सव्वा वर्षापुर्वीची दिल्लीतली निर्भया कोणाला आठवते काय? काय होती तिची कहाणी? अंधारल्यानंतर वाहन मिळण्याची प्रतिक्षा करीत असलेल्या निर्भयाला एका बसमध्ये घेतले गेले. तिथे मग तिच्यावर सामुहिक बलात्कार झाला होता. तिने तो निमूटपणे सहन केला असता, तर त्याला शांततापुर्ण प्रतिसाद असे कोणी म्हटले असते काय? निर्भयाने तिच्यावर चालून आलेल्या प्रत्येक गुंडाला शुद्ध असेपर्यंत झुंजार प्रतिसाद दिला. त्यामुळेचा तिचा जीव घेण्यापर्यंत त्यांची मजल गेली. या प्रतिकारात तिच्याकडूनही हे बलात्कारी जखमी झालेच. कुणाला तिची नखे लागली असतील, कुणाला ती चावल्याने तिचे दात लागून त्यापैकी कोणी रक्तबंबाळ झालेला असेल. त्यांनी निर्भयाला मग मरण्यासाठी रस्त्यावर फ़ेकून दिले. हे प्रकरण चव्हाट्यावर आले, तेव्हा बलात्कार्यांना शोधून काढण्यात आले. त्यांच्यावर गुन्हे दाखल करून खटला भरण्यात आला. त्याचा आता निकालही आलेला आहे. पण या सगळ्या गडबडीत कोणाला त्या जखमी बलात्कार्यांच्या जखमांची तरी आठवण राहिली काय? त्यांचे वागणे अत्यंत शांततापुर्ण नितीमत्तेचे प्रदर्शन होते, असा दावा कोणी केला होता काय? उलट त्याच काळात काही लोकांनी त्या मुलीने अवेळी घराबाहेर पडायला नको होते, किंवा तिने जीव वाचवण्यासाठी बलात्कार्यांचा प्रतिकार करायला नको होता, किंवा त्यांच्याशी निमूट सहकार्य करायला हवे होते; अशीही मुक्ताफ़ळे उधळली होती. अशा प्रतिक्रिया वा मतांबद्दल माध्यमांनी झोड उठवलेली आपल्याला आठवते ना? हल्ला वा बलात्काराच्या विरोधात मुलींनी प्रतिकार करण्याला कोणी गुन्हा ठरवलेले आपण आजवर कधी ऐकले आहे काय? पण केजरीवाल आणि आम आदमी पक्षाच्या नेत्यांचे तर्कशास्त्र मानायचे तर निर्भयाच्याही विरोधात गुन्हा दाखल व्हायला हवा होता.
जो हल्ला करतो व त्याला होणार्या प्रतिकारात त्याला जखमा झाल्या, तर प्रतिकार करणार्यावरही गुन्हा दाखल व्हायला हवा; असाच आपनेते शाझिया इल्मी व आशुतोष यांचा दावा आहे. बुधवारी दिल्लीतील भाजपाच्या मुख्यालयावर आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा जमाव चाल करून गेला. अर्थात तोच जमाव मनसे किंवा शिवसेनेचा असता तर याच दिल्लीतल्या पत्रकारांनी त्या त्या पक्षाचे गुंड; अशीच त्याची संभावना केली असती. पण गुंड आम आदमी पक्षाचे असल्याने त्यांना कार्यकर्ते संबोधले जाते. अशा या गुंड कार्यकर्त्यांनी भाजपाच्या मुख्यालयावर हल्ला केला. तिथे लावलेली मोठमोठी पोस्टर्स पाडली, दरवाजे बंद असताना त्यावर चढून कार्यालयात घुसण्याचा प्रयास केला. भाजपा कार्यकर्ते व पोलिसांनी त्यात हस्तक्षेप केल्यामुळे आपवाल्यांचा मुखभंग झाला. त्यांना मार खावा लागला. भाजपावाल्यांना आपल्याच कार्यालयाचा बचाव करण्याचेही स्वातंत्र्य नसते का? त्यांनी आपवाल्यांना कार्यालयात घुसून मोडतोड आणि जाळपोळ करायला प्रतिबंध करणे, म्हणजे गुन्हाच होता. तो प्रतिकार केल्याने आपवाल्यांना जखमा झाल्या, तर त्या जखमा करणार्यांवर गुन्हे दाखल करायला नकोत काय? म्हणजे तशी हल्लेखोर जमाव घेऊन जाणार्या आशुतोष व शाझियाची मागणी आहे. तसे पोलिस करीत नाहीत, म्हणजेच आम आदमी पक्षावरचा अत्याचार असतो, असे त्यांचे तर्कशास्त्र आहे. हेच तर्कशास्त्र मानायचे तर मग निर्भयासुद्धा गुन्हेगारच ठरत नाही काय? कारण तिने आपल्यावर बलात्कार करणार्यांना रोखण्यासाठी प्रतिकार केला होता आणि त्यातही हल्लेखोर थोडेफ़ार का होईना जखमी झालेच होते. हल्ला परतवणार्या भाजपा कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करायचे असतील, तर निर्भयावरही गुन्हा दाखल करायलाच नको काय?
इथे आपल्याला केजरीवाल किंवा आम आदमी पक्षाचे तर्कशास्त्र समजून घेण्य़ाची गरज आहे. तुम्ही आम्ही ज्या अर्थाने विविध शब्दांचा व भाषांचा वापर करतो, त्यापेक्षा त्यांच्या शब्दकोषात त्या शब्दांचे अर्थ अजिबात भिन्न आहेत. त्यांच्या तर्कानुसार तुमच्या घरात घुसणे, तुमच्या आयुष्यात विनापरवाना हस्तक्षेप करणे, कायदे मोडणे व धाब्यावर बसवणे; हे घटनादत्त अधिकार ‘आप’च्या कार्यकर्ते नेत्यांना मिळालेले आहेत. त्यात कुठलाही हस्तक्षेप म्हणजे गुन्हा असतो. भाजपावाले आपच्या कार्यालयावर चाल करून गेले नव्हते. आपवाले भाजपा कार्यालयात घुसले होते, दगडफ़ेक करीत होते. त्यांना अडवण्याचा प्रमाद भाजपावाले करीत असतील, तर केवढा मोठा अत्याचार आहे ना? निर्भयाने बलात्कार्यांना त्यापासून परावृत्त करणे किंवा रोखणे हा बलात्कार्यांवरचा केवढा मोठा अत्याचार अन्याय होता ना? मग तिच्यावर गुन्हा दाखाल व्हायला नको होता काय? आपल्या देशातल्या कायद्याला व त्याच्या अंमलदारांना काय झाले आहे, तेच समजत नाही. या देशात घटनेने गुन्हा करण्याचे, कायदा मोडण्याचे दिलेले स्वातंत्र्य वापरण्यावर सरकार गदा आणते ना? भाजपाच्या कार्यालयात घुसणे, त्यांच्या प्रवेशद्वारावर चढणे, दगडफ़ेक करणे शांततापुर्ण कार्य असते. कुठल्याही मुलीने छेड काढणार्याला वा तोंडावर एसीड फ़ेकणार्या व्यक्तीला रोखणे हा शांततापुर्ण कार्यातला व्यत्यय म्हणून गुन्हाच असतो ना? यांचा कायदामंत्री सोमनाथ भारती वेगळे काय करीत होता? केजरीवाल त्याच्या समर्थनार्थ धरणे उगाच धरून बसले नव्हते. आज त्यांच्या गुंडांनी दुसर्या पक्षाच्या कार्यालयावर हल्ला उगाच केला का? भाजपावाल्यांनी आपले कार्यालय वाचवायचा उद्योग केला नसता, तर शांततापुर्ण विध्वंस पार पडला असता ना? कुठली हिंसा हाणामारी झाली असती काय? विध्वंस रोखायचा प्रयत्न हा केवढा गुन्हा झालाय आणि पोलिस मात्र त्या शांततापुर्ण विध्वंसाचे कार्य करणार्यांनाच पकडतात. किती हा अत्याचार? ती निर्भया नशीबवान म्हणायची असल्या पक्षाचा उदय होऊन त्याचे कार्यकर्ते दिल्लीत मोकाट होण्याआधीच जग सोडून गेली बिचारी. यापुढे हे लोक कुणाच्याही घरात घुसून बायकामुलीवर हल्ले करतील आणि केजरीवाल अशीच इमानदार भाषा वापरून आपल्यावरच अन्याय होत असल्याची आरोळी ठोकतील
Agadi barobar ahe tumhcha mhanan.... Very good and to the point write up!
ReplyDelete