मागल्या दोन दिवसात आम्ही सातत्याने नवे पुरोगामी विचारवंत जितेंद्र आव्हाड यांचे आख्यान लावलेले आहे आणि त्यात किती तथ्य होते, त्याची तात्काळ प्रचिती आलेली आहे. कालच्याच लेखात आम्ही आव्हाडांचे उंच उंच दहिहंड्या बांधण्याचे प्रबोधनपर प्राथमिक धडे घेण्य़ाचे काम जुन्यापान्या पुरोगामी विचारवंतांवर पवारांनी सोपवावे आणि आव्हाडांना भाषणे प्रवचने देण्य़ासाठी मोकळे करून घ्यावे; असे आवाहन केले होते. पण आमची ‘मन की बात’ परस्पर ओळखून की काय, आव्हाडांनीच स्वत:च तशी घोषणा करून टाकली आहे. यावर्षी त्यांनी आपला नेहमीचा प्रघात मोडून दहिहंडी उभारणार नसल्याची आधीच घोषणा करून टाकली आहे. महाराष्ट्रात दुष्काळ आहे आणि शेतकर्यांच्या आत्महत्या चालू आहेत, म्हणून यावर्षी दहिहंडीचे आयोजन रद्दबातल करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. कोणीही संवेदनशील व्यक्ती त्यासाठी आव्हाडांचे स्वागतच करील. पण आमच्यासारख्या काही विघ्नसंतोषी लोकांना मात्र त्यातही गफ़लत दिसली तर नवल नाही. तसे बघायला गेल्यास मागल्या दहा वर्षापासून महाराष्ट्राच्या विविध भागातले शेतकरी दुष्काळ व कर्जबाजारी स्थितीने पुरते बेजार झालेले आहेत. त्यामुळे सातत्याने आत्महत्येची प्रकरणे वाढलेली आहेत. पण त्याचा आव्हाडांना थांगपत्ता नसावा. अन्यथा त्याच कालखंडात त्यांनी ठाण्यात आपल्या विश्वविख्यात दहिहंडीचे आयोजन अगत्याने कशाला केले असते? त्याचेही वाहिन्यांवरून थेट प्रक्षेपण होईल याची काळजी कशाला घेतली असती? त्याचे दोन अर्थ असू शकतात. एक म्हणजे मागल्या दहा वर्षात राज्यात अशा आत्महत्या होत आहेत ही माहिती शंभर टक्के अफ़वा असावी. किंवा त्याचा कुठलाही तपशील आव्हाडांच्या कानी जाऊ नये, याची सरकारने काळजी घेतलेली असावी. अन्यथा आव्हाड इतका गाजावाजा करून ह दहिहंडीचा सोहळा कशाला साजरा करीत बसले असते?
इतर कोणी नाही तर त्यांचाच राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष ज्यात सहभागी होता, अशा आघाडी सरकारने आत्महत्येचा तपशील आव्हाडांपासून लपवलेला असावा. अन्यथा आव्हाडांसारखा संवेदनशील माणूस शेतकर्यांच्या जखमेवर मीठ चोळत कोट्यवधी रुपयांचा चुराडा दहिहंडीवर कशाला करत राहिला असता? त्यापेक्षा त्यांनी गावोगावी फ़िरून गरीब शेतकर्याच्या घरी राहुलप्रमाणे मुक्काम केला असता आणि इशरत जहानप्रमाणे मृतांना आपल्या नातेसंबंधात जोडून घेतले असते. त्यांच्या नावाने गावात रुग्णवाहिका सेवा सुरू केल्या असत्या. मृतांच्या नातेवाईकांना घेऊन भव्यदिव्य पत्रकार परिषदा भरवल्या असत्या. पण त्यांच्याच पक्षाचे आघाडी सरकार आडवे आले आणि आत्महत्यांचा तपशील आव्हाडापासून जाणिवपुर्वक लपवून ठेवण्यात आला. बिचार्या आव्हाडांना पवारप्रणित शाहू फ़ुले आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी उंच उंच दहिहंड्या बांधत बसावे लागले. कर्जबाजारी होऊन आत्महत्या करणार्या शेतकर्यांचे अश्रू पुसण्याची अनमोल संधी आव्हाडांना नाकारली गेली. खरे तर त्याचाही सीबीआय तपास करण्यासाठी साहेबांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आव्हाडांना न्याय दिला पाहिजे. कारण आव्हाडांच्याच प्रबोधनामुळे अनेक जिल्ह्यात व तालुक्यात एस्टी बसेस जाळण्यात आल्या, मोडतोड झाली. ते प्रबोधन कार्य खुप आधी सुरू झाले असते, तर अनेक शेतकर्यांना आत्महत्येची वेळ आली नसती ना? त्यांनीही आत्महत्या करण्यापेक्षा बसेस गाड्या वहाने पेटवून दुष्काळावर मात करून दाखवली असती. पण आघाडी सरकारने महत्वाचा तपशील आव्हाडांपासून लपवून ठेवला आणि बिचार्या आव्हाडांना फ़क्त दहिहंड्या बांधण्यात गर्क रहावे लागले. त्यात हायकोर्टाने बाधा आणल्यावर आव्हाडांना थेट सुप्रिम कोर्टाचे दार ठोठावून उंच हंड्या बांधण्याचा शेतकरी अधिकार अबाधित ठेवण्यासाठी झुंज द्यावी लागली.
म्हणजे असे की महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करतोय हे मागल्या वर्षीच आव्हाडांना उमगले असते, तर त्यांनी सुप्रिम कोर्टाचे दार ठोठावून दहिहंडीचा अट्टाहास कशाला केला असता? शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्याप्रमाणेच उंच हंडी बांधण्यापेक्षा त्यासाठी जमवलेल्या पैशाचा खर्च इमारत कोसळून ठार झालेल्या वा कुणा रिक्षात जखमी झालेल्या तरूणीच्या पुनर्वसनासाठी केला असता. पण तसे होऊ शकले नाही. मागल्याही वर्षी इतरांनी हंड्यांची उंची कमी केली असताना, आव्हाड मात्र गगनचुंबी हंड्या बांधण्याचे पुरोगामी काम जोमाने करत राहिले. त्यातून मोकळे झाल्यावर सवड मिळाली तेव्हा त्यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहीलेले शिवचरित्र वाचायला घेतले. शेतकरी आत्महत्येकडे बघणेच त्यांना शक्य झाले नाही. इतिहासात घुसले मग वर्तमानकाळाचे भान रहात नाही. आव्हाडांचे तसेच झाले. ते इतक्या वेगाने इतिहासात घुसत गेले, की मागल्या दहा वर्षाच्या भूतकाळात महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्याचे त्यांच्या गावीही नव्हते. अन्यथा त्यांनी बाबासाहेब पुरंदरेंचा पुरस्कार वा त्याच्या विरोधापेक्षा शेतकर्यांचे पुनर्वसन करायचे काम हाती घेतले नसते का? नक्कीच घेतले असते. पण शेतकरी आत्महत्या करतीलच कशाला? जाणता राजा देशाचा कृषिमंत्री असताना कोण कशाला आत्महत्या करील? आणि करीत असेल तर त्यावर आव्हाडांनी विश्वास तरी कसा ठेवावा? पवारनिष्ठा इतकी पक्की आहे, की आव्हाडांना आपल्या डोळ्यावर विश्वास नसेल इतका साहेबांच्या धोरण व कामावर विश्वास आहे. म्हणूनच दहा वर्षे साहेब कृषिमंत्री असतानाच महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येचे पेव फ़ुटले, तरी आव्हाडांनी त्याविषयीच्या बातम्यांवर विश्वास ठेवलेला नसेल. आता साहेब त्या पदावर नाहीत. म्हणूनच तशा बातम्या आल्यावर आव्हाडांना आत्महत्या खर्या वाटलेल्या असू शकतील.
पण चिंता करू नका. आव्हाडांनी त्या विषयात लक्ष घातले आहे आणि त्यांना साहेबांचा आशीर्वाद आहे, म्हटल्यावर शेतकर्यांच्या आत्महत्या लौकरच थांबल्याशिवाय रहाणार नाहीत. इशरतसाठी पत्रकार परिषद घेणारे आणि दहिहंडीच्या उंचीसाठी कोर्टात धाव घेणारे आव्हाड शांत बसणार नाहीत. लौकरच आव्हाड सुप्रिम कोर्टात जातील आणि शेतकर्यांच्या आत्महत्येवर प्रतिबंध लागू करून घेतील, याविषयी आपण खात्री बाळगली पाहिजे. एकदा कोर्टानेच बंदी घातली, मग आत्महत्या करायची कुठल्या शेतकर्याला हिंमत होईल? एका बाजूला सुप्रिम कोर्टाचे आदेश आणि दुसर्या बाजूला आव्हाडांनी खेडोपाडी जाऊन केलेले पुरोगामी प्रबोधनाचे कार्य, यांनी वेग घेतला की शेतकरी आत्महत्येपासून परावृत्त झालाच म्हणून समजा. मग पाऊस पडला नाही तरी बेहत्तर आणि कर्जात शेतकरी बुडाला तरी चिंता करण्याचे कारण नाही. आव्हाडच हे काम करू शकतील. फ़डणवीस वा मोदी सरकारच्या आवाक्यातले ते काम नाही. त्यांनी महाराष्ट्रभूषण पुरस्कार द्यावेत किंवा गोमांसबंदी असल्या फ़डतुस गोष्टी कराव्यात. चिक्क्या खरेदी कराव्यात. चिक्की विकण्याचे काम त्यांना जमणारे थोडेच आहे? तेलगी प्रकरण उकरून काढण्याची फ़डणवीस सरकारची हिंमत झाली होती काय? आव्हाडांनीच ते शिवधनुष्य पेलून दाखवले ना? आता छगन भुजबळांची जागा घ्यायची असेल तर थोडीफ़ार नाटके ही करावी लागणारच ना? त्यासाठीच तर साहेबांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आव्हाड हे ओबीसी समाजाचे धडाडीचे कार्यकर्ते असल्याचे शिफ़ारसपत्र दिलेले होते. त्यात साहेबांनी ओबीसी म्हटले होते. पण आव्हाड यांनी बहुधा ‘ओवायसी समाजाचे’ असे वाचलेले असावे. अन्यथा त्यांनी शिवशाहिराच्या विरोधात इतकी मोठी आघाडी कशाला उघडली असती? ओवायसीप्रमाणे तिरस्कार प्रमाण मानून कशाला रान उठवले असते? काहीही असो, आव्हाडांमुळे राज्यातील जनतेला व ठाणेकरांना राज्यात शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे प्रथमच कळले. शक्य झाल्यास त्यांनी गजानन घोटेकरलाही जाऊन ती बातमी सांगितली तर बरे होईल.
भाऊ गजानन घोटेकर कोण ?
ReplyDelete"Don't vote for the Congress and NCP; they don't care for farmers," 45-year-old Gajanan Ghotekar wrote in the suicide note before consuming pesticide l
Deleteलई भारी. पायताणाने हाणल्यासारखं वाटलं
ReplyDeleteRajkarnat Avadanna pudhachya nivadnukiparyant batmit rahile pahije, mhanun ha sagla stunt ahe.
ReplyDeleteमस्त
ReplyDeleteShal joditale
ReplyDeleteएकमद मस्त...
ReplyDelete