Tuesday, March 11, 2014

राजकारणातला शाहरुख

   मागल्या दोनतीन महिन्यात केजरीवाल यांनी अतिशय धुर्तपणे आपल्या खेळी खेळल्या आहेत. त्यांनी पद्धतशीरपणे गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना आपले लक्ष्य केलेले आहे. अगदी मोदी जिथून उभे रहातील, तिथून आपण त्यांच्या विरोधात निवडणूक लढवू अशा गर्जनाही केलेल्या आहेत. त्याचे कारणही स्पष्ट आहे. मोदींच्या विरोधात जितके बोलतील, आरोप करतील आणि लढतील; तितकी त्यांना अधिक प्रसिद्धी मिळणारे हे उघड आहे. केजरीवाल यांना त्याचाच फ़ायदा उठवायचा आहे. एका वृत्तपत्राला मुलाखत देताना अलिकडेच त्यांनी देशात मोदीच्या लोकप्रियतेची लाट आहे, याची कबुली दिलेली होती. म्हणजेच अशा लोकप्रिय नेत्याच्या विरोधात उभे राहून आपण जगभर प्रसिद्धी मिळवू शकतो, पण जिंकू शकत नाही, याचीही त्यांना पक्की खात्री आहे. मग ते बळीचा बकरा व्हायला मोदी विरोधात उमेदवारी करणार काय? अजिबात नाही. केजरीवाल यांना हरवायला मोदी नक्कीच निवडणूक लढवणार नाहीत. जिंकायलाच ते मैदानात उतरणार आहेत. त्यामुळेच पराजय पक्का धरूनच केजरीवाल तिथे मैदानात उतरतील. परंतु त्यातून त्यांना वेगळेच काही साधायचे आहे. कॉग्रेस पक्ष किंवा अन्य सगळेच पक्ष भाजपा वा मोदींच्या विरोधात नुसते तोंडाची वाफ़ दवडतात, पण कोणी मोदींशी दोन हात करायला आखाड्यात उतरत नाहीत. ते धाडस फ़क्त आपल्यातच आहे; हा सिद्धांत केजरीवाल यांना सिद्ध करायचा आहे. त्यातून पुढल्या काळात आपणच मोदी विरोधातले एकमेव लढवय्ये आहोत, हे त्यांना जनमानसात रुजवायचे आहे. त्यासाठी मोदींकडून कुठल्याही मतदारसंघात पराभूत होणे, ही फ़ार मोठी किंमत नाही.

   ‘बाजीगर’ नावाचा एक चित्रपट खुप गाजला होता. त्यातून मग शाहरुख खान सुपरस्टार व्हायची प्रक्रिया सुरू झाली होती. त्यामध्ये काजोल ह्या नायिकेला मोहित करण्यासाठी शाहरूख एक डाव खेळतो. तिचा पिता ज्या कार शर्यतीमध्ये नेहमी जिंकत असतो, त्यात भाग घेऊन शाहरुख आव्हान देतो. शर्यतीत शाहरुख जिंकण्याची शक्यताही असते. पण ऐनवेळी तो मुद्दाम चुका करून काजोलच्या पित्याला शर्यत जिंकू देतो. त्यात काजोल खुश होते. पण तिचाच पिता शाहरुखला विचारतो, हातातोंडाशी आलेला विजय तू गमावलास कशाला? तू ही शर्यत मारू शकत होतास. त्यावर शाहरुखचा प्रसिद्ध डायलॉग आजही अनेकांना आठवत असेल. ‘कुछ जितने के लिये कुछ गवाना पडता है’. साधायचे काय ते नक्की असेल, तर दिसणारा पराभव व्यवहारातला पराभव नसतो. त्या पराभवात भविष्यातले मोठे यशही गृहीत धरलेले असू शकते. इथेही केजरीवाल पराभवाचा जुगार खेळायला उगाच पुढे आलेले नाहीत. देशातल्या सर्व पक्षातले नेते नुसते मोदींच्या विरोधात तोंडपाटिलकी करतात, कोणी त्यांच्याशी थेट दोन हात करायला राजी नाही. कारण या सर्वच पक्षांचे आतून संगनमत आहे, असा सिद्धांत केजरीवाल मांडत असतात. त्याचीच साक्ष त्यांना मोदी विरोधात उभे राहून द्यायची आहे. बाकीचे पक्ष व नेते मात्र त्यातून मोदींना मोठे आव्हान मिळाल्याची गाजरे खात आहेत. पण केजरीवाल यांना मोदींना पराभूत करायचे नसून मोदी विरोधातील सर्व मतप्रवाह आणि मतदारांना आपल्या गोटात ओढायचे आहे. कारण पुढल्या काळातले राजकारण मोदींच्या भोवतीच फ़िरणार आहे आणि त्यात आपणच आघाडीवर आहोत, असे जनमानसात ठसवायचा हा सोपा उपाय व प्रयास आहे. त्याचा सर्वात मोठा फ़टका याच अन्य पक्षांना भविष्यकाळात बसणार आहे.

   एक गोष्ट स्पष्ट आहे. लोक कधीपासून कॉग्रेसला कंटाळलेले आहेत. पण कॉग्रेसला कुठल्याच पक्षाने कधी गंभीरपणे आव्हान उभे केलेले नव्हते. भाजपाने तसा प्रयत्न केला, तरी सत्तेच्या मागे धावताना त्या पक्षाच्या नेत्यांनी त्याची धार गमावली होती. मोदींनी मागल्या दोन वर्षात प्रयत्नपुर्वक ती धार तेज केली. पण दुसरीकडे भाजपा विरोधातल्या विविध पक्षांची नियतही कधीच खरी नव्हती. या पक्षांनी सोयीनुसार सेक्युलर विचारधारा वळवून वाकवून आपापले स्वार्थ साधताना आपली प्रतिष्ठा गमावलेली आहे. त्यामुळे भाजपा विरोधाच्या राजकारणातही पोकळीच आहे. या तमाम कॉग्रेस व भाजपा विरोधी राजकीय पक्षांच्या खेळखंडोबालाही वैतागलेला मोठा समाजघटक आहे, केजरीवाल त्याच घटकाला आपल्या मागे आणायचा मोठा डाव खेळत आहेत. त्यातून त्यांना मोदींच्या विरोधातले राजकारण करण्यापेक्षा मोदीविरोधी राजकारणाची जागा व्यापायची आहे. त्यासाठी खुलेआम मोदी विरोधी निवडणूक लढवून आपणच एकमात्र मोदींचे शत्रू असल्याची ग्वाही अशा समाजघटकाला व मतदाराला देण्याची इतकी उत्तम संधी दुसरी कुठली असेल? मोदी विरोधात पराभूत झाल्याने त्यांची कुठलीही प्रतिष्ठा जाणार नाही, तर राजकीय वजन वाढणार आहे. पण त्यातून मोदींना धक्का बसण्यापेक्षा मोदी विरोधातल्या जुन्याजाणत्या सर्वच प्रस्थापित पक्षात केजरीवाल व त्यांचा आम आदमी पक्ष उठून दिसणार आहे. पर्यायाने कॉग्रेस व भाजपाला एकमेव पर्याय म्हणून पुढल्या काळात राजकारणात उभे ठाकण्याचा पाया घातला जाणार आहे. म्हणजेच मोदींकडून पराभूत होताना बाकीच्या सेक्युलर पक्षांनाही संपवण्याचा खरा डाव केजरीवाल खेळत आहेत. थोडक्यात लढायचे मोदींच्या विरोधात; पण हरवायचे व संपवायचे डाव्या ‘तिसर्‍या’ सेक्युलर पक्षांना, अशी ही अजब खेळी आहे.

No comments:

Post a Comment