‘टिळक स्मारक मंदिरात आत्ताच मिस्टर अॅण्ड मिसेस नाटकाचा १५२ वा प्रयोग झाला. हा प्रयोग पुणे बार काऊन्सीलने घेतला होता. प्रेषकांमध्ये विकील किंवा न्यायाधीश आणि त्यांचे कुटुंबीय होते. नाटकभर प्रेक्षकांमधून अश्लील शेरेबाजी होत राहीली. इतकी की एका पॉइंटला नाटक थांबवावं लागलं. पुढे अर्थात प्रयोग पार पडला. पण या गोष्टीतून पुन्हा एक जाणवलं की आपल्या देशात 'शिक्षण' आणि 'सुसंस्कृतपणा' यांचा काहीही संबंध नाही. शेम’ - चिन्मय मांडलेकर, अभिनेता
प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला यासारखे एका अभिनेत्याचे वक्तव्य वाचायचे आपल्या नशीबी यावे, इतके कुठल्याही भारतीयाचे दुर्दैव नसेल. कारण त्यातून त्याचे शब्द नुसते कुणाला दुषणे देत नसून, स्वत:ला अभिजनवर्ग समजणार्या व जागरूक नागरिक भासणार्या वर्गाबद्दल खंत व्यक्त केली आहे. आपल्या अनुभवातून चिन्मय याने ती व्यथा व्यक्त केली आहे. ज्यांच्याकडून कायद्याचा सन्मान राखला जावा आणि त्यासाठी कायद्यानुसार सभ्य वर्तनाचा आदर्श समाजापुढे ठेवला जावा, अशी अपेक्षा चिन्मयप्रमाणे आपण सगळेच करीत असतो, त्यांच्याकडून असे कृत्य घडले आहे. रस्त्यावरच्या एका जमावाने वा अन्य कुणा संघटित घटकाने अशाप्रकारे सभ्यतेला तिलांजली देऊन हाणामारी वा मोडतोड केली, मग त्यांना कायद्यानुसार वागायचे सल्ले देणारी मंडळी कोण असतात? कायदा हातात घेऊ नये, असा उपदेश करणारे कोण असतात? नुसते वकील नव्हेतर समाजातला जो कोणी प्रतिष्ठीत सुशिक्षित वर्ग असतो, तो सगळाच अशा धसमुसळ्या बेशिस्तीवर कोरडे ओढायला पुढे सरसावत असतो. त्यामागे आपण सुशिक्षित म्हणून सभ्य आहोत, असा एक गृहीत अहंकार असतो. त्यावरच चिन्मयने असे भाष्य केले आहे. शिक्षण आणि सुसंस्कृत असणे यांचा काहीही संबंध नाही, असे म्हणायची पाळी त्याच्यावर आलेली आहे.
चिन्मयसारखा एक संवेदनशील कलावंत असे म्हणतो, तेव्हा आजच्या अभिजनवर्गाने त्याच्याच नव्हेतर एकूण समाजापुढे कोणते आदर्श ठेवलेत, असाही प्रश्न पडणारच. कारण जी व्यथा वा उद्वेग त्याने आपल्या सोशल नेटवर्क व्यासपीठावरून व्यक्त केला आहे, तोच अनुभव कमीअधिक प्रमाणात अलिकडे सातत्याने सामान्य माणसाला बहुतांश समाजजीवनात येत असतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, लेखन वा भाषण स्वातंत्र्य म्हणून ज्याचा इतका टेंभा मिरवला जातो, त्याच स्वातंत्र्याच्या अर्थ स्वैराचार होत नाही. त्याच्यासोबत जबाबदार्याही येत असतात. कुठले उपकरण कुठे वापरावे आणि कुठे जपून वा वापरूच नये, याचे भान ज्याला नसते, अशा कुणाच्याही हाती असे उपकरण सोपवणे समाजासाठी नेहमीच घातक असते. आपल्याला सुशिक्षित म्हणवणार्या व मिरवणार्या लोकांमध्ये त्याच जबाबदारीचा संपुर्ण अभाव आढळतो. मिळालेल्या स्वातंत्र्याचा स्वैर वापर करायचा आणि त्याचे विपरीत परिणाम भोगायची पाळी आली; मग त्याच स्वातंत्र्याच्या अधिकाराची ढाल पुढे करायची, असली बदमाशी सर्रास होत असते. एखाद्या वृत्तपत्र वा वाहिनीच्या कचेरीत घुसून दंगा करणारे आणि अशा नाटकाच्या प्रयोगात व्यत्यय येण्यापर्यंत चढ्या आवाजात ताशेरे झाडणारे यात किती गुणात्मक फ़रक असतो? त्यांना त्या नाटकाबद्दल प्रतिक्रिया देण्याचा अधिकार जरूर असतो, पण नाटकात व्यत्यय आणण्यापर्यंत त्या अधिकाराची कक्षा पोहोचत नसते. चिन्मय तिथेच लक्ष वेधतो आहे. म्हणूनच त्याने सुसंस्कृतपणावर प्रश्नचिन्ह लावले आहे. कारण त्याने सादर केलेल्या नाटकाच्या अभिव्यक्तीचे अवलोकन करून ती समजून घेण्यापेक्षा त्याच्या अभिव्यक्तीमध्येच व्यत्यय आणण्यापर्यंत इथे असभ्य वर्तन झालेले आहे. आणि हा अनुभव एकट्या चिन्मयचा वा त्याच नाट्यप्रयोगापुरता नाही. बारकाईने बघितल्यास आजची वृत्तवाहिन्यांची कामगिरी त्याच दिशेने वहावताना दिसते आहे.
गेल्या आठवड्यात भारताचे नवे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर एका समारंभाच्या निमीत्ताने मुंबईत आले होते आणि त्यांनी भारताच्या सुरक्षा धोरण व सज्जतेविषयी काही गंभीर मतप्रदर्शन केले. त्यांच्याच व्यासपीठावर निवृत्त लेप्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकरही बसलेले होते. यातले शेकटकर महत्वाचे अशासाठी, की त्यांनी नुसतीच लष्करी सेवा केलेली नाही, तर सेनेच्या गुप्तचर विभागाचे कामही काहीकाळ त्यांनी केलेले आहे. सहाजिकच सुरक्षा व सज्जता याविषयी पर्रीकर काय बोलतात, त्याचे आकलन अन्य कुणा सामान्य व्यक्ती नागरिकापेक्षा शेकटकर यांना अधिक होऊ शकते. कारण पर्रीकर यांनी उपस्थित केलेले मुद्दे, त्यांनी कृतीत अनुभवलेले असू शकतात. तेच शेकटकर संरक्षणमंत्र्यांच्या विधानाविषयी काही बोललेले नाहीत. पण त्यातले एक वाक्य घेऊन माध्यमांनी जो कल्लोळ गेल्या दोनतीन दिवस चालविला होता, त्यामध्ये वेगळा असभ्यपणा नाही. ज्या विषयाची खोली व गांभिर्य आपल्याला ठाऊक नाही, त्याविषयी सामान्य बुद्धीच्या पत्रकारांनी किती मुक्ताफ़ळे उधळावीत? पर्रीकरांनी माजी पंतप्रधानांच्या हलगर्जीपणाचा उल्लेख केला, म्हणून हा कल्लोळ माजवण्यात आला. कारण त्यांचा रोख मग कॉग्रेसच्याच माजी पंतप्रधानांकडे असणार हेच गृहीत आहे. पण यापैकी एकाही अतिशहाण्याने कुठल्या सज्जतेमध्ये हलगर्जीपणा झाला, त्यावर सवाल विचारलेला नाही. पंतप्रधान कोण एवढीच दोरी घेऊन साप साप म्हणून भुई धोपटण्याचा उद्योग चालला. पर्रीकर यांना कॉग्रेसवर खापर फ़ोडायचे असते, तर चीनकडून हार होण्यापासून सिमला कराराची अंमलबजावणी न होण्य़ापर्यंत अनेक मुद्दे पुढे आणता आले असते. पण त्यांनी त्याबद्दल बोलायचे टाळले. तर त्यांच्या वक्तव्याचा अर्थ तरी समजून घेण्याची बुद्धी असायला हवी की नाही? पण चिन्मयच्या नाटकात जशी भुरटेगिरी झाली, त्यापेक्षा पर्रीकरांवर झालेले शरसंधान तसूभर वेगळे नाही.
मुळात पर्रीकर आताच संरक्षण खात्यात आताच आलेले आहेत आणि कामाची सुत्रे हाती घेत आहेत. अशावेळी पोरबंदरची घटना घडली. त्यानंतर असाच शंका व प्रश्नांचा भडीमार त्यांच्यावर झालेला होता. वास्तविक पोरबंदरची कारवाई तटरक्षक दलाकडून झालेली होती. तो विभाग केंद्रीय गृहखात्याच्या अखत्यारीत येतो. पण अतिशहाणे संरक्षणमंत्र्यावर घसरले आणि प्रश्नांची सरबत्ती पर्रीकर यांच्यावर करण्यात आली. ज्यांची अक्कल इतकीच असेल, त्यांना संरक्षणमंत्री सुरक्षा सज्जता असे शब्द कशाला वापरतो, त्याचा अर्थ कसा उमजणार? आणि जो विषयच उमगलेला नाही, त्यावर आपली अक्कल पाजळत सुटले, मग भरकटण्याला पर्यायच नसतो. त्यांनी आपल्या भाषणात ‘डीप असेटस’ अशा शब्दाचा वापर केलेला आहे. त्यावर प्रश्नचिन्ह लावणार्या कितीजणांना त्याचा व्यवहारी अर्थ उमजला आहे? कुठला पंतप्रधान हे खोदून खोदून विचारणार्यांना ‘डीप असेटस’ विषयी कुठलेही कुतूहल नसावे, इथेच बुद्धीची दिवाळखोरी लक्षात येते. सामान्य माणसाला वा वाचकालाही त्या शब्दाचा व्यवहारी अर्थ लक्षात येणार नाही. पण लष्करी सेवा व गुप्तचर विभागात काम केलेल्या शेकटकरांना तरी त्याविषयी विचारायला काय हरकत होती? भाषणाचे चित्रण करणार्यांना ते शब्द एका सेनाधिकार्याकडून समजून घेण्याची सोय तिथेच उपलब्ध होती. पण ब्रेकिंग न्युज देण्याच्या घाईगर्दीत बातमी हरवली, तरी कोणाला फ़िकीर आहे? विनाविलंब पर्रीकराच्या विधानावर ताशेरे झाडण्याचा उद्योग सुरू झाला. आपल्याला जे समजले नाही, त्यावर विविध पक्षाच्या नेत्यांच्याही प्रतिक्रिया येऊ लागल्या. असेट म्हणजे काय ते विचारण्यापेक्षा त्या पंतप्रधानाचे नाव विचारण्यासाठी रांग लागली. इथे शिक्षणाचा व अकलेचाही संबंध तुटल्याचाच अनुभव येत नाही का? पर्रीकर नेमके काय म्हणाले व त्याचे संदर्भ काय, ते म्हणूनच मुळात समजून घ्यावे लागेल. (अपुर्ण)
भाऊराव,
ReplyDeleteपररीकर यांनी काही माजी पंतप्रधानांनी भारताचे आतल्या गोटातले हितसंबंधी उघडे पडल्याचा (डीप असेट्स कॉम्प्रमाईझ्ड) असा उल्लेख केला आहे. ते पुढे म्हणाले की अनेक लोकांना ही नावे ठाऊक आहेत. म्हणजे किमान दोन तरी असे पंतप्रधान असावेत. यावरून थोडा अंदाज लावत येतो.
पहिलं नाव मोरारजी देसाई येतं. भारत आणि पाकिस्तानने एकमेकांशी सहकार्य करायला हवं अशी विनवणी भुत्तोंनी मोरारजींना केली. या गांधीगिरीस मोरारजी लगेच भुलले. त्यांनी भारताच्या किमान एका महत्त्वाच्या हेराची माहिती भुत्तोंकडे उघडी केली. बदल्यात भुत्तोनी तोंडाला पानं पुसली हे वेगळे सांगणे नलगे. मोरारजींना निशाणे पाकिस्तान हा पुरस्कार मात्र मिळाला.
दुसरं नाव इंदरकुमार गुजराल आहे. १९९० च्या आसपास पाकिस्तानातले भारतानुकूल हेरजाळे नष्ट करण्यात आले. मोरारजी स्वत:ला गांधीवादी म्हणवून घ्यायचे, तर गुजराल सोनिया गांधीवादी होते. एकंदरीत राजकीय गांधीवाद ही भारत पोखरणारी कीड आहे.
यांत मनमोहनसिंग बहुधा मोडत नसावेत. ते स्वच्छ चेहरा म्हणून होते. त्यांना कळसूत्री बाहुलीप्रमाणे बसवले होते. गुप्त माहिती उघडी करण्याइतके अधिकार त्यांना नसावेत.
आपला नम्र,
-गामा पैलवान
भाऊ, खर शिक्षण मिळाव हि आमच्या देशातील सरकारी बाबूंची व नेत्यांची खरेच इच्छा आहे का? शिक्षणाचा खेळ खंडोबा मांडणाऱ्या अनेक बाबुना व नेत्यांना शिक्षणाचा "अर्थ" आपला खिश्याच्या "अर्था" बरोबर जोडून घेतला आहे. त्यामुळे शिक्षण असून अक्कल नसलेले किती तरी अधिकारी आपल्याला पावलोपावली दिसतात. आणि हेच उंटावरून शेळ्याही हाकतात.....आणि उंटावरून शिक्षणाची धोरण ठरतात........म्हणूनच भ्रष्टाचाराची गंगा वाहते शुधीकारांच्या नावाने....म्हणूनच सिंचनाचे पाणी वाहते कसे हे समजत नाही .....राजकपूरच्या "राम तेरी गंगा मैली"ला ३० वर्षे उलटली तरीही आमच्या देशाची गंगा साफ होत नाही....ती अधिकाधिक मैली होत चालली आहे.......हेच आमच्या तथाकथित शिक्षणाचे व शिक्षित अधिकाऱ्यांचे कर्तुत्व.......मुंबई विध्यापिथाच्या कुल्गुरुंपासून ते अनेक विध्यापिठांचे "अपात्र" कुलगुरू आपल्याला चालत असतील तर अपेक्षा तरी काय ठेवणार तुम्ही त्यांच्या विध्यार्थ्यांकडून? कुठल खर शिक्षण मिळतंय मग कस कळेल ‘डीप असेटस’ या शिक्षणाची खोली समजू नये म्हणूनच पावडर, लिपस्टिकचा मुलामा लावून इंटरनशनल शिक्षण जोमाने पोसल असत का भाऊ शिक्षणाची खरी तळमळ असल्यावर .......माफ करा पण कायद्याला व मा. न्यायालयांच्या निर्णयाला देखील केराची टोपली दाखविण्याची हिम्मत आमच्या सरकारी बाबुनी केली असती? ज्याच्या बुडाखाली सत्ता आहे तोच येथे न्यायाधीश बनून निर्णय देत सुटल्यावर कसला न्याय आणि कसलं काय.... दोषी ठरणार तरी कोण आणि त्याला शिक्षा देणार तरी कोण? फसव सगळ .........सोयीनुसार न्याय ...........खरे सरकारी अधिकारी..........दुष्काळ व सामान्य शेतकऱ्यांच्या मरणाच्या नोंदीच कुठंच काय? .....
ReplyDeleteExcellent.
ReplyDeleteBhau Mast!!
ReplyDelete