Sunday, March 9, 2014

दक्षिणेतील उलथापालथ

  नरेंद्र मोदी यांना भाजपाने पंतप्रधान पदाचा उमेदवार केल्यास एनडीएमध्ये असलेल्या मित्रपक्षांना मान्य होणार नाही आणि नवा कुणी पक्ष भाजपाच्या गोटात येणार नाही, असा बागुलबुवा वर्षभरापुर्वी चालू होता. त्यानंतर आठ महिन्यापुर्वी मोदींच्या नावाची घोषणा झाल्यावर आधी अडवाणी रुसून बसले आणि त्याआधीच नितीश एनडीए सोडून गेले होते. थोडक्यात राजकीय विश्लेषकांचे भविष्य खरे ठरल्याचा डंका पिटला जात होता. त्याचे खरे कारण मागल्या दहा वर्षात भाजपाचे श्रेष्ठी आपली डोकी गहाण टाकून टिव्हीच्या चर्चेनुसार पक्षाच्या धोरणाचे निर्णय घेऊ लागले होते. तिथेच भाजपा भरकटत गेला होता. पण मोदींचे नाव जाहिर झाल्यानंतर सहा महिन्यातच राजकारणाची दिशा व दशा बदलत गेली आहे. कॉग्रेसच्या आघाडीला मित्रपक्ष सोडून जाऊ लागले आणि भाजपाच्या गोटात नवनव्या पक्षांची आवक सुरू झाली. गेल्याच आठवड्यात अकस्मात रामविलास पासवान यांनी मोदींसोबत व्यासपीठावर हजेरी लावली. जितक्या वेगाने ही घटना घडली, त्याकडे बघता मोदी व त्यांच्या सवंगड्यांनी अनेक चाली अतिशय धुर्तपणे व गोपनीयतेने खेळलेल्या आहेत. त्यांच्याकडून होणार्‍या हालचालींकडे योग्यवेळ येईपर्यंत माध्यमांचेही लक्ष जाऊ नये, याची पुरती काळजी घेतली जाते असेच त्यातून स्पष्ट होते. एका बाजूला सर्वांना गाफ़ील ठेवून आपल्या मित्रांची संख्या वाढवणे आणि दुसरीकडे गाफ़ील प्रतिस्पर्ध्यांच्या गोटात धमाका घडवणे; अशा दुहेरी चाली खेळल्या जाताना दिसतात. पासवान यांना आपल्या गोटात आणताना लालू व कॉग्रेसला पुरते गाफ़ील ठेवले गेले आणि आता दक्षीणेतील हालचाली डाव्यांना बेसावध ठेवणार्‍या वाटतात. तामिळनाडूमध्ये अशीच मोठी राजकीय उलथापालथ होऊ घातली आहे.

   तामिळनाडूचे राजकारण गेल्या अर्धशतकात दोन द्रविडी पक्षांमध्ये विभागले गेलेले आहे. त्यात पडायचे तर राष्ट्रीय पक्षांना त्यापैकी एका द्रविडी पक्षासोबत हातमिळवणी करावी लागते. पण आता त्यात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता दिसते आहे. दोनतीन दशकात जयललिता विरुद्ध करूणनिधी अशीच लढत ठरलेली होती. पण मागल्या विधानसभा निवडणूकीपासून त्यात तिसर्‍या नेत्याने आपला ठसा उमटवला आहे. आधी नवा पक्ष काढून त्याने विधानसभा निवडणूकीत राज्यभर आपली असलेली ताकद दाखवली. त्याच्या मतविभागणीनेच करूणानिधींना लोकसभा निवडणूकीत यश मिळाले होते. त्याचाच फ़टका जयललितांना बसला. त्यामुळेच मागल्या विधानसभा निवडणूकीत जयललितांनी त्या नव्या पक्षाला सोबत घेऊन करुणानिधींवर मात केली. आपल्यामुळेच अण्णा द्रमुक इतके यश मिळवू शकल्या हे ओळखत असूनही, त्या धुर्त नेत्याने सत्तेत सहभागी होण्यापेक्षा विरोधात बसणे पसंत केले आणि तामिळनाडूतील विरोधी नेता म्हणून कामगिरी पार पाडली. आता करूणानिधींच्या पराभूत पक्षालाही दोन भावाच्या पक्षाला पुरते ग्रासलेले आहे. म्हणजेच द्रमुक आणखीच विकलांग झाला आहे. यावेळी त्याच नव्या पक्षाला सोबत घेऊन जयललितावर बाजी उलटवण्य़ाचा डाव करूणानिधी खेळायला बघत होते. पण त्यांना दाद न देता त्याच नव्या पक्षाच्या नेत्याने थेट भाजपाशी युती करण्य़ाचा धुर्त डाव खेळला आहे. त्याचे नाव विजयकांत आणि पक्षाचे नाव डीएमडीके असे आहे. त्याने भाजपा, एमडीएमके आणि पीएमके अशा पक्षांसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. बाकीचे दोन पक्ष लहान आहेत. त्यामुळेच आघाडीत भाजपा व डीएमडीके मोठे ठरतात. तोच मोठा जुगार आहे.

   आजघडीला तरी भाजपाला तामिळनाडू काबीज करण्याची घाई नाही आणि विजयकांत यांना देशव्यापी महत्वाकांक्षा नाही. म्हणूनच दोघांच्या हितसंबंधांना एकत्र येण्याने कुठली बाधा होत नाही. त्यामुळे अशी आघाडी केल्यास त्यांची मते द्रमुकशी तुल्यबळ होतात आणि अण्णा द्रमुकशी झुंज देण्याइतकी प्रभावी ठरू शकतात. त्याचा लाभ जितका विजयकांत यांना आपला राज्यव्यापी प्रभाव दाखवायला होतो, तितकाच आज भाजपाला लोकसभेत हाताच्या बोटावर मोजता येतील, इतक्या जागा वाढवायला होतो. भाजपाला आपल्याकडे तामिळ प्रतिनिधीत्व दाखवायची सोय होते, तर दोन्ही प्रमुख पक्षांना सोडूनही तामिळी राजकारण चालवता येते; असे विजयकांत सिद्ध करू शकतात. त्यासाठी गरजवंत भाजपाचा लाभ त्यांना उठवता येतो. एकदा दोन्ही द्रविडी मोठ्या पक्षांना वगळून लक्षणीय यश विजयकांत संपादन करू शकले, तर त्यांची गणना जयललिता व करूणानिधी यांच्याशी होऊ शकते आणि उतारवयात गेलेल्या करुणानिधींची जागा विजयकांत व्यापू शकतात. दुसरीकडे जयललितापेक्षा हा नेता तरूण आहे. म्हणजेच आज करूणानिधींना तिसर्‍या क्रमांकावर ढकलून थेट जयललिताला आव्हान म्हणून पुढल्या राजकारणात उभे रहाण्याची तयारी विजयकांत करीत आहेत. त्यासाठी त्यांना भाजपसह मोदींच्या आजच्या लोकप्रिय प्रतिमेचाही वापर करून घेता येणार आहे. म्हणूनच या आघाडीत विजयकात व मोदी असा दोघांचा फ़ायदा आहे. पण त्यांनी आपला हा हेतू साध्य केला, तर ती द्रविडी राजकारणातील तीन दशकानंतरची मोठीच उलथापालथ असेल. करूणानिधी व एमजीआर यांच्या धुमश्चक्रीत कॉग्रेस संपली. तसेच अशा डावपेचात द्रमुकच लयास जाण्याची शक्यता आहे. पण त्यातून नव्याने भाजपा हा राष्ट्रीय पक्ष तामिळनाडूत आपले पाय रोवून उभा रहाण्याचीही शक्यता आहे.

2 comments:

  1. Raj thakre ni Mumbai madhye khellelya kheli baddal tumhala Kay vatat

    ReplyDelete
  2. टीव्हीवर अशा नवीन नवीन गोष्टी कळत नाहीत . धन्यवाद तुमच्यामुळे अनेक नवीन पैलू लक्षात येतात .

    ReplyDelete