Wednesday, March 12, 2014

हिटलरने केलेले रोगनिदान



आपल्याला काहीही नको. बंगला-गाडी वा सत्तेचा मानमरातब काहीच नको. आपल्याला फ़क्त भ्रष्टाचारमुक्त देश हवा आहे, अशा नि;स्वार्थ भाषेचा अवलंब करून राजकारणात आलेल्या आम आदमी पक्षाच्या टोळीत आता हाणामारीचे प्रसंग येऊ लागले आहेत. इतक्या त्यागी भूमिकेतून राजकारण करायला पुढे आलेल्या जमावात आता लूटमारीनंतर डाकू हिस्सेदारीसाठी एकमेकांच्या जीवावर उठतात, तसे घडताना दिसू लागले आहे. एकामागून एक जुने सदस्य नेत्यांवर आरोप करून बाहेर पडू लागले आहेत. आमच्या पक्षाचे निर्णय बंद खोलीत भिंतीआड होत नाहीत, आमच्याकडे हायकमांड संस्कृती नाही, आमच्या पक्षात श्रेष्ठींच्या मर्जीने कोणाला उमेदवारी दिली जात नाही. अशा सर्व गमजा विस्मृतीत गेल्या असून उमेदवारी मिळण्यासाठी किंवा चुकीच्या लोकांना उमेदवारी दिली गेल्याने गदारोळ सुरू झाला आहे. मात्र त्याचे नेमके विश्लेषण माध्यमातून वा पत्रकारांकडून होऊ शकलेले नाही. काय चालले आहे या नव्या पक्षात? त्याचे उत्तर कित्येक दशकांपुर्वीच एडॉल्फ़ हिटलर नावाच्या ‘विचारवंता’ने देऊन ठेवलेले आहे. ‘कार्यकर्त्यांना चळवळीतून जोवर आर्थिक वा अन्य प्रकारचे लाभ होत नाहीत, तोवरच त्या चळवळीचा आवेश टिकून रहातो, एकदा का अशा प्रकारचे लाभ मि्ळू लागले, की कार्यकर्ते त्या लाभाला चटावतात आणि चळवळीच्या मुळ उद्दीष्टांची त्यांना विस्मृती होते. भावी पिढ्य़ांकडून होणारा सन्मान आणि भविष्यात होणारी किर्ती हेच फ़क्त आपल्या कार्याचे बक्षिस, या भावनेने कार्यकर्ते जोवर चळवळीसाठी खपतात; तोवरच चळवळीच्या कार्यावर त्यांचे लक्ष रहाते. प्राप्त परिस्थितीचा जास्तीत जास्त फ़ायदा उठवायचा या हेतूने प्रेरित झालेल्यांचा ओघ चळवळीकडे सुरू झाला, की चळवळीचे मुळ उद्दीष्ट बाजूला पडू लागले आहे असा अंदाज करायला कोणतीच हरकत नाही.’ (अडॉल्फ़ हिटलर, माईन काम्फ़)

   प्रथमच निवडणूकीच्या रिंगणात उतरून अवघ्या चार महिन्यापुर्वी नेत्रदिपक यश संपादन करणार्‍या आम आदमी पक्षाने भारतीय तरूण पिढीच्या मनात मोठ्या आशा निर्माण केल्या होत्या. पैसा आणि प्रतिष्ठा यांच्या राजकीय भिंतीवर डोके आपटून निराश झालेल्या या तरूण पिढीला केजरीवाल व त्यांच्या नव्या पक्षाच्या यशाने नवा आशेचा किरण दिसला होता. त्यामुळेच भाजपा व कॉग्रेस यांच्यासह प्रस्थापित पक्षांच्या राजकारणाला कंटाळलेला समाज घटकही मोठ्या अपेक्षेने त्या पक्षाकडे बघू लागला होता. पण यश मिळवणे सोपे आणि पचवणे अवघड असते, हेच शेवटी खरे ठरले आहे. यशाचे श्रेय जनतेला देताना त्या यशावर केवळ आपलीच मक्तेदारी असल्याप्रमाणे केजरीवाल आणि त्यांचे निकटवर्ति वागु लागले आणि त्यांची अवस्थाही समाजवादी पक्षातले मुलायम, राजदमधील लालू यांच्यासारखी होऊन गेली. पक्षात चापलुसी हाच निष्ठेचा निकष झाला आणि प्रश्न वा खुलासे विचारणार्‍यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ लागला. दहा वर्षापुर्वी अकस्मात जया प्रदा नामक अभिनेत्री समाजवादी पक्षात सामील झाली आणि तिलाच रामपूरची उमेदवारी दिल्याने जुने निष्ठावंत आझम खान संतापले होते. कालपरवा लालूंनी आपल्या कन्येला उमेदवारी देताना लाथाडले, म्हणून रामकृपाल यादवांना पक्ष सोडावा लागला. त्यापेक्षा आजच्या नव्या आम आदमी पक्षाची अवस्था कितीशी वेगळी आहे? तिथेही तशाच लाथाळ्या सुरू झालेल्या आहेत ना? पासवान यांनी मोदींच्या गोटात दाखल होणे अथवा नामवंतांनी आम आदमी पक्षात दाखल होणे; यात नेमका कुठला गुणात्मक फ़रक असतो? पण त्याच जयाप्रदा किंवा तत्सम लोकांच्या भरतीने समाजवादी पक्ष लयास गेला होता आणि आम आदमी पक्षही आशुतोष सारख्यांच्या भरतीने तिकडेच जाणार आहे.

   कुठलीही चळवळ, आंदोलन किंवा पक्ष संघटना ही नेहमी निष्ठेने, कसलीही अपेक्षा न बाळगता झटणार्‍यांच्या बळावर उभी रहात असते. एकेकाळी भाजपाही तसाच उभा राहिला होता. पण सत्तेच्या मागे धावताना आणि झटपट अधिक जागा जिंकण्यासाठी त्याने ज्या बांडगुळांची भरती केली; त्यातून त्या पक्षाची दुरावस्था होत गेली. हिटलरच्या भाषेत भाजपाच्या लोकप्रियतेचा लाभ उठवण्याच्या हेतूने प्रेरीत झालेल्यांचा ओघ सुरू झाला आणि त्या पक्षाला उतरती कळा लागली. अशी नामवंत माणसे आपल्या नावाचा लाभ द्यायला पक्षात वा संघटनेत येत नसतात, तर त्या संघटनेचे बळ आपल्या लाभासाठी वापरण्यास पुढे आलेले असतात. मीरा सन्याल, आशुतोष किंवा अन्य नावाजलेले लोक ८ डिसेंबरपुर्वी ‘आप’ पक्षाकडे कशाला फ़िरकलेले नव्हते? पासवान यांना मोदींच्या गुजरातमधील विकासाचा साक्षात्कार इतके दिवस कशाला झाला नव्हता? रामकृपाल यांना मोदीसारख्या सामान्य घरातल्या पोराला भाजपात सामाजिक न्याय मिळू शकतो, हे आताच कसे कळाले? नेहमी उमेदवारीसाठी हाणामारी करणार्‍या कॉग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांना आताच वैराग्य कशाला आलेले आहे? त्यांना उमेदवारी कशाला नको आहे? त्यांच्या अशा वागण्याचे विश्लेषण हिटलरने योग्य पद्धतीने केले आहे. कुठल्याही तजेलदार झाडावर जमा होणारी बांडगुळे त्या वृक्षाच्या सुदृढतेचा पुरावा असतो, तर येऊ घातलेल्या रोगाची चाहुल असते. आम आदमी पक्षाला कोवळ्या वयातच अशा आजाराने ग्रासलेले असेल, तर त्याचे भवितव्य साफ़ आहे. त्या पक्षाने व त्याच्या नेत्यांनी आपल्या उद्धीष्टाला तिलांजली दिली, इतकाच त्याचा अर्थ आहे. अर्थात त्यांची भाषा व शब्द तेच असतील. पण त्यातला खरेपणा व सच्चाई कधीच त्यांना सोडून गेली आहे.

जुन्या नाटकाचा नवा प्रयोग



   काही दिवसांपुर्वी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात आपणच बाप आहोत, इथे ‘आप’ची गरज नाही, असे विधान केले होते. त्यावेळी त्यांच्या त्या विधानाचा अर्थ कोणाच्याच लक्षात आलेला नव्हता. बहुधा त्यासाठीच अरविंद केजरीवाल यांनी मुंबई महाराष्ट्राचा दौरा हाती घेतला असावा. दिल्लीहून विमानाने इथे यायचे आणि रिक्षा पकडून रस्त्यावर वाहतुकीचा गोंधळ उडवून द्यायचा. नंतर रेल्वेच्या सामान्य डव्यातून आपल्या हुल्लडबाज जमावासोबत चर्चगेटपर्यंत प्रवास करायचा. त्यातून मुंबईकरांच्या नित्य जीवनात व्यत्यय निर्माण करून धिंगाणा करायचा. पुढे चर्चगेट येथे त्या जमावाने झुंबड करून असलेल्या सुरक्षा यंत्रांची नासधूस करायची. मेटल डिटेक्टर पाडायचे. कायदे धाब्यावर बसवून रोडशो करायचा. ह्या सगळ्या गोष्टी मुंबईला नव्या नाहीत. असे गांधीवादी शांततापुर्ण आंदोलन महाराष्ट्राने गेल्या अर्धशतकात अनेकदा अनुभवले आहे. मुंबईकरांना त्याची सवय जडली आहे. बुधवारी केजरीवाल यांनी केला तो तमाशा जुन्या नाटकाचा नवा प्रयोग म्हणायला हरकत नाही. फ़रक खुप किरकोळ आहे. जुन्या नाट्यप्रयोगात त्याला दंगल, हुल्लड म्हटले जायचे. आज त्या नवा संचातील नाटकाला शांततापुर्ण गांधीवाद म्हणतात. पुर्वी शिवसेनेचा धिंगाणा असे संबोधले जायचे. फ़सगत झाली असेल, तर बिचार्‍या मुंबईकराची. त्याला केजरीवाल यांनी आधीच कल्पना दिली असती, तर त्याने घराबाहेर पडायचे कष्ट घेतलेच नसते. शिवसेनेने मुंबई बंदचा नारा दिला किंवा हुतात्मा चौक भागात मोर्चा काढायची घोषणा दिल्यावर; मुंबईच्या लोकल गाड्या ओस पडायच्या. रस्त्यावरची वहाने कमी व्हायची, आणि फ़ोर्ट भागातले रस्त्यावरचे फ़ेरीवालेही बेपत्ता व्हायचे. त्यासाठीच राज ठाकरे म्हणाले होते, ‘आप’ कशाला हवे? इथे आम्ही बाप आहोत’.

   दिड वर्षापुर्वी असाच एक धिंगाणा मुंबईने पाहिला होता. रझा अकादमी नावाच्या संस्थेने आसाममध्ये झालेल्या दंगल व हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी एक मोर्चा काढला होता. त्यावेळी म्हणजे नेमके सांगायचे तर ११ ऑगस्ट २०१२ रोजी आझाद मैदानावर योजलेल्या त्या निदर्शनात यापेक्षा अधिक गांधीवादाचे प्रदर्शन झाले होते. अनेक गाड्या जाळण्यात आल्या, पत्रकार व महिलांवर हल्ले झाले, बसेसवर दगडफ़ेक करण्यात आली. फ़रक इतकाच, की त्यात सहभागी झालेल्या अथवा संयोजक वा टिकाकारांनी त्याला गांधीवादी आंदोलन असे नाव दिले नव्हते. पण केजरीवाल यांनी परिवर्तनाची ध्वजा खांद्यावर घेतलेली आहे. त्यामुळे आजकाल त्यांनी ज्या विविध शब्दांच्या व्याख्यांचे परिवर्तन चालविले आहे; त्यातच गांधीवादाचीही व्याख्या परिवर्तित केलेली असावी. ज्याअर्थी गांधीजींचे नातू राजमोहन गांधी स्वत:च केजरीवालांमध्ये आपल्या आजोबाचे प्रतिबिंब बघतात, त्याअर्थी मुंबईत जे काही घडले व दिल्लीत भाजपाच्या कार्यालयावर हल्ला झाला; ते गांधीवादाचे नवे स्वरूप असावे. अन्यथा आपल्याला असे चित्र बघायची वेळ कशाला आली असती? रझा अकादमीच्या दंगलखोर कारवायांनी मुंबई चिडलेली असताना राज ठाकरे यांनी निषेधार्थ शांतता मार्च काढायचा पवित्रा घेतलेला होता. त्याला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. तरी मनसेने तो मोर्चा काढलाच आणि त्यात कुठेही दगड फ़ेकला गेला नाही, की हिंसा मोडतोड झालेली नव्व्हती. तरीही कायद्याचा आदेश मोडून मोर्चा काढल्याबद्दल त्यांना गुंड ठरवायला मोठीच स्पर्धा बुद्धीमंतांमध्ये लागलेली होती. गांधीवाद आणि कुठेही दगड पडू नये? दगड फ़ेकला जाऊ नये? आज त्या सर्वांचे आत्मे शांत झाले असतील, अन्यथा केजरीवाल छातीठोकपणे गांधीवादाचा दावा कशाला करू शकले असते.

   राज ठाकरे यांच्या मोर्चाच्या अखेरीस एका पोलिस शिपायाने राजना गुलाबाचे फ़ुल दिले म्हणून त्याला थेट नोकरीतून निलंबित करण्याची कारवाई झालेली होती. त्यावेळी मेधाताई पाटकरांपासून तमाम शांततावादी व गांधीवादी यांनी रा्ज ठाकरे यांचे अभिनंदन का केले नव्हते? कारण त्यांच्या गांधीवादामध्ये शांतता याचा अर्थच बदलला आहे. दगडफ़ेक, मोडतोड, हिंसा हीच या नव्या महात्म्याने आपल्या देशाला दिलेली सर्वात मोठी भेट असावी. मग गंमत याची वाटते की मागल्या कित्येक वर्षात त्याचे आचरण शिवसेना आणि मनसे करीत असतील, तर त्यांनी आजवर आपणच खरे गांधीवादी असा दावा कशाला केला नव्हता? कारण अलिकडल्या काही दिवसात देशाच्या विविध भागामध्ये केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली जो धिंगाणा चालू आहे, त्यांनी प्रत्यक्षात शिवसेनेचे अनुकरणच चालविले आहे. १९६०-७० च्या कालखंडातली शिवसेना ज्यांना ठाऊक असेल; त्यांना आजच्या आम आदमी पक्षाच्या कारवाया बघून त्याच काळाची आठवण आल्याशिवाय रहाणार नाही. कदाचित नव्या युगातल्या किंवा एकविसाव्या शतकातल गांधींचा नवा अवतार केजरीवाल यांच्या रुपाने जन्म घ्यायची व त्याने शांतता शब्दाची व्याख्या बदलण्याची प्रतिक्षा मेधाताई व अन्य लोकांना प्रतिक्षा असावी. अन्यथा त्यांनी कधीच बाळासाहेब ठाकरे यांचे अनुयायीत्व स्विकारले असते. आपल्या साधेपणाचे प्रदर्शन मांडण्यासाठी हे नवे गांधी जे तमाशे करीत आहेत, त्याची दखल सामान्य जनताही घेत आहेच. तीच त्याला पायबंद घातल्याशिवाय रहाणार नाही. एका अर्थी निवडणूकीपुर्वी केजरीवाल यांनी केलेला धिंगाणा उत्तमच म्हणायचा. त्यामुळे मुंबईकर मतदारांना झाडू कशासाठी वापरायचा त्याचा साक्षात्कार झाल्याखेरीज रहाणार नाही. 

Tuesday, March 11, 2014

राजकारणातला शाहरुख

   मागल्या दोनतीन महिन्यात केजरीवाल यांनी अतिशय धुर्तपणे आपल्या खेळी खेळल्या आहेत. त्यांनी पद्धतशीरपणे गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना आपले लक्ष्य केलेले आहे. अगदी मोदी जिथून उभे रहातील, तिथून आपण त्यांच्या विरोधात निवडणूक लढवू अशा गर्जनाही केलेल्या आहेत. त्याचे कारणही स्पष्ट आहे. मोदींच्या विरोधात जितके बोलतील, आरोप करतील आणि लढतील; तितकी त्यांना अधिक प्रसिद्धी मिळणारे हे उघड आहे. केजरीवाल यांना त्याचाच फ़ायदा उठवायचा आहे. एका वृत्तपत्राला मुलाखत देताना अलिकडेच त्यांनी देशात मोदीच्या लोकप्रियतेची लाट आहे, याची कबुली दिलेली होती. म्हणजेच अशा लोकप्रिय नेत्याच्या विरोधात उभे राहून आपण जगभर प्रसिद्धी मिळवू शकतो, पण जिंकू शकत नाही, याचीही त्यांना पक्की खात्री आहे. मग ते बळीचा बकरा व्हायला मोदी विरोधात उमेदवारी करणार काय? अजिबात नाही. केजरीवाल यांना हरवायला मोदी नक्कीच निवडणूक लढवणार नाहीत. जिंकायलाच ते मैदानात उतरणार आहेत. त्यामुळेच पराजय पक्का धरूनच केजरीवाल तिथे मैदानात उतरतील. परंतु त्यातून त्यांना वेगळेच काही साधायचे आहे. कॉग्रेस पक्ष किंवा अन्य सगळेच पक्ष भाजपा वा मोदींच्या विरोधात नुसते तोंडाची वाफ़ दवडतात, पण कोणी मोदींशी दोन हात करायला आखाड्यात उतरत नाहीत. ते धाडस फ़क्त आपल्यातच आहे; हा सिद्धांत केजरीवाल यांना सिद्ध करायचा आहे. त्यातून पुढल्या काळात आपणच मोदी विरोधातले एकमेव लढवय्ये आहोत, हे त्यांना जनमानसात रुजवायचे आहे. त्यासाठी मोदींकडून कुठल्याही मतदारसंघात पराभूत होणे, ही फ़ार मोठी किंमत नाही.

   ‘बाजीगर’ नावाचा एक चित्रपट खुप गाजला होता. त्यातून मग शाहरुख खान सुपरस्टार व्हायची प्रक्रिया सुरू झाली होती. त्यामध्ये काजोल ह्या नायिकेला मोहित करण्यासाठी शाहरूख एक डाव खेळतो. तिचा पिता ज्या कार शर्यतीमध्ये नेहमी जिंकत असतो, त्यात भाग घेऊन शाहरुख आव्हान देतो. शर्यतीत शाहरुख जिंकण्याची शक्यताही असते. पण ऐनवेळी तो मुद्दाम चुका करून काजोलच्या पित्याला शर्यत जिंकू देतो. त्यात काजोल खुश होते. पण तिचाच पिता शाहरुखला विचारतो, हातातोंडाशी आलेला विजय तू गमावलास कशाला? तू ही शर्यत मारू शकत होतास. त्यावर शाहरुखचा प्रसिद्ध डायलॉग आजही अनेकांना आठवत असेल. ‘कुछ जितने के लिये कुछ गवाना पडता है’. साधायचे काय ते नक्की असेल, तर दिसणारा पराभव व्यवहारातला पराभव नसतो. त्या पराभवात भविष्यातले मोठे यशही गृहीत धरलेले असू शकते. इथेही केजरीवाल पराभवाचा जुगार खेळायला उगाच पुढे आलेले नाहीत. देशातल्या सर्व पक्षातले नेते नुसते मोदींच्या विरोधात तोंडपाटिलकी करतात, कोणी त्यांच्याशी थेट दोन हात करायला राजी नाही. कारण या सर्वच पक्षांचे आतून संगनमत आहे, असा सिद्धांत केजरीवाल मांडत असतात. त्याचीच साक्ष त्यांना मोदी विरोधात उभे राहून द्यायची आहे. बाकीचे पक्ष व नेते मात्र त्यातून मोदींना मोठे आव्हान मिळाल्याची गाजरे खात आहेत. पण केजरीवाल यांना मोदींना पराभूत करायचे नसून मोदी विरोधातील सर्व मतप्रवाह आणि मतदारांना आपल्या गोटात ओढायचे आहे. कारण पुढल्या काळातले राजकारण मोदींच्या भोवतीच फ़िरणार आहे आणि त्यात आपणच आघाडीवर आहोत, असे जनमानसात ठसवायचा हा सोपा उपाय व प्रयास आहे. त्याचा सर्वात मोठा फ़टका याच अन्य पक्षांना भविष्यकाळात बसणार आहे.

   एक गोष्ट स्पष्ट आहे. लोक कधीपासून कॉग्रेसला कंटाळलेले आहेत. पण कॉग्रेसला कुठल्याच पक्षाने कधी गंभीरपणे आव्हान उभे केलेले नव्हते. भाजपाने तसा प्रयत्न केला, तरी सत्तेच्या मागे धावताना त्या पक्षाच्या नेत्यांनी त्याची धार गमावली होती. मोदींनी मागल्या दोन वर्षात प्रयत्नपुर्वक ती धार तेज केली. पण दुसरीकडे भाजपा विरोधातल्या विविध पक्षांची नियतही कधीच खरी नव्हती. या पक्षांनी सोयीनुसार सेक्युलर विचारधारा वळवून वाकवून आपापले स्वार्थ साधताना आपली प्रतिष्ठा गमावलेली आहे. त्यामुळे भाजपा विरोधाच्या राजकारणातही पोकळीच आहे. या तमाम कॉग्रेस व भाजपा विरोधी राजकीय पक्षांच्या खेळखंडोबालाही वैतागलेला मोठा समाजघटक आहे, केजरीवाल त्याच घटकाला आपल्या मागे आणायचा मोठा डाव खेळत आहेत. त्यातून त्यांना मोदींच्या विरोधातले राजकारण करण्यापेक्षा मोदीविरोधी राजकारणाची जागा व्यापायची आहे. त्यासाठी खुलेआम मोदी विरोधी निवडणूक लढवून आपणच एकमात्र मोदींचे शत्रू असल्याची ग्वाही अशा समाजघटकाला व मतदाराला देण्याची इतकी उत्तम संधी दुसरी कुठली असेल? मोदी विरोधात पराभूत झाल्याने त्यांची कुठलीही प्रतिष्ठा जाणार नाही, तर राजकीय वजन वाढणार आहे. पण त्यातून मोदींना धक्का बसण्यापेक्षा मोदी विरोधातल्या जुन्याजाणत्या सर्वच प्रस्थापित पक्षात केजरीवाल व त्यांचा आम आदमी पक्ष उठून दिसणार आहे. पर्यायाने कॉग्रेस व भाजपाला एकमेव पर्याय म्हणून पुढल्या काळात राजकारणात उभे ठाकण्याचा पाया घातला जाणार आहे. म्हणजेच मोदींकडून पराभूत होताना बाकीच्या सेक्युलर पक्षांनाही संपवण्याचा खरा डाव केजरीवाल खेळत आहेत. थोडक्यात लढायचे मोदींच्या विरोधात; पण हरवायचे व संपवायचे डाव्या ‘तिसर्‍या’ सेक्युलर पक्षांना, अशी ही अजब खेळी आहे.

Monday, March 10, 2014

खोट्य़ाच्या कपाळी गोटा

   काही वर्षापुर्वी म्हणजे एकदम नेमके सांगायचे, तर मागल्या विधानसभा निवडणूकीपुर्वी महाराष्ट्राचे मुख्यामंत्री अशोक चव्हाण होते. तेव्हाची गोष्ट आहे. त्याहीवेळी महाराष्ट्र कॉग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरेच होते आणि आजही आहेत. त्यावेळी कॉग्रेसतर्फ़े एक झेंडामार्च नावाचा मोठा मोर्चा काढला जाणार होता. त्याची माहिती देण्यासाठी एक पत्रकार परिषद घेण्यात आलेली होती. माणिकराव आणि सतीश चतुर्वेदी नावाचे विदर्भातील कॉग्रेस नेते त्यात पत्रकारांना माहिती देत होते. पत्रकार परिषद संपली आणि कॅमेरे बंद झाले. म्हणजेच समोरच्या टेबलावर असलेले माईकही बंद झाले, अशा समजूतीमध्ये उपरोक्त दोन्ही नेते आपसात काही खाजगी गप्पा मारू लागले. तेव्हा त्यांच्या पोटातली खरी मळमळ बाहेर येत होती. मात्र त्यापैकी एक कॅमेरा चालूच राहिला होता आणि सोबतच समोरच्या टेबलवरचा माईकही चालू होता. सहाजिकच बोलले गेलेले, खाजगी शब्द व बोलणारे चेहरे टिपले त्यात गेले होते. आज कोणा पत्रकाराला त्याची आठवणही राहिलेली नाही. तो संवाद असा होता, की पक्षाच्या कार्यासाठी व कार्यक्रमासाठी सत्तेतले पक्षाचे मंत्री पैसे जमवत नाहीत. सतीश चतुर्वेदी अशी तक्रार करीत होते. त्यावर प्रदेशाध्यक्ष माणिकरावांचा खुलासा असा होता, की मुख्यमंत्री पैसे गोळा करतात, पण देण्य़ाची नियत नाही. झालेले चित्रण त्या कॅमेरामनच्या नंतर लक्षात आले आणि ती तेव्हाची मोठी खळबळजनक बातमी झालेली होती. मात्र दोनतीन दिवसात ती बातमी काळाच्या पडद्याआड गायब झाली. पुढल्या काळात त्याचा उल्लेख कोणी केला नाही, की होत नाही. मात्र आजही भाजपाचे माजी अध्यक्ष बंगारू लक्ष्मण यांनी लाखभर रुपये रोख घेतल्याचा पंधरा वर्षे जुन्या चोरट्या चित्रणाचा उल्लेख अगत्याने होत असतो.

   असो, ही झाली देशातल्या दोन प्रमुख मोठ्या व सर्वात भ्रष्ट राजकीय पक्षांची कहाणी. त्याना व त्यांनीच चालविलेल्या भ्रष्टाचारापासून देशाला मुक्ती देण्यासाठी पत्रकार व माध्यमे मागल्या कित्येक वर्षापासून अहोरात्र झटत आहेत. आता त्यांच्या मदतीला इश्वरानेच एक महान प्रेषित धाडला आहे, अरविंद केजरीवाल असे त्याचे नाव आहे. म्हणूनच माध्यमे व पत्रकारांनी मागल्या तीन महिन्यात त्याचा विश्वशुद्धीचा ‘नवा धर्म’ जगाच्या पाठीवर सर्वत्र पसरवून मानवजातीला पुण्यवंत बनवण्याचा विडाच उचलला आहे. त्यासाठी तर मागल्या तीन महिन्यात वाहिन्यांसह माध्यमातील अर्ध्याहून अधिक जागा आणि वेळ केजरीवाल यांना अर्पण केलेली आहे. अशा या पवित्र पुण्यवान कर्तव्यापासून ‘पुण्यप्रसून’ नावाचा माणूस मागे कसा राहू शकेल? तो माणूस अनेक वाहिन्यांमधून वहावत पुन्हा ‘आजतक’ नावाच्या सबसे तेज वाहिनीमध्ये पुन्हा येऊन पोहोचला आहे. त्यानेही केजरीवाल नामक प्रेषिताची खास मुलाखत घेऊन भारतीयांना पापमुक्त करण्याचे आपले कर्तव्य पार पाडले. त्याचे दुर्दैव इतकेच, की त्याचे हे पुण्यकर्म संपल्यावरही मानवी संवेदनशीलता अजिबात नसलेला कॅमेरा चालूच राहिला आणि त्यात प्रेषित केजरीवाल व त्यांचा नवाकोरा भक्त पुण्यप्रसून खाजगीत काय संवाद साधत होते, त्याचेही चित्रण व मुद्रण होऊन गेले. त्यात दोघेही प्रेक्षक व जनमानसावर मुलाखतीचा परिणाम साधण्यासाठी कोणता भाग ठळकपणे दाखवावा आणि कितीवेळा त्याची पुनरुक्ती करावी, यावर कुजबुज करताना टिपले गेले आहेत. हे चित्रण अर्थात त्या दोघांना अंधारात ठेवून कॅमेरामन किंवा अन्य कुणीकरी बाजूला काढून ठेवले होते. आता त्याचे प्रसार ‘युट्युब’ या इंटरनेट संकेतस्थळावर करण्यात आल्याने, ती कुजबुज लक्षावधी लोकांपर्यंत जाऊन पोहोचली आहे.

   इथे एक मजेची गोष्ट लक्षात घ्यायला हवी, माध्यमातले जाणकार व पत्रकार नेहमी पावित्र्य त्यांच्याच घरात धुणीभांडी करते, अशा थाटात बोलत असतात आणि त्यासाठी जगातल्या पापाच्या कहाण्य़ा शोधून सादर करीत असतात. सहजगत्या चित्रण-मुद्रण उपलब्ध नसेल तर चोरटे छुपे कॅमेरे लावून पापकर्म्यांना जाळ्यात पकडत असतात. त्यांना आयतेच असे चित्रण मिळाल्यावर त्यांनी त्याविषयी मौनव्रत कशाला धारण करावे? सबसे तेज असलेल्या ‘आजतक’ वाहिनीच्याच कॅमेराने हे चित्रण झाले, हे वेगळे सांगायला नको. मग त्याच वाहिनीने ते चित्रण कशाला आजवर दडपून ठेवले आहे? युट्युब किंवा फ़ेसबुक ट्विटर अशा जागी असलेल्या अनेक धमाल गोष्टी अगत्याने वाहिन्यांवर दाखवल्या जात असतात. मग त्यापैकी कुठल्याच वाहिनीने हे पुण्य‘प्रसव’ आजवर कशाला आपल्या प्रेक्षकाला सादर केलेले नाही? केजरीवाल नावाचा नवा जगाचा उद्धारक कसा माध्यमे व पत्रकारांनी मागल्या तीन महिन्यात लोकांच्या गळी मारला आहे आणि त्यामागे कशी बाजारू मनोवृत्ती आहे; त्याचा हा सज्जड पुरावाच आहे. पण त्याबद्दल कुठला पत्रकार बोलायला राजी नाही. एकूणच केजरीवाल व त्यांचा दिल्लीत किरकोळ यश मिळवणारा आम आदमी पक्ष राष्ट्रीय राजकीय पर्याय म्हणून पुढे आणायचे मार्केटींग करण्याचा कावा राबवण्यात आला त्याचा हा जिवंत पुरावा आहे. एका बाजूला केजरीवाल मोदी वा कॉग्रेस व मुकेश अंबानींनी माध्यमे विकत घेतल्याचा आरोप करीत असतात. पण त्यात बसलेल्या पत्रकारांना केजरीवाल यांनी विकत तरी घेतले आहे किंवा बहुतांश पत्रकार केजरीवाल यांच्या पक्ष व चळवळीचे छुपे हस्तकच असल्याची ही साक्ष आहे. इमानदारीने बेईमानी कशी करावी त्याचा हा सर्वोत्तम वर्गपाठच म्हणता येईल. खोट्याच्या कपाळी गोटा म्हणतात त्यातला प्रकार.
http://timesofindia.indiatimes.com/india/Arvind-Kejriwal-asks-TV-anchor-to-play-up-sections-of-his-interview/articleshow/31770863.cms

https://www.youtube.com/watch?v=yRGNTXDO7dI

Sunday, March 9, 2014

दक्षिणेतील उलथापालथ

  नरेंद्र मोदी यांना भाजपाने पंतप्रधान पदाचा उमेदवार केल्यास एनडीएमध्ये असलेल्या मित्रपक्षांना मान्य होणार नाही आणि नवा कुणी पक्ष भाजपाच्या गोटात येणार नाही, असा बागुलबुवा वर्षभरापुर्वी चालू होता. त्यानंतर आठ महिन्यापुर्वी मोदींच्या नावाची घोषणा झाल्यावर आधी अडवाणी रुसून बसले आणि त्याआधीच नितीश एनडीए सोडून गेले होते. थोडक्यात राजकीय विश्लेषकांचे भविष्य खरे ठरल्याचा डंका पिटला जात होता. त्याचे खरे कारण मागल्या दहा वर्षात भाजपाचे श्रेष्ठी आपली डोकी गहाण टाकून टिव्हीच्या चर्चेनुसार पक्षाच्या धोरणाचे निर्णय घेऊ लागले होते. तिथेच भाजपा भरकटत गेला होता. पण मोदींचे नाव जाहिर झाल्यानंतर सहा महिन्यातच राजकारणाची दिशा व दशा बदलत गेली आहे. कॉग्रेसच्या आघाडीला मित्रपक्ष सोडून जाऊ लागले आणि भाजपाच्या गोटात नवनव्या पक्षांची आवक सुरू झाली. गेल्याच आठवड्यात अकस्मात रामविलास पासवान यांनी मोदींसोबत व्यासपीठावर हजेरी लावली. जितक्या वेगाने ही घटना घडली, त्याकडे बघता मोदी व त्यांच्या सवंगड्यांनी अनेक चाली अतिशय धुर्तपणे व गोपनीयतेने खेळलेल्या आहेत. त्यांच्याकडून होणार्‍या हालचालींकडे योग्यवेळ येईपर्यंत माध्यमांचेही लक्ष जाऊ नये, याची पुरती काळजी घेतली जाते असेच त्यातून स्पष्ट होते. एका बाजूला सर्वांना गाफ़ील ठेवून आपल्या मित्रांची संख्या वाढवणे आणि दुसरीकडे गाफ़ील प्रतिस्पर्ध्यांच्या गोटात धमाका घडवणे; अशा दुहेरी चाली खेळल्या जाताना दिसतात. पासवान यांना आपल्या गोटात आणताना लालू व कॉग्रेसला पुरते गाफ़ील ठेवले गेले आणि आता दक्षीणेतील हालचाली डाव्यांना बेसावध ठेवणार्‍या वाटतात. तामिळनाडूमध्ये अशीच मोठी राजकीय उलथापालथ होऊ घातली आहे.

   तामिळनाडूचे राजकारण गेल्या अर्धशतकात दोन द्रविडी पक्षांमध्ये विभागले गेलेले आहे. त्यात पडायचे तर राष्ट्रीय पक्षांना त्यापैकी एका द्रविडी पक्षासोबत हातमिळवणी करावी लागते. पण आता त्यात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता दिसते आहे. दोनतीन दशकात जयललिता विरुद्ध करूणनिधी अशीच लढत ठरलेली होती. पण मागल्या विधानसभा निवडणूकीपासून त्यात तिसर्‍या नेत्याने आपला ठसा उमटवला आहे. आधी नवा पक्ष काढून त्याने विधानसभा निवडणूकीत राज्यभर आपली असलेली ताकद दाखवली. त्याच्या मतविभागणीनेच करूणानिधींना लोकसभा निवडणूकीत यश मिळाले होते. त्याचाच फ़टका जयललितांना बसला. त्यामुळेच मागल्या विधानसभा निवडणूकीत जयललितांनी त्या नव्या पक्षाला सोबत घेऊन करुणानिधींवर मात केली. आपल्यामुळेच अण्णा द्रमुक इतके यश मिळवू शकल्या हे ओळखत असूनही, त्या धुर्त नेत्याने सत्तेत सहभागी होण्यापेक्षा विरोधात बसणे पसंत केले आणि तामिळनाडूतील विरोधी नेता म्हणून कामगिरी पार पाडली. आता करूणानिधींच्या पराभूत पक्षालाही दोन भावाच्या पक्षाला पुरते ग्रासलेले आहे. म्हणजेच द्रमुक आणखीच विकलांग झाला आहे. यावेळी त्याच नव्या पक्षाला सोबत घेऊन जयललितावर बाजी उलटवण्य़ाचा डाव करूणानिधी खेळायला बघत होते. पण त्यांना दाद न देता त्याच नव्या पक्षाच्या नेत्याने थेट भाजपाशी युती करण्य़ाचा धुर्त डाव खेळला आहे. त्याचे नाव विजयकांत आणि पक्षाचे नाव डीएमडीके असे आहे. त्याने भाजपा, एमडीएमके आणि पीएमके अशा पक्षांसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. बाकीचे दोन पक्ष लहान आहेत. त्यामुळेच आघाडीत भाजपा व डीएमडीके मोठे ठरतात. तोच मोठा जुगार आहे.

   आजघडीला तरी भाजपाला तामिळनाडू काबीज करण्याची घाई नाही आणि विजयकांत यांना देशव्यापी महत्वाकांक्षा नाही. म्हणूनच दोघांच्या हितसंबंधांना एकत्र येण्याने कुठली बाधा होत नाही. त्यामुळे अशी आघाडी केल्यास त्यांची मते द्रमुकशी तुल्यबळ होतात आणि अण्णा द्रमुकशी झुंज देण्याइतकी प्रभावी ठरू शकतात. त्याचा लाभ जितका विजयकांत यांना आपला राज्यव्यापी प्रभाव दाखवायला होतो, तितकाच आज भाजपाला लोकसभेत हाताच्या बोटावर मोजता येतील, इतक्या जागा वाढवायला होतो. भाजपाला आपल्याकडे तामिळ प्रतिनिधीत्व दाखवायची सोय होते, तर दोन्ही प्रमुख पक्षांना सोडूनही तामिळी राजकारण चालवता येते; असे विजयकांत सिद्ध करू शकतात. त्यासाठी गरजवंत भाजपाचा लाभ त्यांना उठवता येतो. एकदा दोन्ही द्रविडी मोठ्या पक्षांना वगळून लक्षणीय यश विजयकांत संपादन करू शकले, तर त्यांची गणना जयललिता व करूणानिधी यांच्याशी होऊ शकते आणि उतारवयात गेलेल्या करुणानिधींची जागा विजयकांत व्यापू शकतात. दुसरीकडे जयललितापेक्षा हा नेता तरूण आहे. म्हणजेच आज करूणानिधींना तिसर्‍या क्रमांकावर ढकलून थेट जयललिताला आव्हान म्हणून पुढल्या राजकारणात उभे रहाण्याची तयारी विजयकांत करीत आहेत. त्यासाठी त्यांना भाजपसह मोदींच्या आजच्या लोकप्रिय प्रतिमेचाही वापर करून घेता येणार आहे. म्हणूनच या आघाडीत विजयकात व मोदी असा दोघांचा फ़ायदा आहे. पण त्यांनी आपला हा हेतू साध्य केला, तर ती द्रविडी राजकारणातील तीन दशकानंतरची मोठीच उलथापालथ असेल. करूणानिधी व एमजीआर यांच्या धुमश्चक्रीत कॉग्रेस संपली. तसेच अशा डावपेचात द्रमुकच लयास जाण्याची शक्यता आहे. पण त्यातून नव्याने भाजपा हा राष्ट्रीय पक्ष तामिळनाडूत आपले पाय रोवून उभा रहाण्याचीही शक्यता आहे.

Friday, March 7, 2014

सेक्युलर पांडवांची कथा


   याच आठवड्यात आयबीएन नेटवर्कने मतचाचणी घेतली होती. वास्तविक मागल्या आठवड्यात एका वाहिनीने चाचण्या घेणारे किती गडबड करतात, त्याचा छुप्या कॅमेराने पर्दाफ़ाश केला होता. त्यामुळेच अशा चाचण्यांविषयी मनात शंका निर्माण केलेल्या आहेत. पण त्या चाचण्याची विश्वासार्हता इथे महत्वाची नाही. या नेटवर्कने आपल्या विविध वाहिन्यांवर त्या चाचणीत विविध पक्षांना मिळू शकणारी मते व जागा यांचे अंदाज व्यक्त करून चर्चा केलेली होती. त्यात राजकीय पक्षांच्या नेत्यांना प्रवक्त्यांना बाजूला ठेवून जाणकार राजकीय अभ्यासक व विश्लेषकांना समाविष्ट करून घेतले होते. म्हणूनच चाचण्य़ा व एकूण राजकीय विश्लेषण विचार करायला लावणारे आहे. या चर्चेमध्ये भाग घेणारे बहुताश पत्रकार शेवटी आपापल्या राजकीय बांधिलकीचे असतात. त्यांचे कुठल्या पक्षाशी थेट संबंध असले नसले, तरी काही प्रमाणात त्यांच्या वैचारिक निष्ठा त्यांचे मत प्रभावित करीत असतात. मग त्यातला कोणी सेक्युलर डाव्या विचारांचा असतो, तर कोणी उजव्या विचारांचा असतो. क्वचितच त्यातला कोणी तटस्थपणे आपले मतप्रदर्शन करीत असतो. ‘द हिंदू’ या दक्षिणेतील प्रख्यात इंग्रजी दैनिकाचे सहयोगी संपादक पी. साईनाथ हे असेच तटस्थ पत्रकार आहेत. म्हणूनच त्यांच्यावर मग बांधिलकी मानणारे पत्रकार आपापल्या सोयीनुसार पक्षपाताचाही आरोप करीत असतात. पण त्याला महत्व नाही. परवा मतचाचणीच्या चर्चेत त्यांचाही सहभाग होता आणि सेक्युलर बाबतीत त्यांनी व्यक्त केलेले मत किंवा केलेला गौप्यस्फ़ोट मोलाचा ठरावा. आपल्या तमाम राजकीय चर्चेत सेक्युलर व जातीय अशी एक विभागणी दाखवली जाते. ती किती भ्रामक व फ़सवी आहे, त्यावरच साईनाथ यांनी नेमके बोट ठेवले.

   कुठल्याही मतचाचण्य़ा दाखवल्यानंतर वाहिन्यांवरच्या विद्वानांची चर्चा आपोआप सरकार कोण बनवू शकतो तिकडे वळते. त्यांनी काढलेले आकडे किंवा गेल्या सात लोकसभा निवडणूकीचे निकाल, कुठल्याही एका पक्षाला स्पष्ट बहूमत देणारे नव्हते. इतकेच कशाला प्रत्येक निवडणूकीत कुठल्या एकाही निवडणूकपूर्व आघाडीलाही बहूमत मिळालेले नव्हते. त्यामुळेच मग चाचणीमध्ये तशीच स्थिती दिसली, तर कोण सरकार बनवू शकतो, तिकडे चर्चेचा रोख वळतो. त्यात मग पक्षांचे निवडून येणारे सदस्य कुठल्या गोटात जाऊन बसले, मग बहुमताचा पल्ला गाठला जातो, त्याची समिकरणे मांडली जातात. किंबहूना असा गणिते मांडण्याचाच खेळ सुरू होतो. त्यासाठी मग भाजपा जातीय व कॉग्रेस सेक्युलर अशी विभागणी सुरू होते. त्यात सेक्युलर मानले जाणारे पक्ष कॉग्रेस वा तिसर्‍या आघाडीत जातील काय आणि नसतील तर का जाणार नाहीत; त्याची मिमांसा होते. पुढे त्यापैकी उघड सेक्युलर पोपटपंची करणारे पण नंतर ‘जातीय’ भाजपाकडे जाऊ शकणारे पक्ष, अशीही शोधाशोध सुरू होते. मग असे नेहमी सेक्युलर गटात असणारे पक्ष निकालानंतर जातीय गटाकडे कसे जाऊ शकतात, याचीही मिमांसा होते. आजवर असे अनेकदा झालेले आहे. वाजपेयींच्या भाजपा सरकारमध्ये आजकालचे अनेक सेक्युलर पक्ष व नेते सहभागी होतेच. मग त्यापैकी कोण मोदींच्या बाजूला जातील, असा हिशोब सुरू होतो. मग अमुक पक्ष जाईल, तमूक नेता जाणारच नाही, याची हमी देणारे विश्लेषक कमी नाहीत. पण वैचारिक व तात्विक भूमिका इतक्या झटपट कशामुळे बदलतात? जातीयवादी मोदी वा भाजपा रातोरात सेक्युलर कशामुळे होऊ शकतात? साईनाथ यांनी नेमका तोच गौप्यस्फ़ोट केलेला आहे.

   साईनाथ म्हणाले, भाजपा व मोदींच्या सोबत जाण्याविषयी त्यांची आंध्रातील दोन पक्षांच्या नेत्यांशी चर्चा झाली. तेलंगणा राज्य समिती आणि जगन रेड्डी यांच्या पक्षांचे नेते जातीयवादी मोदींसोबत जाणारच नाही, याची छातीठोक हमी देत होते. कुठल्याही परिस्थितीत भाजपा वा मोदीच्या गोटात जाण्याचा विषय येत नाही, असे त्या दोन्ही सेक्युलर पक्षांचे ठाम मत होते. त्यानंतर साईनाथ यांनी त्यांना निकालानंतर काय होऊ शकते, असेही विचारले. प्रश्न असा होता की मोदी व भाजपा यांनी दोनशे सव्वा दोनशेहून अधिक जागा मिळवल्या तर काय होईल? त्यावर त्या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी दिलेले उत्तर अतिशय बोलके व आजच्या राजकारणाचे व्यवच्छेदक लक्षण आहे. ह्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे असे पडले, की लोक्सभेच्या दोनशेहून अधिक जागा मिळवणारा आपोआप सेक्युलर होऊन जातो. याचा स्पष्ट आणि व्यवहारी अर्थ असा आहे, की सेक्युलर नावाची कुठली विचारधारा किंवा भुमिका नसून निवडणूक निकाल व त्यातल्या आकड्यांवर सेक्युलर असण्या नसण्याची व्याख्या ठरत असते. म्हणूनच वाजपेयींच्या काळात १८० जागा भाजपाने मिळवताच आधीच्या सेक्युलर आघाडीतले चंद्राबाबू नायडू भाजपाच्या आघाडीत सहभागी झाले. वर्षभरात झालेल्या पुढल्या मध्यावधी निवडणूकीपुर्वीच देवेगौडांच्या जनता दलाला रामराम ठोकून शरद यादव आणि पासवानही जॉर्ज-नितीश यांच्या गोटातून भाजपाजवळ आले. सेक्युलर भूमिका व व्याख्या अशी निवडणूक कोण जिंकणार अथवा कोण सत्ता मिळवणार, त्यानुसार बदलत असते. आजच्या महाभारतीय राजकारणात जिंकण्यासाठी पांडव असावे लागत नाही, तर जिंकण्याच्या आधी सगळेच कौरव असतात, लढाई जिंकणारा पांडव असतो. सेक्युलर पांडव कोण, ते निश्चित करण्यासाठीच तर निवडणूकीचे महाभारत होत असते ना?

Wednesday, March 5, 2014

निर्भया नशीबवान म्हणायची



  सव्वा वर्षापुर्वीची दिल्लीतली निर्भया कोणाला आठवते काय? काय होती तिची कहाणी? अंधारल्यानंतर वाहन मिळण्याची प्रतिक्षा करीत असलेल्या निर्भयाला एका बसमध्ये घेतले गेले. तिथे मग तिच्यावर सामुहिक बलात्कार झाला होता. तिने तो निमूटपणे सहन केला असता, तर त्याला शांततापुर्ण प्रतिसाद असे कोणी म्हटले असते काय? निर्भयाने तिच्यावर चालून आलेल्या प्रत्येक गुंडाला शुद्ध असेपर्यंत झुंजार प्रतिसाद दिला. त्यामुळेचा तिचा जीव घेण्यापर्यंत त्यांची मजल गेली. या प्रतिकारात तिच्याकडूनही हे बलात्कारी जखमी झालेच. कुणाला तिची नखे लागली असतील, कुणाला ती चावल्याने तिचे दात लागून त्यापैकी कोणी रक्तबंबाळ झालेला असेल. त्यांनी निर्भयाला मग मरण्यासाठी रस्त्यावर फ़ेकून दिले. हे प्रकरण चव्हाट्यावर आले, तेव्हा बलात्कार्‍यांना शोधून काढण्यात आले. त्यांच्यावर गुन्हे दाखल करून खटला भरण्यात आला. त्याचा आता निकालही आलेला आहे. पण या सगळ्या गडबडीत कोणाला त्या जखमी बलात्कार्‍यांच्या जखमांची तरी आठवण राहिली काय? त्यांचे वागणे अत्यंत शांततापुर्ण नितीमत्तेचे प्रदर्शन होते, असा दावा कोणी केला होता काय? उलट त्याच काळात काही लोकांनी त्या मुलीने अवेळी घराबाहेर पडायला नको होते, किंवा तिने जीव वाचवण्यासाठी बलात्कार्‍यांचा प्रतिकार करायला नको होता, किंवा त्यांच्याशी निमूट सहकार्य करायला हवे होते; अशीही मुक्ताफ़ळे उधळली होती. अशा प्रतिक्रिया वा मतांबद्दल माध्यमांनी झोड उठवलेली आपल्याला आठवते ना? हल्ला वा बलात्काराच्या विरोधात मुलींनी प्रतिकार करण्याला कोणी गुन्हा ठरवलेले आपण आजवर कधी ऐकले आहे काय? पण केजरीवाल आणि आम आदमी पक्षाच्या नेत्यांचे तर्कशास्त्र मानायचे तर निर्भयाच्याही विरोधात गुन्हा दाखल व्हायला हवा होता.

   जो हल्ला करतो व त्याला होणार्‍या प्रतिकारात त्याला जखमा झाल्या, तर प्रतिकार करणार्‍यावरही गुन्हा दाखल व्हायला हवा; असाच आपनेते शाझिया इल्मी व आशुतोष यांचा दावा आहे. बुधवारी दिल्लीतील भाजपाच्या मुख्यालयावर आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा जमाव चाल करून गेला. अर्थात तोच जमाव मनसे किंवा शिवसेनेचा असता तर याच दिल्लीतल्या पत्रकारांनी त्या त्या पक्षाचे गुंड; अशीच त्याची संभावना केली असती. पण गुंड आम आदमी पक्षाचे असल्याने त्यांना कार्यकर्ते संबोधले जाते. अशा या गुंड कार्यकर्त्यांनी भाजपाच्या मुख्यालयावर हल्ला केला. तिथे लावलेली मोठमोठी पोस्टर्स पाडली, दरवाजे बंद असताना त्यावर चढून कार्यालयात घुसण्याचा प्रयास केला. भाजपा कार्यकर्ते व पोलिसांनी त्यात हस्तक्षेप केल्यामुळे आपवाल्यांचा मुखभंग झाला. त्यांना मार खावा लागला. भाजपावाल्यांना आपल्याच कार्यालयाचा बचाव करण्याचेही स्वातंत्र्य नसते का? त्यांनी आपवाल्यांना कार्यालयात घुसून मोडतोड आणि जाळपोळ करायला प्रतिबंध करणे, म्हणजे गुन्हाच होता. तो प्रतिकार केल्याने आपवाल्यांना जखमा झाल्या, तर त्या जखमा करणार्‍यांवर गुन्हे दाखल करायला नकोत काय? म्हणजे तशी हल्लेखोर जमाव घेऊन जाणार्‍या आशुतोष व शाझियाची मागणी आहे. तसे पोलिस करीत नाहीत, म्हणजेच आम आदमी पक्षावरचा अत्याचार असतो, असे त्यांचे तर्कशास्त्र आहे. हेच तर्कशास्त्र मानायचे तर मग निर्भयासुद्धा गुन्हेगारच ठरत नाही काय? कारण तिने आपल्यावर बलात्कार करणार्‍यांना रोखण्यासाठी प्रतिकार केला होता आणि त्यातही हल्लेखोर थोडेफ़ार का होईना जखमी झालेच होते. हल्ला परतवणार्‍या भाजपा कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करायचे असतील, तर निर्भयावरही गुन्हा दाखल करायलाच नको काय?

   इथे आपल्याला केजरीवाल किंवा आम आदमी पक्षाचे तर्कशास्त्र समजून घेण्य़ाची गरज आहे. तुम्ही आम्ही ज्या अर्थाने विविध शब्दांचा व भाषांचा वापर करतो, त्यापेक्षा त्यांच्या शब्दकोषात त्या शब्दांचे अर्थ अजिबात भिन्न आहेत. त्यांच्या तर्कानुसार तुमच्या घरात घुसणे, तुमच्या आयुष्यात विनापरवाना हस्तक्षेप करणे, कायदे मोडणे व धाब्यावर बसवणे; हे घटनादत्त अधिकार ‘आप’च्या कार्यकर्ते नेत्यांना मिळालेले आहेत. त्यात कुठलाही हस्तक्षेप म्हणजे गुन्हा असतो. भाजपावाले आपच्या कार्यालयावर चाल करून गेले नव्हते. आपवाले भाजपा कार्यालयात घुसले होते, दगडफ़ेक करीत होते. त्यांना अडवण्याचा प्रमाद भाजपावाले करीत असतील, तर केवढा मोठा अत्याचार आहे ना? निर्भयाने बलात्कार्‍यांना त्यापासून परावृत्त करणे किंवा रोखणे हा बलात्कार्‍यांवरचा केवढा मोठा अत्याचार अन्याय होता ना? मग तिच्यावर गुन्हा दाखाल व्हायला नको होता काय? आपल्या देशातल्या कायद्याला व त्याच्या अंमलदारांना काय झाले आहे, तेच समजत नाही. या देशात घटनेने गुन्हा करण्याचे, कायदा मोडण्याचे दिलेले स्वातंत्र्य वापरण्यावर सरकार गदा आणते ना? भाजपाच्या कार्यालयात घुसणे, त्यांच्या प्रवेशद्वारावर चढणे, दगडफ़ेक करणे शांततापुर्ण कार्य असते. कुठल्याही मुलीने छेड काढणार्‍याला वा तोंडावर एसीड फ़ेकणार्‍या व्यक्तीला रोखणे हा शांततापुर्ण कार्यातला व्यत्यय म्हणून गुन्हाच असतो ना? यांचा कायदामंत्री सोमनाथ भारती वेगळे काय करीत होता? केजरीवाल त्याच्या समर्थनार्थ धरणे उगाच धरून बसले नव्हते. आज त्यांच्या गुंडांनी दुसर्‍या पक्षाच्या कार्यालयावर हल्ला उगाच केला का? भाजपावाल्यांनी आपले कार्यालय वाचवायचा उद्योग केला नसता, तर शांततापुर्ण विध्वंस पार पडला असता ना? कुठली हिंसा हाणामारी झाली असती काय? विध्वंस रोखायचा प्रयत्न हा केवढा गुन्हा झालाय आणि पोलिस मात्र त्या शांततापुर्ण विध्वंसाचे कार्य करणार्‍यांनाच पकडतात. किती हा अत्याचार? ती निर्भया नशीबवान म्हणायची असल्या पक्षाचा उदय होऊन त्याचे कार्यकर्ते दिल्लीत मोकाट होण्याआधीच जग सोडून गेली बिचारी. यापुढे हे लोक कुणाच्याही घरात घुसून बायकामुलीवर हल्ले करतील आणि केजरीवाल अशीच इमानदार भाषा वापरून आपल्यावरच अन्याय होत असल्याची आरोळी ठोकतील