दिल्लीत भाजपाकडे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा वा नेता नाही, असा दावा पहिल्या दिवसापासून केजरीवाल करत होते. त्यातले सत्य नाकारण्यात अर्थ नाही. तसा चेहरा वा नेता भाजपापाशी मागल्या पंधरा वर्षात नव्हता. म्हणून तर केजरीवाल नावाचा नवा चेहरा दिल्लीत आपले बस्तान बसवू शकला. नेमकी तीच कॉग्रेसचीही दुबळी बाजू होती. भाजपाच्या दुबळेपणाला कॉग्रेस आपली ताकद समजून बसली होती. दिल्लीत लोकमत कमालीचे प्रक्षुब्ध असताना प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने आवाज उठवण्यात कुठलाच पुढाकार घेतला नाही. टिव्हीच्या कॅमेरासमोर येऊन देखावा उभा करायचा आणि गल्लीबोळात भलेथोरले पोस्टर झळकवणारे विजय गोयल, यासारखे अनेक नेते भाजपातील पदे बळकावून बसल्याचा तो दुष्परिणाम होता. म्हणूनच जेव्हा जेव्हा लोकमत खवळले; तेव्हा रामदेव बाबा, अण्णा हजारे असे दिल्लीबाहेरचे चेहरे समोर आले आणि त्यांच्या सहवासात किरण बेदी वा केजरीवाल अशा नव्या चेहर्यांनी दिल्लीकरांबा भुरळ घातली. दोन वर्षापुर्वी दिल्लीच्या विधानसभा निवडणूकांचे वेध लागले आणि आम आदमी पक्षाचा प्रभाव दिसू लागला. तेव्हा भाजपाला धावपळ करून गोयल ह्यांना बाजूला करून हाडाचा कार्यकर्ता असलेल्या डॉ. हर्षवर्धन यांना पुढे करावे लागले होते. पण केजरीवाल यांच्या उत्साही व आक्रमक व्यक्तीमत्वापुढे हर्षवर्धन फ़िके पडले. कॉग्रेसच्या शीला दिक्षीत कालबाह्य झाल्या, तर त्यांनी आपल्याच आमदनीत पर्यायी नेतृत्व उभेच राहू दिले नाही. त्यापेक्षा आपल्याच पुत्राला वारस बनवण्याचे खेळ केले. त्यातून जी राजकीय नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली, त्यामुळे केजरीवाल झपाट्याने पुढे आले. पण पर्याय आणि उपाय यात जमीन अस्मानाचा फ़रक असतो. त्याची जाणिव दिल्लीकरांना लौकरच आली. म्हणूनच विधानसभेनंतर आलेल्या लोकसभा निवडणूकीत केजरीवालांकडे दिल्लीकराने पाठ फ़िरवली.
आज दिल्लीत पुन्हा केजरीवालांचा आवाज घुमतो आहे आणि तीच समस्या जशीच्या तशी कॉग्रेस व भाजपासमोर आलेली होती. दिडवर्षापुर्वी केजरीवाल जसे तीन महिने आधी कामाला लागले होते, तशीच त्यांनी याहीवेळी आधी सुरूवात केली होती. अन्य दोन पक्षांनी नेहमीप्रमाणेच अखेरच्या क्षणी मैदानात उडी घेतली आहे. मात्र कॉग्रेसने अजय माकन हा नवा चेहरा पुढे आणला असला, तरी त्याला कोणी लढत देणारा मानत नाहीत. कारण लागोपाठच्या दारूण पराभवाने कॉग्रेस पुरती नामोहरम झालेली आहे. इकडे लागोपाठ यश मिळवलेल्या भाजपाची अवस्थाही भिन्न नव्हती. त्यांच्यामागे जनतेच्या सदिच्छा असल्या तरी त्याचा लाभ उठवू शकेल असा आकर्षक चेहरा नव्हता. ज्येष्ठ जाणत्या नेत्यांची भाजपामध्ये रांग असली तरी आपल्या कुवतीवर पक्षाला विजयी करू शकणारे मदनलाल खुराणा वा साहिबसिंग वर्मा यासारख्या नेत्यांचा आजच्या दिल्ली भाजपात दुष्काळ आहे. त्यापेक्षाही केजरीवाल यांच्याशी दोन हात करू शकणारा लढवय्या भाजपामध्ये नाही. म्हणूनच त्याला किरण बेदी यांच्यासारखा चेहरा अंतिम क्षणी पक्षात आणावा लागला आहे. ही उसनवारी नक्कीच आहे. पण त्याखेरीज पर्यायही नव्हता. कारण मागल्या वेळेप्रमाणे केजरीवाल नवखे वा नवा चेहरा नाहीत. त्यांच्या नव्या पक्षाची ताकद विधानसभा व लोकसभा मतदानातून सिद्ध झालेली आहे. शिवाय मुख्यमंत्रीपदाचा चेहरा केजरीवाल यांच्या प्रयत्नांनी महत्वाचा मुद्दा करून ठेवला आहे. सहाजिकच दिल्लीत मोदी लाटेवर स्वार होण्यासाठी चेहर्याची गरज होती. अकस्मात बेदी यांचा चेहरा समोर आणुन तो धक्का भाजपाने दिला, हे नाकारता येणार नाही. हे कितपत नैतिक वा उचित आहे, त्याची वेगळी चर्चा होऊ शकते. पण कुठल्याही मार्गाने निवडणूका जिंकण्याचा हेतू अंतिम असला, मग अशा नैतिक सवालांना अर्थ उरत नाही.
असो. असे झाल्यावर मग मोदी व भाजपा विरोधकांना विनाविलंब किरण बेदी यांच्यावर शरसंधान करणेही भाग झाले आहे. चार दिवस भाजपात येऊन झाले नसतील इतक्यात बेदी यांच्या बाबतीत जेवढा गदारोळ झाला आहे, त्याकडे बघता, अमित शहांची ही खेळी नक्कीच तुरूपचा एक्का ठरली आहे. अनेक अर्थांनी किरण बेदी हा दिल्लीच्या मतदानात निर्णायक घटक ठरू शकतो. पहिली बाब म्हणजे भ्रष्टाचार विरोधात अण्णा हजारे चळवळीत केजरीवाल यांच्या इतकाच बेदींचा हिस्सा निघतो. दोघेही समान सुशिक्षित आहेत आणि आपापल्या कुवतीनुसार त्यांनी दिल्लीत दहा बारा वर्षे तरी राजकारणबाह्य समाजसेवेचे काम केलेले आहे. दोघांमधला एकच फ़रक आहे आणि तो बेदी यांना झुकते माप देणारा आहे. केजरीवाल यांना मुख्यमंत्रीपद मिळाल्यावर किंवा तत्पुर्वी प्रशासकीय पद मिळाल्यावर; त्यांनी कुठलीही चमक दाखवली नाही. नुसत्या तक्रारी करून अधिक अधिकार मागत राहून, त्यांनी प्रशासन चालवण्यातली नालायकी सिद्ध केली आहे. त्याच्या नेमकी उलट बाजू बेदी यांची आहे. दिर्घकाळ पोलिस सेवेत असताना त्यांनी विविध पदावर काम करत, त्या सेवेला लोकाभिमूख बनवण्याचे कष्ट घेतले आहेत. अपुरे अधिकार वा अडचणींच्या तक्रारी केल्या नाहीत. जेवढा अधिकार हाताशी आहे, तेवढ्याच्या बळावर गुन्हे कमी करण्यापासून कैद्यांना सुधारण्यापर्यंत आपल्या कुवतीचे प्रदर्शन घडवले आहे. बोलघेवडेपणा करण्यात मात्र त्या केजरीवाल यांच्या समोर तोकड्या आहेत. म्हणूनच असेल मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार म्हणून घोषणा झाल्यावर केजरीवाल यांनी बेदींना खुल्या चर्चेचे आमंत्रण दिले आणि तितक्याच तत्परतेने बेदी यांनी ते नाकारले. त्यावरून काहूर माजवण्यात आलेले आहे. पण त्यांनी नकारासाठी दिलेल्या कारणाचा कोणी गंभीरपणे विचार केला आहे काय? बेदींनी असा इन्कार कशाला केला?
आपण चर्चा व वादावादीपेक्षा कृतीवर विश्वास ठेवतो. त्यामुळे चर्चा करायची असेल, तर उद्या विधानसभेच्या बैठकीत जरूर केजरीवालांशी वाद घालू; असे बेदी म्हणाल्या. पण आज निवडणूक प्रचारात अशा चर्चा वादविवादाची गरज नाही, असे म्हणत त्यांनी आमनेसामने चर्चेला नकार दिला आहे. पण तसे सांगताना त्यांनी एक पुस्तीही जोडली. केजरीवाल नुसत्या वादविवादावर विश्वास ठेवतात आणि आपण कृतीवर श्रद्धा ठेवतो. बेदींच्या या विधानाचा अर्थ काय? मागल्या दोनतीन वर्षात केजरीवाल सार्वजनिक जीवनात आल्यापासून मुख्यमंत्री होईपर्यंत त्यांची बकवास खुप केली. पण जी मुक्ताफ़ळे उधळली, त्यापैकी किती गोष्टींना त्यांनी न्याय दिला? किती गोष्टी करून दाखवल्या? मोठ्या वल्गना करायच्या आणि नंतर त्यापासून पळ काढायचा; हे केजरीवाल सुत्र राहिले आहे. मग विषय जनता दरबाराचा असो किंवा जनलोकपाल विधेयकासाठी राजिनामा देण्याचा असो. ज्या विधेयकासाठी वर्षभरापुर्वी राजिनामा दिला, तो जनलोकपाल आता त्यांच्या बोलण्यातूनही गायब आहे. जनता दरबारात लोटलेल्या गर्दीला बघून केजरीवाल मंत्रालयाच्या छपरावर पळून गेले होते. वैधानिक मार्गाने जनलोकपाल विधेयक आणण्यापेक्षा त्यांनी घटनाबाह्य नाटके करून पदाचा राजिनामा दिला होता. मग त्याच राजिनाम्यावर जनता खुश असल्याच्या थापा मारणारे केजरीवाल, आज सातत्याने पाच वर्षे मुख्यमंत्री रहाण्याच्या गमजा करतात व जनलोकपाल विषय बोलतही नाहीत. बंगला-गाडी नको म्हणत प्रत्येक सुविधा मुदत संपल्यावरही उपभोगताना त्यांना आपलेच शब्दही आठवत नाहीत. इतक्या कोलांट्या उड्या मारणार्याशी वादविवाद कसला होऊ शकतो? मुद्दे मांडण्यापेक्षा नुसत्या आरोपाची आतषबाजी करून लोकांना दिपवण्याच्या बडबडीला वादचर्चा म्हणत नाहीत, त्याला फ़सव्या युक्तिवादाची बनवेगिरी म्हणतात. मग त्या सापळ्यात बेदींनी फ़सावे कशाला?
No comments:
Post a Comment