Wednesday, December 11, 2013

कॉग्रेस समिती कशासाठी?



   कुठल्याही पक्षात किंवा संघटनेत कार्यकारी मंडळ वा कार्यकारीणी असा एक मोजक्या महत्वाच्या सदस्यांचा गट असतो. पदाधिकारी वा नेत्यांच्या नावाने वा नेतृत्वाखाली चाललेल्या कारभाराला वेळोवेळी सल्लामसलत करायला किंवा आढावा घेण्यात मदत करायला असा गट सज्ज असतो. झालेल्या कामाचे अवलोकन करून त्यातल्या त्रुटी दाखवणे, त्याची चाचणी वा छाननी करणे, सुधारणा सुचवणे; यासाठी ही समिती मदत करत असते. जाहिरपणे ज्या चुका कबूल केल्या जात नाहीत वा दोष दाखवले जात नाहीत; त्यांचा उहापोह अशा समितीच्या बैठकीतून होत असतो. तिथे मग सर्वोच्च नेत्यालाही जाब द्यावा लागत असतो आणि जाब विचारलाही जात असतो. बाहेर नेत्याला सर्वोच्च वा निर्विवाद शहाणा ठरवणारे सहकारी; अशा बंद दरवाजाआड होणार्‍या बैठकीत धारेवर धरून जाब विचारत असतात आणि तो त्यांचा अधिकारच असतो. बाहेरच्या जगात विचारल्या जाणार्‍या प्रश्नांना व उपस्थित केल्या गेलेल्या शंकांना उत्तरे अशा बैठकीत द्यावी लागत असतात. घडून गेलेल्या घटना वा कृतीच नव्हे, तर आगामी योजना व धोरणांच्या यशापयशाचीही झाडाझडती तिथे घेतली जात असते. कुठल्या विषयावर, निर्णयावर कोणते आक्षेप घेतले जाऊ शकतात व त्यावर काय खुलासे देता येतील; त्याचाही आधीचा आढावा घेतला जात असतो. त्यासाठी कार्यकारीणी असते व तिच्या बैठका होतात. सर्वच पक्षांप्रमाणे कॉग्रेस पक्षातही अशी कार्यकारीणी आहे, पण तिच्या बैठकीत खरोखर असे काम चालते का? असा आढावा घेतला जातो काय? असेल तर त्या पक्षाला चार राज्यात आपला किती दारूण पराभव होऊ शकेल, त्याची आधीपासून कल्पना असायला हवी होती ना?

   चार राज्याच्या विधानसभा निवडणूकीत कॉग्रेस पक्षाची जी दयनीय अवस्था झाली आहे, त्यानंतर वरिष्ठ कॉग्रेस नेत्यांकडून येणार्‍या प्रतिक्रिया अडाणीपणाच्या म्हणाव्या लागतील. अंतिम निकाल हाती येण्यापुर्वीच राहुल व सोनियांनी पराभव मान्य केला आणि थेट आम आदमी पक्षाकडून शिकावे लागेल, असे विधान पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केले. सवाल इतकाच आहे, की काय शिकणार? शिकण्यासाठी दुसर्‍यांचे ऐकावे लागते आणि सहकार्‍यांना बोलण्याचे स्वातंत्र्यही द्यावे लागते. आज कॉग्रेस पक्षात सोनिया व राहुल यांच्या व्यतिरिक्त अन्य कुणा कॉग्रेसजनाला आपले मत व्यक्त करण्याचे वा कुठला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे काय? व्यक्तीगत सोडा, पक्षातल्या कुठल्या समिती वा कार्यगटाला तरी आपल्या स्वतंत्र बुद्धीने वागण्याची मुभा आहे काय? चार महिने खुली व बंदिस्त चर्चा केल्यावर मंत्रीमंडळाने एक अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला होता. जेव्हा त्यावर सार्वत्रिक चर्चा झाली आणि विरोधाचा सूर उमटला, तेव्हा अकस्मात पत्रकार परिषदेत येऊन उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आपले सरकार व पक्षाने घेतलेला अध्यादेशाचा निर्णय मुर्खपणाचा असल्याचा घोषणाच करून टाकली. त्यासाठी त्यांना संसदीय मंडळ, कार्यकारीणी यापैकी कुठे आपले ‘बहूमोल’ मत नोंदवण्याची गरज वाटली नाही. एका क्षणात त्यांनी आपल्या पक्षाचे संसदीय मंडळ, कार्यकारीणी, व मंत्रीमंडळाला मुर्ख घोषित करून टाकले. त्याचा साधासरळ अर्थ इतकाच आहे, की घटनात्मक व कायदेशीर तरतुद म्हणुन पक्षांतर्गत अशा समित्या व कार्यगट नेमले जातात. पण त्यापैकी कोणाला आपली बुद्धी वापरण्याचा वा मत व्यक्त करण्याचा अधिकार नसतो. मग इतकाच प्रश्न उरतो, की अशी कॉग्रेस कार्यकारीणी नेमके काय काम करते व कशासाठी आहे?

   गेल्या निदान तीन दशकाचा अनुभव असा आहे, की पक्षश्रेष्ठी म्हणजे जो कोणी कॉग्रेस पक्षाचा अध्यक्ष असतो किंवा जेव्हा तिथे नेहरू गांधी घराण्याचा कोणी पक्षप्रमुख असतो; त्याच्या सुरात सुर मिसळण्याची कुवत असणार्‍यालाच कार्यकारीणी वा संसदीय मंडळात स्थान मिळू शकत असते. मग ते नरसिंहराव असोत किंवा सीताराम केसरी असोत. त्यांचे नेतृत्व कितीही अपेशी ठरो किंवा नाकर्ते असो; तेच किती उत्तम व यशस्वी नेतृत्व आहे, त्याची पोपटपंची करणे, इतकेच कार्यकारीणीचे काम असते. त्यांच्या चुकाच नव्हेतर मुर्खपणाला टाळ्या वाजवणे व समर्थन करणे, यासाठी कॉग्रेस पक्षात अशा कार्यगट आणि समित्या स्थापन होतात वा नेमल्या जातात. जेव्हा सामान्य जनता वा मतदार अशा नेतृत्वावर शंका व्यक्त करून पक्षाला दणका देतो; तेव्हा कार्यकारीणीचा पहिला प्रस्ताव नेतृत्वावर विश्वास व्यक्त करणारा असतो. १९९९ सालात कॉग्रेसने ११२ जागा जिंकून इतिहासातील सर्वात मोठे अपयश संपादन केले, त्यावेळी सोनियांच्या नेतृत्वावर असाच विश्वास व्यक्त झाला होता आणि आज राहुल गांधींचे गुणगान अपयशानंतरही चालू आहे. दोन महिन्यांपुर्वी जयराम रमेश यांनी मोदी हे कॉग्रेस समोरचे आव्हान असल्याचे मान्य केल्यावर सत्यव्रत चतुर्वेदी म्हणाले, असे वाटत असेल तर रमेश यांनी भाजपात चालते व्हावे. आज तेच चतुर्वेदी पक्षात खुशमस्कर्‍यांचे वर्चस्व असल्याचे बोलतात. ज्या केजरीवाल वा त्यांच्या ‘आप’ पक्षाला निकाल लागेपर्यंत कॉग्रेसजन फ़डतूस ठरवत होते, त्याच्याकडून खुप काही शिकायला हवे, असे राहुल म्हणाले, त्याबद्दल त्यांना कुठल्या कॉग्रेसजनाने अजून धारेवर धरलेले नाही. याचा अर्थ काय घ्यायचा? कॉग्रेसमध्ये बाकीच्या समित्या वा कार्यगट आवश्यक आहेत काय? चमचेगिरीपेक्षा त्यांना दुसरे काही काम आहे का?

No comments:

Post a Comment