Sunday, January 18, 2015

‘आप’चे मनसुबे विस्कटले?



दिल्लीच्या निवडणूकीची रणभूमी आत दुमदुमू लागली आहे. तिथे लढण्यासारखी कॉग्रेसची परिस्थितीच नाही. पण विधानसभा व लोकसभा अशा दोन मतदानात केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने राजधानीतला दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष म्हणून स्वत:ला प्रस्थापित केले आहे. सहाजिकच दुबळी कॉग्रेस अशा गृहीतावर भाजपाला ही लढाई जिंकता येणार नाही. त्याला खरी झुंज ‘आप’शी द्यावी लागणार आहे. मात्र जितका भाजपा संघटित आहे व साधनांनी संपन्न आहे तितका केजरीवालांचा पक्ष सामर्थ्यशील नाही. त्याची मदार दोन गोष्टींवर आहे. एक म्हणजे केजरीवाल यांची व्यक्तीगत लोकप्रियता व प्रतिमा हे त्या पक्षाचे एकमेव भांडवल आहे. दुसरी गोष्ट आहे मोजक्या पण झुंजणार्‍या कार्यकर्त्यांची फ़ौज. भाजपाकडे संघाच्या स्वयंसेवकांची फ़ौज आहे त्याच धर्तीवर आपचे झुंजणारे कार्यकर्ते आहेत. कसल्याही पदाची आहा न बाळगता केजरीवाल यांच्याशी निष्ठा बाळगणार्‍यांची ही फ़ौज त्या पक्षाची मैदानातली ताकद आहे. फ़ौज याचा अर्थ लक्षात घेण्यासारखा आहे. कुठल्याही पराभवाने विचलीत न होणारी नेत्यावरील श्रद्धा ही अशा स्वयंसेवकाच्या स्वभावातच असते. तसे आपले पाठीराखे केजरीवाल यांनी गेल्या काही वर्षात निर्माण केलेले आहेत. त्याच्या बळावर त्यांनी पक्ष काबुत ठेवला आहे. ती गर्दी घेऊन त्यांनी अण्णांचे आंदोलन यशस्वी करून दाखवले. वाराणशी असो किंवा मुंबई असो, तीच आठदहा हजार स्वयंसेवकांची गर्दी घेऊन केजरीवाल फ़िरत होते. म्हणून त्यांना वाराणशीत लढा देणे शक्य झाले आणि बालेकिल्ला असलेल्या दिल्लीत त्यांच्या पक्षाचे पानिपत होऊन गेले. या स्वयंसेवकांशिवाय आम आदमी पक्षाला अस्तित्वच नाही. म्हणून अन्य नेते दिसायला असले तरी त्यांचा शब्द पक्षात चालत नाही. केजरीवाल यांचाच निर्णय तिथे अंतिम असतो. म्हणून दिल्लीत भाजपाला त्यांच्याशीच झुंज द्यावी लागणार आहे.

अर्थात संघाचे स्वयंसेवक आणि आपचे स्वयंसेवक यांच्यात मूलभूत फ़रक आहे. संघाचे स्वयंसेवक शिस्तबद्ध असतात. आपचे स्वयंसेवक वेळ आली तर हाणामारीलाही उतरतात. म्हणजे गरजेनुसार कार्यकर्ता व गरजेनुसार दंगलखोर अशी रुपे ‘आप’चे कार्यकर्ते बदलू शकतात. संघ स्वयंसेवकाला ते जमणारे नाही. तिथे मग भाजपाचे थेट रस्त्यावरचे कार्यकर्ते आवश्यक असतात, जे प्रसंगी दोन हात करायला सज्ज असतात. असो, मुद्दा आहे तो दिल्लीच्या आगामी लढतीचा. त्यात म्हणूनच आप विरुद्ध भाजपा अशीच थेट लढत व्हायची आहे. त्यात कॉग्रेसला फ़ारसे स्थान उरलेले नाही. साध्या सभेला गर्दी जमवणेही आताशा कॉग्रेसला साधेनासे झाले आहे. उलट मोठ्या सभा घेण्यावर केजरीवाल यांचा कधीच भर नव्हता. त्यांनी दोन महिने आधीच गल्लीबोळात सभांचा सपाटा लावला आहे. गेल्या वेळी म्हणजे चौदा महिन्यापुर्वीही त्यांनी हाच प्रकार केला होता व त्याचे लाभ त्यांना मिळाले. पण मधेच दिल्लीला वार्‍यावर सोडून लोकसभेच्या लढतीमध्ये उडी घेऊन केजरीवाल यांनी दिल्लीकरांची निराशाच करून टाकली. आज त्याच निराशेशी त्यांना अधिक झुंजावे लागणार आहे. म्हणूनच ज्या जनलोकपालच्या आग्रहासाठी राजिनाम्याचे नाटक रंगवले त्याचाच केजरीवाल यांच्या भाषणात आता उल्लेखही येत नाही. भ्रष्टाचार व जनलोकपाल विसरून त्यांनी दिल्लीला स्थायी सरकार देण्याचेच प्रमुख आश्वासन देण्याची घोकंपट्टी चालविली आहे. कारभार करू असे त्यांना सातत्याने सांगावे लागत आहे. त्यामागची कारणे उघड आहेत. दिलेल्या संधी आपण मातीमोल केल्याची ती कबुलीच आहे. यापुढे तशा संधीचे आपण सोने करू असेच एकप्रकारे केजरीवाल दिल्लीकरांना साम्गत आहेत आणि तेवढ्या बळावर दिल्लीकर आपल्याला माफ़ करून पुन्हा यश देतील अशी खात्री केजरीवाल यांना होती. म्हणूनच त्यांनी आक्रमक प्रचार आरंभला होता.

या सर्व रणनितीमध्ये आणखी एक महत्वाचे गृहीत होते. कॉग्रेस वा भाजपापाशी दिल्लीचे मुख्यमंत्री होण्यासाठी कोणी खमक्या नेता वा चेहरा नाही, म्हणूनच दिल्लीकर जनतेला आपल्याशिवाय पर्याय नाही, ही केजरीवाल यांना जमेची बाजू वाटली होती. मतदानाचा कार्यक्रम जाहिर झाल्यावर त्यालाच भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी सुरूंग लावला. केजरीवाल यांच्या उदयकालातील निकटवर्ती सहकारी व त्यांच्या अंधाधुंद राजकारणाच्या कडव्या विरोधक असलेल्या किरण बेदींना भाजपात प्रवेश देऊन भाजपाने आपची रणनितीच उध्वस्त करून टाकलेली आहे. कारण बेदींनी केजरीवाल यांच्या राजकीय पक्ष स्थापनेला विरोध करून वेगळेपणा दाखवला होता आणि नंतरही अण्णांना लोकपाल कायदा होईपर्यंत साथ दिलेली होती. केजरीवाल मुख्यमंत्री झाल्यावरही त्यांच्या अराजकीय वागण्यावर बेदी कडवी टिका करत राहिल्या होत्या. दिल्लीला आंदोलने नको असून कारभार करणारा मुख्यमंत्री हवाय असे त्या सातत्याने सांगत राहिल्य होत्या. स्वत:च पोलीस अधिकारी म्हणून दिल्लीत चोख कारभार करणार्‍या बेदींची उत्तम प्रतिमा त्यामुळेच राहिली आहे. अशी व्यक्ती नवा मुख्यमंत्री म्हणून दिल्लीकरांपुढे भाजपा आणेल ही केजरीवाल यांची अजिबात अपेक्षा नव्हती. निदान आपल्या तोडीस तोड चेहरा भाजपाकडे नाही, याची खात्रीच आपची उर्जा होती. त्यांना दोनतीन महिने तसेच गाफ़ील ठेवून भाजपाने अखेरच्या क्षणी किरण बेदींना पक्षात आणून दिलेला दणका म्हणूनच मास्टर स्ट्रोक म्हणावा लागेल. त्या प्रवेशानंतर केजरीवाल व त्यांच्या सहकार्‍यांची उडालेली भंबेरी त्याचीच साक्ष देते आहे. पहिल्या दिवसापासून आपकडून बेदी यांच्यावर सुरू झालेली टिकेची झोड त्याचा पुरावा आहे. त्यामध्ये आपकडून होणारे युक्तीवाद कमालीचे हास्यास्पद व गैरलागू आहेत. त्यातून या पक्षाचा धीर सुटल्याचे लक्षात येते.

तसे बघितल्यास जुन महिन्यातच बेदी भाजपात जाण्याचे संकेत मिळालेले होते. दिल्लीत स्थगीत विधानसभेत काही आमदार जोडून भाजपा नवे सरकार बनवणार व त्यात किरण बेदी मुख्यमंत्री असतील अशा वावड्या उठल्या होत्या. त्याला बेदींनी जाहिर प्रतिसादही दिला होता. पण तसे काही घडले नाही आणि तो विषय मागे पडत गेला. आताही दोन महिने दिल्लीची विधानसभा बरखस्त होण्याच्या काळातही कुठे बेदी यांचे नाव नव्हते. म्हणजेच किरण बेदींना मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार म्हणून भाजपात आणायचा निर्णय होऊनही तो गोपनीय राखला होता. त्याबद्दल भाजपातही कोणी बोलत नव्हते आणि बेदी यांच्याकडूनही कुठली वाच्यता मागल्या सहा महिन्यात झाली नाही. याचा अर्थच अखेरच्या क्षणी राजकीय धक्का देण्यासाठी हा निर्णय गोपनीय राखला गेला असाच त्याचा अर्थ होतो. कुठलेली गौप्यस्फ़ोट करण्यात उस्ताद असलेल्या केजरीवाल यांनाही त्याचा अखेरपर्यंत थांग लागला नाही, हे विसरता कामा नये. निवडभूकीचे वेध लागले आणि मतदानाचा कार्यक्रम जाहिर झाल्यावरच एक दिवस आधी याचा गवगवा झाला. त्याआधी भाजपाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोणता असे खिजवून केजरीवाल व त्यांचे सहकारी विचारत होते. त्यांनीच आता बेदी यांच्यावर भडीमार करण्याचे कारण काय? त्या भडीमारातून आपचे नेतृत्व विचलीत झाल्याचेच कळत नाही काय? दोन महिने त्यांनी मोदींवर केलेला टिकेचा भडीमार या एका खेळीने वाया गेला आणि आता नव्याने त्यांना दिल्लीकरांपुढे नव्या भाजपा चेहर्‍यावर हल्ला करावा लागणार आहे. म्हणूनच ह्या एका पक्षप्रवेशाने आपची एकूण रणनितीच विस्कटली असे म्हणावे लागते. त्या पहिल्या धक्क्यातून सावरल्यावर शाझीया इल्मी हा दुसरा धक्का आहे. पण त्याविषयी नंतर चर्चा करता येईल. सध्या भाजपा व अमित शहांनी केजरीवाल यांचे मनसुबे विस्कटले हे नक्की.

No comments:

Post a Comment