Thursday, January 1, 2015

कोळसा उगाळावा तितका काळाच ना?



महाराष्ट्रात मागल्या दोन दशकात इतके दहशतवादी हल्ले बेछूटपणे व बिनबोभाट का होऊ शकले, त्याचे उत्तर आपल्याला खुप दूर शोधण्याचे कारण नाही. महाराष्ट्र पोलिस खात्यात महानिरिक्षक पदापर्यंत पोहोचू शकलेल्या व्यक्तीने  उधळलेली मुक्ताफ़ळे आणि तत्पुर्वी त्यांनी लिहीलेले पुस्तकच त्याचा सज्जड पुरावा आहे. ज्या प्रकरणाचे थेट चित्रण व थेट प्रक्षेपण जगाने प्रत्यक्ष बघितले आणि ज्याचा अतिशय बारकाईने तपास झाला, त्याबद्दल बेताल बडबड करण्याचे धाडस एक माजी वरीष्ठ पोलिस अधिकारी करू शकत असेल, तर त्याच्या कारकिर्दीत किती बजबजपुरी माजलेली असेल, त्याचे खरेच संशोधन व्हायला हवे. २६/११/२००८ रोजी मुंबईत झालेल्या हल्ल्यात हेमंत करकरे आणि अन्य अधिकार्‍यांची शेकडो लोकांसह हत्या झाली. तेव्हा त्या सर्वांवर बेफ़ाम गोळ्या झाडणारा जिहादी अजमल कसाब लोकांनी पाहिला आहे आणि त्याच्यावरच झडप घालून त्याला जिवंत पकडताना तुकाराम ओंबाळे हा जिद्दी अधिकारी मारला गेला. असे असताना करकरे यांची हत्या हिंदूत्ववादी भारतीय गुप्तचर खात्याने कारस्थानी पद्धतीने घडवून आणली, असा दावा करणे निव्वळ मुर्खपणाचेच नाही तर शंकास्पद आहे. याचे कारण माजी महानिरिक्षक एस एम मुश्रीफ़ यांनी त्याविषयी केलेले विवेचन कुठल्याही ठोस पुराव्यावर आधारलेले नाही. एक पोलिस अधिकारी आपला संशय वा आरोप निव्वळ ऐकीव माहिती व वृत्तपत्रिय बातम्यांच्या आधारे करतो, तेव्हा त्याच्या पोलिसी कर्तबगारीवरच प्रश्नचिन्ह लागत असते. पण आपल्याकडे कुठल्याही थापा व कल्पनाविलास ऐकून घेणर्‍यांची वानवा नसल्याने, असे बेताल आरोप होऊ शकतात आणि त्याला प्रसिद्धीही मिळू शकत असते. म्हणूनच मुश्रीफ़ यांच्या पुस्तक वा आरोपांचा इतका गवगवा होऊ शकलेला आहे. पण कितीजणांनी ते पुस्तक बारकाईने वाचले आहे, त्याविषयी शंकाच आहे.

 मुश्रीफ़ यांचे ते पुस्तक नवे नाही. चारपाच वर्षे त्याला होऊन गेली आहेत आणि त्याची भाषांतरेही होऊन गेली आहेत. त्याच्या प्रस्तावनेतच आपण कुठलेही तपासकाम वा संशोधन केलेले नाही, याची ग्वाही मुश्रीफ़ यांनी दिलेली आहे. ज्याला कोर्टाच्या व कायदेशीर खटल्याच्या भाषेत ऐकीव गावगप्पा (hearsay) असे म्हणतात, त्याच्यावर मुश्रीफ़ यांचा सगळा आरोप वा सिद्धांत आधारलेला आहे. वृत्तपत्राच्या आधारे घटनेचे तपास व खटले भरले गेले असते, तर पुराव्याच्या कायद्याची गरज तरी काय होती? मुश्रीफ़ आणि तत्सम पुरोगामी लोकांच्या मनात इतके भ्रम ठासून भरलेले आहेत, की त्यांना आपला कल्पनाविलासच सज्जड पुरावा वाटत असतो. म्हणूनच त्यांनी असे उंदीर पोखरून डोंगर काढण्याचे चमत्कार आजवर अनेकदा केलेले आहेत. गुजरात दंगलीच्या निमीत्ताने बारा वर्षाहून अधिक काळ असे कागदी घोडे खुप लढवले गेले आहेत. मुश्रीफ़ त्याचीच पुनरावृत्ती महाराष्ट्रात करायला निघालेले दिसतात. पण हायकोर्टाचे न्यायाधीश म्हणुन काम केलेले कोळसे पाटिल यांच्या समर्थनाला उभे रहातात, तेव्हा नवल वाटते. ज्या पुस्तकाच्या प्रस्तावनेतच आपले आरोप वृत्तपत्रिय बातम्या व माहितीवर आधारीत असल्याचे लेखक कबूल करतो, त्याचे मनोरंजनात्मक विवेचन सामान्य रसिकांनी ऐकले तर बिघडत नाही. पण एका माजी न्यायमुर्तीने त्याला मान्यता द्यावी काय? ज्या घटनाक्रमावर प्रदिर्घ तपास झाला आणि लहानसहान पुरावे गोळा करून प्रदिर्घ खटला चालवला गेला, त्यात शेकडो पुरावे समोर आलेले आहेत. कोर्टात शेकडो प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी आपल्या साक्षी दिलेल्या आहेत. त्या सगळ्यांना कोणी आपल्या कल्पनाविलासासाठी खोटे पाडत असेल, तर त्याचे डोके तपासणे योग्य ठरावे. कारण गुन्हा तपास आणि त्यावरची सुनावणी कोर्टात होत असते, सभामंडपातल्या व्याख्यानाचा तो विषय नसतो.

मुश्रीफ़ किंवा कोळसे पाटिल यांचा इतकाच आपल्या कारस्था्नी आरोपावर विश्वास होता, तर त्यांना कसाब खटल्यात सहभागी व्हायला कोणाची आडकाठी नव्हती. जो तपास झाला व जे आरोपपत्र दाखल झाले, त्याविषयी त्यांचे दुमत असेल, तर त्या खटल्यात एक पक्षकार म्हणून त्यांना भाग घेता आला असता. खुद्द माजी न्यायमुर्ती असलेल्या व्यक्तीला त्यात पक्षकार होण्यापासून कोणी रोखू शकले नसते. पण दोन्ही महोदयांनी त्यापैकी काहीच केले नाही. मुश्रीफ़ पुस्तक लिहून संशयाचा गुंता वाढवत राहिले आहेत आणि कोळसे पाटिल त्याच साबणाचे बुडबुडे उडवण्यात धन्यता मानत राहिले आहेत. ज्या खटल्याची जागभर दखल घेतली गेली, त्यामध्ये हे महाभाग करकरे हत्याकांडाचा आरोप घेऊन सहभागी झाले असते, इतर कोणी नाही तरी पाकिस्तानने या दोघांची पाठराखण नक्कीच केली असती. कारण यात आरोपी तिथलेच नागरिक धरले गेले होते. जगासमोर पाकिस्तानला दहशतवादी देश ठरवला जाणारा असा हा खटला होता. त्यापासून पाकिस्तानला आपली सुटका करून घेता आलीच असती ना? भले पाकिस्तान आपला शत्रू देश असेल, पण त्याला त्याच्यावरील खोट्या आरोपातून आपली सफ़ाई देण्याची संधी मिळाली असती. ज्या तपासामुळे व पुराव्यामुळे जगभरच्या बहुतेक संस्थांनी पाकिस्तानला गुन्हेगाराच्या पिंजर्‍यात उभे केले किंवा जमात उद दावा व सईद हाफ़ीज यांना दहशतवादी घोषित केले, त्याबद्दल शंका घेणारे महाभाग फ़क्त पाकिस्तानातच आढळतात आणि दुसरे इथे महाराष्ट्रात. कारण त्यांच्या मते करकरे यांना कसाब टोळीने मारले नसून ते भारतीय गुप्तचर खात्याचे कारस्थान होते. इतकी बौद्धिक दिवाळखोरी जगाच्या पाठीवर कुठल्या देशात वा समाजात कधी होऊ शकणार नाही. पण सेक्युलर झिंग इतकी असू शकते, की तिथे माणुस हत्तीला मुंगी वा मुंगीला हत्ती ठरवण्यासही मागेपुढे बघत नाही. मुश्रीफ़ त्याचा उत्तम नमूना आहे.

कोल्हापूर येथे अलिकडेच त्यांचे व्याख्यान झाले आणि त्यात त्यांनी जगाला आव्हान दिले आहे. काय आहे त्यांचे आव्हान? ‘मी पुस्तकातून मांडलेली माहिती खोटी असल्याचे ‌कोणीही सिद्ध करून दाखवावे.' असे मुश्रीफ़ म्हणतात. त्यांच्या ‘हु किल्ड करकरे’ या इंग्रजी मुळ पुस्तकाची प्रस्तावना त्यांनी स्वत:च पुन्हा एकदा वाचावी. मग आपणच आपली माहिती खात्रीची वा विश्वासार्ह नसल्याची ग्वाही दिल्याचे त्यांच्या लक्षात येईल. वृत्तपत्राच्या बातम्यांवर आधारित आपला सिद्धांत असल्याचे प्रस्तावनेत सांगणारा लेखक, कुठल्या माहितीविषयी बोलतो आहे? त्यांचा संशय, शंका व सिद्धांत स्पेशल कोर्टापासून हायकोर्ट व सुप्रिम कोर्टातल्या सुनावणीतच खोटा  असल्याचे रितसर सिद्ध झालेले नाही काय? कसाब व त्याच्या सहकार्‍यानेच करकरे यांना गोळ्या घातल्याचे त्याच जीपमध्ये जखमी पडलेल्या पोलिस शिपायाने साक्ष देऊन सिद्ध केलेले नाही काय? मग त्याच करकरे यांना आयबी म्हणजे भारतीय गुप्तचर खात्याने कारस्थान शिजवून मारले, असा आरोप करणे किती बिनबुडाचे असू शकते? माणूस किती टोकाला जाऊन बेताल बडबड करू शकतो, त्याचा अप्रतीम नमूना म्हणून मुश्रीफ़ यांच्या या पुस्तकाचे दाखले देता येतील. कारण पुस्तकाच्या आरंभी प्रस्तावनेच्या पहिल्या परिच्छेदातच आपले हे पुस्तक पोलिसीकामाचा व सामाजिक क्षेत्रातला अनुभव आणि वृत्तपत्रे व नियतकालिकातील प्रकाशित मजकुराच्या संशोधनावर आधारलेले असल्याची कबुली आहे. पण आपल्यापाशी कुठली ठाम माहिती वा ठोस पुरावा असल्याचा किंचितही दावा मुश्रीफ़ यांनी केलेला नाही. म्हणजेच आपण सत्याधिष्ठीत वस्तुनिष्ठ पुराव्यानिशी आरोप करत नसल्याचीच कबुली आहे. मग त्यांचे पुस्तक वा माहिती कोणी खोटी पाडायचे प्रयोजनच कुठे उरते? मुश्रीफ़ ज्या खोट्याची इतकी स्पष्ट कबुली देतात, त्याची शहानिशा करायची म्हणजे कोळसा उगाळावा तितका काळाच ना?

1 comment:

  1. ‘मी पुस्तकातून मांडलेली माहिती खोटी असल्याचे ‌कोणीही सिद्ध करून दाखवावे.' मुश्रीफ़


    मुश्रिफ़ानी केलेले आरोप सत्य आहेत हे सिद्ध करुन दाखवावे,रोख एक कोटी रुपये देऊन त्यांचा सत्कार करायला मी तयार आहे.

    ReplyDelete