Saturday, January 10, 2015

यात कुठला गुन्हा असू शकतो?



फ़्रान्समध्ये जो रक्तरंजित खेळ झाला, त्यासाठी आता इथले तमाम अविष्कार स्वातंत्र्यसेनानी चिडीचूप झाले आहेत. अवघ्या आठवड्यापुर्वी त्यांच्यातल्या लढायच्या खुमखुमीला ऊत आलेला होता. आमिरखानच्या ‘पीके’ नामक चित्रपटाचे भांडवल करून हे योध्दे तलवार उपसून रणांगणात उतरले होते. कुणा नगण्य हिंदुत्ववाद्याने त्या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केल्याने, अशा स्वातंत्र्य सेनानींचे शौर्य उफ़ाळून आलेले होते. मात्र फ़्रान्समध्ये कलानिश्कोव्ह घेऊन सरसावलेल्या हल्लेखोरांनी बारा पत्रकारांना कंठस्नान घडवल्यावर इथल्या सेनानींचे उसने अवसान पुरते गळाले आहे. कोणी म्हणून अविष्कार स्वातंत्र्याच्या गळचेपीवर अवाक्षर बोलायला तयार नाही. नाही म्हणजे ज्यांनी हत्यार उपसले आहे, त्यांच्याविषयी शब्द बोलायची हिंमत नाही. अर्थात ती कधीच नव्हती आणि त्याची साक्ष खर्‍या लेखन स्वातंत्र्य सैनिकांनी अनेकदा दिलेली होती. मग सेटॅनिक व्हर्सेसचा लेखक सलमान रश्दी असो किंवा ‘लज्जा’ची लेखिका तस्लिमा नसरीन असो. यापैकी तस्लिमाने ‘पीके’ प्रदर्शित होताच त्याच्या समर्थनाला पुढे सरसावलेल्या भुरट्या स्वातंत्र्य सैनिकांची पुरती अब्रुच ट्वीट करून घेतली होती. ज्यांची कोणाची हिंमत आहे, त्यांनी कुठल्या विषयावर चित्रपट काढावा आणि कुठे काढावा, त्याचेही बहुमोल मार्गदर्शन तस्लिमाने केलेले होते. ‘पीके’वर मतप्रदर्शन करताना तस्लिमा म्हणते, ‘पाकिस्तान बांगला देशात असा चित्रपट काढणार्‍याची एव्हाना हत्याच झाली असती.’ तिच्या म्हणण्याचा अर्थ इतकाच, की जे कोणी इथे भारतात हिंदूंच्या श्रद्धा दुखावण्याचा पुरूषार्थ दाखवत आहेत, त्यांनी तशी हिंमत इस्लामवर मुस्लिम देशात चित्रपट काढून दाखवावी. तिचे शब्द मुस्लिम श्रद्धाळूंनी खोटे पडू दिले नाहीत. अवघ्या आठदहा दिवसात इस्लामची धार्मिक टवाळी करणार्‍यांना कंठस्नान घातले.

२०१४ च्या अखेरच्या दिवशी आम्ही त्याच संदर्भात ‘चॅनेलवाले बहुतही कमात है, आमिरखान खाये जात है’ या प्रदिर्घ शिर्षकाचा स्तंभलेख लिहीला होता. त्यामध्ये तस्लिमाच्या वक्तव्याचा उलगडा केलेला होता. आता त्याची प्रचिती आलेली आहे. यात मुद्दा धर्माचा वा श्रद्धेचा नसून त्यामागच्या असहिह्णूतेचा आहे. धर्माची निंदा करताना कोण त्यात सुट देतो आणि कोण कसलीच मुभा देत नाही, यातले तारतम्य सोडले; मग बुद्धीला कुठलेच तारतम्य उरत नाही. भारतीय बुद्धीवाद व पत्रकार यांची तीच दुर्दशा झालेली आहे. त्यातून मग एका बाजूला धर्मांधता सोकावत चालली आहे आणि दुसरीकडे समाजात धार्मिक तेढ वाढण्यास हातभार लावला जात आहे. त्यातून मग जे लोक श्रध्दावान आहेत, पण माथेफ़िरू नाहीत, त्यांनाही कडवे बनवण्याचा उद्योग वाढला आहे. एकप्रकारे अशा संयमी समाज घटकांनाही चिथावण्या दिल्या जात आहेत. कारण नास्तिक म्हणून मिरवणार्‍यांना कुठल्याच धर्माशी कर्तव्य नाही, की कुठल्याही धर्माची जाण नाही. मग असे अर्धवटराव सर्वच धर्माना किंवा त्यांच्या अनुयायांना सरसकट एकाच मोजपट्टीने वागवतात आणि तेच योग्य ठरवण्यासाठी बेछूट खोटेपणाही करतात. मग फ़्रान्ससारखी घटना घडल्यावर त्या शहाण्यांची बोबडी वळत असते. इथे फ़्रान्समध्ये कोणीतरी प्रेषिताची व्यंगचित्रे काढली वा छापलेली आहेत. त्यावरून असे हत्याकांड होऊ शकले. भारतात एका चित्रकाराने तशीच हिंदू देवतांची विटंबना करणारी चित्रे काढल्यावर त्याच्या विरोधात न्यायालयात कोणी दाद मागितली होती. तर या चित्रकाराने कायद्याला घाबरून परदेशी पळ काढला. मग आमचे विचार स्वातंत्र्यवादी न्यायालयात दाद मागण्यालाही दहशतवाद ठरवण्यासाठी बुद्धी खर्ची घालत होते. कोर्टात दाद मागणे व बंदूक हाती घेऊन थेट गोळ्या झाडण्यातले साम्य, केवळ भारतीय सेक्युलर बुद्धीवादालाच शोभू शकते.

असो. ही समस्या नेमकी काय आहे? भुरट्या सेक्युलरांपेक्षा आपण ती समस्या एका इस्लामच्या अभ्यासकाकडून समजून घेतलेली बरी नाही का? अब्दुल कादर मुकादम हे इस्लामचे गाढे अभ्यासक मानले जातात. अनेकदा असे विषय आले, मग आपण त्यांना कुठल्या ना कुठल्या वृत्तवाहिनीवर विवेचन करताना ऐकतो. त्यात ते हिरीरीने इस्लाम हा शांततावादी धर्म असल्याचे सांगतात. म्हणूनच त्यांच्यावर कोणी इस्लाम विरोधक असल्याचा आरोप करू शकणार नाही. पण तेच मुकादम मुस्लिम व इस्लामच्या अनुयायांविषयी काय सांगतात? तेच मुस्लिमांच्या धार्मिक जाणिवांविषयी कोणते व्यवच्छेदक विवेचन करतात? काळजीपुर्वक वाचण्यासारखा त्यांच्याच लेखातील हा उतारा आहे आणि तो प्रेषिताविषयीच्या एका वादातूनच आलेला आहे. पाच वर्षापुर्वी दैनिक ‘सकाळ’मध्ये लिहीलेल्या त्यांच्या लेखाचे शिर्षक होते, ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याला धर्मसत्तेचे आव्हान’ त्या लेखात इस्लामच्या अनुयायांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यापुढे उभ्या केलेल्या आव्हानाविषयी मुकादम म्हणतात, ‘जगात मुस्लिम नसणार्‍यांची संख्या मुसलमानांपेक्षा अधिक आहे हे मुसलमानांना माहित आहे व मान्यही आहे. पण मुसलमान नसण्याचा त्यांचा अधिकार मुसलमानांना मान्य आहे काय? हा लाखमोलाचा प्रश्न आहे. वरवर दिसतो तितका हा प्रश्न साधा व सरळ नाही. कारण बिगर मुसलमान असणे व त्यांचा मुसलमान नसण्याचा अधिकार मुसलमानांनी मान्य करणे यात महत्वाचा असा गुणात्मक फ़रक आहे. बिगर मुसामानांचा हा अधिकार मान्य करणे म्हणजे मुसलमानांना श्रद्धेय व पूजनिय वाटणार्‍या सर्वच गोष्टींकडे पहाण्याचा दृ्ष्टीकोन मुसलमानांइतका श्रद्धेय असू शकत नाही. त्यांचा दृष्टीकोन चिकित्सक अभ्यासकाचाच असेल हेही मान्य करणे अपरिहार्य ठरते’. यातून आपल्याला फ़्रान्समधील हल्ल्यामागची नेमकी मानसिकता उलगडू शकते.

मुळात इस्लामची धर्मचिकित्सा करण्याचा प्रश्नच येत नाही. एकदा कोणी इस्लाम स्विकारला, मग त्याला आपल्या धर्माचे संरक्षण करण्याचा अधिकार आपोआपच मिळत असतो. पण तेवढ्यावर इस्लामच्या अनुयायाचे अधिकार संपत नाहीत. इतर जे कोणी मुस्लिम नसतील वा त्यांनी इस्लामखेरीज अन्य धर्म स्विकारलेला असेल वा नास्तिक असतील, तर त्यांच्या तशा बिगर मुस्लिम असण्याला मुस्लिमांची मान्यता असणे अगत्याचे असते. तुम्हाला इस्लाम स्विकारण्याची मुभा आहे. इस्लाम नाकारला, मग तुमची सर्व स्वातंत्र्ये वा अधिकार हक्क मुस्लिमांकडे गहाण पडतात, असाच उपरोक्त विवेचनाचा अर्थ होत नाही काय? म्हणजे निदान जगभरचा मुस्लिम तरी त्याच भूमिकेतून जगतो व वागतो, असेच मुकादम सुचवत नाहीत काय? एकदा हे विवेचन समजून घेतले, मग फ़्रान्समधल्या त्या हल्लेखोरांनी कुणावरही अकारण हल्ला केलेला नाही हे लक्षात येईल. जे मारले गेले ते निष्पाप निरपराध नव्हते, हे लक्षात येईल. बिगर मुस्लिम असणे हा पहिला गुन्हा आहे आणि मुस्लिम नसताना प्रेषिताविषयी चिकित्सक भूमिका घेणे, आणखीच मोठा अक्षम्य गुन्हा आहे. इतके मोठे गुन्हे राजरोस चालू देणे, भले तुमच्या आधुनिक कायद्याला न्याय्य वाटत असेल, पण इस्लामला ते मान्य नाही. सहाजिकच अशा कुठल्याही कृतीतून इस्लामचा घोर अपमान व विटंबना होत असते. तुमचा देश वा समाज बहुविध धर्माचा असेल, पण त्यात इस्लामला मान्यता दिली, मग त्या इस्लामच्या अनुयायाला आपोआप आपले धर्मकायदे लागू करण्याचा अधिकार प्राप्त होत असतो. इस्लाम नुसता भक्ती वा अध्यात्माचा धर्म नाही, ती संपुर्ण जीवनशैली आहे आणि त्यात इतरांना कुठलेही अधिकार असू शकत नाहीत. मग त्यातून कुठला पत्रकार वा लेखक कसा सुटू शकेल? आपण इस्लामच्या अनुयायांची मानसिकता समजून घेतली, तर यात कुठला गुन्हा आढळणार नाही.

No comments:

Post a Comment