Sunday, December 22, 2013

अंजामे गुलीस्तॉं क्या होगा




   शनिवारी दिल्लीत आपल्या सरकारच्या अपयशाचे पोवाडे गावून झाल्यावर रविवारी उत्तरप्रदेशात कॉग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, दंगलग्रस्तांना भेटायला गेले होते. मुझफ़्फ़रनगर येथे त्यांचे निर्वासित छावण्यात ‘प्रचंड’ स्वागत झाले. मध्यंतरी विधानसभांच्या निवडणूकीत राहुल यांनी तिथले दंगलग्रस्त तरूण पाकिस्तानी हेरसंस्था आयएसआयच्या संपर्कात असल्याची लोणकढी थाप ठोकली होती. तिचाच जाब विचारण्यासाठी काळे झेंडे दाखवून त्यांचे तिथल्या मुस्लिमांनी भव्य स्वागत केले. शनिवार व रविवारच्या दोन घटनांकडे बघता राहुल गांधी आपल्याच पक्षाला कसे बुडवू शकतील; त्याचा अंदाज येतो. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याच पक्षाला व सरकारला अडचणीत आणणारे नेमके शब्द ते भाषणात उच्चारतात. दुसरी गोष्ट म्हणजे मुर्खपणा केल्याचेही त्यांच्या लक्षात येत नाही, किंवा त्यांना तो सांगायची कोणात हिंमत उरलेली नाही. निवडणूकीत साफ़ मार खाल्ल्यावर आम आदमीशी कसे जोडून घ्यावे, ते नव्या पक्षाकडून शिकायची भाषा ते करतात. दुसरीकडे आपण कोणत्या चुका केल्या, तेही अगत्याने सांगून टाकतात. उदाहरणार्थ पत्रकार परिषदेत जाऊन सरकारचा अध्यादेश फ़ाडून टाकणे, ही आपली चुक होती असे त्यांनी देशाच्या उद्योगपतींच्य सभेत सांगितले. दुसर्‍या दिवशी मुझफ़्फ़रनगरच्या दंगलग्रस्त छावण्यांमध्ये जाऊन तिथल्या निर्वासितांना त्यांनी आपापल्या गावी व घरी जाण्याचे आवाहन केले. जणू राहूल गांधी यांची परवानगी मिळण्यासाठीच हे हजारो लोक इतक्या थंडीवार्‍यात कुडकुडत त्या नरकवासात वास्तव्य करीत असावेत. ही माणसे गाव सोडून अशी निर्वासित छावण्यात कशाला वास्तव्य करून जगत आहेत, त्याचे तरी भान राहुलना आहे काय?

   गावात जाऊन रहाण्याची स्थिती असती, तर त्यांनी असे उघड्यावर वास्तव्य कशाला केले असते? त्यांना गावात काम नाही, की सुरक्षितता मिळायची हमी नाही. म्हणूनच ते तिथे उघड्यावर येऊन पडले आहेत ना? उपासमारी व रोगराईचे जीवन कंठत आहेत ना? गावात व घरात जाऊन वास्तव्य करणे शक्य असते, तर ते तिथे कशाला राहिले असते? त्यांच्या मनातले भय काढून टाकण्यासाठी व त्यांना सुरक्षेची हमी देण्यासाठी राहुलनी काही केल्यावर घरोघर परत जा, असे आवाहन केले असते तर गोष्ट वेगळी. पण ज्यांना सदोदीत सुरक्षा कवचातच वास्तव्य करायची बालपणापासून सवय जडली आहे, त्यांना असुरक्षित जीवन म्हणजे काय, ते समजायचे कसे? त्यांच्यासाठी अशा दंगलग्रस्त वा भुकेकंगाल लोकांच्या कहाण्या म्हणजे पुस्तकातल्या मौजेच्या गोष्टी असतात. चार शतकांपुर्वी फ़्रेंच राज्यक्रांती झाली तिची आठवण येते. देशातली गरीब उपाशी जनता राजवाड्यावर मोर्चा घेऊन आली आणि आपल्याला खायला पाव नाही, म्हणून घोषणा देऊ लागली. तर तिथे चाललेल्या मेजवानीत गर्क असलेल्या राणीने त्यांना म्हटले, ‘पाव नसेल तर भुक भागवायला केक खा’. आज आपल्या देशाचे लोकशाही राजपुत्र दंगलग्रस्तांना काही वेगळा सल्ला देत आहेत काय? ज्यांना गावात दंगलीच्या भयामुळे जायची भिती वाटते, त्यांना आहेत त्या छावणीमध्ये किमान जीवनावश्यक सुविधा पुरवण्याचे बाजूला राहिले आणि आहात तसेच घरोघर निघून जा, असले आवाहन करायला राजपुत्र जातात; तेव्हा लोकांनी काळे झेंडे नाही दाखवायचे तर काय आरत्या ओवाळायच्या? चार राज्यात दारूण पराभव झाल्यानंतर राजपुत्राची अशी अवस्था व मस्ती असेल, तर त्यांच्याकडून कॉग्रेसचे पुरते पानिपत झाल्याशिवाय हा विषय संपू शकेल काय?

दुसरीकडे आदल्याच दिवशी देशातील एक भयंकर घोटाळा म्हणून गाजलेल्या आदर्श प्रकरणात चौकशी अहवाल आला, त्यातील चार कॉग्रेसी मुख्यमंत्र्यांवर ठपका ठेवलेला असताना, तो अहवालच फ़ेटाळला गेला. दुसरीकडे त्याच प्रकरणात राजिनामा द्यावा लागलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्याची परवानगी राज्यपालांनी पोलिसांना नाकारली. म्हणजेच कॉग्रेस पक्ष व त्याचे सरकार गुन्हेगार व भ्रष्टाचार्‍यांना पाठीशी घालत असल्याचा सज्जड पुरावाच त्यातून दिला गेला. पण त्याच पक्षातले व त्याच्या देशभरातील सरकारचे अंतिम निर्णय घेणारे राहुल गांधी, उद्योगपतींना आपण भ्रष्टाचार कसा निपटून काढणार त्यावर प्रवचन देत होते. जिथे आपलेच हातपाय काळे व माखलेले आहेत, त्या विषयात निदान बोलू नये; इतकीही बुद्धी ज्या व्यक्तीपाशी नाही, त्याच्या हाती पक्षाची सर्व सुत्रे असतील तर त्याचा सफ़ाया करण्यासाठी कुणा केजरीवाल किंवा नरेंद्र मोदीची गरज नसते. त्यांनी केवळ समोर ठाम उभे राहिले तरी पुरते. बाकी असा सत्ताधारी पक्ष आपलाच नाश ओढवून घेत असतो. राहुल गांधी व मनमोहन सिंग नेमके तेच काम आपल्या विरोधकांसाठी करीत आहेत. इतका दारूण पराभव झाल्यानंतरही आपण अनागोंदी, अराजक व भ्रष्टाचारामुळे हरलो, हे मान्य करायची बुद्धी ज्यांच्यापाशी नाही, त्यांच्यासाठी पुढली लोकसभा निवडणूक किती विनाशक असेल, ते वेगळे सांगण्याची गरज नाही. कुठल्याशा उर्दू कविने म्हटलेले आहे.

बरबादे गुलिस्तॉं करने को
बस एकही उल्लू काफ़ी था
हर शाखपे उल्लू बैठा है
अंजामे गुलीस्तॉं क्या होगा

No comments:

Post a Comment