दिल्लीत शेवटच्या क्षणी किरण बेदी यांना भाजपाने आपल्या पक्षात आणून थेट मुख्यमंत्री पदाचे उमेदवार बनवल्याने झोड उठली आहे. प्रामुख्याने आम आदमी पक्षाने त्यावर अधिक गरळ ओकली आहे. त्यांनाही दोष देता येत नाही. कारण बेदी हे त्यांच्यासाठी खरोखरच राजकीय आव्हान आहे. आपलीच जुनी सहकारी भाजपात गेल्याने धुतल्या तांदळासारखा नेता असला आता मक्ता त्यामुळे त्यांनी गमावला आहे. पण विषय तेवढ्यापुरता नाही. राजकीय पक्ष व त्यांची विचारसरणी असा मुद्दा आहे. कुठल्या कारणास्तव आम आदमी पक्ष भाजपाचा विरोधक आहे आणि कशामुळे कॉग्रेस भाजपा यांच्यात भांडण आहे? कुठल्याही पक्षाकडे आज विचारसरणी उरलेली नाही. त्यामुळे विचारांसाठी उभे रहाणे वा लढणे, ही राजकीय पक्षाची मूळ कल्पना आहे. त्याचाच अस्त झाला आहे. मागल्या खेपेस कॉग्रेस विरोधात झुंज देऊन केजरीवाल यांनी आपल्या पक्षाला इतके मोठे यश मिळवून दिले होते. पण नंतर त्याच कॉग्रेसच्या पाठींब्यावर त्यांनी सत्तेची झुल पांघरली होती. त्यापेक्षा त्यांनी सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपाला अल्पमताचे सरकार चालवू दिले असते तर? बहूमताअभावी त्यांना मनमानी करता आली नसती आणि केजरीवाल यांचा पक्ष सत्तालोलूप नसल्याची ग्वाही पुढल्या काळात देता आली असती. अधिक आपण गुणात्मक बदल करू इच्छितो, असेही छाती फ़ुगवून केजरीवाल बोलू शकले असते. किंबहूना त्यांचेच सहकारी प्रशांत भूषण यांनी तेव्हाच तशी कल्पना जाहिरपणे मांडली होती. मुद्द्याच्या आधारावर भाजपाला ‘आप’ पाठींबा देऊ शकेल, असे भूषण म्हणाले होते. पण केजरीवाल यांनी त्याला वैयक्तिक मत ठरवू विषय निकालात काढला. तेव्हापासून एक प्रश्न अनुत्तरीत राहिला आहे. बाकीच्या नेत्यांची वैयक्तीक मते असतात, तर एकट्य़ा केजरीवाल यांचे कुठलेही वक्तव्य पक्षाचे अधिकृत मत वा धोरण कसे असू शकते?
इथे एक गोष्ट लक्षात येते, की आम आदमी पक्षाला कुठलेही धोरण वा विचारसरणी नसून केजरीवाल यांना त्या त्या क्षणी जसा झटका येईल व ते बोलतील; तेच पक्षाचे धोरण वा विचारसरणी असते. थोडक्यात त्या पक्षापासी कुठले धोरण नाही किंवा कुठलीही विचारसरणी नाही. भ्रष्टाचार निर्मूलन हा त्यांचा एक कलमी कार्यक्रम आहे आणि भ्रष्टाचार म्हणजे काय, त्याची व्याख्या केजरीवाल म्हणतील तशी वेळोवेळी बदलत असते. निवडणूकीपुर्वी जुन्या नेत्यांनी सरकारी बंगला गाडी घेणे, म्हणजे भ्रष्टाचार असतो आणि मुख्यमंत्री झाल्यावर केजरीवाल यांनी त्या सवलती उकळल्या, तर भ्रष्टाचार नसतो. थोडक्यात केजरीवाल कोलांट्या उड्या मारतील, तशी ‘आप’ची विचारसरणी बदलत असते. अशा कसरतींनी लोकांना काहीकाळ उल्लू बनवता येते. पण सातत्याने अशा कसरती करू लागलात, मग त्यातला खोटेपणा लोकांच्या लक्षात येऊ लागतो. आताही तेच झाले आहे. म्हणूनच केजरीवाल यांचे खंदे पाठीराखे व थोर कायदेपंडीत शांतीभूषण यांनी केजरीवाल यांच्यासह त्या पक्षाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह लावत किरण बेदी यांची पाठ थोपटली आहे. परिणामी केजरीवाल यांचे खुल्या चर्चेचे बेदींना दिलेले आव्हान बाजूला पडले असून, भूषण यांच्या नव्या वक्तव्याने आम आदमी पक्षाला पळता भूई थोडी केली आहे. तशी वेळ त्यांच्यावर येण्याचे काही कारण नव्हते. भाजपा वा बेदी यांच्यावर बेताल आरोप करण्यापेक्षा आपला गमावलेला दिल्लीतला पाठींबा मिळवण्यावर केजरीवाल यांनी लक्ष केंद्रित केले असते, तर अधिक लाभदायक ठरले असते. पण दिड वर्षात लोकांना भुलवायला ज्या युक्त्या योजल्या; त्या जुन्या होऊन गेल्यात, याचेही भान केजरीवालना राहिलेले नाही. त्यातली जादू संपलेली आहे. म्हणूनच खुल्या चर्चेचे त्यांनी बेदींना दिलेले आव्हान फ़ुसके व फ़सवे होते. त्यातली हवा एका दिवसात निघून गेली आहे.
मुळात केजरीवाल व त्यांच्या राजकीय पक्षाचा फ़ुगा माध्यमांनी फ़ुगवलेला होता आणि तो यथावकाश फ़ुटला. माध्यमांना सतत काही सनसनाटी हवी असते आणि ती शोधण्यापेक्षा आयती मिळाली, तर पत्रकार त्यावर हावर्यासारखे तुटून पडतात. आताही तेच झाले. बेदींचे नाव जाहिर होताच, खुल्या चर्चेचे आव्हान ही सनसनाटी करून काहुर माजवण्यात आले. त्यात तसूभर कुठले नाविन्य नव्हते. असेच आव्हान मागल्या विधानसभा व लोकसभा निवडणूकीत केजरीवाल यांनी शीला दिक्षीत व मोदींना दिले होते. त्यांनी तिकडे ढुंकूनही बघितले नाही. शीला दिक्षीत बदनाम होत्या म्हणून पराभूत झाल्या आणि मोदींची हवा असल्याने केजरीवाल यांचा सुपडा लोकसभेत साफ़ झाला. मुद्दा असा, की आव्हान देणारे केजरीवाल कोण लागून गेलेत? आपले भाडोत्री सहासात हजार पगारी सोबती घेऊन सगळीकडे रोडशो करण्यातून कॅमेराची दिशाभूल होऊ शकत असेल. पण स्थनिक मतदार जनतेची फ़सगत होत नसते. बंगलोर मुंबईपासून वाराणशीपर्यंत सर्वत्र तीच गर्दी फ़िरवून प्रतिसादाचे नाटक केजरीवाल यांनी छान रंगवले होते. पण साडेचारशे जागी अनामत रक्कम गमावल्यावर त्या गर्दीचे पितळ उघडे पडले. खुल्या चर्चेचे आव्हान द्यायचे. अमूकतमूक करायचे आग्रह धरायचे आणि मग माध्यमांनी त्यासाठी इतर पक्षाच्या नेत्या उमेदवारांचा पाठपुरावा करायचा; हा काय खुळेपणा आहे? प्रत्येक पक्ष आपल्या अजेंडानुसार प्रचार करतो वा मोहिमा चालवतो. तो कसा चालवायचा याच्या अटी घालणारे केजरीवाल कोण लागून गेलेत? माध्यमे वा पत्रकार केजरीवाल यांच्या राजकीय उत्पादनाचे विक्रेते एजंट झालेत काय? नसतील तर केजरीवाल पुढे करतील, तो माल घेऊन अन्य पक्षांच्य दारात त्याची विक्री करायचे उद्योग माध्यमांनी करायचे कारणच काय? तर यामागे ठराविक डाव दिसतो. पद्धतशीर योजलेले कारस्थान असू शकते.
‘ज्यांना तुम्ही पटवू शकत नसाल, त्यांची दिशाभूल करा’ अशा अर्थाचा एक इंग्रजी वाक्प्रचार आहे. हा सगळा प्रकार काहीसा तसाच चालला आहे. केजरीवाल यांचा अजेंडा भाजपा वा कॉग्रेसच्या गळ्यात मारण्याचा माध्यमांचा अट्टाहास कशाला? केजरीवाल कधीच मुद्देसूद बोलत नाहीत. आपल्या प्रत्येक प्रचारसभेत अनुयायांची गर्दी करून पुर्वनियोजित संवाद ते घडवतात. प्रतिसादातून येणारा ‘कोरस’ त्याची साक्ष आहे. अन्य कुठल्याही नेता वा पक्षाच्या प्रचारसभेत असा एकसुरी कोरस ऐकायला मिळत नाही. अगदी आपल्यावर खोटे हल्ले घडवून आणायचेही नाटक केजरीवाल यांनी यशस्वीरित्या सादर केलेले आहे. पण आता त्यातले नाविन्य संपलेले आहे. मात्र त्यांच्या काही माध्यम समर्थकांना अजून त्या जादूने भारलेले असावे. म्हणून मग अशा नाटकाचे प्रयोग आणखी रंगवले जात असतात. चर्चेचे आव्हान बेदींनी स्विकारले नाही, म्हणजे त्यांनी पळ काढला असे पळपुटेपणाचे विनाविलंब झालेले आरोप, त्याचा पुरावा आहे. रोज प्रत्येक मोबाईल फ़ोनवर काहीतरी टेलेमार्केटींगचे फ़ोन येतच असतात. ती कटकट नको म्हणून आपण तो फ़ोन थेट काटतो. याचा अर्थ आपण पळपुटे असतो काय? नसू तर केजरीवालचा माल गळ्यात मारणार्या एजंटाला नकार देणार्या बेदी पळपुट्या कशाला असतील? केजरीवाल यांच्या पक्षाच्या अन्य नेत्याच्या सभा वा रोडशो असताना तशी गर्दी कशाला दिसत नाही? त्याचे चित्रण कुठली वाहिनी का दाखवत नाही? यातच ‘लोटणार्या दिखावू गर्दीचे’ रहस्य लपलेले आहे. विचारहीन व धरसोडवृत्तीने पक्ष चालत नसतात. राजकारण व सरकार चालवणे दूरची गोष्ट झाली. अशा पद्धतीने लोकांची काहीकाळ दिशाभूल जरूत होऊ शकते. पण त्यांना ‘पटवता’ येत नसते. हे पत्रकार माध्यमांनीही लौकर समजून घेणे आवश्यक आहे. नाहीतर उरलीसुरली विश्वासार्हताही माध्यमे गमावून बसतील.
भाऊ उत्कृष्ट लेखन
ReplyDeleteमस्त
पत्रकारांनी आतातरी शहाणे व्हावे
जे आपणास समजते ते इतर पत्रकारांना का समजत नाही
Bhau , aajhi Tumhala ase vaat te ka ki Kejriwaal aani AAP cha fuga Madhmyani fugavla hota?
ReplyDelete