कुठल्याही संघटना किंवा संघाला जिंकायचे असेल, तर अगोदर आपण कोणत्या कारणास्तव पराभूत झालो, त्याचे आत्मपरिक्षण करणे अगत्याचे असते. आपली रणनिती व डावपेच कुठे चुकले वा कशामुळे चुकले; त्याचे परिशीलन करणे आवश्यक असते. याच्या उलट सतत तेच तेच फ़सलेले डाव खेळत रहाणारा संघ पराभव टाळू शकत नसतो. किंबहूना तो नवा पराभव आपल्याच कर्माचे ओढवून आणत असतो. दिल्लीत वर्षभरापुर्वी उदयास आलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या नव्या पक्षाची अवस्था काहीशी अशीच झाली आहे. आपण चुकलो हेच त्यांना मुळात पचलेले नाही, म्हणून चुक सुधारण्याचा विषयच त्यांच्या मनाला शिवलेला ,नाही. म्हणूनच मग लोकसभा निवडणूकीत फ़सलेल्या कल्पना घेऊन त्यांनी नवी लढाई जिंकायचे मनसुबे रचले आहेत. अर्थात त्यांनी नुसत्या लोकसभेतील दारुण पराभवाचा अभ्यास करण्यापुर्वी, मुळात मागल्या विधानसभा निवडणूकीत जिंकलो कशापायी, याचा गंभीरपणे तपास करायला हवा. त्यांना केवळ जनलोकपाल आंदोलनाने इतके मोठे यश मिळाले असे वाटले, तर नवल नाही. पण केवळ लोकपाल व भ्रष्टाचार याच कारणांनी केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष इतके मोठे यश मिळवू शकला नव्हता. लागोपाठ पंधरा वर्षे तिथली सत्ता निरंकुश भोगणार्या कॉग्रेसच्या मस्तवालपणाला लोक वैतागले होते आणि पर्याय शोधत होते. तितका उत्साहवर्धक प्रतिसाद त्यांना भाजपाकडून मिळाला नव्हता. म्हणूनच लोकांमध्ये केजरीवाल या नव्या तरूण नेत्याविषयी आस्था-अपेक्षा निर्माण झाल्या होत्या. त्याचे रुपांतर मतदानात झाले. पण तरीही लोकांनी कॉग्रेस नाकारताना भाजपालाच झुकते माप दिलेले होते. ‘आप’ला मते मिळाली ती कॉग्रेस व भाजपापेक्षा अन्य पक्षाची. ही मते कुणाची व कशामुळे आपल्या नावावर जमा झाली, त्याचा शोधही आजवर केजरीवाल यांनी घेतलेला नाही.
दिल्लीच्या राजकारणात भाजपा व कॉग्रेस हेच दोन प्रमुख प्रतिस्पर्धी दिर्घकाळ राहिलेले आहेत. त्यांच्यात तिसरा पक्ष सहसा पुढे कधीच आलेला नव्हता. पण मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाने २००८ च्या निवडणूकीत तिथे चंचूप्रवेश केला आणि चांगली मते मिळवली होती. दोन आमदार असलेल्या त्या पक्षाचा केजरीवाल यांनी संपुर्ण सफ़ाया केला आणि तोच त्यांच्या मतांचा खरा पाया आहे. त्याखेरीज नाराज कॉग्रेसी मतांचा मोठा हिस्सा त्यांच्याकडे वळला. त्यातून त्यांचे पारडे इतके जड झाले आणि विधानसभेत दुसर्या क्रमांकाचा पक्ष होण्यापर्यंत त्यांनी पहिल्याच लढतीमध्ये मजल मारली. त्यामध्ये केजरीवाल यांच्या काही चलाख्याही कामी आल्या. दिल्लीच्या एकूण भ्रष्टाचार व नाराजीचे प्रतिक बनलेल्या शीला दिक्षीत यांच्या विरोधात थेट लढायची मर्दुमकी त्यांनी दाखवली होती. याशिवाय दिर्घकाळ केजरीवाल यांची सेवाभावी संस्था झोपडपट्टी व गरीब वस्तीमध्ये काम करत होती अधिक अण्णा आंदोलनाचा चेहरा असल्याचाही लाभ त्यांना मिळाला. याचा एकत्रित परिणाम म्हणून पहिल्याच लढतीमध्ये इतके मोठे यश त्यांना मिळवता आले. त्याला केजरीवाल आपली शक्ती समजून बसले. पण ती त्यांच्या पक्षाची राजकीय ताकद नव्हती, तर दिल्लीकरांच्या शुभेच्छा त्यांना मताच्या रुपाने मिळालेल्या होत्या. जशा त्या मुंबईत २००९ सालात राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाला मिळालेल्या होत्या. दोघांनीही पुढल्या काळात त्याच सदिच्छांना पायदळी तुडवण्यात धन्यता मानली. ज्या सदिच्छा मिळाल्या होत्या, त्याचा सदुपयोग केजरीवाल यांनी पुढल्या दहाबारा महिन्यात केला असता, तर तीच मते त्यांच्या पक्षासाठी ताकद बनली असती. पण त्याच सदिच्छा लाथाडून केजरीवाल देशव्यापी राजकारणात उतरले. त्यांना उभे करणार्या जुन्या सहकार्यांनाही लाथाडण्यापर्यंत त्यांची मजल गेली. कुठल्याही बनेल राजकारण्यापेक्षा केजरीवाल बेताल वागत गेले.
थोडक्यात दिल्लीच्या राजकारणात जो तिसरा पर्याय म्हणून लोकांनी स्विकारला होता, त्याचे सोने करून देशव्यापी तिसरा पर्याय व्हायची संधी, त्यांनीच मातीमोल करून टाकली. एक तर पहिल्या दिवसापासून मुख्यमंत्री म्हणून कारभार करण्यापेक्षा केजरीवाल आंदोलनाचा पवित्रा घेऊन प्रसिद्धी माध्यमात चमकण्याच्या पळापळीत राहिले. लोकांना दिलेली आश्वासने विसरून मनमानी करीत गेले. गाडी बंगला सुरक्षा नको म्हणून गाजावाजा करणार्या केजरीवालनी बंगला घेतलाच, पण मुख्यमंत्रीपद सोडल्यावरही सात महिने बंगला मात्र सोडायला नकार दिला. साधेपणाचे नाटक करताना त्यांचे खर्चिक खेळही चव्हाट्यावर येत गेले. तेव्हा सराईत राजकारण्यासारखी सारवासारव करण्यात त्यांनी धन्यता मानली. आरोप व सनसनाटी यातून प्रसिद्धी मिळवताना त्यातूनच लोकप्रियता व मते मिळतात, अशा भ्रमात ते रममाण होऊन गेले. हळूहळू त्याला मनोरंजनाचे स्वरूप येत गेले आणि परिणामी लोकांच्या सदिच्छा रोडावत गेल्या. तरीही दिल्लीत लोकसभेची एकही जागा न मिळणार्या त्यांच्याच पक्षाला मते मात्र लक्षणिय मिळाली. त्याचे श्रेय केजरीवाल यांच्यापेक्षा नाकर्त्या कॉग्रेसचे होते. आज आम आदमी पक्षाचे बळ दिल्लीत जितके दिसते आहे, त्याचे खरे श्रेय मरगळलेल्या कॉग्रेसला आहे. थोडक्यात आता ‘आप’ने दिल्लीत कॉग्रेसची जागा व्यापलेली असून केवळ त्यामुळेच बिगरभाजपा मतांसाठीचा एक पर्याय, इतकेच आपचे स्थान आहे. त्यामुळे केजरीवाल लढतीमध्ये दिसत आहेत. भाजपाला सत्तेबाहेर ठेवायच्या आत्मघातकी पवित्र्याने कॉग्रेसची बरीच मते आपकडे गेली. लोकसभेतही त्याचेच प्रतिबिंब मतदानात पडले होते. आताही आरोप व सनसनाटीच्या बडबडीपेक्षा असलेल्या लोकांच्या सदिच्छांची जोपासना केजरीवाल यांनी केली, तर त्यांना चांगले यश मिळू शकेल. पण जित्याची खोड म्हणतात, तसे त्यांचा पक्ष आजही प्रसिद्धीच्या सापळ्यातच फ़सला आहे.
लोकपाल आंदोलन व पुढल्या काळात सोवळेपणाचे जे नाटक केजरीवाल यांनी रंगवले होते, त्यामुळे जी वेगळी प्रतिमा उभी राहिली होती, ती आता लयास गेलेली आहे. इतर कुठल्याही सत्तालोलूप व मतलबी राजकीय पक्षापेक्षा आप पक्षाला कोणी वेगळे मानत नाही. जर कॉग्रेसपाशी समर्थ नेतृत्व असते आणि झुंजण्याची इच्छा असती, तर केजरीवालांची महत्ता कुठल्या कुठे अस्तंगत होऊन गेली असती. पण अनेक राज्यात व केंद्रातली सत्ता गमावलेला कॉग्रेस पक्ष दिल्लीत लढायच्याही अवस्थेत राहिला नाही. म्हणूनच बिगर भाजपा मतदारासाठी केजरीवाल इतकाच पर्याय आहे. म्हणून आप पक्षाला प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. उद्या तिसरा कुठला पक्ष राजकारणात शड्डू ठोकून उतरला, तर केजरीवाल यांची सद्दी संपुष्टात यायला वेळ लागणार नाही. कारण त्यांनी अजून व इतक्या अपयशानंतरही राजकारण गंभीरपणे करायची इच्छा दाखवलेली नाही. निवडणूक असो किंवा संघटनात्मक कार्य असो, केजरीवाल कुठेच चुका सुधारताना दिसत नाहीत. आताही त्यांनी आपल्या मतदाराला चुचकारण्याचे सोडून पुन्हा लोकसभेप्रमाणे भाजपावर दोषारोप करण्याचा सपाटा लावला आहे. याच भूमिकेतून वाराणशीला जाऊन मोदींना हरवण्याच्या नादात त्यांनी आपले बलस्थान असलेली दिल्लीही गमावली. आताही पंतप्रधान आपल्याला घाबरलाय, असली पोरकट भाषा त्यांच्याकडून ऐकू येते. याचा अर्थ ह्या पक्षाला राजकारणात कुठले भविष्य नाही, याचीच साक्ष आहे. ज्याला जनता व मतदारांच्या सदिच्छा ओळखता येत नाहीत, त्याला सार्वजनिक जीवनात भवितव्य नसते. मग तो राज ठाकरे असो, राजू शेट्टी असो किंवा केजरीवाल असो. दिर्घकालीत राजकारण करायचे असेल, तर मिळालेले यश पचवून, झालेल्या चुका सुधारण्याची मानसिकता लागते. केजरीवाल व त्यांच्या सहकार्यांकडे त्याचास दुष्काळ आहे.
No comments:
Post a Comment