Monday, March 2, 2015

पुरोगामीच आता प्रतिगामी होऊन गेलेत



"आगर्‍याजवळील फ़िरोझाबाद येथे आकस्मिकपणे जातीय दंग्याचा डोंब उसळून, त्यामध्ये आठ माणसांचे बळी पडले आणि सुमारे साठ माणसे जखमी झाली, हा वृत्तांत वाचल्यापासून आम्ही अत्यंत बेचैन झालो आहोत. एका माणसाने दुसर्‍या निरपराध माणसावर गावठी बॉम्ब फ़ेकून त्याच्या चिंधड्या उडवणे, अगर सुरा खुपसून त्याचा कोथळा बाहेर काढणे सदगतीचा नि मोक्षप्राप्तीचा मार्ग होय, असे कुठल्या धर्माच्या खर्‍या तत्वज्ञानात सांगितले आहे कोण जाणे! पण धर्माच्या नावाने अशा प्रकारचे अत्याचार आपल्या देशात आजतागायत होत आहेत. या धर्मांधतेच्या राक्षसानेच अखेर आपल्या राष्ट्राची फ़ाळणी करून त्याची चिरफ़ाड केली, या फ़ाळणीपायी लक्षावधी निरपराध माणसांची भेसूर कत्तल झाली. असंख्य स्त्रियांच्या अब्रुची होळी झाली, कोट्यावधी माणसांच्या सर्वस्वाचा सत्यानाश झाला आणि अगणित माणसे देशोधडीला लागली. पण एवढी भयानक आहुती घेऊनही या राक्षसाचे अजून समाधान झाले नाही आणि तो देशात मिळेल त्या संधीची वाट पहात दबा धरून बसला आहे, असाच प्रत्येक जातीय दंग्याचा अर्थ आहे. म्हणून जातीय दंगा म्हटले- मग तो कुठल्याही कानाकोपर्‍यात असो- तो लहान असो की मोठा असो- आमच्या काळजात चर्र होते. हा राक्षस जोवर जिवंत आहे, तोवर हे राष्ट्र सुरक्षित नाही, त्याचे स्वातंत्र्य सुरक्षित नाही, लोकशाही सुरक्षित नाही, साधी माणुसकीदेखील सुरक्षित नाही. म्हणून या राक्षसाला थारा न देणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्याचा नि:पात करून त्याला गाडून टाकणे ही राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे. पण स्वराज्य मिळून बारा वर्षे होत गेली तरी हे होत नाही. ‘इश्वर अल्ला तेरे नाम, सबको सन्मती दे भगवान’, अशी भजने तारस्वरात आळवूनही हे होत नाही. आमची राज्यघटना निधर्मी आहे, असा अहोरात्र पुकारा करूनही हे होत नाही. हिंदु-मुस्लिम ऐक्यावर प्रवचने झोडूनही हे घडत नाही. कारण जातीय दंगे हे केवळ साध्यासुध्या माणसांच्या धार्मिक भावनांमुळे घडत नाहीत. या दंग्यांमागे संघटना असते, पद्धतशीर चिथावणी असते, पैसाही असतो. अशा दंग्यांमागे वरकरणी धर्मकारण असले तरी त्याच्या मू्ळाशी राजकारण असते. ब्रिटीश राजवटीने या देशातील स्वातंत्र्याच्या आंदोलनात दुफ़ळी माजवण्यासाठी या धर्मद्वेष्ट्या राजकारणाचा भरपूर उपयोग केला.

दंगे ज्या दंगलखोरांमुळे होतात, त्यांना शासन करून जनतेच्या नागरिक हक्कांचे रक्षण हे राज्यकर्त्यांचे कर्तव्य आहे. त्याऐवजी दंगा टाळण्याच्या सबबीखाली वाद्यबंदीचा हुकूम काढणे हा चोर सोडून संन्याशाला सुळी देण्याचाच प्रकार आहे. जातीयवाद्यांपुढे सपशेल शरणागती स्वीकारण्याच्या या धोरणामुळे त्यांचे निर्मूलन होण्याऐवजी ते जास्तच माजल्याखेरीज रहाणार नाहीत. किंबहूना, सध्या नव्याने जो ऊत आला आहे, तो या देशातील जातीयवादी व धर्मांध गटांनी नव्याने उचल खाण्याचे जे प्रयत्न चालविले आहेत, त्याचाच एक भाग आहे.

केरळातील कम्युनिस्ट सरकार उलथवून पाडण्यासाठी तेथील कॉग्रेसवाल्यांनी कॉग्रेसश्रेष्ठींच्या आशीर्वादाने राष्ट्रद्रोही मुस्लिम लीगवाल्यांशी तत्वशून्य जी युती केली, तिच्यामुळे देशभर मुस्लिम जातीयवाद्यांना नवे उत्तेजन मिळाले आहे. देशात ठिकठिकाणी लीगच्या शाखांचे पुनरूज्जीवन करण्यात येत आहे. एवढेच नव्हे, तर आक्टोबरमध्ये लीगची अखील भारतीय परिषद भरवून या संघटनेचे कार्य पुन्हा देशभर सुरू करण्याचीही घोषणाही करण्यात आली आहे. ज्या मुस्लिम लीगच्या कारस्थानामुळे अखेर भारताची फ़ाळणी झाली, ती भारताच्या राष्ट्रीय जीवनात पुन्हा जातीयवादाचे विष फ़ैलावण्यासाठी नव्याने अवतार घेत आहे. जातीय नि धार्मिक तेढ हेच लीगचे एकमेव भांडवल आहे. त्यामुळे तिच्या पुनरूज्जीवनाची नांदी जातीय दंग्यांनी व्हावी यात नवल ते काय? या प्रतिगामी, लोकशाहीविरोधी नि देशद्रोही प्रवृतीला देशात पुन्हा थारा मिळता कामा नये; म्हणून सर्व शक्ती पणाला लावून झटणे हे राष्ट्रातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. लोकशाही नि समाजवाद यांच्याबद्दल निष्ठा बाळगणार्‍या मुस्लिम नागरिकांना देखील या जातीयवादी विचाराला प्रतिबंध करण्यासाठी पुढे सरसावले पाहिजे." २४

उपरोक्त तीन परिच्छेद मुद्दाम अशा एका जुन्या लेखातून घेतले आहेत, की नव्या कम्युनिस्ट व पुरोगाम्यांना आपलाच इतिहास कळावा. कारण हा लेख आजचा नाही तर तब्बल पंचावन्न वर्षे जुना आहे. तो कुणा हिंदू महासभा, रा. स्व. संघाच्या नेत्याने लिहीलेला नाही की सनातनच्या ताज्या अंकातला नाही. तो एका कम्युनिस्ट सहप्रवाशी अशी हेटाळणी झालेल्या दिग्गज संपादकाने लिहिलेला आहे. आज जे लोक शिवाजी खरा कोण होता, त्याचा शोध घेतल्याचे तावातावाने सांगायला पुढे सरसावलेले आहेत, त्यांना भारतातला ‘कम्युनिस्ट खरा कोण होता’, त्याचे तरी भान व ज्ञान आहे काय? असते तर साडेतीन चारशे वर्षे जुन्या इतिहासाचे हवाले देत बसण्यापेक्षा त्यांनी आपल्याच भारतातील पुरोगामी इतिहासाचा थोडा तपास केला असता. कॉम्रेड पानसरे यांची हत्या झाल्यावर जातीयवादाची घासून गुळगुळीत झालेली टेप वाजवण्यापेक्षा आपल्याच अंतरंगात थोडे डोकावून बघितले असते. १९६० सालात जेव्हा संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि त्यासाठीच लढलेल्या सर्वपक्षीय समितीमध्ये फ़ुट पडली, त्याच काळात त्यापैकी एक नेते व दैनिक ‘मराठा’चे संपादक आचार्य अत्रे यांनी लिहीलेला हा अग्रलेख आहे. त्यात त्यांनी जातीयवादाला कॉग्रेस कशी चुचकारते आहे आणि ती कुठल्या राजकारणासाठी चुचकारते आहे, त्याचे दाखले दिले आहेत. कम्युनिस्टांचीच एकमेव केरळी सत्ता खच्ची करण्यासाठी कॉग्रेस पक्षाने मुस्लिम लीग या जातीयवादी पक्षाला हाताशी धरून कसले विष फ़ैलावण्याचे पाप देशात केले, त्याचा तो पुरावा आहे. त्यात कुठे हिंदूत्ववादी वा संघाचा उल्लेखही आढळत नाही. त्याही काळातले कम्युनिस्ट साहित्य व विवेचन संघाच्या नावाने खडे फ़ोडताना दिसत नाही. कारण तेव्हा तमाम पुरोगामी आजच्या भाजपाच्या भाषेत मुस्लिम जातीयवाद व मुस्लिम लीगवर खापर फ़ोडत होते. मात्र आज तेच कम्युनिस्ट व समाजवादी त्याच मुस्लिम जातीयवादाला जोजवत अंगाईगीते गाताना दिसत असतात. मतांच्या राजकारणासाठी तेव्हा कॉग्रेसने जे पाप केले असे आरोप पुरोगामी करायचे, ते आरोप आता भाजपाने केल्यावर लगेच प्रतिगामी होतो? उपरोक्त लेखात प्रतिगामी कोण व कोणत्या कारणाने त्याची वर्णन आलेले आहे.

‘या प्रतिगामी, लोकशाहीविरोधी नि देशद्रोही प्रवृतीला देशात पुन्हा थारा मिळता कामा नये’ असे १३ सप्टेंबर १९६० रोजीच्या अग्रलेखात अत्रे लिहीतात. ती प्रवृत्ती कोणाची आहे? कुणात सामावलेली आहे? आजचे कम्युनिस्ट कोणाला हाताशी धरून उलट्याबोंबा मारत असतात? ५५ वर्षे जुन्या सिद्धांताचा आधार घेतला तर आज पुरोगामी म्हणून मिरवणारेच प्रतिगामी होऊन गेलेले नाहीत काय? कारण देशाची फ़ाळणी ज्यामुळे झाली, त्याच प्रतिगाम्यांची कास आजचे पुरोगामी धरून आज चालले आहेत. त्यांना लीग चालते, त्यांना ओवायसी चालतो. किंबहूना तेच सेक्युलर पुरोगामी वाटतात. त्यांच्यामुळे देश जोडला जाईल अशा थाटात यांचे पुरोगामी राजकारण चालते. मुस्लिम लीग बदललेली नाही की त्यांच्या राजकारणातील प्रतिगामी प्रवृत्ती बदललेली नाही. बदललेले आहेत ते कम्युनिस्ट आणि समाजवादी पुरोगामी. आपलाच अगदी अलिकडचा इतिहास त्यांना आठवत नाही आणि इतिहासाचे नव्याने संशोधन व लेखन करण्याच्या गमजा चालू आहेत. आणि तोंडावर पुरावे दाखले टाकले, मग इतिहासात कशाला जायचे, असे उफ़राटे सवाल केले जातात. ज्यांना आपण कोण होतो, काय होतो आणि कसे होतो, तेही आठवत नाही, त्यांनी इतरांचे वा समाज देशाचे विश्लेषण करावे, हा हास्यास्पद प्रकार नाही काय? कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या संबंधात नुसता शोकप्रस्तावच नको तर निषेधाचा प्रस्ताव विधीमंडळात आणायला हवा. त्याला जर भाजपाचा विरोध असेल, तर तो त्यांचा मुर्खपणाच नव्हेतर दिवाळखोरी आहे. पण त्यासाठी आक्रोश करणार्‍यांनी थोडाफ़ार अशा शोकप्रस्तावाचा आपला इतिहासही तपासून बघितला आहे काय?

(उपरोक्त उतारे ‘कर्‍हेचे पाणी’ खंड ६ मधून)

Sunday, March 1, 2015

पादर्‍याला आवट्याचे निमीत्त



माझ्या पत्रकारितेची सुरूवात दैनिक ‘मराठा’त झाली. तिथे आचार्य अत्र्यांच्या सहवासाने भाषेवर प्रभूत्व असलेल्या लोकांची मांदियाळी होती. त्यात दत्तू आंबेरकर ह्या जाहिरात खात्यात काम करणार्‍या छायाचित्रकाराचाही समावेश होता. अधूनमधून नव्या पत्रकार बुद्धीमंतामुळे दत्तोबाची आठवण येत असते. कारण त्यांनी अशा अर्धवटरावांचे नेमके विश्लेषण वा व्याख्या सांगितली होती. सोशल मीडियावर ‘सकाळ’चे रोविंग एडीटर संजय आवटे यांनी लिहीलेल्या एका चिरकुट मजकुरामुफे दत्तू आंबेरकर आठवले. ते अशा अर्धवटरावांना  नव्याने शेंबुड खायला शिकणारा कावळा म्हणायचे. अतिशय किळसवाणा असा तो प्रकार आहे. आरंभी मला त्याचा अर्थ माहिती नव्हता. दत्तोबांशी चर्चा केल्यावर त्यांनी प्रत्यक्षच असा कावळा दाखवला. अत्यंत बुळबुळीत असा हा पदार्थ तुम्ही फ़ेकला, की कावळा त्यावर झेपावतो. पण तो सहजगत्या त्याच्या चोचीत येत नसतो. मग तो चोचीत ओढून घेण्यासाठी कावळा जी कसरत करतो, ती खरेच कितीतरी केविलवाणी असते. ‘चोरटया भाऊच्या मनात चांदणे!!!’ या शिर्षकाचा जो मजकूर आवटे यांनी सोशल मीडियात टाकला, त्यावर नजर टाकली तर दत्तू आंबेरकरच्या शब्दांची प्रचिती येते. माझ्या वय व बुद्धीविषयी आवटे लिहीतात


‘भाऊ तोरसेकर यांचे वय झाले आहे आणि काहीवेळा वृद्धापकाळात विचारप्रक्रिया विसंगत दिशेने जाण्याचे भय असते. त्यामुळे भाऊना माफ करायला हरकत नाही. पण त्यांच्या बेताल लेखनाने काही गैरसमज होऊ शकतात. ते होऊ नयेत यासाठी:’

असे म्हणत आवटे यांनी विचारप्रक्रिया वयानुसार विसंगत दिशेने जाण्याचे भय व्यक्त केले आहे. याचा अर्थ तसा त्यांचा अनुभव असावा आणि ज्या हिरीरीने आवटे पानसरे दाभोळकरांच्या समर्थनार्थ उभे ठाकले आहेत, त्यावरून ते कोणाच्या संगतीत असतात, त्याचा अंदाज करण्याची गरज नाही. पण मग असा प्रश्न येतो, की वयाचाच निकष लावायचा तर ते पानसरे दाभोळकर माझ्यापेक्षा वयाने अधिकच पुढे गेलेले होते. म्हणजे आवटेच्या निकषानुसार त्यांची विचारप्रक्रिया विसंगतीच्या दिशेने गेलेली आहे, असेच त्यांना वाटत असावे. त्याचे कारण उघड आहे. आवटे ज्या दिवट्यांच्या संगतीत रहातात वावरतात, त्यावर सुसंगती-विसंगती अवलंबून असते. म्हणूनच त्यांना पानसरे दाभोळकर यांचे विचार भरकटत विसंगतीच्या दिशेने गेल्यासारखे वाटले असेल तर नवल नाही. मात्र मला तसे वाटत नाही. त्या दोघांच्या काही भूमिका व विचार असू शकतील आणि त्या इतरांना पटणार्‍या नसल्या म्हणून आवटेला विसंगतही वाटल्या असतील. म्हणून मी त्यांना बेताल वागणे म्हणणार नाही. तो आवटे यांचा निष्कर्ष आहे. अर्थातच तो गैरसमजावर आधारलेला असू शकतो. पण ज्याच्यापाशी मुळात बालीश समजही नाही, त्याच्या गैरसमजाला किती किंमत द्यायची? म्हणूनच आवटे यांना पानसरे व दाभोळकर विसंगत विचार करायचे असे वाटत असले तरी मला अजिबात तसे वाटत नाही. आपापले चिंतन मनन यानुसार त्यांनी विचार मांडले आणि कृतीही केल्या. आवटेंना त्या बेतालही वाटतात, मला नव्हे. त्यांच्याकडून चुक झालीच असेल, तर आवटेसारख्या निर्बुद्ध नासमज बेताल लिहीणार्‍या बोलणार्‍यांची संगत त्या दोघांना टाळता आली नाही, इतकेच. अर्थात अशा बेअक्कल आवट्याची दखल घेण्याचे काहीच कारण नाही, असे अनेकांना वाटेल. पण जेव्हा अशी बेताल माणसे शेफ़ारल्यासारखी अक्कल पाजळू लागतात, तेव्हा त्यांचे गाढवासारखे लांबलेले कान उपटून तोकडे करावे लागतात. आणि पादण्याला ‘आवाज महाराष्ट्राचा’ म्हणत नाहीत हे सांगणे भाग पडते.

हरकत नाही, माझी बुद्धी इतकी भरकटली असेल तर साम टिव्हीवर त्यांनी मला आमंत्रित करून ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अशी माझी ओळख करून देण्याचे कारण काय? त्यातून आवट्यांची बुद्धी किती भरकटली वा भ्रष्ट झाली आहे, त्याचा पुरावा आपोआपच मिळत नाही काय? यातून या बेताल माणसाचे जगाविषयी व बुद्धीविषयी किती गैरसमज आहेत याची साक्ष मिळू शकते. दुसरी बाब आवट्याच्या भरकटलेल्या बुद्धीची व कामाची. याला ‘सकाळ’ समूहाने कोणत्या पदावर नेमले आहे? रोविंग एडीटर म्हणजे काय? ज्याला कुठली जागा वा काम नेमून दिलेले नाही व त्याने कुठेही भरकटावे असा संपादक. सहाजिकच अशा भरकटलेल्या माणसाला अवघे जगच भरकटलेले वाटले तर नवल नाही. अर्थात हा माझा नुसता आरोप नाही. त्याचा साक्षात ऑडीओ व्हीज्युवल पुरावाच आवट्यांच्या दफ़्तरी नोंदलेला आहे. त्यांनी त्याचीही लिंक सोशल मीडियात टाकली, तर कोण किती भरकटलेला निर्बुद्ध आहे, त्याचा निर्णय बघणार्‍यालाच घेता येईल.

डिसेंबर महिन्याच्या अखेरीस नागपूरला महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन होत असते. ते संपल्यावर साम टिव्हीने ‘आवाज महाराष्ट्राचा’ नावाच्या शोमध्ये चर्चा ठेवलेली होती. चर्चेचा विषय होता विधानसभेच्या हिवाळी नागपूर अधिवेशनाचे फ़लित. त्यात सकाळचे नागपूरचे निवासी संपादक होते, तसेच भाजपाचे प्रवक्ते अवधूत वाघ आणि कॉग्रेसचे डॉ. राजू वाघमारे सहभागी झाले होते. त्यात माझाही ज्येष्ठ विश्लेषक म्हणून समावेश आवट्यांनी केला होता. चर्चेचा पहिला भाग उरकला आणि ब्रेकनंतर वाघ आणि वाघमारे याच दोघांमध्ये तुंबळ लढाई जुंपली. पण चर्चा विषय सोडून कुठल्याकुठे भरकटली होती. कारण हे दोघे मुंबईच्या रेल्वे लोकल गाड्या व फ़लाटांच्या विकास सुविधांविषयी तब्बल पंधरा मिनीटे बोलत होते. माझ्या ‘भरकटलेल्या बुद्धी’नुसार रेल्वे हे केंद्र सरकारचे मंत्रालय असून महाराष्ट्र सरकार व विधानसभेच्या कक्षेत तो विषय येत नाही. म्हणूनच नागपूर विधानसभेच्या फ़लितामध्ये त्यावर चर्चा व्हायला नको. पण कागद नांगरीत बसलेल्या आवट्याला त्याचे भान कुठे होते? त्यांनी दोन्ही प्रवक्त्यांना मोकाट भरकटू दिले. शेवटी बेताल झालेल्या त्या चर्चेला रेल्वेच्या रुळावरून विषयाच्या रुळावर आणण्यासाठी मला ओरडून आवट्याला शुद्धीवर आणावे लागले. विषय कुठला आणि चर्चा कुठे चाललीय, असे ओरडून सांगितल्यवर पादण्यात रमलेल्या आवट्यांना भान आले. त्यांना शुद्धीवर आणण्यासाठी मी केलेली कॉमेन्टही अजून माझ्या स्मरणात आहे आणि दोन्ही पक्षाचे उपरोक्त प्रवक्तेही त्याची साक्ष देतील. मी आवट्यांना शुद्धीवर आणण्यासाठी म्हणालो होतो, कृपया या वाघ आणि वाघमारेंना एकाच चर्चेच्या पिंजर्‍यात कोंडू नका, अन्यथा चर्चा बाजूला रहाते आणि शिकार सुरू होते. तेव्हा कुठे आवट्यांना जाग आली. पण तोवर चर्चेचा वेळही संपत आलेला होता.

असा हा बेताल निर्बुद्ध आवटे त्याने माझी बुद्धी भरकटण्य़ाचा धोका सांगावा यातच माझी बुद्धी शाबुत असल्याचा पुरावा मिळतो. ज्याची स्वत:ची बुद्धी लाईव्ह चर्चेमध्ये भरकटलेली असते. त्याने मला बुद्धी भरकटल्याचे प्रमाणपत्र दिल्याबद्दल त्याचे आभार मानायला नको काय? त्यांनी पादलेला दुसरा मुद्दा ‘दाभोलकर अथवा पानसरे यांचे खून शेतीच्या बांधावरच्या भांडणातून नक्कीच झाले नाहीत. त्याला असणारा संदर्भ विचार आणि विवेकाचा आहे. त्यामुळे हे खून अविवेकी शक्तीनी केले आहेत, असे म्हटले जाणे स्वाभाविक आहे.’ याचा अर्थ अन्य खुन हे विवेकी शक्ती करतात असा होत नाही काय? इतर खुन विवेकी बुद्धी वा शक्तींकडून होतो असे आवट्यांना म्हणायचे आहे. इथे या माणसाची बुद्धी किती भरकटली आहे, त्याचा पुरावा वेगळा देण्याची गरज आहे काय?

त्यांचा तिसरा मुद्दा, ‘दाभोलकर अथवा पानसरे यांच्या हत्येला केरळ, चीन, रशिया, क्युबा असे संबंध जोडत काय सिद्ध होणार आहे, हे काही मला समजलेले नाही. त्यावरही चर्चा करता येईल, पण मुद्दा भरकटण्याचा डाव त्यातून यशस्वी होत जाईल!’ ज्याला एक तासाच्या चर्चेत विषय मुद्देसूद ठेवता येत नाही आणि पंधरा मिनीटे चर्चा भरकटल्याची शुद्ध नसते, त्यांनी उगाच असला पांडित्याचा आव आणायची गरज आहे काय? केंद्र आणि राज्य यांची खाती व मंत्रालये यातली तफ़ावत कळत नाही, त्यांनी मुद्दे भरकटण्याची भाषा करावी, हा विनोद नाही काय? मग आवट्यांचा मुद्दा काय आहे? त्यांच्याच शब्दात सांगायचे तर ‘मुद्दा आहे आयडिया ऑफ़ इंडियाचा.’ म्हणजे ते आयडीयाच्या काल्पनिक जगात वावरत असतात आणि वास्तवातील जगाशी त्यांचा काडीमात्र संबंध नसतो. याला भ्रमिष्टावस्था म्हणतात. कारण पानसरे दाभोळकरांची हत्या वास्तवात झालेली आहे. ती नुसती आयडीया नाही. त्या हत्यांचा आयडियाशी संबंध नसून गुन्हेतपासाशी संबंध आहे. पण कल्पनेच्या विश्वात कल्पनाविलास करण्यात रमलेल्यांना वास्तवाचे भान कसे असावे?

तर मुद्दा किती व्यापक आहे असे सांगताना आवटे म्हणतात, ‘तेव्हा हा मुद्दा तथाकथित पुरोगामी अथवा डावे पक्ष यांच्याशी संबंधित नाही. (उलट शेकापसारखा तथाकथित डावा पक्ष रायगडातही बंदमध्ये उतरताना दिसला नाही!) मुद्दा त्याहून जास्त व्यापक आहे. म्हणून तो प्रत्येक भारतीय माणसाच्या चिंतेचा होणे स्वाभाविक आहे. जो जो भारतीय, तो तो सचिंत, तो तो संतप्त असे चित्र आहे. असायला हवे. आम्ही भारताचे लोक आज अस्वस्थ असताना हा कोणी भाऊ असे पचकत असेल तर त्यांना सांगायला हवी या देशाची गोष्ट!’

हा दिवटे कुठल्या देशात रहातो ठाऊक नाही. कारण एकाच वाक्यात तो अगदी डावा असूनही रायगडातला शेका पक्ष बंदपासून दूर राहिल्या़चे सांगतो आणि त्याच वाक्यात पुन्हा ‘जो जो भारतीय, तो तो सचिंत, तो तो संतप्त असे चित्र आहे’ अशी ग्वाही सुद्धा देतो. म्हणजे जो जो संतप्त तेवढाच भारतीय बाकीचे भारतीय नसतात का? तसे असेल तर अगदी दिल्लीतले व अन्य प्रांतातील डावे पक्ष, कम्युनिस्टही भारतीय असू शकत नाहीत. कारण त्यातला कोणी नेता अस्वस्थ होऊन कोल्हापूरला फ़िरकला सुद्धा नाही. बंदमध्ये किती व कोण सहभागी झाले, त्याच्या बातम्या सकाळनेच दिल्यात. त्या तरी आवटे वाचतो काय? की रोविंग एडीटर म्हणजे घरमाशी जशी ताटावरून मैल्यावर बसत भरकटत जाते, तसे यांचे काम चालते?

‘हिंसाचाराचे समर्थन करणारी साम्यवादी आवृत्ती आणि त्याचे तपशील याचा इथे संबंध येतोच कुठे? लोकशाहीत त्याला जागा असू शकत नाही.ते सारे अवैध आहे. दाभोलकर अथवा पानसरे यांच्या हत्येला केरळ, चीन, रशिया, क्युबा असे संबंध जोडत काय सिद्ध होणार आहे, हे काही मला समजलेले नाही.’ असा प्रश्न मला विचारणार्‍या आवट्याला महाराष्ट्राचाही इतिहास माहिती नाही की इथल्या राजकारणाची ‘आयडिया’ नाही. मग समजणार तरी कसे? या अन्यत्रच्या साम्यवादी हिंसक कृत्यांचा संबंध काय असाच प्रश्न पंचावन्न वर्षापुर्वी कॉम्रेड डांगे, दाजीबा देसाई, आचार्य अत्रे इत्यादी दिग्गजांनी तेव्हाचे समाजवादी दिग्गज एसेम जोशी, नानासाहेब गोरे, बॅ. नाथ पै यांनाही विचारला होता. तसा कुठलाही संबंध नसताना तेव्हाचे संयुक्त महाराष्ट्र समितीचे राजकारण नासले होते. जे उत्तर जोशी-गोरे यांचे होते, तेच माझे उत्तर आहे. ते जरा आवटे नावाच्या घरमाशीने इतिहासावर बसून वाचले तर संबंध लक्षात येऊ शकेल. पण घाणीवरच घोंगावत बसल्यावर लक्षात काय यायचे? आज आवटे वगैरे दिवटे ज्या आवेशात सनातन वा हिंदूत्ववाद्यांवर भडीमार करत असतात, त्याच भाषेत तेव्हाचे समाजवादी दिग्गज कम्युनिस्टांना खुनी प्रवृत्ती म्हणून  खिजवत होते?

असो तर त्यांच्यामुळे मला दत्तू आंबेरकरची आठवण झाली. कारण आवट्यांनीच लिहून ठेवले आहे ‘कोणी भाऊ असे पचकत असेल तर’. तर हा अत्यानंदाने शेंबुड सापडला म्हणून त्याच्यावर झेपावणार ना? नसलेली अक्कल माणुस वापरू लागला, मग असेच होते. ज्याला देश, लोक, मुद्दे, भरकटणे, पचकणे अशा शब्दांचा मुळातला अर्थच ठाऊक नाही, त्याने जीभ उचलून टाळ्याला लावली, तर वेगळे काय व्हायचे? काय लिहीतो वा बोलतो, त्याचेही भान त्याला असायचे कारण नाही. त्यांनी आपल्या त्या ‘आवाज महाराष्ट्राचा’ शोची लिंन्क मुद्दाम इथे टाकावी, म्हणजे त्यांच्या भरकटलेल्या अकलेचे छान प्रदर्शन मांडले जाईल. चोरट्याच्या मनात चांदणे असे आपले पुर्वज म्हणून गेलेत. पण त्यांनीच पादर्‍याला पावट्याचे निमीत्त असेही म्हटले आहे. असले दिवटे त्या काळात पैदा झाले असते, तर पुर्वजांनी पादर्‍याला आवट्या़चे निमीत्त अशीच म्हण रूढ केली असती ना?

पानसरे नावाचे विचार आणि हत्यार

Swami Laxmananda Saraswati

जेव्हा आपल्याकडे कुठल्याही प्रश्नाची उत्तरे नसतात, तेव्हा चलाख व लबाड माणसे मूळ प्रश्नच बदलण्याची केविलवाणी धडपड करू लागतात. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येनंतर त्या कृत्याचा तात्काळ निषेध सर्वांनीच केला होता. कुठल्याही हिंसक हत्येचा व हिंसाचाराचा निषेध व्हायलाच हवा. पण मग त्याचवरून चर्चा होताना दोन तट पडायचे कारण काय? जेव्हा निषेधकर्त्यातला एक गट दुसर्‍या निषेधकर्त्यालाच खुनी वा हल्लेखोर ठरवू लागतो, तेव्हा हत्येचा विषय बाजूला पडून आरोपबाजीला सुरूवात होत असते. कुठल्याही गुन्हा वा हत्येचा तपास हे सामान्य माणसाचे काम नसते. ते पोलिसांचे कर्तव्य असते. अशावेळी कोणाकडे त्यासंबंधी पुरावा वा साक्षीदार असेल तर त्याला पोलिसांकडे घेऊन जाणे किंवा तपासात मदत करणे; हे त्याचे कर्तव्य असते. त्याऐवजी कोणी भलत्याच कोणावर बिनबुडाचे आरोप करू लागला आणि त्यासाठी जुने संदर्भ देऊ लागला, तर काय करायचे? त्यातला खरेखोटेपणा तपासायचा नाही काय? दाभोळकर असोत की पानसरे असोत, त्यांच्या हत्येनंतर विनाविलंब हल्ल्याचा आरोप हिंदूत्ववाद्यांवर सुरू झाला. अशा आरोपानंतर पोलिसांनीही त्या दिशेने तपास केला, आरोप झालेल्यांना ताब्यात घेऊन चौकश्या केल्या. पण कुठलाही पुरावा सापडू शकलेला नाही. आरोप करणार्‍यांनीही त्यासाठी कोणी पुरावा आणुन देण्याचे कष्ट घेतलेले नाहीत. सहाजिकच त्यापैकी कोणाला पानसरे वा दाभोळकरांच्या हत्येचे महत्व वाटत नसल्याचे स्पष्ट होते. त्यापेक्षा झालेल्या हत्येचा राजकीय लाभ उठवण्याचा अश्लाघ्य हेतू मात्र अशा आरोपबाजीतून स्पष्ट समोर येतो. एका निष्पाप व्यक्तीच्या हत्येचा गुन्हा जितका निषेधार्ह असतो, तितकाच त्याच्या हत्येपासून राजकीय लाभ उठवण्याचा हेतूही निषाधार्ह असतो. म्हणूनच त्या निषेधाच्या मुखवट्याआड लपलेल्या विकृत प्रवृत्तीचा बुरखा फ़ाडणे अगत्याचे होऊन जाते.

पानसरे यांच्या हत्याकांडानंतर तेच घडत गेले. म्हणून अशा प्रकरणांचा व त्यात गुंतलेल्या लबाड प्रवृत्तीचा पर्दाफ़ाश करणे अगत्याचे झाले. किंबहूना तेच तर पत्रकारितेचे कर्तव्य असते. आजवर बहुतांश वेळी पुरोगामी मुखवटे लावूनच वावरणार्‍या बहुतेक पत्रकार, विचारवंतांनी त्यात नेहमीच कसूर केली आहे. म्हणूनच कॉम्रेड पानसरे हयात असताना त्यांच्या विचारावर कधी वाहिनीवर चर्चा झाल्या नाहीत की कुठल्या वृत्तपत्राने त्यावर सांगोपांग चर्चा घडवण्याचा प्रयासही केला नाही. पण त्यांची निर्घॄण हत्या झाल्यावर मात्र या तमाम पुरोगामी माध्यमांना पानसरेंच्या वैचारिक लढाईचा पुळका आला. कारण त्यांच्यासाठी एक निर्घॄण हत्येला महत्व नव्हते, त्यापेक्षा हिंदूत्ववादी संघटनांना झोडण्यासाठी अशी हत्या हे धारदार हत्यार म्हणून हाती लागले होते. सहाजिकच त्या प्रयत्नाला खिळ घालणारा कोणी लेखक पत्रकार असेल, तर त्याचे लेख अशा हत्याराची धार बोथट करत असतात. म्हणून पानसरे हत्येच्या निमीत्ताने इथे जो पुरोगामी वा कम्युनिस्ट हिंसाचाराच्या जुन्या इतिहासाचा पाढा वाचण्याचा प्रयत्न झाला, त्यामुळे अनेक सेक्युलर पुरोगामी पत्रकार कार्यकर्ते विचलीत झाले तर नवल नाही. कारण त्यांनी सातत्याने सत्य लपवून ठेवत ज्या खोट्या आभासांना सत्य ठरवण्य़ाची कसरत चालविली होती, तिलाच अशा लिखाणाने तडा जात असते. हे कसे नित्यनेमाने चालू असते, त्याची शेकडो उदाहरणे आहेत. त्यातला एक आक्षेप असा की वैचारिक भूमिका वेगळी आणि एका ऐंशी वर्षाच्या म्हातार्‍याची निर्घृण हत्या वेगळी. खरेच आहे. पण मग अशी हत्या झालेले पानसरे पहिलेच आहेत काय? अशी करूणा इतर म्हातार्‍यांच्या हत्येनंतर पुरोगाम्यांनी कधी व किती दाखवली? ओरिसा राज्यात फ़ादर स्टेन्स नामक धर्मोदेशकाची निर्घृण हत्या दारासिंग नावाच्या हिंदूत्ववादी गुंडाने केली. याचा दिर्घकाळ गवगवा माध्यमातून झाला होता. पण ती ओरीसातली एकमेव हत्या होती?

त्याच ओरीसात त्यानंतर लक्षमणानंद सरस्वती नावाच्या म्हातार्‍याची हत्या झालेली होती. कधी कोणी त्याचा उहापोह माध्यमातून केला होता काय? आज पानसरेंसाठी गळा काढणार्‍यांना फ़ादर स्टेन्सचा खुनी दारासिंग लगेच आठवेल. पण लक्ष्मणानंद नावाच्या म्हातार्‍याचा खुनी आठवणार नाही. कसा आठवेल? त्याच्या बातम्याच द्यायच्या नाही. सव्यसाचि पंडा नावाच्या नक्षलवादी नेत्यावरही त्या हत्येचे अरोप होते. कधी यापैकी कोणा पुरोगाम्याने पंडाचे नाव सांगून गळा काढला? कशाला काढला नाही? त्यावर माध्यमातून उहापोह कशाला झाला नाही? खुनाची प्रवृत्ती हिंदूत्ववादी असते, तशीच मार्क्सवादी व पुरोगामी सुद्धा असते. पण त्यात हिंदूत्ववादी मारला गेला, मग सगळे पुरोगामी मौनीबाबा होऊन जातात. कशाला मौनी होतात? लक्ष्मणानंद म्हातारा नव्हता? रहात्या आश्रमात त्याच्या शरीराची खांडोळी करून त्याला ठार मारण्यात आले, तेव्हा ज्यांच्या तोंडी निषेधाचे चार शब्द उमटले नाहीत, त्यांनी हिंसेच्या विरोधात आरोळ्या ठोकण्यात अर्थ असतो काय? आज त्यांनी म्हातार्‍याच्या हत्येनंतर इतिहास कशाला उगाळता म्हणणे, बदमाशी नसते काय? सगळीकडून बघितल्यास हे लोक पक्के बदमाश असल्याचे पुरावे मिळू शकतात. मग आपली बदमाशी लपवण्यासाठी त्यांना अपवादात्मक उदाहरणे हवी असतात. त्यामुळेच मग पानसरे यांच्यासारख्या प्रामाणिक अहिंसक माणसाच्या हत्येचे भांडवल करायला हे बदमाश लोक हिरीरीने पुढे येतात. त्यांना पानसरेंच्या विचार विवेकाशी अजिबात कर्तव्य नसते. म्हणूनच त्यांनी आपापल्या हाती असलेल्या विविध साधनांचा उपयोग कधीच पानसरे यांच्या विचारांना प्रोत्साहन करण्यासाठी होऊ दिलेला नाही. मारले जाईपर्यंत अशा पुरोगाम्यांनी कितीदा वा कुठे कुठे पानसरे यांच्या पुस्तके व विचारांचा उल्लेख केला होता?

हल्लेखोर व मारेकरी नुसत्या देहाची हत्या करतात, त्यापेक्षा भयंकर हे लोक असतात, जे विचारांची हत्या करतात. पानसरेंच्या बाबतीत असे दिसेल, की आज त्यांच्या विचारांसाठी गळा काढणार्‍यांनी सहसा पानसरेंच्या विचारांना आपले तयार व्यासपीठ कधी उपलब्ध करून दिलेले नव्हते. पानसरे यांचे विचार इतके प्रगल्भ असताना त्यांना किती वाहिन्यांनी देशातल्या विविध घडामोडींसाठी वेळोवेळी आपल्या कार्यक्रमात सहभागी करून घेतले? तसे केले असते, तर पानसरे यांचे प्रगल्भ विचार शेकडो नाही तर लाखो लोकांपर्यंत सहजासहजी पोहोचू शकले असते. कुठल्या छछोर अभिनेत्री वा अभिनेत्याच्या मुलाखतीवर कित्येक तास वा वृत्तपत्राचे रकाने खर्च करणार्‍यांनी पानसरे यांना किती स्पेस दिला होता? फ़ेसबुक वा तत्सम सोशल माध्यमात किती लोकांनी आजवर पानसरे यांच्या विविध मतांवर भूमिकांवर मतप्रदर्शन केले होते? हिंसेसाठी त्यांना लक्ष्मणानंद या वृद्धाच्या हत्येचा राग येत नाही, तर पानसरेंच्य हत्याकांडाची चिड कशाला येईल? त्यांच्यासाठी पानसरेंची हत्या ही एक राजकीय संधी असते. आणि हीच अतिशय संतापजनक हिणकस प्रवॄत्ती आहे. कारण पानसरे यांच्या विचारापेक्षा त्यांना पानसरेंच्या हत्येचे अप्रुप असते. यापैकी कितीजणांनी पानसरेंचे विचार वाचले व त्याचे मनन केले आहे, याचीच शंका आहे. तसे केले असते तर पानसरे इतिहास नव्याने उलगडून सांगत होते हे लक्षात येईल आणि म्हणूनच इतिहासाचे महत्व या बोंबल्यांना उमगले असते. मग त्यांना राजकीय इतिहासातील हिंसाचाराचे स्मरण का महत्वाचे आहे, त्याचाही साक्षात्कार झाला असता. पण त्याची यांना गरजच काय? ज्यांना जिवंत पानसरे यांच्यापेक्षा त्यांच्या हत्येचे भांडवल करायचे असते. त्यांना त्यांच्या विचारांशी कुठले कर्तव्य असणार? त्यांना पानसरे नावाचे हत्यार हवे असते, विचार नकोच असतात.

Saturday, February 28, 2015

पेडन्युजचे गुलाम की विवेकाचे लढवय्ये?



आता त्याला वर्ष होईल. लोकसभेच्या निवडणूका ऐन रंगात आलेल्या होत्या आणि मुंबईतले शेवटचे मतदान व्हायचे होते. दिड दिवस शिल्लक होता आणि मुंबईतला प्रचार थंडावला होता. तेव्हा एका उमेदवाराने सोशल मीडियातून सर्व वर्तमानपत्रे व वाहिन्यांचे आभार मानले होते. कशासाठी त्याने असे आभार मानावेत? तर प्रसिद्धीच्या रणधुमाळीत त्याच्या पक्षाची वा उमेदवारीची कोणीही साधी दखलही घेतलेली नव्हती. त्या पक्षाचा कोणी उमेदवार मुंबईत उभा असल्याच्या चार ओळीही खरडाव्यात, अशी ‘विवेकबुद्धी’ कुणा पत्रकाराला झाली नाही. सगळी माध्यमे केजरीवाल आणि मोदींच्या भोवती घुमत होती. अर्थात त्यात पुन्हा मोदींच्या भोवती कारण हे मोदींचे मार्केटींग असल्याचा त्याच माध्यमांचा आरोप होता. पण तीच माध्यमे आणि तेच पत्रकार तोडीस तोड अशी प्रसिद्धी केजरीवालना कशासाठी देत होते? त्यामागचे मार्केटींग उलगडत नव्हते. कसे उलगडणार? त्यालाच तर पेडन्युज म्हणतात. आता पेडन्युज हा सर्वतोमुखी झालेला शब्द आहे. सेक्युलर म्हणून मिरवणार्‍या विचारस्वातंत्र्यांच्या लढवय्यांसाठी मात्र पेडन्युज हीच विवेकाची लढाई असते. म्हणूनच आज ज्यांनी कोणी वैचारिक संघर्षाचे झेंडे खांद्यावर घेऊन गोविंद पानसरे यांचा उदो उदो चालविला आहे, त्यापैकी कोणी त्यांच्याच पक्षाच्या मुंबईतील एकमेव उमेदवाराला मागल्या वर्षी चार ओळीची प्रसिद्धीही का दिलेली नव्हती? त्याचे नाव कॉम्रेड प्रकाश रेड्डी. कोण हा प्रकाश रेड्डी? तर कॉ. पानसरे यांचे समकालीन जी. एल. रेड्डी व तारा रेड्डी यांचा पुत्र. आजही आपल्या जन्मदात्यांनी खांद्यावर घेतलेला लाल बावटा निष्ठेने लढवणारा मुंबईतला एक हाडाचा कार्यकर्ता. त्यानेही पानसरे यांच्या पक्षाचा व विचारांचा मुंबईतला शिलेदार म्हणून ती लढत एकाकी दिलेली होती. त्याची दखल किती सेक्युलर पत्रकारांनी घेतली? नसेल तर कशाला घेऊ नये?

प्रकाश तेच विचार मांडत होता आणि त्याच विचारसरणीची लढाई लढत होता, ज्यासाठी पानसरे यांनी आपल्या प्राणांची शर्थ केली. मग जे त्या विचारांचा इतका उदो उदो करतात, त्यांना प्रकाशला प्रसिद्धीचा व मदतीचा हात द्यायची बुद्धी तेव्हा कशाला होऊ नये? तर प्रकाशपाशी न्युजचे बिल पेड करण्याची आर्थिक कुवत नव्हती. आणि पेडन्युज देण्याची कुवत नसेल तर त्याच्या विचारांना कोण सेक्युलर माध्यम धुप घालणार? त्यामुळेच प्रकाश व त्याची उमेदवारी त्या निवडणूकीत साफ़ दुर्लक्षित राहिले. समजा त्याच्या प्रचारासाठी तेव्हा गोविंद पानसरे मुंबईत आले असते, तर यापैकी किती सेक्युलर पत्रकारांनी त्यांच्या त्या वैचारिक लढाईत खांद्याला खांदा लावून सोबत केली असती? आज त्यांचा बळी पडल्यावर रकानेच्या रकाने त्यासाठी खर्ची घालणार्‍या अशा पत्रकारांनी, प्रकाशच्या प्रचाराला आलेल्या पाबसरे यांच्या विचार मांडणार्‍या भाषणाच्या चार ओळी तरी प्रसिद्ध केल्या असत्या काय? जे प्रकाशची दखल घ्यायला तयार नव्हते, त्यांनी पानसरेंनी त्याच्यासाठी मांडलेल्या वैचारिक भूमिका वा केलेल्या प्रचाराला तरी कशाला दाद दिली असती? विचारांचे कोणाला काही पडलेले नाही. पण आज त्यापैकी प्रत्येकजण हिरीरीने पानसरे यांच्या बहुमोल वैचारिक योगदानाची किर्तने गातो आहे. त्यातल्या कितीजणांनी पानसरे वाचले वा ऐकले आहेत? ज्या माध्यमे व बाजारू पत्रकारितेची इथे लक्तरे धुतली जात आहेत, तिचेच हे सगळे गुलाम आहेत आणि त्यांना शोषक कसे आपले हुकूमाचे गुलाम करतात, त्याचीही सविस्तर व्याख्या पानसरे यांनी आपल्या पुस्तकात लिहून ठेवली आहे. असे पेडन्युज वा पेडविचारांचे गुलाम हे शोषकांनी शोषितांची दिशाभूल करण्यासाठी कामाला जुंपलेले असतात. तेव्हा आज पानसरेंच्या विवेकी वैचारिक लढाईचा उमाळा आलेले कुठल्या गोत्रातले आहेत, ते लक्षात येऊ शकेल.

अशा सेक्युलर म्हणून मिरवणार्‍या भामट्यांना कॉ. पानसरे, कॉ. प्रकाश वा त्यांच्या पक्ष विचारसरणीशी कुठलेही कर्तव्य नसते. त्यांनी मांडलेल्या बाजारात ग्राहकोपयोगी वस्तू म्हणून विचार व विवेक हा मोसमी माल असतो. जेव्हा त्याला उठाव असतो, तेव्हा त्याची घाऊक आयात केली जाते आणि शोकेसमध्ये त्यांची आकर्षक मांडणी केली जाते. तो माल खपवण्यासाठी त्यांना विचारवंत पानसरे नको असतात, तर हुतात्मा हवा असतो. म्हणून आजवर याच माध्यमांनी कधी पानसरे वा त्यांच्या विचारांसाठी चार रकाने जागा दिली नाही. पण हुतात्मा म्हणून पानसरे यांचे जोरदार मार्केटींग मात्र चालू आहे. त्यांच्या विचारांच्या लढाईची महत्ता असती, तर त्याच विचारांचा झेंडा खांद्यावर घेतलेल्या प्रकाश रेड्डीला चार दिवस साध्या बातमीतून लोकांपर्यंत घेऊन जाण्याचे कर्तव्य अशा पत्रकारांनी पार पाडले नसते का? पण बाजारू मालाचा सेल लावणार्‍यांना वैचारिक गुणवत्तेशी काय घेणेदेणे असणार? तेव्हा केजरीवाल हा बाजारात जोरदार खपणारा ब्रॅन्ड होता आणि तमाम ‘आम्ही सारे पानसरे’ आणि ‘आम्ही सारे दाभोळकर’ केजरीवालच्या भजन किर्तनात मग्न झालेले होते. त्या गदारोळात विचारांसाठी लढणार्‍या प्रकाश रेड्डींचा आवाज कोणाच्या कानावर जायचा? किंबहूना त्याचाच वैचारिक आवाज दाबून टाकण्यासाठी माध्यमांतील बुद्धीमंतांना, शोषकांनी कामाला जुंपलेले असते ना? आज जे विचारवंत बुद्धीमंत आहेत, त्यांना शोषकांनीच कसे गुलाम वा लाचार केलेले असते, तेच तर पानसरे यांनी सांगितलेले आहे. ‘शोषक दुसरी एक चलाखी करतात. जे शोषितांचा विचार मांडतात त्यांनाच शोषक मान्यता देतात. त्यांनाच आपले विचारवंत म्हणून घोषित करतात. याचा परिणाम शोषितांचा संघर्ष कमकुवत करण्यात होतो’ (‘परिवर्तनाच्या दिशा’ पुस्तकातून). यावरूल लक्षात येते, की आज पानसरे यांच्याविषयी असे नक्राश्रू ढाळणारे नेमके कोण आहेत?

विक्रेत्याला आणि दुकानदारांना गुणवत्तेशी वा जनहिताशी कर्तव्य नसते. त्यांची नजर खपणार्‍या मालावर असते. म्हणून आज पानसरेंच्या वैचारिक लढ्याचा उमाळा आलेले तमाम माध्यमकर्मी वा फ़लकबाज यापुर्वी कधी पानसरेंच्या विचारांचे अध्ययन करायला सवड काढू शकले नाहीत. कारण त्यांच्याच भामटेगिरीकडे तर पानसरे सामान्य जनतेचे लक्ष वेधत होते. ज्यांनी शोषितांची व विचारांची लढाई बाजारू करून टाकली, अशाच ढोंगी पाखंडी विचारवंतांकडे पानसरे यांनी कटाक्ष टाकलेला आहे. जो आपल्याकडेच आरोपी म्हणून बोट दाखवतोय, त्याची दखल बदमाश कशाला घेतील? म्हणूनच आजवर पानसरे दुर्लक्षित राहिले आणि त्यांचा बळी पडल्यावर मात्र त्यांच्या हौतात्म्याचा बाजार मांडायला हे शोषकांचे पगारी गुलाम हिरीरीने पुढे आलेले आहेत. अशा बाजारू लोकांना माल खपवण्यासाठी दर्जा नको असतो तर आकर्षक मॉडेल लागते. तसे पानसरे यांचे हौतात्म्य हे मॉडेल आहे. नथूराम हे सुद्धा मॉडेल असते. दातातले-हातावरचे किटाणू ओरडाआरडा करून दाखवले नाहीत, तर लोशन-पेस्टचा माल खपायचा कसा? त्यासाठी आकर्षक मॉडेल आणि आक्रमक जाहिरात लागते. त्यापेक्षा आज पानसरे यांच्या हौतात्म्याचा मांडलेला बाजार किंचितही वेगळा नाही. तो मांडणार्‍यांना पानसरे ही व्यक्ती, त्याच्यावरचा अमानुष हल्ला वा त्यांचे विचार व संघर्ष यांच्याशी कवडीचे कर्तव्य नाही. त्यांचा मतलब त्या हौतात्म्यातून आपला गल्ला-धंदा साधण्याचा आहे. म्हणूनच प्रकाश रेड्डी त्याच विचारांची लढाई लढताना तिकडे जे ढुंकून बघत नाहीत, तेच आज पानसरेंच्या लढाईचे रणशिंग फ़ुंकत धावताना दिसतील. कारण त्यांच्या राजकीय अजेंड्यातले जे प्रतिस्पर्धी आहेत, त्यांना झोडण्यासाठी पानसरेंचे हौतात्म्य हे एक हत्यार म्हणून गवसले आहे. पेडन्युजचे गुलाम कधी वैचारिक लढाई लढत नसतात. ते आयत्या बिळावरचे नागोबा असतात.

Thursday, February 26, 2015

आसाराम भक्तांच्या गोत्रातले समविचारी

   

गेल्या काही दिवसापासून समविचारी कार्यकर्ते व संघटनांनी एकत्र यायला हवे, अशी भाषा पुन्हा ऐकू येऊ लागली आहे. म्हणजे ती नवी भाषा नाही. गेल्या कित्येक वर्षापासून ही भाषा बोलली जाते आहे. पण त्याचा अर्थ ते शब्द बोलणार्‍यांना तरी कितपत समजला आहे, याबद्दल शंका आहे. कारण असे समविचारी एकत्र येऊन करणार काय? ज्यांचे विचारच समान आहेत, त्यांनी आपल्याला मान्य असलेल्या विषयांवर चर्चा कसल्या करायच्या? तर आधीच मान्य असलेल्या गोष्टी व मुद्दे यांच्यावर नंदीबैलाप्रमाणे माना डोलवायच्या. एकाने कोणीतरी काही तरी सांगायचे आणि बाकीच्यांनी निमूट त्याला माना डोलवत त्याचाच पुनरूच्चार केला, म्हणजे समविचारी चिंतन-मंथन पार पडते. त्यात वेगळा विचार येऊ शकत नाही, की वेगळ्या बाजूचाही विचार समोर आणला जाऊ शकत नाही. सहाजिकच व आसपासची परिस्थिती बदलते त्याप्रमाणे जग ओळखण्याची कुवत हे समविचारी विसरून जातात. जितके असे समविचारी सातत्याने भेटत रहातात, तितका त्यांच्या वास्तविक जगाशी संपर्क तुटत जातो आणि ते कल्पनेच्या भ्रामक जगात वावरू लागतात. त्यांचे प्रश्न काल्पनिक व उत्तरेही तितकीच भ्रामक होत जातात. त्याचा परिणाम असा होतो, की वास्तवाचा दणका बसला, मग असे समविचारी भानावर येतात आणि वास्तवाला चाचपडू लागतात. तेव्हा त्यांच्यातला कोणीतरी तो दणकाही काल्पनिक असल्याचे विश्लेषण त्यांच्या पुढे मांडतो आणि त्या नशेत असे समविचारी पुन्हा निद्राधीन होऊन जातात. तसे नसते, तर मागल्या तीनचार दशकात समविचारी संघटना व पक्ष सार्वजनिक जीवनातून इतके संदर्भहीन कशाला झाले असते? पण इतकी दुरावस्था होऊनही यापैकी कोणाला आपल्या कोषातून, बिळातून बाहेर पडून वास्तविक जगाला उघड्या डोळ्यांनी बघायची हिंमत झालेली नाही.

आसाराम किंवा तत्सम बुवाबाजीचे परिणामही दिसत असतात. कोण असतात असे बुवा महाराज? आधी अशा बुवांचा चमत्कार लोकांना ठाऊक नसतो. कुठलाही महाराज-बुवा चमत्कारी असला तरी त्याचा प्राथमिक अनुभव कोणाला आलेला नसतो. म्हणूनच पहिल्या दिवशी हजारो भक्त अनुयायी कुठल्या बुवाच्या नशीबी येत नाहीत. पण जसजसे त्याचे मार्केटींग करणारे भगतगण गोळा होत जातात, तशी त्याच्या भोवतीची गर्दी वाढत जाते आणि त्यात असे मार्केटिंग करणारे आपले हितसंबंध निर्माण करत असतात. गेली दिड वर्षे आसाराम हा बुवा गजाआड जाऊन पडला आहे. त्याला कुठलाही चमत्कार त्यातून बाहेर काढू शकलेला नाही. पण आजही कुठल्या आसाराम भक्ताला जाऊन भेटा, त्याच्या मनातली समजूत वा भक्ती कमी झालेली दिसणार नाही. कशी कमी होईल? त्याचा भक्तगण व गोतावळा शेवटी एक समविचारी घोळका किंवा झुंडच असते ना? त्या झुंडीला स्वत:चा विवेकी विचार करण्याची क्षमता नसतेच. बुवा किंवा त्याच्या हस्तकांनी डोक्यात जे भ्रम जोपासलेले असतात, त्यात मशगुल रहाण्याला असे समविचारी सुरक्षित जागा मानत असतात. त्यातून त्यांना बाहेर काढायचा प्रयास केलात, तर ते तुमच्यावरच गुरगुरू लागतील. कारण त्यांच्या ज्या अंधश्रद्धा वा समजुती असतात, तेच त्यांच्यासाठी अगाध ज्ञान असते. त्याला छेद देणारे कुठलेही वास्तव त्यांच्या समोर आणून उपयोग नसतो. कारण त्यांना वास्तवाशी कर्तव्यच नसते. ते समजूतीच्या जगात सुखी असतात. मग असे भक्तगण आसारामचे असोत किंवा कुणा सेक्युलर बुवाबाबाचे अनुयायी असोत. त्यांना वास्तवाचे भय खुप भेडसावत असते. समजुतीचे भ्रामक जग त्यांच्यासाठी भूतबंगलाच असतो. विवेकबुद्धीशी त्यांचा ३६ चा आकडा असतो. म्हणूनच असे लोक बुद्धीमान म्हणून मिरवत असले, तरी व्यवहारात पक्के अंधश्रद्ध भक्तच असतात.

एक साधी गोष्ट घ्या, कुठला बुवाभगत सांगतो, की अमूक रोग झाला असेल, तर देवाचा कोप झाला आहे. त्याचे भक्तगण जितक्या आंधळेपणाने त्याच्यावर विश्वास ठेवतात, त्यापेक्षा समविचारी पुरोगामी तसूभर वेगळे असू शकतात का? इथे कुठलाही पुरावा समोर नसताना एखाद्या हत्याकांडाला अमूक कोणी जबाबदार असल्याचे समविचारी बुवाने सांगायची खोटी, की तमाम समविचारी भक्त त्याचा शब्द उचलून धरतात. मध्यंतरी दाभोळकर हत्याकांडाचा तपास करण्यासाठी पुण्याचे तात्कालीन पोलिस आयुक्त पोळ यांनी कुणा पराशक्तीच्या माणसाची मदत घेतल्याचा गवगवा झाला. त्याबद्दल दोन जाणत्यांनी मतप्रदर्शन केले होते. त्यात एक खुद्द अंधश्रद्धा निर्मूलन कार्याचे एक नामवंत श्याम मानव यांचा समावेश होता. तर त्यांच्यावरही समविचारी भक्त तुटून पडले होते. दुसरे होते परम संगणक भारतात विकसित करणारे डॉक्टर भटकर. त्यांनी अशी काही पराशक्ती असते आणि तिच्या मदतीने पाश्चात्य देशातही पोलिस गुन्हेतपास करतात, असे विधान केल्यावर तमाम समविचारी भक्त भटकरांवर तुटून पडले होते. पण भटकर सांगतात, त्याचा दाखला नॅशनल जिओग्राफ़िक किंवा डिस्कव्हरी वाहिन्यांवरच्या माहितीपटातून आलेला आहे. तिकडेही कोणी समविचारी भक्त ढुंकून बघायला तयार होता काय? आपला मठाधीश सांगतो, त्यावर अशा लोकांनी आंधळेपणाने विश्वास ठेवून भटकर व श्याम मानव यांनाही धारेवर धरलेच ना? याला समविचारी वा भक्तगणांचे घोळके म्हणतात. समोरचा आपल्यातला नाही वा तसा वाटत नाही म्हटल्यावर त्याच्यावर तुटून पडण्याची झुंडशाही तशीच असते. दुसर्‍या धर्माचा वा जातीचा व विचारांचा असला, की त्याच्यात शत्रू शोधण्याला समविचारी नाव दिले म्हणून त्यातली झुंडशाही संपत नसते की लपत नसते. कारण दोन्हीकडले परिणाम सारखेच असतात.

समविचारी या शब्दातच भिन्न विचारांसाठी दरवाजा बंद करण्याची पुर्वअट सामावलेली असते. आणि नेमके असेच लोक वैचारिक सहिष्णूता व वैचारिक संघर्षाची भाषा बोलतात, तेव्हा म्हणूनच हसू येते. पण हसण्यावारी न्यावी अशी ही बाब सोपी नाही. जेव्हा असा भ्रम प्रभावी व शक्तीशाली होतो, तेव्हा तो अमानुष कृत्येही करू लागतो. म्हणूनच हिटलर, स्टालीन वा चे गव्हेरा आपल्या सहकार्‍यांकडून हिंसक हत्याकांड करून घेऊ शकले. भारतातून इसिसमध्ये सहभागी व्हायला निघालेल्या तरूणांची मानसिकता त्यापेक्षा भिन्न नाही. ते कुणाच्या रक्ताला आसूसलेले नाहीत. आपण इस्लामच्या धार्मिक कर्तव्यासाठी इराकला जावे, असे त्यांना वाटत असेल, तर त्यामागे समविचारी धारणाच असते. शेवट चांगला व उदात्त असल्याने त्यांना हिंसा गैरलागू वाटेनाशी होते. सामान्य घरातली ही मुले भारावली म्हणून त्यात सहभागी व्हायला निघालेली असतात. इस्लामचा जो अर्थ कोणीतरी त्यांच्या डोक्यात भरवलेला असतो, त्यालाच सत्य मानल्यावर अशा तरूणांची विवेकबुद्धी, सारासार विचारशक्ती नेस्तनाबूद होत असते. त्यांना समविचारी कोषात डांबून टाकले, की वास्तविक जगातले संदर्भ जाणवेनासे होतात आणि तिथून मग एखाद्या वस्तुप्रमाणे, हत्याराप्रमाणे त्यांना कुणाच्याही विरोधात वापरता येत असते. समविचारी म्हणवून घेण्यात आपण आपलीच विवेकबुद्धी गमावून बसतोय, याचेही भान त्यांना रहात नाही. समोर दिसणारे वास्तव बघायची हिंमत त्यांच्यात उरत नाही. कोणी दाखवायचा प्रयास केल्यास त्यांना सत्याची भिती वाटू लागते. त्या भितीपोटी सत्यच खोटे असल्याचा आक्रमक आरोप त्यांच्याकडून सुरू होतो. अंधश्रद्धा देवधर्माची असो किंवा समविचारी निष्ठा असोत, ती एकप्रकारची धुंदी असते आणि तिच्याच आहारी गेलेल्या व्यक्तीकडून कुठल्याही विवेकी कृतीची अपेक्षा करता येत नाही.

Wednesday, February 25, 2015

पुरोगामी-प्रतिगामी: एकूण झुंडशाहीच



Bertrand Russell — 'Collective fear stimulates herd instinct, and tends to produce ferocity toward those who are not regarded as members of the herd.'

माणूस हा मुळातच कळपात जगणारा प्राणी आहे. विविध विषयात तसा उल्लेख मुद्दाम केला जातो. माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे, असे म्हणायचा वास्तविक अर्थ काय? समाज म्हणजे तरी काय? इतर प्राणी जसे थव्याने वा कळपाने एकत्र जगतात, तसाच माणुसही कळपात वावरतो. जो भित्रा प्राणी असतो, तोच कळपाने जगतो. माणूस त्याला अपवाद नाही. आपण एकटेच आपले संरक्षण करू शकत नाही आणि समूहशक्तीनेच आपण सुरक्षित राहू शकू, अशा भयापोटी समाज नावाचा कळप माणसाने स्विकारलेला असतो. त्याही कळपात लहानमोठे समूह वा झुंडी असतात. जोवर बाहेरच्या कुठल्या धोक्याचे सावट असते, तोवर अशा समुहांची एकजिवता पक्की असते आणि जेव्हा हा बाहेरचा धोका संपुष्टात येतो, तेव्हा कळपाच्या अंतर्गत समुहातील उपजत हेवेदावे उफ़ाळून येतात. अर्थात अशा लहान समुहातही एकजीवता नसते. त्यातही व्यक्तीगत स्वरूपाचे वाद वितुष्ट असतातच. पण परस्पर गरजेपोटी एकरूपता स्विकारलेली असते. एकूण काय माणुस हा मुळातच झुंडीने जगतो आणि झुंडीसारखाच वागतो. अगदी आपल्या पांढरपेशा चेहर्‍याचे सभ्यपण मिरवणारेही त्यातलेच असतात. त्यामुळेच आधुनिक जगात ज्या काही विचारसरणी तत्वज्ञानाच्या गप्पा चालतात, त्याही झुंडीचे प्रतिक झालेले आहे. विचारांची लढाई शेवटी त्याच झुंडीपर्यंत येऊन थांबते. म्हणूनच झुंडीची मानसिकता समजून घेतली, तर आजच्याही युगातल्या वैचारिक लढाईची ढोंगबाजी उमजू शकेल. जोवर तुमच्यापाशी प्रतिकाराची शक्ती नसते, तोवर विचारांचा ढोल वाजवला जात असतो आणि तितकी हिंसक ताकद गोळा झाली, की वैचारिक झुंडीचे साम्राज्य उदयास येत असते. पण व्यवहारात सगळीकडे झुंडीनेच लोक जगत असतात आणि त्यातले मुठभर आपापल्या हेतू वा भूमिकेसाठी तत्वज्ञानाचे मुखवटे लावत असतात.

कालपरवा कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येनंतर अंत्ययात्रेत जी गर्दी उसळली होती, तिथे लाल झेंड्यासह लाल टोप्यांचा जमावडा दिसत होता. लाल सलामच्या घोषणा दिल्या जात होत्या. दाभोळकर यांच्याही संदर्भात तसेच म्हणता येईल. पण दुसरीकडे शिवसेनेच्या, बजरंगदल वा भाजपाच्या मेळाव्यातही त़सेच चित्र दिसते. सोहळा वा प्रसंग कुठलाही असो, त्यात सहभागी होणार्‍यांना प्रतिकाचे आकर्षण असलेले दिसेल. अगत्याने टोप्या, झेंडे वा ठराविक फ़लक वा वस्त्रेप्रावरणे परिधान केलेली दिसतात. अशी प्रतिके झुंडीसाठी अगत्याची असतात. कारण ती भूमिका वा विचारांचे प्रतिनिधीत्व करत असतातच. पण त्याहीपेक्षा महत्वाची बाब म्हणजे सामान्य व्यक्तीला अतिरीक्त उर्जा देत असतात. अंगी नसलेल्या सामर्थ्य व शक्तीची अनुभूती त्या व्यक्तीला अशा प्रतिकांमधून मिळत असते. एक तगडा गुंड असतो आणि त्याच्या तुलनेत हाडकुळा असलेला पोलिस शिपाई सुद्धा गुर्मीत बोलताना आपल्याला दिसतो. एका ठोश्यात गुंड अशा पोलिसाला झोपवू शकतो. पण त्याच्या अंगातले ते धाडस पोलिसाच्या गणवेशामुळे पांगळे पडत असते. ही प्रतिकांची किमया असते. त्या गणवेशामुळे पोलिस एकटा उरत नाही. त्याच्यामागे संपुर्ण सरकारची ताकद उभी असल्याचे भय गुंडाला गप्प ठेवीत असते. अगदी तीच बाब सार्वजनिक जीवनात बहुतांश प्रतिकांची असते. झुंडीत जगणारा माणूस म्हणूनच अशा प्रतिकांच्या आहारी जातो. त्याच्या अंगभूत नसलेल्या गोष्टी त्याला अशी प्रतिके काही काळापुरती बहाल करीत असतात. संघाच्या शाखेत गणवेशात जाणारा स्वयंसेवक आणि लाल टोपी घालून गर्जणारा कम्युनिस्ट यांची अवस्था वेगळी नसते. त्यांना विचारांपेक्षा ती प्रतिके शक्ती देत असतात. त्याच प्रतिकांच्या स्वरूपात त्यांच्या बुद्धीचे नियंत्रणही होत असते. त्यांना कार्यान्वीतही केले जात असते.

मोदींच्या विषयी काहीही लिहा वा बोला, त्यांचा भक्तगण विनाविलंब तुमच्यावर तुटून पडतो. विविध भिन्न जागी असलेला हा अनुयायी सारखाच व्यक्त होताना दिसेल. भाजपा विरोधकांचीही अवस्था त्यापेक्षा वेगळी आढळणार नाही. पानसरे यांची हत्या झाल्यावर हिंदूत्ववाद्यांच्या विरोधात असलेल्या सर्वच झुंडीतले लोक समान भाषेत सारखीच प्रतिक्रिया देताना आढळले ना? कालपरवा विधानसभेत एकमेकांचे गळे धरणार्‍या शिवसेना भाजपाच्या अनुयायांची इथे एकजीवता दिसून येईल. कारण पुरोगामी व प्रतिगामी असे दोन तट पडले, मग अंतर्गत झुंडी विरघळून एकजीव होऊन जातात. पानसरे यांच्या हत्येनंतर असेच अनेक गट एकसुरात बोलताना दिसतील, इतर प्रसंगी त्यांचे सूर परस्पर विरोधात दिसतील. झुंडीत जगणार्‍यांना स्वयंभूपणे विचार करण्याची मोकळीक नसते. त्यांना प्रसंगानुसार वहावत जावेच लागते. पुरोगामी असले मग हिंदू संघटनांच्या विरोधात काहीही असले, मग एकत्र येऊन बोलावेच लागते. विषय मदर तेरेसाचा असो किंवा बाबरीचा असो. नेमके तेच हिंदू संघटनांच्या बाबतीत आपल्याला बघता येईल. झुंडीत रहायचे तर झुंडीच्या प्रतिकांना व ओळखीला जपावे लागत असते. सहाजिकच कुठल्या झुंडीचे प्रतिनिधीत्व करता, त्यानुसार तुमची भूमिका ठरत असते. तिथे विवेकाला स्थान नसते. पुरोगामी ओळख असलेल्यांवर हल्ला झाला, मग विनाविलंब प्रतिगामी मानल्या गेलेल्यांनीच तो केल्याचा ओरडा सुरू करायचा असतो. तेच प्रतिगामी उलट परिस्थितीत करताना दिसतील. त्यात योग्य अयोग्य असला भेदभाव करायला वाव नसतो. तसा विवेक दाखवायला गेल्यास तात्काळ तुम्ही गद्दार असल्याचा आरोप तुमच्याच झुंडीतले लोक एकमुखाने करू लागतात. किंबहूना त्याचीच भिती असते, म्हणून झुंडीत जगावे लागते. आज विवेकाची भाषा केली आणि उद्या एकटे पडलो तर आपलेच सहकारी मदतीला येणार नाहीत, याची भिती असते ना?

म्हणून तर झुंडीतले लोक एका झुंडीतून दुसर्‍या झुंडीतही जातात आणि मग आपल्याच जुन्या झुंडीवर बेछूट आरोपही करू लागतात. कारण अशा सर्वांना एकटेपणाची असुरक्षितता भेडसावत असते. विचार, धर्म, जात, संघटना वा तत्सम विविध झुंडी म्हणूनच मानवी जीवनाचे यशस्वी नियंत्रण करत असतात. त्यातले काही गट वा झुंडी आपण झुंड नसल्याचे दावेही करतात. विवेकाचे मुखवटेही लावतात. पण वास्तवात तेही झुंडीनेच जगत असतात आणि झुंडीसारखेच वागत असतात. त्यांच्यातला वाद चर्चेने कधीच संपत नाही की निकाली लागत नाही. त्याचा निचरा शेवटी कुठली झुंड अधिक शक्तीशाली असते, त्यानुसारच होत असतो. मग त्याच शक्तीच्या बळावर सत्याचा विजय झाल्याचा डांगोरा पिटला जात असतो. भिन्न विचारांची कत्तल होत असल्याचा दावा करणार्‍या कम्युनिस्टांची जिथे सत्ता आली, त्यांनी कुठल्या दुसर्‍या राजकीय विचार वा तत्वज्ञानाला डोके वर काढू दिले काय? फ़ॅसिस्ट लोकांच्या सत्तेत मतभिन्नतेला स्थान असू शकते काय? भारतातल्या कुठल्या लोकशाही पक्षात नेत्यांच्या विरोधात बोलून वा भूमिका घेऊन पक्षसदस्य रहाणे शक्य आहे? सोमनाथ चॅटर्जी कशाचा बळी होते? विचारांचा की विवेकाचा? तेही झुंडीचाच बळी नव्हते का? शरद पवारांना वेगळी चुल कशाला मांडावी लागली? रा. स्व. संघात त्यापेक्षा वेगळी स्थिती नाही. मग ते फ़ॅसिस्ट आणि बाकीचे लोकशाहीनिष्ठ कसे? सगळ्याच झुंडी असतात. मात्र आपण झुंड आहोत, हे मान्य करायची कोणाची तयारी नसते. हजारो वर्षापुर्वी आपले पुर्वज झुंडी व कळपाने जगले आणि आपणही आज तसेच जगतो. पुर्वजांपेक्षा आजचे आपण अधिक पाखंडी व ढोंगी आहोत इतकेच. बाकी आपल्यात त्यांचेच सारे गुणदोष तसेच ठासून भरलेले आहेत. आजही इतक्या वैज्ञानिक भौतिक प्रगतीनंतर आपण आपल्यातल्या ‘समाजप्रिय’ जनावरावर मात करू शकलेलो नाही. आजही आपण कळपातले जनावरच आहोत.

Tuesday, February 24, 2015

विचारांसाठी माणसांना कोण ठार मारतो?


 (इद्दूकी जिल्ह्याचे मार्क्सवादी चिटणिस मणी)

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर पुन्हा एकदा बिनबुडाच्या आरोपांचा कांगावा सुरू झाला आणि विनाविलंब डझनावारी ‘आम्ही सारे’ म्हणत भोंदू लोक रस्त्यावर आले. अर्थात त्यात आता नवे काही राहिलेले नाही. ताबडतोब खुन्यांना हल्लेखोरांना अटक करायच्या मागण्याही आता नेहमीच्याच झाल्या आहेत. त्यात जणू खुन होताना बघितले आहे, असा आवेश असतो. पण नुसते आरोप करायचे आणि धुरळा उडवायचा. मग ज्याची हत्या झाली त्याच्याविषयीची सहानुभूती जागवून आपल्या राजकीय पोळ्या त्यावर भाजून घेण्याचा उद्योग आता नित्याचा झालेला आहे. त्यात बळी पडलेल्याविषयी किंचितही आत्मियता नसते. त्यापेक्षा अशा दुर्घटनेची इव्हेन्ट करण्या्ची जणू स्पर्धाच चालू होते. पानसरे यांच्या हत्येनंतर त्याला उधाण आले तर नवल नव्हते. कारण ती नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्याकांडानंतरची पुनरावृती होती. खरेच अशा हत्या व हल्ले राजकीय असतात आणि त्यामागे नेमके काही हेतू असतात, याबद्दल शंका नाही. पण कुठल्याही गुन्हा व खुनामागे काहीतरी हेतू असतो. कोणाचा तरी लाभ अशा हत्याकांडामागे असतो. असा कुठला हेतू असु शकतो, त्याचे विवेचन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे केरळातील नेते एम एम मणी यांनी केलेले आहे. त्यावरून तीनच वर्षापुर्वी काहुर माजलेले होते. अर्थात केरळ इथून खुप लांब असल्याने इथले विवेकवादी तेव्हा ढाराढूर झोपा काढत होते. त्यांनी त्याबद्दल चकार शब्द उच्चारला नाही. त्यांचा विवेक झोपेतून जागा होण्यासाठी दाभोळकरांना आपल्या प्राणाची किंमत मोजावी लागली. तरीही अजून यापैकी कोणी मणी नामक मार्क्सवादी नेत्याने केलेले मार्गदर्शन अभ्यासायला तयार दिसत नाही. राजकीय हत्या करण्याचे धोरण व कारस्थान डाव्यांनी कसे पुर्वापार चालविले आहे, त्याचा तपशीलच मणी यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितला होता.

२००८ सालात केरळमध्ये मार्क्सवादी पक्ष सोडून गेलेल्या आणि वेगळा प्रादेशिक पक्ष स्थापन करणार्‍या टी. पी. चंद्रशेखरन या आपल्याच जुन्या सहकार्‍याची डाव्या नेत्यांनी कशी वैचारिक लढाई केली? त्यांनी त्याला ठार मारून संपवले. त्याचे प्रकरण २०१२ मध्ये खुप गाजत होते. डाव्या किंवा पुरोगाम्यांची वैचारिक लढाई कशी असते? त्यांचे काही विचार आहेत आणि तत्वज्ञान आहे. तेच अंतिम असून त्याला मान्यता देण्याखेरीज तुम्हाला गत्यंतर नसते. ते अमान्य करणे किंवा त्याच्या विरोधात लढायला उभे रहाणे, म्हणजे प्राणांची बाजी लावणे होय. चंद्रशेखर हत्याकांडाचे प्रकरण गाजत असताना इद्दूकी जिल्ह्याचे मार्क्सवादी चिटणिस मणी यांनी आपल्या पक्षाने चंद्रशेखर यांची हत्या केलेली नाही, असा निर्वाळा भाषणातून दिला होता. पण तेवढ्यावर न थांबता, तसे असते तर आपला पक्ष खुनाची जबबादारी घ्यायला कचरला नसता अशीही ग्वाही देऊन टाकली. त्याला दुजोरा देण्यासाठी मणी यांनी त्यापुर्वी पक्षाने तीन हत्या कशा पद्धतशीरपणे घडवून आणल्या, त्याचाही तपशील याच भाषणातून दिला. पुरोगाम्यांच्या दुर्दैवाने कोणीतरी त्याचे चित्रण करून ठेवले आणि त्याचा बभ्रा झाला. सहाजिकच तिथल्या विधानसभा व राजकारणात डावे कुठल्या ‘माळेचे’ मणी आहेत त्यावर चर्चा झाली. आपल्या राजकारणात आडव्या येणार्‍यांना आपण कसे खड्यासारखे बाजूला करतो, याची कबुलीच मणी यांनी दिलेली होती. मुद्दा इतकाच, की लेनीन स्टालीन वा चे गव्हेरा यांच्यापर्यंत जाण्याची गरज नाही. नक्षलवाद्यांच्या जंगलातही शिरायचे कारण नाही. लोकशाहीत विचार जोपासण्यासाठी विचार कसे जीवानिशी मारावेत, याचे मार्गदर्शन मार्क्सवादी नेत्याने केलेले आहे. तेव्हा महाराष्ट्रातल्या विवेकवादी परिवर्तनाच्या चळवळीने कुठली अफ़ुची गोळी घेऊन गाढ झोपणे पसंत केले होते?

आज उपोषणे करणारे वा फ़लक मिरवणारे तेव्हा विवेकशून्य होऊन बिळात दडी मारून बसले होते काय? जगातली कम्युनिस्ट चळवळ आणि भारतातली महाराष्ट्रातली कम्युनिस्ट चळवळ वेगळी नाही. सर्वांच्याच विचार धोरणात प्रसंगी हिंसा करण्याचा सारखाच अंतर्भाव आहे. त्यातले काही पानसरे यांच्यासारखे निव्वळ वैचारिक वाद प्रतिवादात रमणारे असतात, तर काही थेट कृती करणारे हिंसकही असतात. म्हणून प्रत्येक कम्युनिस्ट वा पुरोगामी हिंसक हल्लेखोर होत नाही. पण हिंदूत्ववाद्यांना जर सरसकट नियम लावला जाणार असेल, तर कम्युनिस्टांनाही सरसकट तोच नियम लावावा लागेल ना? दोनचार हिंदूत्ववादी हिंसक कृती करतात, म्हणून त्यांची संपुर्ण संघटनाच खुनी ठरवायची असेल, तर दोनचार खुनी कम्युनिस्टांसाठी संपुर्ण चळवळच हल्लेखोर म्हणावी लागेल ना? कारण कुठल्याही विचारांचा अतिरेक व्हायला लागला, मग त्यातून हिंसेचा उदभव होत असतो. आपला तो विचार आणि तोच बाकीच्यांनी निमूट मान्य केला पाहिजे, असा अट्टाहास असहिष्णूतेला जन्माला घालत असतो. त्याची सुरूवात भिन्न विचारांना वा वेगळ्या मतांवर झुंडीने हल्ला करण्यातून होत असते. दाभोळकर-पानसरे यांच्यावरील हल्ल्यानंतर एका संघटना विचारांच्या लोकांवर ज्याप्रकारे आरोप सुरू झाले, तेच मुळात असहिष्णू वृत्तीचे द्योतक आहेत व होते. ते आपल्या विचारांचे नाहीत वा समविचारी नाहीत, म्हणूनच ते हल्लेखोर आहेत असा एकसुरी प्रचार त्यांच्या विरोधातील हिंसेला प्रेरणा देणारा असतो. कारण अशी एकसुरी प्रतिक्रियाच कळपाची वा झुंडीची मानसिकता जोपासत असते. आपले नाहीत वा समविचारी नाहीत, म्हणूनच ते शत्रू आणि आपले शत्रू म्हणूनच त्यांच्यापासून जगाला धोका असल्याचा मानसिक प्रवास आपोआप होत जातो. केरळचे डावे मार्क्सवादी नेते मणी त्यातूनच मग हिंसेचे समर्थन करतात व कृतीही करतात.

सवाल इतकाच आहे, की तसेच असेल तर विवेकाचे व वैचारीक संघर्षाचे नाटक कशाला? प्रतिकार वा प्रतिहल्ल्याची शक्ती नसल्याने मग वैचारिक मुखवटा चढवला जातो. पुढे शक्ती जमा झाली, तर तितकाच हिंसक प्रतिकार करायची इच्छा त्यातून लपत नाही. ‘हम शरमिंदा है, तेरे कातील जिंदा है’ अशा घोषणा विवेकाचे प्रतिक आहेत काय? कातील जिंदा है म्हणून शरम वाटत असेल, तर शरम संपवायचा कुठला मार्ग असतो? तो मार्ग चोखाळण्याची इच्छा त्यातून व्यक्त होत नाही काय? अशा घोषणा कायदा व शिक्षा देण्याचा अधिकार हाती घेण्याची अतीव इच्छा व्यक्त करत नाहीत काय? त्यालाही हरकत नाही. पण मग उगाच संयमाचे वा विवेकाचे नाटक कशाला? कालपरवापर्यंत बंगालमध्ये डाव्यांची सत्ता कशाच्या बळावर होती? आज तीच झुंडशाही ममताच्या गोटात गेल्यावर डाव्यांना विवेक आठवू लागला आहे. पण आता त्यांची सद्दी संपली असून ममताची झुंडशाही मोकाट आहे. तिच्याशी भाजपा झुंज देतो आहे. उद्या तीच झुंडशाही भाजपाच्याही गोटात दाखल होईल आणि मग ममताला विवेकाचे महत्व आठवेल आणि विचारांची लढाई विचारांनी करण्याचे शहाणपण सुचेल. विवेक वगैरे गोष्टी सोयीच्या असतात. जेव्हा आपल्या मनगटात हल्ला करायची शक्ती नसते, तेव्हा विवेकाच्या गप्पा करायच्या आणि रक्त सांडण्याची कुवत आली, मग दुसर्‍यांची मुस्कटदाबी करायची हा सर्वच राजकीय चळवळी व संघटनांचा खाक्या राहिला आहे. तेव्हा कोणीही उगाच वैचारिक संघर्षाच्या गमजा करण्याचे कारण नाही. दाभोळकर पानसरे अशा लोकांच्या संगतीत असले, तरी व्यक्ती म्हणून विवेकी होते. त्यांचा हकनाक बळी गेला ही वस्तुस्थिती आहे. त्याचे भांडवल व इव्हेन्ट करून कोणी किती राजकीय पोळ्या भाजून घ्यायच्या, हा निव्वळ बेशरमपणा होत चालला आहे. तो कुठेतरी थांबवला पाहिजे.