Thursday, December 5, 2013

चाचण्यांच्या भाकीताची भुते



   लोकशाहीतल्या निवडणूका, त्यातला प्रचार आणि मतचाचण्या, हा आता वाहिन्यांसाठी एक रियालिटी शो होऊन बसला आहे. कारण बहुतेक वृत्तवाहिन्या हल्ली अशा चाचण्यांवर प्रदिर्घ कार्यक्रम योजत असतात. त्यासाठी मग मतचाचण्या करून देणार्‍या कंपन्यांचाही सुळसुळाट झालेला आहे. तसे बघितल्यास मतचाचण्या आपल्या देशात नव्या नाहीत. कुठलीही कंपनी आपले उत्पादन करण्याआधी त्यासारखी कुठली उत्पादने बाजारात आहेत आणि त्याविषयी उपभोक्ता काय विचार करतो; हे जाणून घेण्य़ासाठी अशा चाचण्या करीत होत्या. त्याच बाजार चाचपणी करणार्‍या कंपन्यांनी विसाव्या शतकाच्या अखेरीस राजकीय मतचाचण्यांची नवी दुकाने थाटली. पण बाजारातील उपभोग्य वस्तू व सेवा आणि जनतेचे राजकीय मत, यांच्यात प्रचंड फ़रक असतो. सामान्य माणूस एखाद्या उत्पादनाविषयी जितके स्पष्ट मतप्रदर्शन करतो, तितका तो राजकीय पक्ष वा नेत्याविषयी मोकळेपणाने आपले मत सांगत नसतो. कारण ज्याच्या बाजूने मत मांडले, त्याचा लाभ होण्याची शक्यता कमी असते आणि ज्याला कौल दिला नाही, त्याच्याकडून त्रास दिला जाण्याची दाट शक्यता असते. म्हणूनच जनमताची राजकीय चाचणी जिकीरीचे काम असते. त्यामुळेच अनेक चाचण्य़ा होतात आणि त्यातल्या काही नेमक्या खर्‍या ठरतात. पण अनेक अगदीच चुकीच्या होऊन जातात. पण त्यावर चर्चा रंगवणारे मात्र आपल्याला आधीच अंतिम निकाल गवसला आहे, अशा थाटात बोलू लागतात. पाच विधानसभेच्या मतदानानंतर बुधवारी झालेल्या एक्झीट पोलच्या बाबतीत नेमके तेच घडले. वास्तविक दिल्लीत मतदान केंद्रात उशीरा पोहोचलेले लोक अजून करीत होते, ते संपण्याआधीच त्यावरील निष्कर्ष व चर्चांचे फ़ड रंगलेले होते.

   सर्वच चाचण्यात जनमत कॉग्रेसच्या विरोधात जाताना दिसत होते. पण दिल्लीतले मतदान व त्याचे अंतिम आकडे हाती आलेले नसल्याने, चाचणीकर्तेही बुचकळ्यात पडलेले होते. पण त्यावर पांडित्य सांगणारे मात्र अंतिम निकाल हाती आल्याप्रमाणे देशाच्या भवितव्याची भुते नाचवू लागले होते. आरंभीच्या चाचणीत केजरिवाल यांच्या आम आदमी पक्षाला चांगला प्रतिसाद असल्याचे निष्पन्न होत असले, तरी पाच विविध चाचण्यात त्यांना मिळणारी मते व जागांचे आकडे परस्पर विरोधी दिसत होते. पण त्यापैकी एकात तोच पक्ष सर्वात मोठा पक्ष होण्याची शक्यता दाखवल्यावर एका वाहिनीवरचे जाणते पत्रकार थेट केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली देशातला तिसरा राजकीय पर्याय उभा करण्यापर्यंत पोहोचले. दुबळी कॉग्रेस व विस्कळीत विरोधी पक्षांच्या तुलनेत भाजपाचे नरेंद्र मोदी यांचे पारडे सध्या जड दिसत आहे, त्याला खोडण्यासाठी केजरीवाल भाजपा-कॉग्रेस वगळून नवा राष्ट्रीय पर्याय उभा करतील आणि मोदींसाठी तेच मोठे आव्हान असल्याचा शोध त्या चर्चेत मांडला जात होता. मात्र ज्या आधारावर आपण असला सिद्धांत मांडतो आहोत, तो आधार तरी पक्का आहे काय, त्याची तपासणी करण्याची कोणाला गरज भासली नाही. मजेची गोष्ट म्हणजे चाचणीकर्ता म्हणून दिर्घ अनुभव असलेला भाजपा नेता नरसिंहराव त्या बाबतील मत मांडत असताना हे जाणते पत्रकार त्याची खिल्ली उडवण्यात रममाण झाले होते. मात्र काही मिनीटातच त्यांचा भ्रमनिरास झाला. कारण ज्या माहितीच्या आधारे हे पांडीत्य चालले होते, ती माहिती देणारा चाचणीकर्ता यशवंत देशमुख स्टुडीओत आला व त्याने केजरीवाल मागे पडत असल्याचे ताजे आकडे दिले. मग त्याच केजरीवाल यांच्याकरवी उभारलेला तिसरा राष्ट्रीय पर्याय कोसळून पडला.

   अर्थात देशमुख यांनी शेवटी आणलेला आकडाही खात्रीचा नाही, तर नुसता अंदाजच होता. त्यामुळे केजरीवाल मागे पडलेले नाहीत. रविवारी प्रत्यक्षात मतांची मोजणी होईल तेव्हाच केजरीवाल मागे पडले, की त्यांच्या पक्षाने विक्रम केला ते सिद्ध व्हायचे आहे. तोपर्यंत घाईघाईने निष्कर्ष काढण्याची गरज नाही किंवा अन्य कुठल्या पक्षाला निकालात काढायचे कारण नाही. राजकीय पत्रकारिता करणारे वा अभ्यासक यांनी अंदाज करण्यापेक्षा आधीच्या निकालांच्या आधारावर निष्कर्ष काढणे शहाणपणाचे असते. गेल्या पाच सहा वर्षातले विविध निवडणूकांचे निकाल एक स्पष्ट कल दाखवत आहेत आणि तो त्रिशंकू स्थितीच्या विरोधी आहे. म्हणजेच कुठल्याही परिस्थितीत मध्यावधी निवडणूक घ्यायची वेळ येऊ नये, असे मतदान लोक करतात. जयललिता, ममता, मुलायम, नितीशकुमार यांना मिळालेला कौल त्याचे द्योतक आहे. आघाडीत असतानाही ममता, जयललिता वा नितीशकुमार यांना जनतेने दिलेला कौल त्यांचे मित्रपक्ष बाजूला झाले तरी स्थिर सरकार चालवण्याइतका स्पष्ट आहे. मग दिल्ली वा अन्य कुठल्या राज्यात त्रिशंकू स्थिती येण्य़ाशी शक्यता शिल्लक उरते काय? दिल्लीचा मतदार कॉग्रेसला नाकारताना केजरीवाल यांनाही स्पष्ट बहूमत देऊ शकेल अथवा भाजपाला सत्तेवर आणू शकेल. पण आघाडी वा फ़ोडाफ़ोडीला जागा शिल्लक ठेवणार नाही. हे सांगण्यासाठी चाचणीची गरज नाही. सहा निवडणूका जिंकणार्‍या डाव्या आघाडीला तिसर्‍या क्रमांकावर फ़ेकून बंगालच्या मतदाराने ममताला बहूमत व कॉग्रेसला दुसर्‍या क्रमांकाच्या जागा दिल्या. त्यापासून ज्यांना बोध घेता येत नाही, त्यांना राजकीय अभ्यासक तरी कशाला म्हणायचे? भाकिताची भुते नाचवण्याला जाणकार म्हणायचे असेल, तर ज्योतिषांनाच राजकीय चर्चेसाठी आमंत्रित करावे ना?

No comments:

Post a Comment