Monday, March 10, 2014

खोट्य़ाच्या कपाळी गोटा

   काही वर्षापुर्वी म्हणजे एकदम नेमके सांगायचे, तर मागल्या विधानसभा निवडणूकीपुर्वी महाराष्ट्राचे मुख्यामंत्री अशोक चव्हाण होते. तेव्हाची गोष्ट आहे. त्याहीवेळी महाराष्ट्र कॉग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरेच होते आणि आजही आहेत. त्यावेळी कॉग्रेसतर्फ़े एक झेंडामार्च नावाचा मोठा मोर्चा काढला जाणार होता. त्याची माहिती देण्यासाठी एक पत्रकार परिषद घेण्यात आलेली होती. माणिकराव आणि सतीश चतुर्वेदी नावाचे विदर्भातील कॉग्रेस नेते त्यात पत्रकारांना माहिती देत होते. पत्रकार परिषद संपली आणि कॅमेरे बंद झाले. म्हणजेच समोरच्या टेबलावर असलेले माईकही बंद झाले, अशा समजूतीमध्ये उपरोक्त दोन्ही नेते आपसात काही खाजगी गप्पा मारू लागले. तेव्हा त्यांच्या पोटातली खरी मळमळ बाहेर येत होती. मात्र त्यापैकी एक कॅमेरा चालूच राहिला होता आणि सोबतच समोरच्या टेबलवरचा माईकही चालू होता. सहाजिकच बोलले गेलेले, खाजगी शब्द व बोलणारे चेहरे टिपले त्यात गेले होते. आज कोणा पत्रकाराला त्याची आठवणही राहिलेली नाही. तो संवाद असा होता, की पक्षाच्या कार्यासाठी व कार्यक्रमासाठी सत्तेतले पक्षाचे मंत्री पैसे जमवत नाहीत. सतीश चतुर्वेदी अशी तक्रार करीत होते. त्यावर प्रदेशाध्यक्ष माणिकरावांचा खुलासा असा होता, की मुख्यमंत्री पैसे गोळा करतात, पण देण्य़ाची नियत नाही. झालेले चित्रण त्या कॅमेरामनच्या नंतर लक्षात आले आणि ती तेव्हाची मोठी खळबळजनक बातमी झालेली होती. मात्र दोनतीन दिवसात ती बातमी काळाच्या पडद्याआड गायब झाली. पुढल्या काळात त्याचा उल्लेख कोणी केला नाही, की होत नाही. मात्र आजही भाजपाचे माजी अध्यक्ष बंगारू लक्ष्मण यांनी लाखभर रुपये रोख घेतल्याचा पंधरा वर्षे जुन्या चोरट्या चित्रणाचा उल्लेख अगत्याने होत असतो.

   असो, ही झाली देशातल्या दोन प्रमुख मोठ्या व सर्वात भ्रष्ट राजकीय पक्षांची कहाणी. त्याना व त्यांनीच चालविलेल्या भ्रष्टाचारापासून देशाला मुक्ती देण्यासाठी पत्रकार व माध्यमे मागल्या कित्येक वर्षापासून अहोरात्र झटत आहेत. आता त्यांच्या मदतीला इश्वरानेच एक महान प्रेषित धाडला आहे, अरविंद केजरीवाल असे त्याचे नाव आहे. म्हणूनच माध्यमे व पत्रकारांनी मागल्या तीन महिन्यात त्याचा विश्वशुद्धीचा ‘नवा धर्म’ जगाच्या पाठीवर सर्वत्र पसरवून मानवजातीला पुण्यवंत बनवण्याचा विडाच उचलला आहे. त्यासाठी तर मागल्या तीन महिन्यात वाहिन्यांसह माध्यमातील अर्ध्याहून अधिक जागा आणि वेळ केजरीवाल यांना अर्पण केलेली आहे. अशा या पवित्र पुण्यवान कर्तव्यापासून ‘पुण्यप्रसून’ नावाचा माणूस मागे कसा राहू शकेल? तो माणूस अनेक वाहिन्यांमधून वहावत पुन्हा ‘आजतक’ नावाच्या सबसे तेज वाहिनीमध्ये पुन्हा येऊन पोहोचला आहे. त्यानेही केजरीवाल नामक प्रेषिताची खास मुलाखत घेऊन भारतीयांना पापमुक्त करण्याचे आपले कर्तव्य पार पाडले. त्याचे दुर्दैव इतकेच, की त्याचे हे पुण्यकर्म संपल्यावरही मानवी संवेदनशीलता अजिबात नसलेला कॅमेरा चालूच राहिला आणि त्यात प्रेषित केजरीवाल व त्यांचा नवाकोरा भक्त पुण्यप्रसून खाजगीत काय संवाद साधत होते, त्याचेही चित्रण व मुद्रण होऊन गेले. त्यात दोघेही प्रेक्षक व जनमानसावर मुलाखतीचा परिणाम साधण्यासाठी कोणता भाग ठळकपणे दाखवावा आणि कितीवेळा त्याची पुनरुक्ती करावी, यावर कुजबुज करताना टिपले गेले आहेत. हे चित्रण अर्थात त्या दोघांना अंधारात ठेवून कॅमेरामन किंवा अन्य कुणीकरी बाजूला काढून ठेवले होते. आता त्याचे प्रसार ‘युट्युब’ या इंटरनेट संकेतस्थळावर करण्यात आल्याने, ती कुजबुज लक्षावधी लोकांपर्यंत जाऊन पोहोचली आहे.

   इथे एक मजेची गोष्ट लक्षात घ्यायला हवी, माध्यमातले जाणकार व पत्रकार नेहमी पावित्र्य त्यांच्याच घरात धुणीभांडी करते, अशा थाटात बोलत असतात आणि त्यासाठी जगातल्या पापाच्या कहाण्य़ा शोधून सादर करीत असतात. सहजगत्या चित्रण-मुद्रण उपलब्ध नसेल तर चोरटे छुपे कॅमेरे लावून पापकर्म्यांना जाळ्यात पकडत असतात. त्यांना आयतेच असे चित्रण मिळाल्यावर त्यांनी त्याविषयी मौनव्रत कशाला धारण करावे? सबसे तेज असलेल्या ‘आजतक’ वाहिनीच्याच कॅमेराने हे चित्रण झाले, हे वेगळे सांगायला नको. मग त्याच वाहिनीने ते चित्रण कशाला आजवर दडपून ठेवले आहे? युट्युब किंवा फ़ेसबुक ट्विटर अशा जागी असलेल्या अनेक धमाल गोष्टी अगत्याने वाहिन्यांवर दाखवल्या जात असतात. मग त्यापैकी कुठल्याच वाहिनीने हे पुण्य‘प्रसव’ आजवर कशाला आपल्या प्रेक्षकाला सादर केलेले नाही? केजरीवाल नावाचा नवा जगाचा उद्धारक कसा माध्यमे व पत्रकारांनी मागल्या तीन महिन्यात लोकांच्या गळी मारला आहे आणि त्यामागे कशी बाजारू मनोवृत्ती आहे; त्याचा हा सज्जड पुरावाच आहे. पण त्याबद्दल कुठला पत्रकार बोलायला राजी नाही. एकूणच केजरीवाल व त्यांचा दिल्लीत किरकोळ यश मिळवणारा आम आदमी पक्ष राष्ट्रीय राजकीय पर्याय म्हणून पुढे आणायचे मार्केटींग करण्याचा कावा राबवण्यात आला त्याचा हा जिवंत पुरावा आहे. एका बाजूला केजरीवाल मोदी वा कॉग्रेस व मुकेश अंबानींनी माध्यमे विकत घेतल्याचा आरोप करीत असतात. पण त्यात बसलेल्या पत्रकारांना केजरीवाल यांनी विकत तरी घेतले आहे किंवा बहुतांश पत्रकार केजरीवाल यांच्या पक्ष व चळवळीचे छुपे हस्तकच असल्याची ही साक्ष आहे. इमानदारीने बेईमानी कशी करावी त्याचा हा सर्वोत्तम वर्गपाठच म्हणता येईल. खोट्याच्या कपाळी गोटा म्हणतात त्यातला प्रकार.
http://timesofindia.indiatimes.com/india/Arvind-Kejriwal-asks-TV-anchor-to-play-up-sections-of-his-interview/articleshow/31770863.cms

https://www.youtube.com/watch?v=yRGNTXDO7dI

1 comment:

  1. ते झेंडा मार्च चे विसरूनच गेलो होतो .

    ReplyDelete