीलेल्या पत्रात म्हणता, आव्हाड महाराष्ट्रात पुरोगामी विचार प्रसाराचे काम करतात. त्याचे प्रात्यक्षिक पोलिसांच्या नोकर्‍या घालवण्याच्या धमकीतून मिळू शकते. पोलिसांनाच धमकी देण्यापर्यंत ज्याची मजल जाते, तो किती शांततावादी माणूस असेल ना? असे काम कधी दाभोळकर पानसरेंना जमले नाही. म्हणून तर आपण त्यांची हत्या होऊनही विचलीत झाला नाहीत, की पत्र लिहीण्याचा प्रपंच केला नाहीत. बहुधा आपल्याला आव्हांडांच्या कामातून शाहू फ़ुले आंबेडकरांचे पुरोगामी विचार अवगत झाले असावेत. जे कधी पानसरे वा तत्सम कार्यकर्त्यांना ऐकायलाही मिळाले नाहीत. अन्यथा त्यांनी हकनाक नुसत्या चर्चा भाषणात कालापव्यय करण्यापेक्षा आव्हाडांप्रमाणेच पुरोगामी दहीहंड्या बांधून किती महान कार्य केले असते ना? जरा सविस्तर लिहा शरदराव. शक्य झाल्यास आव्हाडांची वाहिन्यांवर प्रक्षेपण करून पुरोगामीत्वाची व्याख्याने व प्रवचने जारी करा. वेगाने महाराष्ट्र पुरोगामी होईल आणि दाभोळकर पानसरे यांच्या अनुयायांसहीत जवखेडा खैरलांजीच्या अन्यायाला न्याय मिळवू बघणारेही आव्हाडांच्या नेतृत्वाखाली क्रांतीची ध्वजा उंच फ़डकवू लागतील. जरा महाराष्ट्र कधी पुरोगामी व शाहू फ़ुले आंबेडकरांचा असतो व नसतो त्याचे पंचांगही बनवायचे काम त्वरेने हाती घ्यावे. ही आग्रहाची विनंती.